देशाचे स्वातंत्र्य आणि समाजपरिवर्तनाच्या ध्येयाने लिहिणारा इंग्रजी कादंबरीकार

मागील ब्लॉगमध्ये आपण भारतीय लेखकांनी इंग्रजीत कादंबरी लेखनास प्रारंभ कसा केला त्याचा मागोवा घेताना बंकिंमचंद्र चटर्जी आणि लालबिहारी दास यांच्या इंग्रजी कादंबऱ्यांबद्दल थोडक्यात जाणून घेतले. आज आपण स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय इंग्रजी कादंबरीकार म्हणून जगभरात ख्यातकीर्त झालेले  मुल्कराज आनंद यांचा आणि त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

मुल्कराज आनंद यांचा जन्म परतंत्र भारतात पेशावर(आताच्या पाकिस्तानात) येथे १९०५ साली झाला.२००४ साली पुणे येथे वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ७५ वर्षांची प्रदीर्घ अशी आपली लेखन कारकिर्द मुल्कराज यांनी सातत्याने इंग्रजीत कथा, कादंबऱ्या, समीक्षा व वैचारिक  लेखन करून गाजवली.त्यांनी आपले सगळे लेखन भारतातील इंग्रजी सत्तेच्या पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या व अन्य बलुतेदारांच्या वाट्याला आलेले दारिद्र्य तसेच पारंपरिक जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता यासंदर्भातले वास्तव वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी केले आहे हे विशेष. स्वतंत्र भारत हा न्याय,समता आणि पुरोगामी विचारांचा पाया असलेला देश असावा असे तत्कालीन अनेकांप्रमाणे त्यांचेही स्वप्न होते.या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे अशी तळमळ मुल्कराज यांना होती. तीच त्यांच्या लेखनातून सातत्याने अभिव्यक्त झालेली दिसते.

१२ डिसेंबर १९०५ रोजी मुल्कराज यांचा जन्म एका पंजाबी लोहाराच्या कुटुंबात झाला.त्यांच्या घरात लोहार कामाची परंपरा असली तरी ब्रिटीश साम्राज्यात त्यांचे वडील लष्करात भरती झाले होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशातील लष्करी वसाहतींमध्ये मुल्कराज यांचे बालपण गेले. अमृतसर येथील खालसा महाविद्यालयातून आणि पंजाब विद्यापीठातून पदवी शिक्षण घेऊन मुल्कराज पुढे लंडनला गेले. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत त्यांनी लंडन विद्यापीठाच्या महाविद्यालयातून  तत्वज्ञान विषयातील उच्चशिक्षण घेतले आणि अखेरीस  केंब्रिज विद्यापीठातून १९२९ साली बर्ट्रांड रसेल या आधुनिक तत्वज्ञाच्यासंदर्भात संशोधन करून त्यांनी तत्वज्ञान या विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त केली.पुढे त्यांनी १९३२ पर्यंत जिनेव्हा येथील ‘लिग ऑफ नेशन्स स्कुल ऑफ इंटलेक्चुअल कॉऑपरेशन’ या महाविद्यालयात व्याखाता म्हणून काम केले.तर १९३२ ते १९४५या काळात ते लंडनच्या ‘वर्कर्स एज्युकेशनल असोसिएशन’ या संस्थेत व्याखाता म्हणून कार्यरत होते.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी बी.बी.सी. साठी पत्रकारीताही केली.

ब्रिटनमध्ये शिकत असताना मुल्कराज यांच्यावर मार्क्सिस्ट विचारांचा मोठा पगडा होता.त्या काळात ब्रिटनमध्ये ‘ब्लुम्सबरी’ (लंडनमधील ब्लुम्सबरी भागात रहाणाऱ्या लेखकांचा गट) ही साहित्यिक चळवळ सुरू होती आणि मुल्कराज त्या चळवळीत सक्रीय होते.कथनातील वेगवेगळे प्रयोग या चळवळीतील लेखक करत होते.व्हिक्टोरीयन काळातील कर्मठ मतांविरूद्ध बंड करणारा हा आधुनिकवादी गट होता.व्हर्जिनिया वुल्फ ही स्त्रीवादी लेखिका याच गटातील एक होती.प्रामुख्याने केंब्रिज विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे या गटाचे सदस्य असत. मुल्कराज यांना लेखनप्रेरणा ‘ब्लुम्सबरी’या गटातून मिळाली.टी.एस. इलियट, क्लाईव्ह बेल, नॅन्सी क्युनार्ड, इ.एम. फॉर्स्टर ,एरिक गिल आणि ऍडाल्स हक्स्ले यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांचा सहवास मुल्कराज यांना मिळाला.अर्थातच त्यांच्या लेखनाला तो प्रेरक ठरला. ‘ऍनिमल फार्म’ या कादंबरीने प्रसिद्ध झालेला जॉर्ज ऑरवेल हा मुल्कराज आनंद यांचा मित्र झाला होता. ऑरवेलने मुल्कराज यांच्या पहिल्याच म्हणजे ‘अनटचेबल’ या कादंबरीचे कौतुक करताना भारतीय संस्कृतीचा दस्तावेज म्हणून या कादंबरीतील प्रत्येक पानाकडे पहावे लागेल असे म्हटले होते आणि हे भारतीय इंग्रजी लेखक महायुद्धोत्तर इंग्रजी साहित्यावर निश्चित प्रभाव पाडणार आहेत असे भाकित वर्तवले होते. त्यांच्या कादंबऱ्या जशा प्रसिद्ध होऊ लागल्या तसतशी मुल्काराज यांना ब्रिटनमध्येही साहित्यिक म्हणून मान्यता प्राप्त झाली. भारतीय इंग्रजी कादंबरीकारांमधील ‘चार्ल्स डिकन्स’ असे मुल्कराज आनंद यांना म्हटले जाऊ लागले.पुढे मुल्कराज आनंद, राजा राव आणि आर.के. नारायण ही लेखकत्रयी भारतीय इंग्रजी कादंबरीलेखनाचा पाया रचणारी ठरली.

  मुल्कराज यांचे शिक्षण आणि कादंबरीलेखनाचा प्रारंभ ब्रिटनमध्ये झाला असला तरी लेखनाचा आशय मात्र भारतातील समाजजीवनातून त्यांना गवसला होता. लहानपणी आपल्या एका आत्याला केवळ मुस्लिम स्त्रीबरोबर जेवली या कारणाने कसे वाळीत टाकले गेले होते आणि त्यातून वैफल्य आलेल्या आत्याने आत्महत्या कशी केली हे विदारक वास्तव  मुल्कराज विसरू शकले नव्हते.आपला पहिला इंग्रजी निबंध त्यांनी याच प्रसंगावर लिहिला होता.

१९३५ मध्ये लंडन येथे असतानाच ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’ ही संस्था मुल्कराज आनंद यांनी सुरू केली. भारतात सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी पुरक असे लेखन करावे या ध्येयाने प्रेरीत झालेले समविचारी तरूण भारतीय या संस्थेत एकत्र येत असत.त्यावेळी सज्जाद झाहिर, ज्योतिर्मय घोष आणि त्यांचे अन्य लेखक मित्र मुल्कराज यांच्या सोबत होते.त्यांनी या संस्थेचा जाहिरनामा तयार केला होता.भारतातील भूक, दारिद्रय आणि राजकीय दडपशाही याविरूद्ध आवाज उठवणारे लेखन आणि कृतीशील चळवळ उभारण्याचे ध्येय या संस्थेने बाळगले होते.पुढे भारतात ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’ची चळवळ फोफावली तेव्हा त्यात अहमद अली, प्रेमचंद, इस्मत चुगताई,फैज अहमद फैज , सदाअत हसन मंटो  ही हिंदी भाषेत लिहिणारे समविचारी लेखकही सहभागी झाले.

१९३५मध्ये मुल्कराज वैचारिक मंथन करणाऱ्या पॅरिस, माद्रिद येथील काही महत्त्वाच्या जागतिक  परिषदांना उपस्थित राहिले आणि तिथे त्यांनी सामाजिक न्याय  मिळवण्याच्या लढ्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत हक्काची किती गरज आहे याबद्दल आपले आग्रही मत मांडले.साहित्याने दडपशाही करणाऱ्या सत्ताधाऱ्यांबद्दल व शोषणाविरूद्ध आवाज उठवण्याचे काम करणे जरूरीचे आहे या त्यांच्या मताबद्दल या जागतिक परिषदांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.युरोपमध्ये मुल्कराज आनंद शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने २० वर्षे वास्तव्यास होते. पण तिथे राहूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे हिरीरीने समर्थन केले. जेव्हा जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी या चळवळीत सहभागही घेतला.महात्मा गांधींसारख्या नेत्यांच्या ते संपर्कात असत. एवढेच नव्हे तर युरोपात असतानाच स्पेनच्या स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

मुल्कराज यांनी आपली लेखक म्हणून कारकिर्द लंडनमध्येच सुरू केली.ते तत्कालीन प्रख्यात कवी टी.एस. इलियट यांच्या ‘क्रायटेरिया’ या मासिकात पुस्तक परीक्षणे लिहीत असत. त्यानंतर त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘अनटचेबल’ लिहून ती १९३५ साली लंडन येथून प्रकाशित केली.या कादंबरीत त्यांनी भारतातील  दलित, गावातील मैला उचलणाऱ्या, रस्ते सफाईचे काम करणाऱ्या   तरूणाचे जगणे किती अपमानास्पद असते हे वास्तव वाचकांसमोर ठेवले.या कादंबरीत त्यांनी इंग्रजी तर सफाईदार शैलीत वापरलेच पण त्याबरोबर पंजाबी भाषेतील म्हणी, वाकप्रचारांचाही सहज वापर केला.या कादंबरीचे हस्तलिखित महात्मा गांधींनी वाचले होते आणि कादंबरीचे मूळ नाव ‘बाखा’  हे बदलून ते अधिक प्रातिनिधिक असावे असे सुचवले होते. मुल्कराज यांच्या कथनावर जेम्स जॉईस यांच्या संज्ञाप्रवाहीस्पंदन या शैलीचा प्रभाव होता. पण तो बाखासारख्या अशिक्षित व्यक्तिरेखेसाठी समर्पक नाही असेही महात्मा गांधी यांनी त्यांना सुचवले होते.त्यामुळे मुल्कराज यांनी आपल्या लेखनशैलीत बदल केला. ब्रिटनमधील कादंबरी या साहित्यप्रकाराबद्दल तात्विक मांडणी करणारे प्रख्यात समीक्षक इ.एम. फॉर्स्टर यांनी ‘अनटचेबल’ या कादंबरीबद्दल गौरवोद्गार काढताना असे म्हटले आहे की विषयाभोवती गोलगोल फिरत रहाण्यापेक्षा त्याला थेट भिडून त्याची गांभिर्याने मांडणी करणे हे मुल्कराज आनंद यांच्या शैलीचे वैशिष्ट्य ठरेल.

१९३६ मध्ये मुल्कराज आनंद यांची दुसरी कादंबरी ‘कुली’ ही प्रसिद्ध झाली.या कादंबरीत मुल्कराज यांनी तत्कालीन बाल कामगारांच्या समस्येचे विदारक वास्तव अत्यंत प्रत्ययकारी शब्दांत वाचकांसमोर ठेवले होते.तर १९३७ साली प्रकाशित झालेल्या आपल्या ‘टु लिव्हज ऍंड अ बड’ या कादंबरीत मुल्कराज यांनी चहाच्या मळ्यातील कामगारांचे  विशेषतः स्त्रियांवर ब्रिटीशांनी चालवलेले लैंगिक अत्याचार ही सामाजिक समस्या जगातील वाचकांसमोर परिणामकारकपणे मांडली.

मुल्कराज आनंद त्यांच्या ‘व्हिलेज’(१९३९), ‘अक्रॉस दी ब्लॅक वॉटर्स’ (१९४०)  ‘दी स्वोर्ड ऍंड सिकल’ (१९४२)  या कादंबरीत्रयीसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील शेतकऱ्याची, पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून सहभागी झालेल्या मूळच्या भारतीय शेतकऱ्यांची तसेच भारतीय खेड्यांतील बलुतेदारांची  ब्रिटीश आमदानितील विकल परिस्थिती जागतिक वाचकांसमोर मांडण्याची कामगिरी या कादंबऱ्यांनी केली. मुल्कराज यांची सामाजिक वास्तव तपशीलवारपणे मांडण्याची शैली या कादंबऱ्यांतून प्रभावीपणे समोर आली.

एका बाजूला मुल्कराज आनंद यांच्यावर  गांधीवादाचा प्रभाव होता पण त्याचवेळी जवाहरलाल नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक भारतात यंत्र आणि उद्योगांचे महत्त्वही त्यांना पटले होते त्यामुळे त्यांच्या ‘दी बिग हार्ट’((१९४५) या कादंबरीतील नायक लोहारांनी आता पारंपरिक पद्धती सोडून नवी यंत्रे चालवण्याचे कौशल्य शिकून घ्यावे असे सांगतो.हा नायक मुंबईत राहून गिरणीत काम करून आला आहे. त्याला यंत्रांचे महत्त्व पटले आहे.नव्या विचारांना सामोरे जाण्याएवढे त्याचे मन विशाल झाले आहे. पण  बदलाला सामोरे जाऊ न इच्छिणारे लोक त्यालाच यंत्रावर आपटून मारून टाकतात असा आपल्या कादंबरीचा करूण पण वास्तव शेवट मुल्कराज करतात.( मराठीतील विभावरी शिरूरकर यांची ‘बळी’ ही कादंबरी त्यासंदर्भात आठवते)

१९५३ मध्ये मुल्कराज आनंद यांनी ‘प्रायव्हेट लाईफ ऑफ ऍन इंडियन प्रिन्स’ ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारतात असलेल्या संस्थानातील राजे आणि राजकुमारांची श्रीमंती रहाणी आणि त्यांची सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याची वृत्ती याचे वर्णन असणारे वास्तववादी कथानक मुल्कराज यांनी मांडले आहे.

 आपले आत्मचरित्र सात कादंबऱ्यांतून क्रमशः मांडावे असे मुल्कराज आनंद यांनी ठरवले होते. त्यातील चार कादंबऱ्या त्यांनी प्रकाशित केल्या. ‘सेव्हन समर्स’ (१९५१), ‘मॉर्निंग फेस’(१९६८), ‘कन्फेशन ऑफ अ लव्हर’ (१९७६) आणि  ‘द बबल’(१९८४) अशी या चार कादंबऱ्यांची नावे आहेत. किशनचंदर आझाद हा या चार कादंबऱ्यांचा नायक आहे.  ‘सेव्हन समर्स’ या कादंबरीत किशनचंदरची  बालपणीची सात वर्षे त्यांनी वर्णन केली आहेत.दुसऱ्या म्हणजे ‘मॉर्निंग फेस’ या कादंबरीला भारतातील साहित्य अकादमीने पारितोषिक देऊन गौरवले आहे. १९२० ते १९३० दरम्यानची भारतातील स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. ‘कन्फेशन ऑफ अ लव्हर’ या तिसऱ्या कादंबरीत किशनचंदर अमृतसर येथील खालसा महाविद्यालयात शिक्षण घेतो,प्रेमाचा आणि प्रेमभंगाच पहिला अनुभव त्याला विफल करतो.तो मुंबईत येतो आणि पुढे लंडनला प्रयाण करतो.चौथ्या आणि शेवटच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत ‘द बबल’मध्ये मुल्कराज आनंद यांनी किशनचंदर याचे इंग्लंडमधील वास्तव्य, नोकरी करत पीएच.डी. मिळवताना त्याला घ्यावे लागलेले कष्ट.त्याच्या आयुष्यात आलेली आयरीन ही आयरीश स्त्री. तिने त्याच्या मनात पेरलेली स्वातंत्र्याकांक्षा, लेखनासाठी दिलेली प्रेरणा, किशनचंदरच्या लेखनावर पाश्चात्त्य तत्वज्ञानाबरोबरच गांधीवादाचा असलेला प्रभाव, त्याला लेखक म्हणून मिळत गेलेली ओळख हा भाग येतो.

 मुल्कराज आनंद हे जसे कादंबरीकार होते तसेच ते लघुकथाकार म्हणूनही प्रसिद्ध होते. ‘दी लॉस्ट चाइल्ड’, ‘दी बार्बर्स ट्रेड युनियन’, ‘अ पेअर ऑफ मुस्टॅच’ ,’दी गोल्ड वॉच’, ‘लाजवंती’ या त्यांच्या काही गाजलेल्या लघुकथा आहेत.भारतातील सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण करून इथल्या विषमतेचा कठोर उपहास करणाऱ्या कथा असे मुल्कराज यांच्या कथांचे वर्णन समीक्षक करतात.

साहित्य आणि अन्य ललित कलांचा संबंध याबद्दल मुल्कराज आनंद यांना कुतूहल होते. लंडनमध्ये असताना ते चित्रकार पिकासो यांच्या सहवासात आले होते आणि पिकासोची चित्रे त्यांच्या संग्रही होती. १९४६ मध्ये मुल्कराज आनंद यांनी ‘मार्ग’ हे कला समीक्षेला वाहिलेले दर्जेदार त्रैमासिक सुरू केले.विशेष म्हणजे जे आजही सुरू आहे आणि जगभरात दर्जेदार गणले जाते. (https://marg-art.org/aboutus). ‘कुतुब पब्लिकेशन’ या संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९५३ मध्ये ‘वर्ल्ड पिस कॉन्सिल’ या रशियातील विख्यात संस्थेतर्फे मुल्कराज आनंद यांना ‘शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. १९६० मध्ये त्यांची नियुक्ती पंजाब विद्यापीठाने ‘रविंद्रनाथ टागोर प्रोफेसर ऑफ लिटरेचर ऍंड फाईन आर्टस’ या मानाच्या पदावर केली.सिमला येथील ‘इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज’ मध्येही ते वर्षभर कार्यरत होते. १९६५ ते १९७० या कालखंडात ते दिल्ली येथील ‘ललित कला अकादमी’चे चेयरमन होते.१९६८ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभुषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यिक कामगिरीचा उचित गौरव केला.

युरोपमध्ये असतानाच मुल्कराज आनंद यांनी १९३८मध्ये कॅथरीन व्हॅन गेल्डर या ब्रिटीश कलावंत स्त्रीशी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना एक मुलगी झाली होती. जिचे नाव त्यांनी सुशिला असे ठेवले होते.पण १९४८ मध्ये  कॅथरीनशी त्यांचा घटस्फोट झाला. पुढे भारतात आल्यावर १९५० मध्ये शिरीन वजिफदार या भारतीय नृत्यकलेत पारंगत पारसी नृत्यांगनेशी मुल्कराज आनंद यांनी दुसरा विवाह केला.वृद्धापकाळात मुल्कराज आनंद पुणे येथे स्थाईक झाले होते. तिथेच वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुल्कराज आनंद यांच्या ‘अनटचेबल’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्र यांचा परिचय पुढील ब्लॉगमध्ये मी करून देईन.

-गीता मांजरेकर

________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा