मागील ब्लॉगमध्ये आपण भारतीय इंग्रजी कादंबरीकार राजा राव यांच्याबद्दल आणि त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाबद्दल थोडक्यात जाणून घेतले. आज त्यांच्या पहिल्याच आणि गाजलेल्या कादंबरीचे- ‘कांथापुरा’चे कथानक, कथन आणि कथासूत्रे याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘कांथापुरा’ ही कादंबरी राजा राव यांनी ते फ्रान्समध्ये असताना म्हणजे १९३८ साली लिहिली आहे. मात्र या कादंबरीचे कथानक भारतात घडणारे आहे. विशेषतः ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधीत आहे.स्वतः राजा राव यांनी या कादंबरीच्या अखेरीस कादंबरीलेखनाचा काळ आणि या कादंबरीच्या भाषांतरांबद्दल लिहिले आहे.ते म्हणतात की ‘कांथापुरा’ त्यांनी फ्रान्समधील आल्प्स पर्वतातील एका १३ व्या शतकातील भक्कम गढीत बसून लिहिली. सभोवती बर्फाळ निसर्ग आणि थंड हवा असताना भारतातील कारवारमधील एका छोट्या गावात स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रखर उठावाची धग ते शब्दबद्ध करत होते.हा उठाव महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या, अहिंसेच्या मार्गाने जाणारा होता तर युरोपमध्ये त्याच काळात सुरू झालेले दुसरे महायुद्ध म्हणजे साम्राज्यासाठी सुरू झालेली, हिटलर व मुसोलिनीच्या नेतृत्वाखालील अत्यंत हिंसक , क्रूर लढाई होती.हा विरोधाभास लक्षात घेऊनच असेल विविध परकीय भाषांतून ‘कांथापुरा’च्या भाषांतरासाठी लेखकाकडे विचारणा होऊ लागली होती.डच कादंबरीकार ए.एम. डीजॉन्ग यांनी सर्वप्रथम ‘कांथापुरा’च्या भाषांतराचे हक्क मागितले.दुर्दैवाने डीजॉन्ग यांना नाझी सैनिकांकडून मरण पत्करावे लागले.त्यानंतर स्विडीश भाषेत कांथापुराचे भाषांतर झाले आणि मग कांथापुराचे स्पॅनिश आणि हंगेरीयन भाषांतील भाषांतरेही प्रकाशित झाली. दुसऱ्या महायुद्धातील हिंसेच्या पार्श्वभूमीवर ही अहिंसेचा संदेश देणारी कादंबरी जागतिक साहित्यात महत्त्वाची ठरली.आपल्या कादंबरीला ‘गांधी पुराण’ असं म्हणत राजा राव कलिंग युद्धातील संहार पाहून सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले होते नी तो अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा अनुयायी, प्रचारक झाला होता याची आठवण करून देतात. ‘सत्य हे तलवारीपेक्षा अधिक ऐतिहासिक ठरते’ असे सांगत राजा राव म्हणतात की ‘भारताला हे पुन्हा एकदा शिकावे लागेल.’

राजा राव स्वतः भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक होते आणि भारतीय परंपरेत साधनेला असलेले महत्त्व त्यांना पटलेले होते. लेखन ही एक साधना आहे अशी त्यांची धारणा होती. ‘मला जंगलात नेऊन टाकले किंवा अन्य कुठेही नेऊन ठेवले तरी माझे लेखन सुरू राहील कारण ते मी स्वतःसाठी करतो, ती माझी अध्यात्मिक साधना आहे असे राजा राव यांनी म्हटले आहे.मला माझ्या साहित्यकृतीवर स्वतःचे नाव देखील नको होते कारण ते मी कोणत्याही प्रसिद्धीसाठी, मानसन्मानासाठी लिहित नव्हतो.ते मी माझ्या आंतरीक आनंदासाठी लिहीत होतो’ ,असे राजा राव सांगतात.
‘कांथापुरा’ ही कादंबरी राजा राव यांनी गांधीवादी विचार, त्यांचा सर्वसामान्य माणसांवर पडणारा प्रभाव आणि त्यातून उभी रहाणारी स्वातंत्र्य चळवळ यांचे तपशीलवार वर्णन करण्यासाठीच लिहिली आहे. ‘कांथापुरा’ हे काल्पनिक गाव आहे पण तिथे हळूहळू महात्मा गांधींच्या विचारांचे गारूड कसे पसरत गेले आणि तिथली सामन्य माणसे जातीभेद, लिंगभेद, वर्गभेद विसरून एकजुटीने अन्यायाविरूद्ध, गुलामगिरीविरूद्ध अहिंसेच्या मार्गाने लढण्यासाठी कशी तनमनाने सज्ज झाली त्याचे प्रातिनिधिक चित्रण ‘कांथापुरा’ ही कादंबरी करते. भारतातील अशी शेकडो गावे आणि तेथील हजारो सामान्य माणसे अशीच स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेली असतील असे राजा राव यांना सुचवायचे आहे.
राजा राव यांना असे वाटते की इंग्रजीतून आलेल्या कादंबरी या आधुनिक साहित्यप्रकारापेक्षा भारतात कथनपरंपरेतून अजरामर झालेली रामायण, महाभारतासारखी पुराणे अधिक रोचक आहेत.विशेषतः पुराणांची कथनाची जी शैली आहे ती राजा राव यांना विलक्षण वाटते. त्यामुळे ते ‘कांथापुरा’ ही पहिलीच कादंबरी लिहिताना ही भारतीय पुराणांची कथनशैली स्वीकारतात.खूप तपशीलवार वर्णने करणारी अशी ही शैली आहे.विशेष म्हणजे या कादंबरीची कथक ‘कांथापुरा’ गावातील एक वृद्ध स्त्री अच्चम्मा ही आहे.आजी जशी लहान मुलांना रंगवून गोष्ट सांगते तशी ही स्त्री गोष्ट सांगत जाते. एक प्रकारे ती झालेल्या घटनांचा वृत्तांतच देते आहे.या घटना तिने प्रत्यक्ष पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. ती काही शिकलेली बाई नाही पण तिने निरागसपणे, तिला जे काही कळले ते अधिकाधिक तपशीलवारपणे कथन केले आहे असे कादंबरी वाचताना जाणवते.
‘कांथापुरा’ ही काही नायक-नायिकेची कहाणी सांगणारी कादंबरी नाही. कादंबरीला प्रस्तावना लिहिणाऱ्या आर. पार्थसारथी या विचारवंताच्या शब्दांत सांगायचे तर भारतीय पुराणांच्या परंपरेत ‘स्थळपुराण’ नावाची पुराणे आहेत तसेच हे स्थळपुराण आहे. ‘कांथापुरा’ गावाचा स्वातंत्र्यचळवळीतील कामगिरीचा इतिहासच जणू ही कादंबरी तपशीलवारपणे मांडते.यात या गावातील स्वस्थ,शांत जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये होणारे वैचारीक परिवर्तन तर आहेच पण या परिवर्तनातून उभ्या राहिलेल्या चळवळीचा परिणाम म्हणून इंग्रजांनी केलेल्या सशस्त्र कारवाईत गाव पूर्ण बेचिराग झाले आहे. कित्येक गावकरी तुरूंगात गेले आहेत तर अनेकांना जीव मुठीत धरून गाव सोडून पळून जावे लागले आहे. या उद्वस्थ झालेल्या कांथापुराला उर्जितावस्था येणार का हा प्रश्न कथानकात अनुत्तरीत ठेवला गेला आहे.
ही कादंबरी वाचताना स्वातंत्र्यपूर्वकाळात विदर्भातील चिमुर गावातील गावकऱ्यांनी केलेला उठाव, सातारा प्रांतातील नानाभाऊ पाटलांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले प्रती सरकार हे संदर्भ आठवतात.
‘कांथापुरा’ हे स्वातंत्र्यपूर्वकाळातील कारवार जिल्ह्यातील एक डोंगरांनी वेढलेले गाव आहे.हैमावती नदी या गावातून वहाते. गावात केंच्चम्मा देवीचं एक देऊळ आहे आणि एक शंकराचे मंदीर आहे. गावात सुमारे पंचवीस घरे आहेत. ब्राह्मण आळी, पटेल किंवा गौडांची घरे, चेट्टी लोकांची घरे ही सवर्ण वस्ती एका बाजूला तर दुसऱ्या बाजुला परीहा म्हणजे दलित ,लोहार, चर्मकार, धोबी,कोष्टी अशी अन्य बलुतेदारांची घरे आहेत.गावातील लोक प्रामुख्याने पारंपरिक रूढी-प्रथा पाळणारे,पापभिरू, भाविक आहेत.
‘कांथापुरा’ गावाला लागूनच एका ब्रिटीश माणसाचा स्केफिंग्टन कॉफी इस्टेटचा मोठा परिसर आहे.या इस्टेटीवर शेकडो कुली किंवा गुलाम काम करतात. हे सगळे लोक गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील मैदानातील गावांतून पोटापाण्यासाठी स्थलांतरीत झालेले लोक आहेत. मेस्त्री म्हणजे मुकादमाने या लोकांना कॉफी इस्टेटवर काम करण्यासाठी आणले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या लोकांना इस्टेटमध्येच रहायला झोपड्या देण्यात आल्या आहेत. पण मैदानांतून आलेल्या या लोकांना डोंगराळ भागातील पाऊस, दमट हवा, दाट जंगल, जंगलातले हिंस्त्र प्राणी, साप हे सगळेच नवे आहे. तसेच पावसामुळे होणारे डास आणि त्यांच्या दंशाने होणारा मलेरिया हा जीवघेणा आजार तर त्यांच्यासाठी संकटच ठरला आहे. पण केवळ जीव जगवण्यासाठी ही माणसे कॉफीची रोपे लालण्याचे, त्याची निगा राखण्याचे आणि कॉफी बिया काढण्याचे जिकिरीचे काम करत रहातात.त्यांना कोणतीही आरोग्यसेवा इंग्रज मालक पुरवत नाही की त्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय करून देत नाही.उलट या गुलाम स्त्री-पुरूषांना माडी प्यायला देऊन, नशेच्या धुंदीत त्यांच्याकडून प्रचंड कामे करवून घेण्याचे तंत्र मेस्त्री आणि इंग्रज मालकाने अवलंबले आहे.हे कॉफी इस्टेटवरील कामगार म्हणजे जणू जिवंत प्रेतेच आहेत.त्यांच्यात विचार करण्याची ताकद तर नाहीच पण अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याएवढे शारिरीक बळच त्यांच्यात राहिलेले नाही.
गावातील गौडा लोकांकडे मोठ्या शेतजमिनी आहेत,प्रामुख्याने तिथे भातशेती होते. नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या बागाही त्यांच्या मालकीच्या आहेत.गायी-गुरेही त्यांच्याकडे आहेत.रंगे गौडा हा संपूर्ण गावचा पटेल आहे.गावकऱ्यांवर कोणतोही संकट आले तर हा पटेलच त्यांना मदत करतो. त्यामुळे तो गावकऱ्यांच्या दृष्टीने राजाच आहे. चेट्टी हे व्यापारी आहेत. ते गावातील शेतमाल बैलगाड्यांतून शहरांत विकायला घेऊन जातात. अडीनडीला गरजू लोक चेट्टी लोकांकडूनही व्याजाने पैसे घेतात.
‘कांथापुरा’ गावातील ब्राह्मण प्रामुख्याने देवळांत पुजारी आहेत पण त्याबरोबरच पंचांग सांगणं,पुजा सांगणे, लग्न लावून देणं ही कामेही ते करतात. भट्ट हा त्यांच्यातील प्रमुख पुजारी आहे.कारवारमधील शंकराचार्य पीठातील स्वामींशी त्याचे संधान आहे.गावातील अनाचार तो स्वामींच्या कानावर घालतो आणि एखाद्या कुटुंबावार अनाचारासाठी बहिष्कार घालण्याची आज्ञा तो सवर्णांना करू शकतो. त्याच्याकडे जमिनीही आहेत.गावाबाहेरच्या ताडाच्या झाडांची ताडी इंग्रजांना विकून त्यावर दलालीही हा भट्ट मिळवतो.पैसा गाठीशी बांधून असणारा हा ब्राह्मण गरजूंना व्याजाने कर्जही देतो.गावकऱ्यांची आपापसातील भांडणे तो एकतर स्वतः सोडवतो आणि त्याची दलाली घेतो किंवा कारवारच्या आपल्या ओळखीच्या वकिलांकडे त्याना पाठवून त्यातून दलाली मिळवतो. आपली मोठी हवेली त्याने बांधली आहे.पण गावकरी भट्टला तो देवाचा पुजारी असल्याने नितीमान समजतात, त्याला जाब विचारला तर देवाचा कोप होईल म्हणून घाबरतात. ‘कांथापुरा’ कादंबरीत एक खलनायक हा भट्टच आहे.तर दुसरा अप्रत्यक्ष खलनायक स्केफिंग्टन कॉफी इस्टेटचा इंग्रज मालक आहे.
गावातील सवर्ण कामापुरते परीहा व अन्य बलुतेदारांशी बोलतात पण अन्य़था ते कनिष्ठ लोकांशी संबंध ठेवत नाहीत.अस्पृश्यता पाळतात. ‘कांथापुरा’मध्ये ब्राह्मणांच्या घरांत बालविधवा आहेत. पण त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते.रंगम्मा,तिच्या बहिणीची मुलगी रत्ना यांनी हा अनुभव घेतला आहे.तरीही या स्त्रिया घरच्याघरी अक्षरओळख करून घेऊन थोडफार लिहू, वाचू लागल्या आहेत.रंगम्माकडे वर्तमानपत्र येते आणि ती इतर स्त्रियांना त्यातील बातम्या सांगते.नरसम्मासारख्या वृद्ध विधवा मात्र अजूनही परंपरेत अडकून पडलेल्या असल्याने दयनीय जीवन जगत आहेत.नरसम्माच्या अकरा मुलांपैकी सहा जिवंत आहेत. त्यापैकी पाच मुलींची तिने कशीबशी लग्न लावून दिली आहेत. सहावा मुलगा मुर्ती म्हणजे जणू तिच्या काळजाचा तुकडा आहे.
गावात शाळा, कॉलेज नाही. त्यामुळे नरसम्माचा मुलगा मुर्तीला शिक्षणाची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गाव सोडून कारवारला आणि पुढे पुण्याला जावे लागले आहे.मुर्तीने शहरात राहून आपले वाचन वाढवले आहे.महात्मा गांधी यांचे विचार त्याला आवडू लागले आहेत.विशेषतः गावातील जातीभेद संपले पाहिजेत या गांधीजींच्या मताचा त्याच्यावर खूप प्रभाव पडला आहे.एकदा महात्मा गांधींची सभा प्रत्यक्ष पहाण्याची संधी मुर्तीला लाभते. सभेला प्रचंड गर्दी असल्याने मुर्ती कशीबशी स्टेजला लागून असलेल्या जागेवर बसून गांधीजींचे भाषण ऐकतो. गांधीजींचे ते संथ, शांत सूरातील बोलणे त्याला भारावून टाकते. तो पुढे होऊन महात्मा गांधींच्या पायावर आपले डोके टेकवतो आणि आपण स्वातंत्र्य चळवळीत कसे योगदान देऊ शकतो याबद्दल गांधीजींना विचारतो. गांधीजी त्याला ‘खेड्याकडे परत जा’ आणि तिथे लोकांना सत्य, अहिंसा,स्वराज या तत्वांची ओळख करून दे असा सल्ला देतात. मुर्ती बरीचशी पुस्तके घेऊन कांथापुराला परततो.
गावी परतलेला मुर्ती अच्चम्माचा मुलगा शिनु तसेच पुट्टु,चंद्रू,रामू,श्रीनिवास या मित्रांशी आणि रंगम्मा, रत्ना,अच्चम्मा या स्त्रियांशी, बोलून देवळातील रामजन्माच्या उत्सवाला शहरातून वक्ते बोलावण्याचे ठरवतो.उत्सवासाठी तो गावकऱ्यांकडून प्रत्येक घरटी पंचवीस पैसे वर्गणी घेतो.आलेले वक्ते पारंपरिक कीर्तनाच्या ढंगात महात्मा गांधींच्या चरित्रातील प्रसंग गावकऱ्यांसमोर रंगवून सांगतात. त्यांचे कथन इतके रसाळ असते की गावकरी मंत्रमुग्ध होतात.गांधींवर ब्रिटीशांकडून झालेल्या अन्याय अत्याचाराच्या कहाण्या ऐकून कीर्तन ऐकायला जमलेल्या लोकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात.हा गावकऱ्यांच्या मनाचा नवे विचार स्वीकारण्यासाठीचा पाया तयार झाल्यावर मुर्ती घरोघरी जाऊन गांधीजींच्या स्वराज्याच्या संकल्पनेत स्वदेशीला असलेले महत्त्व विशद करतो. शहरात जाऊन तो कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयातून आठ-दहा चरखे घेऊन येतो. प्रत्येक घरातून किमान किती खादी कातली गेली पाहिजे ते मुर्ती गावकऱ्यांना सांगतो. ही खादी शहरात पाठवून तो गावकऱ्यांना पैसा मिळवण्याचा नैतिक मार्ग दाखवतो.गावकऱ्यांच्या हाती पैसा आला तर ते आपल्याकडे कर्ज मागायला येणार नाहीत ही भीती भट्टाला अस्वस्थ करते. तो मुर्तीला कोंडीत पकडायचे ठरवतो.
या खादीच्या प्रसारासाठी मुर्ती परीहांच्या वस्तीतही जातो. त्यामुळे भट्ट मुर्ती व त्याच्या आईवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकावा अशी आज्ञा देतो.ब्राह्मण आळीतील धबधब्यासारखी बोलत रहाणारी वेंक्कम्मा या गोष्टीचं भांडवल करून मुर्तीच्या आईचा अपमान करत रहाते. मुर्तीची पापभिरू आई या गावकऱ्यांनी टाकलेल्या बहिष्काराच्या ताणाने मरून जाते.
कथक अच्चम्माच्या मते मुर्तीवर बहिष्कार पडला असला तरी तो अनेकांच्या दृष्टीने राम होता आणि तिचा मुलगा शिनू जणू लक्ष्मण होता. त्या दोघांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या भूमीला म्हणजे सीतेला मुक्त करण्यासाठी संघर्ष करायची हाक दिली असेल तर आपण मागे कसे रहायचे असे गावातल्या काही लोकांना निश्चितच वाटू लागले होते.मुर्तीने सांगितल्याप्रमाणे लोक चरखा चालवून खादी कातू लागले होते.गावातील खादी जिल्ह्यात पोहचू लागली होती. गावकऱ्यांच्या अंगावरून परदेशी कपडे नाहीसे होऊन खादीचे कपडे दिसू लागले होते.आणि मग गावात बडे खान नावाचा पोलिस अधिकारी येऊन ठेपला होता. त्याने मुर्ती व अन्य तरूणांच्या हालचालींवर पाळत ठेवायला सुरूवात केली होती.
मुर्ती परीहांच्या वस्तीत जाऊन तिथल्या मुलांना शिकवू लागला होता. तिथल्याच माणसांच्या मदतीने स्केफिंग्टन कॉफी इस्टेटमधील लोकांच्या मुलांना शिकवायला जायचे त्याने निश्चित केले होते. पण त्याबद्दल कुणकुण लागताच बडे खानने मुर्तीला रोखले होते. त्याला तुरूंगात धाडले होते.
मुर्ती तुरूंगात गेल्यामुळे गावकऱ्यांच्या दृष्टीने तो नायक ठरला होता. विशेषतः गावातल्या स्त्रिया दुपारी रंगम्माच्या घरी एकत्र येत तेव्हा त्यांना ती वर्तमानपत्र वाचून दाखवे आणि गांधी महात्माची चळवळ कशी सुरू आहे, गावागावातले, शहरातले लोक कसे हिरीरीने त्यात सामिल होत आहेत हे जेव्हा ती वाचून दाखवे तेव्हा आपणही मुर्ती तुरूंगातून सुटून परत येईपर्यंत बायकांची सेना तयार केली पाहिजे असे गावातल्या स्त्रियांना वाटू लागले होते.मुर्तीबद्दलच्या बातम्याही त्यांना वर्तमानपत्रातून कळत होत्या. रंगम्मा त्यांना पहाटे नदीकाठी योगासनाचे, लाठी-काठीचे धडे देऊ लागली होती.कधी १८५७च्या बंडातील रणरागिणी झाशीची राणी कशी लढली ते ती त्यांना सांगे तर कधी भगतसिंगाची गोष्ट सांगे. ते ऐकून स्त्रियांना आपणही स्वातंत्र्यलढ्याच्या पवित्र कार्यात आपला सहभाग दिला पाहिजे असे मनोमन वाटू लागले होते.
मुर्तीने तुरूंगातून सुटून आल्यावर गावकऱ्यांना माडी विक्री केंद्रावर जाऊन सत्याग्रह करायचा कार्यक्रम दिला होता. सर्व गावकऱ्यांना घेऊन तो स्वतः गावाबाहेरच्या स्केफिंग्टन इस्टेटजवळील माडांच्या बागेवर मोर्चा घेऊन गेला होता. या बागेला असलेल्या कुंपणावरून परीहा तरूणांनी आत उड्या मारून झाडांवर चढून माडीची मडकी फोडली होती. पण बडे खानच्या पोलिसांनी या मोर्च्यातील लोकांवर लाठी चालवून अनेक स्त्री-पुरूषांना घायाळ केले होते. मुर्ती आणि अन्य काही पुरूष मंडळींना पुन्हा तुरूंगात टाकले गेले होते. तर रंगम्मा व कितीतरी स्त्रियांना पोलिसांनी गाडीत घालून दूर नेऊन जंगलात भर मध्यरात्री सोडून दिले होते. पण बायकांना धीर सोडू नका असे सांगत रंगम्माने जिद्दीने रस्त्यापर्यंत येऊन व्यापारी बैलगाड्यांना थांबवून मदत मागितली होती. तिच्या भावाच्या गावापर्यंत बैलगाडीतून पोहचल्यावर त्या गावातील लोकांनी बायकांनी दाखवलेल्या जिद्दीबद्दल त्यांचे खूप कौतुक केले होते. पण रंगम्मा तिथे न थांबता बायकांना घेऊन रातोरात चालत कांथापुरापर्यंत घेऊन गेली होती. कांथापुरातील लोकांनी बायकांच्या या पराक्रमाची दखल घेऊन त्यांना सन्मानाने गावात घेतले होते.
मुर्ती तुरूंगात असल्याने पुन्हा एकदा गावातील चळवळ थंड पडली होती. दरम्यान रंगम्मा कारवारला गेली असता तेथील गांधीवादी वकील शंकरला भेटली होती. त्याच्या निरपेक्ष कामाने ती भारावून गेली होती. दिवाळीच्या सुमारास ती परत गावात आली तेव्हा पुन्हा एकदा बायकांना एकत्र करून ती त्यांना शहरातील गांधीवादी चळवळीबद्दल सांगू लागली होती. मुर्ती आला की आपण त्याच्या हाकेसरशी चळवळीत सहभागी व्हायचे बायकांनी ठरवले होते.
मुर्ती सुटून आल्यावर त्याने देवळात सभा घेऊन गावकऱ्यांनी ब्रिटीश सरकारला शेतसारा भरू नये, असहकाराची अहिंसक चळवळ गावात सुरू करावी असे सांगितले होते. ब्रिटीशांनी सारा गोळा करायला नेमलेल्या अधिकाऱ्याला न घाबरता उत्तर द्यावे आणि परंपरेने गावचा पटेल असलेल्या रंगेगौडालाच गावाचा प्रमुख मानावे असेही मुर्तीने सुचवले होते. त्याप्रमाणे गावकरी सारा न भरता शेती करू लागले होते.पण ब्रिटीशांनी काही महिन्यांत याची दखल घेऊन गावात गाड्या भरभरून पोलिस पाठवले होते.गावातील घरे, जमिनी आता सारा न भरल्याने आम्ही लिलावात विकून टाकू असे ब्रिटाशांचे म्हणणे होते. गावकऱ्यांनी घाबरून आपला पैसा अडका जमिनीत पुरून ठेवला होता. ब्रिटीशांचे पोलिस घरांत शिरून मोडतोड करत होते.मुर्तीची रवानगी पुन्हा एकदा तुरूंगात झाली होती.रंगम्मालाही पोलिसांनी तुरूंगात टाकले होते.आणि रंगे गौडालाही अटक झाली होती.गावाला कोणी आधारच राहिला नव्हता.
गावातील स्त्रियांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता तरूण रत्नावर आली होती. आणि ती ते काम जबाबदारीने पार पाडत होती.कोणा गरोदर स्त्रीचे बाळंतपण करण्यापासून ते आगीपासून स्त्रियांना वाचवण्यात रत्ना कुठेच कमी पडत नव्हती. गावातले इतर पुरूष हैमावती नदीच्या बाजुला वाढलेल्या रानात, कोणी डोंगरावरील जंगलात कसे तरी जीव मुठीत धरून जगत होते. डोळ्यादेखत लोकांच्या जमिनी ब्रिटीशांना विकल्या जात होत्या भट्ट तर कधीच घर बंद करून काशिला निघून गेला होता. पण त्याचे घरही आगीने गिळंकृत केले होते.रत्ना इतर स्त्रियांना घेऊन शंकराच्या मंदिरात रहात होती. एके दिवशी पोलिसांनी जबरदस्तीने मंदिराचे दरवाजे बाहेरून बंद करून बायकांना आत कोंडून ठेवले होते. पण एका परीहाच्या बायकोला ते लक्षात आल्यावर तिने रंगे गौडाच्या घरून चावी आणून बायकांना मुक्त केले होते.

मुर्तीने तुरूंगात जाताना रत्नाला सांगितले होते की तो नसला तरी कॉंग्रेस गावकऱ्यांच्या चळवळीला मदत करणारी तरूण मुले ठिकठिकाणाहून पाठवेल. रत्ना त्या मदतीची वाट पहात होती आणि अचानक तिला कळले की काही तरूण मुले देवळाजवळच्या घरात एका खोलीत येऊन राहिली आहेत. रत्ना त्यांना भेटली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की देवळात सत्यनारायणाची पुजा आहे असे सांगून गावकऱ्यांना एकत्र करूया आणि मग सत्यनारायणाची पालखी घेऊन जातोय असे दाखवून मोर्चा काढून आपला संघर्ष सुरू ठेवूया.रत्ना त्याप्रमाणे सर्व तयारी करते. देवळातील शंख वाजवून एके दिवशी सर्व गावकऱ्यांना देवळात बोलावले जाते आणि सगळा बेत सांगितला जातो. सत्यनारायणाची पुजा होऊन पालखी काढली जाते.कारवरहून आलेला वकील शंकर पालखीचे नेतृत्व करतो. सुरवातीला धार्मिक उत्सव आहे म्हणून पोलिस पालखी जाऊ देतात पण मग हळूहळू ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा पालखीच्या मिरवणुकीतून ऐकू येऊ लागतात आणि पोलिस सावध होतात. तोपर्यंत पालखी स्केफिंग्टन कॉफी इस्टेटच्या दरवाजातून आत जाते आणि तिथे काम करणाऱ्या गुलामांना साद दिली जाते आधी खाली मान घालून काम करणारे गुलाम एका क्षणी आवेशाने पालखीच्या मिरवणुकीत सामील होऊन ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणा देऊ लागतात ते पाहून ब्रिटीश मालक त्यांना पकडण्यासाठी पोलिस पाठवतो. पोलिस लाठी हल्ला करतात, अनेकजण जखमी होतात पण तरीही स्वातंत्र्य चळलीतील गाणी म्हणत,इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देत मोर्चा कालव्याच्या दिशेने चालत रहातो. दूरच्या बोडो डोंगरावर कॉंग्रेसचा झेंडा फडकताना दिसतो आणि तिथून तरूणांची नवी कुमक येऊन मोर्चात सामील होते. अखेर पोलिस गोळ्या चालवू लागतात पण अंधारातही मोर्चा घोषणा देत पुढे सरकत रहातो. डोंगरावरून त्यांना आपले घर उद्वस्थ झालेले दिसते पण तरीही गावकरी पुढे चालतच रहातात. अच्चम्मा आणि तिच्याबरोबर चालणाऱ्या अन्य काही बायका, काही पुरूष मिळून शेजारच्या गावाच्या दिशेने चालत रहातात.मोर्चात त्यांच्याबरोबर चालणारे काही स्वयंसेवक पंजाबमधून आल्याचे त्यांना कळते.त्यांना त्याचे आश्चर्य वायते. शेजारच्या गावी पोहचल्यावर जखमांवर मलमपट्टी करून ते पुढे निघतात आणि दुसऱ्या दिवशी कावेरी नदीच्या काठी असलेल्या काशिपूरा गावात जाऊन स्थिरावतात. तेथील लोकांना कांथापुरामधील आंदोलनाची माहिती मिळालेली असते. ते कांथापुरामधील या गावकऱ्यांना आपल्यात सामावून घेतात. काही दिवसांनी रत्नाही तुरूंगातून सुटून येते. तिच्याकडून कळते की मुर्तीही सुटला आहे. त्याचे पत्र रत्ना गावकऱ्यांना वाचून दाखवते.त्याने लिहिलेले असते की जोपर्यंत मालक आणि मजुर हा भेदभाव राहील, जोपर्यंत श्रीमंत-गरीब हा भेदभाव राहिल तोपर्यंत महात्मा गांधींना अपेक्षीत स्वराज आपल्याला अनुभवता येणार नाही. पण मुर्ती त्याबद्दल आशावादी असतो. जवाहरलाल हा जणू रामाचा जसा भरत हा भाऊ होता तसा महात्मा गांधींचा जणू भाऊच आहे आणि भरताने रामाचे राज्य सांभाळले तसे महात्मा गांधींचे स्वराज्याचे स्वप्न जवाहरलाल सत्यात आणेल असा विश्वास त्याने आपल्या पत्रातून व्यक्त केलेला असतो.समतेच्या पायावर हे स्वराज्य उभे राहील असे रत्ना गावकऱ्यांना सांगते. रत्ना पुन्हा एकदा चळवळीत सहभागी व्हायला मुंबईत जाणार असते पण आता रंगम्मा तुरूंगातून सुटून काशिपुरात येणार असते. साधारण दीड वर्षाने रंगे गौडा तुरूंगातून सुटून कांथापुरात जातो तेथील हैमावती नदीचे पाणी पिऊन तो आपल्या लोकांना शोधत काशिपुरात येतो.पण कांथापुराची स्थिती पाहून तो हळवा झालेला असतो.
अशाप्रकारे ‘कांथापुरा’ कादंबरीचे कथानक कांथापुरा पुन्हा उभे राहिल का या प्रश्नाचे उत्तर न देताच संपते. पण स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद मात्र कादंबरी वाचकांच्या मनात निर्माण करते.
‘कांथापुरा’ वाचताना वर्तमानातील वास्तव काहीवेळा भासमान होते.उदा. मुर्ती तुरूंगात असताना त्याच्या समर्थनार्थ शंकर आणि ऍडव्होकेट रंगण्णा यांच्या पुढाकाराने कारवारमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या सभेत एक वृद्ध अचानक बोलणाऱ्या वक्त्यांना थांबवून स्वतःच बोलू लागतो. तो म्हणतो की तुमचे हे स्वराज, सर्वधर्म समभाव हे ऐकायला चांगले आहे पण ब्रिटीश इथून गेले तर यातले काहीही होणार नाही.त्यामुळे ब्रिटीशांना घालवून देण्याचा तुमचा हट्ट सोडून द्या.ब्रिटीशच आपला धर्म वाचवणारे, आपले रक्षणकर्ते आहेत. ते येण्यापूर्वी येथे मुस्लीम राजांनी हिंदूंना रहाणे कठीण केले होते.अर्थात त्या वृद्धाला निरूत्तर करून पुढचे वक्ते बोलत रहातात. हा वृद्ध शंकराचार्यांच्या पीठातील स्वामींचा चेला आहे हे सभेत जमलेल्या लोकांच्या लक्षात येते. या स्वामींनी ब्रिटीशांकडून मठासाठी जमिन घेतलेली आहे, देणगी घेतलेली आहे आणि त्यामुळे ते ब्रिटीशांचे मिंधे झालेले आहेत हे शंकर रंगम्माला सांगतो.हा प्रसंग वाचताना आजच्या राजकीय वास्तवाशी त्याचे सांधे जुळलेले वाटतात.
एका प्रसंगात रंगम्मा तिच्या घरी जमलेल्या स्त्रियांना कॉंग्रेसमधील सरोजिनी नायडू ,कमलादेवी चट्टोपाध्याय, ऍनी बेझंट यांच्याबद्दल , त्यांच्या धैर्याबद्दल सांगते.आपण इथे चुली फुंकत आणि केरसुणीने अंगणे साफ करत किंवा गायींच्या धारा काढत बसलो आहोत पण देशभरात अनेक धीट स्त्रिया देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या मातृभूमीला ब्रिटीशांच्या जोखडातून सोडवण्यासाठी लढत आहेत, मार खात आहेत, तुरूंगवास सोसत आहेत हे सगळे सांगते तेव्हाही आजच्या वास्तवाशी त्याचा सांधा जुळवावासा वाटतो.
एका भाषणात मुर्ती गावकऱ्यांना सांगतो की कोंबडा आरवला नाही तरी पहाट व्हायची रहात नाही. कोंबडा पहाट निर्माण करत नाही तशी कोणी एक माणूस क्रांती आणू शकत नाही क्रांती किंवा परिवर्तन होण्यासाठी हजारो हात लागतात. आपण एक हजारो खांब असलेले मंदीरच जणू बांधणार आहोत आणि त्यात भारतमातेला विराजमान करणार आहोत. आपण सर्वांनी बांधलेल्या मंदिरातच भारतमाता राहणार आहे. त्यानंतर मुर्ती महात्मा गांधींनी सुरू केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल गावकऱ्यांना सांगतो. आपला संघर्ष इंग्रजांविरूद्ध आहे आणि त्यासाठी आपल्याला एकजुटीने आंदोलन करावे लागणार आहे हे मुर्तीचे म्हणणे आहे. ब्राह्मण, परीहा हा भेदभाव सोडून सर्वांनी खादी कातली पाहिजे हे सांगताना मुर्ती म्हणतो की आता आपण सारे एका मंदिरात आहोत आणि हे मंदीर शंकर या एका देवाचे आहे. आणि आपण सारे त्या एकाचेच अंश आहोत. म्हणून आपण ब्राह्मण, परीहा, बांगडीवाला, पुजारी असे वेगवेगळे नसून एकच आहोत असे मुर्ती लोकांना पटवून देतो. मुर्तीच्या या संदेशाची यथार्थता आजही पटते.
एका भाषणात मुर्ती गावकऱ्यांना सांगतो की एकाने जरी पोलिसांना हिंसेने उत्तर दिले तरी आपला सत्याग्रह थांबवावा लागेल. सर्वांनी हे लक्षात ठेवायचे आहे की आपला संघर्ष कोणा ब्रिटीश माणसाशी नाही की कोणा पोलिसाशी नाही आपला संघर्ष या लोकांच्या मनात शिरलेल्या राक्षसाशी, विकृत हव्यासाशी आहे. त्यांचे आत्मे हिंसक विचारांनी, लोभाने, लालसेने, अहंकाराने भ्रष्ट झाले आहेत. पण आपल्याला त्यांना शांतपणेच सामोरे जायचे आहे. त्यांच्यासारखीच हिंसा आपण करू लागलो तर आपण आणि त्यांच्यात फरक रहाणार नाही. म्हणून आपली कृती अहिंसकच असली पाहिजे असा मुर्तीचा आग्रह आहे.तशी शपथच तो लोकांना घ्यायला लावतो.गावकरी मुर्तीचे ऐकतात. प्रसंगी पोलांकडून मार खाताना त्यांना मुर्तीचा राग येतो , त्याचा मार्ग सोडून द्यावासा वाटतो पण मार खाल्ल्यावर ते मनातून निर्भय होत जातात, सहिष्णू होत जातात, त्यांची मने निर्मळ होतात. ही आंतरीक शक्तीच त्यांना पुढे सत्याग्रह करण्याचे नैतिक बळ देत रहाते. आजही अहिंसक आंदोलकांकडे असलेली नैतिक ताकद सत्ताधाऱ्यांना नामोहरम करते हे आपण पहातो आहोतच.
एकंदरीत , जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद,प्रांतभेद,भाषाभेद हे सगळे विसरून एकजुटीने उभे राहिले आणि सत्य व अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत राहिले तरच प्रबळ शत्रूचाही आपण पराभव करू शकतो हे कथासूत्र ‘कांथापुरा’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. समतेच्या पायावर उभ्या राहिलेल्या स्वराज्यातच लोकशाही व स्वातंत्र्य टिकू शकते हेही कादंबरीला सांगायचे आहे असे म्हणता येईल.
‘कांथापुरा’ ही कादंबरी त्यातील वर्णनांसाठी, कथनातील सहज साधेपणासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठीच्या महात्मा गांधी यांच्या कालातीत संदेशासाठी तरी सर्वांनी जरूर वाचली पाहिजे.
पुढील ब्लॉगमध्ये आपण राजा राव यांच्या ‘सरपंट ऍंड दी रोप’ या कादंबरीचा परिचय करून घेणार आहोत. ती कादंबरी दीर्घ असल्याने मला ती वाचून त्याबद्दल लिहायला थोडा अधिक वेळ लागणार आहे.
–गीता मांजरेकर
————————————————————————————

यावर आपले मत नोंदवा