आजच्या ब्लॉगमध्ये आपण गीतांजली श्री या हिंदीतील प्रथितयश लेखिकेचा परिचय करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीचा ‘टुंब ऑफ सॅंड’ या नावाने इंग्रजी अनुवाद करणाऱ्या डेझी रॉकवेल या अनुवादक अमेरिन लेखिकेचाही परिचय करून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

वास्तविक आपण या ब्लॉगमध्ये साततत्याने भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रिया आणि त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा परिचय करून घेत असतो. पण आज हिंदी भाषेतून लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार स्त्रीचा परिचय करून द्याचये ठरवले आहे कारण या लेखिकेची ‘रेत समाधी’ ही  अशी पहिली हिंदी(भारतीय भाषेतील) कादंबरी ठरली आहे की जिच्या इंग्रजी अनुवादाला (Tomb of sand) २०२२ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले.मूळ लेखिका आणि अनुवादक अशा दोघांना हे पारितोषिक विभागून दिले जाते.

LONDON, ENGLAND – MAY 26: Daisy Rockwell and Geetanjali on the red carpet with their winners medals at The 2022 International Booker Prize Winner Ceremony at One Marylebone on May 26, 2022 in London, England. (Photo by Shane Anthony Sinclair/Getty Images)

गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये बानु मुश्ताक यांच्या ‘एडेया हानाटे’ या कन्नड कथासंग्रहाच्या दीपा बस्थी यांनी ‘हार्ट लॅम्प’ नावाने केलेल्या भाषांतराला बुकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.हे भारतीय भाषेतील साहित्यकृतीच्या अनुवादाला मिळालेले दुसरे बुकर पारितोषिक ठरले. मराठीतील पुस्तकाच्या अनुवादाला असा मान कधी मिळेल ?असो, आपण गीतांजली श्री यांचा परिचय करून घेऊ.

गीतांजली श्री या लेखिकेचे मूळ नाव आहे गीतांजली पांड्ये. त्यांचा जन्म १२ जून १९५७ चा आहे. मैनपुरी या उत्तर प्रदेशातील शहरात त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील अनिरूद्ध पांड्ये हे उत्तर प्रदेशात सनदी अधिकारी असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे गीतांजलीचे बालपण उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यामुळे इंग्रजी भाषेशी त्यांचा संपर्क उशीराच आला आणि हिंदीशी त्यांचे घट्ट नाते जुळले.उच्च शिक्षणासाठी त्या दिल्लीला आल्या. लेडी श्रीराम महाविद्यालयातून त्यांनी इतिहास या विषयात पदवी मिळवली.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एम. ए. केले.पीएच.डी. मात्र त्यांनी हिंदी साहित्य विषयात केले आहे. ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या समग्र साहित्यावर त्यांनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात प्रबंध सादर केला आणि पीएच.डी. मिळवली.

पदवीसाठी अभ्यास करत असतानाच गीतांजली श्री हिंदीतून लिहू लागल्या होत्या. पीएच.डी. पूर्ण झाल्यावर त्यांनी हिंदी कथालेखन जोमाने सुरू केले. त्यांची पहिली कथा ‘बेलपत्र’ हिंदीतील ‘हंस’ या मासिकात १९८७ साली प्रसिद्ध झाली.१९९१ साली त्यांचा पहिला कथासंग्रह ‘अनुगुंज’ प्रकाशित झाला.

‘माई’ (१९९३) ही गीतांजली श्री यांची कादंबरी त्यांना प्रथितयश लेखिका बनवणारी ठरली. उत्तर प्रदेशातील मध्यमवर्गीय स्त्रीची कथा मांडणारी ही कादंबरी आहे.’क्रॉसवर्ड’ पुरस्कारासाठी ती नामांकीत झाली होती. २०१७साली  नीता कुमार यांनी ‘माई’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला.या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘माई’ या कादंबरीचे अनेक भारतीय भाषांत तसेच फ्रेंच,जर्मन, कोरियन आणि सर्बियन भाषांत अनुवाद झाले आहेत.१९९८ साली गीतांजली श्री यांची ‘हमारा शहर उस बरस’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.बाबरी मशिद पाडली जाण्याचा काळ त्यात चित्रीत झाला आहे.  जातीय तेढ लोकांच्या मनावर काय परिणाम घडवते ते दाखवणारी ही कादंबरी आहे.या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद डेझी रॉकवेल यांनी २०२४ साली प्रसिद्ध केला आहे.

२००१मध्ये गीतांजली श्री यांची ‘तिरोहित’ ही कादंबरी प्रकाशित झाली  जिचा इंग्रजी अनुवाद राहुल सोनी यांनी ‘द रूफ बिनीथ देयर फीट’ या नावाने २०१३ साली प्रकाशित केला.तर २००६ साली गीतांजली यांनी लिहिलेल्या ‘खाली जगह’ या कादंबरीचा  ‘एम्प्टी स्पेस’ या नावाने निवेदीता मेनन यांनी केलेला अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला.

२०१८ मध्ये गीतांजली श्री यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. जिचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आणि त्याला २०२२ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले.‘सहसा’ या नावाची गीतांजली श्री यांची नवी कादंबरी २०२५ साली प्रकाशित झाली आहे.

आता डेझी रॉकवेल यांच्याबद्दल जाणून घेऊ. त्या इंग्रजीतील लेखिका आणि भाषांतरकार आहेत. गीतांजली श्री यांच्या दोन कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्या आहेत.

डेझी रॉकवेल यांचा जन्म १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट राज्यात झाला.त्यांचे आजोबा नॉर्मन रॉकवेल हे चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे आई-वडीलही कलावंत होते.डेझी स्वतःही एक उत्तम चित्रकार आहेत.’लापता’ या टोपणनावाने त्या चित्र काढत असतात.लहानपणापासूनच डेझी यांना विविध भाषांची गोडी वाटू लागली. त्या इंग्रजी बरोबरच जर्मन,फ्रेंच, लॅटीन, हिंदी, उर्दू आणि प्राचीन ग्रीक भाषेच्या अभ्यासक आहेत.शाळेत असतानाच त्यांनी देवनागरी लिपी शिकली होती.शिकागो विद्यापीठात पदवी मिळवताना त्यांनी हिंदी, उर्दू, तमिळ , मल्याळम आणि संस्कृत या भाषांचा अभ्यास केला.दक्षिण आशियाई देशांतील साहित्य या विषयात त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.त्यानंतर उपेंद्रनाथ शर्मा ‘अश्क’ या हिंदी भाषेतील लेखकाच्या साहित्याचा समग्र अभ्यास करून  त्यांनी शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली आहे.बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी अनेक वर्ष दक्षिण आशियाई देशांतील साहित्य या विषयाचे अध्यापन केले आहे.आजही त्या विविध अमेरिकन विद्यापीठांत दक्षिण आशियाई साहित्यासंदर्भात व्याख्याने देत असतात.हिंदीतील सादत हसन मंटो, यशपाल यांच्या साहित्याची तसेच समकालीन हिंदी साहित्याची समीक्षा त्यांनी इंग्रजीतून केली आहे.

डेझी रॉकवेल यांनी भाषांतरीत केलेली हिंदी, उर्दु पुस्तके पाहू. २०१३ साली त्यांनी उपेंद्रनाथ शर्मा ‘अश्क’ यांच्या गाजलेल्या कथांचे भाषांतर करून ‘हॅटस ऍंड डॉक्टर्स’ या नावाचा संग्रह प्रसिद्ध केला.२०१५ साली त्यांनी उपेंद्रनाथ अश्क यांच्याच ‘गिरती दिवारे’ या कादंबरीचा ‘फॉलिंग वॉल्स’ या नावाने अनुवाद केला आहे.२०१६ साली त्यांनी भिष्म सहानी यांच्या ‘तमस’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला.२०१८ साली डेझी रॉकवेल यांनी पाकिस्तानी लेखिका खदिजा मास्तुर यांच्या ‘आंगन’ या कादंबरीचा ‘द वुमन्स कोर्टयार्ड’ या नावाने इंग्रजी अनुवाद केला.ज्याचा पुढे अनेक भाषांत अनुवाद झाला.खदिजा मास्तुर यांच्याच ‘जमिन’ या कादंबरीचे ‘दी प्रॉमिस्ड लॅंड’ या नावाने भाषांतर २०१९ मध्ये डेझी रॉकवेल यांनी केले आहे. अमेरिकेत स्थाईक झालेल्या पण हिंदीतून लेखन करणाऱ्या उषा प्रियंवदा(नीलसन) या गाजलेल्या लेखिकेच्या ‘पचपन खंबे लाल दिवार’ या कादंबरीचा तसेच त्यांच्याच ‘रूकोगी नही राधिका’ या कादंबरीचाही अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आहे. प्रख्यात हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांच्या ‘गुजराथ पाकिस्तानसे गुजराथ हिंदुस्थान’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवादही २०१९ साली डेझी रॉकवेल यांनी केला आहे.अझरा अब्बास या कवयित्रीच्या कवितांचा अनुवाद ‘स्लिप जर्नी’ या नावाने २०२५ साली डेझी रॉकवेल यांनी प्रसिद्ध केला आहे.

अशाप्रकारे गीतांजली श्री आणि डेझी रॉकवेल या दोघी विलक्षण प्रतिभावान स्त्रिया आहेत.त्यांच्या साहित्याचा तुम्ही जरूर आस्वाद घेतला पाहिजे. पुढील ब्लॉगमध्ये आपण गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कादंबरीच्या ‘टुंब ऑफ सॅंड’ या डेझी रॉकवेल यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाच्या आधारे कादंबरीचे कथानक जाणून घेऊ.ही कादंबरी ७३० पृष्ठांची असल्याने ती बारकाईने वाचून त्यासंबंधी लिहायला मला थोडा अधिक वेळ लागू शकतो.पण लिहिणार निश्चित !

                                                                         -गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा