मुल्कराज आनंद या इंग्रजीतून लिहिणाऱ्या प्रख्यात कादंबरीकाराचा परिचय आपण मागील ब्लॉगमध्ये करून घेतला होता.आज आपण त्यांनी १९३५ साली लिहिलेल्या पहिल्या कादंबरीचे म्हणजे ‘अनटचेबल’ चे कथानक   समजून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘अनटचेबल’ या कादंबरीच्या मलपृष्ठावर ‘गार्डियन’ या नियतकालिकाने या पुस्तकाचे परीक्षण करताना जे लिहिले होते त्यातील एक मार्मिक वाक्य उधृत करण्यात आले आहे.ते असे-

 “‘अनटचेबल’ या कादंबरीने सर्वप्रथम दलितांची वेदना व्यक्त केली आणि तेही ही वेदना दूर करण्याचा उपाय सोपा आहे अशी ढोंगी भूमिका न घेता.”

‘अनटचेबल’ या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड केवळ एका दिवसाचा आहे. मुल्कराज आनंद यांच्यावर इंग्रजी लेखक जेम्स जॉईस यांचा प्रभाव होता. जेम्स जॉईस यांच्या ‘युलिसिस’ (१९२२) या कादंबरीत डब्लिनमधील एका व्यक्तीच्या (लिओपोल्ड ब्लुम) आयुष्यातील चोवीस तास एवढाच काळ त्याने दाखवला आहे. परंतु त्या चोवीस तासांत त्या व्यक्तीच्या बाह्य मनात, अंतर्मनात आणि सूप्त मनात ज्या भावना आणि जाणिवा निर्माण होतात त्यांची गुंतागुंतीची मांडणी कादंबरीकाराने विस्ताराने केली आहे. ‘मी माझ्या कादंबरीत एक माणूस काय बोलतो, पाहतो, विचार करतो आणि या सगळ्यामुळे त्याच्या अंतर्मनात कोणत्या जाणिवा होत असतात ते दाखवले आहे’ असे जेम्स जॉईसने म्हटले आहे. जेम्स जॉईसच्या या लेखनतंत्राला ‘स्ट्रीम ऑफ कॉन्शशनेस’ ( मराठीत संज्ञाप्रवाही स्पंदने) असे म्हटले जाते. जेम्स जॉईसला चार्ल्स लॅंब याने लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘ऍडव्हेंचर्स ऑफ ओडेसी’ या काव्यातील ‘ओडेसी’ या नायकाने भुरळ घातली होती. ‘ओडेसी’ हे होमर या ग्रीक महाकवीने रचलेले पुराणकाव्य आहे.यातील ‘ओडेसी’ हे नाव लॅटिन भाषेत ‘युलिसीस’ असे उच्चारले जाते. जेम्स जॉईसने तेच नाव आपल्या कादंबरीला दिले आहे. ‘ओडेसी’ (युलिसीस) हा नायक आपल्या पराक्रमाने व बुद्धीचातुर्याने ट्रौजन युद्धात यशस्वी होतो. मात्र ट्रॉय येथून आपल्या ‘इथाका’ या राज्यात परत येताना त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पण अखेरीस वीस वर्षांनी तो सुखरूप परत येतो आणि प्रिय पत्नी पेनोलपीला व मुलाला भेटतो, असे होमरच्या ‘ओडेसी’ या महाकाव्याचे कथानक आहे. ज्याला अध्यात्मिक संदर्भ आहे. दर्यातील वादळे, अमानवी जीवांकडून होणारे हल्ले,मोहात अडकणे,अपऱाधीपणाशी सामना करणे अशा संकट मालिकांतून अध्यात्मिक प्रवास करत नायक ओडेसी तावून सुलाखून बाहेर पडतो. आपले राज्य मुलाला देऊन विरक्त होऊन पत्नीसह ओडेसी पुन्हा प्रवासाला निघतो तेव्हा त्याने वेगळीच आध्यात्मिक उंची गाठलेली असते.

जेम्स जॉईसच्या युलिसीस मधील लिओपोल्ड ब्लुम हा आधुनिक जगातला ननायक आहे. त्याला आयर्लंडमधील डब्लिन या शहरात दैनंदिन जीवन जगताना किती आंतरीक संघर्ष करावा लागतो ते मूळ ओडेसी या महाकाव्याला समांतर असे १८ प्रकरणांचे  उपरोधिक कथानक लिहून जेम्स जॉईसने दाखवले होते. त्याकाळी या कादंबरीला अश्लिल ठरवून जॉईसवर खटला चालवला गेला होता.

मुल्कराज आनंद युरोपात असताना त्यांनी जेम्स जॉईसची ‘युलिसीस’ वाचली असावी आणि त्यातील कथनतंत्र वापरून भारतातील ननायकाची म्हणजे एका दलित तरूणाची (बाखा) कहाणी लिहावी असे त्यांना वाटले असावे.ही कहाणी उपरोधिक नाही तर स्पष्टपणे सामाजिक वास्तव मांडणारीआहे.अस्पृश्यतेशी सामना करणाऱ्या बाखाचा आंतरीक संघर्ष आणि वैचारीक प्रवास दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न कादंबरीतून विशेषत्वाने जाणवतो. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील क्रौर्य मुल्कराज आनंद यांनी भेदकपणे या कादंबरीतून वाचकांसमोर मांडले आहे. वाचकांनाही विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे.

बाखा एका दिवसात काय काय भोगतो ,अनुभवतो , ऐकतो, पहातो आणि त्यामुळे त्याच्या अंतर्मनात कोणत्या जाणिवांचा कल्लोळ उठतो ते ‘अनटचेबल’ ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते.मुल्कराज आनंद यांनी जेव्हा कादंबरी लिहिली तेव्हा त्याचे नाव त्यांनी ‘बाखा’ असेच ठेवले होते. पण पुढे गांधीजींनी कादंबरीचे हस्तलिखित वाचून बाखाची कहाणी प्रातिनिधिक असल्याने कादंबरीचे नाव व्यक्तीवाचक विशेषनाम न ठेवता ‘अनटचेबल’ असे ठेवावे असे लेखकाला सुचवले.

‘अनटचेबल’ कादंबरीचे कथानक घडते स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब प्रांतातील बुल्लेशहा शहरात. या शहराच्या वेशीबाहेर बहिष्कृत अशा भंगी, चांभार, लोहार,धोबी वगैरे जातीच्या लोकांची वस्ती आहे. एका ओढ्याच्या काठी असलेली ही वस्ती अत्यंत अस्वच्छ आहे. ओढ्याचे पाणी जे एकेकाळी निर्मळ होते ते वस्तीतल्या लोकांनी गढूळ करून ठेवले आहे. वस्तीत ठिकठिकाणी गाढवे, घोडे आणि गुरांच्या शेणाचे ढीग पडले आहेत.या शेणापासून तयार झालेल्या शेण्या वापरून पेटवलेल्या वस्तीतील घरांतील चुलींतून बाहेर पडणारा धूर सर्वत्र दुर्गंध पसरवतो आहे.वस्तीतील घरे म्हणजे मातीच्या भिंतीची कच्ची घरे, झोपड्या आहेत. या घरांत धड उजेड देखील येत नाही.

अशा या बकाल वस्तीतील एका झोपडीत बाखा हा स्वच्छता कामगार त्याचे वडील लाखा जमादार ,बहीण सोहिनी आणि धाकटा भाऊ राखा यांच्यासह रहातो आहे.बाखाची आई तो लहान असतानाच वारली आहे.

खरं तर वस्तीत रहाणाऱ्या सर्वांना सभोवतीच्या अस्वच्छ वातावरणाची सवय झाली आहे. ते बदलले पाहिजे असेही त्यांना वाटत नाही. पण बाखाला आपल्या वस्तीतील अस्वच्छता आवडत नाही, ही वस्ती माणसांना रहाण्यालायकच नाही असे त्याला वाटते. हा विचार त्याच्या मनात यायला कारण त्याने काही महिने त्याच्या काकांच्या बदली स्वच्छता कामगार म्हणून शहराच्या ब्रिटीश सैनिकांच्या वसाहतीत काम केले हे आहे.ब्रिटीश वसाहतीत काम करताना बाखाला सन्मानाने वागवले गेले आहे. बाखाला ब्रिटीश लोकांची रहाणी, भाषा हे सगळेच प्रभावित करणारे वाटले आहे. काम करताना कोणी सैनिकाने दिलेले जुने बुट, पॅंट, शर्ट हे सगळे बाखा अभिमानाने वापरतो. वस्तीतील समवयस्क मुले त्याला ‘झंटरमन’ म्हणून चिडवतात. पण तरीही बाखाला ब्रिटीशांसारखे रहावेसे वाटते. आता त्याचे सैनिकी वसाहतीतील काम संपले आहे आणि त्याला शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह साफ करावे लागते. तो ते काम पहाटे उठून न थकता, निष्ठेने करतो. त्यादिवशी तर चरतसिंग या लष्करातील हॉकी खेळाडूने त्याला चांगली सफाई केली म्हणून हॉकी स्टीक भेट द्यायचे आश्वासनही दिले आहे. म्हणून बाखा खुश असतो.

 आपले काम करून आल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला त्यांचे काम-शहरातील सार्वजनिक रस्ते साफ करून ये असे फर्मान सोडले आहे. बाखासाठी हे काम नवे आहे. तरी वडिलांना दुखवायचे नाही म्हणून ते काम करायला तो होकार देतो.

पहाटेपासून काम करून आल्यावर खरे तर बाखाला चहा आणि थोडे खायला हवे आहे. पण घरात पाणी नसल्याने त्याची बहीण सोहिनी सार्वजनिक विहीरीवर पाणी आणायला गेलेली असते. तिथे अस्पृश्यांना पाण्यासाठी भीक मागावी लागते. कोणा सवर्णाला किंवा सवर्णाने पाणी भरायला नेमलेल्या नोकराला दया आली तर ते विहीरीतील पाणी काढून अस्पृश्यांच्या मडक्यांत पाणी भरून देतात. सोहिनी रांगेत उभी राहून पाणी कधी मिळेल याची वाट पहात असताना गावातील देवळाचा पुजारी तिथे येतो. तो पाणी घेत असताना त्याची नजर सोहिनीवर जाते. सोहिनी नुकतीच तारूण्यात पदार्पण केलेली मुलगी आहे. गरीब असली तरी देखणी आहे. पुजाऱ्याच्या मनात तिच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. ती पाणी मागणाऱ्यांच्या रांगेत मागे असली तरी पुजारी तिला पुढे बोलावून पाणी देतो आणि देवळाचे आवार साफ करायला तिने यावे असे तिला सुचवतो. सोहिनीला आपल्या आधी पाणी मिळाल्याने रांगेतली इतर माणसे चिडतात. सोहिनी पाणी घेऊन घरी येते. आपल्या भावाला, वडिलांना चहा आणि आदल्या दिवशीची शिळी भाकरी देते. धाकट्या भावासाठी थोडा चहा ठेवते.

बाखा चहा पिऊन वडिलांची झाडू व टोपली घेऊन शहराकडे निघतो. वाटेत त्याला शाळेत जाणारी बाबु लोकांची मुले दिसतात. त्यालाही शाळेत जायची इच्छा आहे, विशेषतः इंग्रजी शिकायची इच्छा आहे. पण त्याला ते शक्य नाही. दुपारी या मुलांबरोबर हॉकी खेळायची त्याची इच्छा आहे . जर चरतसिंग यांनी हॉकी स्टीक दिली तर दुपारी हॉकी खेळता येईल अशी आशा बाखा करतो.बाबू लोकांच्या एका छोट्या मुलाने बाखाला इंग्रजी शिकवण्याचेही मान्य केले आहे.

आपला धाकटा भाऊ राखा सकाळपासून खेळतो आहे हे पाहून बाखा वैतागतो. भावाला तो घराकडे धाडतो. शहराच्या रस्त्यावरून जाताना बाखा आजुबाजुची दुकाने पहात जात असतो. मिठाईच्या दुकानातील जिलेबीचा त्याला मोह होतो. स्वतःकडचे साठलेले पैसे वापरून तो जिलेबी घ्यायची ठरवतो. दुकानदाराला तो जिलेबी द्यायला सांगतो. दुकानदार जिलेबीची पुडी बांधून दुरून त्याच्याकडे फेकतो.ती पुडी उघडून जिलेबी खाण्यात दंग झालेल्या बाखाला समोरून कोणी ब्राह्मण येत आहे याचे भानही नसते. एक ब्राह्मण त्याच्या जवळून जातो आणि मग तू मला अपवित्र केलेस म्हणून बाखाला शिव्या देऊ लागतो.त्याला मारतो. पहाता पहाता गर्दी जमते आणि सगळे बाखाला ओरडू लागतात. रस्ता साफ करत जाताना भंग्याने आपण येतो आहोत हे ओरडून सांगायचे असते असे सगळ्यांचे म्हणणे आहे. बाखाला ते माहीत असते पण अनवधानाने तशी वर्दी द्यायला तो विसरलेला असतो. लोकांचे शिव्याशाप ऐकून घेताना तो गांगरून जातो. अखेरीस एक मुसलमान टांगेवाला त्याला वाचवतो आणि पुढे घेऊन जातो.वाटेत थांबलेल्या आणि उकिरड्यावरची कुजलेली भाजी खाणाऱ्या गायीला लोक स्पर्श करून, नमस्कार करतात , ती कितीही अस्वच्छ असली तरी तिला पवित्र मानतात पण आपल्याला मात्र अस्पृश्य मानतात ही विसंगती बाखाला अस्वस्थ करते.

रस्ता साफ करून झाल्यावर बाखा वडिलांचे पुढचे काम म्हणजे देवळाचे आवार साफ करायला जातो. तिथे पालापाचोळा एकत्र करून त्याचे ढिगारे करत असताना देवळात शिरणाऱ्या भाविकांकडे त्याचे लक्ष जाते. ही माणसे देवळात का जातात, देवळात असे काय असते ते पहायची त्याला उत्सुकता वाटते . आपल्याला देवळात जायला मज्जाव आहे याची त्याला जाणीव असते. तरीही कोणाचे लक्ष नाही असे पाहून तो पटकन देवळाच्या पायऱ्या चढतो. मात्र तेवढ्यात एका पुजाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष जाते आणि तो बाखाने देऊळ अपवित्र केले म्हणून ओरडू लागतो. बाखा घाईघाईने पायऱ्या उतरतो तेव्हा त्याची बहीण सोहिनी त्याला आवारात रडत बसलेली दिसते. पुजाऱ्याने आपल्याला घरात बोलावले आणि अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला असे ती बाखाला सांगते. आपण आपल्या बहिणीचेही संरक्षण करू शकत नाही हे जाणवून बाखाला अपराधी वाटते. बहिणीला घेऊन वस्तीच्या वाटेकडे जात असताना तो शरमिंदा झालेला असतो. वाटेत बहिणीला एके ठिकाणी सोडून तो शहराच्या गल्लीत जेवण मागायला शिरतो. तिथेही वडील नेहमी ज्या घरून जेवण घेतात तिथे हाका मारूनही जेवण मिळत नाही. जेवण तयार नसेल असे वाटून बाखा दमून घराबाहेरच्या पायरीवर झोपतो तर घरातील स्त्री त्याने पायरी अपवित्र केली म्हणून त्याला रागावते. एक स्त्री पहिल्या मजल्यवरून रोटी त्याच्याकडे फेकते. आणि ती मातीत पडलेली रोटी उचलून घेऊन बाखा अत्यंत व्यथित मनाने घराकडे परततो. आज आपण भावंडांना आणि वडिलांना खायला काय देणार असा प्रश्न त्याला पडतो. घरी आल्यावर हुक्का ओढत बसलेले वडील बाखाने फक्त एक रोटीच आणली म्हणून त्याला शिव्या घालतात. बाखाचा भाऊ राखाला त्यांनी लंगरकडे जाऊन उरलेले खाणे आणायला पाठवलेले असते.

बाखा शांत आहे पण मनातून चिडलेला आहे हे त्याच्या वडिलांना जाणवते. त्याबद्दल ते त्याला खोदून विचारतात तेव्हा तो शहरात त्याचा झालेला अपमान कथन करतो. बाखाने रस्ता झाडताना वर्दी देत जायला हवे होते असे वडिलांचे म्हणणे असते. शहरातले लोक वाईट नाहीत आपण त्यांच्याशी आपली पायरी राखून वागले बोलले पाहिजे असे त्यांचे सांगणे असते. बाखा लहान असताना एकदा खूप आजारी पडला होता आणि शहरातील हकिमाकडे आपण गेलो असता ते आपल्याकडे लक्ष देत नव्हते. पण जेव्हा त्यांना कळले की बाखा अत्यवस्थ आहे तेव्हा ते स्वतः वस्तीत येऊन बाखाला औषध देऊन गेले होते. त्यांच्यामुळेच तू वाचलास हे वडील बाखाला सांगतात. पण बाखाला आलेले अनुभव इतके दाहक आहेत की तो शहरातील सवर्णांवर चिडलेला असतो आणि स्वतःच्या अस्पृश्यतेबद्दल नशिबाला दोष देत असतो.वडिलांप्रमाणे मुकाट्याने अस्पृश्यता,लाचारी स्वीकारणे बाखाला शक्य नसते. आणलेली शिळी भाकरी खाऊन तो घराबाहेर पडतो.आपला मित्र राम चरणच्या बहिणीचे आज लग्न आहे हे त्याला एकदम आठवते. आपल्याला जी मुलगी आवडत होती तीच आता दुसऱ्याची बायको होऊन जाणार याचे मनोमन त्याला दुःख होत असते. पण राम चरण चांभार आहे म्हणजे आपल्यापेक्षा उच्च जातीचा आहे, त्याला वडील नाहीत आणि त्याच्या आईने तिला अधिक पैसे देणाऱ्या माणसाला मुलगी देऊन टाकली आहे हे त्याला माहीत असते.

राम चरणच्या घराजवळच्या गर्दीपासून बाखा दूर उभा रहातो. तिथेच त्याचा दुसरा मित्र छोटा त्याला भेटतो. छोटा गर्दीतल्या राम चरणला हाक मारतो तेव्हा तो पळत मागे येतो. त्याने आपल्या खिशात दोन्ही मित्रांसाठी मिठाई ठेवलेली असते. आई ओरडत असतानाही राम चरण दोन्ही मित्रांना घेऊन वस्तीला लागून असलेल्या टेकडीकडे पळत निघतो. तिघे मित्र आपापसात कधीच अस्पृश्यता मानत नसतात. हळहळू येणाऱ्या बाखाला दोघे हत्ती म्हणून चिडवतात. पण टेकडीवर गेल्यावर तेथील तळ्याकाठच्या निसर्गरम्य वातावरणातही बाखा शांतच आहे हे पाहून दोघे मित्र त्याला त्याच्या अस्वस्थपणाचे कारण विचारतात. बाखा हळूहळू आपले मन मोकळे करतो. शहरातील ब्राह्मणाने ,गावातल्या पुजाऱ्याने, जेवण देणाऱ्या बायकांनी केलेला आपला अपमान तो मित्रांसमोर उघड करतो. तेव्हा ब्राह्मणाला तर आपण नक्की अद्दल घडवू असे म्हणून छोटे त्याला शांत करतो. दुपारी हॉकी खेळायला भेटू असे सांगून तिघेही टेकडी उतरून खाली येतात.

हॉकी खेळायचे असेल तर चरत सिंगच्या घरी जाऊन तो हॉकी स्टीक देतो का ते विचारावे असे मनात येऊन बाखा त्याच्या घराकडे जातो. पण चरत सिंगच्या घराबाहेर त्याला कोणतीच चाहुल लागत नाही. तो घराबाहेरच्या झाडाखाली बसून रहातो. थोड्या वेळाने त्याला चरत सिंग बंगल्याच्या वऱ्हांड्यात दिसतो. तेव्हा बाखा पुढे येतो. चरतसिंग त्याला त्याच्या हुक्क्यासाठी मागील बाजूच्या स्वयंपाकघरातून आचाऱ्याकडून कोळसा आणायला सांगतो आणि आचाऱ्याला चहा पाठवायची आठवण द्यायलाही सांगतो. चरत सिंगला आपल्या हातून आणलेला कोळसा चालेल का अशी शंका बाखाच्या मनात येते. पण चरत सिंगला आपण भंगी असल्याचे माहीत आहे तरीही तो आपल्याला कोळसा आणायला पाठवतो आहे हा त्याचा चांगुलपणाच असे बाखाला वाटते. आचारी बाखाला तू कोण आहेस असे विचारतो पण स्वयंपाकघरातील धुरात त्याला बाखा नीट दिसत नाही. तो बाखाला निखारा देतो. बाखा तो आणून चरतसिंगला देतो आणि तिथेच बसून रहातो. चरतसिंग आचाऱ्याने चहा आणून दिल्यावर बाखाला सांगतो की पाखरांना पाणी प्यायला भांडे ठेवले आहे ते घे. त्या भांड्यात तो बाखाला चहा ओतून देतो. बाखाला चरत सिंग भला माणूस वाटतो. चरतसिंग आतून एक उत्तम दर्जाची हॉकी स्टीक बाखाला आणून देतो तेव्हा तर तो भारावूनच जातो. आपल्या शर्टात ती स्टीक लपवून तो वस्तीबाहेरच्या मैदानाकडे येतो. बाबू लोकांच्या वस्तीतील छोटा त्याची वाट पहात असतो. त्याच्याकडे असलेली हॉकी स्टीकही चरतसिंगनेच त्याला दिलेली असते हे ऐकल्यावर आपली हॉकीस्टीक काही विशेष आहे हा आनंद बाखाच्या मनातून गळून पडतो.

बाखाचा मित्र छोटे त्याची टीम घेऊन हॉकी खेळायला येतो. तेव्हा बाखा त्यांच्या टीममध्ये त्याच्या लहानग्या मित्राला घ्यायची विनंता छोटेला करतो.पण छोटे त्या बाबूच्या मुलाच्या मोठ्या भावाला टीममध्ये घेतो. धाकटा नीट खेळणार नाही, त्याला लागेल असे तो बाखाला समजावतो. खेळ सुरू होतो, बाखा गोल करतो आणि दुसऱ्या टीममधील मुलांना बाखा कोण आहे हे कळून ते त्याला मारायला पुढे येतात. छोटे दगड भिरकावतो आणि नेमका बाखाच्या छोट्या दोस्ताला तो लागतो, बाखा तडकाफडकी पुढे होतो आणि रक्तबंबाळ लहानग्याला त्याच्या घरी पोहचवतो. पण तिथे त्या मुलाची आई त्यालाच दोषी धरते. शिव्या देते. तिचा मोठा मुलगा तिला सांगतो की बाखाने लहानग्याला वाचवले पण ती ऐकून घ्यायलाच तयार नसते. बाखाला छोटेचा राग येतो. पण तो काही न बोलता घराकडे जातो. तर तिथे वडील त्याला दिवसभर घरी न आल्याबद्दल आणि त्यांची उरलेली सफाईची कामे न केल्याबद्दल शिव्याशाप देतात नी रागाने बाखाला घराबाहेर हाकलतात.बाखा खिन्न मनाने शहराकडे चालत राहतो.एकटेपणा त्याला घेरू लागतो.

रस्त्याच्या कडेच्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या बाखाला असे वाटत होते की राम चरण किंवा छोटेने येऊन आपली विचारपूस करावी. पण ते काही येत नाहीत. शहरातील चर्चचे पाद्री कलोनल हटचिन्सन यांनी मात्र एकटे बसलेल्या बाखाला हेरले आणि येसुची कृपा तुझ्यावर होईल असे सांगत ते त्याला चर्चकडे घेऊन गेले.पाद्री आपल्याला स्पर्श करतात हे बाखाला आंनंददायक वाटत असले तरी त्याच्या मनात भयशंका येत होत्या. वाटेत ते बाखाला येसूबद्दल त्याने मानवजातीसाठी आत्मार्पण केले असे सांगत होते पण बाखाला त्याचे आकलन झाले नाही. आपल्या वडिलांनी कधीतरी ब्रिटीश पाद्र्याने त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला सांगितले असता नकार दिला होता हे बाखाला आठवले. आपले आई वडिल कधी देवळात जाऊ शकले नाहीत पण रामाचे चित्र घरात लावून ते त्याची गाणी गात हे बाखाने पाहिले होते. त्यामुळे राम हा एक देव आहे हे त्याला माहीत होते. पाद्री मात्र येसू हा देवाचा दूत आहे असे सांगत होते. मग हा ख्रिस्ती लोकांचा देव कसा असतो असा प्रश्न बाखाला पडला होता. त्याला फादरना तो प्रश्न विचारायचा होता पण तेवढ्यात फादरची बायको रागारागाने ओरडत बाहेर आली. तिचे रंगवलेले तोंड नी गुडघ्यापर्यंतचा झगा पाहून बाखा गोंधळला. ती आपल्यावरच रागावली आहे असे वाटून त्याने पळ काढला.

चर्चकडून निघालेला बाखा रेल्वे स्टेशनजवळून जात असताना अचानक लोकांची गर्दी “महात्मा गांधी की जय” म्हणत मैदानाकडे जाताना त्याला दिसली. महात्मा गांधी आता शहरात येणार आहेत आणि भाषण करणार आहेत हे त्याला कळले. बाखाला महात्मा गांधी हे नाव ऐकून माहीत होते पण ते कसे दिसतात, काय बोलतात हे ऐकायची त्याला उत्सुकता वाटली. तोही गर्दीत अंग चोरून घाबरून पुढे जात राहिला. एका बाजूला असलेल्या झाडाजवळ तो उभा राहिला आणि गर्दीतील लोक काय बोलत आहेत ते ऐकू लागला. कोणी विलायतेहून आलेला माणूस महात्मा गांधी यंत्रांना, उद्योगांना विरोध करत आहेत आणि त्यामुळे आपला देश कधीही युरोपियन देशांसारखा पुढारलेला होऊ शकणार नाही असे सांगत होता.कोणी महात्मा गांधी स्वदेशीचा नारा देत आहेत त्याबद्दल बोलून विलायतेहून आलेल्या माणसाला त्याचा टाय त्याने टाकून द्यावा असे सांगत होते.एक बाबू त्याने ‘ट्रिब्युन’ या नियतकालिकात वाचलेल्या महात्मा गांधींच्याबद्दलच्या लेखातील वाक्यच बोलून दाखवत होता. आधुनिक झालेल्या युरोप अमेरिकेतही अनेक समस्या आहेत आणि महात्मा गांधी ज्या मूलभूत आध्यात्मिक आणि मानसिक बदलाचा, स्वधर्माचे पालन करण्याच्या मार्गाचा आग्रह धरत आहेत तोच जगाला योग्य दिशेने नेऊ शकणार आहे हे युरोपातील बुद्धिवंतांनीही मान्य केले आहे असे तो सांगत होता. आधुनिकतेचा आंधळेपणाने स्वीकार संपूर्ण जगाला अमानुषतेच्या मार्गाने नेईल पण गांधींनी सांगितलेल्या मार्गाचा पाया धार्मिक, अध्यात्मिक स्वयंशिस्तीचा आहे आणि तो मात्र जगाला मानवतेच्या मार्गाने शांतीकडे नेईल असे ‘ट्रिब्युन’मधील लेख सांगत होता. बाखाला यातील सगळे कळत होते असे नाही पण महात्मा गांधींचा मार्ग वेगळा आहे आणि तो सर्वांना सोबत नेणारा आहे असे त्याला जाणवत होते.गर्दीतले कोणी भारतातही शेकडो वर्षांपूर्वीपासून रस्ते बांधले गेले आहेत, गावपंचायती होत्या हे सांगत ब्रिटीश जे करत आहेत ते आपल्याकडे पूर्वापार होते असे पटवत होते. मात्र कोणी शेतकरी गावातील अस्पृश्यांच्या उद्धारासाठी महात्मा गांधी अतिशय दृढपणे प्रयत्न करत आहेत हे सांगत होता हे ऐकून बाखाला गांधींजींबद्दल आदर वाटला.

अखेर महात्मा गांधी आले असे गर्दी म्हणू लागली आणि बाखा झाडावर चढून महात्मा गांधी दिसतात का ते पाहू लागला. एक काळसर, पांढरा पंचा पांघरलेले, डोक्यावर केस नसलेले, तोंडाचे बोळके झालेले,गोल चष्मा लावणारे,वृद्ध बारीकसे गृहस्थ महात्मा गांधी आहेत हे पाहून बाखाला धक्काच बसला. आणि मग महात्मा गांधींचे हळू आवाजातले भाषण तो कानात प्राण आणून ऐकू लागला.ब्रिटीशांनी फोडा व झोडा ही निती वापरून भारताला परतंत्र केले आहे असे म्हणतात पण खरं तर ब्रिटीश येण्याआधीपासूनच आपण कधीही समाज म्हणून एकजुट नव्हतो. आपल्या समाजातील जातीभेद आणि विशेषतः अस्पृश्यतेची प्रथा  हे आपल्याला पारतंत्र्यात टाकणारे मोठे कारण आहे. ब्रिटीशांना घालवायचे असेल तर आपल्याला समाज म्हणून एकसंध व्हावे लागेल, अस्पृश्यता संपवावी लागेल असे महात्मा गांधी अतिशय शांतपणे समजावून देत होते. गांधीजी स्वदेशीबद्दल सांगत असताना आपण आंधळेपणाने गोऱ्या लोकांचे अनुकरण करत आहोत असे बाखाला जाणवले होते. अस्पृश्यांनी आपले गाव सफाईचे काम करून आल्यावर आंघोळ करावी, स्वच्छ रहावे म्हणजे इतर लोकांना त्यांची घृणा वाटणार नाही, आपल्या आश्रमात आपण स्वतः आणि ब्राम्हण माणसेही आवडीने स्वच्छतेची कामे करतात. काम कोणतेही वाईट नसते असे महात्मा गांधींनी सांगितले तेव्हा तर बाखा अचंबीत झाला होता. अस्पृश्यांनी आता लोकांकडून मागून आणून खाऊ नये तर स्वतः घरात बनवून खावे असेही त्यांनी सांगितले. अस्पृश्यांना हरिजन असा शब्द वापरला जावा असे गांधीजींचे म्हणणे होते. विशेषतः गांधीजींनी जेव्हा त्यांच्या घरात सफाई करणाऱ्या उका या भंग्याचा स्पर्श वाईट आहे हे सांगणाऱ्या आईला ती चुकीचे सांगते आहे हे कसे ठणकावून सांगितले होते हे ऐकताना बाखाला गांधींजींबद्दल कृतज्ञता वाटली. मला पुनर्जन्म नको आहे पण जर तो मला मिळणारच असेल तर मला तो अस्पृश्य म्हणून हवा आहे असे महात्मा गांधींनी म्हणताच बाखा भारावून गेला होता.मला स्वच्छतेचे काम आवडते आणि त्यात मला अधिक कौशल्य मिळवायचे आहे असे गांधीजी म्हणत होते.बाखा अवाक होऊन ते ऐकत होता.जर सभेत अस्पृश्य असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यावे की ते समाज स्वच्छ करत आहेत.त्यांनी आपले जीवन शुद्ध केले पाहिजे आणि त्यासाठी स्वतः स्वच्छ राहिले पाहिजे असे गांधीजींचे म्हणणे होते.विशेषतः अस्पृश्यांनी दारूचे व्यसन सोडले पाहिजे असे गांधीजी कळकळीने सांगत होते. पण बाखाला वाटले की महात्मा गांधी इथे आपल्याला दोष देऊ लागले आहेत. गांधीजींची ती शेवटची वाक्ये विसरून जायचे त्याने ठरवले होते. त्याला वाटले आपण महात्मा गांधींना आपला आज कसा ठिकठिकाणी अपमान करण्यात आला ते सांगावे.आपल्याला कसे शिळेपाके खायला लागते आणि ते मागताना कसे लाचार व्हावे लागते ते सांगावे.पण जेव्हा त्याने ऐकले की महात्मा गांधी सांगत होते- हिंदु समाजाला स्वभावतः अनैतिकतेने वागण्याची सवय आहे. ते अज्ञानात रहातात . पण आता त्यांनी सगळे रस्ते, देवळे, शाळा अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या पाहिजेत तेव्हा बाखा चकीत झाला.

महात्मा गांधींचे भाषण संपले आणि गर्दी पांगू लागली पण भाषणापूर्वी वाद घालणारे बाखाच्या सभोवतीचे लोक परत वाद घालू लागले. त्यातील कोणी कवी गांधीजींवर कविता म्हणत होता. तो विलायतेत जाऊन आलेला होता. तो सांगत होता की महात्मा गांधी अस्पृश्यता दूर करा म्हणत आहेत पण ती यंत्रांचा स्वीकार केल्यानेच दूर होईल. युरोपात स्वच्छतागृहे, रस्ते साफ करणारी यंत्रे आहेत. त्यामुळे सफाई कामगार म्हणून कोणाला हिणवले जाण्याची वेळच येत नाही. कोणी त्या माणसाला विरोध करत आपली जातीव्यवस्था लोकांना हिणवणारी आहे असे त्याला सांगत होता. बाखा हे सगळे ऐकत होता. त्यालाही वाटत होते की स्वच्छता करणारी यंत्रे आली तर किती बरे होईल मग आपल्याला ते अस्वच्छ काम करावेच लागणार नाही. आपण मग दुसरे एखादे कौशल्य शिकून घेऊ असे त्याला वाटले.

सूर्य अस्ताला गेला होता, आकाशात चांदण्या चमकू लागल्या होत्या आणि आपल्या वस्तीकडे परतणाऱ्या बाखाला वाटत होते की आता घरी जाऊन आपण आपल्या वडिलांना महात्मा गांधी काय म्हणाले ते सांगू आणि कधीतरी त्या कवीला शोधून काढून स्वच्छता करणारी यंत्रे कुठे मिळतात तेही शोधून काढू. तो दिवस बाखामध्ये परिवर्तन घडवणारा, त्याला विचारांच्या अनेक प्रवाहांची ओळख देणारा ठरला होता.

अशाप्रकारे ‘अनटचेबल’ ही मुल्कराज आनंद यांची कादंबरी बाखा या अस्पृश्य तरूणाची वेदना आणि त्याचा भावनिक, वैचारीक प्रवास वाचकांसमोर उलगडणारी आहे असे म्हणता येईल.

तुम्ही ‘अनटचेबल’ ही मूळ इंग्रजी कादंबरी जरूर वाचा.ती तुम्हाला निश्चित प्रभावित करेल.त्यानंतर तुम्हालाही माझ्याप्रमाणे प्रश्न पडतील. देशाच्या स्वातंत्र्याला ऐंशी वर्षे झाली पण दलितांना अजून तरी समान वागणूक मिळते आहे का ? शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांत राखीव जागा मिळाल्याने सर्व दलितांचे दारिद्र्य , त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणुक संपली का ?गावागावातील दलित स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार थांबले का ? सर्व देवळांत दलितांना प्रवेश दिला जातो का ?अस्पृश्यता समूळ नष्ट झाली आहे का ?

खरं तर अस्पृश्यता,जातीभेद  आपल्यापैकी अनेकांच्या मनातील पूर्वग्रह आहेत कारण आपल्याला जातीश्रेष्ठतेचा अहंकार आहे. आपण आपला अहंकार दूर करून खरोखरच दलितांना समान मानतो आहोत की केवळ नाइलाजाने किंवा दयेपोटी त्यांना स्वीकारतो आहोत ?  महात्मा गांधींनी सांगितलेला नैतिकतेचा, सत्य,अहिंसेचा,समानतेचा, स्वदेशीचा मार्ग आपण मनापासून स्वीकारला आहे का ?   याचे उत्तर तुम्ही स्वतःला तरी प्रामाणिकपणे देऊ शकाल का ? ते देऊ शकत असलात तरच तुम्हाला मुल्कराज आनंद यांच्या ‘अनटचेबल’ या कादंबरीतील बाखाची वेदना, त्याचे क्रूर वास्तव आणि वैचारीक प्रवास समजून घेता येईल.

पुढील ब्लॉगमध्ये ‘अनटचेबल’ या कादंबरीतील कथन आणि कथासूत्रे याबद्दल विचार करू.

                                                              –गीता मांजरेकर

________________________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा