सुमारे दीड महिन्यापूर्वी आपण गीतांजली श्री आणि त्यांच्या ‘रेत समाधी’ या मूळ हिंदी कादंबरीचे ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या नावाने इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या डेझी रॉकवेल यांचा परिचय करून घेतला होता. आज आपण ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या बुकर पारितोषिक प्राप्त भाषांतरीत कादंबरीच्या कथानकाचा आढावा घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ या प्रदीर्घ (७३१पृष्ठे) कादंबरीचे कथानक तीन भागांत विभागलेले आहे.पहिल्य़ा भागाचे नाव ‘मां इज बॅक’ असे आहे आणि तो २३४ पृष्ठाचा आहे.दुसरा भाग ‘सनलाईट’ असा असून तो २९७ पृष्ठांचा आहे.तर तिसरा विभाग ‘बॅक टू दी फ्रंट’ या नावाचा असून तो १९२ पृष्ठांचा आहे.तर सहा पानांचा उपोद्घात कादंबरीच्या अखेरीस जोडलेला आहे.

‘टुम्ब ऑफ सँड’ या कादंबरीचे कथानक पहिल्या दोन भागांत प्रामुख्याने सरळ रेषीय आहे आणि ते १९८० च्या दशकातील दिल्लीच्या परिसरात घडणारे आहे.पण कथानकाचा तिसरा भाग पाकिस्तानमधील लाहोर आणि खैबर भागात घडणारा आहे आणि तो काळाच्या अक्षावर मागे-पुढे होत रहातो. कधी त्यातील घटना भारत-पाकिस्तान स्वतंत्र झाले त्यानंतर घडलेल्या फाळणीच्या काळातील आहेत तर कधी १९८० च्या दशकातील आहेत.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीच्या कथानकात मोजक्याच व्यक्तिरेखा आहेत. त्यातही मां ही व्यक्तिरेखा कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. किंवा असंही म्हणता येईल की मांची कहाणी सांगणे हाच कादंबरीचा मुख्य उद्देश आहे. मांची दोन मुले बडे आणि बेटी यांच्या व्यक्तिरेखा मांच्या कहाणीच्या अनुषंगाने येत रहातात.बडेची बायको बहु आणि त्याची दोन मुले क्वचित कादंबरीच्या कथानकात डोकावतात. बेटीचा प्रियकर के.के. क्वचित कादंबरीत येतो. पण प्रामुख्याने मां आणि तिच्या अगदी जीवाभावाची रोझी बुआ(तृतीयपंथी व्यक्ती) यांना कथानकात सर्वाधिक महत्त्व आहे.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे कथन वेगवेगळ्या कथकांकडून झालेले आहे. ते प्रामुख्याने तृतीय पुरूषी आहे तर कधी बडेच्या मित्राचा सिद्धार्थचा कोणी मित्र कथन करतो तेव्हा मध्येच ते प्रथम पुरूषी होते. कधी कावळा,चकोर असे पक्षी कथन करतात.कधी मां कहाण्या सांगते तेव्हाही ते तृतीय पुरूषी असते.कधी एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू (जो एकेकाळी सैनिक असतो) तो कथन करतो तेव्हा कथन प्रथम पुरूषी होते. दृष्टीक्षेत्र नियंत्रक वेळोवेळी बदलत जातात. कधी बडे, कधी बहू, कधी बेटी, कधी मां, तर कधी पक्षी दृष्टीक्षेत्र नियंत्रक होतात.कादंबरीच्या कथनात गीतांजली श्री यांनी जे प्रयोग केले आहेत आणि जादुई वास्तववादाचा वापर केला आहे त्याचे विश्लेषण अधिक तपशीलवारपणे आपण पुढील ब्लॉगमध्ये करू.आजच्या ब्लॉगमध्ये ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे कथानक समजून घेऊया.
‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचे कथानक पहिल्या भागात अतिशय संथ गतीने पुढे सरकते. अगदी पहिल्याच प्रकरणात लेखिका ही कादंबरी दोन स्त्रियांची आहे, एक मोठी , एक छोटी आणि यातील मोठीच्या मृत्यूची ही कहाणी आहे हे स्पष्ट सांगून टाकते. दुसऱ्या प्रकरणात मात्र ती खरोखरच कादंबरीच्या कथानकाची सुरूवात करते. मोठी स्त्री मां हिच्या पतीचा नुकताच मृत्यू झाला आहे. वृद्धत्व हेच मृत्यूचे कारण आहे. पण मां ने हा मृत्यू खूपच मनाला लावून घेतला असावा असे तिचे वागणे सांगते. पतीच्या मृत्युनंतर ऐंशीकडे झुकलेल्या मांने जणू लौकीक आयुष्याकडे पाठच फिरवली आहे. आपल्या खाटेवर ती भिंतीकडे तोंड करून निजून रहाते. कोणीही कितीही विनवण्या केल्या तरी ती उठून बसत नाही, बाहेरच्या खोलीत जात नाही की काही बोलत नाही. घरातील सगळेच तिच्या या वागण्याने चिंतेत आहेत. विशेषतः मां चा मोठा मुलगा बडे सर्वात जास्त काळजीत आहे. तो एक प्रशासकीय अधिकारी आहे आणि त्याच्या सतत बदल्या होत राहिल्याने त्याची घरे वेळोवेळी बदलली आहेत.मां आणि वडील वृद्धापकाळामुळे मुलाबरोबरच आहेत. पण आता वडील निधन पावल्याने मां एकटीच राहिली आहे आणि ती आजवर पतीसेवेत मग्न असणारी स्त्री पतीनिधनानंतर जीवनाकडे पाठ फिरवून बसली असल्याने मुलगा चिंतेत आहे. बडेचा मोठा मुलगा सिद्धार्थ हा मां चा आवडता नातू. तो आपल्या आजीला हसवण्याचा प्रयत्न करतो पण आजी सगळ्याला नकारच देत रहाते. तिला उन्हात जाऊन बसावेसे वाटत नाही, फुललेली फुलं बघावीशी वाटत नाहीत की कोणाशी काही बोलावेसे वाटत नाही. ती जणू एक शरीराचं गाठोडं झाली आहे. आणि हे गाठोडं कमी खाण्यापिण्याने आणखीनच लहान होत चाललं आहे.
मां ची मुलगी बेटी तरूण वयात घर सोडून निघून गेली आहे. तिला हवे ते स्वातंत्र्य न मिळाल्याने जणू तिने बंडखोरी केली आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर ती एक लेखिका, पत्रकार झाली आहे आणि प्रतिष्ठीत ठरली आहे. ती क्वचित आईला भेटायला भावाकडे येते. पण तिचे येणे भावाला आणि वहिनीला फारसे पसंत नाही.तिचे वागणे त्यांना स्वैर वाटते.बडेची बायको बहु ही योगशिक्षिका आहे. ‘रिबॉक’चे बुट घालून चालायला जाणे ही तिच्यासाठी स्वातंत्र्याची खूण आहे.मां बिछान्यातून उठायला तयारच नसल्याने तिला आता स्वयंपाकघरात थोडे अधिक लक्ष घालावे लागते आहे. पण घरात नोकरचाकर भरपूर असल्याने बहूला बरीच मोकळीक आहे. आपला धाकटा मुलगा जो नुकताच ऑस्ट्रेलियाला नोकरीनिमित्त गेला आहे, त्याच्याशी फोनवर बोलत रहाणे आणि दिवसभर घरात काय झाले ते त्याला सांगत रहाणे हा तिचा आवडता उद्योग आहे.
मां चा मोठा मुलगा बडे आता निवृत्तीला आला आहे. त्याचा मोठा मुलगा सिद्धार्थ टेनीस खेळणे, गिटार वाजवणे यात मग्न असतो.त्याला भरपूर मित्र आहेत.धाकटा घरात बसून सतत अभ्यास करणारा, अगदी हसणंही विसरून गेलेला. पण त्याने ऑस्ट्रेलियात नोकरी पटकावली आहे. तिथे हळूहळू तो जीवनाला सामोरा जातो आहे.बहुने आपल्या धाकट्या मुलाला आजी हसत नाही, सतत झोपून असते असे सांगितल्यावर त्याने एक चमकदार ,फुलपाखरांचे चित्र असलेली काठी आजीसाठी पाठवून दिलेली असते. ही काठी घेऊन आजीने चालावे, बागेत जावे असे त्याला वाटत असते. ती काठी मांच्या बिछान्याशेजारी ठेवलेली असते. सिद्धार्थच्या एका मित्राने मांच्या नकळत त्या काठीकडे पाहिले असता त्याला असे वाटते की मां ती काठी फिरवत आहेत आणि त्यातून जणू इंद्रधनुष्य उमलते आहे.
निवृत्तीनंतर बडेला आपले सरकारी घर सोडून दिल्लीतील स्वतःच्या घरात रहायला जावे लागणार असते. त्यासाठी बहु आतापासूनच तयारीला लागलेली असते.ते घर लहान असल्याने बरेच सामान काढून टाकावे लागणार असते.आणि घरातील नोकरचाकरांनी आताच वेगवेगळ्या वस्तुंवर आपला हक्क सांगायला सुरवात केलेली असते.
निवृत्त होणार असल्याने बडे त्याच्या परिचयाच्या सर्वांसाठी जंगी मेजवानी आयोजित करतो. शाकाहारी, मांसाहारी भोजन,मदिरा असे सगळे काही या मेजवानीत आहे. अशी मेजवानी यापूर्वी कोणीच दिली नाही असे आलेले सगळे पाहुणे म्हणतात. या मेजवानीच्या निमित्ताने तरी आपल्या आईने थोडा हुरूप दाखवून बिछाना सोडून बाहेर यावे, लोकांना भेटावे असे बडेला वाटते. पण प्रत्यक्षात मां जराही उत्साह दाखवत नाही. उलट ती अधिकच आकुंचीत होऊन बिछान्यावर पाठ फिरवून झोपून रहाते.
या मेजवानीनंतर घरातील अधिकच्या वस्तू नोकर-चाकर आपल्या घरू नेऊ लागतात.एक दिवस मां च्या परिचयाची रोझी बुआ देखील घरी येते आणि काही वस्तू घेऊन जाते.आम्ही मां ना सांगून या वस्तू नेतो आहोत, त्यांनीच आम्हाला त्या दिल्या आहेत असे प्रत्येकाचे म्हणणे आहे. आणि एके दिवशी मां च्या कपाटातील बुद्धाची मूर्ती गायब झाली आहे. ही मूर्ती आपल्या वडिलांनी कुठूनतरी आणली होती आणि मांने ती जपून ठेवली होती तर ती मां स्वतःच नोकरांना कशी देईल असा प्रश्न बडेला पडला आहे. मूर्ती गायब झाल्याचे कळल्यावर बडेची बहीण बेटीही घरी आली आहे. तिलाही मूर्ती गायब होण्याचे रहस्य उलगडत नाही. पण ती मूर्ती हरवल्याने अस्वस्थ होते.
आपली आई सतत भिंतीकडे तोंड करून झोपलेली असते. त्या भिंतीला बारीक तडे गेलेले आहेत.त्यातील एखाद्या बारीकशा तड्यातून आई आरपार निघून जाईल,नाहीशी होईल असं बेटीच्या मनात येऊन जातं.आपली मां बडेच्या घरात खुष नाही म्हणूनच ती उठत नसावी असा बेटीचा पक्का समज झालेला असतो.आणि एके दिवशी मां खरोखरच घरातून नाहीशी होते. बडे, बहू, सिद्धार्थ सगळेच हवालदिल होतात. जी बाई बिछान्यातून जेमतेम उठून बाथरूमपर्यंतच जात होती ती अचानक उठून गेली कशी याच कोडं सगळ्यांनाच पडतं. मांची काठीही तिच्याबरोबरच गायब झालेली दिसते. बेटीला ही बातमी मिळताच ती तडक पोलिस्टेशन गाठते.बडेही नाइलाजाने पोलिसस्टेशनवर पोहोचतो.सगळीकडे शोधाशोध सुरू होते. नोकरचाकरही घाबरून जातात.
इथे मां रात्री घरातून निघून काठी टेकत रोझी बुआला भेटायला गल्लीच्या कोपऱ्यापाशी गेलेली असते. पण तिथून परत घरी येताना ती चुकीच्या ठिकाणी वळते आणि मग वाट न सापडल्याने गोंधळून भरकटत भलतीकडेच जाते. एका ठिकाणी ती रात्री बसून रहाते. पण सकाळी उठून ती काठी टेकत परत रस्ता शोधू लागते तेव्हा काही वात्रट मुलं तिला वेडी समजून तिच्यावर दगड मारतात. कोणीतरी बुजुर्ग तिची चौकशी करून तिला एका पोलिस स्टेशनवर सोडतो. तिथे पोलिस तिची माहिती विचारतात तेव्हा ती आपले नाव चंदा आणि नवऱ्याचे नाव अन्वर असल्याचे सांगते. पोलिस बुचकळ्यात पडतात. पण दुसऱ्या पोलिसस्टेशनना एक वृद्ध बाई सापडल्याची खबर देतात. बडे आणि बेटी ज्या पोलिसस्टेशनला असतात तिथेही ही बातमी पोहोचते आणि ते तातडीने ही वृद्ध बाई कोण ते पहायला दुसऱ्या पोलिसस्टेशनवर जातात तेव्हा त्यांना मांला पाहून हायसे वाटते. पोलिसांचे म्हणणे असते की मांने स्वतःचे नाव वेगळेच सांगितले आहे. पण मांला विस्मरण होते, ती भ्रमिष्ट झाली आहे असे सांगून बडे आणि बेटी आम्हीच तिची मुले आहोत अशी ओळख पटवतात. बडेचे काहीही न ऐकता बेटी मांला स्वतःच्या घरी घेऊन जाते.कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो.
बेटीच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये शिरल्यापासून मां अगदी प्रफुल्लीत असते. तिला बेटीचा लहानसा फ्लॅट फार आवडतो. या फ्लॅटला असलेली गॅलरी, घराच्या चारही बाजूच्या खिडक्यांतून दिसणारी हिरवीगार झाडं हे सगळं मांला आवडते. बेटी मांला स्वच्छ आंघोळ घालून जेवू घालते.मां रात्री बाथरूमला जायला उठेल आणि पडेल या भयाने बेटी रात्रभर जागी रहाते. मांवर सतत नजर ठेवणे हे तिचे कामच होऊन जाते.काही दिवसांच्या आरामानंतर मां गच्चीत कुंड्या हव्यात आणि मी त्यात रोप लावणार असं सांगते. कुंड्या आणून दिल्यावर ती मातीत हात घालून स्वतः रोपं लावते, बिया पेरते. मग रोज गच्चीत बसून ती उगवणाऱ्या अंकुरांशी , गच्चीच्या कठड्यावर येऊन बसणाऱ्या कावळ्या-चिमण्यांशी बोलू लागते. बेटीला मांचे हे रूप नवीनच वाटते.आणि मग अचानक एके दिवशी रोझी बुआ बेटीच्या घरी येते.तिला बघून तर मां फारच आनंदीत होते. रोझी बुआ मांला पटवते की तिने आता पायात घोळणाऱ्या साड्या नेसणं सोडून द्यावे. त्या साडीच्या घोळात पाय अडकून ती पडण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा गुडघ्यापर्यंत येणारे लेस लावलेले गाऊन शिवून घ्यावेत. रोझी नुसती बोलून थांबत नाही तर मांचे माप घेऊन जाऊन दोन गाऊन शिवून आणून देते.मांना हे नवे सुटसुटीत कपडे फारच आवडतात. बेटीही मांचे हे परिवर्तन चकीत होऊन पाहात रहाते. एके दिवशी कपाट साफ करताना तिला गायब झालेली बुद्धाची मूर्ती मागे सरकवून ठेवलेली दिसते.तिला धक्काच बसतो. मांला त्याबद्दल विचारल्यावर ती मूर्ती तिनेच रोझी बुआकडे ठेवायला दिली होती. पण रोझीकडे स्वतःचे घर नाही मग ती मूर्ती कुठे ठेवेल या शंकेनेच ती रात्री रोझीला भेटायला गेली होती.तिथून परततानाच ती रस्ता भरकटली होती हे कबुल करते. बेटीच्या घरी आल्यावर तिनेच रोझीला सांगून बुद्धाची मूर्ती परत मागून घेतलेली असते.

मां आणि रोझी बुआ मिळून जुन्या कपड्यांपासून, फुटक्या कपांपासून, टाकाऊ गोष्टींपासून नवनव्या कल्पना लढवून वस्तू बनवू लागतात. रोझी त्या वस्तू विकायला नेऊ लागते. मिळणारे पैसे ती तृताय पंथीयांच्या संघटनेला देणार असते.रोझी बुआ आणि मां रोज संध्याकाळी बेटीच्या घराजवळील भग्न समाध्यांजवळ जाऊन गप्पा मारत बसू लागतात. मांचे हे नवे उत्साहाने भरलेले रूप बेटीला आश्चर्यचकीत करणारे ठरते. स्वयंपाकघरातही मां नवनवे पदार्थ बनवू लागलेली असते. बडेची बहू बेटीकडे येऊन मांना पाहून जाते. मनोमन ती बेटीच्या लहान घराला, त्यातील फर्निचरला नाकं मुरडते. मांचे नवे रूपही तिला आवडत नाही. सिद्धार्थही परदेशातून येतो ते थेट मांना भेटायला आत्याच्या घरी मित्राला घेऊन दाखल होतो.आजीचे बदललेले रूप सिद्धार्थला आणि विशेषतः मित्राला फार आवडते. आता आजीच्या काठीवरली फुलपाखरे खरोखर उडू लागली आहेत असे त्याला वाटते.
बडे मात्र बेटीवरील रागामुळे मांना भेटायला प्रत्यक्ष तिच्या घरी येत नाही. पण बेटीच्या घराच्या बाजूच्या रस्त्यावरील झाडावर चढून तेथील कावळ्यांशी सामना करत तो मांला दुरून पहातो. मांमधील बदल त्याला आवडत नाहीत.
बेटीला आता मांवर देखरेख करावी लागत नसली तरी मांच्यामुळे घरी येणारे शेजारपाजारी, पहारेकरी, नातेवाईक यांच्यासाठी सतत दरवाजा उघडणे,आल्यागेलेल्यांसाठी काहीतरी खायला करणे यात तिचा बराच वेळ जाऊ लागतो. आपले मन लेखनात एकाग्र करता येत नाही म्हणून बेटी अस्वस्थ होते. पण मांचे रूपांतर हा तिच्या कौतुकाचा विषय होतो. अगदी तिचा प्रियकर के.के. यालाही माने लिलया आपलेसे केलेले पाहून तर तिला मांची असुयाच वाटते !
अचानक एके दिवशी रोझी बुआ बेटीच्या घरी येईनाशी होते. मांच्या जीवाला घोर लागतो. ती बेटीला पोलिसांत तक्रार नोंदवायचा आग्रह करते.रोझीने दिल्लीच्या उपनगरात एक लहानसा फ्लॅट घेतला होता हे मांना माहीत आहे. त्या घरी ती बेटी आणि तिचा मित्र के.के. यांना घेऊन जाते. त्या फ्लॅटवर एक तरूण जोडपं रहात असते. रोझीने तो फ्लॅट या जोडप्याला भाड्याने दिल्याचे त्यांना कळते. पण घराच्या एका भिंतीवर पानाच्या पिचकारीसारखे दिसलेले डाग पिचकारीचे नसून रक्ताचे आहेत असा संशय बेटीला येतो. मांनाही त्या जोडप्याकडे रोझीची चौकशी करताना मिळालेली उत्तरे समाधानकारक वाटत नाहीत.पोलिस मात्र रोझी तृतीय पंथीय असल्यामुळे तिच्या लापता होण्याची गोष्ट गांभिर्याने घेत नसतात.बेटीचा मित्र के.के. पत्रकार असल्याने पोलिसांच्या या पूर्वग्रहदुषित वागणुकीबद्दल बातमी तयार करतो. पण ती बराचसा तपशील वगळून त्याचा संपादक पेपरमध्ये छापतो.मां पोलिसांकडे पाठपुरावा करून त्यांना रोझीच्या फ्लॅटची झडती घ्यायला लावते. रोझीचा देह तुकडे करून त्याच फ्लॅटमधील कॉटच्याखालील कपाटात कोंबून ठेवलेला पोलिसांना मिळतो. आरोपी पकडले जातात.भाडे वेळेवर देत नाहीत म्हणून रोझीने त्यांच्याकडे फ्लॅट परत मागितलेला असतो.तेव्हा तृतीय पंथीयांना कायद्याने फ्लॅट घेताच येत नाही वगैरे धमक्या देत त्यांनी रोझीला फ्लॅट परत द्यायला नकार दिलेला असतो. रोझीने फ्लॅट तुम्ही फ्लॅट विकत घ्या असे जोडप्याला सांगितल्यावर त्यांनी तिचाच काटा काढलेला असतो.अशाप्रकारे रोझीचा करूण अंत होतो. मांना ते पाहून अतिशय वाईट वाटते. रोझीचे अंत्यसंस्कार करण्यापेक्षा तिचा देह वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी देण्याचा निर्णय मां घेते.रोझीला दुसरे कोणीच नसल्याने मांच्या निर्णयाला स्वीकारले जाते.
रोझी गेल्यामुळे मां पुन्हा खाटेवर झोपून राहू लागेल की काय अशी भीती बेटीला वाटते. मां आपली कामे थांबवते पण आता तिला रोझीची एक अधुरी इच्छा पूर्ण करायची आहे. तिने दिलेल्या चिरौंजीच्या (चारोळी) बिया तिच्या कोणा नातेवाईकाकडे पाकिस्तानात पोहचवायच्या आहेत अशी भुणभुण ती बडेच्या मागे लावते. सीमा पार करून शत्रू राष्ट्रात जाणे सोपे नाही हे बडे तिला परोपरीने समजावतो. पण मां काहीच ऐकायला तयार नसते. माझी शेवटची इच्छा मानून मला सीमेपार जायला पासपोर्ट व्हिसा मिळवून दे असे ती बडेला सांगते. बेटीने आपल्यासोबत यावे अशी आज्ञाच ती करते.बहुच्या एका योगा शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील वकिलातीत असल्याने त्यांच्या ओळखीने अखेरीस मांना आणि बेटीला पाकिस्तानात जायच्या परवानगीचे कागदपत्र मिळतात.आणि दोघींना पोहोचवायला बडे बाघा बॉर्डरपर्यंत गाडी करून जातो.पाकिस्तानला जाताना मांनी त्यांची बुद्धमूर्ती सोबत घेतलेली असते. कादंबरीचा दुसरा भाग इथे संपतो.
बाघा बॉर्डरवरील सगळा नाटकी कवायतीचा सोहळा पाहून दोघी बॉर्डर पार करतात. आणि बसने लाहोरला जातात.तिथे वकिलातीने दिलेला मार्गदर्शक त्यांना भेटतो. मां त्यांना आणि बेटीला घेऊन लाहोरमधील विशिष्ट भाग, विशिष्ट गल्ल्यांतून सराईतासारखी फिरू लागते. रोझीने मला या भागाबद्दल, तिच्या घराबद्दल इतकं वर्णन करून सांगितले होते की मला इथली खडान खडा माहीत आहे , असं म्हणून मां एका गल्लीत बेटी आणि मार्गदर्शकाला घेऊन जाते आणि एका हिरव्या दाराची कडी वाजवते.दुरून एक म्हातारा तिला पहातो आणि “डाक्टर साहब की पोती आयी” असे म्हणून लगबगीने पुढे येतो. तेव्हा बेटीच्या लक्षात येते की हे मांच्या आजोबांचे घर आहे. रोझीचे नाही.
आणि मग मां बेटीला घेऊन पाकिस्तानातील कराची, इस्लामाबाद, सिंध भागात फिरू लागते. त्यांच्याकडे थरच्या वाळवंटात जाण्याची परवानगी नसतानाही मां गाडी करून बेटीसह तिथे जाते आणि वाळवंटात बसून ती एक -एक कहाणी बेटीला सांगू लागते.या कहाण्यांची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे एक विवाहीत तरूण मुलगी. भारत-पाक फाळणीनंतर लाहोरमधील आपल्या आजोबांच्या घरात रोट्या भाजत असताना जमावाने येऊन तिला फरपटत घराबाहेर नेऊन एका ट्रकमध्ये बसवले आहे. सुरवातीला तरी तिला आपल्याकडून चूल सुरू राहिली आहे आणि आजोबांच्या घराला आग लागेल याचीच चिंता आहे. तिला फरपटत नेताना अंगाला खरचटले आहे. ट्रकमध्ये तिच्या सारख्याच अनेक मुली तिला बसलेल्या दिसतात.ट्रक वेग पकडतो तेव्हा मुलींचा तोल जाऊन त्या एकमेकींच्या अंगावर पडतात.सगळ्याच रडत आहेत, भयभीत आहेत.या मुलींना वाटेत कधीतरी पाणी, कधीतरी थोडे खायला ट्रकवाले देत आहेत. पण आपल्याला कुठे घेऊन जात आहेत हे या मुलींना कळत नाही. आपल्यावर हे लोक बलात्कार करणार का ?की आपल्याला मारून टाकणार याबद्दल मुली साशंक आहेत.एका रात्री एका मिशन स्कुलमध्ये मुलींना ठेवले जाते. तिथे मुलींना आंघोळ करता येते. कथेची नायिका चंदा शाळेत फिरत असताना एके ठिकाणी तिला बुद्ध मूर्ती दिसते. तिच्या नवऱ्याने अन्वरने तशीच बुद्ध मूर्ती घरी ठेवलेली तिने पाहिलेली असते. ही मूर्ती जर आपल्याबरोबर असेल तर आपला नवराच जणू आपल्यासोबत असल्यासारखे आपल्याला वाटेल या श्रद्धेने चंदा ती बुद्ध मूर्ती उचलून आपल्या ओढणीत लपवते.सकाळी पुन्हा ट्रकचा प्रवास सुरू होतो. आणि ट्रक थरच्या वाळवंटात पोहचतो. वाळू वाऱ्याने उडत असतानाच मुलींना ट्रकमधून उतरवून वाळवंटात सोडले जाते.प्रत्येकीला एक शिट्टी दिली जाते. जी वाजवत राहायची आहे. ज्यामुळे वाळवंटातून चालत जाताना मुलींना एकमेकींचा आधार वाटणार आहे. चंदाला ट्रकमधून उतरताना तिची बुद्ध मूर्ती सोबत ठेवायची आहेच पण एका अकरा वर्षीच्या मुलीचा हातही तिच्या हातात दिला गेला आहे. ती मुलगी आहे रोझी. चंदाला रोझीसह वाळवंट ओलांडून सुरक्षित ठिकाणी पोहोचायचे आहे.दोघी कशाबशा चालत रहातात. रात्री कमालिची थंडी, दिवसा भयंकर ऊन , सतत उडणारी, नाका-तोंडात जाणारी वाळू अशा प्रतिकूलतेचा सामना करत त्या चालत रहातात. मध्येच कुठल्याशा शेतात त्यांना गव्हाचे कच्चे दाणे मिळतात, पाणी मिळते. ते खाऊन दोघी पुढे जात रहातात. पण वाळूचा प्रचंड ढगच जणू त्यांच्यावर आदळतो तेव्हा त्या दोघींचीही शुद्ध हरपते. त्या शुद्धीवर येतात तेव्हा स्वतंत्र भारतातील कोणत्याशा ठिकाणी इस्पितळात असतात.मांची ही कहाणी बेटीला अवाक करते.मांचा भूतकाळ तिला अजिबात माहीत नसतो.

कराची, इस्लामाबाद येथे काही लोकांना भेटल्यार मांला माहिती मिळते की अन्वरचा मुलगा अली अन्वर हा पोलिस अधिकारी असून खैबर भागात त्याची नेमणूक झाली आहे. खैबर खिंडीचा डोंगराळ इलाका हा पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया करणाऱ्या टोळ्यांच्या ताब्यात असणारा अतिशय संवेदनशील भाग आहे.लष्कर आणि पोलिसांखेरीज अन्य कोणालाही खैबरमध्ये प्रवेश नसतो. मां तरीही धाडस करून बेटीला घोऊन खैबर भागात जाते. बेटी सतत विरोध करत असतानाही ती जुमानत नाही. पोलिस दोघींनाही पकडून कोठडीत टाकतात.तेव्हा मां तिला अली अन्वरला भेटायचे आहे असे सांगत रहाते. अली अन्वर डोंगराळ भागात दौऱ्यावर असल्याने कितीतरी दिवस मां आणि बेटीला तो परत येईपर्यंत पोलिसी कोठडीत रहावे लागते. रोज चौकशी, रोज त्यांच्यावर घेतला जाणार संशय याला त्यांना सामोरे जावे लागते. मां या चौकशीत ती या भूमीतच जन्माला आली, मोठी झाली हे सांगत. तिचा या मातीत, या देशात कुठेही फिरण्याचा हक्क कोणीही डावलू शकत नाही अशी भूमिका सतत घेत रहाते. तर बेटी आपण भारतीय आहोत आणि मांच्या हट्टापायी सीमा ओलांडून या भागात आलो आहोत, आपल्याकडून चूक झाली आहे. पण माफ करून आपल्याला सोडून द्यावे अशी विनंती करत रहाते.
दिल्लीत बडेने सरकारी घर सोडून स्वतःच्या घरात प्रवेश केलेला असतो. या छोट्या घराचा दरवाजाही पूर्वीच्या घराप्रमाणे सतत उघडाच ठेवावा असे त्याचे सर्वांना सांगणे असते. मां आणि बेटी पाकिस्तानातून ठरलेल्या दिवशी परत न आल्याने आणि त्यांचा संपर्क होत नसल्याने तो हवालदील होतो. कुठून कुठून ओळखी काढून तो त्या दोघींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत रहातो. मांच्या आठवणीने अस्वस्थ झाला की बेटे खिडकीत येणाऱ्या कावळ्याला खाऊ-पिऊ घालून , त्याच्याशी बोलण्यात दिलासा शोधत रहातो.
पोलिस कोठडीतही मां तरूण पोलिसांना व्हरांड्यात कुंड्या आणून द्या, माती आणून द्या, मी तुम्हाला रोपं लावून देते असा आग्रह करते. हळूहळू मांबद्दल प्रेम वाटू लागलेले पोलिस शिपाई खरोखरच मांला कुंड्या आणून देतात. मां व्हरांडा हिरवा करून टाकते.ती अगदी सहजपणे पोलिसांशी गप्पा मारते. एका कावळ्याला तिने जीव लावलेला असतो आणि ती त्याच्याशी बोलत रहाते. बेटी मात्र कायम घाबरून बसते.मां आणि बेटीला चांगले अन्न, पाणी रोज पोलिस पुरवत रहातात. त्यांची बडदास्त ठेवतात.आणि मग अनेक दिवसांनी अली अन्वर दौऱ्यावरून परत येतो. मां आणि बेटीला त्याच्यासमोर आणले जाते.त्याचेही म्हणणे हेच असते की परवानगी नसताना दोन भारतीय स्त्रियांनी या संवेदनशील भागात येणे चुकीचे आहे आणि त्यांना परत इस्लामाबादला पाठवले जाईल. मां अली अन्वरला सांगत रहाते की भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ही केवळ काल्पनिक रेषा आहे. दोन्ही देशांची भूमी, आकाश एकच आहे, संस्कृती एक आहे.मुख्य म्हणजे ती याच भूमीत जन्माला आलेली आहे.आणि मग त्याचा पुरावा तुला हवं तर तू तुझ्या वडिलांकडे माग, मी त्यांच्याशी विवाह केला होता हे मां जेव्हा उघड करते तेव्हा अली अन्वर रागाने लाल होतो.दोघींची पोलिस कोठडी वाढते.बेटी मांचा हा भूतकाळ ऐकून चक्रावून जाते. तिला भारतात परत जायची तीव्र ओढ वाटू लागते.पण मांची अन्वरला भेटल्याशिवाय परत भारतात जाण्याची तयारी नसते.
अन्य पहारेकऱ्यांकडून मांना कळते की अन्वर तर पक्षाघाताने बिछान्याला खिळला आहे. तो आपल्या भेटीला येऊ शकत नाही.मग ती स्वतः अन्वरच्या भेटीला जायची इच्छा व्यक्त करते.दरम्यान तिला सतत उचकी लागू लागते. ही उचकी पाणी पिऊन, श्वास रोखून थांबत नाही. तेव्हा मां दोन्ही पोलिसांना विनंती करते की त्यांनी तिच्या पाठीवर जोराने लाथ हाणावी म्हणजे उचकी थांबेल. आधी पोलिस या गोष्टीला तयार होत नाहीत. पण मां च्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नाही. लाथ मारल्यावर मां तोंडावर पडू इच्छित नसते. तिला पाठीवर पडायचे असते. मग हा रोजचा एक खेळच होऊन बसतो. मांला उचकी लागणे, तिने पाठीवर लाथ घालण्याची आज्ञा पोलिसांना देणे आणि त्यांनी लाथ मारताच तिने पाठीवर पडणे. उचकी गायब होणे.सुरवातीला मांला लागू नये म्हणून पोलिस बिछाने अंथरून हा खेळ खेळतात. पण नंतर मां त्यांना बिछानेही घालू देत नाही. लाथ मारल्यावर पाठीवर पडण्याचा जणू सरावच ती करत असते.
आणि एका रात्री दोन सावल्या एक लहान, एक मोठी पोलिस कोठडीतून बाहेर पडतात. कोठडीच्या छपरावर बसलेला कावळा आणि चकोर या दोन सावल्या पहातात. या सावल्या अली अन्वरच्या घराकडे जातात.अली अन्वरचे वडील खाटेवर पडून असतात. मंद ज्योतीच्या उजेडात मां(चंदा) आणि अन्वरची भेट होते. अन्वरच्या खाटेमागील कपाटावर तीच बुद्धाची मूर्ती असते जी दोघांची ताटातुट होण्यापूर्वी चंदाने पाहिलेली असते. अन्वरचे डोळे मिटलेले असतात. चंदा अन्वरशी बोलत रहाते, जुन्या आठवणी काढत रहाते, त्याच्या चेहऱ्यावरून, हातांवरून आपले हात फिरवत रहाते.जुनी गाणी हळूवार आवाजात त्याला ऐकवत रहाते. पहाट होताहोता ती अन्वरला सांगते की आपण एकत्र राहू शकलो नाही. फाळणीने आपल्याला दूर केलं. मी माझ्या सुरक्षेसाठी दुसरं लग्ल केलं, त्या संसारात गुंतून राहिले. तूही तेच केलंस. दोघेही एकमेकांना विसरलो.पण आता दोघांनी एकमेकांना माफ केलं पाहिजे. आणि अवचितपणे अन्वरचा हात वर उचलला जातो आणि माफ केल्याचे उद्गार अस्फुटपणे त्याच्या ओठातून बाहेर पडतात. मांना(चंदा) कोठडीत परत जा असे सांगायला आलेला अन्वर ते ऐकतो.मां आणि दुसरी मोठी सावली अन्वर अलीच्या घराबाहेर पडून थोडी पावलं जाताच मागून बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो.मोठी सावली पटकन पळते पण छोटी पळू शकत नाही. गोळी मांच्या पाठीत शिरते आणि मां सराइतपणे उडून पाठीवर पडतात, गतप्राण होतात.
अशाप्रकारे मांनी रोझीची इच्छा पूर्ण करायची आहे असे सांगून सीमेपलीकडे जाऊन स्वतःचीही इच्छा पूर्ण करून घेतलेली असते आणि आपल्या पहिल्या पतीला अन्वरला भेटून त्याची माफी मागून, त्याच्याकडून क्षमा स्वीकारून मांनी मोठ्या समाधानाने आणि सन्मानाने मृत्यू स्वीकारलेला असतो.
मोठी सावली म्हणजे बेटी नसते. ती कोठडीतच झोपलेली असते. मोठी सावली असते कोठडीचा प्रमुख पोलिस. अली अन्वर आपण गोळी झाडली नाही असे सांगतो. गोळी कोणा अतिरेक्याने मारली असावी असे त्याचे म्हणणे असते. मांच्या मृत्यूची खबर तो बेटीला देतो ती ऐकून बेटी मोडून पडते. अली अन्वर तात्काळ तिला गाडीने इस्लामाबादला रवाना करून विमानाने भारतात पाठवून देतो. त्यावेळी आपण बेटीचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन केले नाही याची खंत त्याला नंतर सतावत रहाते.बेटी आपली सावत्र का होईना बहीण होती आणि तिला दुःखातून सावरायला आपण मदत करायला हवी होती असे अली अन्वरला वाटत रहाते.
मांने कोठडीत माणसाळवलेला कावळा आणि चकोर मांच्या मृत्युबद्दल ऐकून दुःखी होतात. ही बातमी बडेला द्यायला आपण भारतात गेले पाहिजे असे कावळ्याला वाटते. तो चकोराला घेऊन भरारी घेतो. पण उंच डोंगर ओलांडताना चकोराचा दम तुटतो. कावळा त्याला पालथा पडू देत नाही. त्याला अलगद चोचीत धरून तो पर्वत माथ्यावर त्याचे शरीर ठेवतो आणि त्याचा आदर करतो.मग तो उडत दिल्लीत जातो आणि बडेच्या घराच्या जवळील झाडावर राहू लागतो.
बेटी भारतात परत येते आणि आपले दैनंदिन काम सुरू करते. ती फक्त कामापुरती भावाकडे येते अशी तक्रार बहु आणि तिची मुले करत रहातात.
असे हे ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या गीतांजली श्री लिखित कादंबरीचे प्रदीर्घ , गुंतागुंतीचे कथानक आहे.कधी ते इतके संथ जाते की वाचताना वाचक काही घडतच नाही म्हणून कंटाळू शकतो. पण जेव्हा कथानक वेग घेते तेव्हा मात्र अनेक सनसनाटी वाटाव्यात अशा घटना घडत जातात, अनेक रहस्य उलगडत जातात.काही गोष्टींची उत्तरे कादंबरी संदिग्ध ठेवते. वाचकांनी ती स्वतःच्या कल्पनेने समजून घ्यायची आहेत.
तुम्ही ही कादंबरी जरूर वाचा. मी हा ब्लॉग लिहिला तेव्हा ‘टुम्ब ऑफ सॅंड’चा मराठी अनुवाद झाला आहे हे मला माहीत नव्हते. मी डेझी रॉकवेल यांनी भाषांतरीत केलेली इंग्रजी कादंबरी वाचूनच हा ब्लॉग लिहीला आहे. पण नंतर वर्तमानपत्रात मधुश्री प्रकाशनाने ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे अशी माहिती मला मिळाली. तुम्हाला हा अनुवादही वाचायला उपलब्ध होऊ शकेल.नक्की वाचा.
पुढील ब्लॉगमध्ये ‘टुम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून कादंबरीची कथासूत्रे लक्षात घेऊ.
-गीता मांजरेकर
________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा