आपण भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रियांच्या कादंबऱ्यांचा सखोल परिचय करून घेताना शशी देशपांडे यांच्या कादंबऱ्यांपर्यंत येऊन ठेपलो आहोत.शशी देशपांडे यांच्या ‘डार्क होल्डस नो टेरर्स’ आणि ‘दॅट लॉंग सायलन्स’ या दोन कादंबऱ्यांची तपशीलवार ओळख आपण करून घेतली. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला त्यांच्या ‘शॅडो प्ले’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे जाणून घ्यायची आहेत. ही कादंबरी ‘हिंदू’ या दैनिकाने २०१३ सालातील चांगल्या कादंबऱ्यात निवडली होती.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘शॅडो प्ले’ ही एक दीर्घ लांबीची कादंबरी आहे.एकूण ३०९ पृष्ठांची ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही आणि वाचकांना जणू बांधून ठेवते.याचे श्रेय अर्थातच शशी देशपांडे यांनी मनाशी निश्चित केलेल्या कथासूत्रांना , ती कथासूत्रे उलगडण्यासाठी रचलेल्या व्यामिश्र कथानकाला आणि कथनाच्या प्रवाहीपणाला आहे. ‘अ मॅटर ऑफ टाईम’ या कादंबरीचा दुसरा भाग म्हणून शशी देशपांडे यांनी ‘शॅडो प्ले’ ही कादंबरी लिहिली असली तरी ती एक स्वतंत्र कादंबरी म्हणूनही वाचनीय आहे. ‘अ मॅटर ऑफ टाईम’ या कादंबरीचा  ‘अशी काळ-वेळ’ या नावाने सरोज देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवाद उपलब्ध  आहे. ‘शॅडो प्ले’ या कादंबरीचा मराठी अनुवाद मात्र उपलब्ध नाही.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीत तृतीय पुरूषी आणि प्रथम पुरूषी असे दोन्ही प्रकारचे कथक आहेत.  कादंबरीतील एक व्यक्तिरेखा गोपाळ ही स्वतःचा भूतकाळ आणि त्याच्या मनातील भावनिक आंदोलने प्रथम पुरूषी कथनात मांडताना दिसते. बाकीचे कथन मात्र तृतीय पुरूषी किंवा सर्वज्ञ कथकाने केले आहे. कथानकाचा प्रत्यक्ष काळ सुमारे सात-आठ वर्षांचा असावा. अप्रत्यक्षपणे मात्र कथानकात तीस-चाळीस वर्षांचा काळ सामावलेला आहे.कथानकात असलेल्या व्यक्तिरेखांचा भूतकाळ कादंबरी उलगडत जाते त्यामुळे कादंबरीतील अप्रत्यक्ष काळ दीर्घ झाला आहे.कादंबरीच्या कथानकातील घटनांचा अवकाश प्रामुख्याने  भारतातील एक महानगर(बहुतेक बंगलोर) आहे. परंतु व्यक्तिरेखांच्या भूतकाळामुळे घटनांचा अवकाश कधी जोगीपूरासारख्या गावात जातो तर कधी हिमालयातील कोणा ऋषीच्या आश्रमातही पोहोचतो. कादंबरीतील बहुतेक घटना एका कुटुंबातील असल्या तरी काही घटना या कुटुंबीयांच्या परिघात कारणपरत्वे आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत आहेत.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीत व्यक्तिरेखा बऱ्याच असल्या तरीदेखील ही व्यक्तिप्रधान कादंबरी नाही. ती घटनाप्रधान कादंबरी आहे.काहीवेळा तर ही कादंबरी एखाद्या हिंदी चित्रपटासारखी सनसनाटी, योगायोगाने भरलेली वाटते.पण तरीही ती असंभवनीय वाटत नाही हे विशेष. प्रमुख व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील धक्कादायक घटनांमुळे किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना ज्या वास्तवाला सामोरे जावे लागले ते या कादंबरीच्या कथानकातून  वाचकांना कळते.या घटना मानवी चुकीमुळे,माणसांतील शारीरिक-मानसिक उणिवांमुळे घडलेल्या आहेत ,तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे घडल्या आहेत. त्या कधी अपघाताच्या   आहेत, सरंजामशाही व पुरूषप्रधान परंपरेतून निर्माण झालेल्या हिंसक उद्दाम प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत तशाच त्या जगभरातल्या विषमतेमुळे माणसाच्या मनात वाढत चाललेल्या हिंसकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्याही आहेत.या घटना एखाद्या व्यक्तीचे, त्याच्या कुटुंबाचे व पर्यायाने संपूर्ण समाजाचेच स्वास्थ्य कसे बिघडवून टाकतात हे या कादंबरीतून लक्षात येते.भिंतीवर प्रकाशाच्या विरूद्ध बाजूने केलेल्या बोटांच्या हालचालींनी क्षणोक्षणी आकार बदलणाऱ्या सावल्यांच्या खेळातील  अशाश्वतता माणसांच्या जीवनातही जणू भरून राहिलेली आहे.क्रौर्याची, वियोगाची वा अभावाची वेदना वेगवेगळ्या रूपांनी जणू माणसाच्या जगण्याशी खेळ करते आहे हे ‘शॅडो प्ले’ या कादंबरीतून ठळकपणे जाणवते

‘शॅडो प्ले’ या कादंबरीचे कथानक समजून घेण्यासाठी आपल्याला या कादंबरीतील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील घटना समजून घ्याव्या लागतील आणि या घटनांचा त्या माणसांच्या प्रवृत्तीवर झालेले खोल परिणाम लक्षात घ्यावे लागतील.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा अरू ही मध्यमवयीन स्त्री आहे. ती पेशाने वकील आहे.आपली आजी-कल्याणीच्या कुटुंबातील आजीच्या बहिणी, आईच्या बहिणी आणि स्वतःच्या बहिणी अशा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी अरू ही एक समंजस,सोशिक आणि न्यायाबद्दल जागरूक,संवेदनशील असलेली व्यक्तिरेखा आहे.तिच्या वाट्याला तरूण वयात आलेले दोन धक्कादायक अनुभव तिला एकदम प्रौढ बनवून गेले आहेत.यातील एक प्रसंग म्हणजे अरूच्या वडिलांनी-गोपाळने ती लहान असताना काहीही कारण न देता अचानक घरातून निघून जाणे हा आहे .तर दुसरा प्रसंग म्हणजे कालांतराने अरूच्या आईचे- सुमीचे व तिच्या आजोबांचे झालेले अपघाती निधन हा आहे. या दोन्ही प्रसंगांनी अरूला एकदम जबाबदार,गंभीर मुलगी बनवले आहे.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीचे कथानक अरू आणि रोहित यांच्या विवाहाच्या घटनेपासून सुरू होते. हा विवाह अरूच्या आजीच्या-कल्याणीच्या घराच्या आवारातच आयोजित केलेला आहे.विवाहाला घरची मोजकीच माणसे आलेली आहेत.घरात अरूची आजी कल्याणी अंथरूणाला खिळलेली असल्याने अरूसह सर्वांच्याच मनात एक चिंता आहे.आजीची बहिण गोदा सतत तिच्यासोबत आहे.कल्याणीची  मुलगी प्रेमी आणि गोदाची मुलगी देवकी तसेच अरूची अमेरिकेत स्थायिक झालेली बहीण चारू अशा सर्वच लग्नाला आलेल्या आहेत.एवढेच नाही तर कल्याणीने पाठवलेल्या निरोपाचा मान राखून अरूचे वडील गोपाळ हेही आजारी कल्याणीची सेवा करायला आणि तिच्या डोळ्यादेखत अरूचे लग्न होताना  पाहण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

अरूचे वडील गोपाळ हे वस्तुतः अतिशय जबाबदार, प्रेमळ पिता होते.अरूला आठवते की त्यांनी लहानपणी तिला सायकल शिकवली होती,दोन धाकट्या बहिणींच्या जन्मानंतर अरूची आई सुमी त्यांच्या संगोपनात व्यस्त झाली आणि अरू आपल्या वडिलांच्या अधिक जवळची झाली.गोपाळ -अरूचे वडील विद्यापीठात प्राध्यापक होते.त्यांचे बालपण खूप कष्टात गेले होते.आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने त्यांना खूप संघर्ष करून स्वतःचे जीवन घडवावे लागले होते. सुधा ही मोठी बहिण ही एकच  व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करणारी, आधार देणारी होती.गोपाळने नैतिकतेच्या पायावर धैर्याने  आपले जीवन उभे केले होते. पण एका संशोधन पत्रिकेत लिहिलेल्या लेखाचे निमित्त होऊन आपल्या भावना दुखावल्या अशी हाकाटी करत समाजकंटकांनी गोपाळला जीवनातून उठवू, कुटूंबाला संपवून टाकू अशा धमक्या दिल्या होत्या. भयभीत झालेल्या गोपाळने  माफी मागून, आपला लेख  मागे घेतला होता.पण आपण भ्याडपणे माघार घेतली, भेकड झालो ही आपल्याच तत्वांशी केलेली  तडजोड गोपाळला शरमिंदेपणाची वाटली होती. विद्यापीठाने धोका नको, राजकारण्यांचा रोष नको म्हणून गोपाळला राजिनामा द्यायला लावला होता. आपण आपल्या विद्यार्थ्यांना, कुटुंबाला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार असे वाटून गोपाळने तडकाफडकी ते शहर, घर सोडून परागंदा व्हायचा निर्णय घेतला होता. पण मुलींना आपल्या वडिलांनी अचानक परागंदा होण्याचे कारण नीट समजले नव्हते. त्यामुळे विशेषतः अरूच्या मनात तर वडिलांबद्दल कायमची अढी निर्माण झाली होती.

गोपाळच्या अचानक निघून जाण्यामुळे सुमीला अरू, चारू व सीमा या आपल्या तीन मुलींसह आपल्या आई-वडिलांकडे रहायला यावे लागले होते.सुमीचे आई -वडील म्हणजे कल्याणी व श्रीपती यांच्यात अनेक वर्षांपासून संवाद नव्हता.सुमी आणि प्रेमी या दोन मुलींनंतर या दांपत्याला एक मुलगा झाला होता पण तो मनोरूग्ण होता.श्रीपती आणि कल्याणी यांच्यासोबत एका रेल्वेप्रवासात असताना हा मुलगा बेपत्ता झाला होता. कल्याणीच्या हलगर्जीपणामुळे आपला एकुलता मुलगा हरवला असा ठपका ठेवून श्रीपतीने कल्याणीशी संवाद बंद केला होता.कल्याणी विवाहीत असूनही अनेक वर्षे विधवेचे जगणे जगली होती. श्रीपतीने मात्र जानकी नावाच्या एका बाईशी संबंध ठेवले होते.तिच्यासाठी वेगळे घरही त्यांनी घेतले होते.अगदी आपल्या मरणानंतरही त्या बाईला बेघर व्हावे लागू नये अशी खबरदारीही श्रीपतीने  घेतली होती.

खरं तर श्रीपती हा कल्याणीच्या आईचा भाऊ म्हणजे मामाच होता. कल्याणी शाळेत शिकत असताना कुणा एका मुलाने तिला पत्र पाठवले म्हणून तिच्या आईने घाबरून तडकाफडकी मुलीचे आपल्या धाकट्या भावाशीच लग्न लावून दिले होते.पण श्रीपतीने कल्याणीचे आयुष्य निष्प्रेम करून टाकले होते.सुमी व प्रेमी या मुलींनाही वडिलांच्या धाकात रहावे लागले होते. प्रेमी शिकून डॉक्टर झाली होती आणि एका डॉक्टरशीच तिचा विवाह झाला होता.सुमी मात्र नवऱ्याच्या परागंदा होण्याच्या निर्णयामुळे पुन्हा आई-वडिलांच्या आश्रयाला आली होती. वडिलांवर अवलंबून रहाणे तिला आवडत नव्हते त्यामुळे ती धडपड करून स्वतःच्या मुलींना वाढवत होती. शक्य झाले तर तिला वडिलांचे घर सोडून भाड्याने घर घेऊन  मुलींसह वेगळे रहायचे होते.पण एका स्कुटर अपघातात सुमी आणि तिचे वडील श्रीपती या दोघांवरही मृत्यूने घाला घातला होता. अठरा वर्षांच्या अरूवर आपल्या वृद्ध आजीला आणि दोन धाकट्या बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली होती.श्रीपतीने जमा करून ठेवलेली पुंजी यावेळी अरू व बहिणींच्या शिक्षणासाठी कामी आली होती. अरूची प्रेमी मावशी आणि तिच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा रमेश हे या काळात तिच्या पाठीशी उभे राहिले होते. अर्थात कणखर होऊन, जिद्दीने अरूला आपली जबाबदारी पार पाडावी लागली होती , स्वतःचे वकिलीचे शिक्षण पूर्ण करून नोकरीही पत्करावी लागली होती.

अरूची बहीण चारू हिने वैद्यकशास्त्रातले शिक्षण पूर्ण केले होते. तिची एक मावशी देवकी हिचा मुलगा ऋषी याच्याशी तिने प्रेमविवाह केला होता. ऋषी इंजिनियर होता आणि त्याला  अमेरिकेत संधी मिळाल्याने ते दोघे तिथेच स्थायिक झाले होते.अरूची सर्वात धाकटी बहीण सीमा ही आधी वडील परागंदा झाले म्हणून आणि मग आईचे छत्र हरपल्याने वैफल्यग्रस्त झाली होती. पण सुमी व चारूने योग्य तो मानसोपचार करून सीमाला त्या मनोविकारातून बाहेर काढले होते. सीमाला डॉक्टरांनी शारीरिक व्यायाम हाच तिच्या मनोविकारावरचा कायमचा उपाय आहे हे सांगितल्याने सीमाने जाणीवपूर्वक व्यायामावर आपले लक्ष केंद्रीत केले होते.त्याचा एक फायदा म्हणजे ती एक सडपातळ, सुडौल मुलगी झाली होती. या शारीर सौंदर्याच्या बळावर सीमाला अचानक मॉडेलिंगच्या क्षेत्रात यश मिळू लागले होते. वेगवेगळ्या जाहिरातीत, दिनदर्शिकांच्या पानांवर तिचे फोटो झळकू लागले होते. सीमा स्थिरस्थावर होताना पाहून अरूला हायसे वाटले होते.  पण सीमाच्या व्यवसायाचे वलयांकीत क्षेत्र तिला धोकादायकही वाटत होते. सीमाने काही वर्षे या क्षेत्रात काम करून नंतर वेगळ्या क्षेत्रात करीयर करायचा बेत अरूला सांगितला होता.

रोहित हा अरूचा महाविद्यालयात शिकत असल्यापासूनचा मित्र.तो मध्यमवर्गीय होता.घरी त्याचे वडील दारूच्या आहारी गेले होते आणि आई पारंपरिक स्त्रीसारखी सोशिक होती.त्याला रवी हा एक धाकटा भाऊ होता.आईच्या मृत्यूनंतर अरूने ज्या कणखरपणे परिस्थिती हाताळली आणि घर सावरले ते रोहितने पाहिले होते.प्रतिकूल परिस्थितीत अरूच्या घरातील सगळे एकत्र येऊन कणखरपणे संकटांना तोंड देताना पाहून रोहित चकीत झाला होता.या कुटूंबात आपला समावेश व्हावा असे रोहितला वाटत होते.

अरू परिस्थितीने गंभीर झाली होती आणि जणू स्वतःच्या भावनिक गरजाच विसरली होती. आणि अरूवर तेव्हा अनेक तरूणांची नजर असल्याने रोहित अरूवरचे प्रेम व्यक्त करायला धजावला नव्हता. अरू अन्य कोणाची तरी होईल आणि आपल्याला ते पहावणार नाही म्हणून तो उच्चशिक्षणासाठी काही वर्षे परदेशी  गेला होता. पण तिथेही तो अरूला विसरू शकला नव्हता.पुन्हा भारतात आल्यावर मात्र त्याने अरूवरील आपले प्रेम व्यक्त केले होते.अरूची आजी कल्याणी हिला रोहित हाच अरूसाठी योग्य मुलगा वाटला होता.अरूचे लग्न होईपर्यंत मृत्यूने  आपल्याला गाठू नये एवढीच कल्याणीची इच्छा होती.आणि अरूच्या लग्नानंतर काही दिवसांतच कल्याणीचा मृत्यू झाला होता. कल्याणीने आपल्या मृत्यूपत्रात त्यांचा राहता जुना वाडा अरूच्या व तिच्या दोन बहिणींच्या नावे केला होता. मात्र आहे तो जुना वाडा पाडून तिथे नवीन बंगला बांधावा आणि त्यात आपल्या बहिणीला प्रेमीला तसेच अरू,चारू, सीमाला स्वतंत्र घरे मिळावीत अशी इच्छा कल्याणीने व्यक्त केली होती.

गोपाळ परागंदा झाल्यानंतर जिथे कुठे वास्तव्याला होता तिथून त्याचा सुमीशी व तिच्या आईशी कल्याणीशी तसेच त्याचा भाचा रमेशशी  संपर्क असावा.कारण सुमीच्या व तिच्या वडिलांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच गोपाळ कल्याणीला भेटायला आणि विशेषतः आपल्या सर्वात लहान मुलीला सीमाला दिलासा द्यायला शहरात आला होता. सुमीचे व सासऱ्यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर मात्र गोपाळ  उद्विग्न झाला आणि कल्याणीची परवानगी घेऊन पुन्हा हिमालयात निघून गेला.सीमाला गरज असेल तेव्हा मी परत येईन असे आश्वासन त्याने कल्याणीला दिले होते.कल्याणीला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा तिने गोपाळला पुन्हा घरी येण्याबद्दल निरोप पाठवला.गोपाळ कल्याणीची सेवा करायला शहरात आला आणि मग अरूचे लग्न ठरले म्हणून शहरातच थांबला होता. कल्याणीचा मृत्यू झाल्यानंतर सीमाला भावनिक आधार देण्यासाठी गोपाळला शहरात थांबावे लागले.दरम्यान अरूचा नवरा रोहितने कल्याणीच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार जुना बंगला पाडून तिथे नवे अद्ययावत पण जुन्या शैलीतील घर बांधले होते. ज्यात सीमाला आणि गोपाळला एक फ्लॅट मिळाला.  गोपाळला शहरातच त्याच्या आवडीची काही कामेही मिळू लागली.  बंगल्यात चारूसाठी ठेवलेल्या फ्लॅटमध्ये कस्तुरी नावाची एक मध्यमवयीन स्त्री राव नावाच्या वृद्ध पत्रकाराला सोबत घेऊन रहायला आली.ती नेमकी गोपाळच्या गावची म्हणजे जोगीपूरची होती. कस्तुरीचा स्वच्छ,मोकळा स्वभाव गोपाळला आवडू लागला.  कस्तुरीचा सहवास , तिच्याशी गप्पा मारणे त्याला आवडू लागते. चारूला गोपाळला नवीन जोडीदार असणे यात काही गैर वाटले नाही. अरूला मात्र ते खटकले होते.

कस्तुरीचे एक उपकथानक कादंबरीत आहे.कस्तुरी पाटील ही जोगीपूर या गावातील एका लिंगायत जमिनदाराची मुलगी आहे. तिचे वडील कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार असल्याने गावात त्यांना मोठा मान होता.कस्तुरीला वसंत नावाचा एक भाऊ होता.आपल्या मुलांना पाटीलांनी इंग्रजी शाळेत घातले होते.कस्तुरीला कन्नड वगळता अन्य भाषा शिकण्यात अजिबात स्वारस्य नव्हते.ती एक हुड, मस्तीखोर मुलगी होती. पण इंग्रजी शाळेत जेव्हा अन्य सहाध्यायी तिची खिल्ली उडवत होते तेव्हाच मायरा नावाच्या ऍंग्लो इंडियन मुलीने कस्तुरीला इंग्रजी शिकवण्याचा जणू विडाच उचलला. मायराची आई बेलिंदा महाविद्यालयात इंग्रजी शिकवत होती. मायराने  गळ घातल्याने ती कस्तुरीला इंग्रजी शिकवू लागली. त्यानिमित्ताने कस्तुरी आपल्या पारंपरिक वळणाच्या कुटूंबातून बाहेर पडून आधुनिक विचारांच्या कुटुंबात रमू लागली. इंग्रजीची गोडी तिला लागली नाही पण मायरा आणि  तिची  बहीण डेलिया  यांच्याशी तिची दोस्ती झाली.या मुली पुढील शिक्षणासाठी मुंबईत गेल्या तेव्हा कस्तुरीने वडिलांना गळ घालून स्वतःही शिक्षणासाठी मुंबईत स्थलांतर केले.तिथे पत्रकारीतेचे शिक्षण ती घेऊ लागली. मायरा व तिच्या बहिणींबरोबर रहात असताना कस्तुरी धीटपणे त्यांच्या ख्रिस्ती मित्रमंडळीत वावरू लागली. त्यातच नील हा तरूण तिला आवडू लागला. त्या दोघांच्या एकत्र असण्याबद्दलची कुणकुण कस्तुरीच्या वडिलांना लागली तेव्हा त्यांनी तडकाफडकी कस्तुरीला जोगीपूरला बोलावून घेतले. त्याच दरम्यान कस्तुरीच्या आईचे निधन झाले असल्याने वडिलांनी एका बाईशी संबंध ठेवले होते. खरं तर कस्तुरीचे वडील जात-धर्म न मानणारे होते. त्यांचा खास मित्र इब्राहिम होता आणि त्यांना शेतात हरप्रकारची मदत करणारा विश्वासू माणूस पिटर हा  ख्रिश्चन होता.पण ठेवलेल्या बाईने कस्तुरीच्या वडिलांना इतके प्रभावीत केले होते की तिच्या सांगण्यावरून त्यांनी कस्तुरीचा नीलशी विवाह लावण्यास विरोध केला.कस्तुरीचे शिक्षण थांबवले आणि तडकाफडकी तिचा विवाह लावण्याचे ठरवले. आपल्या वडिलांचे हे निर्णय कस्तुरीने नीलला कळवले तेव्हा तो तिला भेटायला आला. गावातील नदीकाठी ते दोघे फिरायला गेले असताना अचानक नदीत सोडलेल्या धरणाच्या पाण्याने नदीत पाणी एवढे वाढले की काही कळायच्या आतच नील नदीत वाहून गेला. कस्तुरी हतबल झाली. आपल्या पोटात नीलपासून गर्भ वाढतो आहे याची कल्पना असतानाही तिला वडिलांनी ठरवलेल्या माणसाशी लग्न करावे लागले.या माणसाच्या क्रूर वागण्याच्या वेदना कस्तुरीला सहन कराव्या लागल्या. तिला झालेला मुलगाही तिच्यापासून तोडण्याचा सासूचा प्रयत्न पाहून कस्तुरीला कोंडमारा असह्य झाला. एका रात्री मुलाला तिथेच ठेवून कस्तुरीने घरातून पलायन केले. रेल्वे स्टेशनवर ज्या बाकावर ती विमनस्कपणे बसली होती त्या बाकावर शेजारी बसलेल्या माणसाला तिने तिकीट काढून देण्याची विनंती केली. त्याने तिला तिकीट तर काढून दिलेच पण पुढे आपल्या वर्तमानपत्रात नोकरीही दिली.या राव नावाच्या माणसाने कस्तुरीला कन्नड भाषेतून लिहिण्याचा आत्मविश्वास दिला. पण त्याचवेळी त्याने कस्तुरीवर अधिकार गाजवून तिचा लैंगिक सुखासाठी वापरही केला. आपल्या अधःपतनाला कंटाळून कस्तुरी जेव्हा रस्त्यावर गाडीखाली आत्महत्या करायला गेली तेव्हा राजू रिक्षावाल्याने तिला वाचवले, आपल्या घरी नेले आणि उपचार केले.

नवी प्रसारमाध्यमे कस्तुरीलाही आकर्षित करू लागली. काही काळाने कस्तुरी नव्या आत्मविश्वासाने टी.व्ही.सारख्या माध्यमात मालिकांचे लेखन करू लागली, मुलाखती घेऊ लागली.  लोकप्रियतेने तिला जगण्याची नवीन जिद्द दिली.

मायरा आणि तिच्या बहिणी,आई पुन्हा एकदा कस्तुरीच्या संपर्कात आल्या. कस्तुरीला तिच्या चुका दाखवून देणारी आणि तरीही तिला आहे तशी स्वीकारणारी मायरा बहिणीसारखीच वाटू लागली. मायराचे रंजन या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झाले ,तिला मुले झाली पण कस्तुरी त्यांच्या घरातलीच होऊन गेली.मायराला कर्करोग झाल्याचे कळल्यावर तर कस्तुरी तिची आणि तिच्या वृद्ध आईची बेलिंदाचीही काळजी घेत होती.

मायराच्या धाकट्या बहिणीच्या डेलियाच्या वाट्याला तरूण वयात वैधव्य आले .पण तरीही तिने कणखरपणे आपल्या मुलांना वाढवले. नवऱ्याची स्वतःची जाहिरात कंपनी नावारूपाला आणली आणि मग मुलगी मॅगी देखील त्या कंपनीतच काम करू लागली.या मॅगीमुळेच अरूची धाकटी बहीण सीमाला जाहिरात क्षेत्रात एका मोठ्या ब्रँडचे मॉडेल म्हणून काम करायला मिळणार होते.कस्तुरीच्या ओळखीतूनच हे झाले होते.अरूच्या मनात त्यामुळे कस्तुरीबद्दल आपुलकी निर्माण झाली होती.

कस्तुरीवर अधिकार गाजवून तिचे एकेकाळी शोषण करणारा संपादक राव वृद्धापकाळात तिच्याच आश्रयाला आला. त्याची परदेशी असणारी मुलगी येऊन त्याला घेऊन जाईपर्यंत त्याला सांभाळण्याची जबाबदारी कस्तुरीने घेतली. योगायोगाने कस्तुरीने भाड्याने जो फ्लॅट  घेतला  तो होता अरू आणि रोहितने कल्याणीचा जुना वाडा पाडून बांधलेल्या नव्या घरातील अरूच्या बहीणीचा चारूचा फ्लॅट. चारू आणि तिचा नवरा ऋषी अमेरिकेत स्थायिक झालेले असल्याने त्यांनी आपला फ्लॅट भाड्याने दिला होता.चारूच्या शेजारचा फ्लॅट होता अरूची सर्वात लहान बहीण सीमाचा. अरूचे वडील गोपाळ अरूच्या लग्नानंतर सीमाला सोबत म्हणून तिच्याबरोबर राहू लागले होते. अशाप्रकारे कस्तुरीचा अरूच्या घरात आणि अरूचे वडील गोपाळ यांच्या जीवनात अचानक प्रवेश झाला.आयुष्यात अनेक विपरीत अनुभव घेतलेल्या कस्तुरीचे मनमोकळे वागणे गोपाळला नकळत आवडू लागले आणि कस्तुरीच्या सहवासात त्याच्या पश्चात्तापदग्ध मनाला जणू गारवा मिळू लागला.

कस्तुरीचा भाऊ वसंत आय.ए.एस. अधिकारी म्हणून निवृत्त झाला होता.  निवृत्तीनंतर तो पुन्हा आपल्या जोगीपूरा या गावी गेला होता.तिथे घराची दुरवस्था पाहून  त्याने घर पुन्हा नव्याने बांधून घेतले होते. तो आणि त्याची पत्नी शालिनी आता जोगीपूरमध्येच रहाणार होते. शालिनीला राजकीय महत्त्वाकांक्षा होती. आपण किंवा कस्तुरीने निवडणुकीला उभे राहून पुन्हा एकदा जोगीपूरामध्ये आमदार पाटलांच्या मृत्यूनंतर हातातून गेलेली सत्ता परत मिळवावी असे शालिनीला वाटत होते.ती कस्तुरीला सतत जोगीपूराला बोलावत होती. कस्तुरीलाही जोगीपूरची ओढ वाटतच होती. अब्राहम चाचांनी कस्तुरीला आणि तिच्या वहिनीला राजकीय महत्त्वाकांक्षा कशी उपयोगाची ठरणार नाही पण गावातील महिलांमध्ये सामाजिक जागरूकता मात्र त्या दोघी निर्माण करू शकतात हे सुचवले होते.जोगीपूरहून रेल्वेने परत शहरात येत असताना कस्तुरीला एका स्टेशनवर  आपला एकेकाळचा नवरा दिसला. त्याच्यासोबतचा तरूण हा आपलाच मुलगा असणार असा अंदाज तिने बांधला.आपल्या  मुलाला परत भेटावे असे तिला तीव्रपणे वाटू लागले. अब्राहमचाचांकडून तिला तिचा एकेकाळचा नवरा कर्करोगाने आजारी आहे आणि शेवटचे काही दिवस मोजतो आहे हे कळले. तिला वाटले की त्याचे निधन झाले की आपण मुलाला भेटावे. आपली इच्छा ती फक्त गोपाळला सांगू शकली होती. कारण गोपाळच तिला जीवाभावाचा वाटू लागला होता. गोपाळचे बालपण आणि शिक्षण जोगीपूरात झाले आहे हा एक दुवाही तिला गोपाळशी जोडणारा ठरला होता.

अरूचा विवाह होऊन काही वर्षे उलटली होती तरी तिला मुल झाले नव्हते. दरम्यान तिची धाकटी बहीण चारूला पवन हा मुलगा झाला होता. चारूच्या बाळंतपणासाठी अरू अमेरिकेत जाऊन आली होती. छोट्या पवनला घेऊन चारूही सर्वांना भेटायला काही दिवस भारतात येऊन गेली होती. अरूला अपत्यप्राप्तीची लागलेली आस तिला जाणवली होती. आपला पवन अरूने ठेवून घ्यावा किंवा अरू-रोहितचा गर्भ आपण आपल्या पोटात वाढवण्याचा-सरोगसीचा  मार्गही तिने अरूला सुचवला होता. पण अरूला स्वतःचे मुल स्वतः जन्माला घालायचे सुख हवे होते.मुंबईत जाऊन तिने आणि रोहितने तपासण्या करून घेतल्या होत्या. पण पुढील खर्चिक उपाय आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया दोघांनाही नकोशा वाटल्या होत्या. दत्तक मुलाचा प्रस्ताव रोहितने सुचवला होता पण अरूला तोही पटत नव्हता.

अरू आपल्या वकिलीत व्यस्त होती. पण अधूनमधून  मुल नसल्याचे दुःख तिला सतावत होते.नगमा ही तिची सहकारी आणि चांगली मैत्रीण दुसऱ्यांदा गरोदर आहे हे कळल्यावर तिला तिचा मत्सर वाटला होता. एका चित्रकाराच्या प्रदर्शनातील आई व मुलाचे चित्र अरूला व्याकूळ करून गेले होते.तिच्या या दुःखात रोहित तिला मूक साथ देत होता पण ती साथ समजून घेण्याचे व रोहितवर प्रेम करण्याचे औदार्यही आपण हरवून बसतो आहोत आणि त्यामुळे रोहित आणि आपल्यात हळूहळू एक दरी निर्माण होत आहे याची अंधुक जाणीव अरूला होऊ लागली होती.

याच दरम्यान अरूची आणखीन एक सहकारी ट्रेसा हिचा दहशतवाद्यांनी एका मॉलच्या आवारात ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात मृत्यू झाला.ट्रेसाची मुलगी ग्रेसीचे सैरभैर होणे अरूने पाहिले. ट्रेसाचा नवरा रामूच्या वाट्याला एकट्याने ग्रेसीला सांभाळताना आलेली हतबलता अरू पाहत होती. एका बाजूला प्रेमी मावशीच्या अती काळजीमुळे तिचा मुलगा निखिल कसा गैरवर्तन करत आहे हे अरूला दिसत होते. रोहितचा भाऊ रवी स्थिरस्थावर न झाल्याने त्याच्या आईला वाटणारी खंत अरूने पाहिली होती.चारूची पवनला वाढवताना होणारी चीडचीडही तिने पाहिली होती. मुल सर्वांच्या आयुष्यात आनंदच आणेल असे नाही हे अरूला कळत होते. मुलाच्या बाबतीत अरू एका बाजूला हळवी तर दुसऱ्या बाजूला साशंक झाली होती.या सगळ्या द्विधा अवस्थेत तिच्या मनाला दिलासा देणारा रोहित तिच्यासोबत होता.रोहितलाही मुलाची आस लागली आहे हे अरूला कळत होते. शेवटी मुल आपले स्वतःचे नसले तरी आपण त्याच्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करू शकू याबद्दल मनाची खात्री पटल्यावर अरूने रोहितचा मुल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला होता.

जुने वर्ष सरून नवे वर्ष येणार होते. मुल दत्तक घेण्याच्या निर्णयाने अरू-रोहित दोघेही आशावादी झाले होते. पण दुर्दैवाने त्याच दिवशी रात्री अरूची बहीण सीमावर काही मुलांनी सामुहिक बलात्कार केला आणि तिला घराच्या दरवाजात आणून टाकले होते. सीमाला या स्थितीत पहिल्यांदा पाहिले ते गोपाळ आणि कस्तुरीने. तिला घरात आणून कसेबसे झोपवतानाच तिच्यावर बलात्कार झाल्याचे त्यांना लक्षात आले होते. काही तासांपूर्वी सीमा तिचा मावसभाऊ निखिलबरोबर नववर्षाच्या पार्टीला जाताना त्यांनी पाहिले होते. निखिलचा संपर्क होत नव्हता आणि सीमाची झालेली हालत पाहून तिला इस्पितळात हलवायचे तर पोलिसात तक्रार देणे आवश्यक झाले असते. तशी तक्रार निखिललाही अडचणीत आणणारी ठरली असती. त्यामुळे पेचात पडलेल्या अरूला सीमाच्या वेदनेने व तिच्या भविष्याच्या चिंतेने अस्वस्थ केले होते.सीमाची बदनामी होईल, तिच्या करीयरचे नुकसान होईल याचे भयही अरूला वाटत होते. निखिलचा ठावठिकाणा लागला तेव्हा त्याच्या काही मित्रांनी त्याला फसवून सीमाला कसे एका खोलीत कोंडले व तिच्यावर अत्याचार केले ते सर्वांना कळले. या मुलांबद्दल पोलिसांत जावे का असा पेच सर्वांनाच पडला. सीमाने स्वतःच अशी तक्रार करू नये असे सांगितले आणि निखीलचा यात काही दोष नसल्याचेही स्पष्ट केले.तिला होणाऱ्या शारीर व मानसिक वेदनांशी सीमा स्वतःच सामना करणार होती. ती कणखरता तिने दाखवल्याने सर्वांचीच चिंता मिटली होता. सीमा नवीन कामासाठी तिचा जुना फोटोग्राफर मित्र लिओसोबत मुंबईला गेली आणि अरू-रोहित, गोपाळ सर्वांनाच हायसे वाटले.

अरू आणि रोहितने एक नवजात मुलगी दत्तक घेतली.या मुलीचे संगोपन कसे करावे या संभ्रमात असणाऱ्या अरूला सुरूवातीला कस्तुरीची मदत मिळाली. नंतर तिची बॉंब स्फोटात निधन पावलेली मैत्रीण ट्रीसा हिचा नवरा रामूने त्याच्या आईला सांगून अरूला एक गावातील मुलगी बाळाला सांभाळायला मिळवून दिली. रोहितच्या आईला रोहित- अरूने आणखी एक मुलगा दत्तक घ्यावा असे वाटले. सुदैवाने त्यांना एक मुलगाही दत्तक घेता आला. कल्याणी आजीला वाटत होते तसा ‘विश्वास’ बंगला शापातून जणू बाहेर आला होता आणि लहान मुलांच्या खेळाने, मस्तीने गजबजून गेला होता.

अरूने कस्तुरीला तिच्या मुलाला भेटायला कायदेशीर मदत करायचे ठरवले. गोपाळ पुन्हा आपल्या हिमालयातल्या आश्रमात जाऊन आला. सर्वांचेच आयुष्य आपापल्या मार्गाने पुढे सरकत राहिले.

कथासूत्रेः

शॅडो प्ले या कादंबरीतील कथासूत्रे पुढीलप्रमाणे जाणवतात-

१.भिंतीवरील सावल्यांच्या खेळातील सावल्या जशा भराभर रूप बदलतात आणि अदृष्य होतात तशाच माणसाच्या आयुष्यातील घटना आणि त्यातून त्यांच्या वाट्याला येणारी सुख-दुःखे भरभर रूप बदलतात, अदृष्यही होतात.काहीही झाले तरी जीवन अप्रतिहत पुढे सरकतच राहते. असे लेखिकेला या कादंबरीतून सुचवायचे असावे.

२. स्त्रिया ज्या वरवर दुबळ्या वाटतात त्या प्रतिकूल परिस्थितीत अतिशय कणखर होतात आणि आपापसातील भांडणे विसरून जबाबदारीने परिस्थिती हाताळतात. जिद्दीने आपली आयुष्ये घडवतात असेही शशी देशपांडे ‘शॅडो प्ले’ या कादंबरीतून सुचवत आहेत.

३. प्रेम तर माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहेच पण त्याहीपेक्षा अधिक त्याचा आशावाद त्याला जीवनात पुढेपुढे नेत असतो हेही ही कादंबरी सांगते.

४. नैतिक -अनैतिक,चूक-बरोबर या चर्चेपलीकडे  जीवन जगण्याची लालसा माणसात प्रबळ असते आणि तीच माणसाला पुढेपुढे नेत असते. या प्रवासात माणसे चुकतात-सुधारतात,तडजोड करतात,हट्टाला पेटतात,जिद्दीने उभी रहातात आपल्या सोबतच्या मित्र-मैत्रिणींच्या सुख-दुःखात साथ देतात,कधी दुःख तर कधी शांत समाधान मिळवतात असेही ‘शॅडो प्ले’ ही कादंबरी दाखवते.

अशाप्रकारे ‘शॅडो प्ले’ या कादंबरीतून  गतीमान जीवनप्रवाहात आपला समाधानाचा,आनंदाचा मार्ग शोधून अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने पोहत राहणारी माणसे वाचकांना पाहता येतात.

तुम्ही ही कादंबरी मूळातून वाचावी ही विनंती. याचा पहिला भाग म्हणजे ‘अ मॅटर ऑफ टाईम’ ही कादंबरी मराठीत ‘अशी काळवेळ’ या नावाने अनुवादीत झालेली आहे. तीही तुम्हाला आवडेल.

पुढील ब्लॉगमध्ये ‘शॅडो प्ले’ या कादंबरीच्या कथनाचा आणि लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा शोध घेऊ.

-गीता मांजरेकर

——————————————————————————————————————————————————————————————–

2 प्रतिसाद

  1. कादंबरी जरी दीर्घ लांबीची आणि व्यामिश्र स्वरूपाची असली तरी, तुम्ही मांडलेल्या कथासूत्रांच्या आधारे ती अधिक ठळकपणे लक्षात येते..घटना किती वेगाने घडतात ना अरुच्या आणि इतर पात्रांच्या आयुष्यात !…आणि किती जिद्दीने ही पात्रे स्वतः ला मानसिकरित्या सावरतात अर्थात त्यांच्या आयुष्यात आलेल्या नवीन नात्यांमुळे ती अधिक मजबूत होतात..

    Like

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.