मागील काही ब्लॉग्जमध्ये आपण भारतीय इंग्रजी कादंबरीकार म्हणून आपली नाममुद्रा उमटवणारे लेखक मुल्कराज आनंद यांचा परियच करून घेऊन त्यांच्या सर्वात गाजलेल्या ‘अनटचेबल’ या कादंबरीचे कथानक व कथन या अंगाने विचार केला.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण मुल्कराज आनंद यांचे समकालीन भारतीय अमेरिकन कादंबरीकार राजा राव यांच्या चरित्राचा व साहित्यिक कर्तृत्वाचा धावता आढावा घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
राजा राव यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील मैसुर संस्थानातील हसन या गावी ८ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला. एच.व्ही. कृष्णमुर्ती आणि गौरम्मा हे त्यांचे जन्मदाते होते.कन्नडिगा होयसाळ ब्राह्मण कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांना लाभली.त्यांचे पूर्वज वेदांतशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते आणि मैसूरच्या राजाच्या दरबारात त्यांना मान होता.
नऊ भावंडात राजा हे सर्वांत मोठे होते.त्यांना सात बहिणी आणि एक धाकटा भाऊ होता.राजा यांचे काका हैद्राबादमध्ये वकील होते तर वडील हैद्राबाद संस्थानातील निझाम महाविद्यालयात कन्नड भाषा आणि गणित शिकविणारे अध्यापक होते.राजा यांची सख्खी आई ते चार वर्षांचे असतानाच वारली. त्याचा फार मोठा भावनिक प्रभाव राजा यांच्या मनावर कायम राहिला.त्यामुळे पोरकी मुले , आईची घरातील अनुपस्थिती हे त्यांच्या काही कथा, कादंबऱ्यातील मध्यवर्ती सूत्र झालेले दिसते.
आई गेल्यानंतर राजा यांना त्यांच्या आजोबांकडे हसन येथे पाठवले गेले.आजोबांनी त्यांना संस्कृत भाषेतील अमरकोश शिकविला. पाठांतर करून घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मात्र ते परत हैद्राबादमध्ये आल्यावरच सुरू झाले. मुस्लिम मदरशात त्यांनी शिक्षणाचे पहिले धडे गिरवले. पण ते छातीच्या विकाराने आजारी पडल्याने त्यांना नांजनगुड येथील बहिणीकडे पाठवण्यात आले.तेथेही संस्कृत त्यांच्या कानावर पडत राहिले. १९२५ मध्ये ते मॅट्रिक परीक्षेत पास झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना उस्मानिया विद्यापीठाच्या निझाम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.तिथेच त्यांचा अहमद अली या लेखकाशी परिचय झाला.याच काळात त्यांनी फ्रेंच भाषा शिकून घेतली.अलिगड मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. इंग्रजी आणि इतिहास या दोन्ही विषयांत चांगले गुण मिळाल्याने त्यांना १९२९ साली तत्कालीन निजाम सरकारकडून परदेशात जाऊन शिकण्यासाठी एशियाटीक शिष्यवृत्ती मिळाली.सर पॅट्रिक गेडीस यांनी राजा राव यांचे काही लेखन वाचले होते. त्यांनी फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेल्या मॉन्टपेलियर विद्यापीठात शिकायला येण्याचे आमंत्रण राजा राव यांना दिले.
राजा राव मॉन्टपेलियर या फ्रान्समधील विद्यापीठात फ्रेंच भाषा व साहित्य शिकले. त्यानंतर त्यांनी पॅरिस विद्यापीठात ‘आयरीश साहित्यावरील भारतीय प्रभाव’ या विषयात संशोधन केले.
मॉन्टपेलियर विद्यापीठात त्यांना फ्रेंच शिकविणाऱ्या कॅमिली मॉले या तरूणीशी राजा राव यांनी १९३१ साली विवाह केला. १९३३ मध्ये वडिलांच्या आजारपणात राजा राव यांना त्यांची सेवा करण्यासाठी भारतात परतावे लागले.या काळात भारतीय तत्वज्ञानाबद्दल त्यांच्या मनात ओढ निर्माण झाली. विशेषतः आत्मशोधाची तीव्र इच्छा त्यांना वाटू लागली. तुंगभद्रा नदीच्या काठावरील पंडीत तारानाथ यांच्या आश्रमात ते काही काळ राहिले. कालांतराने ते पॅरिसला परतले. तिथेच त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘काथांपुरा’(१९३८) लिहिली. पण दरम्यान कॅमिलीच्या आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि १९३९ साली राजा राव आणि कॅमिली विभक्त झाले.दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवस राजा राव भारतात परतले होते.
१९३१ पासून राजा राव यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला.सुरूवातीचे चार लेख त्यांनी त्यांची मातृभाषा कन्नडमध्ये लिहिले आणि ते ‘जय कर्नाटक’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाले. १९३९ मध्ये पुन्हा भारतात परतल्यावर त्यांनी इक्बाल सिंग यांच्यासह ‘चेंजिंग इंडिया’ या लेखसंग्रहाचे संपादन केले. त्यात राजा राममोहन रॉय ते जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचे दर्शन त्यांनी घडवले. याच काळात ते पॉंडेचरी येथील योगी अरबिंदो यांच्या आश्रमात जाऊन राहिले होते. आत्मशोधाची ऊर्मी त्यांना तिथे घेऊन गेली होती.
१९४०मध्ये राजा राव यांचे वडील निधन पावले. १९४२ मध्ये काही काळ राजा राव महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन राहिले होते. १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.त्यानंतर त्यांनी त्रिवेंद्रम येथील श्री आत्मानंद यांच्या आश्रमात वास्तव्य केले होते.आत्मानंद यांच्या सहवासात त्यांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली. १९४३-४४ या वर्षांत त्यांनी त्यांचे महाविद्यालयातील मित्र अहमद अली यांच्यासह मुंबईत ‘टुमॉरो’ नावाच्या नियतकालिकाचे संपादन केले. ‘श्री विद्या समिती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य ठरले. या संस्थेने प्राचीन भारतीय मूल्यांचा पुनर्विचार केला.१९४८ साली राजा राव पुन्हा एकदा पॅरिसला परतले. तेथून ते अमेरिकेलाही गेले. काही काळ त्यांनी लंडन येथेही वास्तव्य केले.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा ठसा राजा राव यांच्या ‘कांथापुरा’(१९३८) या पहिल्याच कादंबरीवर आणि ‘काऊ ऑफ बॅरिकेटस’(१९४७) या कथासंग्रहातील कथांवर पडलेला दिसतो.मध्ये मोठा विराम घेऊन ‘दी सरपंट ऍंड दी रोप’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी राजा राव यांनी १९६० साली प्रकाशित केली. भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्यातील नाते या कादंबरीत त्यांनी नाट्यपूर्ण पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केला.१९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कॅट ऍंड शेक्सपियर’ या कादंबरीत राजा राव यांनी उपरोधिक भाषेत अधिभौतिक गोष्टींबद्दल विनोदी भाष्य केले आहे.
१९६३ मध्ये राजा राव यांच्या ‘कांथापुरा’ या पहिल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
१९६४मध्ये राजा राव यांनी अमेरिकेत स्थलांतर केले.१९६५ मध्ये त्यांनी कॅथरीन जोन्स या अमेरिकन रंगभूमीवरील कलावंत स्त्रीशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव ख्रिस्तोफर रामा ठेवले गेले.१९६६ मध्ये राजा राव अमेरिकेतील ऑस्टिन मधील टेक्सास विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले आणि १९८० मध्ये तेथून त्यांनी निवृत्ती घेतली.या वीस वर्षांत त्यांनी मार्क्सवाद ते गांधीवाद , महायान बुद्धिझम,भारतीय तत्वज्ञान असे विषय शिकवले.
१९६९ मध्ये राजा राव यांना भारतातील ‘पद्मभुषण’ हा पुरस्कार देण्यात आला .
१९७६ मध्ये राजा राव यांची ‘कॉमरेड किरलोव’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. तर १९७८ मध्ये त्यांचा ‘दी पोलिसमॅन ऍंड दी रोझ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला.
१९८६मध्ये कॅथरीनशी विभक्त होऊन राव यांनी आपली टेक्सास विद्यापीठातील एकेकाळची विद्यार्थिनी सुझान वॉट हिच्याशी विवाह केला.
१९८८ मध्ये राजा राव यांना ‘न्युस्टॅड आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ हा २५ हजार डॉलर्सच्या प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र ‘ग्रेट इंडियन वे- अ लाईफ ऑफ महात्मा गांधी’ प्रकाशित केले. त्याच वर्षी त्यांची ‘चेसमास्टर ऍंड हिज मुव्हज’ ही कादंबरीही प्रसिद्ध झाली.तर १९८९मध्ये त्यांचा ‘ऑन दी गंगा घाट’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

२००६ साली वयाच्या ९७ व्या वर्षी टेक्सास येथे राजा राव यांचे निधन झाले.त्यावेळी सुझान त्यांच्यासोबत होती. २००८ साली भारत सरकारने राजा राव यांना मरणोत्तर पद्मविभुषण हा पुरस्कार जाहीर केला.
राजा राव हे त्यांचे समकालीन कादंबरीकार मुल्कराज आनंद आणि आर.के. नारायण यांच्यापेक्षा वेगळे ठरतात कारण मुल्कराज आनंद आणि आर.के.नारायण स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारतीय समाजाचे वास्तव थेटपणे मांडतात.त्याअर्थाने ते आधुनिकवादी कादंबरीकार आहेत.तर राजा राव हे भारतीय वेदांत तत्वज्ञान ते गांधीवादी विचार ही अध्यात्मिक पार्श्वभूमी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडतात. भारतातील महाकाव्य आणि त्यातील कथनपरंपरेचा मोठा प्रभाव राव यांच्या कथा-कादंबऱ्यांवर आहे. त्यामुळे अभिजाततावादी साहित्य परंपरेसारखी त्यांची लेखनशैली आहे.भारतीय व पाश्चात्त्य संस्कृतीचे नाते, विरोधाभास ते आपल्या साहित्यकृतीतून शोधतात. बराच काळ परदेशात वास्तव्य केले असूनही राजा राव यांची मूळे भारतात पक्की रूजलेली होती हे विशेष.
पुढील ब्लॉगमध्ये आपण राजा राव यांच्या ‘कांथापुरा’ या कादंबरीचे कथानक समजून घेऊ.
-गीता मांजरेकर
________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा