मागील ब्लॉगमध्ये झुंपा लाहिरी यांच्या ‘दी लोलॅंड’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे यांचा परिचय करून घेतला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या कादंबरीचे कथनाच्या अंगाने विश्लेषण करून लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा वेध घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘दी लोलॅंड’ ही एक दीर्घ कादंबरी असली तरी ती प्रामुख्याने एकाच कुटुंबातील प्रामुख्याने दोन माणसांचे – सुभाष व गौरी यांचे पन्नास वर्षांचे जीवनपट मांडणारी आहे. हे जीवनपट उलगडण्यासाठी लेखिकेने कथनकाला आठ विभागांत विभाजीत केले आहे.संपूर्ण कादंबरीचे कथन तृतीय पुरूषी असले तरी दृष्टीक्षेत्रनियंत्रक वेळोवेळी बदलत गेलेला आहे. कधी सुभाष हा दृष्टीक्षेत्रनियंत्रक आहे , कधी गौरी दृष्टीक्षेत्रनियंत्रक आहे, कधी बेला दृष्टीक्षेत्रनियंत्रक आहे तर अगदी अखेरच्या प्रकरणात उदयन हा दृष्टीक्षेत्रनियंत्रक आहे.

दी लोलॅंड या कादंबरीच्या कथानकाचे विभाजन लेखिकेने पुढीलप्रमाणे केले आहे-

विभाग १- ६ प्रकरणे- ४४ पृष्ठे

विभाग २-४ प्रकरणे-३२ पृष्ठे

विभाग ३ -३ प्रकरणे- ३३ पृष्ठे

विभाग ४- ७ प्रकरणे- ५३ पृष्ठे

विभाग ५- ४ प्रकरणे – ४६ पृष्ठे

विभाग ६- ४ प्रकरणे -४३ पृष्ठे

विभाग ७- ६ प्रकरणे – ५० पृष्ठे

विभाग ८-२ प्रकरणे- ११ पृष्ठे

‘दी लोलॅंड’ या कादंबरीच्या कथानकाचा परिचय आपण मागील ब्लॉगमध्ये करून घेतला तेव्हा हे कथानक सुभाष व उदयन या दोन भावांपासून सुरू होत असले तरी उदयनच्या पोलिसांकडून झालेल्या हत्येनंतर कथानक वळण घेते आणि सुभाष व गौरी या व्यक्तिरेखांचे जीवनपट उलगडत जाते हे आपण पाहिले.खरं तर असं म्हणता येईल की उदयनची हत्या गौरीच्या आयुष्याला जो हादरा देते त्याने आणि सुभाषने तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन तिला अमेरिकेत आणल्याने संपूर्ण कथानकाला कलाटणी मिळाली आहे.किंबहुना गौरीचा विशिष्ट स्वभाव ,तिच्या आयुष्याला उदयनच्या हत्येमुळे बसलेला हादरा आणि त्यामुळे स्वभावात आलेला निष्प्रेम कोरडेपणाचा परिणाम सुभाष आणि बेला या दोघांनाही भोगावा लागला आहे असे म्हणता येईल.गौरीने सुभाष व बेलावर अन्याय केला आहे असे सकृतदर्शनी कोणालाही वाटेल.पण लेखिकेला खरंच तसे म्हणायचे आहे का हेच कथनाच्या विश्लेषणातून शोधता येईल.

लेखिकेने केलेले कथानकाचे विभाजन पहाताना विभाग ४ आणि ७ अन्य प्रकरणांपेक्षा मोठे दिसतात. नेमक्या याच विभागांमध्ये गौरी या व्यक्तिरेखेत झालेल्या परिवर्तनाला कथकाने केंद्रस्थानी ठेवले आहे हे लक्षात येते. गौरी ही मूळातच अंतर्मुख व्यक्तिरेखा आहे. आई-वडिलांपासून ती लहानपणापासून दूर राहिली आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या प्रेमाला पारखी झाली आहे. उदयन तिच्यात तारूण्यसुलभ आकर्षण निर्माण करतो आणि भावनेच्या भरात ती त्याच्याशी प्रेमविवाह करते.त्याच्यासोबत नक्षलवादी चळवळीचे थोडे कामही करते. तिच्या आयुष्यात तिला प्रेम आणि एक ओळख उदयननेच दिली आहे. पण त्याचीच हत्या झाल्याने गौरी अंतर्बाह्य बदलून गेलेली दिसते.

गौरी ही तत्वज्ञानाची अभ्यासक आहे. उदयनची आणि तिची ओळख होते तेव्हा तो तिला तत्वज्ञान जीवनाशी जुळवून कसे घेता येते, समर्पक का वाटते असा प्रश्न विचारतो.तेव्हा ती म्हणते प्लेटोने म्हटले आहे “तत्वज्ञानाचा उद्देश माणसाला त्याने मरावे कसे हे शिकवण्याचा आहे “.जीवन आणि मरणाचा गांभिर्याने विचार करणारी, त्यावर चिंतन करणारी अशी गौरी ही व्यक्तिरेखा आहे.

कादंबरीच्या तिसऱ्या विभागात कथक गौरीबद्दल अधिक माहिती देतो. तो म्हणतो –

“ती जणू काळाचा नकाशा मनात घेऊनच जन्माला आली होती ….तिच्या मनात सगळ्यात ठसठसशीत प्रतिमा काळाचीच होती. भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीची. क्षितिज जे तिला दिशा दाखवते आहे , ज्यात ती आहे त्याची प्रतिमा. उजवीकडे नजिकचा भूतकाळ होता, ज्यात ती उदयनला भेटली आणि तत्पूर्वीचा उदयनच्या ओळखीपूर्वीचा काळ. तिचा जन्म १९४८ मधील होता आणि त्याआधी अनेक शतके उलटली होती.डावीकडे तिचा भविष्यकाळ होता. ज्यात अखेरच्या बिंदूवर तिचा मृत्यू निश्चितपणे होता. नऊ महिन्यांपेक्षा कमी काळात एक मुल ती जन्माला घालणार होती. त्या जीवाचे श्वासोश्वास तिच्या गर्भात सुरू झाले होते. हळूहळू त्या जीवाची रेषा भविष्यात पुढे सरकताना तिला दिसत होती. पण उदयनची जीवनरेखा जिची सोबत तिने कायम गृहीत धरली होती ती आता तिला सोबत करणार नव्हती.ऑक्टोबर १९७१ मध्ये ती रेषा संपली होती. ही जाणिव तिच्या मनाला बधिर थडगे बनवणारी होती “

चौथ्या विभागात गौरी अमेरिकेत ऱ्होड आयलंडला येते त्यावेळी तिच्या मनःस्थितीबद्दल कथक काय म्हणतो ते लक्षात घेऊ. विमानातून अमेरिकेच्या भूमीवर उतरल्यावर , सुभाषबरोबर गाडीतून त्याच्या घराकडे जाताना गौरीला तिच्या उदरातील गर्भाची हालचाल जाणवते. तिला वाटते –

“ जणू काही भूत आहे पोटात. जसा उदयन होता. हे मुल त्याचीच आवृत्ती आहे. एका अर्थाने दोघेही आहेत आणि नाहीतही. दोन्ही तिच्या आत खोल. ती या गोष्टीकडे अविश्वसनीय असल्यासारखे पाहू लागली.जसं ती उदयन आता नाही याकडेही अविश्वासाने पहात होती. तो फक्त कलकत्त्यातूनच नाही तर या जगातूनच हरवला आहे यावर तिचा विश्वास नव्हता.” 

सुभाषबरोबर गाडीतून ऱ्होड आयलंडला जाताना वाटेत दिसणाऱ्या प्रदेशाकडे गौरी पहात होती. तिच्यासाठी सगळे नवीनच होते.त्याबद्दल कथक म्हणतो-

“विमानात वेळ जुळणारी नव्हती पण तेवढी एकच गोष्ट वेगळी होती. अवकाश बदलले नव्हते.  आपण प्रवासात आहोत याची जाणीव तिला होती. ती अनेक आपापल्या मुक्कामावर पोहचण्याची वाट पाहणाऱ्या  प्रवाशांसोबत एकाच जागी जखडून बसली होती. बहुतेक सगळे गौरीप्रमाणेच अशा एका मुक्त वातावरणात जाणार होते जे त्यांचे स्वतःचे नव्हते.” 

 घरी पोहोचल्यावर सुभाषने गौरीला त्याची झोपण्याची खोली देऊ केली होती आणि स्वतःचे बस्तान दिवाणखान्यात हलवले होते. तो सकाळी उठून स्वतःचा नाश्ता करून,जेवणाचा डबा भरून घेऊन निघून गेला होता. त्याच्या या वागण्याकडे पाहताना गौरीला काय वाटले ते सांगताना कथक म्हणतो –

“तिला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल ती कृतज्ञ होती आणि आश्चर्यचकीतही होती. उदयनला क्रांती हवी होती पण घरी त्याला सगळ्यांकडून सेवेची अपेक्षा होती. जेवायला तो येऊन बसत असे एवढंच. गौरी किंवा त्याची आई ताट वाढून कधी ठेवतील याची तो वाट पाहात असे.”

सुभाषने तिच्या स्वातंत्र्याला दिलेली मान्यता गौरीला जाणवत होती. उदयनची बायको झाल्यावर तिला आपला आवाज कोणीतरी ऐकते आहे असे वाटले होते. सुभाषशी लग्न करण्याचा आणि अमेरिकेत येण्याचा हिशोबी आणि तरीही उत्स्फुर्त निर्णय तिच्यासाठी खूपच टोकाचा होता.त्यामुळे झालेल्या गौरीच्या मनःस्थितीबद्दल कथक म्हणतो-

“आणि तरी उदयन गेल्यामुळे सगळे काही शक्य वाटत होते.जीवन बांधून ठेवणारे तंतू आता नव्हते. त्यांचे नसणे तिला काहीसे अपरिक्व अवस्थेत, निकराने सुभाषशी बांधून घ्यायला लावणारे होते. तिला टॉलिगंज सोडायचे होते. आपल्या आयुष्यातील घटना विसरायच्या होत्या. आणि त्याने एक शक्यता तिच्या समोर ठेवली होती. मनात मागे कुठेतरी तिला वाटत होते की आपण सुभाषवर प्रेम करू दुसऱ्या कशामुळे नाही तरी निदान कृतज्ञतेमुळे ते होईल.”  

कथानकाच्या ओघात आपल्याला लक्षात येते की गौरी सुभाषवर प्रेम करू शकली नव्हती आणि बेलावरही तिला प्रेम करता आलेले नव्हते. उदयनला ती आपल्या मनातून काढून टाकू शकली नव्हती. मिळालेल्या स्वातंत्र्याचा मात्र तिने पुरेपूर उपयोग करून घेतला होता आणि स्वतःची तत्वज्ञानाची प्राध्यापक ही ओळख तिने तिच्या मेहनतीने, जिद्दीने कमावली होती.कोणाची तरी बायको वा कोणाची तरी आई यापेक्षा ती स्वतंत्र ओळख तिला अधिक शाश्वत वाटली होती. पण त्याने खरंच ती मूळ ओळख विसरू शकली होती का ?

कालांतराने मात्र किमान बेला आपल्याला परत भेटावी अशी तीव्र ओढ तिला वाटू लागली. इंटरनेटवरून फेसबुकच्या आधारे गौरीने बेलाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. बेलाबद्दल सुभाषला विचारण्याची हिंमत गौरीकडे नव्हती. इंटरनेटवरून तिने उदयनबद्दल काही माहिती मिळते का ते शोधण्याचाही प्रयत्न केला होता. पण काही हाती लागले नव्हते. त्यावेळी गौरीला काय वाटले ते सांगताना कथक म्हणतो –

“सर्व माहिती होती, मते होती पण त्याच्या सहभागाबद्दल, कामगिरीबद्दल कुठे साधा उल्लेखही नव्हता. त्याच्यासारखे शेकडो असतील तेव्हा कलकत्त्यात. पायदळ ज्यांनी अनामिक राहून ध्येयप्रवणतेने कामगिरी पार पाडली होती. त्याचा सहभाग नोंदवला गेला नव्हता. त्याला मिळालेली शिक्षा त्यावेळी सर्वसाधारण होती.”

उदयनप्रमाणे बेलाचीही कुठेही नोंद गौरीला इंटरनेटवर दिसली नव्हती. परत परत ती शोधत असे पण तिला बेलाचा ठावठिकाणा कळला नव्हता. तिच्या या अस्वस्थ आट्यापिट्याबद्दल कथक म्हणतो-

“जेवढ्या वेळा गौरी बेलाचा शोध सुरू करे तेवढ्या वेळा तो फसला होता. तिला माहीत होते की आता तिलाच प्रयत्न करावा लागणार होता. नाहीतर बेला येणार नव्हती. सुभाषला विचारण्याचे धाडस तिच्याकडे नव्हते. तिचे प्रयत्न तिच्या मनाची अवस्था एखाद्या नुकत्याच पकडलेल्या आणि तडफडणाऱ्या माशासारखी करून सोडत. बेलाचे नाव इंटरनेटवर टाईप करताना मनात असलेली लहानशी आशा आणि तिच्याबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने विफल होई.”

 असाच प्रयत्न गौरी नक्षलबारी चळवळीचा नेता कनु सन्याल याची माहिती शोधण्यासाठीही करते. इंटरनेटवर कनू सन्यालने अखेरीस विपन्नावस्थेत आत्महत्या केली हे ती वाचते, त्याचे फोटो पाहते तेव्हा ती अस्वस्थ होते. ज्या नेत्याचे भाषण ऐकायला हजारो तरूण मुले येत आणि ज्याने आंदोलनाची हाक दिली की उदयनसारखे कित्येक तरूण मरणाला सामोरे जात त्याची अशी अखेर होणे गौरीच्या मनात अनेक प्रश्न उभे करते.कथक म्हणतो-

“तिच्या मनात अनेक भावनांचा कल्लोळ उठला. आपल्या भावनांचे ओझे सहन होईना आणि मनातील पोकळीही तिला असह्य झाली.” 

उदयन गेल्यानंतर आणि सुभाषशी पुनर्विवाह झाल्यानंतर गौरी एका दुपारी जाधवपूरला ती जिथे शिकवणी घेत असे त्या गल्लीत जाते.ज्या पोलिसावर तिने उदयनच्या ठेवणीवरून पाळत ठेवली होती त्याचे घर अंदाजाने शोधत ती त्या घरासमोर उभी रहाते. आपल्या वडिलांबरोबर रोज हसतखेळत शाळेतून परतणारा मुलगा तिला दाराजवळ दिसतो. आता त्याच्या चेहऱ्यावर उदासी आहे, त्याचे कपडेही विरलेले आहेत. त्याची आई आता पांढऱ्या साडीत आहे. वैधव्याची अवकळा तिच्या चेहऱ्यावर गौरीला दिसते. ती अवकळा तिने काही दिवसांपूर्वी अनुभवलेली असते. त्या आई आणि मुलाकडे पहाताना गौरीच्या मनात काय विचार येतात त्याबद्दल कथक सांगतो –

“ ती पुढे गेली. तिला माहित होते की ती बाई आणि मुलगा आपल्याला लगेचच विसरून जातील. एखादा  पतंग  चुकून खिडकीतून आत यावा नी परत पंख फडफडवत बाहेर जावा तसे गौरीचे येणे आणि निघून जाणे त्या दोघांसाठी होते.गौरीप्रमाणे ते त्या घटनेत अडकून पडणार नव्हते की परत परत मागे वळून त्या घटनेकडे पहाणार नव्हते.खरं तर तिचा केवढा मोठा सहभाग त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखद प्रसंगात होता. पण ती त्यांच्या मनातून निसटून जाणार होती.”

गौरीचे भूतकाळात अडकून रहाणे हीच जणू  दलदलीने भरलेली खोलगट पाणथळ म्हणजेच इंग्रजीत ‘लोलॅंड’ आहे असे लेखिकेला सुचवायचे असावे. त्याअर्थाने कादंबरीचे शीर्षक यथार्थ आहे.

 एकंदर, ‘दी लोलॅंड’ या कादंबरीच्या कथनातून हे जाणवते की कथकाने पोलिसांनी उदयनला गोळ्या घालून ठार करणे हा प्रसंग केंद्रवर्ती ठेवला आहे आणि या एका प्रसंगामुळे गौरीचे बदलत जाणे, त्याचा तिच्या सहवासातील अन्य व्यक्तींवरही परिणाम होणे हे संपूर्ण कथानकातून  कथकाला दाखवायचे आहे. गौरीने उदयनला पोलिसांनी गोळ्या घातल्या तो  प्रसंग प्रत्यक्ष पाहिला आहे, उदयनने ज्या पोलिसाला भर रस्त्यात मारले त्याच्या रोजच्या दिनक्रमाची माहिती आपणच उदयनला दिली याची खंत गौरीला आहे. आपल्यामुळे एक मुलगा अनाथ झाला, एक बाई विधवा झाली असे शल्य गौरीच्या मनात आहे. उदयनलाही आपण पोलिसाची हत्या करून नेमके काय मिळवले असा प्रश्न ती हत्या करून आल्यानंतर आणि अगदी मृत्युसमयीही पडला आहे.आपल्या व्यक्तीगत हिंसक कृत्यातून क्रांती कशी घडणार याबद्दल तो संभ्रमात आहे.आपण जे केले त्यामुळे आपण कुणाचा बाप व्हायला लायक नाही असेही उदयन गौरीला म्हणाला आहे.उदयनकडून घडलेली हिंसा, त्यात आपला असणारा सहभाग हा भूतकाळ गौरी कधीच विसरू शकलेली नाही. एकूण नक्षलवादी चळवळीची व्यर्थता गौरीला कनु सन्यालच्या आत्महत्येबद्दल कळल्यावरही जाणवली आहे.गौरीचे व्यक्तिगत आयुष्य  ती सुभाषबरोबर लग्न करून अमेरिकेत आल्याने बदलले तरी वैवाहिक आयुष्यातील सुखे ती उपभोगू शकत नाही. बेलाचे संगोपन करतानाही तिला प्रेमळ आई होता येत नाही.जणू उदयनच्या मृत्यूनंतर गौरी प्रेम करणंच विसरून गेली आहे.तिच्या मनात खोलवर साचलेली भूतकाळाची दलदल तिला आणि पर्यायाने सुभाष, बेला यांनाही एकाकीपणा,दुःख देणारी ठरली आहे असे कथक सुचवतो.

‘दी लोलॅंड’ या कादंबरीच्या कथनाचे हे विश्लेषण वाचून तुम्हाला ही कादंबरी मूळातून वाचण्याची प्रेरणा मिळो ! पुढील ब्लॉगमध्ये चित्रा बॅनर्जी देवकारूणी या भारतीय वंशाच्या इंग्रजी कादंबरीकार स्त्रीचे चरित्र आणि साहित्यिक कामगिरी याचा परिचय आपण करून घेणार आहोत.

                                                                                    –गीता मांजरेकर

——————————————————————————————————————————————————————————————–

2 प्रतिसाद

  1. झुम्पा लाहिरी यांच्या ‘ द लोलँड’ या कादंबरीच्या कथानकातील पात्रे मला महत्वाकांक्षी वाटतात… प्रत्येकजण मनाशी आशा, आकांक्षा बाळगत जगतोय, स्वतःच्या भावनांशी झुंझताना दिसतोय.. जिथे हे कथानक वाचून मला त्यातील बराचसा भाग माझ्यासाठी माझ्या आठवणींना उजाळा देणारा होता ..त्यामुळे हे पुस्तक मी नक्कीच मुळापासून वाचणार आहे..

    Like

    1. नाही या व्यक्तिरेखा महत्त्वाकांक्षी नाहीत.गौरी तिच्या भूतकाळात अडकून पडली आहे.त्यामुळे तिचा स्वभाव कोरडा झाला आहे.त्याचे परिणाम सुभाष व बेलाला भोगावे लागतात.

      Like

यावर आपले मत नोंदवा