मागील ब्लॉगमध्ये आपण मुल्कराज आनंद यांनी लिहिलेल्या पहिल्याच कादंबरीचा- ‘अनटचेबल’चा परिचय करून घेतला. ‘अनटचेबल’ चे कथानक आपण थोडक्यात समजून घेतले होते.आज आपण ‘अनटचेबल’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करत त्या अनुषंगाने कादंबराची कथासूत्रे लक्षात घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘अनटचेबल’ या कादंबरीत सामावलेला काळ केवळ एका दिवसाचा आहे आणि कथानक सरळरेषीय आहे. ते क्वचितच भूतकाळात जाते.कथानकाचा अवकाश पंजाब प्रांतातील बुलेशहा हे शहर हा आहे. विशेषतः बुलेशहा शहराच्या वेशीवरची महार, चांभार, धोबी, कोष्टी अशा बलुतेदारांची जी वस्ती आहे ती या कादंबरीच्या कथानकाचा प्रमुख अवकाश आहे.या वस्तीशेजारील टेकडी हाही कथानकाचा एक अवकाश आहे. त्याखेरीज बुलेशहा शहरातील ३८ डोगरा बटालियनमधील हवालदारांच्या घरांची वसाहत, बुलेशहा शहरातील बाजाराचा रस्ता, देवळाचा परिसर आणि मध्यमवर्गीय सवर्णांची वस्ती असलेल्या गल्ल्या, बुलेशहा शहराच्या रेल्वे स्टेशनजवळचा परिसर आणि तेथील मैदान येथेही कथानक वाचकांना घेऊन जाते.

‘अनटचेबल’ या कादंबरीतील कथन प्रामुख्याने तृतीय पुरूषी आहे. या कथनात वर्णन आणि भाष्याला अधिक अवकाश मिळाला आहे तर संवाद, स्वगते याला तुलनेने कमी वाव मिळाला आहे.
‘अनटचेबल’ या कादंबरीच्या कथानकाबद्दल समजून घेताना आपण या कादंबरीवर जेम्स जॉईस या इंग्रजी कादंबरीकाराच्या ‘युलिसीस’ या कादंबरीचा प्रभाव आहे हे लक्षात घेतले होते आणि ‘युलिसीस’ या कादंबरीचे कथानक होमरच्या ‘ओडेसी’ या पुराणकाव्यातील कथानकाला समांतर पण समकालीन वास्तव दाखवणारे आणि त्यामुळे उपहासात्मक आहे हे पाहिले होते. ‘युलिसीस’ या कादंबरीच्या कथनात पहिल्यांदा ‘संज्ञाप्रवाही स्पंदने’ या तंत्राचा वापर कादंबरीकाराने केला होता. ‘अनटचेबल’ या कादंबरीतही प्रमुख व्यक्तिरेखेच्या मनातील जाणिवा टिपण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.तसे करताना तो वस्तुनिष्ठपणे निरीक्षणे करणारा कथक निर्माण करतो. या कादंबरीच्या प्रस्तावनेत प्रख्यात इंग्रजी समीक्षक इ.एम. फॉर्स्टर यांनी त्याबद्दल म्हटले आहे की, ‘लेखक स्वतः अस्पृश्य समाजातील नाही त्यामुळे तो वस्तुनिष्ठपणे अस्पृश्यांची वस्ती, त्यांच्या आकांक्षा, त्यांची उपेक्षा, त्यांच्या मनातील चीड, निराशा, गोंधळ याबद्दल वस्तुनिष्ठपणे लिहू शकतो.’ एखाद्या अस्पृश्याला ते जमले नसते कारण तो आपले वास्तव सांगताना भावनेत वहात गेला असता.मुल्कराज आनंद दलितेतर असल्याने त्यांनी निर्माण केलेला कथक अस्पृश्यांबद्दल सहानुभूती बाळगून वस्तुनिष्ठ कथन करू शकतो असे इ.एम. फॉर्स्टर यांचे म्हणणे आहे.
‘ओडेसी’ या पुराणकाव्याला नायकाच्या समुद्र प्रवासाची पार्श्वभूमी आहे. हा समुद्रप्रवास नायकाच्या वाटेत अनेक अडचणी निर्माण करतो आणि त्या अडचणींतून मार्ग काढत नायक पुढे सरकत रहातो, प्रगल्भ होतो व आपले ईप्सित गाठतो असे ते कथानक आहे. ‘युलिसीस’मध्ये असलेल्या ननायकाच्या वाट्याला येणाऱ्या समस्या आधुनिक काळातील माणसाच्या वाट्याला येणाऱ्या निरर्थक आयुष्यामुळे,परात्मतेमुळे निर्माण झाल्या आहेत. या ननायकाचा प्रवास डब्लिन शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत झाला आहे.त्यामुळे त्याच्या आयुष्याला अर्थपूर्णता आली आहे का हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो. ‘अनटचेबल’ मधील ननायकाचा प्रवास बुलेशहा शहरातील अस्पृश्यांच्या वस्तीकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील मैदानाकडे झाला आहे.या प्रवासात त्याच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्याला मिळाली नसली तरी आपली समस्या, आपली वर्तमान स्थिती बदलू शकते हा आशावाद त्याच्या मनात निश्चित निर्माण झाला आहे.
‘अनटचेबल’ या कादंबरीच्या प्रारंभी बुलेशहा शहरातील अस्पृश्यांच्या वसाहतीचे वर्णन लेखक करतो. या वस्तीतील मातीची घरे, वस्तीतील अस्वच्छता, वस्तीबाहेर पडलेली मानवी विष्ठा आणि गाढव, गुरे यांच्या शेणाचे ढीग, वस्तीवर तरंगणारा धूर या सगळ्याचे अगदी थोडक्यात वर्णन करून ही वस्ती मानव प्राण्याला रहाण्यासाठी अगदी निरस जागा होती असे कथक सांगतो.
लगेचच कथक कादंबरीतील ननायक(Antihero) बाखाला ही वस्ती त्याचे व्यक्तिमत्व खुरटवून टाकणारी, निरस वाटते असे सांगतो आणि पुढे बाखाच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतो.बाखा अठरा वर्षांचा तरूण आहे. तो शहरातील व लष्करी वसाहतीतील सर्व सफाई कामगारांचा मुख्य असलेल्या जमादार लाखाचा मुलगा आहे.सार्वजनिक संडासांच्या तीन रांगा स्वच्छ ठेवणे ही त्याची जबाबदारी आहे. पण त्याने काही वर्षे त्याच्या दूरच्या काकांच्या बदली लष्करी वसाहतीत काम केले असल्याने त्याचा दृष्टिकेन बदलला आहे हेही कथक सांगतो. गोऱ्या माणसांच्या वलयात बाखा अडकला होता हे कथनातून स्पष्ट होते.
बाखाला रोज पहाटे उठावे लागते. तसा तो जागा होतो पण बिछान्यात पडून आपल्या परिस्थितीचा विचार करतो.तो त्याच्या अंगावर दिवसभर असणाऱ्या कपड्यांतच झोपलेला असतो. ते कपडे कोणा गोऱ्या साहेबाने टाकून दिलेले, तर कधी बाखाने त्यांच्याकडून मागून घेतलेले जुनेच कपडे आहेत.साहेबाचे बूट,मोजे ,शर्ट, पॅन्ट, कोट असे सगळे घालून बाखा काम करतो. रात्री झोपतानाही तो गोऱ्या साहेबाने दिलेले पांघरूण वापरतो. खरे तर बुलेशहामधील थंडीला ते पुरेसे नाही पण तरीही बाखाला तेच घेऊन झोपण्यात काहीतरी सुख मिळत असावे असे कथक सांगतो.त्याच्या बापाने त्याला असे पातळ पांघरूण घेऊन झोपलास तर थंडीने मरशील असे सांगितले असूनही बाखाला तेच पांघरूण घेणे पसंत आहे. त्यावर भाष्य करताना कथक म्हणतो-
‘बाखा आधुनिक भारताचा सुपुत्र होता.युरोपियनांच्या कपड्यांची स्टाईल त्याच्या निरागस मनाला भावली होती.भारतीय कपड्यांचा कोरडा साधेपणा त्याला नकोसा वाटत होता. बाखाने युरोपियन सैनिकांकडे अचंबीत होऊन पाहिले होते. गोऱ्यांच्या वसाहतीत तो काकाबरोबर राहिला होता तेव्हा त्यांचे सखल पलंग, त्यावरील चादरी, पांघरूणे , त्यांचे अंडी खाणे, चहा पिणे , दारूचे पेले रिचवणे , कवायती करणे आणि फुरसतीच्या वेळी सिगारेट ओढत बाजारात फिरणे हे सगळे बाखाने मनोमन जपून ठेवलेले चित्र होते.’-
आणि आपल्याला कधीतरी तसे जगायला मिळावे ही त्याची आकांक्षा होती. ते साहेब आहेत, वरिष्ठ आहेत असे त्याला कोणी कोणी सांगितले होते.तेव्हा आपण त्यांच्यासारखे कपडे घातले तर आपणही साहेब होऊ असे बाखाला वाटले होते असे कथक सांगतो.’मी साहेबासारखा दिसणार’, ‘साहेबासारखा चालणार’ असे बाखाने स्वतःशीच म्हटले होते. पण आपल्याकडे त्यांच्यासारखे कपडे विकत घ्यायला पैसे नाहीत हे लक्षात आल्यावर बाखाचे दिवास्वप्न भंग पावले होते असेही कथक सांगतो.
बाखा पहाटे बिछान्यावर पडून साहेब होण्याची दिवास्वप्ने पहात असताना त्याचा बाप लाखा त्याला शिव्या घालून जागे करायचा प्रयत्न करीत असे.मग बाखाचे मन भूतकाळात जाई त्याची आई हयात असताना त्याला पहाटे झोपून रहावेसे वाटत नसे कारण आई त्याच्यासाठी गरमागरम गोड गोड चहा करून देत असे.तो चहा पिऊन नव्या उत्साहाने बाखा संडास साफ करण्याच्या थकवणाऱ्या कामाला हसत हसत जात असे.पण आता आई वारली होती आणि गरम चहा मिळणार नाही हे बाखाला माहीत होते. त्यामुळे तो आळसटल्यासारखा झाला होता. अखेरीस हवालदार चरतसिंगने दिलेल्या हाकेने बाखा उठला नी लगेचच कामाला लागला.
बाखाचे काम मेहनतीचे होते, किळस यावी असे होते पण तो ज्या लयीत, मनापासून ते काम करे ते पाहून कोणालाही आश्चर्य वाटे.त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायू दगडासारखा टणक झालेला होता. घामाने त्यावर तकाकी आलेली होती. पण ‘एखादी शिडाची होडी सहजपणे तरंगत जावी तसे बाखाचे काम सहज होते’ असे त्याच्या कामाचे वर्णन कथक करतो.येणारे जाणारे बाखाकडे बघून ‘तो खरोखरच कुशल कामगार आहे’, ‘त्याच्यासारख्यांपेक्षा त्याचे काम बरेच वरच्या दर्जाचे आहे’, ‘हे काम त्याच्यासारख्याने करण्यायोग्य नाही’असे उद्गार काढत. अगदी सकाळी संडास वेळेवर साफ केले नाहीत म्हणून बाखावर चिडलेला हवालदार चरतसिंग देखील नंतर बाखाकडे पाहून त्याला ‘तू तर जंटरमनच झाला आहेस’ असे म्हणत खूश होऊन ‘दुपारी आलास तर हॉकी स्टीक देईन’ असे सांगून गेला होता. ‘हॉकी स्टीक-नवीन असेल का ती’ ..बाखाच्या मनात येऊन गेले होते.आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विनयशील, कृतज्ञ हसू खेळू लागले होते.मग पुन्हा तो लयीत त्याचे काम करू लागला होता.
सार्वजनिक संडासावर येणारे हिंदू-मुस्लिम लोक किती अस्वच्छ असतात असे बाखाला वाटले होते कारण त्याने ब्रिटीश सैनिकांच्या वसाहतीत काम केले होते तेव्हा त्यांची स्वच्छ रहाणी त्याला आवडली होती. मात्र त्यांचे संपूर्ण नग्न होऊन टबस्नान घेणे त्याला पसंत पडले नव्हते हेही कथक सांगतो.भारतीय आणि ब्रिटीश यांच्या रहाणीची तुलना करणाऱ्या बाखाच्या मनाचा कल कुठे होता, त्याला काय आदर्श वाटत होते ते कथक स्पष्ट करतो.
सकाळच्या प्रहरी बाखाच्या वाट्याला आलेल्या बापाच्या शिव्या, त्यानंतर हवालदार चरतसिंगने दिलेल्या शिव्या आणि मग मात्र बाखाचे काम पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून त्याचे झालेले कौतुक, हवालदार चरतसिंगने हॉकी स्टीक देण्याचे दिलेले आश्वासन आणि त्यामुळे आपण खरेखरच ‘जंटरमन’ झाले पाहिजे असे बाखाला वाटणे यामुळे बाखाच्या मनाचा हिंदोळा कसा खाली-वर जातो ते कथक दाखवतो.
आपले किळस वाटणारे आणि कष्टाचे काम पूर्ण करून बाखा घरी जातो तेव्हाही चहा तयार नसतो कारण त्याच्या बहिणीला सोहिनीला चूल पेटवता आलेली नसते. बाखा तिला चटकन चूल पेटवून देतो.पण घरात पाणीच नसते.म्हणून सोहिनी पाणी आणायला निघते. आपल्या बहिणीकडे पहाताना बाखाला तिचे सौंदर्य जाणवते आणि अभिमान वाटतो असे कथक म्हणतो. हा अभिमान एखाद्या भावाला बहिणीचा वाटतो तसा नसून वेगळाच आहे असे कथक सांगतो. तेव्हा आपल्यासारख्या अस्पृश्याच्या घरात असे सौंदर्य असणे याचा बाखाला अभिमान वाटत असावा असे कथकाला सुचवायचे असावे.बाखाची सोहिनीकडे पाहण्याची नजर ती आपल्या घरातील एक किंमती वस्तू आहे अशी आहे असे कथकाला सुचवायचे आहे. पुढील दृष्यात तो सोहिनीची भावाकडे पाहण्याची नजर मात्र किती मायेची आहे तेही तो कथन करतो.
बाखाची बहीण सोहिनी पाणी आणायला जाते तेव्हा विहिरीवर पाणी मागण्यासाठी जमलेल्या अस्पृश्यांमधील विशेषतः बायकांची आपापसातील भांडणे, हेवेदावे याचे वर्णन कथक करतो.सोहिनीला माहित आहे की पाणी मिळायला वेळ लागणार आहे. थांबण्याची चिकाटी तिच्याकडे आहे पण आपला भाऊ बाखा पहाटेपासून कष्टाचे काम करून दमुनभागुन आला आहे आणि त्याला चहा हवा असताना पाणी मिळायला वेळ लागतो आहे याने ती अस्वस्थ होते. ही तिची अस्वस्थता जणू एखाद्या मातेची अस्वस्थता आहे असे भाष्य कथक करतो. मग सोहिनीकडे वासनेच्या नजरेने पाहणारा देवळातला पुजारी तिलाच आधी पाणी देऊन उपकृत कसे करतो आणि देवळात साफसफाईला ये असे तिला सांगताना त्याच्या मनात काय काळेबेरे असते त्याची चाहुल कथक वाचकांना देतो.एकूण स्त्रियांकडे पाहण्याचा पुरूषाचा दृष्टिकोन तिला माणूस म्हणून जगू देणारा नसतो असे कथकाला सुचवायचे आहे.
चहा पिऊन परत वडिलांनी सांगितलेले गावचा रस्ता झाडण्याचे काम करायला बाहेर पडलेल्या बाखाच्या मनाचा हिंदोळा पुन्हा चांगल्या वाईट अनुभवांमुळे कसा वरखाली जात रहातो ते कथक तपशीलवारपणे कथन करतो. आपण अस्पृश्य आहोत याची प्रखर जळजळीत जाणीव बाखाला शहरातील रस्त्यावरून जाताना एका ब्राह्मणाने त्याचा अपमान केल्याने कशी होते त्याचे कथक वर्णन करतो. विशेषतः उकिरड्यावरचे खाणारी गाय लोकांना वंदनीय वाटते आणि आपण साफसफाई करतो तरी अस्पृश्य ठरतो हा विरोधाभास बाखाला कसे अस्वस्थ करतो ते कथक सांगतो. पुढे देवळात साफसफाई करायला गेले असता आपल्याला देवळात प्रवेश नाही,पण आपली बहीण मात्र पुजाऱ्याला शारीर सुखासाठी वापरायची आहे यातील विरोधाभास बाखाच्या मनात अंगार फुलवतो. आपल्या बहिणीला आपण सुरक्षितता देऊ शकत नाही याची एक पुरूष म्हणून त्याला शरमही वाटते असे कथक सांगतो.
सोहिनीला घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडून बाखा शहरातील सवर्ण वस्तीतील गल्ल्यांतून अन्न मागत हिंडू लागतो तेव्हा त्याला येणारा उपेक्षेचा अनुभव विदारक आहे.स्वयंपाक तयार झालेला नसेल म्हणून एका घराच्या बाहेरील लाकडी ओट्यावर दमलेला बाखा वाट पहात बसतो आणि त्याचा डोळा लागतो.तेव्हा त्याला दिसणारे स्वप्न त्याच्या मनातील आकांक्षा स्पष्ट करणारे आहे.आपण मालवाहू ट्रेनच्या एका बोगीत भरलेल्या सामानावर,हुक्का ओढत राजासारखे आपण विराजमान झालो आहोत, ती बोगी पुढे एका मोकळ्या भागात येते तिथे गोरे सैनिक आपल्याला उतरवून घेतात असे स्वप्न बाखाला पडते. तसेच एका गावातील सुंदर सकाळ, किलबिलणारे पक्षी आणि त्यातच हातात खाऊ घेऊन पक्ष्यांकडे पहाणाऱ्या छोट्या मुलीच्या हातातील खाऊ कावळ्याने पळवून उकिरड्यावर टाकणे असेही एक दृष्य त्याला स्वप्नात दिसते आणि मग ‘अलख निरंजन’ या फकिराच्या आरोळीने तो जागा होतो.फकिराशी नम्रतेने वागणारी त्याच्या झोळीत स्वतः हाताने अन्न देणारी गृहिणी बाखाशी मात्र वाईट वागते तेव्हा तो अनुभव पुन्हा एकदा त्याला वास्तवाची दाहकता दाखवतो.
अपमानीत झालेला बाखा केवळ एक भाकरी घेऊन घराकडे परततो तेव्हा परत बापाच्या शिव्या त्याला ऐकाव्या लागतात.कसातरी भाकरतुकडा खाऊन तो मित्राच्या बहिणीचे लग्न आहे असे सांगून घराबाहेर पडतो. मित्रांच्या सहवासातही बाखा घुमाच रहातो. पण मित्रांनी त्याला सहानुभूती दाखवल्यवर मात्र तो वाट्याला आलेले सगळे अपमानास्पद अनुभव त्यांना सांगून मन मोकळे करतो.मित्र आपल्यासोबत आहेत या जाणिवेने बाखाच्या मनाला परत उभारी मिळते.हवालदार चरतसिंगच्या घरी हॉकी स्टीक घ्यायला जाताना वाटेत दिसलेल्या चौकीतील सैनिकांची ‘सनहॅट’ बाखाच्या मनाला भुरळ घालते. लहानपणापासून एखाद्या प्रेयसीवर करावे तसे प्रेम त्याने सनहॅटवर केले आहे. जणू तो त्या हॅटचा भक्तच झाला आहे असे म्हणून कथक बाखाच्या मनातील छोट्या छोट्या इच्छा कशा आहेत ते वाचकांना दाखवतो.
चरतसिंगसारख्या सामान्य हवालदाराच्या घराबाहेरही बाखाला रेंगाळत रहावे लागते. तो दार ठोठावू शकत नाही ती चरतसिंगला हाक मारण्याची त्याला मुभा नाही हे सांगताना बाखाला कोणीतरी सांगितलेली राजा जहांगीरच्या दरवाज्यावरील घंटेची आठवण कशी होते ते कथक सांगतो. बाखाला वाटते की चरतसिंगच्या दरवाजातही तशी घंटा असती तर मी ती वाजवली असती.अखेरीस तिष्ठत बसलेल्या बाखाला चरतसिंग दिसतो. तो बाखाकरवी त्याचा हुक्का पेटवायला कोळसा मागून घेतो, स्वतःसाठी मागवलेला चहा पाखरांसाठी ठेवलेल्या दाण्याच्या भांड्यातून का होईना बाखाला देतो आणि अखेरीस नवीकोरी वाटावी अशी हॉकी स्टीक पण देतो तेव्हा बाखाच्या मनाचा हिंदोळा आनंदाने, कृतज्ञतेने खूपच वर जातो.
हॉकी खेळताना बाखाच्या छोट्या दोस्ताला दगड लागतो आणि बाखा त्याला त्याच्या घरी नेऊन पोहचवतो तरी त्याच्या आईकडून त्याला शिव्याच ऐकाव्या लागतात तेव्हा पुन्हा एदा बाखाचे मन हिरमुसते. हा छोटा दोस्त म्हणजे बाखाच्या मनातील ज्ञानलालसेची आकांक्षा पूर्ण करू शकणारा एकमेव मार्ग आहे. पण त्याला आपल्यामुळे दगड लागला आणि आता तो आपल्याला कधीच शिकवणार नाही असेही बाखाला वाटते. घरी परतल्यावर दुपारपासून सफाईचे काम केले नसल्याने बापाकडून पुन्हा एकदा बाखाला शिव्या ऐकाव्या लागतात नी बाप रागाने त्याला घराबाहेरच काढतो तेव्हा बाखा अगदी निराश होतो. यावेळी मित्रही त्याला दिलासा द्यायला येत नाहीत. पण फादर हटचिनसन त्याला गाठतो. आणि त्याच्या स्पर्शाने बाखाला दिलासा मिळतो. येसू सर्वांना जवळ घेतो, त्याला सगळे सारखेच हे ऐकून बाखाला मनोमन येसू आवडतो पण तरी फादरचा देव कसा असतो ते त्याला नीट कळतच नाही. वडिलांनी ख्रिस्ती बनायला नकार दिला होता हेही त्याला आठवते आणि तो फादरना सोडून पळ काढतो.
आशा-निराशा- अपमान-कृतज्ञता-गोंधळलेपण अशा जाणिवांच्या हिंदोळ्यावर वरखाली होणारे बाखाचे मन मैदानातील महात्मा गांधींच्या भाषण ऐकून बरेच स्थिरावते. कोणतेही काम वाईट नसते. आपण करतो ते कामही चांगलेच आहे. पण सवर्णांनी आता आपल्याला समावून घेतले पाहिजे हे बाखाला कळते. विशेषतः बापुजींच्या आश्रमात ब्राह्मणही आवडीने सफाईचे काम करतात हे कळल्यावर आपल्या कामाबद्दलचा कमीपणा बाखाच्या मनातून दूर होतो. गांधीजींनी सांगितलेला स्वच्छ राहणीचा, देशी कपडे वापरण्याचा मंत्रही बाखाला पटतो.भाषणानंतर चाललेल्या चर्चेत एका कवीने स्वच्छता करणे पुढे यंत्रांमुळे किती सोपे होईल हे सांगितल्याने तर बाखाचे मन एकदम आशावादी होते. आता बापाला जाऊन हे सगळे सांगावे असे त्याला वाटू लागते. सूर्यास्त होत असताना बाखाचे मन मात्र नव्या आशेने प्रकाशमान होते असे कथक सांगतो.

अशाप्रकारे संज्ञाप्रवाहाचे वरखाली जात रहाणे दाखवणे हे कथनाचे तंत्र ‘अनटचेबल’ या कादंबरीला वेगळेपणा देते.या कथनाच्या विश्लेषणातून ‘अनटचेबल’मधील प्रमुख कथासूत्रे पुढीलप्रमाणे स्पष्ट होतात-
- भारतीय समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वात खालच्या स्तरावर जगणाऱ्या लोकांच्या उपेक्षीत जगण्याचे दाहक वास्तव मांडणे हे या कादंबरीचे प्रमुख कथासूत्र आहे. बाखासारख्या तळागाळातील माणसांच्या आशाआकांक्षांचा चुराडा करणारी क्रूर जातीव्यवस्था समूळ नष्ट झाली पाहिजे असे ‘अनटचेबल’ ही कादंबरी सुचवते आहे.विविध अनुभव घेताना बाखाला जाणवलेला समाजव्यवस्थेतील विरोधाभास ठळक करणे हेही या कादंबरीचे कथासूत्र म्हणावे लागेल. उदा. जसे उकिरड्यावरील कचरा खाणाऱ्या गायीला स्पर्श करून नमस्कार केला जातो पण उकिरडे साफ करणाऱ्या सफाई कामगाराला मात्र सतत अस्पृश्य मानून दूर ढकलले जाते.अस्पृश्य स्त्रीचे शरीर उपभोगायला चालते पण तिला स्वतःहून पाणी घेण्याचा मात्र हक्क नाही. देवाच्या नावाखाली अन्न मागणाऱ्या फकिराला नम्रपणे अन्न दिले जाते पण सफाई कामाचा मोबदला म्हणून अन्न मागणाऱ्या दलितांना मात्र हिणवले जाते हे विरोधाभास ‘अनटचेबल’ ही कादंबरी स्पष्ट करते आणि वाचकांना अंतर्मुख करते.
- जातीव्यवस्थेबरोबरच पितृसत्ताक व्यवस्था, स्त्रीकडे एक सुंदर, उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन दाखवणे हेही एक कथासूत्र ‘अनटचेबल’मध्ये आहे.
- ब्रिटीशांनी आणलेली आधुनिकता केवळ त्यांच्या कपड्यांच्या फॅशनचे अनुकरण करण्यापुरती मर्यादीत ठेवायची की त्यांची विज्ञाननिष्ठा, लोकशाही मुल्य स्वीकारून विचारांनी आधुनिक व्हायचे असा प्रश्न ‘अनटचेबल’या कादंबरीतून पुढे येतो.
- ब्रिटीशांनी आणलेली आधुनिकता स्वीकारायची की आपले स्वतःचे वेगळेपण(Originality) टिकवणारी महात्मा गांधी प्रणीत स्वराज आणि स्वदेशीची भूमिका स्वीकारायची हाही प्रश्न ‘अनटचेबल’या कादंबरीतून लेखक वाचकांसमोर ठेवतो.
- स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद विसरून एकजुट झाले पाहिजे आणि परदेशातील गोष्टींनी भारावून जाण्यापेक्षा स्वदेशीचा आग्रह धरला पाहिजे हे गांधीजींचे सांगणे स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य व लोकशाही टिकवण्यासाठीही भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे हेही ‘अनटचेबल’ या कादंबरीचे कथानक वाचताना वाचकांच्या मनावर ठसते.
- काम कोणतेही वाईट नाही अस्पृश्यता घालवायची असेल तर सफाईकामगाराचे काम सवर्णांनीही केले पाहिजे नव्हे त्यात सर्वांनी कौशल्य मिळवले पाहिजे आणि अस्पृश्यांनी सवर्णांप्रमाणे शिकण्यात पुढाकार घेतला पाहिजे हे महात्मा गांधींचे सांगणे आज तरी आपण पूर्णपणे स्वीकारले आहे का हा प्रश्न ‘अनटचेबल’ ही कादंबरी वाचून झाल्यावर वाचकांना पडेल.
मुल्कराज आनंद हे इंग्रजी कादंबरी लेखनाचा पाया घालणारे पहिले भारतीय कादंबरीकार ठरले.त्यांच्या ‘अनटचेबल’ या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि ही कादंबरी विविध भारतीय भाषांत भाषांतरीत झाली. तुम्ही ती हिंदीतही वाचू शकता.
मुल्कराज आनंद यांच्यानंतर आर.के. नारायण आणि राजा राव यांनी ही भारतीय इंग्रजी कादंबरीची पायवाट अधिक रूंद केली. पुढील ब्लॉगमध्ये आपण कादंबरीकार राजा राव यांचा परिचय करून घेऊ.
-गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा