शशी देशपांडे या भारतीय इंग्रजी कादंबरीकार आहेत.शशी देशपांडे यांची मातृभाषा कन्नड असली तरी त्यांना मराठी भाषा चांगली अवगत आहे. मराठीतील काही साहित्यकृतींचे इंग्रजी व कन्नड भाषेत अनुवादही त्यांनी केले आहेत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
खरं तर, शशी देशपांडे यांच्या कादंबऱ्यांबद्दल आपण यापूर्वीच जाणून घ्यायला हवे होते. कारण त्या अनिता देसाई यांच्या समकालीन आहेत. यापूर्वी ब्लॉग क्रमांक १६मध्ये आपण अनिता देसाई या भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रीचा परिचय करून घेतला होता हे तुम्हाला आठवत असेलच. तसंच, ब्लॉग क्रमांक १७ ते २१ तुम्ही वाचले असतील तर त्यामध्ये अनिता देसाई यांच्या तीन महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा सखोल आढावा आपण घेतला होता. शशी देशपांडे या अनिता देसाई यांच्या समकालीन कादंबरीकार आहेत मात्र फरक एवढाच की अनिता देसाई या परदेशस्थ भारतीय आहेत. त्यामुळे, त्यांच्या काही कादंबऱ्यांत भारतीय वास्तवाच्या बरोबरीने अमेरिकन समाजाचे वास्तवही मांडले जाते. याला ‘डायस्पोरीक लेखन’ असे म्हणतात.उदा. ‘फास्टिंग-फिस्टींग’ या अनिता देसाई यांच्या कादंबरीत तुम्हाला भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांतील समाजजीवनाचे चित्रण पाहता येते.तसेच अनिता देसाई यांच्या कन्या किरण देसाई यांच्या ‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतही अमेरिकेतील आणि भारतातील समाजवास्तव एकाचवेळी उलगडत गेलेले आपण पाहिले आहे. शशी देशपांडे या भारतातच वास्तव्य करून असल्याने त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांत स्वाभाविकपणे भारतीय समाज वास्तव चित्रीत झाले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांना अनिता देसाई आणि किरण देसाई यांच्याप्रमाणे जागतिक स्तरावरची बुकर किंवा तत्सम पारितोषिके मिळालेली नाहीत. शशी देशपांडे यांना त्याबद्दल वैषम्यही वाटते. आपले लेखनकर्तृत्व जागतिक स्तरावर उपेक्षित राहिले असे त्यांना वाटते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण शशी देशपांडे यांचा एक कादंबरीकार म्हणून परिचय करून घेणार आहोत.त्यांच्या कादंबऱ्यांचे वेगळेपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तत्पूर्वी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली ते त्यांच्या चरित्रात्मक माहितीआधारे समजून घेणेही उद्बोधक ठरेल.

शशी देशपांडे यांचे माहेरचे नाव शशी जाहगिरदार. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९३८ रोजी आजच्या कर्नाटक राज्यातील धारवाड या शहरात झाला. आजही त्यांचे वास्तव्य कर्नाटकातील बंगळुरू येथेच असते. शशी देशपांडे यांचे वडील ‘आद्य रंगाचार्य’ आणि ‘श्रीरंग’ या टोपणनावाने प्रामुख्याने कन्नड भाषेत लेखन करीत असत.ते एक नामांकीत कन्नड नाटककार,कवी,संस्कृत भाषेचे पंडीत होते.त्यांना १९६० मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.तसेच १९७१ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि १९७२ मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी मानाच्या पद्मभूषण या पदवीने सन्मानीत केले .
शशी देशपांडे यांची आई शारदा यादेखील उच्चशिक्षित अशा चंद्रचूड कुटुंबातून आलेल्या होत्या. भारताच्या सर्वोच्च न्यायालायतील माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या त्या भगिनी होत्या.शशी देशपांडे यांची मोठी बहीण उषा देसाई ही मुंबईत प्रख्यात डॉक्टर होती.शशी देशपांडे यांचा जन्म आणि शालेय शिक्षण धारवाडमध्ये झाले असले तरी त्या काळात त्यांनी आपले ध्येय ठरवले नव्हते. लहानपणापासून त्या भरपूर वाचत होत्या.मराठीतील इरावती कर्वे यांचे लेखन त्यांना फार भावले होते. विशेषतः इरावतीबाईंचे ‘युगांत’ हे महाभारतातील व्यक्तिरेखांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहाणारे पुस्तक शशी देशपांडे यांच्यावर मोठा प्रभाव टाकणारे ठरले होते.पुढे ‘अंबा’ नावाची एक कथा त्यांनी याच प्रभावातून लिहिली. पण आपण लेखिका व्हावे असे काही त्यांनी ठरवले नव्हते. तरूण वयात शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या. मुंबईत त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि नंतर भारतीय विद्या भवन येथून पत्रकारीतेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काही काळ त्या वर्तमानपत्रात लेखन करत होत्या. मुंबईत असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयात डॉक्टर असल्याने इस्पितळाच्या परिसरातच त्या रहात होत्या. त्याच काळात अरूणा शानभाग बलात्काराची घटना के.ई.एम. रूग्णालयात घडली होती आणि त्याचा खोल परिणाम शशी देशपांडे यांच्या मनावर झाला होता.परळ परिसरातील सर्वसामान्य माणसांचे जगणेही याच काळात शशी देशपांडे यांनी पाहिले होते.त्याचाही प्रभाव त्यांच्या मनावर झाला असावा.पुढे शशी देशपांडे यांनी कुटूंबासह बंगळुरू येथे स्थलांतर केले. तिथेच त्यांच्या लेखनाला सूर गवसला.

शशी देशपांडे यांनी चार बाल साहित्याची पुस्तके,अनेक लघुकथा, एकूण तेरा कादंबऱ्या ,काही ललित निबंध,समीक्षात्मक लेखन आणि आत्मकथन असे विपूल लेखन साधारण तीस वर्षांत केले आहे. अजूनही त्या लिहित असतात.१९९० मध्ये त्यांना कादंबरीलेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे तर २००९ मध्ये त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानीत केले आहे. मात्र २०१५ साली शशी देशपांडे यांनी दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी या तीन विचारवंतांच्या निर्घृण हत्या आणि त्याबाबतचा सरकारचा उदासीन दृष्टिकोन याचा निषेध म्हणून आपला साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत केला आणि साहित्य अकादमीच्या सदस्यत्वाचाही राजिनामा दिला. तसेच २०१८ साली गोवा कला आणि साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना त्यांनी भारतातील धर्मवेड्या राष्ट्रवादाचा निषेध करत भारतातील हिंसक जातीय दंगलींबद्दल चिंता व्यक्त केली होती.
आपण एक इंग्रजी कादंबरीकार म्हणून शशी देशपांडे यांनी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊ.
शशी देशपांडे यांची पहिली कादंबरी ‘डार्क होल्डस नो टेरर’ ही १९८० साली प्रकाशित झाली.ही मराठीत भाषांतरित झाली आहे.या कादंबरीची नायिका बालपणापासून आईच्या प्रेमाला वंचित झाली आहे. कारण तिच्यामुळे तिचा लहान भाऊ तळ्यात बुडून मरण पावला असा गैरसमज तिच्या आईने करून घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये असल्यापासून ही मुलगी वसतीगृहात राहिली आहे. पुढे तिचे नाटकातील एका कलावंताशी प्रेम जुळले आहे. आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता तिने प्रेमविवाह केला आहे. लहानशा भाड्याच्या खोलीत संसार करत असतानाच तिने मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु नंतर उच्चशिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची घडी बसवण्यासाठी जो पैसा लागतो तो तिने अनैतिक मार्गाने मिळवला आहे.डॉक्टर म्हणून यशस्वी होत असताना एक विवाहित स्त्री म्हणून मात्र ती कायम दुःखी राहिली आहे.नवऱ्याच्या विकृत स्वभावाला घाबरून आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून ती संसार रेटत राहिली आहे. आईच्या मृत्यूच्या बातमीनंतर ती वडील एकटे पडतील असे वाटून अनेक वर्षांनी पुन्हा माहेरी जाते. लगेच परत जायचे ठरवून आलेल्या तिला माहेरी जी शांतता मिळते त्यामुळे अधिक काळ रहावेसे वाटते. याच काळात ती जे आत्मपरीक्षण करते आणि तिला स्वतःबद्दल काय जाणवते तो ‘डार्क होल्डस नो टेरर’ या कादंबरीचा गाभा आहे. आपण विस्ताराने या कादंबरीबद्दल पुढील ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
शशी देशपांडे यांची दुसरी कादंबरी १९८२ मध्ये प्रसिद्ध झाली. तिचे नाव होते ‘इफ आय डाय’.या कादंबरीचे कथानक रहस्यमय आहे.गुरू हा कॅन्सर पेशंट शेवटच्या काही महिन्यांचा सोबती आहे. तो उपचार केंद्रात येतो.तेथे त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे इतर रूग्ण त्याला आपल्या मनातील शल्ये सांगतात.तेथील रक्ततपासणी करणारी आणि स्वतः गरोदर असणारी डॉक्टर मुलगी तर गुरूला आपला फार जवळचा स्नेही मानू लागते. आणि अचानक गुरूचा अनैसर्गिक मृत्यू होतो. ज्याचे शेवटचे काही महिनेच आयुष्य बाकी होते त्याचा खून कोणी आणि का केला असावा याचा शोध हा ‘इफ आय डाय’या कादंबरीच्या कथानकाचा मुख्य भाग आहे.
शशी देशपांडे यांच्या पुढील कादंबरीचे कथानकही रहस्यमय आणि सूडाचे होते. त्या कादंबरीचे नाव होते ‘कम अप ऍंड डाय’. ही कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. या कादंबरीतील क्षमा राव ही नुकतीच एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रूजू झाली आहे. त्या शहरातील आपल्या दोन चुलत भावंडांसोबत म्हणजे प्रताप आणि देवयानीसोबत ती राहते आहे. दुर्दैवाने क्षमा राव ज्या शाळेत नोकरी करते त्या शाळेतील मृदुला नावाची विद्यार्थिनी आत्महत्या करते. तिची मैत्रीण सोना देवयानीला सांगते की मृदुलाने आत्महत्या केली कारण तिला दिवस गेले होते. आणि प्रताप तिचा एक मित्र होता. त्यामुळे संशयाची सुई प्रतापकडे जाते. खरं तर, प्रताप स्वतःच वैफल्यग्रस्त असतो आणि त्याच्यावर डॉक्टर गिरीश उपचार करत असतात.लौकरच प्रतापचा बागेतील शिडीवरून पडून संशयास्पद मृत्यू होतो आणि देवयानीला प्रतापच्या खणात एका चित्रपटाचे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडते. कालांतराने सोनाची आई मिसेस रामन यांचाही संशयास्पद मृत्यू होतो आणि सोनाची मैत्रीण शर्मिलालाही धमकी येते. शर्मिला एका चित्रपटाला जाणार असते की ज्याचे नाव प्रतापच्या चिठ्ठीत असते. त्यामुळे देवयानी शर्मिलाला वाचवायला चित्रपटगृहात जाते.शर्मिलाला ती वाचवते पण स्वतः मरणार असते. इन्स्पेक्टर प्रसाद योग्य वेळी तिथे पोहचून तिला वाचवतो. असे हे गुंतागुंतीचे कथानक आहे.या सगळ्या खून सत्राचा सूत्रधार शहरातला कोणी बडा उद्योगपती असतो आणि तो डॉ.गिरीशच्या मदतीने शाळेतील अल्पवयीन मुलींचा लैंगिक वापर करत असतो हे अखेरीस उलगडते.
१९८३ मध्ये शशी देशपांडे यांची आणखी एक कादंबरी प्रकाशित झाली. तिचे नाव होते ‘रूटस ऍंड शॅडोज’. या कादंबरीतील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा इंदू आणि एकत्र कुटूंबातील अनेकांशी तिचा वेगवेगळ्या पातळीवर असलेला संवाद असे या कादंबरीचे कथानक आहे.
शशी देशपांडे यांची नंतरची कादंबरी ‘दॅट लॉंग सायलन्स’ ही १९८९साली प्रसिद्ध झाली. ही एक बहुचर्चित कादंबरी ठरली. १९९० साली या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.ही कादंबरी सानिया यांनी मराठीत भाषांतरित केली आहे.या कादंबरीत लग्नानंतर गावातून मुंबईत येऊन स्थिरावलेल्या एका मध्यमवर्गीय स्त्रीला तिच्या पतीने केलेल्या गैरव्यवहारामुळे आपले सुस्थिर आयुष्य अस्थिर होणार हे कळल्यावर बसलेला धक्का आणि त्यानंतरची तिच्या मनातील वादळे लेखिकेने समर्थपणे चित्रीत केली आहेत.आपण पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये या कादंबरीचा सखोल परिचय करून घेऊ.
१९९६ मध्ये शशी देशपांडे यांची आणखी एक कादंबरी प्रसिद्ध झाली. तिचे नाव होते ‘अ मॅटर ऑफ टाईम’. या कादंबरीत पहिल्यांदाच शशी देशपांडे यांनी गोपाळ ही पुरूष व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवली होती.गोपाळ आणि त्याचे कुटूंब यांच्यातील संवाद-विसंवादाचे हे कथानक आहे.
‘स्मॉल रेमिडीज’ ही शशी देशपांडे यांची कादंबरी २००० साली प्रसिद्ध झाली. मधू ही या कादंबरीची नायिका एक लेखिका आहे. तिचा मुलगा बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मारला गेला आहे. त्या दुःखातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मधू प्रवासाला निघाली आहे. प्रवास करत असतानाच मधू सावित्रीबाई नावाच्या एका गायिकेच्या आयुष्यावर कादंबरी लिहिते आहे. सावित्रीबाई देवदासी किंवा कलावंत समाजातील होत्या,समाजाचा त्यांच्या चारित्र्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन हेटाळणीचा होता.मात्र त्यांचे गाण्यात त्यांना वाद्याची साथ देणाऱ्या मुस्लीम वादकाबरोबर एकनिष्ठ संबंध होते अशाप्रकारचे कथानक या कादंबरीत आहे. सावित्रीबाईंबद्दल लिहित असताना मधूला आपल्या दुःखाचा अर्थ कळतो आणि या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळतो असा ‘स्मॉल रेमिडीज’ या कादंबरीच्या कथानकाचा समारोप शशी देशपांडे यांनी केला आहे.
‘दी बाईंडींग वाईन’ ही शशी देशपांडे यांची कादंबरी २००२ साली प्रसिद्ध झाली.आपल्या लहानग्या कन्येच्या निधनाने दुःखात बुडालेली ऊर्मी या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. ऊर्मीला या प्रसंगात मनोबल मिळते ते तीन स्त्रियांकडून. एक आहे तिची फार पूर्वी मरण पावलेली सासू मीरा. मीराने लिहून ठेवलेले स्वतःच्या आयुष्यातले काही प्रसंग ऊर्मीला जुन्या कागदांत मिळतात.तेव्हा त्या फार न शिकलेल्या स्त्रीने आपल्या आयुष्यात केलेला संघर्ष तिला आश्चर्यकारक वाटतो. ऊर्मीला मनोबल देणारी दुसरी स्त्री आहे कल्पना. ती एक बलात्कारीत मुलगी आहे आणि स्वतःच्या दुःखाशी ती दोन हात करते आहे. तर तिसरी स्त्री आहे कल्पनाची आई. मुलीवर बलात्कार झालेला असतानाही तिला दोष न देता तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली ही बाईही ऊर्मीला मनोबल देते असे ‘दी बाईंडींग वाईन’ या कादंबरीच्या कथानकातून लेखिका दाखवते.
२००४ साली शशी देशपांडे यांची ‘मुव्हिंग ऑन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीत मंजिरी ही नायिका आहे. ती वडिलांच्या आजारपणात त्यांची सेवा करण्यासाठी मुंबईत येते. अनेक वर्षांपूर्वी तिने आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता आणि मुंबई सोडलेली होती. पण दुर्दैवाने दोन लहान अपत्ये पदरी असताना तिच्या वाट्याला वैधव्य आले.मात्र न डगमगता तिने एकटीने स्वतःच्या पायावर उभे राहून, संघर्ष करून मुलांना मोठे केले आहे.आता आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर असताना वडिलांच्या मित्राचा विधुर मुलगा राजा मंजिरीच्या आयुष्यात आला आहे.प्रेम,मृत्यू आणि जीवनसंघर्ष यांचे एक जाळेच ‘मुव्हिंग ऑन’ या कादंबरीत शशी देशपांडे यांनी गुंफले आहे. आयुष्य एखाद्या नदीसारखे वळणे, वाकणे घेत पुढे सरकतच असते असे त्यांना या कादंबरीतून सुचवायचे असावे.
‘इन दी कंट्री ऑफ डिसीट’ ही शशी देशपांडे यांची पुढली कादंबरी २००८ साली प्रसिद्ध झाली. या कादंबरीत देवयानी ही मध्यमवयीन स्त्री कथानकाच्या केंद्रस्थानी आहे.ही एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेली आणि स्वतंत्रपणे राहणारी आधुनिक स्त्री आहे. तिचे कुटुंबीय त्याच शहरात असूनही देवयानी एकटीच राहणे पसंत करते. तिला स्वतःचे स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते आहे. कुटूंबीयांनी तिला लग्न कर असा आग्रह करूनही ती लग्न करत नाही. मधल्या वयात असताना, चित्रपट क्षेत्रातील मैत्रीण राणी हिच्या परिचयाचा पोलीस ऑफिसर देवयानीच्या आयुष्यात येतो. तो विवाहीत असून त्याला एक मुलगीही आहे. पण तो देवयानीला आपल्या आकर्षणात अडकवतो आणि देवयानीशी विवाहबाह्य संबंध ठेवतो. मग दोघांचाही आपापल्या कुटूंबाला, परिचितांना फसवत पण मनोमन अपराधीपणा पेलत जगण्याचा प्रवास सुरू होतो.
शशी देशपांडे यांनी लिहिलेली ‘शिप्स दॅट पास’ ही कादंबरी २०१२ साली प्रकाशित झाली.तारा आणि शान यांची कहाणी या कादंबरीत उलगडते.त्या दोघांच्या विवाहाला चौदा वर्षे होऊनही ते जणू परस्परांना अपरिचित आहेत.ताराची बहीण राधिका हिचेही आता लग्न ठरले आहे आणि आपल्या बहिणीचे विफल लग्न पाहिल्यामुळे राधिकाच्या मनात भय निर्माण झाले आहे. त्यातच ताराचा अनैसर्गिक मृत्यू होतो आणि पोलिस शानला चौकशीसाठी ताब्यात घेतात. त्यामुळे राधिकाच्या मनात आपण विवाह करावा की करू नये अशी द्विधा अवस्था निर्माण होते. अखेरीस तिच्या लक्षात येते की आयुष्य अनपेक्षीत गोष्टींनी भरलेले असले तरी घाबरून जाऊन ते जगण्याची संधीच नाकारणे हे चुकीचे ठरते.
‘शॅडो प्ले’ ही शशी देशपांडे यांची कादंबरी २०१३ सालची आहे.या कादंबरीतील अरू आणि रोहित हे दोघे विवाह करून शहरात स्थाईक होतात. ते दोघेही नोकरी करणारे आहेत. आपल्या व्यस्त आयुष्यातही अरू आपल्या वडिलांचे अचानक परागंदा होणे आणि आईचा अपघाती मृत्यू ही दुःखे विसरू शकलेली नाही. तिच्या दोन बहिणी आणि मावशांशी घट्ट नाते जोडून ती आपले दुःख पेलते आहे. पण अशातच तिला आणखी एक धक्का बसतो. तिच्या बहिणीवर बलात्कार होतो. स्त्रियांच्या आयुष्यातील असुरक्षितता आणि चढउतार या गोष्टी शशी देशपांडे यांनी ‘शॅडो प्ले’ याकादंबरीत अधोरेखीत केल्या आहेत.
‘स्ट्रेंजर टू अवरसेल्वज’ ही शशी देशपांडे यांची कादंबरी २०१५ साली प्रकाशित झाली. अपर्णा आणि श्रीहरी हे दोघे आयुष्याच्या मध्यावर परस्परांना भेटले आहेत.अपर्णा ही एक ऑंकॉलॉजिस्ट आहे आणि कॅन्सर पिडितांवर उपचार करते.तिचा पहिला विवाह दुर्दैवाने अपयशी ठरला आहे. तिच्या आई-वडिलांचाही घटस्फोट झालेला तिने पाहिला आहे. त्यामुळे विवाहावरचा तिचा विश्वासच डळमळला आहे.श्रीहरी हा संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकार आहे.अपर्णा आणि श्रीहरी या दोघांच्याही आवडीनिवडी, पूर्वायुष्य अगदी भिन्न आहे.त्यांचा प्रेमसंबंधही त्यामुळे कसा गुंतागुंतीचा होत जातो हे ‘स्ट्रेंजर टू अवरसेल्वज’ या कादंबरीतून शशी देशपांडे यांनी उलगडले आहे.
अशाप्रकारे, सुमारे पंचवीस वर्षे शशी देशपांडे या इंग्रजीतून कादंबरीलेखन करत आहेत आणि भारतीय समाजातील सर्व आर्थिक स्तरांतील स्त्रियांचे वास्तव,स्त्रियांची मानसिक तगमग त्यातील अनेक गुंतागुंतींसह, तपशीलवारपणे रंगवत आहेत.पण तरीही मराठी वाचकांना त्यांचा फारसा परिचय नाही. शशी देशपांडे यांच्या ‘डार्क होल्डस नो टेरर’ आणि ‘दॅट लॉंग सायलन्स’ या दोन गाजलेल्या कादंबऱ्या मराठीत भाषांतरीत झाल्या आहेत.आपण त्यांचा पुढील काही ब्लॉग्जमधून सखोल परिचय करून घेणार आहोत.
-गीता मांजरेकर

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.