मागील ब्लॉगमध्ये आपण ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या गीतांजली श्री लिखित मूळ हिंदी कादंबरीचे (‘रेतसमाधी’) कथानक डेझी रॉकवेल यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाच्या सहाय्याने समजून घेतले.या इंग्रजी अनुवादाला बुकर पारितोषिक मिळाले आहे.

‘टुम्ब ऑफ सॅंड’ ही कादंबरी विस्तृत आहे आणि तीन भागांत विभागलेली आहे हे आपण मागील ब्लॉगमध्ये लक्षात घेतले होते. आज आपण या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसे करताना कादंबरीतील कोणती कथासूत्रे होती गवसतात तेही पहाणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे कथन प्रामुख्याने तृतीयपुरूषी आहे. पण काहीवेळा ते प्रथमपुरूषी होते.तृतीयपुरूषी कथकाला सर्वज्ञ कथक म्हणतात तसा तो याही कादंबरीत झालेला दिसतो. व्यक्तिरेखांच्या मनातील गोष्टीही हा कथक सांगत जातो. जुन्या कादंबऱ्यात जसे कथक सूज्ञ वाचकांना विश्वासात घेत असे तसाच तो याही कादंबरीत घेतो. आधुनिक इंग्रजी कादंबरीत कथक आपल्या कथनप्रक्रियेबद्दलही अधूनमधून भाष्य करतो तसा तो याही कादंबरीत करताना दिसतो.उदा.पहिल्या विभागातील पहिल्याच प्रकरणात कथक म्हणतो की-
“कहाणी स्वतःच कथन करत असते. ती पूर्ण असेल किंवा अपूर्ण.या विशिष्ट कथेला एक सीमारेषा आहे. आणि दोन स्त्रिया ही सीमारेषा हवी तेव्हा ओलांडून अलीकडे-पलीकडे जात रहातात.बायका जणू स्वतःच कहाण्या असतात.खळबळीने आणि कुजबुजीने भरलेल्या- ज्या वाऱ्यावर तरंगत रहातात आणि गवताच्या प्रत्येक पात्याबरोबर झुलत,झुकत रहातात.मावळतीचा सूर्य या कहाण्यांचे कण गोळा करतो आणि जणू त्यांचे आकाशातून लटकलेले झगमगते आकाशकंदील बनवतो…..”
खरं तर, या पहिल्याच प्रकरणात कथकाने कादंबरीतील महत्त्वाच्या घटना सांगून टाकल्या आहेत.पण तरीही दुसऱ्या प्रकरणात तो म्हणतो की हे सगळे घडण्यापूर्वी एक मृत्यू झाला होता आणि तो होता मांच्या पतीचा. आणि कादंबरीचे कथानक इथून सुरू होते.

कथनाचा वेग सर्वसामान्यपणे संथच म्हणावा लागेल. पण काहीवेळा कथन गतीमान होते.एखादी परिस्थिती किंवा व्यक्तीची अवस्था वाचकांच्या मनावर व्यवस्थित ठसावी म्हणून असावे कथक ती खूपवेळा परतपरत सांगत रहातो. उदा. या कादंबरीच्या पहिल्या विभागात मां ही साधारण ऐंशी वर्षांची व्यक्तिरेखा तिच्या पतीच्या निधनानंतर इतकी उदासीन झाली आहे की ती काहीच करायला तयार नाही. घरच्यांनी तिला आग्रह केला तरी ती प्रत्येक गोष्टीला नकार देत रहाते.ही मांची अवस्था आणि त्यामुळे तिच्या घरात प्रत्येकाने तिच्याबद्दल सतत काळजी व्यक्त करत रहाणे हे वातावरण कथक इतके तपशीलवारपणे आणि सातत्याने सांगत रहातो की वाचकांच्या मनात ते जणू कोरले जाते.कदाचित त्यामुळेच कादंबरीच्या दुसऱ्या विभागात जेव्हा मां बेटीच्या घरी रहायला जाते आणि हळूहळू कृतीशील होऊ लागते तेव्हा तो विरोधाभासही वाचकांना चांगलाच प्रभावित करतो.या मांच्या पुढील अवस्थेची चाहुल खरं तर, कथकाने वाचकांना आधीच्या कथनातून दिलेली असते पण ती इतकी अस्पष्ट असते की ती वाचकाला लगेच लक्षात येत नाही. उदा.कादंबरीच्या पहिल्या भागातील आठव्या प्रकरणात तरूणपणीच्या मांनी आपल्या मुलीला स्वातंत्र्य घ्यायला कसे प्रोत्साहीत केले होते त्याबद्दल कथक सांगतोय तेव्हा रात्री उशीरा येणाऱ्या मुलीला खिडकीतून आत घेणारी मां, मुलीच्या मैत्रीणीला लग्नासाठी हवी असणारी साडी रात्री हळूच खिडकीतून बाहेर पडून बागेतील झुडपांच्या आडून मुलीला नेऊन देणारी मां, झुडपांत लपून रात्री उशीरा मां आणि बेटीने केलेले हितगुज या भूतकाळाबद्दल कथक सांगतो तेव्हा मां ही व्यक्तिरेखा मूळात स्वातंत्र्याचा आदर करणारी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धोका पत्करणारी आहे हे वाचकांना सांगण्याचा हेतू कथक साध्य करत असतो.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ हे कादंबरीचे शीर्षक म्हणजे एक रूपक आहे. हे रूपक कथक कथनात वापरतो. वाळवंटाबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला वाळूच्या टेकड्यांबद्दल नक्कीच माहीत असेल. या वाळूच्या टेकड्या स्थिर नसतात. त्या वाऱ्याची दिशा जशी असेल तशा सरकत असतात. कथक सतत भिंतीकडे पाठ करून झोपणाऱ्या मांबद्दल सांगताना त्या भिंतीबद्दलही सांगत रहातो. भिंत जुनी आहे. तिला बारीक तडे गेलेले आहेत.त्यातून भिंतीतील माती, वाळू दिसते. कथक अशी कल्पना मांडत रहातो की मां जणू एक छोटासा भिंत पोखरणारा किटक आहेत. हा किटक शांतपणे ,चिकाटीने भिंत पोखरून बाहेर पडणार आहे. भिंतीत असलेली वाळू त्याच्यासाठी जणू मोठी टेकडीच असेल पण किटकाने ती टेकडी सरकवली आहे.कथक म्हणतो “इच्छेची एक क्षीण ज्वाळा मांच्या मिटलेल्या डोळ्यांतून बाहेर पडते आहे आणि वाळूची टेकडी(जणू समाधी) सरकली आहे.” (पृ.५७)पुढे कादंबरीच्या तिसऱ्या विभागात मां खरोखरच वाळवंटात बसून बेटीला तिच्या भूतकाळात घडलेल्या घटना विशेषतः फाळणीमुळे तिच्या आयुष्याने अचानक घेतलेली वेगळीच दिशा याबद्दल सांगत रहाते. तेव्हा ती आणि रोझी कशा थरच्या वाळवंटात वाळूचा मारा सहन करत जिद्दीने चालत राहिल्या होत्या, वाळूच्या ढगात अडकून शुद्ध हरपून पडल्या होत्या याची थरारक आठवण सामोरी येते. आणि त्या संकटातून त्या दोघी योगायोगाने वाचल्या म्हणूनच तर त्यांची जीवनकहाणी वेगळ्याच दिशेना का होईना पुढे सरकली होती. आणि अखेरीस मांनी रोझीच्या दुर्दैवी निधनानंतर जाणीवपूर्वक आपली जीवनकहाणी परत एकदा सीमा पार करून भूतकाळात नेली आहे. त्यांना हवी तशीच त्यांच्या जीवनकहाणीची अखेर त्यांनी जिद्दीने, धैर्याने,सन्मानाने करून घेतली आहे.वाळूची टेकडी वाऱ्याच्या दिशेने आपोआप सरकते. पण यावेळी मांनी ती त्यांना हवी त्या दिशेने सरकवली आहे असे कथक सुचवतो.
दरवाजा हे एक रूपक ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीत कथकाने वापरले आहे. मांच्या पतीच्या घराचा दरवाजा कायम लोकांसाठी उघडा असे. त्यांच्या मुलाच्या घराचा दरवाजाही तसाच येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांसाठी नेहमी उघडा असतो.सरकारी बंगला सोडून निवृत्तीनंतर बडे आणि कुटुंबीय दिल्लीतील फ्लॅटमध्ये रहायला गेल्यावरही बडेने आपल्या घराचा दरवाजा बंद करायचा नाही ही रूढी पाळली आहे. कोणी चोराच्या भयाने तो बंद केला तरी बडे तो स्वतः जाऊन उघडतो.बडेच्या घरी त्याच्या गावातून दूरचे नातेवाईक मदतीच्या अपेक्षेने येतात, सहकुटुंब मुक्काम करतात, त्याच्या बायकोच्या माहेरचे लोक येतजात रहातात, नोकर-चाकर, शेजारीपाजारी येत रहातात.घर सर्वांसाठी खुले आहे.याच दरवाजातून बडेची धाकटी बहीण घरातील अन्य कुटुंबीयांशी न पटल्याने घर सोडून निघून गेली, तिने आपले स्वतःचे कर्तृत्व दाखवत, स्वतःची ओळख निर्माण केली. मग ती स्वतःहून याच दरवाजातून परत घरी येऊ लागली, आईला भेटू लागली आहे.हलणाऱ्या भिंती, उघडा दरवाजा ही रूपके हे कुटुंब बदलांना सामोरे जाणारे, स्वीकारणारे आहे हे सुचवण्यासाठी कथकाने वापरले असावे असे वाटते.
अशाचप्रकारे फुलपाखरांचे एक रूपक कथक वापरतो. मांना त्यांच्या ऑस्ट्रेलियातील नातवाने एक काठी भेट दिली आहे. या सोनेरी काठीवर फुलपाखरांचे चित्र आहे.मांचा मोठा नातू सिद्धार्थ याच्या मित्राला या काठीतून इंद्रधनुष्य बाहेर पडत आहे असा भास होतो. सिद्धार्थ आजीची काठी घेऊन तिच्याशी खेळत असताना काठीवरील चित्रातील फुलपाखरे जणू खरी होऊन उडू लागली असेही त्याच्या मित्राला वाटते.(पृ.९४-९५)मी या कथेतील पात्र नाही पण मी परत येईन असे सांगत हा सिद्धार्थचा मित्र परत एकदा कथानकात डोकावतो. त्याहीवेळी तो सिद्धार्थबरोबरच असतो मात्र तेव्हा मां बेटीच्या घरी रहायला गेलेली असते. तिच्यात परिवर्तन होऊ लागलेले असते आणि सिद्धार्थचा मित्र तेव्हा मांच्या काठीतून पुन्हा एकदा इंद्रधनुष्य उमलताना पहातो. काठीवरील फुलपाखरांच्या पंखांची फडफड त्याला ऐकू येते.
इंद्रधनुष्य आणि उडणारी फुलपाखरे ही स्वच्छंदतेचे, सौंदर्याचे, प्रतिभेचे प्रतीक म्हणून कथकाने वापरली असावीत.मां जसजशा मोकळ्या होत जातात, तसंतशी कथनात ही फुलपाखरं पुन्हापुन्हा भेटत रहातात. मां बेटीला घेऊन सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात जातात तेव्हा थरच्या वाळवंटात बसून त्या बेटीला आपल्या भूतकाळाची कहाणी सांगतात जणू कहाण्यांची फुलापाखरं त्यांच्या काठीतून बाहेर पडून उडत रहातात.मां आणि बेटी खैबरला गेल्या असताना पोलिस त्यांना पकडून कोठडीत ठेवतात तेव्हाही मांच्या काठीतून बाहेर पडणारी फुलपाखरं उडत रहातात. याचा अर्थ पोलिस कोठडीदेखील मांना बंदिस्त करू शकत नाही. आपले स्वातंत्र्य मां गमावू देत नाहीत असे कथकाला सुचवायचे असावे.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ च्या कथनात अधूमधून पक्ष्यांचा उल्लेख येतो. उदा. पहिल्या विभागात प्रकरण २५ मध्ये एक वक्ता भाषण करत असताना रूढी म्हणजे काय हे सांगत असतो. त्यावेळी एका सूर्यालाही प्रिय असणाऱ्या चिमणीबद्दल तो सांगतो. पण त्या प्रदेशात माणसे आल्यावर त्यांनी बटाटे भाजायला पेटवलेल्या आगीच्या वर जणू नर्तन करणारी चिमणी शेवटी शिकाऱ्याकडून मारली जाते आणि मग सगळ्या चिमण्या माणसांना घाबरू लागतात. हळूहळू समाज चिमणी घाबरटच असते असे मानू लागतो. ही कथा सांगून कथक रूढी म्हणजे केवळ सवयी असतात आणि त्या स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या असतात हे उघड करतो.स्त्रिया चिमणीसारख्या घाबरट असतात हा समज असाच समाजाने आपल्या फायद्यासाठी निर्माण केला आहे असे कथकाला सुचवायचे आहे. पण योग्य संधी मिळताच कथानकातील मां किती धीट होते हे दाखवून स्त्रियांबद्दलचा समज कसा कृतक आहे हे स्पष्ट करतो.
कादंबरीच्या दुसऱ्या भागात मां बेटीच्या घरी रहायला येतात तेव्हा तिच्या घराच्या गॅलरीत येणाऱ्या पक्ष्यांना दाणे घालून आपलंस करतात.पुढे मां आणि बेटी पाकिस्तानातील तुरूंगात असताना पुन्हा एकदा अतिशय सहजपणे मां कावळ्या चिमण्यांशी दोस्ती करतात.पुढे हाच कावळा मांच्या निधनाची खबर बेटेला द्यायला सीमा ओलांडून भारतात येतो आणि बडेच्या घराजवळच्या झाडावर घरटे करून राहू लागतो असाही उल्लेख आहे.बडेने स्वतःही त्याच्या आईप्रमाणे कावळ्यांना आपलंस केले आहे.आपल्या बहिणीच्या घरी आईने रहायला जाणे बडेला आवडलेले नसते. बहिणीकडे जाऊन आईला भेटायची त्याची तयारी नसते. तेव्हा तो बहिणीच्या घराजवळच्या झाडावर चढून तिच्या घरात डोकावून आईला पहायचा प्रयत्न करतो आणि झाडावरील कावळे जणू त्याला सहकार्यच करतात असा एक विनोदी वाटावा असा प्रसंगही कथक रंगवतो. आपल्या धार्मिक रूढींमध्ये कावळ्यांना पिंडदान करणे वगैरे गोष्टी आहेत. पण इथे कथकाला कोणत्याही धार्मिक रूढींकडे वाचकांचे लक्ष वेधायचे नसावे. त्याला म्हणायचे आहे की तुमची इच्छा तीव्र असली की जणू निसर्ग ही इच्छा पूर्ण करायला तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही निसर्गाशी प्रेमाने वागत असाल तर निसर्गही तुमची मनोकामना जणू समजून तुम्हाला मदत करतो अशी धारणा या कथनातून सामोरी येते.

‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीच्या पहिल्या विभागात मांचा मुलगा बडे निवृत्तीच्या दिवशी सर्वांना जंगी पार्टी देतो.या पार्टीच्या निमित्ताने परदेशी देशी असे बरेच पाहुणे बंगल्याच्या आवारात जमा होतात.या सगळ्या पाहुण्यांच्या बोलण्यातून जे वेगवेगळी मते व्यक्त होत रहातात त्यातून ‘बहुआवाजी कथना’ (Polyphony) चा प्रयोग कादंबरीकाराने केला आहे.
कादंबरीच्या तिसऱ्या भागात ३०व्या प्रकरणात कथक भविष्याचे सूचन करतो. कोणी एक पत्रकार दिल्लीतील त्रिमुर्ती भवनात बसून सनसनाटी बातमीसाठी जुनी वर्तमानपत्रे चाळत असताना त्याला एक म्हातारी बाई आपल्या तरूणपणीच्या प्रियकराला भेटण्यासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती अशी बातमी मिळते. चंदा हे त्या वृद्ध बाईचे नाव असते. तिच्याबरोबर तिची मोठी मुलगीही सीमा ओलांडून गेली होती आणि मग दोघीही बेपत्ता झाल्या होत्या असाही मजकूर त्याला पुढे मिळतो.वृद्ध स्त्रीच्या मुलाची मुलाखत, त्याने सरकार दरबारी आपली आई व बहीण यांना पाकिस्तानातून परत आणण्यासाठी केलेली खटपट याचा तपशीलही या पत्रकाराला मिळतो.ऐतिहासिक गोष्टींना मालमसाला लावून उदात्त करण्याच्या या काळात ही बातमी एखाद्या चित्रपटकथेसारखी रंगवता येईल असे पत्रकाराला वाटते. पण त्याची मैत्रीण माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे , मला हा बारीक टाईपातील मजकूर वाचता येत नाही आणि तूही त्यात गुंतून पडू नकोस असे सांगून पत्रकाराला बातमीचा पुढे शोध घेण्यापासून परावृत्त करते. हे पत्रकार जोडपे म्हणजे बेटी आणि तिचा प्रियकर केके हे दोघे असतील का ?याबद्दल कथक काही सांगत नाही पण पुढे या सत्यघटनेचा मिडिया कसा उपयोग करेल याची सूचना कथक देऊन जातो.
एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या मित्राला उचकी लागते आणि थांबत नाही तेव्हा तो पोलिस म्हणून काम करत असताना त्याला भेटलेल्या अजब स्वभावाच्या मांबद्दल सांगतो. मां दहशतवाद्याच्या गोळीला बळी पडून अनेक वर्ष झाली तरी हा पोलिस मांना विसरू शकलेला नाही. मांच्या उचकीच्या निमित्ताने त्यांनी उदात्तपणे मृत्युला सामोरे जाण्याचा प्रसंगही क्रिक्रेटपटूच्या प्रथमपुरूषी निवेदनातून कथनात येतो. हाही भविष्यातील प्रसंगच म्हणावा लागेल.

अशाप्रकारे टुम्ब ऑफ सॅंड या कादंबरीच्या कथनात प्रयोगशीलता आहे. जुन्या-नव्या कथनशैलींची सरमिसळ आहे.या कथनाच्या विश्लेषणातून कादंबरीतील पुढील कथासूत्रे स्पष्ट होतात.
- ‘टुम्ब ऑफ सॅंड’ ही कादंबरी व्यक्तीने मनात आणले,स्वातंत्र्य घेतले आणि धोका पत्करला तर ती जिद्दीने आपल्या जीवनाची दिशा आपल्याला हवी तशी वळवू शकते हे दाखवते.मांच्या कथेतून हेच कथासूत्र उलगडत जाते.मांनी तरूण वयात आपल्यापेक्षा वेगळ्या धर्मातील तरूणावर प्रेम करून त्याच्याशी विवाहबद्ध होणे असेल, फाळणीने त्यांची फारकत झाली असली तरी नवं आयुष्य सुरू करून त्यातील जबाबदाऱ्या, कर्तव्य पूर्ण करणे असेल किंवा पतीनिधनानंतर भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानातील आपला पहिला पती अन्वर याला भेटायला जाण्याची इच्छा मनात जपून ती जिद्दीने पूर्ण करून मगच सन्मानाने मृत्युला सामोरे जाणे असो, या सर्व गोष्टींतून मांनी आपल्या आयुष्याच्या ‘वाळूच्या टेकडी’ची दिशा वाऱ्यावर सोडून दिलेली नाही तर ती आपल्या इच्छेप्रमाणे हलवली आहे.मां काही उच्च शिक्षित नाही पण तिच्या जाणिवा प्रगल्भ आहेत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर तिने तिला पाहिजे ते धैर्याने, जिद्दीने मिळवले आहे.
- ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा मांची मुलगी बेटी ही आहे. ती वस्तुतः एक स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्ती आहे, लेखिका, पत्रकार आहे. ती आपले स्त्रीस्वातंत्र्याचे विचार मांडण्यासाठी देशांतच नव्हे तर परदेशांतही जाऊन आलेली आहे. खरं तर तिला हे स्वातंत्र्याचे बाळकडू तिच्या आईनेच पाजले आहे. लहानपणी घरातील पुरूषांनी बेटीला स्वातंत्र्य देऊ नये असे सांगितलेले असतानाही मांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला स्वातंत्र्य घ्यायला प्रोत्साहीत केले आहे. अखेर बेटी वडिलांचे, भावाचे घर सोडून बाहेरच पडली आहे.तिने वेगवेगळ्या पुरूषांबरोबर प्रेमसंबंध ठेवले आहेत.स्वतःचे घर वसवले आहे. कथानकात बेटी आपल्या मांला आपला भाऊ वहिनी नीट सांभाळत नाहीत असे वाटून स्वतःच्या घरी रहायला घेऊन जाते, मां तिच्याकडे रहायला आल्यावर ती तिला हवे तसे वागू देते. पण मनोमन मांच्या अशा स्वतंत्र वागण्यामुळे आपल्या घरात नको एवढी माणसं येऊ लागली आहेत, ही माणसं आपल्याला लेखनासाठी हवी असलेली शांतता, स्वस्थता मिळू देत नाहीत असे बेटीला वाटते.मांनी पाकिस्तानात जाण्याचा हट्ट केल्याने आणि बेटीने आपल्याबरोबर यावे अशी आज्ञाच केल्याने बेटी मांबरोबर जाते खरी पण म्हाताऱ्या मांनी त्यांच्या पहिल्या पतीला अन्वरला भेटण्यासाठी केलेले धाडस बेटीला अनाकलनीय वाटते. संपूर्ण प्रवासात ती भयभीत आहे. पोलिसांच्या कोठडीत तर ती भयग्रस्त होऊन मांशी भांडताना दिसते. मां भ्रमिष्ट झाली आहे, तिचा तिच्या काळात एका परधर्मीयाबरोबर विवाह झालेला असणे केवळ अशक्य आहे आणि ती काहीतरी मनगढंत गोष्टी सांगते आहे असे बेटीला वाटते. १८७०च्या स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार मी आणि अन्वरने विवाह केला होता हे मां बेटीला सांगता तेव्हा ती त्यांच्याकडे पुरावा मागते. फाळणीमुळे नेसत्या वस्त्रातच देश सोडून नाइलाजाने सीमा पार कराव्या लागलेल्या मांना आपल्या लग्नाचा पुरावा कसा नेता आला असेल याची जाणीवही बेटीला नाही. त्यामुळे मांच्या भावनेची तिला कदरही नाही.बेटीच्या स्वातंत्र्याची कल्पना आत्मकेंद्रीततेकडे झुकलेली आहे. याउलट मांची स्वातंत्र्याची कल्पना केवळ स्वतःपुरते जगणे म्हणजे स्वातंत्र्य असे म्हणणारी नसून ती सामाजिक कर्तव्य पूर्ण करणारी, रोझीसारख्या तृतीय पंथीयाला आपली स्नेही मानून तिलाही मदत करण्याची, निसर्गावर, प्राण्या-पक्ष्यांवर प्रेम करण्याची आहे हे कथनातून उलगडते. तुरूंगातील पहारेकऱ्यांशीही तिने मैत्रीचे नाते जोडले आहे.तुरूंगातही झाडे लावली आहेत, पक्ष्यांशी ती हितगुज करते. त्यामुळे स्त्रीस्वातंत्र्य ही १९७० च्या दशकातील विचारप्रणाली असली तरी तत्पूर्वीच्या काही स्त्रियांनी घेतलेले स्वातंत्र्य किती व्यापक होते हे कथासूत्र ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीतून ठळक होत जाते.
- ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीत मांचा मुलगा बडे हा सरकारी अधिकारी आहे. त्याचा लोकसंग्रह मोठा आहे.त्याच्या घराचा दरवाजा कायम उघडा असतो. गावाताल लोक त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने येतात. तो स्वतः नोकर-चाकरांच्या मुलांनाही नोकरीला लावतो असे तपशील कथनातून येतात. तो आपल्या निवृत्तीनिमित्ताने मेजवानी आयोजित करतो तेव्हा अनेक देशी-परदेशी लोक येतात.पण हे सगळे तो स्वतःच्या मोठेपणासाठी करतो आहे असे कथनातून स्पष्ट होते. मूलतः त्याला , त्याच्या पत्नीला स्वातंत्र्य हे मूल्य कळले आहे असे वाटत नाही. त्याची पत्नी रीबॉकचे बुट घालून चालायला जाण्यात स्वातंत्र्याची परीसीमा मानते.घरातल्या कर्तव्यांकडे ती फारसे लक्ष देत नाही. दिखावा मात्र करते.तिला आपल्या नणंदेचे वागणे, रहाणे स्वैर वाटते.तिचा परदेशात भरपूर पगाराची नोकरी करणारा मुलगा तिच्यासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे.त्याला सतत फोन करून ती भारतातूनही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते.संधी मिळताच ती परदेशात मुलाकडे रहायला जाणार आहे. एकंदर मांचा मुलगा बडे आणि त्यांची बहू ही तथाकथित प्रतिष्ठेच्या मागे पळणारी मध्यमवर्गीय माणसे आहेत. त्यांना स्वातंत्र्याची कल्पना नीटशी कळलेलीच नाही आणि बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक असेच असतात असे कथकाला सुचवायचे आहे.मध्यमवर्गीयांचे ढोंगी जगणे दाखवणे हेही ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे एक कथासूत्र आहे असे म्हणता येईल.
- रोझी बुआ या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने तृतीय पंथीयांचा प्रश्न कादंबरीत येतो. समाजाचे या तृतीयपंथीयांशी आकसाने वागणे, त्यांची खिल्ली उडवण्याचा, त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांची हिंसा करणे, पोलिस व्यवस्थेनेही तृतीय पंथीयाच्या गूढ मृत्युबद्दल दाखवलेली अनास्था, वर्तमानपत्रानेही तृतीय पंथियाबद्दल बातमी देताना निर्माण केलेली अडचण असे बरेच आनुषंगीक प्रश्न कथनातून पुढे येतात.तृतीयपंथीयांना मिळणारी संवेदनशून्य वागणूक दाखवणे हेही ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे एक कथासूत्र ठरेल.
- मांनी सीमेपलीकडे जाऊन आपल्या पहिल्या पतीला भेण्याचे धाडस करणे या घटनेच्या निमित्ताने समान संस्कृती,समान भौगोलिक वैशिष्ट्ये असलेल्या देशाची फाळणी, त्यामुळे दोन धर्मांत निर्माण झालेले वैमनस्य आणि माणुसकीशून्य दहशतवादाची झालेली वाढ या सगळ्या प्रश्नांना भिडणे हेही ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे एक महत्त्वाचे कथासूत्र आहे.युद्ध, हिंसा हा सीमासंघर्ष मिटवण्याचा उपाय नाही असे ही कादंबरी सुचवते.दोन देशांतील , दोन धर्मांतील तेढ उदात्त मानवतावादी भूमिकेतूनच दूर होऊ शकेल असे ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीच्या लेखिकेला सांगायचे आहे.यासंदर्भात मांनी आपले लाहोरमधील घर सोडल्यानंतर एका शाळेतून चोरलेली बुद्धमुर्ती,रोझी आणि मांनी ती मूर्ती जपण्यासाठी केलेले प्रयत्न आणि तीच मूर्ती घेऊन मांनी आपल्या पहिल्या पतीला अन्वरला भेटायला पाकिस्तानात येण्याचे दाखवलेले धाडस. अखेरीस पक्षाघाताने बिछान्याला खिळलेल्या अन्वरला भेटायला धोका पत्करून मांनी अन्वरच्या घरी जाणे ,दोघांनी परस्परांना क्षमा करणे आणि या प्रसंगाला साक्ष असणारी अन्वरकडील बुद्ध मूर्ती हे संदर्भ कथनात मानवतावाद हाच जगातील शांततेचा, सौहार्दाचा मार्ग ठरू शकतो हे सुचवणारे आहेत.
अशाप्रकारे टुम्ब ऑफ सॅंड ही एक प्रदीर्घ ,कधी संथ गतीने तर कधी वेगाने पुढे सरकणारी कादंबरी मानवतेचा उदात्त संदेश देणारी आहे. तुम्ही ती मूळातून वाचावीत अशी विनंती.
‘ऐसपैस’ हा ब्लॉग लिहिताना भारतीय किंवा भारतीय वंशाच्या स्त्रियांनी लिहिलेल्या निवडक चांगल्या इंग्रजी भाषेतील कादंबऱ्यांचा मराठी वाचकांना परिचय करून देणे हा माझा उद्देश होता. १९व्या शकातील तोरू दत्ता यांच्या कादंबरीपासून आपण सुरूवात केली होती आणि समकालीन कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांपर्यंत येऊन पोहचलो आहोत. आता इंग्रजीत लिहिणाऱ्या महत्त्वाच्या अशा सर्व कादंबरीकार स्त्रियांच्या निवडक कादंबऱ्यांचा मी परिचय करून दिला आहे असे मला वाटते.त्यामुळे यानंतर मला इंग्रजी भाषेतून लिहिणाऱ्या भारतीय किंवा भारतीय वंशातील पुरूष कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांबद्दल कुतूहल वाटू लागले आहे. लवकरच मी या कादंबऱ्यांचा परिचय करून देण्यास सुरूवात करणार आहे. माझ्या या वाचन, लेखन प्रवासात नेहमीप्रमाणे तुम्हा वाचक सुहृदांची साथ मिळेल अशी आशा आहे. भेटूया लवकरच .
–गीता मांजरेकर
_________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा