‘दॅट लॉंग सायलन्स’ ही शशी देशपांडे यांची १९९० साली प्रसिद्ध झालेली कादंबरी.या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.या कादंबरीचा अनुवाद मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार सानिया यांनी १९९६मध्ये, ‘वाट दीर्घ मौनाची’ या नावाने प्रसिद्ध केला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण सानिया यांनी केलेल्या मराठी अनुवादाच्या आधारे ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडलेली आहे.
‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीतील कथन प्रथम पुरूषी आहे.कादंबरीत मध्यवर्ती व्यक्तिरेखा जया हीच कथक आहे.अर्थातच ती या कादंबरीच्या कथानकाची दृष्टीक्षेत्र नियंत्रकही आहे. तिच्याच दृष्टीकोनातून कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखा व घटनांकडे वाचक पाहू शकतो. ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीच्या कथानकाचा प्रत्यक्ष काल केवळ १० दिवसांचा असावा. मात्र अप्रत्यक्ष काल साधारण ५० वर्षांचा आहे.कथानक एकरेषीय नाही. ते सतत वर्तमानातून भूतकाळात जात राहते आणि क्वचित भविष्याचाही अंदाज बांधते. ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीच्या कथानकाचा अवकाश प्रामुख्याने जयाच्या मामांचे मुंबईतील दादर येथील एका जुन्या इमारतीतील घर हे असले तरी कथानक जयाच्या मनोवकाशात अधिक जाते.जयाचे मन भूतकाळात जाते तेव्हा हे अवकाश सप्तगिरी,आंबेगाव या जयाच्या आजोळच्या गावांत जाते आणि काहीवेळा जयाच्या चर्चगेटच्या घरातही जाऊन पोहोचते.

‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीचे कथानक सुरू होते ते जया आणि मोहन आपलं चर्चगेट येथील आलिशान घर सोडून काही दिवसांसाठी जयाच्या मकरंदमामाच्या दादर येथील रिकाम्या घरात रहायला आले आहेत या घटनेपासून.तर या तात्पुरत्या निवासातून जया- मोहन आणि मुले पुन्हा प्रतिष्ठेच्या अशा र्चगेटच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा कथानकाचा समारोप होतो.
मोहनने त्याच्या कामात काहीतरी भ्रष्टाचार केला आहे आणि परिणामी त्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे. म्हणून जया आणि मोहन दोन्ही मुलांना त्यांच्या स्नेह्यांबरोबर पर्यटनाला पाठवून काही काळासाठी जयाच्या दादरच्या मकरंद मामांच्या रिकाम्या घरात स्थलांतरीत झाले आहेत.अनिश्चिततेच्या,भीतीच्या आणि शरमेच्या या काळात जयाचे मन सतत भूतकाळात जात राहते.मोहन या काळात भावनिक आधारासाठी आपल्यावर अवलंबून आहे याची जाणीव जयाला आहे पण त्याला अपेक्षीत प्रतिसाद ती देऊ शकत नाही आणि त्यामुळे चिडून मोहन तिला काहीच न सांगता घरातून निघून जातो. अशावेळी जयाला आपल्या वागण्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक वाटते. नात्यातील पूर्वपिढ्यांतील स्त्रियांच्या वागण्यात आणि आपल्या वागण्यात काय साम्य आहे याचा सतत शोध जया घेत राहते.तसेच मोहनच्या आणि आपल्या नात्याचा तळ ती या काळात शोधत रहाते.
जया ही ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा तिच्या भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देत असताना, तिच्या दोन्ही आज्या, आई, वनितामामी, वनितामामीची बहीण वेणू, वेणूची वेडसर मुलगी कुसुम या स्त्रियांबद्दल सांगते. तसेच जया तिचा नवरा मोहनच्या आईबद्दल, बहिणींबद्दल, तिची मुलगी रती, पुतणी रेवती यांच्याबद्दलही बोलते. याखेरीज तिच्या दादरच्या घरातील शेजारी मुक्ता आणि तिची मुलगी निलीमा यांच्याबद्दल बोलते आणि याच घरात येणारी मदतनीस स्त्री जिजा, तिची सून तारा, नात मंदा तसेच कचरा घेऊन जाणारी नयना या स्त्रियांबद्दलही जया बोलताना दिसते. या सर्व वेगवेगळ्या वयोगटातील,वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांतील स्त्रियांच्या वागण्यातील काही साम्यभेद जया शोधते आहे असे वाटते.स्त्रीच्या विशिष्ट प्रकारे वागण्याला नेहमी पुरूषप्रधान संस्कृतीच कारण असते का की प्रत्येक स्त्रीची वास्तवाचा सामना करण्याची स्वतःच्या सोयीची एक पद्धत असते याचा शोध घेणे असे काहीसे जयाच्या विचारांचे सूत्र असावे. शेवटी स्त्री व पुरूष ही दोन्ही माणसेच असतात आणि आपल्या सोयीचे, स्वार्थाचे वागणे हेच माणसाचे मूळ स्वरूप आहे असे या कादंबरीतून लेखिकेला सुचवायचे असावे.
‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीचे कथानक एका सरळ रेषेत कथन केलेले नसले तरी आकलनाच्या सोयीसाठी आपण ते कालानुक्रमे लावून घेऊ.जया या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचा – कथकाचा जन्म १९३९ साली नेमके दुसरे महायुद्ध घोषित झाले त्याच दिवशी झाला आहे.तिला एक मोठा भाऊ आहे आणि एक धाकटा भाऊ आहे.हे कुटूंब सप्तगिरी या गावचे आहे. आधी एकत्र कुटूंबात असणारे जयाचे अप्पा त्यांच्या विवाहानंतर आईच्या वर्चस्वाचा आपल्या बायकोला जाच नको असे वाटून सप्तगिरीतच वेगळे बिऱ्हाड करून राहू लागले आहेत.त्यांनी आपल्या दोन मुलांप्रमाणे जयालाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.मुलीचे नाव ‘जया’ ठेवताना तिला कायम यश मिळो हीच त्यांची भावना आहे.’तू वेगळी आहेस ,अन्य मुलींसारखी नाहीस’ असे त्यांनी जयाच्या मनावर सतत बिंबवले आहे.अप्पा स्वतःला कवी समजतात आणि त्यांनी आपला एक काव्यसंग्रह देखील प्रकाशित केला आहे. जयाच्या आईला नवऱ्याच्या कवीपणाची कदर नाही. ती त्यांचा काव्यसंग्रह रद्दी म्हणून विकून टाकते.जयाच्या दृष्टीने आई परिस्थितीप्रमाणे धूर्तपणे वागली आहे.मकरंदमामाचे दादरचे घर वनितामामीला मिळू न देणे आणि धूर्तपणे ते स्वतःच्या मुलाला देणे यात तिचा व्यवहारीपणाच प्रत्ययाला आला आहे.
जयाला वाचण्या-लिहिण्याची आवड तिच्या वडिलांमुळे लागली आहे.जयाच्या आजीला मात्र जयाचे सतत प्रश्न विचारणे आवडत नाही. अशा मुलीला नवरा मिळणार नाही अशी भीती तिच्या मनात आहे.आजी स्वतः तिच्या पतीच्या निधनानंतर केशवपन करून, लाल आलवण नेसणारी आहे.पती निधनानंतर ती कायम व्रतस्थासारखी निरासक्तपणे जगते आहे.असे असले तरी मुले,सुना, नातवंडांच्या वर्तनाबद्दल तिचा कटाक्ष आहे. जयाच्या वडिलांचा दृष्टीकोन आधुनिक असल्याने त्यांचा आईशी वाद होत असावा.अशाच एका वादाचे निमित्त होऊन ते हृदयविकाराने अचानक मरण पावले. जया त्यावेळी दहावीची परीक्षा देत होती. तिच्या मनावर हा फार मोठा आघात होता.वडिलांच्या मृत्यूनंतर जयाच्या आईने त्यांचे सप्तगिरीतील घर विकून,पतीचे कर्ज फेडून तिच्या माहेरी भावाकडे आंबेगावला रहायचा निर्णय घेतला. जयाला तो अजिबात पसंत पडला नाही. तिचा मोठा भाऊ ज्याप्रमाणे मुंबईत वसतीगृहात राहून शिकतो तशीच तीही मुंबईत एकटी राहून शिकेल असा हट्टच तिने धरला.
जयाला मुंबईत राहून शिकता आले. पण तिथले एकटेपणही तिला आवडले नाही.अन्य मुलींप्रमाणे ती मुक्त,मोकळी, स्वतंत्र झालीच नाही. तिला मैत्रिणीही मिळाल्या नाहीत.फक्त आंबेगावपासून दूर रहाण्याचा हेतू मात्र तिला पूर्ण करता आला.
आंबेगावला जयाचे चंदूमामा रहातात. त्यांची बायको वनिता मामी ही मवाळ स्वभावाची आहे. चंदूमामाला मुले नाहीत. पण ‘नवरा हा आधारवड असतो’ अशा धारणेतून वनितामामी सासरच्या घराशी एकरूप होऊन जगते आहे. वनितामामीला तिची बहीण वेणू हिच्या गरीबीची आणि विशेषतः तिच्या मुला-मुलींच्या भवितव्याची काळजी वाटते. जया शिकलेली आहे तर तिने वेणूच्या मुलीला कुसुमलाही शिकवावे म्हणजे तिला चांगले स्थळ मिळेल अशी वनितामामीची इच्छा आहे.कुसुम एक काहीशी मंदबुद्धीची मुलगी आहे. वनितामामीच्या सततच्या भुणभुणीमुळे जया कुसुमला आपल्या बरोबरीने वागवते.अगदी लग्नानंतरही घरी सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता कुसुमवर मानसोपचार करण्याची जबाबदारी घेऊन ती कुसुमला मुंबईत आणते. पण ही जयाची कुसुमबद्दलची जबाबदारीची जाणीव आहे की स्वतःचा अहंकार सुखावून घेणे आहे हे कळत नाही. कुसुममध्ये सुधारणा होत नाहीच आणि अखेरीस ती गावी जाण्याचा हट्ट धरते. गावी गेलेली कुसुम विहिरीत उडी घेऊन जीव देते तेव्हा जयाला वाईट वाटते. पण यात आपण कुसुमसारख्या नाही याचा दिलासाही आहे.
पदवी शिक्षण झाल्यानंतर सप्तगिरीतील एका गरीब घरातील धडपडत शिकलेल्या इंजिनियर मुलाशी -मोहनशी जयाचा विवाह झाला आहे. मोहनने जया इंग्रजी शिकलेली आधुनिक स्त्री आहे म्हणून तिला पसंत केले आहे. जयाचा दादा या लग्नाबाबत तिचे मन वळवतो कारण त्यालाही तिच्या जबाबदारीतून लौकर मोकळे व्हायचे आहे.दादाला अमेरिकेला जायचे आहे.तसा तो जातोही आणि स्वतःच्या आईची, भावाची जबाबदारी तो जयाकडे ढकलतो. आपला दादा जयाला खूप आवडत असला तरी त्याचा हा धूर्तपणा, घरापासून अलिप्त होण्याची त्याची वृत्ती तिला कायम खटकली आहे.
विवाहानंतर जया मोहनच्या नोकरीच्या गावी म्हणजे लोहानगरला येते. तिथे पोलाद कंपनीत मोहन काम करतो. त्याच्या दृष्टीने ती प्रतिष्ठेची नोकरी आहे. जयाला मात्र ते गाव आणि विशेषतः त्यांचे कर्मचाऱ्यांसाठीच्या वसाहतीतील छोटे, रूपहीन घर अजिबात आवडलेले नाही.पण लौकरच ती बाळंतपणासाठी माहेरी जाते आणि ती बाळाला घेऊन परतेपर्यंत आपण जरा बरे घर मिळवू असे आश्वासन मोहन तिला देतो.हे बरे घर मिळवण्यासाठी मोहन त्याच्या एका वरिष्ठाशी भ्रष्टाचारात हातमिळवणी करतो.आणि तेव्हापासूनच त्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाते. पुढे तो बढती मिळवून मुंबईत येतो.तिथे चर्चगेटला त्याला आलिशान फ्लॅट रहायला मिळतो.आता जयाही खुष असते कारण तिचे रहाणीमान एकदम सुधारलेले असते.तिची दोन्ही मुले दर्जेदार शाळेत शिकू लागतात.घरातील नोकरचाकर वाढतात. प्रतिष्ठीत लोकांत त्यांची उठबस होऊ लागते.घर स्वच्छ ठेवण्यात, मुलांचे आणि मोहनचे स्वास्थ्य राखण्यात,आवश्यक तेव्हा आंबेगावला जाऊन आई,मामा-मामीच्या आरोग्याची काळजी घेणे यात जया व्यस्त होऊन जाते.मूळात तिचा स्वभाव आळशी आहे पण मोहनला टापटीप आवडते, त्याचे मित्र घरी आले तर घर चांगले दिसायला हवे म्हणून जया पूर्णवेळ गृहिणी होणेच पसंत करते.
आपले घरातले व्याप सांभाळताना जयाने हळूहळू तिची लेखनाची आवड जोपासायला सुरूवात केली आहे.सुरूवातीला ती कथा लिहिते. पण ती प्रसिद्ध होऊन आल्यावर मोहनला त्यातील तिने रंगवलेले विकृत पुरूषाचे चित्र आवडत नाही. वाचकांना लेखिकेचा नवराच विकृत आहे असे वाटेल असा गैरसमज करून घेऊन तो जयाकडे आपली नापसंती व्यक्त करतो. जयाही मोहनला कथेत काल्पनिक वास्तव रंगवलेले असते हे पटवू शकत नाही. मोहनच्या सांगण्यानुसार ती हलके-फुलके, कौटुंबीक विषयांवरचे ललितलेखन करून ते लोकप्रिय मासिकांत प्रसिद्ध करू लागते. त्यामुळे तिचा अहंकार सुखावत असला तरी आपल्याला काहीतरी वेगळे लिहायचे आहे असे तिला मनोमन वाटत रहाते.मोहनच्या नकळत ती कथा लिहीत रहाते आणि टोपणनावाने विविध मासिकांत पाठवत रहाते. त्यासाठी ती तिच्या दादरला रहाणाऱ्या मकरंदमामाच्या इमारतीतील कामत या स्नेह्यांचा पत्ता वापरते.कामत हे एक विधुर गृहस्थ आहेत.त्यांचा मुलगा परदेशात आहे. कामत एक जाहिरात क्षेत्रात काम करणारे कलावंत आहेत.त्यांच्याकडे कलात्मक दृष्टी आहे. जयाशी ते मोकळेपणाने, बरोबरीच्या नात्याने वागतात. त्यामुळे जयाला ते जवळचे वाटतात. ती तिच्या लेखनाबद्दल कामतांशी सहजतेने बोलू शकते.जयाच्या कथा साभार परत येतात तेव्हा कामत जयाला तिच्या कथांमध्ये फक्त वास्तव मांडले जाते पण त्या वास्तवाबद्दल तीव्र, ठाम भूमिका मांडण्याचे धैर्य जोपर्यंत ती दाखवणार नाही तोपर्यंत त्या कथा प्रभावी होणार नाहीत हे स्पष्टपणे सांगतात.आपल्यातील लेखिकेची कदर करणाऱ्या आणि निखळ मैत्रीच्या नात्याने आपल्या चुका दाखवणाऱ्या कामतांबद्दल एका क्षणी जयाला आकर्षण वाटते. पण आपण विवाहीत आहोत, आपल्याला अनैतिक वागून चालणार नाही असे मनाला बजावत जया कामतांपासून दूर जाते.पुन्हा जेव्हा ती कामतांना भेटायला जाते तेव्हा दुर्दैवाने त्यांचा मृतदेहच तिला दिसतो. पण तेव्हाही आपण कामतांच्या मृत्यूबद्दल कुणाला सांगितले तर आपले आणि त्यांचे काही संबंध होते असा अपसमज पसरेल या भयामुळे जया आपली जबाबदारी टाळून गुपचूप काढता पाय घेते.
जया आणि मोहन दादरच्या घरात रहायला आल्यापासून मोहन अस्वस्थच आहे. त्याचा वरिष्ठ अधिकारी अगरवाल याच्य सांगण्यावरून त्याने काहीतरी भ्रष्टाचार केला आहे.नवीन आलेला सचिव आणि मंत्री यांना त्याबद्द कुणकुण लागल्याने अगरवालने मोहनला काही काळ सुट्टी घे असे सुचवले आहे. अगरवालच्या वरपर्यंत ओळखी आहेत आणि तो सगळे प्रकरण निस्तरणार आहे. पण मोहनला आणि पर्यायाने त्याची पत्नी जयालाही असुरक्षित, अस्थिर वाटत रहाते.मोहन आपली अस्वस्थता जयाकडे व्यक्त करतो. पण ती शांतच रहाते. जयाला आपली पर्वा नाही असे मोहनला वाटते.विशेषतः मोहन काहीतरी गंभिरपणे सांगत असताना जया हसते तेव्हा तर मोहनला चीड येते आणि जयाला काहीही न सांगता तो तडकाफडकी घरातून निघून जातो.
मोहन अचानक घरातून निघून गेल्याने जयाला प्रचंड असुरक्षित वाटते. मोहनचा भूतकाळ तिला आठवतो.तोही जयाप्रमाणेच सप्तगिरीचा आहे.पण जयाचे बालपण जसे सुरक्षिततेत गेले तसे मोहनचे झालेले नाही. मोहनने लहानपणी गरीबी अनुभवली आहे. तसेच वडिलांच्या तिरसट वागण्यामुळे त्याच्या आईचे झालेले हाल त्याने पाहिले आहेत. वडिलांबद्दल त्याच्या मनात कायम तेढ आहे आणि आईच्या सोशिक स्वभावाबद्दल अतीव करूणा आहे.गावातील काही श्रीमंतांच्या आर्थिक मदतीमुळे मोहनचे शिक्षण पूर्ण झाले आहे.आईच्या निधनानंतर मोठी बहिण विमलने मोहनला प्रेम दिले आहे.पण विमलही अखेरीस मूकपणे आजारपण सोसत मरण पावली आहे.दोन धाकट्या बहिणींची लग्न मोहनने लावून दिली आहेत आणि त्या मोहनबद्दल नेहमीच कृतज्ञ आहेत. सप्तगिरीतच राहिलेला धाकटा भाऊ वसंतबद्दल मोहनची कायम तक्रार आहे की तो जबाबदारी घेत नाही. पण घरातला थोरला म्हणून आपली भूमिका बजावणारा मोहन नेहमीच वसंतला मदत करत आला आहे. मोहनची मुलगी रेवतीला चांगले शिक्षण मिळावे असे त्याला वाटते आहे.लोहानगरला नोकरी करताना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातही मोहनने आपले वडील, बहिणी, भाऊ यांच्या गरजांसाठी आर्थिक मदत केली आहे. त्याचवेळी आपल्याला कधी हौसमौज करता येणारच नाही असा कडवट विचार मोहनच्या मनाला ग्रासू लागला त्यामुळे अधिक पैसे मिळवणे हेच त्याला आयुष्याचे ध्येय वाटू लागले हे जयाला माहीत आहे. तिने मोहनचे हळूहळू भ्रष्टाचारी बनत जाणे पाहिले आहे. पण त्यावेळी त्याला काहीही विरोध तिने केलेला नाही कारण तिच्या स्वतःच्या भौतिक सुखांच्या आकांक्षा मोहनच्या वाढत्या आमदनीमुळेच पूर्ण होताना ती अनुभवते आहे.आता मोहन अडचणीत आल्यावर मात्र ती अगदी अलिप्तपणे त्याच्याकडे पाहते आहे.मोहनने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जयाला नोकरी कर असे सुचवले आहे पण त्याबद्दल ती फारशी उत्साही नाही. तुमच्या सुखांसाठी मी पैसा मिळवण्याचा हा धोकादायक मार्ग स्वीकारला असे मोहनचे म्हणणे जयाला हास्यास्पद वाटते. मोहनच्या पापात सहभागी व्हायची तिची तयारी नाही. पण मोहन अचानक परागंदा झाल्यामुळे असुरक्षितता अनुभवणाऱ्या जयाला आत्मपरीक्षण करताना हे लक्षात आले आहे की तिनेही मोहनने कथेबद्दल नापसंती व्यक्त केली म्हणून कथालेखन थांबवले हे म्हणणेही चुकीचे आहे. तिच्या कथा साभार परत येत होत्या आणि हे अपयश पचवणे तिला जड जात होते म्हणून तिने कथालेखन थांबवले होते.आरोप मात्र मोहनवर केला होता ! खरं तर, तेव्हा तिला मोहनचा विरोध पत्करूनही स्वतःची वेगळी ठाम भूमिका मांडण्यासाठी कथा लिहीत रहाता आले असते पण तो धोका ती पत्करत नाही. उलट तडजोड करून तिने हलकेफुलके ललितलेख लिहिणे पसंत केले आहे.कोणी कोणासाठी म्हणून काही करत नसतो तर जो-तो आपली कुवत, मर्यादा लक्षात घेऊन सोयीचा, स्वार्थाचा,आरामदायी निर्णय घेत असतो हे जयाच्या लक्षात आले आहे.या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी जयाला तिच्या पूर्वसूरीच्या स्त्रियांचे अनुभव उपयोगी ठरले आहेत.दोन्ही आज्यांचे सोशिकपण पण पतीनिधनानंतर विशेषतः सप्तगिरीच्या आजीच्या स्वभावात आलेला हट्टीपणा ,पतीनिधनानंतर आपल्या आईच्या स्वभावात आलेले अलिप्तपण,तिने पतीचे पुस्तकांचे गठ्ठे रद्दीत टाकून देणे जयाला आठवते.आईने आणि आजीने मकरंदमामा नाटक, चित्रपटात काम करतो म्हणून त्याच्यावर जणू बहिष्कार टाकला होता पण तो गेल्यावर त्याचे मुंबईतले घर मात्र आईने पद्धतशीरपणे हस्तगत केले आहे. या सगळ्या बायका फारशा शिकल्या नव्हत्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हत्या त्यामुळे एक तर त्या अलिप्त राहिल्या, नाही तर अबोल राहिल्या.कधी त्या दूराग्रही, धूर्त,व्यवहारी झाल्या कारण त्यांना स्वतःच्या आनंदाचे मार्ग शोधता आले नव्हते असे जयाला वाटत असावे. तिच्या मुलीमध्ये -रतीमध्येही तिला तोच आत्मकेंद्रीत अलिप्त भाव दिसला आहे आणि पुतणी रेवतीमध्ये अहंकारी हट्टीपणाही तिने पाहिला आहे.आपण कशा आहोत?आजी-आईसारख्या की रती-रेवतीसारख्या आणि आपण स्वतःला सुशिक्षित, लेखिका समजतो तर खरेच तशा संवेदनशील आहोत का ?असे प्रश्न जयाला मनोमन छळत असावेत असे वाटते.
एका बाजूला जया आपल्या सभोवतीच्या मध्यमवर्गीय आणि गरीब स्तरातील स्त्रियांच्या वागण्याचेही निरीक्षण करून, विचार करते आहे.इमारतीचा कचरा गोळा करून न्यायला येणारी नयना पुन्हा गरोदर आहे. आतापर्यंत मुलीच झाल्या म्हणून नयनाला तिच्या घरातून वाईट वागवले जाते आहे. नवरा तिला अजिबात आवडत नाही. आता मुलगाच होणार आणि तो झाला की आपण नवऱ्याला अद्दल घडवू असे नयनाला वाटते आहे.दादरच्या घरात शेजारीच रहाणारी मुक्ता पतीनिधनानंतर आपल्या एकुलत्या मुलीला नोकरी करून वाढवते आहे.तिला नवरा गेल्यानंतर कामतकडून आर्थिक मदत मिळाली आहे.शिकून ती शिक्षिकेची नोकरी करते आहे.कामतबद्दल ती कृतज्ञ आहे. कामतच्या मृत्यूनंतरची अंत्यसंस्काराची जबाबदारी देखील मुक्ताने घेतली आहे.मुक्ताची सासू माई कजाग आहे पण तरीही तिची जबाबदारीही मुक्ताने घेतली आहे.जिजा ही जयाला घरकामात मदतनीस म्हणून येणारी बाई. अनेक वर्षे तिने जयाचे मकरंदमामा, जयाचा दादा यांच्याकडे काम केले आहे. आता जया दादरच्या घरी रहायला आल्यापासून जिजा तिच्याकडे घरकामाला येते आहे.जिजाला नवऱ्यापासून मुलबाळ झालेले नाही. तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे. नवरा आणि सवत दोघांच्या मृत्युनंतर जिजाने तिच्या सावत्र मुलाला राजारामला वाढवले आहे, त्याचे लग्न लावून दिले आहे.राजाराम दारूच्या आहारी गेल्याने त्याची बायको मंदा घरकाम करते आहे आणि पोटच्या मुलीला वाढवत आहे. राजारामला कोणी गुंडांनी मारहाण केली तेव्हा जिजा आणि मंदा त्याला सायन हॉस्पिटलला घेऊन जातात.तिथल्या डॉक्टरांशी जयाची ओळख निघू शकेल हे जाणवल्याने जिजा जयाकडे मदतीची याचना करते.जिजाला पैसे नको आहेत फक्त राजारामला चांगले उपचार मिळावेत म्हणून डॉक्टरांची ओळख जयाने वापरावी असे जीजाला वाटते आहे. प्रारंभी जयाला ही जबाबदारीही नको आहे पण नंतर आपण काहीतरी केले पाहिजे या आंतरीक इच्छेने जया सायन हॉस्पिटलला जाते आणि तिथे डॉक्टर असणाऱ्या भावाच्या मित्राला डॉ.व्यासला ती जिजाच्या मुलाची उत्तम काळजी घ्या असे सांगते.ठरवलं तर आपण मानवतेच्या भावनेतून कितीतरी गोष्टी करू शकतो असे जयाला वाटले असावे.आपलं सत्व,आनंद शोधण्याच्या हा तिचा प्रयत्न आहे.आपल्या वडिलांनी मृत्यूआधी डायरीत लिहून ठेवलेले वाक्य जयाला आठवते. इच्छा असेल तसे वागा हे ते वाक्य आहे.आपण आपली इच्छा नक्की काय आहे ते कधी ओळखले का आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला का असा प्रश्न जयाला पडला आहे.आपण एका बाजूला मोहनवर अवलंबून राहिलो,त्याने मिळवून दिलेली भौतिक सुखे उपभोगत राहिलो आणि आपल्याला हवे ते लेखन करता येत नाही ते केवळ मोहनमुळेच असे म्हणत त्याला दोष मनोमन मोहनला, संसाराला देत राहिलो. खरं तर मोहन आपल्याला गृहीत धरत नव्हता तर आपणच वरवरच्या सुखांच्या,प्रतिष्ठेच्या, अहंकाराच्या मोहात फसून आपल्या आंतरीक समाधानाचा मार्ग हरवून बसलो होतो याची जाणीव जयाला होते.
मोहन अचानक निघून गेल्यानंतर तो कदाचित चर्चगेटला आपल्या घरी गेला असेल असे वाटून जया चर्चगेटला पोहोचते.तिथे पत्रे गोळा करत असतानाचा फोनची घंटा वाटते आणि रूपा-अशोक यांच्याकडून कळतं की आपला मुलगा रोहित ट्रीपमधून अचानक गायब झाला आहे.रोहितच्या चिंतेने गर्भगळीत झालेली जया चर्चगेटच्या घरातून बाहेर निघत असतानाच मोहनचा भाऊ वसंतचा फोन येतो आणि कळते की रोहित सप्तगिरीला काकांकडे जाऊन पोहचला आहे.ते ऐकून हायसं वाटलेली जया घर बंद करून रस्त्यावर येते तेव्हा पाऊस सुरू होतो. ट्रेनने जाण्यापेक्षा बसने जावे या हेतूने जया बसस्टॉपवर पोहोचते.पाऊस मुसळधार पडत असतो. तेवढ्यात तिला काही तरूण आपल्या मौत्रिणीशी शारीर चाळे करत रस्त्याने जाताना दिसतात,जयाला वाटते की त्या मुलीला आपल्या मदतीची गरज आहे.ती आक्रमकपणे त्या तरूण मुलांना त्यांचे वागणे चुकीचे आहे असे सांगते. पण कोणीच ऐकून घेत नाहीत. अगदी ती मुलगीही सगळे मजेत सहन करताना दिसते.जयाला पराभूत वाटते.ती पावसात भिजून कशीबशी दादरच्या घरी पोहचते. तिला ताप चढतो.मुक्ता, नीलम,जिजा,मंदा सगळ्याच तिची काळजी घेतात.तेव्हा जयाला भगिनीभावाचा प्रत्यय येत असावा.या सर्वसामान्य, आर्थिक दृष्ट्या दुबळ्या स्त्रियाच खरे तर जयाला सच्च्या दिलाच्या, प्रामाणिक वाटल्या आहेत. यांच्या वागण्यात ढोंगीपणा नाही, व्यवहारी धूर्तपणा नाही नी अलिप्तपणे आपली जबाबदारी नाकारण्याचा नाकर्तेपणाही नाही.उलट त्या वास्तवाशी थेट डोळा भिडवतात, कष्ट करतात, आला दिवस आनंदात जगतात, प्रेमाला जागतात, कृतज्ञता बाळगतात. जयाला या सामान्य स्त्रियांमुळेच जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली आहे.
अखेरीस रोहित त्याच्या वसंतकाकांबरोबर सप्तगिरीहून मुंबईत येतो. मोहनची तो दिल्लीला आहे ,सगळे ठीक आहे आणि दोन दिवसांत मुंबईत परतणार आहे अशा मजकुराची तार येते.
जयाला जाणवते की पंधरा वर्षाचा रोहितही आपल्या मनाविरूद्ध काहीही घडत असलेले सहन करत नाही आणि बंडखोरी करतो. आपण मात्र नेहमी कोणताही निर्णय घेताना मोहनने आपले मत विचारले तर त्याचा निर्णय पटला नसला तरी त्याला विरोध करत नाही. मोहनचा रोष नको म्हणून आपण मौनच बाळगतो. मनोमन मात्र कडवटपणा बाळगतो. याचा अर्थ आपले वागणेही आपली आजी, आई,मोहनची आई यांच्यापेक्षा वेगळे नाही.सोयीसोयीने आपणही स्वार्थाचा,सुरक्षिततेचा असा ‘मौनम सर्वार्थ साधनम’ हाच मार्ग स्वीकारला आहे.पूर्वीच्या बायकांना पर्याय नसल्याने त्या सोशीक होत्या,स्वतःचे मत व्यक्त करत नव्हत्या. आपण शिकलेल्या आहोत,विचार करू शकतो,आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो पण तरी मौनाचा पर्याय निवडतो तेव्हा तो सोशिकपणा नसतो तर आपला स्वार्थ असतो याचे भान जयाला आले आहे.कादंबरीच्या अखेरीस जयाने स्वतःला बदलायचे ठरवले आहे. आपली मते -मग ती एखाद्याचा रोष ओढवून घेणारी,आपले जगणे असुरक्षित करणारी असली तरी धीटपणे व्यक्त केली पाहिजेत असे जयाने ठरवलेले दिसते.आपल्याला नेमके काय हवे आहे हे निश्चित करून त्याचा पाठपुरावा करायचेही तिने मनोमन ठरवले आहे.संवादच न करणे, दुराग्रह, अलिप्तता, जबाबदारी टाळणे, स्वतःच्या निर्णयांचे खापर दुसऱ्यावर फोडणे,आपल्याला गृहीत धरले जाते म्हणून कुढत रहाणे आणि स्वातंत्र्यच न घेणे हे सगळे चुकीचे आहे असे जयाला मनोमन कळले आहे. ते पर्याय ती यापुढे स्वीकारणार नाही,जिद्दीने स्वतःची विचारप्रक्रिया बदलेल आणि वास्तवाला खंबीरपणे सामोरी जाईल असा सकारात्मक शेवट ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीला सुखात्म बनवतो.

‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीतील कथासूत्रेः
‘दॅट लॉंग सायलन्स’ ही कादंबरी जयाच्या मनोवकाशात शिरून तिचे विचार, भावना यांचे एक कोलाज उभे करते. त्यामुळे या कादंबरीची कथासूत्रेही जयाच्या विचार प्रक्रियेशी, तिच्या जाणीवांशी, जीवनदृष्टीशी, अनुभवातून आलेल्या तिच्या शहाणपणाशी निगडीत आहेत.मानवी जीवनाबद्दल ही कथासूत्रे काही भाष्य करतात. थोडक्यात या कथासूत्रांचा परिचय करून घेऊ.—
१. एकेकाळी भारतात गार्गी, मैत्रेयीसारख्या वादपटू स्त्रिया होत्या.वादपटू पुरूषांची तर मोठीच परंपरा होती.नैयायिक,सांख्य,मीमांसक असा त्यांच्या शाखा होत्या.कोणतीही गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून घेतली जात होती.तत्वज्ञान,नितीशास्त्र हा माणसांच्या जगण्याचा भाग होता.पण आता स्त्री असो की पुरूष प्रत्येकजण आपल्या सोयीचे निर्णय घेत असतात.मग ते नैतिक असोत की अनैतिक.समाजाच्या दृष्टीने विवेकी असोत की अविवेकी. आपली सुरक्षितता, प्रतिष्ठा धोक्यात येणार नाही, आपल्यावर अधिकची जबाबदारी पडणार नाही, आपला अहंकार सुखावला जाईल असेच निर्णय माणसे धूर्तपणे, व्यवहारीपणे घेत असतात. असे लेखिकेला जाणवले आहे.विशेषतः माणसांचे संवाद न करणे, मूक रहाणे हे देखील नेहमी सोशिकपणातून, अन्यायातूनच आलेले नसते तर ती कैकवेळा सोयीची म्हणून वापरलेली पळवाट असते असे लेखिकेला म्हणायचे असावे. मूक रहाणे म्हणजे नेहमीच दडपले जाणे नसते तर ती एका अर्थी आपली मते निर्भयपणे मांडण्याची तयारी नसणे असते.आपले निर्णय आपल्या बळावर घेऊन त्याची योग्य ती किंमत मोजण्याची तयारी नसणे असते असे लेखिकेला सुचवायचे असावे.
२.माणसांच्या दुराग्रहामागे आणि अलिप्त असण्यामागेही त्यांचा स्वार्थच असतो असे लेखिकेला जाणवले आहे.आपले सामाजिक स्थान आणि प्रतिमा टिकविणे याला अग्रक्रम दिल्याने मग माणसे खरे प्रेम व्यक्त करत नाहीत,कृतघ्न होतात, ढोंगी वागतात.
३.जर इच्छा असेल तर सर्व स्तरांतील माणसे,अगदी स्त्रियाही परस्परांना मदत करू शकतात आणि त्यातून सौहार्दाचे जीवन जगू शकतात. असे जगणे खरोखरच समाधानाचे असू शकेल. पण बहुसंख्य माणसे स्वतःपलीकडे जाऊन दुसऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत नाहीत आणि निखळ आनंदाला मुकतात.
४. स्त्रियांमधील भगिनीभाव जागा झाला की मग त्या कोणत्याही स्तरांतील असोत एकमेकींच्या मदतीला, एकमेकींना दिलासा द्यायला पुढाकार घेतात. हे मोठे मनोहर दृष्य असते.
५.भौतिक सुखे की आंतरीक समाधान यापैकी नेमके काय हवे हे माणसाने ठरवले पाहिजे. बरेचवेळा भौतिक सुखे मिळवताना माणसे अनैतिक मार्गाकडे जातात. अशावेळी त्यांनी मिळवून दिलेल्या भौतिक सुखांचा फायदा घेणारे मूक राहिले,अलिप्त राहिले तरी तेही अनैतिकतेचे भागीदार म्हणावे लागतील.
६. स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी मनोधैर्य लागते,सातत्य लागते तसेच पराभव, असुरक्षितता पत्करण्याची तयारीही लागते.ही तयारी असेल तर दुसऱ्यांना दोष देत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत.
अशाप्रकारे ‘दॅट लॉंग सायलन्स’ ही शशी देशपांडे यांची एक विचारप्रवृत्त करणारी कादंबरी आहे.तुम्ही ती मूळ इंग्रजीतून वाचा किंवा ‘वाट दीर्घ मौनाची’ हे सानिया यांनी केलेले या कादंबरीचे भाषांतर तरी जरूर वाचा.पुढील ब्लॉगमध्ये आपण ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीच्या कथनाच्या विश्लेषणाचा प्रयत्न करणार आहोत.आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका !
-गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा