‘ऐसपैस’ या ब्लॉगमध्ये मी आजवर भारतीय किंवा भारतीय वंशाच्या इंग्रजी कादंबरीकार स्त्रियांच्या कादंबऱ्यांची कथानके आणि कथनाच्या वैशिष्ट्यांबद्दल मराठी वाचकांना परिचय करून देत होते. आता वाचनाचा पैस थोडा आणखी विस्तारून भारतीय किंवा भारतीय वंशाच्या इंग्रजी कादंबरीकार पुरूषांच्या कादंबऱ्यांबद्दल मराठी वाचकांना सांगावे असे मी ठरवले आहे.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.
भारतीय इंग्रजी कादंबरीलेखनाचा इतिहास १९व्या शतकापर्यंत मागे जातो.प्रारंभी भारतीयांनी इंग्रजांचे अनुकरण करत कादंबऱ्या लिहिल्या असल्या तरी नंतर त्यांनी इंग्रजी कादंबरीच्या इतिहासात दखल घेण्याएवढा स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरवले गेल्याने भारतीय इंग्रजी कादंबरीकारांना वैश्विक मान्यता व प्रतिष्ठा मिळाली आहे.अन्य परदेशी भाषांमध्ये या कादंबऱ्यांची भाषांतरेही झाली आहेत.
भारतीयांनी इंग्रजीत कादंबरी लेखनाला प्रारंभ केला तेव्हा देश पारतंत्र्यात होता. इंगजांनी आणलेल्या शाळा, मुद्रण व्यवस्था यामुळे एतद्देशीय तरूणांना इंग्रजी भाषा शिकता आली, इंग्रजी साहित्य त्यांच्या वाचनात येऊ लागले आणि इंग्रजी शिक्षणातून आलेल्या जाणिवेमुळे त्यांना आपल्या समाजातील अस्पृश्यता, जातीवाद,अज्ञान, जुनाट रूढी-परंपरा, अंधश्रद्धा याबद्दल भान आले.आपल्या समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने भारतीय सुशिक्षित तरूणांनी प्रारंभीच्या इंग्रजी कादंबऱ्या लिहिलेल्या दिसतात.आजच्या काळात जगभरातील वास्तव या कादंबरीकारांच्या लेखनात येऊ लागले आहे.या कादंबऱ्या आधुनिक तसेच ‘डायोस्पोरिक’ म्हणजे भारताबरोबरच अन्य परदेशांतील वास्वव मांडणाऱ्या होऊ लागल्या आहेत असे म्हणता येईल.

भारतीय इंग्रजी कादंबरी लेखनाची सुरूवात बंगालमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी केली असे मानले जाते. त्यांची ‘राजमोहन्स वाईफ’ (१८६४) ही भारतीयाने लिहिलेली पहिली इंग्रजी कादंबरी ठरली. दरोडेखोरांना सामील असणाऱ्या आपल्या नवऱ्याला -राजमोहनला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणारी मातंगिनी ही करारी,धीट स्त्री या कादंबरीची नायिका आहे. नवऱ्याची मारहाण सहन करणारी मातंगिनी नवरा आपल्या बहिणीच्या हेमांगिनीच्या नवऱ्याच्या म्हणजे माधवच्या घरातच दरोडा घालणार आहे हे कळल्यावर मातंगिनी धाडसाने माधवपर्यंत पोहोचून त्याला सावध करते आणि अखेरीस पोलिसांकरवी राजमोहन पकडला जाऊन त्याला तुरूंगात टाकले जाते असे हे बरेच रहस्यमय, गतीमान कथानक आहे.आपल्या नवऱ्याच्या अनैतिक कृत्याला शिक्षा झाली पाहिजे असे वाटणारी आणि त्यानुसार कृती करणारी नायिका हे या कादंबरीचे वैशिष्ट्य ठरते.

खरं तर, १८३८ मध्ये सुविद्य ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले बंकिमचंद्र हे मूळात बंगाली भाषेत लिहिणारे पत्रकार, कादंबरीकार, कवी होते. ‘वंदेमातरम’ हे संस्कृतप्रचूर गाजलेलं आणि आता राष्ट्रगीत ठरलेले गीत बंकिमचंद्र यांनीच लिहिले. रविंद्रनाथ टागोर यांनी ते संगितबद्ध केले होते. बंकिमचंद्र यांनी एकूण १३ बंगाली कादंबऱ्या आणि एकच इंग्रजी कादंबरी लिहिली. ‘दुर्गेशनंदिनी’ (१८६५) ही बंगाली भाषेतील पहिली कादंबरी बंकिमचंद्रांनीच लिहिली होती. ‘आनंदमठ’, ‘कपालकुंडलं’, ‘देवी चंद्रमुखी’ ,’बिशववृक्ष’ या बंकिंमचंद्र यांच्या अन्य काही गाजलेल्या बंगाली कादंबऱ्या. काहीशा गंभीर पण तेवढ्याच उपहासात्मक, विनोदी शैलीसाठी बंकिंमचंद्र प्रसिद्ध होते. बंगालमध्ये त्यांना ‘साहित्यसम्राट’ म्हटले जाई. बंगाली भाषेत एवढ्या कादंबऱ्या लिहून वाचकमान्यता मिळालेली असूनही इंग्रजीतून लिहावे असे बंकिंमचंद्रांना वाटले हे विशेष.त्याचे कारण त्यांचे इंग्रजी शिक्षण आणि त्यांनी इंग्रज सरकारची मॅजिस्ट्रेट म्हणून केलेली नोकरी हे असावे. शेक्सपियरच्या ऑथेल्लो नाटकातील डेस्डिमोना आणि कालिदासाची शकुंतला यांची तुलना बंकिमचंद्र यांचा एक शोधनिबंध आजही संशोधकांना महत्त्वाचा वाटतो.
बंकिंमचंद्रांच्या लेखनात आणि कृतीत विरोधाभास दिसतो.ब्रिटीश सत्तेला आणि इंग्रजी भाषेला विरोध करण्याऐवजी बंकिंमचंद्र त्याचा पुरस्कार करणारे होते. ब्रिटीशांनी जर भारत काबिज केला नाही तर तो मुस्लीमांच्या ताब्यात जाईल असे भय त्यांच्या मनात होते.पण तरीही ‘आनंदमठ’ ही त्यांची कादंबरी ब्रिटीशांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी ठरली.पुढे या कादंबरीवर आधारित हिंदी चित्रपटही गाजला.वंदे मातरम हे गीत त्या चित्रपटातून अनेकांपर्यंत पोहोचले.
एका बाजूला इंग्रजी भाषेच्या प्रेमात असणारे बंकिंमचंद्र पुढे रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात आले. रामकृष्ण परमहंस यांना इंग्रजी भाषेचा अजिबात गंधही नव्हता. पण तरीही त्यांच्या विचारांनी बंकिमचंद्र प्रभावित झाले होते.

रेव्हरंड लाल बिहारी डे हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे समकालीन. त्यांनी ब्रिटीशांच्या आधुनिक विचारांनी प्रभावित होऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. लाल बिहारी डे हे ‘अरूणोदय’ या बंगाली वृत्तपत्राचे संपादक होते. तीन इंग्रजी मासिकांचे संपादनही ते करत असत. यांच्या दोन इंग्रजी कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यापैकी एक होती ‘चंद्रमुखी’ ( ‘अ टेल ऑफ बेंगॉली लाईफ’) ही तर दुसरी होती ‘गोविंद सामंथा’(हिस्ट्री ऑफ बंगाली रयत) (१८७४) या नावाची.बंगालमधील जमिनदारी पद्धती आणि जमिनदारांनी शेतमजुरांवर चालवलेले अत्याचार, त्यांचे केले जाणारे शोषण हे वास्तव मांडणाऱ्या या दोन कादंबऱ्या होत्या.गोविंद सामंथा या कादंबरीला त्या काळात एका बंगाली साहित्यप्रेमी माणसाने ५०० रूपयांचे पारितोषिक दिले होते.लाल बिहारी डे यांनी बंगाली लोककथांचे संकलन करून तेही इंग्रजीत प्रसिद्ध केले होते.
१८९४ मध्ये ‘कमला’ ही कृपाबाई सथीआनंदन यांनी लिहिलेली कादंबरी भारतीय स्त्रीने इंग्रजीत लिहिलेली पहिली कादंबरी ठरली.या कादंबरीबद्दल आपण ‘ऐसपैस’च्या प्रारंभीच्या ब्लॉगमध्ये वाचले आहे.तत्कालीन उच्चकुलीन हिंदू विधवा स्त्रीचे दुःखद वास्तव ‘कमला’ या कादंबरीतून कृपाबाईंनी मांडलेले दिसते.
२० व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजीतून कादंबरी लिहिणारे तीन कादंबरीकार विशेष प्रसिद्धी मिळवून गेले. त्यापैकी पहिले होते मुल्कराज आनंद. त्यांच्या ‘अनटचेबल’ (१९३५), ‘कुली’ (१९३६) या महत्त्वाच्या कादंबऱ्या.’अनटचेबल’ मधून तत्कालीन जातीव्यवस्थेमुळे होणारे माणसांचे शोषण दिसते. तर ‘कुली’ या कादंबरीत ब्रिटीशांनी केलेल्या शोषणामुळे भुकेकंगाल झालेला, शारीर कष्ट करणारा हमालवर्ग हा देखील कादंबरीचा विषय बनतो.
आर.के.नारायण (‘मालगुडी डे’ यांचेच) यांची ‘गाईड’ ही इंग्रजी कादंबरी १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेली लक्षणीय इंग्रजी कादंबरी ठरली. पुढे त्यावर हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला.
राजा राव हेही २० व्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिणारे महत्त्वाचे इंग्रजी कादंबरीकार ठरले. गांधीवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या राव यांची ‘कांतापुरा’ ही कादंबरी विशेष गाजली. पण त्यानंतरच्या त्यांच्या ‘सर्पँट ऍंड दी रोप’, ‘दी कॅट ऍंड शेक्सपियर’ या कादंबऱ्याही प्रभावी होत्या.
२० व्या शतकातील मुल्कराज आनंद, आर.के.नारायण आणि राजा राव या एकेका इंग्रजी कादंबरीकारांबद्दल आपण स्वतंत्रपणे, सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांच्या निवडक कादंबऱ्यांच्या कथानकांचा आणि कथनशैलीचा सखोल परिचय मराठी वाचकांना करून देण्याचा माझा मानस आहे.
पुढील ब्लॉगमध्ये मुल्कराज आनंद यांचा आणि त्यांच्या कादंबरीलेखन प्रवासाचा सविस्तर परिचय आपण करून घेऊ.
-गीता मांजरेकर
___________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा