भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रियांच्या कादंब-यांचा परिचय करून देणा-या या ब्लॉगमध्ये आज आपण आपल्या पहिल्याच ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या अरूंधती रॉय यांचा एक व्यक्ती म्हणून आणि साहित्यिक म्हणून परिचय करून घेणार आहोत.

सुझाना अरूंधती रॉय यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६१ रोजी तत्कालीन आसाममधील शिलॉंग या छोट्याशा शहरात झाला.त्यांची आई मेरी ही मल्याळी सिरीयन ख्रिस्ती होती.पुढे ती एक महिला हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती म्हणून नावाजली गेली.अरूंधती यांचे वडील राजीब रॉय हे एका चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक होते.ते बंगाली ख्रिस्ती होते.दुर्दैवाने अरूंधती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या आईने पतीकडून होणा-या छळाला कंटाळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अरूंधती व त्यांचा भाऊ आईसोबत तिच्या आजोबांकडे उटी येथे आले.तिचे आजोबा हे दिल्लीतील नामांकित पुसा कृषी संशोधन संस्थेतून निवृत्त झाले होते.अरूंधतीच्या आईचे शिक्षण दिल्लीत झाले होते.अरूंधतीच्या आईने मुलांना तामीळनाडूतील थंड हवेचे ठिकाण लव्हडेल इथल्या प्रसिद्ध लॉरेन्स निवासी शाळेत दोन्ही मुलांना शिक्षणासाठी दाखल केले.आईने स्वतःही कोट्टायम येथे लहान मुलांसाठी एक शाळा सुरू केली.तरूण वयात अरूंधती यांनी आईशी बंडखोरी करत दिल्ली येथे स्कुल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्किटेक्चर या संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.तिथेच तिने १९७८ सारी आपला जोडीदार देखील निवडला.तो होता पुढे नावाजला गेलेला गोवा येथील आर्किटेक्ट जेरार्ड डि-कुन्हा.पण अरूंधती यांचा हा पहिला विवाह चार वर्षांत म्हणजे १९८२ साली संपुष्टात आला.ती जेरार्डपासून विभक्त झाली.पुन्हा एकदा तिने दिल्लीत स्थलांतर केले व नोकरी पत्करली.

१९८४ मध्ये अरूंधती यांनी चित्रपट क्षेत्रातील प्रदीप किशन यांच्याशी विवाह केला. कालांतराने अरूंधती रॉय यांनीही चित्रपट क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली.’मस्सी साहिब'(१९८५) या चित्रपटात त्या एक अभिनेत्री म्हणून चमकल्या.’विच ऍनी गिव्हज इट दोज वन्स’ या इंग्रजी लघुपटाची पटकथा अरूंधती यांनी लिहिली आणि त्यात अभिनय करण्याची संधीही त्यांना मिळाली. याच पटकथेसाठी अरूंधती यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

‘इलेक्ट्रीकल मून’ या चित्रपटात देखील अरूंधती यांनी अभिनय केला.पुढे नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने अरूंधती यांनी ‘ड्राऊन्ड आऊट'( २००२) हा माहितीपट बनवला.

एक कादंबरीकार म्हणून अरूंधती यांची कारकीर्द १९९७ पासून सुरू झाली.त्यांनी लिहिलेल्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्याच कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्कार मिळाला आणि त्या जागतिक कीर्तीच्या कादंबरीकार ठरल्या.परंतु त्यानंतर अरूंधती यांचे लक्ष भारतातील पर्यावरणाचे प्रश्न आणि सामाजिक समस्या यांवर केंद्रीत झाले.स्वाभाविकच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सत्ताधारी दुर्लक्ष का करतात याचा शोध त्या घेऊ लागल्या.त्यातून शोध पत्रकारिता या क्षेत्राकडे त्या वळल्या तसेच नर्मदा बचाव आंदोलनात सक्रीय सहभागी झाल्या.या सर्व प्रश्नांसंदर्भात त्यांनी केलेले संशोधन त्या लेख स्वरूपात प्रकाशित करू लागल्या.अशा लेखांची सुमारे वीस पुस्तके अरूंधती रॉय यांच्या नावावर आहेत.त्यापैकी काही महत्त्वाच्या पुस्तकांची शीर्षके पुढीलप्रमाणे:

१.’दी एंड ऑफ इमॅजिनेशन'(१९९८) २.’दी ग्रेटर कॉमन गुड'(१९९९) ३.दी कॉस्ट ऑफ लिव्हिंग ( १९९९)

४.’दी आलजिब्रा ऑफ इनफायनाइट जस्टिस'(२००२) ५.’पॉवर पॉलिटिक्स'(२००२) ६.’वॉर टॉक'(२००३) ७.’वॉकिंग विथ कॉम्रेडस’ (२०११) ८.’कॅपिटॅलिझम : अ घोस्ट स्टोरी'(२०१४) ९.’दी डॉक्टर ऍन्ड दी सेन्ट’ (२०१७)-(ज्यात डॉ .आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यातील चर्चा संपादीत केली आहे.) १०.’माय सेडिशियस हार्ट'( २०१९) ११.आझादी:फ्रिडम,फॅसिझम,फिक्शन (२०२०)

एकूणच सामाजिक , पर्यावरणविषयक व अनुषंगाने राजकीय मुद्द्यांवर लेखन केल्याने अरूंधती रॉय या एक वादग्रस्त लेखिका ठरलेल्या आहेत.

दरम्यान २०१७ साली त्यांनी ‘मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ ही आपली दुसरी कादंबरी प्रकाशित केली आहे.

आपल्या लेखन कर्तृत्वासाठी अरूंधती रॉय यांना ‘बुकर’ खेरीज इतरही विविध पुरस्कार मिळाले आहेत.२००४ मध्ये त्यांना शांततेसाठी कृतीशील असणारी लेखिका,कार्यकर्ती म्हणून ‘सिडनी पिस पुरस्कार ‘ मिळाला.त्याच वर्षी समाजाच्या हितासाठी केलेल्या शोधपत्रकारितेसाठी अरूंधती रॉय यांना ‘जॉर्ज ऑरवेल पुरस्कार’ मिळाला.तर २०११ मध्ये त्यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी ‘नॉर्मन मेलर’ जीवनगौरव पुरस्कार मिळाला. २०२४ मध्ये अरूंधती रॉय यांना ‘पेन पिंटर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

२०२५ च्या सप्टेंबर महिन्यात अरूंधती रॉय यांचे त्यांच्या आईच्या आठवणी संबंधीचे पुस्तक ‘मदर मेरी कम्स टू मी’ हे प्रसिद्ध होणार आहे.इंग्रजी साहित्य रसिक या नव्या पुस्तकाची आतुरतेने वाट पहात आहेत.

आपण पुढील ब्लॉगमध्ये अरूंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे यांचा परिचय करून घेणार आहोत.

गीता मांजरेकर

————————————————————

2 प्रतिसाद

  1. परिचित कादंबरीकार आणि कादंबरी…पुढील ब्लॉग वाचण्यासाठी खरोखरच उत्सुक आहोत..

    Like

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.