मागील ब्लॉगमध्ये आपण शशी देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीच्या ‘वाट दीर्घ मौनाची’ (भाषांतरकार-सानिया) या मराठी अनुवादाच्या आधारे कादंबरीचे कथानक व कथासूत्रे जाणून घेतली. आज त्याच कादंबरीच्या कथनाच्या विश्लेषणातून आपण लेखिकेची या कादंबरीमागील अंतर्दृष्टी समजून घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीचे कथन प्रामुख्याने प्रथम पुरूषी आहे.जया ही या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा हे कथन करताना दिसते.कादंबरीच्या कथानकात सामावलेला प्रत्यक्ष काळ अगदी मोजक्या दिवसांचाच असला तरी अप्रत्यक्ष काळ बराच मोठा आहे. तसेच कादंबरीच्या कथानकाच्या अवकाशाबद्दलही म्हणता येईल. हा प्रत्यक्ष अवकाश मुंबईच्या चाळीतील दोन खोल्यांचा असला तरी अप्रत्यक्ष अवकाश दक्षिण भारतातील सप्तगिरी नामक गाव, आंबेगाव, लोहानगर,दक्षिण मुंबईतील अलिशान घर असा बराच मोठा आहे.

जया या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या मनोवकाशातच बहुतांश घटना आणि त्यावरील चिंतन,चिकित्सा होत असल्याने प्रामुख्याने तिची मानसिक आंदोलने ,तिने स्वतःच्या भूतकालातील वर्तनाचे केलेले परीक्षण,सभोवतालाच्या घटनांचा व व्यक्तींच्या वागण्याचा तिने लावलेला अर्थ हेच कादंबरीच्या कथनातून वाचकांसमोर उलगडत जाते.आपल्याला जयाची काही मनोगते वाचत वाचतच तिच्या अंतरंगात डोकावून पाहायचे आहे.
कथनाच्या प्रारंभीच जया म्हणते की एखाद्याला आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल,अगदी संतपद जरी मिळवायचे असेल तरी त्याला कणखर आणि निर्दय व्हावे लागते. खरं तर, जया एक लिहिती लेखिका आहे पण आता तिला जे लिहायचे आहे त्याच्यासाठी तिला शब्द सुचत नाहीत. कसलीतरी भीती तिच्या मनात घर करून बसली आहे.आता जेव्हा ती मनात डोकावून पाहते आहे तेव्हा तिला तिच्या मनाचीच भीती वाटते आहे कारण दहा वेगवेगळ्या कोनातून ते तिला तिचे दहा वेगळे चेहरे दाखवते आहे.
जया एक कथाकार आहे. आजवर तिने ज्या कथा लिहिल्या आहेत त्या प्रियकर प्रेयसीच्या गोड मीलनाच्या कपोलकल्पित कथा आहेत.स्वतःचे अनुभव तिने कधी व्यक्त केलेले नाहीत. कारण या अनुभवांकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे तिला जमत नाही. पण आता ज्या परिस्थितीत ती अडकली आहे ती समजून घेऊन मार्ग काढण्यासाठी स्वतःकडे कठोरपणे, वस्तुनिष्ठपणे पाहणे जयाला आवश्यक वाटते आहे.
जयाने आपली खास आवड जपलेली नाही.कारण आधी तिच्या वडिलांनी आणि नंतर नवऱ्याने तिच्या आवडी फार उथळ असल्याचे तिला सांगितले आहे. आपल्या आवडींबद्दल जयाच्या मनात न्यूनगंड तयार झाला आहे.आपल्याला सिनेसंगीत आवडे पण आपले वडील त्याला ‘भिकार आवड’ म्हणत हे जयाला आठवते. जयाला चित्रपट सुरू होण्यापूर्वी ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या आवडतात पण तिच्या नवऱ्याला त्या अजिबात आवडत नसंत.जयाला त्या जाहिरातीतील सुखी, चौकोनी कुटुंब आवडे. पण आताशा तिला स्वतःच्या चौकोनी कुटुंबातील तोचतोचपणा कंटाळवाणा वाटू लागला होता.ती स्वतःशी म्हणते –
“ते कौटुंबीक आयुष्य मला अगदी असह्य होत असे.सगळ्यात सहन न होणारी गोष्ट म्हणजे त्याच त्या चौकटीचा न संपणारा कंटाळा.. एकसुरीपणा.. कितीदातरी मी मनातल्या मनात एखाद्या वादळाची,तुफानाची …आम्हाला आमच्या पक्क्या रूतलेल्या साच्यातून हलवून बाहेर काढेल असल्या काही बदलाची इच्छा केलेली होती…आमचं आयुष्य म्हणजे नुसतं जगायचं. एक पाऊल पुढे की दुसरं पाठोपाठ. नुसतं पुढे चालायचं… सरळ रेषेत..निमूटपणे मरण यायची वाट पाहत नुसतं आपलं जगायचं.”
आजवर जया मोहनच्या म्हणण्यानुसार जगत आली होती.पण आता जेव्हा मोहनच्या नोकरीत त्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊन त्याच्यावर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली होती तेव्हा मात्र या वादळाला सामोरे जाण्याचे धैर्य जयाकडे नव्हते.उलट मोहनच्या नोकरीतील असुरक्षितेमुळे जया अस्वस्थ झाली होती, चिडली होती. ती म्हणते-
“तो कसा वागला आमच्याशी आणि त्यामुळे आमच्यावर काय गुजरणार होती. इतक्या वर्षांच्या निमुटपणाचा बदला म्हणून मीच त्याच्या तोंडावर त्याचेच शब्द फेकायला हवे होते.एखादा तुडवलेला किडा परत चावायला उठतो तसं.पण खरंच का मी तुडवलेला किडा होते ?”
मोहनने त्याच्या कार्यालयात केलेल्या भ्रष्टाचारात तो पकडला जाईल याची जाणीव झाल्यावर त्यांचे चर्चगेटचे सरकारी वसाहतीतले घर सोडून काही दिवस जयाच्या मकरंदमामांच्या घरी रहायला जाण्याचा निर्णय घेतला होता.दादरच्या चाळीतील त्या घराचा जिना मोहनसह चढताना जयाला जाणवले होते की ती आता स्वतःकडे अलिप्तपणे पाहू शकते आहे.आपल्याला जाहिरातीतील सुखी कुटुंबचित्राचा भाग व्हायला आवडलं असतं पण प्रत्यक्षात आपण आणि मोहन अशा सुखी कुटुंबातील नवरा -बायको नसून केवळ एक स्त्री-पुरूष आहोत अशी जाणीव जयाच्या मनाला झाली होती. ही तिला वास्तवाचे भान येण्याची सुरूवात होती आणि आश्चर्य म्हणजे त्या वास्तवभानाने तिला मोकळे वाटत होते. आता तिला सुखी कुटूंबातील स्त्रीची प्रतिमा जपून घराची स्वच्छता, टापटीप ठेवावी लागणार नव्हती. आपण कित्येक वर्षांनी स्वतंत्र झालो आहोत असं जयाला वाटत होतं.जयाला जाणवले की आज मोहनने मागूनही दादरच्या ब्लॉकची चावी तिने स्वतःच्या हातातच ठेवली होती नी स्वतःच दरवाजा उघडला होता.मोहनचा अधिकार मानणे जणू तिने बंद केले होते. पण तो अधिकार सोडणार होता का ? तिला परतंत्र मोहनने केलं होतं ? की ती स्वतःच स्वेच्छेने परतंत्र झाली होती असा प्रश्न जयाच्या मनात निर्माण झाला असावा. या प्रश्नाचे उत्तर स्वतःलाच देताना ती म्हणते –
“…पण मीच नव्हत्या का त्या वस्तू जमवल्या ? मीच नव्हते का त्यांच्या मागे लागले ? नाही ते खरं नाही पूर्णपणे. मोहन आणि मी आम्हा दोघांनाही हे सारं हवं होतं. नाही ते पण पूर्ण खरं नाही. खरं तर मोहनलाच काय हवं आहे याची स्पष्ट कल्पना होती. कसं आयुष्य जगायचं ,घर कसं हवं हे त्याला पूर्णपणे माहीत होतं आणि मी फक्त ‘हो ला हो’ म्हणत गेले..”
मोहनला सुखात जगायचे होते कारण त्याचे बालपण दारिद्र्यात आणि निष्प्रेम गेले होते.तो पैसे कमावून सुखे मिळवण्यासाठी धडपडला होता.मात्र आता ज्या परिस्थितीत आपण अडकलो आहोत त्याला फक्त मोहन कारणीभूत आहे असे म्हणणे म्हणजे स्वतःशी प्रतारणा करणे होईल हेही जयाच्या अंतर्मनाला कळत होते. तिला याज्ञवल्क्याची आणि त्याच्या पत्नीची मैत्रेयीची गोष्ट आठवत होती. ती म्हणते –
“मला मैत्रेयीची आठवण येते. मैत्रेयीने तिच्या तत्वज्ञानी नवऱ्याची -याज्ञवल्क्याची -अर्ध्या मालमत्तेची सूचना साफ नाकारली होती.यामुळे मला अमरत्व मिळेल का ? तिने विचारलं होतं. त्यानं नाही म्हटल्यावर तिने ताबडतोब ती मालमत्ता नाकारली. काय हवं ते माहीत असणं- मला ते कळालंच नाही.”
कादंबरीच्या कथनात बऱ्याच पुढे जया हे मान्य करते की तिने मोहनने मिळवलेल्या भौतिक सुखांना कधी नाकारलं नाही की ही सुख तो कशी मिळवतो आहे याबद्दल प्रश्न विचारला नाही. कारण तिलाही त्या भौतिक सुखांची आसक्ती होती. कधीतरी रामूकाकांनी महात्मा गांधींच्या साधी रहाणी , उच्चविचारसरणीबद्दल तिला सांगितले होते तेव्हा तिने मनोमन हसत ‘आपल्याला कुठे गांधी व्हायचेय’ असे म्हटले होते.आज जयाला ते आठवते.आपल्याला नैतिकतेची चाड नव्हती, फक्त सुखेच हवी होती म्हणूनच आपण सोयिस्करपणे आंधळेपण स्वीकारले हे जयाला जाणवले आहे. ती म्हणते –
“मोहनला मिळाली ती (मुंबईची) जागा कशी मिळाली ते मी कधी विचारलं नाही. … जर का डोळ्यांवर पट्टी बांधून घेतलेली गांधारी आदर्श पत्नी म्हणवते तर मग मीही आदर्श पत्नीच होते की. माझे तर डोळे मी घट्टच बांधले होते. मला काहीच माहीत करून घ्यायचं नव्हतं. माझ्यासाठी एवढं पुरेसं होतं की आम्ही मुंबईला गेलो, राहुल नि रतीला चांगल्या शाळेत पाठवू शकलो. जे काय हवं ते सतत मिळत गेलं… चांगले कपडे, फ्रिज, गॅस,पहिल्या दर्जाचा प्रवास …..याज्ञवल्क्यानं मैत्रेयीला सांगितलं, तुझं आयुष्य मालमत्ता असलेल्या कुणाच्याही आयुष्याप्रमाणे असेल. याहून अधिक काय हवं असतं ? अमरत्व ? ते आणखी कशाला हवं ?”
जयाला हे स्वतःशी मान्य कारावंच लागलं होतं की तिला मोहनच्या पापाची भागीदार होणं भाग होतं. त्याच्या कर्माची वाटेदार तीही होती.तिला वनिता मामीने तिला तिच्या लग्नाआधी नवरा म्हणजे ‘आधारवड’ असतो असा उपदेश केलेला आठवतो. आपण स्वतःला आधुनिक, स्वतंत्र स्त्री म्हणवतो पण वस्तुतः आपणही नवऱ्याला ‘आधारवड’ मानूनच संसार केला आणि त्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व स्वतःच गमावून बसलो याची कडवट जाणीव जयाला होते . ती स्वतःशी म्हणते –
“आधारवड… म्हणजे आपणच त्या वृक्षाला जिवंत आणि फळतंफुलतं ठेवायला हवं. मग भले त्याच्या मुळाशी असत्याचं आणि फसवाफसवीचं पाणी घालून का होईना. हेही मग तार्किकच… पण मग सप्तगिरीला आपल्याकडे वेल होती. अतिपाण्याने, खतातील वाळवीने तिची मुळंच नष्ट झाली. मग ?”
आपण आपल्या आनंदासाठी, सुखांसाठी, सुरक्षिततेसाठी मोहनवर अवलंबून राहिलो.आणि ही सुखासीनता, अती सुरक्षितताच आपल्या मूळ सत्वाला संपवणारी ठरली हे जयाला कळते आहे.
मोहनचं म्हणणं होतं की त्याने जयासाठी आणि मुलांसाठी पैसा मिळवला. त्याला जे लहानपणी मिळालं नाही ते मुलांना मिळावं म्हणून त्याने आटापिटा करून पैसा कमवला.आता ज्या परिस्थितीत मोहनमुळे जया अडकली होती त्यात तिला मोहनच्या या म्हणण्याचा फक्त राग, चीडच येत होती.मोहनने आपल्याला गृहित धरलं असं तिचं एक मन म्हणत होतं पण त्याचवेळी आपणही मोहनमागे निमुटपणे जात राहिलो कारण ते आपल्याला सोयीचे होते हे सत्यही तिला नाकारता येत नाही. ती स्वतःशी म्हणते –
“मला आठवतं की त्याने हे गृहीतच धरलं की मी त्याच्या बरोबर असेन… आणि मीही नवऱ्यामागे वनवासाला निघालेली सीताच जणू… यमापाठोपाठ नवऱ्याचे प्राण मिळवायला धावलेली सावित्री, आपल्या नवऱ्यांच्या कपटात निवर्विकारपणे सहभागी होणारी द्रौपदी.. छे,छे या पुराणकाळातल्या बायकांशी मला काय देणं-घेणं आहे ? मी फक्त मलाच फसवू शकत नाही . सत्य अगदी साधं आहे … एका जोखडाला बांधलेले दोन बैल. एकाच दिशेने जाणं दोघांनाही अधिक सोयीचं आहे. निरनिराळ्या दिशांना जाणं जास्त कष्टाचं आणि कुणा प्राण्याला आपणहून दुःख विकत घेणं आवडेल ?”
मोहन आणि जया दोघांनाही एकाचवेळी मोहनच्या लोहानगरच्या ऑफिसमधील नायर कुटूंबाची आठवण झाली. नायरने काहीतरी भ्रष्टाचार केला होता आणि तो उघडकीला आल्यावर आपली प्रतिष्ठा लयाला जाणार आणि आपल्यामुळे आपल्या बायको-मुलांनाही समाजात मान खाली घालावी लागणार हे जाणवलेल्या नायरने बायको आणि मुलांसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता. आपल्यालाही तोच मार्ग स्वीकारावा लागेल असे जया सुचवते तेव्हा मोहन तिला वेड्यात काढतो. आपल्यावर कोणताही कलंक लागणार नाही, आपण सहीसलामत सुटू अशी त्याला आशा होती. जयाला मात्र आता एकदम असुरक्षितता जाणवू लागली होती.आपण आपलं सत्व कधी शोधलं नाही आणि कायम मोहनची बायको म्हणून जगणे पसंत केले कारण त्यात आपल्याला काही कष्ट करावे लागणार नव्हते हे जयाला जाणवते. असे सुरक्षित आयुष्य जगताना आपण मोहनच्या अनैतिक वागण्याबद्दल स्वीकारलेले मौन ही आपल्या सोयीची, स्वार्थाची भूमिका होती हे जयाला ठळकपणे जाणवते.आपण मोहनने लग्नानंतर बहाल केलेले ‘सुहासिनी’ हे नाव मिरवत मृदू,हसऱ्या,सौम्य,प्रेमळ स्त्रीची भूमिका वठवत होतो. पण ही भूमिका आपण आपल्या सोयीची म्हणून स्वीकारली होती. आपल्याला घराबाहेरच्या असुरक्षित जगातील कष्ट नको होते, स्वतःला सिद्ध करण्याची तोशीश नको होती म्हणूनच आपण पूर्णवेळ गृहिणीची भूमिका निवडली होती हे जयाला जाणवते. मात्र अशी निवड करणे हा आपला कावेबाजपणा, धूर्तपणा होता हे सत्य आता तिला बोचते.आता तिला कावळ्या-चिमणीच्या गोष्टीचा तिच्या आईने सांगितलेला शेवट आठवत होता.ती म्हणते-
“शेवटी चिमणी घेते का कावळ्याला आत ? मी आईला विचारलं. हो तर घेते की … हां आठवलं … काय होतं की चिमणी शेवटी म्हणते , ये बाबा आत. भिजलायंस ना सगळा.. बिचारा … आणि मग ती नुकत्याच पोळ्या केलेला तवा दाखवते त्याला .. शेक घे त्यावर असं म्हणते आणि मग तो मूर्ख कावळा बसतो तव्यावर नि चटके खाऊन भाजून मरतो….मुली अहंमन्य, घमेंडी, ऐटबाज अशा चिमण्या होऊन जातील (ही गोष्ट ऐकून)..आपली घरं, मुलं-बाळं यांची देखभाल करणाऱ्या.. त्या जगाची पर्वाच करणार नाहीत.घरी रहा, मस्तपैकी ,मुलाबाळांत रमा, बाहेरचं जग बाहेरच राहू द्या की तुम्ही सुरक्षित राहाल. त्या बिचाऱ्या मूर्ख सुहासिनीने असाच विश्वास ठेवला. आता मला शहाणपण आलं आहे. आता माहीत आहे मला की सुरक्षा अप्राप्य आहे. तुम्ही कधीच सुरक्षित नसता …”
जयाला हे कळत होतं की आपण नेहमीच सोयीच्या अशा ‘मोहनची बायको’, ‘मुलांची आई’ या भूमिका वठवत राहिलो आणि आता या भूमिका अंगाशी येत आहेत हे लक्षात आल्याने आपलं मन सैरभैर झाले आहे. पण या भूमिका नाकारल्या तर आपण कोण असणार आहोत हे मात्र जयाला कळत नाही.ती म्हणते –
“….आमच्या आयुष्याचा आधारच सुटल्यासारखा झाला होता. त्याचं नेहमीचं रूटीन,फाईल्स,टेलिफोन्स.अपॉईंटमेंटस या सगळ्याशिवाय तो कुणीच नव्हता. माझा नवरा म्हणून असणारा माणूस तर नक्कीच नव्हता. ज्याच्या इच्छा आणि गरजांभोवती माझं आयुष्य फिरत होतं. त्याला आता कसलीच गरज उरली नव्हती. तेव्हा मला करण्याजोगं , मी केलंच पाहिजे असं काहीच उरलं नव्हतं. माझी बायको म्हणून असलेली भूमिकाच धोक्यात आली होती. ती बाई -जी खरेदी करे, स्वयंपाक करे, झाडझूड करणं, घर लावणं, आवरणं करे, घराची कुटुंबाची काळजी वाहे- इतकं तनमन वेचून … ती कुठे गेली …”
आपल्या वागण्याचा विचार करताना, मनाशी आपल्या चुका कबूल करताना जयाचे मन भूतकाळात जाते तिला स्वतःची आई कशी सोयीसोयीने खोटे बोले, मकरंदमामाचा ब्लॉक तिने वनितामामीला मिळू न देता कसा धूर्तपणे हस्तगत केला हे आठवते. मोहनच्या आईने मूकपणे तिच्यावर लादलेली बाळंतपणे सहन केली आणि शेवटचं बाळंतपण नाकारताना घेतलेल्या औषधानेच तिचा बळी घेतला हे जयाला आठवते. मोहनची बहीण विमल मुल होत नाही म्हणून सासरच्यांनी दिलेली दुषणं , खंत मूकपणे सहन करत राहिली आणि कॅन्सरचा आजार झाल्याचे कुणालाही न सांगता वेदना सहन करत मरण पावली ते जयाला आठवते.आपल्या दोन्ही विधवा आज्या जो मान नवऱ्याकडून मिळाला नाही त्याची अपेक्षा मुलांकडून करत दुराग्रही, दुष्ट झाल्या असे जयाला जाणवले आहे. तिच्या दादरच्या घरी कामाला येणारी जिजा दारूड्या नवऱ्याने केलेली मारहाण, वांझ म्हणून तिला दिलेली दुषणे सहन करत, नवऱ्याने आणलेल्या सवतीच्या मुलाचा, सुना-नातवंडांचा सांभाळ करत केवळं जिवंत रहायचं या ध्येयाने निमूट जगते आहे हे जयाला दिसले.शेजारच्या केळकरांचा सतीश अकाली गेल्यावर त्याची बायको मुक्ता उपासतापास करते पण कामतच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभी राहून मूकपणे जबाबदारी पेलते आहे हेही जया पहाते. या सगळ्या सभोवतीच्या बायकांच्या तुलनेत आपण अधिक सुविद्य, अधिक अनुकलता मिळालेल्या असूनही केवळ सोयीसोयीने सोप्पी भूमिका निभावत राहिलो आणि स्वत्व विसरलो ही आपलीच चूक आहे, पराभवाची भीती बाळगून आपण नेहमी सामान्य दर्जाचे लिहीत राहिलो हा देखील आपलाच दोष आहे हेही जयाला कळले आहे. आपल्यापेक्षा आपला छोटा मुलगा राहुल तसंच मुक्ताची मुलगी निलीमा अधिक स्वतंत्र आहेत, बंडखोर आहेत, त्यांना ढोंगीपणा आवडत नाही , स्वत्वाला ते सोडत नाहीत,स्पष्टपणे बोलतात, न घाबरता कृती करतात हेही जयाला लक्षात येते.

जया आपल्या परिस्थितीची खिल्ली उडवते आहे, तिला आपली पर्वा नाही असे वाटून मोहनने दादरच्या घरातून अचानक निघून जाणे, राहुलने अशोक- रूपाबरोबरच्या ट्रीपमधून अचानक बेपत्ता होणे हे धक्के जयाला असुक्षितपणाची जाणीव करून देणारे आहेत. पण जिजाच्या मुलाच्या इलाजासाठी काही मदत करू शकलो हा प्रसंग जयाला स्वतःपलीकडे नेणारा, इच्छा असेल तर मार्ग निघू शकतो याची जाणीव देणारा आहे.पावसात भिजणाऱ्या मुलीच्या शरीराशी चाळे करत चाललेल्या तरूणांना रोखू पाहताना त्या मुलांनी आणि जिचे शोषण होते आहे असे आपल्याला वाटले त्या मुलीनेही आपली दखल घेतली नाही हा प्रसंग जयाला आपल्या मर्यादाही दाखवतो.आजारपणात मुक्ता, नीलिमा, जिजा, तिची नात सर्वांनी केलेली सेवा जयाला मानवतेचा प्रत्यय देते. आपण ही मानवता प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांपायी कामतसाठी दाखवू शकलो नाही याची खंतही जयाला अस्वस्थ करते.
अखेर राहुल सप्तगिरीला असल्याचे जयाला कळते आणि सगळे ठीक आहे, आपण परत येत आहोत ही मोहनची तारही जयाला दिलासा देते.मोहनला नोकरीतून काढून टाकले जाईल की नाही, सगळ्यांना परत चर्चगेटच्या घरात राहायला जाता येणार की नाही या कशाचीही उत्तरे जयाकडे नाहीत.पण आता किमान तिच्या मनातले भय संपले आहे आणि सत्वाची जाणीव तिला झाल्याने ती समाधानाचा वेगळा मार्गही निवडू शकणार आहे. ती म्हणते-
“जूला बांधलेले दोन बैल- मी नी मोहन इथे रहायला आलो तेव्हा मी आम्हालाच तसं पाहिलं. आता ती प्रतिमा मी खोडून टाकतेय.तशा दृष्टीनं मी जर आम्हाला पाहिलं तर मग आमच्यावरच्याचं अविश्वासाने आमचं आयुष्य कायमचं भरून जाईल….मी नेहमी म्हणत आले – एकच आयुष्य आहे. त्यात माफी नाही. पुन्हा एकदा संधी नाही. पण या एका आयुष्यातच किती तरी रस्ते असतात, किती तरी वाव असतो निवडीला…. ‘यथेच्छसी तथा कुरू’ अप्पा गेल्यानंतर त्यांच्या डायरीत मी ते संस्कृत शब्द पाहिले….तुझी इच्छा असेल ते कर… मला आता समजतं आहे- एवढ्या मोठ्या उपदेशानंतर कृष्णानं अर्जुनाला मानवी आयुष्याचा मंत्र दिला आहे. मी तुला ज्ञान दिलं. आता निवड तू कर. निवडीचं स्वातंत्र्य तुझं. तुझी इच्छा असेल तसं कर.”
अशाप्रकारे अचानक आलेल्या संकटाने सैरभैर, निराश झालेल्या जयाला आत्मशोधानंतर वास्तवाचा सामना करण्याचे धैर्य मिळाले आहे. तसेच स्वतःच्या समाधानाचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपणच घेतले पाहिजे हेही तिला अखेरीस कळले आहे.एकूणच कल्पनारम्यतेत रहाणे,कुणाच्या तरी मागून आंधळेपणाने , निमूटपणाने चालणे आणि मग वाट्याला असुरक्षितता आली तर दुसऱ्यालाच दोष देणे हे चुकीचेच आहे. आपला मार्ग आपण डोळसपणे, विवेकाने निवडला पाहिजे, आपले मत,विरोध ठामपणे मांडला पाहिजे तरच वाट्याला ढोंगी,खोटे, असमाधानाचे आयुष्य येत नाही हेच शशी देशपांडे यांना ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीतून सुचवायचे आहे.
तुम्ही इंग्रजीतून ‘दॅट लाॉंग सायलन्स’ ही कादंबरी वाचावी किंवा मराठीतील त्याचे सानिया यांनी केलेले ‘वाट दीर्घ मौनाची’ हे भाषांतर तरी जरूर वाचावे ही विनंती.आजचा ब्लॉग कसा वाटला याबद्दल प्रतिसादही जरूर कळवावा.
पुढील ब्लॉगमध्ये शशी देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘शॅडो प्ले’ या आणखी एका कादंबरीचे कथानक व कथासूत्रे आपण समजून घेऊ.
-गीता मांजरेकर
_______________________________________________________________

Leave a reply to Divyata Sandav उत्तर रद्द करा.