मागील ब्लॉगमध्ये आपण बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या भारतीय इंग्रजी कादंबरीकार अरूंधती रॉय यांचा एक व्यक्ती म्हणून आणि साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ती म्हणून परिचय करून घेतला. आज आपण अरूंधती रॉय यांनी लिहिलेल्या ज्या कादंबरीला प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक मिळाले त्या –‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे समजून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही इंग्रजी कादंबरी ३३९ पृष्ठांची भली भक्कम कादंबरी आहे.मी ही कादंबरी मूळातूनच वाचू लागले होते पण कादंबरी अर्धी वाचून झाली असतानाच मला या कादंबरीचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला मराठी अनुवाद उपलब्ध झाला. मूळ कादंबरीचे सत्व पकडण्यात अनुवाद यशस्वी झाला आहे.त्यामुळे मी हा मराठी अनुवाद वाचूनच आजचा ब्लॉग लिहिते आहे.

अरूंधती रॉय यांनी लिहिलेली ही पहिलीच कादंबरी असून ती  १९९७ मध्ये प्रकाशित झाली.आंतरराष्ट्रीय पातळीवर ही कादंबरी नावाजली गेली आहे.या कादंबरीसंदर्भात देश-विदेशातील मान्यवर प्रकाशकांनी, नियतकालिकांतील समीक्षकांनी गौरवोद्गार काढले आहेत.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या कथानकाचा प्रत्यक्ष काळ अवघ्या तीन-चार दिवसांचा असावा.राहेल भारतात येते. आयमेनम गावातील जुन्या घरी ती आपला जुळा भाऊ एस्थाला भेटायला आली आहे. पण ती आल्यापासून एस्था तिच्याशी एक शब्दही बोललेला नाही. पण काही दिवसांनी गावातल्या देवळात कथकली नृत्य-नाट्य पाहून परत आल्यावर एस्थाचा बांध फुटतो . राहेल व एस्था दोघेही परस्परांच्या कुशीत शिरून रडू लागतात एवढाच खरं तर प्रत्यक्ष वर्तमान ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीत आहे.परंतु कादंबरी सतत भूतकाळात जात असल्याने हा काळ सुमारे पन्नास वर्षे मागे जातो. त्यातही साधारण तेवीस वर्षांच्या कालखंडात काय घडले त्याचे तपशील लेखिका अगदी थोडक्यात देते.तेवीस वर्षांपूर्वीच्या बारा पंधरा वर्षांच्या कालखंडातील देखील एक वर्ष आणि त्यातीलही साधारण पंधरा दिवस हेच कादंबरीच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आहेत. अतिशय कसबीपणाने अरूंधती रॉय यांनी कादंबरीचे कथानक काळाच्या अक्षावर मागे-पुढे नेले आहे,काही घटनांवर रेंगाळत ठेवले आहे आणि भावोत्कट केले आहे. तरल काव्यात्मता आणि  नाट्यपूर्णता ही या कादंबरीच्या कथानकाची वैशिष्ट्ये ठरतील.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे कथन तृतीयपुरूषी आहे. कादंबरीचा दृष्टीक्षेत्र नियंत्रक राहेल ही एकतीस वर्षांची मुलगी ही आहे.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे अवकाश प्रामुख्याने केरळमधील कोचीनजवळच्या आयमेनम  या खेड्यातले आहे.या खेड्याजवळून वहाणारी मीनाचल नदी हा या अवकाशाचा केंद्रबिंदू आहे.नदीच्या एका तीरावर असणारा  ‘आयमेनम हाऊस’ हा जुना बंगला, तिथून जवळच असणारी बंगला मालकिणीची ‘पॅरडाईज पिकल ऍंड प्रिझर्वेटिव्ज’ ही फॅक्टरी आणि या फॅक्टरीत काम करणाऱ्या अस्पृश्य,हरहुन्नरी, कसबी कामगाराची -वेलुथाची झोपडी हा बहुतेक घटनांचा अवकाश आहे.तर नदीच्या पलीकडच्या तीरावर असणारे रबराच्या झाडांच्या जंगलात लपलेले एका आफ्रिकन स्थलांतरीताचे आता बेवारस ठरलेले,  जुने, पडके घर ज्याला ‘हिस्ट्री हाऊस’ असे नाव गावकऱ्यांनी दिले आहे तेही काही घटनांचे अवकाश झाले आहे.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या कथानकाची सुरूवात राहेल आयमेनम गावात तिच्या पणजोबांनी बांधलेल्या बंगल्यात परत आली आहे इथून होते.राहेल अमेरिकेतून आली आहे. तिच्या आईच्या आत्याने म्हणजे बेबी(नवोमी) कोच्चमा हिने पत्र पाठवून तिला कळवले आहे की एस्था( राहेलचा जुळा भाऊ) कलकत्त्याहून आयमेनम गावात परत आला आहे.राहेल आपल्या या जुळ्या भावाला तब्बल तेवीस वर्षांत भेटलेली नाही. मनाने तो तिच्या अंतरंगात खोल रूतलेला आहे. पण या दोघा जुळ्या भावंडांची प्रत्यक्ष भेट मात्र तेवीस वर्षांत झालेलीच नाही.वयाच्या सातव्या वर्षी ते दोघे एकमेकांपासून दूर गेले आहेत आणि आता वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांची पुन्हा भेट होते आहे.

तेवीस वर्षांपूर्वी राहेल,एस्था आणि त्यांची आई अम्मु यांच्या आयुष्यात असे काही वादळ घडले होते की ज्यामुळे आधी एस्था त्या दोघींपासून दुरावला . मग अम्मू केवळ एकतिसाव्या वर्षी निधन पावली आणि राहेल शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आयमेनम मध्ये राहून नंतर मात्र आठ वर्ष दिल्लीत आणि नंतर लॅरी मॅककॅस्लीनशी विवाह करून थेट अमेरिकेत पोहोचली होती.लॅरीशी तिचा विवाह फार काळ टिकला नसला तरी राहेल अमेरिकेतच लहानमोठ्या नोकऱ्या करत तग धरून राहिली होती. आता मात्र बेबी कोच्चमाचे पत्र आणि एस्थाचे आयमेनममध्ये आगमन झाल्याचे वृत्त कळताच राहेल नोकरी सोडून आयमेनममध्ये परतली होती.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’चे  कथानक एका बाजूला राहेल आणि एस्थाच्या आयमेनममधील पुनरागमनानंतरच्या दिवसांचे, त्यातील घटनांचे वर्णन करत राहते. तर दुसऱ्या बाजूला या जुळ्या मुलांच्या भूतकाळात म्हणजे साधारण तीस वर्षांपूर्वी घडलेल्या आणि त्यांच्या ताटातुटीला कारण ठरलेल्या घटनेकडे हळूहळू वाचकांना घेऊन जाते.  काळाच्या अक्षावर सतत पुढे-मागे जाणारे हे कथानक अरूंधती रॉय यांनी फार कसबीपणे विणले आहे. अम्मु,एस्था-राहेल यांच्या आयुष्याला पार उद्वस्थ करणाऱ्या घटनांची चाहुल लेखिका अधूमधून देत रहाते पण त्या घटना तपशीलवारपणे सांगते मात्र कादंबरीच्या अगदी अखेरीस  येणाऱ्या विलक्षण वेगवान पण तेवढ्याच काव्यात्म कथनातून.

एस्था आणि राहेल यांच्या आईचे आजोबा म्हणजे रेव्हरंड इ. जॉन आयपे. हे आयमेनममधील सिरीयन ख्रिश्चन समाजाच्या चर्चमध्ये धर्मगुरू होते.त्यांनीच सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी, ब्रिटीशांच्या काळात ‘आयमेनम हाऊस’ हा बंगला एका टेकडीवर बांधला होता.रेव्हरंड आयपे यांना दोन मुले. एक म्हणजे बेनन जॉन आयपे आणि दुसरी मुलगी नवोमी (बेबी) कोच्चम्मा.

बेबी कोच्चम्माने धर्मगुरू (नन) व्हावे म्हणून तशाप्रकारचे धार्मिक शिक्षण देणाऱ्या निवासी शाळेत तिला तिच्या वडिलांनी घातलेले असते. पण तिचे मन काही तिथे रमत नाही. आयमेनममध्ये असताना वडिलांच्या भेटीला अधूमधून येणाऱ्या तरूण फादर मुलीगन यांच्यात बेबी कोच्चमा हिचा जीव अडकलेला असतो. पण ते फादर तिच्या प्रेमाचा स्वीकार कसा करणार ?अखेरीस बेबी कोच्चमाला नन व्हायचे नाही हे लक्षात येऊन तिच्या वडिलांनी तिला शाळेतून काढून पुन्हा आयमेनमला आणलेले असते.पुढे ती ऑरनमेंटल गार्डनिंग या विषयात पदविका मिळवून बंगल्याच्या बागेतच नवनवीन झाडे लावून प्रयोग करत रहाते.मनातून मात्र ती असमाधानीच असते.आत्मप्रीती हा तिच्या स्वभावाचा विशेष आहे.

बेनन आयपे हे रेव्हरंड आयपे यांचे सुपुत्र पुढे परदेशात उच्चशिक्षण घेऊन  किटकशास्त्रज्ञ झाले होते .ते दिल्ली येथील पुसा इन्सटिट्यूट या ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या कृषीसंशोधन संस्थेत आयुष्यभर नोकरी करून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते आपल्या आयमेनमच्या बंगल्यात परत आले.बेनन यांनी तरूणपणी आयमेनममध्ये असतानाच एक नवीन जातीचा मॉथ(एकप्रकारचे फुलपाखरू) शोधलेला असतो. परंतु ते नोकरीत असताना त्यांनी लावलेल्या या शोधाला मान्यता मिळालेली नसते. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या प्रयोगशाळेतील सहकाऱ्याला या शोधाचे श्रेय दिले गेलेले असते. त्यामुळे बेनन कायम असंतुष्ट असत. त्यांचा हा राग ते त्यांच्या पत्नीवर काढत रहात.बेनन आयपे यांची पत्नी ते युरोपात उच्चशिक्षण घेत असताना व्हायोलीन वाजवायला शिकली होती. पण तिला शिकवणाऱ्या शिक्षकाने तिच्या कलगुणांची प्रशंसा केल्यावर बेनन यांनी तिची व्हायोलीन शिकवणी बंद केलेली असते. आयमेनममध्ये रहायला आल्यावर बेनन आयपे यांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या पत्नीने लोणची बनवण्याचा व विकण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यासाठी त्यांना बेनन यांचा मारही खावा लागला होता.

 बेनन आयपेंचा मोठा मुलगा चाको हा ऱ्होडस स्कॉलर म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता तर त्यांची धाकटी मुलगी( एस्था-राहेलची अम्मु) दिल्लीत शाळा शिक्षण संपवून आई- वडिलांबरोबर आयमेनमला परत आली होती.आयमेनममध्ये तिचे लग्न जुळवण्याची खटपट चालली असतानाच तिची एक आत्या तिला कलकत्त्याला बोलावते. कलकत्त्यात एका नातेवाईकाच्या लग्नात या मुलीची एका बंगाली तरूणाशी ओळख होते.हा बंगाली तरूण आसाममधील चहाच्या बागेचा व्यवस्थापक असतो.तो बेनन आयपेंच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालतो. फारसा विचार न करता ती होकार देते आणि कलकत्त्यात बेनन आणि त्यांच्या पत्नीच्या अनुपस्थितीतच तिचे लग्न पार पडते. लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर आसामच्या चहा मळ्यावर रहायला जाते. तिथे तिच्या हळूहळू लक्षात येते की आपला नवरा दारूच्या व्यसनात बुडालेला आहे. पण तोपर्यंत ती गरोदर राहिलेली असते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ती आपल्या जुळ्या मुलांना जन्म देते. ही मुले म्हणजेच एस्था आणि राहेल.मुले जेमतेम दोन वर्षांची असतानाच अम्मुला तिच्या नवऱ्याने सांगितलेले असते की जर त्याची नोकरी जाऊ नये असे तिला वाटत असेल तर तिने त्याच्या ब्रिटीश मालकाच्या शारीर वासना शमवाव्यात. नवऱ्याची ही मागणी ऐकून चवताळलेली अम्मू नवऱ्याला नकार देते तेव्हा त्याच्याकडून मारहाण तिला सहन करावी लागली. अम्मु नाइलाजाने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेते आणि  आपल्या जुळ्या मुलांना घेऊन परत आपल्या वडिलांकडे आयमेनमला निघून येते.

एस्था आणि राहेलची बालपणीची सुमारे पाच वर्षे आयमेनममध्ये फार मजेत गेली.सुंदर निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे खेळण्या-बागडण्यात आणि आईच्या,वेलुथाच्या प्रेमळ सहवासात गेलेली ही वर्षे हा त्यांच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा होता.मुलांनी इंग्रजी चांगले शिकावे यासाठी त्यांची अम्मु वेगवेगळे शिक्षक नेमते पण मुले त्या शिक्षकांना दाद देत नाहीत. ते आपली स्वतःचीच एक भाषा बनवून आपापसात बोलून इतरांना गोंधळवून टाकण्याची मजा लुटतात.

याच काळात त्यांच्या आजीच्या लोणच्याच्या कारखान्यात सुतारकाम, रंगकाम आणि अशाप्रकारची अनेक कामे करणारा कारागीर वेलुथा हा त्यांचा दोस्त,मार्गदर्शक झाला होता.त्यानेच या मुलांना नदीत पोहणे,मासेमारी करणे, होडी वल्हवणे शिकवले होते. दरम्यान त्यांचे आजोबा बेनन आयपे यांचे निधन झाले. मामा चाको जो ब्रिटनमध्ये ऱ्होडस स्कॉलर होता तो शिक्षण अर्धवट सोडून आयमेनमला परतला. त्याने इंग्लंडमध्ये असताना कॉफी शॉपमध्ये भेटलेल्या मार्गारेट नावाच्या वेटरेसशी लग्न केले होते आणि त्याला सोफी मॉल नावाची मुलगीही होती.पण चाकोचा अव्यवस्थितपणा, बेजबाबदारपणाला कंटाळून मार्गारेटने त्याच्याशी घटस्फोट घेऊन दुसऱ्या एकाशी लग्न केले होते.चाकोने भारतात परतल्यावर एखादे वर्ष मद्रासला नोकरी केली पण नंतर मात्र तो लोणच्याच्या कारखान्याला अद्ययावत बनवून लोणच्याचा व्यापार करायचे ठरवून पुन्हा आयमेनमला आला होता.कारखान्याचे यांत्रिकीकरण करण्यासाठी चाकोने बँकेकडून कर्ज घेतले होते. आईच्या लोणच्याच्या कारखान्यावर त्याने कब्जा मिळवला होता.

एस्था आणि राहेलला चाको मामाकडून वडिलांच्या प्रेमाची अपेक्षा असते पण चाको तसा प्रेमळ नसतो.तो आपल्या भाच्यांची चेष्टा-मस्करी करतो पण त्यांच्या मनातील असुरक्षितता घालवू शकत नाही.अम्मुला म्हणजे धाकट्या बहिणालाही तो हसतहसत ही जाणीव देत राहतो की त्यांच्या आजोबांनी बांधलेला बंगला आणि आईने सुरू केलेला लोणच्याचा कारखाना या मालमत्तेत तिला कोणताही हिस्सा मिळणार नाही.

चाको आपल्या शारीर गरजा पूर्ण करण्यासाठी कारखान्यातील कामगार बायकांशी संबंध ठेवतो. त्याचे हे वागणे त्याच्या आईने स्वीकारलेले असते. चाकोच्या खोलीला बाहेरून एक दार तिने स्वतःच काढून दिलेले असते आणि चाकोच्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना ती काही रक्कम देत असते.

चाको भारतात येऊन दोन-चार वर्षे झाली असतानाच त्याची माजी पत्नी मार्गारेटने त्याला कळवले होते की तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. चाकोने मार्गारेटला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मुलीला म्हणजे सोफी मॉलला घेऊन आयमेनमला येण्याचे आमंत्रण दिले होते.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घटना चाकोची बायको मार्गारेट व मुलगी सोफी मॉल आयमेनमला येणार असतात तिथेच सुरू होतात. त्या दोघींना घरी आणायला अम्मु, एस्था-राहेल आणि बेबी कोच्चमा चाकोच्या गाडीतून कोचिन विमानतळाकडे निघालेले असतात. विमान पहाटे येणार असते. त्यामुळे आदल्या दिवशीच कोचीनला जाऊन ‘साऊंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट पाहू, नंतर हॉटेलवर राहू आणि मग दुसऱ्या दिवशी मार्गारेट व सोफीला घेऊन परत आयमेनमला येऊ असा बेत चाकोने आखलेला असतो. ब्रिटीश मामी आणि मामेबहीण यांच्याशी एस्था-राहेलने कसे इंग्रजीतच बोलावे, कोणत्या रितीभाती पाळाव्यात याचे धडे अम्मु, बेबी कोच्चमा यांनी त्यांना दिलेले असतात. मनमुक्तपणे वाढणाऱ्या जुळ्या मुलांना हे शिस्त लावणं आवडलेल नसतं.सोफी मॉलविषयी एकप्रकारची असुया आणि स्वतःविषयी न्यूनगंड जुळ्या मुलांच्या मनात निर्माण झालेला असतो.

कोचिनला जाण्याच्या वाटेवर कम्युनिस्ट संघटनेने काढलेल्या कामगारांच्या मोर्चात चाकोची गाडी अडकते.चाको हा लोणची बनवण्याचा कारखाना चालवणारा म्हणजे भांडवलदारच. त्यामुळे कामगार मोर्चातील लोक चाकोलाही आपला शत्रू मानून घोषणा देतात.विशेषतः त्यांच्या मोटारीवर केळी फेकतात, मागच्या सिटवर बसलेल्या बेबी कोच्चम्माच्या हातात लाल झेंडा खोचतात.तिची चेष्टा करतात.याच कामगारांच्या गर्दीत घोषणा देणारा, हातात लाल बावटा घेऊन चाललेला वेलुथा राहेलच्या नजरेला पडतो. ती जोरात त्याला हाक मारते. पण तो ओळख दाखवत नाही.मोर्चात अडकल्याने आणि रेल्वे फाटक बराच काळ बंद मिळाल्याने चाकोला कोचिनमध्ये पोहचायला उशीर होतो. ‘साऊंड ऑफ म्युझिक’ चित्रपट सुरू झाल्यानंतर अम्मु आणि बेबी कोच्चमा मुलांना घेऊन थिएटरवर पोहचतात. कसेबसे सिटमधून वाट काढत त्यांना आपल्या जागा शोधाव्या लागतात. सिटवर बसल्यावर एस्था चित्रपटात चालू असलेले गाणे जोरात म्हणू लागतो. कारण त्याने हा चित्रपट यापूर्वी दोनदा पाहिलेला असतो. एस्थाचे गाणे म्हणणे प्रेक्षकांना व्यत्यय आणणारे ठरू लागते.त्यामुळे अम्मु चिडते. शेवटी एस्था चित्रपटगृहाबाहेर जाऊन तिथल्या कॅन्टिनजवळ उभा राहून गाणे म्हणू लागतो. कॅन्टीनवाला माणूस एस्थाला थंड पेयाचे आमिष दाखवून त्याच्याकरवी आपल्या लैंगिक वासना शमवून घेतो. एस्थाला हा अनुभव इतका किळसवाणा वाटतो की तो उलटी करतो. चित्रपट अर्धवट सोडून अम्मु आणि मुलं बाहेर पडतात.काय झाले ते एस्था अम्मुला सांगतच नाही. राहेलला मात्र काहीतरी विचित्र एस्थाच्या बाबतीत झाले असावे याची चाहुल लागते.

दुसऱ्या दिवशी चाकोची माजी पत्नी मार्गारेट व त्याची मुलगी सोफी मॉल यांचे स्वागत करायला सगळेजण विमानतळावर जातात.विमानतळाच्या स्वागतकक्षात भयंकर गर्दी, कोलाहल सुरू असतो. सोफी मॉल येते पण एस्था-राहेल तिला पाहून बिचकतात, संकोचतात आणि त्यांना शिकवलेली स्वागताची वाक्ये बोलायचे विसरून जातात.पण कालांतराने गाडीतून प्रवास सुरू होतो तेव्हा एस्था-राहेल थोडे स्थिरावतात. आयमेनमला गेल्यावर मात्र आजीने सोफीच्या स्वागतासाठी व्हायोलीन वाजवणे, मोठा केक तयार करवून घेणे, खास जेवण ठेवणे हे सगळे पाहून मुलांना सोफी मॉलबद्दल असुया वाटते. आजवर त्यांचे असे कौतुक कोणीच केलेले नसते. सोफीचा स्वागत सोहळा चालू असताना एस्था लोणच्याच्या कारखान्यात जाऊन बसतो तर राहेल बागेत मुंग्या मारत बसते.दुसऱ्या दिवसापासून मात्र सोफी मॉल त्यांच्याशी जुळवून घेऊन त्यांच्या खेळांत, मस्तीत सामील होऊन जाते.त्यामुळे एस्था-राहेलच्या मनातील तिच्याबद्दलची असुयाही संपते.

सोफी मॉल आयमेनममध्ये येते त्याच सुमारास अंगणात आलेला वेलुथा अम्मुच्या मनात प्रेमाची वासना जागवतो. तशी ती या आधीपासूनच वेलुथाकडे आकर्षित झालेली असते. पण तिने कधीही मर्यादा सोडलेली नसते. मात्र मार्गारेट व सोफी मॉलच्या आगमनाच्या रात्री अम्मुला आपला एकटेपणा तीव्र वेदना देऊ लागतो. ती मध्यरात्री नदीकिनाऱ्यावर जाऊन बसते. तीच वेळ वेलुथाची पोहण्याची वेळ असते हे तिला माहीत असते.त्या रात्री वेलुथा आणि जुळ्या मुलांची अम्मु तीव्र वेगाने परस्परांजवळ येतात.प्रेमाची आस शमण्याऐवजी अधिकच उफाळते आणि पुढे रोजच अम्मु आणि वेलुथा रात्री-अपरात्री भेटू लागतात.सुमारे तेरा रात्री ते दोघे एकत्र येतात. पण एका रात्री वेलुथाच्या आंधळ्या बापाला काहीतरी संशय येतो. आणि तो घाबरून जातो. आपण अस्पृश्य आहोत, आपल्यावर आयपे कुटुंबाचे उपकार आहेत आणि आता आयपे कुटुंबातील मुलीशी आपला मुलगा शारीर संबंध ठेवतो आहे हे म्हणजे भयंकर पाप आहे असे वेलुथाच्या म्हाताऱ्या वडिलांना वाटते. तो घाबरून या गुन्ह्याबद्दल सांगायला चाकोच्या आईकडे येतो. गयावया करत तो जे सांगतो ते ऐकून ती म्हातारी बाई हादरून जाते. आपल्या मुलीमुळे आपल्या घरण्याची अब्रू धुळीला मिळणार याचे भय तिला वाटते. त्याचवेळी तिची नणंद बेबी कोच्चम्मा एक  बेत निश्चित करते. चाको आणि मार्गारेट परतीच्या विमानाचे तिकिट काढायला कोचिनला गेलेले असतात. त्यामुळे बेबी कोच्चमाच परिस्थिती हातात घेते. ती अम्मुला खोलीत बंद करून ठेवते आणि पोलिस ठाण्यावर जाऊन वेलुथाने आपल्या घरात शिरून तरूण अम्मुवर बलात्कार केला आहे अशी तक्रार  नोंदवते.एस्था-राहेल बाहेर हुंदडून घरात येतात तेव्हा त्यांना अम्मुला कुलुप घालून खोलीत बंद केलेले दिसते. ते तिला हाका मारू लागतात तेव्हा अम्मुला बाहेर काढले जाते. अम्मु सगळा राग मुलांवर काढून त्यांना ओरडते, चालते व्हा म्हणते. मुले मुकाट घरातून दूर निघून जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक छोटी होडी नदीकिनारी शोधलेली असते. वेलुथानेच त्यांना ती दुरूस्त करून दिलेली असते. त्या होडीत बसून आपण पलीकडच्या तीरावर जाऊ आणि तिथे असलेल्या ‘हिस्टरी होम’ नावाच्या पडक्या बंगल्यात जाऊन राहू असे मुलांनी ठरवलेले असते. तेवढ्यात सोफी मॉल त्यांना विनवणी करते की तिलाही होडीतून त्यांच्यासोबत यायचे आहे. जुळे तिला नको म्हणत असतानाही ती त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह धरते. ते मग तिलाही होडीत घेतात. दिवस पावसाचे, नदीच्या प्रवाहाला चांगलाच वेग आलेला असतो. पलीकडे जाताना होडी उलटते. एस्था-राहेल सराईतपणे पोहून पलीकडे पोहचतात पण सोफी मॉल मात्र नदीप्रवाहात वाहून जाते. एस्था-राहेल तिला खूप शोधतात पण ती मिळत नाही. शेवटी दोघेही दमुन हिस्टरी हाऊसच्या व्हरांड्यात झोपी जातात.

इथे इन्सपेक्टर मॅथ्यु वेलुथाबद्दल बेबी कोच्चमाने नोंदवलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी वेलुथाला शोधण्यासाठी त्याच्या झोपडीवर पोलिस पाठवतो. पण वेलुथा तिथे नसतो. तो कामासाठी दुसऱ्या गावी गेलेला असतो.त्याचा अपंग भाऊ एकटाच झोपडीत असतो. वेलुथा संध्याकाळी गावात परततो तेव्हा त्याला आपल्याला पोलिस शोधत असल्याचे कळते. आपली बाजू मांडण्यासाठी तो कम्युनिस्ट नेता नंबुद्रीपाद  यांच्याकडे जातो कारण तो कम्युनिस्ट युनियनचा सभासद असतो. पण त्यांच्याकडून काहीच मदत मिळत नाही कारण वेलुथा अस्पृश्य आहे आणि जे काही घडले आहे तो त्याचा व्यक्तिगत मामला आहे असे त्याला सांगितले जाते. वेलुथा त्या रात्री आपल्या झोपडीवर जाण्याऐवजी नदीपलीकडील ‘हिस्टरी होम’मध्ये आसरा घेतो. दुसऱ्या दिवशी तेथून बेपत्ता होण्याचा त्याचा बेत असतो. एस्था-राहेल तिथे आहेत हे त्याला कळत नाही.

रात्री खूप उशीरा इन्सपेक्टर मॅथ्यु आपल्या सहकाऱ्यांना घेऊन नदीपलीकडच्या जंगलातून हिस्टरी होमवर पोहचतो. तिथे त्यांना वेलुथा झोपलेला मिळतो. त्याची कोणतीही चौकशी न करताच इन्सपेक्टर आणि त्याचे सहकारी पोलिस त्याला बेदम मारहाण करतात. वेलुथाच्या विव्हळण्याच्या आवाजाने आणि पोलिसांच्या मारहाणीच्या आवाजाने एस्था-राहेल जागे होतात. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांना देव वाटणारा, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा वेलुथा घायाळ होऊन पडतो पण मुले त्याला वाचवू शकत नाहीत.पोलिस अर्धमेल्या झालेल्या वेलुथाला आणि एस्था-राहेलला कोठडीत घेऊन जातात.

रात्री चाको आणि मार्गारेट कोचिनहून परत येतात तेव्हा सोफी मॉल कुठे आहे ते त्यांना कळत नाही. मग तिघेही मुले दुपारपासूनच घरातून गायब आहेत हे त्यांना कळते. शोधाशोध सुरू होते पण मुलांचा पत्ता लागत नाही. दुसरे दिवशी सकाळीच एक कोळी सोफी मॉलचा मृतदेह नदीकाठी मिळाला आहे असे सांगत आयमेनम हाऊसवर येतो. एस्था-राहेल पोलिस कोठडीत असल्याचे कळते. बेबी कोच्चमाला पोलिस बोलावून घेतात.आता पोलिसांच्या लक्षात आलेले असते की बेबी कोच्चमाने नोंदवलेली तक्रार खरी नव्हती. आपण त्या तक्रारीचा शहानिशा न करताच वेलुथाला मारहाण केली आहे.बलात्कारीत स्त्री जोपर्यंत स्वतः तक्रार नोंदवत नाही तोपर्यंत अशी तक्रार नोंदवून घ्यायची नसते हे माहीत असूनही आपण बेबी कोच्चमाचे म्हणणे खरे मानले हे आपले चुकले आहे हे पोलिसांना कळते.पण आता उशीर झालेला असतो. वेलुथा पोलिस कोठडीत मरणार हे तर उघडच असते. मग आपल्याला चौकशीला सामोरे जावे लागेल हे लक्षात येऊन इन्सपेक्टर बेबी कोच्चमाला सांगतो की तिने एस्था-राहेल यांना सांगून वेलुथाने त्यांना पळवून नेले अशी तक्रार करावी.नाही तर बेबी कोच्चमालाच कोठडीत टाकले जाईल. बेबी कोच्चम्मा इन्सपेक्टरचे म्हणणे मानून एस्था-राहेलला सांगते की जर त्यांनी वेलुथाने त्यांना पळवून नेले अशी तक्रार केली नाही तर पोलिस अम्मुला पकडतील आणि मारतील. अम्मुला वाचवण्यासाठी मुले वेलुथाविरूद्ध खोटी तक्रार नोंदवतात. बेबी कोच्चम्मा सुटते, इन्सपेक्टर मॅथ्यु सुटतो आणि मुले मात्र कायमचा अपराधगंड मनात घेऊन बसतात.दुसरे दिवशी सोफी मॉलचा अंत्यसंस्कार होतो तेव्हाही मुलांना आपल्यामुळेच ती गेली असे वाटत राहते. हसऱ्या-खेळकर मुलांचे सगळे भावविश्वच झाकोळून जाते.

सोफी मॉलच्या अंत्यसंस्कारानंतर अम्मु लगेचच पोलिस ठाण्यात जाते. वेलुथाला पोलिसांनी नाहक मारल्याची खबर तिला कळलेली असते. त्याबद्दल जाब विचारायला ती इन्सपेक्टर मॅथ्युकडे जाते. पण तो एस्था-राहेलसमोरच काठीने तिचे स्तन चाचपून तिची वेश्या म्हणून हेटाळणी करतो.या अपमानाने अम्मु पूर्णच ढासळून जाते.

चाकोने सोफी मॉल गेल्यानंतर आणि अम्मुने वेलुथाबरोबर संबंध ठेवले होते हे कळल्यानंतर अम्मुने घर सोडून निघून जावे असा पवित्रा घेतलेला असतो. अम्मु कोचिनला स्वतःसाठी नोकरी शोधत असते. दरम्यान एस्था- राहेलच्या वडिलांशी संपर्क साधून तिने त्यांना एस्थाची जबाबदारी घ्यावी असे सुचवलेले असते. त्यांनी ते मान्य केल्यावर अम्मु सात वर्षांच्या एस्थाला एका परिचिताच्या सोबतीने कोचिनहून कलकत्त्याला पाठवते. अम्मु आपल्याला परत न्यायला कधीच येणार नाही हे मनात कोरून ठेवत एस्था कलकत्त्याला निघून जातो.तिथे जेमतेम शालेय शिक्षण तो पूर्ण करतो पण पुढे शिकायचे नाही असे सांगून सावत्र आईला घरकामात मदत करण्याची-नोकराची भूमिका स्वीकारतो. त्याच्या एका अपंग मित्राची तो सेवा करतो. पण तो मित्र मरण पावल्यावर एस्था  एकदम मूक, गंभीर होऊन जातो. तेवीस वर्षांनी त्याचे वडील त्यांच्या द्वितीय पत्नीबरोबर ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत व्हायचे ठरवतात. त्यांना एस्थाला ऑस्ट्रेलियात न्यायची इच्छा नसल्याने ते त्याला परत आयमेनमला पाठवून देतात.

अम्मुने एस्थाला कलकत्त्याला पाठवून दिल्यावर राहेलला आयमेनमलाच ठेवून घ्यायला चाको तयार होतो. अम्मु मात्र कोचिनला नोकरी पत्करते. तुटपुंजे पैसे मिळवत लॉजच्या खोलीत रहाते. पण आयुष्याने तिला एवढे दुःख, अपराधीपण आणि अपमान भोगायला लावले आहे की ती दुबळी होऊन जाते आणि त्यातच दम्याच्या विकाराने आजारी पडते. कशीबशी गोळ्या घेत ती चार वर्ष जगते आणि एके दिवशी लॉजवरच मरून जाते. राहेल चाकोबरोबर अम्मुच्या अंत्यसंस्काराला जाते. धर्मगुरू घटस्फोटीत आणि अस्पृश्याशी संबंध ठेवल्याचा कलंक लागलेल्या अम्मुचे दफन चर्चच्या आवारात करण्यास नकार देतात. त्यामुळे विद्युत दाहिनीत अम्मुला टाकले जाते.अम्मूच्या मृत्युनंतर काही वर्षांनी तिच्या आणि चाकोच्या आईचेही निधन होते. तोपर्यंत राहेल दिल्लीत शिक्षणासाठी निघून गेलेली असते.चाकोला कामगारांच्या संपाने आणि बॅंकेच्या कर्जफेडीच्या तगाद्याने कंटाळून लोणच्याचा कारखाना बंद कारावा लागतो. राहेलच्या शिक्षणाची तरतुद तो करतो आणि कॅनडात स्थलांतरीत होतो. तिथे तो भारतातील पुराणवस्तुंचा व्यापार करू लागतो.आयमेनम हाऊसवर एकटी बेबी कोच्चमा आणि तिची स्वयंपाकीण या दोघीच रहातात. एकेकाळी देखण्या असणाऱ्या बंगल्याची  आणि बागेची पूर्ण वाताहत होते. दोघी बायकांना टी.व्ही.वरील निरर्थक मालिका पाहण्याचे जणू व्यसनच लागते आणि घराची देखभाल करणेही त्या सोडून देतात.

 अकरा वर्षांची राहेल आईला विद्युत दाहिनीत टाकतात ते दृष्य पाहते. आधीच वेलुथावरील पोलिसांनी केलेले अत्याचार, त्याचा पोलिस कोठडीतील मृत्यू आणि त्यावेळची हतबलता तिच्या मनाला हादरवून गेलेली असतेच.अम्मूच्या मृत्यूने तर  राहेलच्या मनाला बधिरताच येते. एस्थाला ती अम्मु गेल्याचे कळवतही नाही. शाळेत तिचे मन रमत नाही. दिल्लीतील एका सुमार दर्जाच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात ती प्रवेश मिळवते.नोकरी करत शिकताना पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला ती आठ वर्ष लावते.तिथेच तिला लॅरी मॅककॅस्लीन भेटतो. त्याच्याशी लग्न करून राहेल न्युयॉर्कला जाते. पण लॅरीला ऐन भावनोत्कटतेच्या क्षणीही राहेलचे डोळे कोरडे दिसतात तेव्हा तो वैतागत जातो. राहेलच्या मनातील एकाकीपण, तिचे बालपणीचे भावविश्व उद्वस्थ करून गेलेले अनुभव समजून घ्यावेत असे त्याला वाटत नाही. तो राहेलला घटस्फोट देतो. राहेल एका पेट्रोलपंपवर रात्रीची ड्युटी करत पोट भरत राहाते. पण ती समाधानी नाहीच. त्यामुळे एस्था कलकत्त्याहून आयमेनमला आला आहे हे कळताच ती तातडीने अमेरिकेहून भारतात निघून येते. एस्थाचे न बोलणे , सतत चालत राहणे किंवा कपडे धूत राहणे, खोली स्वच्छ करत राहणे हे सगळे बघून राहेल अस्वस्थ होते. एस्थाच्या मनातील घुसमट बाहेर पडावी असे तिला वाटत राहते.पण ते कसे शक्य होईल ते तिला कळत नाही. एके रात्री गावातील देवळातून येणारा कथकलीचा आवाज ऐकून ती देवळात जाऊन पोहोचते. महाभारतातील कर्णाचा आणि कुंतीच्या भेटीचा प्रसंग अभिनय व नृत्यातून मांडणारे जीव तोडून अभिनय करणारे कलावंत ती पाहते. एस्थाही कधीतरी देवळात येऊन बसलेला ती पाहते.महाभारतातील कर्ण- कुंती भेटीचा प्रसंग,भीमाने केलेल्या दुःशासन वधाचा प्रसंग नृत्य-नाट्यात रंगवला जात असताना राहेल आणि एस्था दोघांची मने हळवी होतात. पहाटे ते दोघेही देवळातून घरी जातात तेव्हा त्या दोघांचाही बांध फुटतो आणि दोघे एकमेकांच्या कुशीत शिरून रडू लागतात.आता ते दोघे एकमेकांसाठी आहेत एवढेच. भविष्य काय असेल ते मात्र गूढच आहे.बेबी कोच्चमाने तर ते दोघे परत कधी जाणार हे विचारायला सुरूवात केलीच आहे.

अशाप्रकारे ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही कादंबरी एका कुटूंबाची, एका घराची वाताहत दाखवणारी शोकांतिका ठरते.ही शोकांतिका नियतीप्रधान म्हणता येणार नाही आणि ती स्वभावप्रधान शोकांतिकाही ठरणार नाही. ही निःसंशय एक सामाजिक शोकांतिका आहे.या सामाजिक शोकांतिकेची कारणे हीच या कादंबरीची कथासूत्रे ठरतील. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे:

  • ब्रिटीश आमदानीचा प्रभाव म्हणून केरळमध्ये झालेले धर्मांतर,त्यातून निर्माण झालेला ब्रिटीशांचे अंधानुकरण करणारा आणि स्वतःला आधुनिक समजणारा ख्रिस्ती समाज आतून कसा मध्ययुगीन,सरंजामशाहीच जपतो आहे हे दाखवणे हे या कादंबरीचे एक कथासूत्र म्हणता येईल. कादंबरीतीन बेनन आयपे निवृत्तीनंतरही नखशिखांत साहेबी पोषाख घालतात.एक जुनी का होईना पण परदेशी गाडी प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून बाळगतात.मुलगा ब्रिटनमध्ये शिकायला पाठवतात. पण बायकोने लोणची करून विकणे त्यांना अप्रतिष्ठेचे वाटते. त्यासाठी ते बायकोला मारहाण करतात. चारचौघांदेखत तिचा अपमान करतात. मुलीला फारसे शिकवत नाहीत आणि तिच्या लग्नासाठी फारशी खटपटही करत नाहीत.मुलगी घटस्फोट घेऊन परत माहेरी आल्यावर एका ब्रिटीश माणसाच्या वासनांध मागणीमुळे तिला घटस्फोट घ्यावा लागला हे ऐकून त्यांना फारच धक्का बसतो. कारण ब्रिटीश म्हणजे सभ्यतेचे आदर्श असेच ते मानत असतात.एकंदर आधुनिकता, सभ्यतेच्या कल्पनांचे अंधानुकरण करणारे बेनन आयपे हे ढोंगीच ठरतात.ही तथाकथित आधुनिकांची ढोंगी वृत्ती दाखवणे हे ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे मध्यवर्ती कथासूत्र ठरते.
  • अम्मुचा नवरा देखील पोषाखात साहेबी रितीरिवाज  पाळतो. परंतु वर्तनाने तो मध्ययुगीन संस्कारच दाखवतो. दारूच्या व्यसनात अडकलेला, बायकोला मारहाण करणारा, तिच्याशी खोटे बोलणारा, स्वतःची नोकरी टिकावी म्हणून तिचे चारित्र्य पणाला लावणारा हा पुरूष आधुनिकतेचे केवळ ढोंग करतो आहे असे लेखिकेला सुचवायचे आहे.
  • ऱ्होडस स्कॉलरशिप मिळवून इंग्लंडला शिकायला गेलेला बेनन आयपे यांचा मुलगा चाको अर्थातच स्वतःला आधुनिक विचारसरणीचा मानतो. त्याने इंग्लंडमध्ये एका वेटरेसशी प्रेमविवाह केला आहे. त्याबद्दल आई-वडिलांना कळवलेलेही नाही.कारण स्वातंत्र्य घेणे ही आधुनिकताच आहे असे तो मानतो. भारतात परतल्यावर चाको एक वर्ष नोकरी करून नंतर आयमेनमला त्याची आई चालवत असणाऱ्या लोणच्याच्या कारखान्याचे आधुनिकीकरण करण्याचे योजून परत आयमेनमला येतो. त्याचे वडील आईला मारहाण करणार असताना तो त्यांचा हात पकडून त्यांच्याविरूद्ध बंड करतो.तिथे तो आधुनिकच ठरतो. पण वडिलांच्या मृत्युनंतर चाको घराचा मालक तर होतोच आणि आईचा लोणच्याचा कारखानाही ताब्यात घेतो.तेथील कामगारांशी तो सलगीने बोलतो तेव्हा तो आपण मार्क्सवादी आहोत असे बोलूनही दाखवतो. पण हे सगळे वरवरचेच आधुनिकपण आहे. कारण याच कारखान्यातील  कामगार स्त्रियांना तो आपल्या वासना शमवण्यासाठी वापरतो.वेलुथा कामगारांच्या मोर्चात दिसला हे पाहून तो मनातून घाबरतो.एका बाजुला चाको गावातील अन्य लोकांसारखी अस्पृश्यता मानत नाही तेव्हा तो आधुनिक ठरतो. पण दोन मुलांसह माहेरी परतून आलेल्या धाकट्या बहिणीला तो हसत हसत मालमत्तेचा हक्क मिळणार नाही हे सांगतो तेव्हा तो आधुनिक न राहता सरंजामशाही वृत्तीचाच ठरतो.आणि अखेरीस अम्मुने वेलुथासारख्या अस्पृश्य तरूणाशी संबंध ठेवले आहेत हे कळल्यावर चाको तिला घर सोडून जायला सांगतो तेव्हा तर तो पारंपरिक पुरषी वर्चस्ववादच दाखवतो.मार्गारेटशी विवाह करून चाकोने आधुनिकता दाखवली असली तरी अम्मुशी व तिच्या मुलांशी निर्दयपणे वागून तो पुरूषप्रधान संस्कृतीच दाखवून देतो.त्यामुळे आधुनिकतेच्या मुखवट्याआड सरंजामशाही वृत्तीच जोपासली जाते आहे आणि तीच अम्मुच्या, वेलुथाच्या व मुलांच्या शोकांतिकेला कारण ठरते असे एक कथासूत्र लेखिकेने हाताळले आहे.
  • राहेलचा अमेरिकन नवरा लॅरी मॅककॅस्लिन आधुनिक,भांडवलदारी वृत्तीचा आहे.तो राहेलशी लग्न करतो पण तिच्या डोळ्यातील कोरडेपणाचे कारण समजून घेण्याची तसदी घेत नाही. त्याला एक उपभोगाची वस्तु म्हणून राहेल हवी आहे. त्यामुळे लॅरी देखील ढोंगी प्रवृत्तीचाच म्हणावा लागेल.त्याचे प्रेम वरवरचेच आहे.त्यामुळे लेखिकेने निवडलेले कथासूत्र लॅरीच्या वागण्यातून पुन्हा एकदा ठळक होते.
  • केरळमधले राजकारण कम्युनिस्ट विचारसरणीचे आहे. कादंबरीत त्याची झलक काहीवेळा दिसते. पण हे स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणारे नेतेही अस्पृश्यता मानतात म्हणजे विषमतेचेच वर्तन करतात. त्यांच्या घरातीस स्त्रियांशीही ते समानतेने वागत नाहीत असे कादंबरीत दिसते.
  • पुरूष आधुनिकतेच्या आवरणाखाली आपले वर्चस्व दाखवून देत असताना स्त्रियाही त्याच मानसिकतेच्या कशा होतात याचे उदाहरण म्हणजे अम्मुची आई.ती एका बाजुला बंडखोर आहे कारण ती व्हायोलीन शिकली आहे. नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता ती व्हायोलीन वाजवत रहाते.आयमेनमला आल्यावर ती लोणची बनवून विकण्याचा उद्योग सुरू करते तेव्हाही ती नवऱ्याच्या विरोधाला जुमानत नाही. त्याचा मार खात ती तिच्या इच्छेप्रमाणे जगते.पण चाको कारखान्यातील बायकांशी संबंध ठेवतो हे कळल्यावर ती विरोध करत नाही. उलट त्याच्या खोलीला बाहेरून दार काढून ती चाकोला व्यभिचाराला मुभाच देते. चाकोच्या शारीर वासना भागवणाऱ्या बायकांनी तोंड बंद ठेवावे म्हणून त्याची आई या बायकांना पैसे देते.अगदी घटस्फोटीत मार्गारेटलाही ती पैसे देते. यावरून तिचा व्यवहारी स्वार्थच दिसून येतो.
  • स्वतःच्या मुलीच्या म्हणजे अम्मुच्या शारीर-भावनिक गरजा असू शकतात हे मात्र ती समजून घेत नाही. वेलुथासारखा माणूस अम्मुच्या आईला कारखान्यात हरहुन्नरी कामगार म्हणून हवा आहे. पण गावातले लोक नावे ठेवतात म्हणून ती त्याला कमी पगार देते.अखेरीस अम्मु आणि वेलुथाचे संबंध आहेत हे कळल्यावर अम्मुच्या बाजूने उभे राहण्याऐवजी ती नणंदेच्या म्हणण्याप्रमाणे वागून अम्मुला खोलीत डांबून ठेवते. वेलुथाला पोलिसांनी अन्यायकारक पद्धतीने मारले याबद्दल तिला वैषम्य वाटत नाही.म्हणजे व्यक्तीगत पातळीवर आधुनिक असणारी अम्मुची आई समाजाला घाबरणारी, दुटप्पी वागणारी ठरते. हा विरोधाभास दाखवणे हेही कादंबरीचे एक कथासूत्र म्हणता येईल.
  • धर्माचे आणि नैतिकतेचे, अनासक्तीचे शिक्षण घ्यायला गेलेली बेबी कोच्चमा तरूण वयातील फादर मुलीगनवरील एकतर्फी प्रेम विसरू शकत नाही. पण कालांतराने फादर मुलीगन हिंदु तत्वज्ञानाने प्रभावीत होऊन भगवी वस्त्र घालू लागल्याचे कळताच ती त्यांना आयुष्यातून बाद करते.निरासक्तीचे धडे घेतलेली बेबी कोच्चम्मा मनातून असुरक्षित, असंतुष्ट आहे. अम्मु स्वतःच्या मना-शरीराची हाक ऐकून जे स्वातंत्र्य घेते तसे स्वातंत्र्य घेण्याची हिंमत बेबी कोच्चम्मामध्ये नाहीच. खेरीज ती अस्पृश्यताही मानते.त्यामुळेच अम्मु आणि वेलुथाचे संबंध ती समजून घेऊ शकत नाही. उलट तीच त्यांच्या शोकांतिकेला कारण ठरते.केवळ आत्मकेंद्रीत मनोवृत्ती असणाऱ्या बेबी कोच्चमाची वृत्तीही ढोंगीच म्हणावी लागेल. ती इंग्रजी भाषेचा आग्रह धरते,अम्मुच्या मुलांना शिस्त लावू पाहते. पण स्वतःचा आळशीपणा झटकून घराची, बागेची देखभाल करू शकत नाही.स्वतःचे शरीर ,विशेषतः नाजुक पावले, केसांचा बॉब कट याबद्दल म्हातारपणीही जागरूक असणारी बेबी कोच्चम्मा एस्था आणि राहेल या प्रेमासाठी आसुसलेल्या नातवंडांसाठी थोडीही संवेदनशील होत नाही.ढोंगी आधुनिकता दाखवणे हेच कथासूत्र लेखिकेने बेबी कोच्चमाच्या व्यक्तिरेखेतून खेळवले आहे.
  • वेलुथा हा या कादंबरीत ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ आहे.श्रीमंतांचा देव मोठमोठ्या देवालयांत, प्रार्थनास्थळांत रहातो पण गरीबांचा, समाजाने नगण्य ठरवलेल्या उपेक्षितांचा देवही उपेक्षितांतूनच येतो असे लेखिकेला सुचवायचे असावे.
  • अम्मु आणि तिच्या मुलांना आयमेनम हाऊसमध्ये नगण्य वागणूक मिळते आहे.आपण चाकोला, बेबी कोच्चमाला एवढेच नाही तर आजीलाही नकोसेच आहोत हे एस्था-राहेल आणि अम्मुलाही जाणवले आहे.पण अशा प्रेमशून्य आयुष्यात त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक वेलुथाच काय तो त्यांच्यासाठी दिलासा आहे. वेलुथा अस्पृश्य असला, दरिद्री असला तरी प्रेम करण्यात कंजुष नाही.निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा वेलुथा प्रेममय आहे.शारीर कष्टाने बळकट,कणखर झालेला वेलुथा मनाने मृदू आहे. भांडवलदारी जगातील लोकांसारखा तो ढोंगी नाही की व्यवहारी नाही. तो प्रेमासाठी आसुसलेल्या मुलांशी मुल होऊन खेळतो, त्यांना कोणताही आव न आणता नवनवीन गोष्टी शिकवतो. त्यांच्या आईची भूकही समजून घेतो आणि तिला उत्कटतेने प्रेम,सुख देतो.असे करताना वेलुथा निरपेक्ष आहे, निर्भय आहे. सामाजिक रोषाची तमा तो बाळगत नाही.खरं तर, तो एवढा कसबी आणि हरतऱ्हेची कामे करणारा आहे की त्याला अधिक पगार मिळाला पाहिजे पण तसा तो दिला जात नाही कारण तो अस्पृश्य आहे.पण तरीही तो मनापासून कामे करत रहातो.कामगार संघटनेत सक्रीय असूनही ती संघटना त्याच्याशी दुजाभावाने वागते आणि त्याला न्याय मिळवून देण्यात असमर्थ ठरते.
  • आपल्या वृद्ध आंधळ्या वडिलांना वेलुथा सांभाळतो आणि अपंग भावाची सेवा करत, त्यांना जगवत रहातो. म्हणूनच तो छोट्या, नगण्य जीवांचा देव ठरतो.हा देवच जेव्हा व्यवस्थेच्या ढोंगीपणामुळे, अन्याय्य वागणुकीमुळे संपतो तेव्हा छोट्या जीवांची ती शोकांतिका ठरते. कारण त्यांच्या चांगुलपणावरील श्रद्धेलाच तडा जातो आणि त्यांचे जगणे अश्रद्ध,निरर्थक होऊन जाते असे एक कथासूत्र ‘ दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणता येईल.

अशाप्रकारे ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे कथानक आणि त्यातील कथासूत्रे विलक्षण कसबाने गुंफलेली आहेत.काळाच्या अक्षावर मागे-पुढे सरकणारे, कधी रेंगाळत तर कधी अतिशय गतीने पुढे सरकणारे हे कथानक काव्यात्म आणि नाट्यपूर्ण म्हणता येईल.

तुम्ही ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचा अपर्णा वेलणकर यांनी समर्थपणे केलेला मराठी अुनवाद जरूर वाचावा ही विनंती.पुढील ब्लॉगमध्ये आपण ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

                                                        -गीता मांजरेकर

————————————————————————————————————————————————————————–

2 प्रतिसाद

  1. “दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे वाचल्यावर सर्वजण आधुनिकतेचा मुखवटा घालून, आतून किती ढोंगीपणाचे जीवन जगतात हे समजते, कदाचित नाईलाजास्तवसुद्धा ते आपल्या तत्वांविरुद्ध वागू शकले असतील… पण समाजात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या मोठ्या संकल्पनांचा शोध घ्यायला भाग पाडतात हे लेखिकेने मांडलेल्या कथासूत्रांच्या आधारे लक्षात येते.. निराशाजनक वागणूकता जरी मोठ्या माणसांच्या पात्रातून दिसत असली, तरी वेलुथासारखा “देवमाणूस” आशादायी वागणुकीचे चित्रण घडवतो..पण त्याचाच शेवटी बळी दिला जातो..

    Like

    1. हो ना ..व्यवस्था माणसांना स्वार्थी,ढोंगी बनवतात आणि अनेकदा त्यातून क्रौर्य जन्माला येतं..हीच शोकांतिका

      Liked by 1 person

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.