मागील ब्लॉगमध्ये आपण किरण देसाई यांनी लिहिलेल्या ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे यांचा परिचय करून घेतला.आजच्या ब्लॉगमध्ये आपण ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून लेखिकेची ही कादंबरी लिहिण्यामागची अंतर्दृष्टी काय होती ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.
‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीची पृष्ठसंख्या २०९ एवढी आहे आणि कादंबरीचे कथानक एकूण २५ प्रकरणात विभागले गेले आहे. या प्रकरणांपैकी काही केवळ ३,४,५,७ किंवा ८ पानांचीएवढी लहान आहेत. पण काही प्रकरणे मात्र १०,११,१२ आणि १६ पानांची मध्यम आकाराची आहेत.अर्थातच ज्या प्रकरणांत अधिक घटना आहेत ती अधिक पृष्ठांची आहेत.कादंबरीच्या कथनाचा वेग मात्र साधारणपणे सुरवातीपासून शेवटापर्यंत सारखाच आहे असे म्हणता येईल.कादंबरीच्या पहिल्या प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणात जाताना कथन एकदम २० वर्षांचा कालखंड पुढे सरकते. तिसऱ्या प्रकरणापासून पंचविसाव्या प्रकरणापर्यंत कथनात सामावलेला काळ मात्र केवळ काही महिन्यांचा आहे.कथनाला अवकाशाचा संदर्भ आहे तो शहाकोट या एकाच नगराचा आणि या नगराबाहेरील टेकडीवरील पेरूबागेचा.कथन फक्त कुल्फी या एकाच व्यक्तिरेखेच्या भूतकाळात थोडेसे डोकावते. अन्यथा ते सरळरेषीय आणि वर्तमान काळातील आहे.भविष्यकाळाचे सूचन कथनात आहे पण ते दूरवरच्या डोंगररांगांसारखे धूसर आहे.

कथनातून शहाकोट या नगरातील चावला कुटूंबीय आणि नगरातील अन्य काही माणसे आणि प्रशासनातील काही माणसे यांच्या व्यक्तिरेखा सामोऱ्या येत असल्या तरी कथनाच्या केंद्रस्थानी संपत हा चावला कुटूंबातील थोरला मुलगाच आहे.संपतची ही व्यक्तिरेखा नायकासारखी सर्वगुणसंपन्न मात्र नाही. संपत एक न-नायक आहे असे म्हणता येईल.समाजात, कुटूंबात,नोकरीत संपतला स्वतःची ओळख हरवल्यासारखे म्हणजे परात्म वाटते पण आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावेत असेही त्याला वाटत नाही.कारण अशी ओळख निर्माण करायची असेल तर आपल्या जगण्यावर अनेक बंधने येतील,आपल्याला कष्ट करावे लागतील, आज्ञाधारक व्हावे लागेल,काहीवेळा खोटे किंवा ढोंगी वागावे लागेल याची जाणीव संपतला झाली आहे.संपतला यापैकी काहीही करण्याची इच्छा नाही. त्याला तशी महत्त्वाकांक्षाच नाही.अन्य मानवेतर प्राण्यांप्रमाणे निसर्गात, निसर्गनियमाने शांतपणे जगता यावे एवढेच त्याला अपेक्षीत आहे.तसे जगण्यासाठी संपत एकदा घर सोडून पळतो आणि एका पेरूबागेत पेरूच्या झाडावर चढून बसतो. तिथे त्याला विलक्षण शांतता मिळते.पण लोक त्याला एकटं, शांतपणे जगू देत नाही.संपतला परत सामाजिक बंधनात अडकायचे नाही आणि वडिलांच्या स्वार्थासाठी लोकांना अंधश्रद्धेत अडकवायचेही नाही.त्यापेक्षा माकडांसारखे, पक्षी-प्राण्यांसारखे नैसर्गिक मुक्त जगायचे आहे. कथानकाच्या अखेरीस संपत जणू निसर्गात अंतर्धान पावतो. संपतच्या जन्मापासून ते त्याच्या निसर्गात अंतर्धान पावेपर्यंतच्या घटना क्रमाने ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीत येतात.या काही घटनांसंदर्भात सांगणारे आणि संपतच्या मनोवस्थेबद्दल सांगणारे कथन हा आज आपल्या ब्लॉगमधील विश्लेषणासाठीचा तपशील ठरणार आहे.आपल्या आकलनासाठी मी कादंबरीतील काही कथन मराठीत भाषांतरीत केले आहे आणि त्या कथनाचे विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या शीर्षकातील ‘हलाबल्लू’ हा शब्द गोंधळ,कोलाहल या अर्थाचा आहे.कथनातून भारतीय समाजातील हा वेगवेगळ्या प्रकारचा कोलाहल लेखिका वाचकांना दाखवते. पहिल्या प्रकरणात शहाकोट या नगरात पडलेला दुष्काळ आणि तो दूर व्हावा, पाऊस पडावा यासाठी नगरातील अनेकांनी सुचवलेले उपाय यांचा कोलाहल पहायला मिळतो. आपण कथनातून त्याची झलक पाहू.
मि.चावला वर्तमानपत्र वाचत असतात.ते मोठ्याने वाचायची त्यांना सवय आहे.ते वेगवेगळ्या बातम्यांचे जे तुकडे वाचतात ते कथनात पुढीलप्रमाणे येतात-
“(दुष्काळ पडण्यामागील) समस्या राशीमेघांच्या (Cumulus clouds) थरात शोधली गेली आहे जे अतीतप्त झाले आहेत.”मि. चावला वर्तमानपत्रातून वाचत होते.
“टिएरा डेल फ्युगो या ज्वालामुखीतून बाहेर फेकली गेलेल्या राखेचा हा सगळा परिणाम आहे.”
आणि त्यानंतर थोड्याच वेळात मि.चावलांनी त्यांचे वाचणे कोणी ऐकते आहे की नाही हे न पहाताच पुढे वाचले-
“ समस्या पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील प्रवाहांमुळे आणि धृवीय भागातील बर्फाच्छादीत आवरणातील सूक्ष्म कणांत झालेल्या अनाकलनीय हालचालींमुळे निर्माण झाली आहे.”
“ इराक त्यांच्या वाळवंटी प्रदेशात हेतूतः दाब निर्माण करून आणि वारे वळवून भारतातील मोसमी पाऊस चोरू पाहतो आहे”
“ हंगेरीयन संगीतकाराने बासरी वाजवून युरोपमधील पावसाळी ढग भारताकडे वळवून दाखवण्याचा प्रस्ताव दिला आहे.”
चावला म्हणाले “यांना दुष्काळावर एखादा गंभीर उपाय शोधावासा का वाटत नाही ..”
“शहाकोटमध्ये यावर्षी देशातील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले होते.पाऊस कसा पाडता येईल यासंदर्भातील उपाय सुचवणारे डझनावारी प्रस्ताव मांडले गेले होते. खुद्द मि. चावलांनी झाडे आणि पिके कशी वाढवावीत आणि कापावीत याची एक पद्धत तपशीलवारपणे वनविभागाकडे पाठवली होती.लष्कराने ढग खेचून व पसरवून देण्यासाठी विशिष्ट भौमितक आकारांत जेट विमाने चालवावीत असा प्रस्ताव पाठवला होता.पोलिसांनी भटजी बोलावून बेडकाचे लग्न लावून द्यावे असे कळवले होते.विद्यापीठातील वर्माजींनी एक प्रचंड मोठ्ठा पंखा बनवून घ्यावा आणि ढग वळवावेत असे सुचवले होते.त्यासाठी विशेष तीव्रतेने वीजपुरवठा करावा लागेल असे त्यांनी विद्युत बोर्डाला कळवले होते.बर्नाला आणि टेलर गल्लीतील उभरत्या वैज्ञानिकांनी ते सैनिक फार्ममधील मिस रैना यांनी व्यापारी मेळ्यांना हजेरी लावून आपली खूप आवाज करणारी चुंबकीय शक्तीने ढग खेचून आणू शकतील अशी यंत्रे दाखवली होती…”
हे उपरोधिक कथन असे सुचवते आहे की लोकशाहीतून आलेले व्यक्तीस्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय समाजातील सर्वांना आपली मते व्यक्त करायची संधी देते आहे पण आपले मत विज्ञानावर, विवेकावर, तर्कावर आधारलेले असावे किंवा अंधश्रद्धेतून आलेले नसावे याचे भान सामान्य लोकांना तर नाहीच आणि माध्यमांनाही नाही. त्यामुळे मतमतांचा गलबलाच काय तो निर्माण होतो नी हाती ठोस काही लागतच नाही.
‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’च्या दुसऱ्या प्रकरणात कथन एकदम २० वर्षे पुढे सरकले असले तरी वीस वर्षांत मि.चावला यांच्या घराची सांपत्तीक स्थिती काही सुधारलेली नाही आणि ते अजूनही एकाच खोलीत, एकाच पंख्याखाली कोंदटलेल्या हवेत झोपत आहेत. आता वीस वर्षांच्या झालेल्या चावलांच्या मुलाला संपतचा मात्र त्या कोंदट खोलीत जीव घुसमटतो. तो रात्री घराच्या गच्चीवर जाऊन काही तरी कल्पनारंजन करून मन रमवतो.पण सकाळी तीच चाकोरी सुरू होते. संपतचे वडिल मि.चावला आपण घरातील कर्ता पुरूष आहोत हे दाखवायला सकाळपासूनच कुटूंबीयांना स्वतःच्या सेवेसाठी वापरून घेतात,त्यांना सतत काहीतरी उपदेश करतात.अशा सरंजामशाही कुटूंबव्यवस्थेत कोणत्याही घरात एक कोलाहलच निर्माण होतो. संपत या वातावरणाला कंटाळून जातो. तिसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी परत एकदा मि.चावला वर्तमानपत्र मोठ्याने वाचत आहेत.एक बातमी वाचून ते म्हणतात-
“मी सांगत नव्हतो आणखी एक भ्रष्ट राजकारणी. एका आंतरराष्ट्रीय घोटाळ्यातून बाहेर पडत नाही तो हा दुसरा घोटाळा.आपले राजकारणी निष्काळजी झाले आहेत. ते स्विस बॅंकेत इतकी खाती उघडत आहेत की जितक्या ते आपल्याला विचलीत करायला गांधी टोप्याही घालत नसतील.संपूर्ण देशात एकही सत्यवचनी राजकीय नेता उरलेला नाही.आपल्या लोकसभेत सगळे चोर भरले आहेत. सगळे पंतप्रधानांना उत्तरदायी आहेत पण ते तर सगळ्यात मोठे चोर आहेत.बघा त्यांच कसं छान चाललं आहे. प्रत्येक फोटोत ते आणखीनच स्थूल झालेले दिसत आहेत”
या कथनातून लेखिका आपल्या देशातील राजकीय परिस्थितीही कशी कोलाहलाची आहे ते सुचवते आहे. सामान्य माणसाचा लोकशाहीवर विश्वास रहावा असे वातावरणच सभोवती नाही असे लेखिकेला म्हणायचे आहे.
आपल्या वडिलांना देशाच्या राजकारणाबद्दल माहीत आहे पण शहाकोट या नगरात काय घडते याबद्दल त्यांना माहीत नाही असे म्हणत पिंकी त्यांना बाजारात गोंधळ (हलाबल्लू) घालणाऱ्या माकडाबद्दल मात्र सांगते. तिने संपतला घेऊन बाजारात जावे असे सुचवल्यावर संपतसोबत असेल तर माकड नक्कीच माझ्यावर हल्ला करेल असे म्हणत संपतचे दुबळेपण अधोरेखीत करते.तिची आजी संपतला गेल्या दोन वर्षांत नोकरीत बढती मिळालेली नाही की पगारवाढ झालेली नाही याबद्दल सहानुभूती व्यक्त करते.एकूणच संपत चावलांच्या घरातील मोठा मुलगा असूनही त्याला कुटूंबात किंमत नाही कारण तो व्यवहारचतुर नाही असे कथनातून सुचवले जाते.कथनात पुढे संपतच्या सरकारी नोकरीच्या निमित्ताने कथक एकूणच सरकारी नोकरी लोकांना का आवडते याबद्दल कारणमीमांसा करतो.सरकारी नोकरीत लागताना माणसे काय विचार करतात ते कथक सांगतो. तो म्हणतो –
“सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना दुपारी मस्त वामकुक्षी काढता येते.तिथे चहावाली मुले दिवसभर दुधाळ वाफाळत्या चहाचे ग्लास घेऊन वरखाली धावत असतात.सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत औषधोपचार मिळू शकतो आणि निवृत्तीवेतनही.रेशनकार्ड,टेलिफोन जोडणी,गॅस जोडणी सगळे काही त्यांना सहज मिळते.सणवार आणि इतर सुट्ट्यांचा तर देश आहे हा.इथे वरिष्ठ साहेब एखाद्यावर रागावले तर त्याहून मोठ्या आवाजात त्याच्या कनिष्ठावर रागावू शकतो…”
एकूणच सरकारी कर्मचारी कसे मस्त आणि सुस्त असतात,सरकारी कार्यालये म्हणजे एक प्रचंड कोलाहलच असतो असे लेखिकेला या उपरोधिक कथनातून सुचवायचे आहे.
‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या चौथ्या प्रकरणात संपत ज्या सरकारी कार्यालयात म्हणजे शहाकोटच्या पोस्ट ऑफिसात काम करत आहे ते कसे भर बाजारात, गर्दीत,कोलाहलात आहे त्याचे वर्णन कथक करतो. मग संपत तारेच्या कुंपणात अडकून डोक्यावरच्या केसांचा पुंजका गमावून शॉर्टकटने आपल्या कार्यालयात पोहचतो तेव्हा तिथे त्याचे दोन सहकारी खुर्च्यांवर पाय ठेवून मजेत गप्पा मारण्यात कसे मश्गुल आहेत त्याचे वर्णन कथक करतो. विशेषतः विवाहीत गुप्ताजी आणि अविवाहीत ज्योत्स्ना यांच्या या गप्पा इतक्या व्यक्तीगत पातळीवरच्या आहेत की संपत अवाक होतो. ज्योत्स्नाला डोळे मिचकावत गुप्ताजी तिला हिरवा रंग शोभून दिसत नाही हे इतक्या सहजपणे सांगताना दिसतात की हे कार्यालयीन वातावरण नको एवढे मोकळे आणि असभ्य वाटते.पोस्टमास्टर येऊन त्यांच्या मुलीच्या लग्नात तीनही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी येऊन पडतील ती कामे करायची आहेत हे भिडभाड न बाळगता सांगू शकतात आणि सहकारी देखील ती आज्ञा सहज स्वीकारतात हे कथक सांगतो तेव्हा आपल्या अधिकारांचा दुरूपयोग सरकारी कर्मचारी कसा करतात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही अशा गुलामगिरीची सवय झालेली असते असे कथकाला सांगायचे आहे. एकूणच सरकारी कार्यालयातील मनमानी कारभार,ढोंगीपणा, लाचारी आणि गोंधळाचे दर्शन घडवून लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर भारतातील लोक कसा करत आहेत हे कथकाला दाखवायचे आहे.संपत या सगळ्या व्यवस्थेत इतर लोकांसारखा निगरगट्ट होऊ शकत नाही त्यामुळे त्याला त्याचे कार्यालय कोंडवाडा वाटते. या कार्यालयात विरंगुळा शोधण्यासाठी तो लोकांची आलेली पत्रे फोडून ती वाचण्याचा मार्ग निवडतो.शहाकोटमधील अनेकांची खाजगी रहस्ये त्यामुळे संपतला माहीत झालेली आहेत. त्याची निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती बरी असल्याने याचा उपयोग संपतला पुढे लोकांना प्रभावीत करण्यासाठी करता येतो.
संपत पोस्टमास्टरांच्याकडील लग्नात कल्पनारंजन करू लागतो आणि त्यामुळे अनवस्था प्रसंग ओढवतो. संपतला नोकरीतून काढून टाकले जाते.त्यानंतर आपले वडील आपल्याला दुसऱ्या नोकरीत अडकवणार हे कळल्यावर संपत अस्वस्थ होतो. त्याच्या आईने त्याला खायला दिलेला पेरू एकदम मोठा होत चालला आहे, फुटला आहे आणि त्याचा रस आपल्या धमन्यांतून वाहू लागला आहे असे दृष्य कथक रंगवतो ते सूचक आहे. कारण पुढे संपत पेरूबागेत पेरूच्या झाडावरच मुक्काम हलवतो आणि अखेरीस तर तो दिसेनासा होतो तेव्हा त्याच्या खाटेवर फक्त एक बुद्धाच्या आकाराचा पेरूच शिल्लक राहिलेला असतो.पेरू हे जणू संपतचे आदीसत्व, संपतचे मुक्त अंतर्मन आहे असे कथकाला सुचवायचे आहे.
संपत पेरूबागेत स्थलांतर करतो तेव्हा सगळेच त्याला पेरूच्या झाडावरून खाली उतरण्याची विनवणी करत रहातात.तेव्हा कथक संपतच्या मनातला प्रश्न वाचकांसमोर ठेवतो. “किटक, पक्षी, माकडे झाडावर राहू शकतात तर मी का नाही ?” आपण झाडावरून खाली उतरत नाही म्हणून हतबल झालेल्या वडिलांना पाहून संपतला प्रश्न पडतो की आपणच असे इतरांपेक्षा वेगळे का आहोत ? इतरांप्रमाणे सर्वांशी मिळून मिसळून,खोटंखोटं आपल्याला का वागता येत नाही ?आणि आपण असे आहोत तर हे लोक आपल्याला आहोत तसे सोडून का देत नाहीत , आपला पिच्छा पुरवून त्यांच्यासारखेच जगण्याचा आग्रह का करतात असे संपतच्या मनतले प्रश्न कथनातून सामोरे येतात.
संपतने झाडावरून खाली उतरावे म्हणून डॉक्टर,वैदु,साधू,तांत्रिक, मांत्रिक सगळ्यांकडे मि.चावला जातात पण सगळेजण वेगवेगळे उपाय सुचवतात. त्यातून आरोग्यव्यवस्थेतही कोलाहलच आहे असे कथक सुचवतो.संपतचे लग्न लावून देण्याचा जो सगळा प्रकार मि. चावला आयोजित करतात त्यातून विवाहव्यवस्थेतील भोंगळपणा नी कोलाहल कथक दाखवून देतो. संपतची बहीण पिंकी हिच्या आणि आईसक्रीमवाल्या मुलाच्या प्रेमप्रकरणातून देखील विवाहव्यवस्था आणि त्यात अडकलेले प्रतिष्ठेचे प्रश्न याने कोलाहलच निर्माण होतो असे कथक दाखवतो.प्रशासन,कायदा, लष्कर अशा सगळ्या व्यवस्था संपतच्या निमित्ताने पेरूबागेत येणाऱ्या भक्तांना त्रास देणाऱ्या माकडांचा प्रश्न निकाली लावण्यासाठी जे काही निर्णय घेतात नी कृती करतात त्यामुळे तर अभूतपूर्व गोंधळ निर्माण होतो असे कथक दाखवतो.एकूण कोलाहल, गोंधळ हा भारतीय समाजजीवनाचा अपरिहार्य भाग आहे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या व्यवस्थांच्या चाकोऱ्यांत व्यक्ती स्वतःची ओळख गमावून बसते असे कथकाचे निरीक्षण आहे. अशावेळी व्यक्ती एकतर या चाकोऱ्या यांत्रिकपणे पाळत रहाते आणि त्यातच सत्ता मिळवून अरेरावी करते जसे संपतचे वडील मि.चावला करतात किंवा मग पिंकीसारखा आक्रमक होऊन ओळख हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते.स्त्रिया पिंकीच्या आजीसारख्या दुसरीशी तुलना करून स्वतःकडे एखादी गोष्ट नाही म्हणून खंत करतात नी तसे काहीतरी मिळाले तरी समाधान मानतात. पण कुल्फी,संपत यांच्यासारखी स्वप्नाळू माणसं मात्र कोलाहलात घुसमटू लागतात आणि मग मोकळा श्वास घेण्याच्या तीव्र इच्छेने काहीतरी वेगळेच करून बसतात असे कथकाला सांगायचे आहे.
संपतने आपल्या स्मरणशक्ती आणि निरीक्षणांच्या आधारे झाडाखाली जमलेल्या गर्दीतील लोकांची रहस्ये उघड करायला सुरूवात केल्यावर आणि त्यांना सुभाषितवजा वाक्यांतून सल्ले देण्यास सुरवात केल्यावर त्याला एक वेगळी ओळख मिळू लागते. जी त्यालाही काही काळ गंमतीची वाटते.पण कालांतराने त्यातील व्यर्थता त्याला उमगते. त्याचे वडील मि. चावला मात्र संपतला मिळू लागलेल्या लोकप्रियतेने एकदम उत्साही होतात कारण त्यांच्या हिशोबी स्वभावाला संपतमध्ये त्यांच्या कुटूबांची परिस्थिती कायमची बदलवून टाकण्याची क्षमता दिसते.आता त्यांना जगभरातल्या बातम्यांपेक्षा दैनंदिन घडामोडी महत्त्वाच्या वाटतात असे कथक सांगतो.संपतची ही उपयुक्तता लक्षात आल्यावर कुटूबांत त्याची किंमत एकदम वाढते. जणू तो राजाच होतो.कथक म्हणतो –
“एकदा हीच माणसे संपतला त्याने केलेल्या लहानसहान गोष्टींवरून किती ओरडत असत. आणि आता तो एकाद्या राजासारखा झाडावरून खुणा करून जे सांगत होता ते सगळे कुटूंबीय त्याच्यासाठी करत होते.”
संपतच्या वडिलांना संपतची उपयुक्तता लक्षात आल्यावर त्यांनी संपतला सुचवले.
“सगळेजण हातात काहीही नसताना काहीतरी घडवतात. तू जर प्रयत्न केलास तर तुलाही ते जमेल. तुलाच माहीत आहे हे कसे करायचे.”
संपत जी सुभाषितासारखी वाक्ये झाडाखाली जमलेल्या लोकांना ऐकवत रहातो ती कथनातील एक मजेशीर भाग आहेत. त्यातील काही उदाहरणे अशी –
काही नास्तिक मंडळी संपतला भेटून त्याचे बिंग फोडायला येतात तेव्हा संपत त्यांना सांगतो –
“शहराचा इन्सपेक्टर नदी पहायला जातो. तो नेमका पावसाळ्यात गेल्याने त्याला जी नदी दिसते त्याचे वर्णन तो अथांग लाटा येणारे पाणी असे करतो.पण काही महिन्यांनी त्याची काकी तीच नदी पहायला जाते तेव्हा तिला वाटते की आपला पुतण्या नदीचे वर्णन किती चुकीचे करत होता.नदी म्हणजे तर एक लहान गलिच्छ गटार आहे.आणखी काही दिवसांनी त्यांचा एक शेजारी नदी पहायला जातो त्याला तर नदी म्हणजे केवळ रखरखीत वाळवंट वाटते.” हे उदाहरण देऊन संपत जणू त्याची परीक्षा पहायला आलेल्या नास्तिकांना सांगतो की देव ज्याला त्याला वेगळा दिसतो कारण त्याला पहाणाऱ्या प्रत्येकाची परिस्थिती,मनःस्थिती वेगळी असते.”
नास्तिकतावाद्यांनी पाठवलेला एक हेर संपतला देवाच्या अस्तित्वाविषयी सारखे प्रश्न विचारून भंडावून सोडतो तेव्हा संपत म्हणतो-
“मुल आईच्या दुधासाठी रडते..नाही का ?”
“मला काही कळलं नाही”-हेर
“पक्ष्याचं पिल्लू किड्यासाठी रडतं.”
“पण सर.. दुधं,किडा ?”
“आईला माहीत असतं की मुलाला काय हवं आहे आणि मुलाच्या रडण्याच्या सुरावरून ती ते ओळखते.तसंच तुम्ही जर प्रश्न विचारले नाही तर बरे होईल .तुमची आई तुमच्याकडे येईल तोपर्यंत धीर धरा.”
कथकाला हे सुचवायचे आहे की संपतची ही उत्तरे हुशारीची आहेत आणि प्रामाणिकही.
संपतची आणि पेरूबागेतील माकडांची हळूहळू मैत्री होऊ लागते.त्याचे वर्णन कथक करतो.
“संपत पेरूबागेत आला तेव्हा माकडे त्याच्याकडे आपल्या हद्दीत आलेला दुसऱ्या प्रजातीचा एक परका, बसून रहाणारा सभासद म्हणून पहात होती.ती त्याच्याशी एक विशिष्ट अंतर ठेवून वावरत असंत.आपले दात दाखवून,चेहरे विचित्र करून,आवाज करून ते आपला उपहास व्यक्त करत असत.त्यांच्या चिडवण्याची जराही पर्वा न करता,उलट एक आपले लक्ष वेधून घेणारी नवी गोष्ट म्हणून संपत आनंदाने त्यांच्यासारखेच आवाज करत,चिडवत माकडांकडे पाही.त्यांच्यासारखेच डोळे फिरवत, गाल फुगवून संपत माकडांकडे पाही तेव्हा जणू त्यांचे एक सामोपचारीक समाधान होत असावे.हळूहळू माकडे संपतच्या जवळ येऊ लागली..”
फक्त माकडेच नाहीत तर झाडांवरचे किटकही संपतला आपलेसे वाटू लागले हे स्पष्ट करताना कथक म्हणतो –
“त्याने फांदीवर अगदी त्याच्या नाकाखाली एक किडा रांगताना पाहिला.त्याने जणू गडद हिरव्या रंगाचे चिलखत घातले होते.त्याच्या मिशा डोक्यातून पुढे आलेल्या होत्या.त्याचे पंख पारदर्शक परकरासारखे दिसत होते….संपत हळूहळू शांत झाला.त्याच्या भोवतीचे हे किटक किती सुंदर होते.मोठी फुलासारखी उदार फुलपाखरे,बारीक जिभेच्या मधमाशा, बारीक पावडर लावलेले किटक जणू काही त्यांनी डोळ्यात काजळच घातले आहे असे वाटे, विदुषकी चेहऱ्याचे आणि गोल नाकाचे रेशीमकिडे…अनेक किटकांची अहर्निश चाललेली कवायत संपत पहात राही.त्यांचे वाकडेतिकडे होणे,उड्या मारणे,उडणे जणू काही उकळता द्रव असलेल्या जादुगाराच्या भांड्यातून बाहेर येणारे हे हिरेमाणकासारखे चमकदार किटक ..कशाचे सत्व असलेले ? गवत,सूर्यप्रकाश,पाण्याचे ?”
संपतला असे प्रश्न पडत.कथक म्हणतो की त्याची आई,तो आणि माकडे यांचा काही एक नातेसंबंध आहे असे संपतला वाटू लागले होते. कथक सांगतो माकडांना पेरूबागेत संपतच्या कोणी भक्ताने विसरलेल्या रमच्या बाटल्या मिळाल्या आणि ती दारू पिऊन त्यांनी बागेत धिंगाणा घातला तेव्हा झाडाखालील सगळे माकडांवर चिडले.पण संपत जणू त्यांचा पालक झाला. ‘असं केलंत तर तुम्ही आजारी पडाल’ असे त्याने माकडांना सांगितले पण माकडांनी जे काही केले त्यात त्यांचा काही दोष नव्हता तर दारू बनवणाऱ्या माणसांचाच दोष होता असेच संपतला वाटले.माकडांना पेरूबागेतून दूर हटवले जाणार किंवा आपल्याला झाडावरून उतरवून देवळात बसवले जाणार आहे हे कळल्यावर संपतला बेचैन वाटले.झाड आता त्याचे घर झाले होते आणि ते त्याला सोडायचे नव्हते. त्याबद्दल कथक सांगतो –
“त्याने आपले सुंदर घर असलेल्या झाडाकडे पाहिले.किती गुळगुळीत,विस्तिर्ण ,चंदेरी फांद्या आहेत झाडाच्या .ज्या पुढे जाऊन वळतात, गाठी घेतात आणि त्यांना नाजूक पानांचे पुंजके येतात.माझ्यासाठी हे झाड किती महत्त्वाचे आहे.या झाडावर बसून –खूप उंचावर नाही की खूप खाली नाही त्याने जग पहिल्यांदाच स्वच्छपणे पाहिले होते.रात्रीच्या अंधारातून जणू शुद्ध होऊन निघालेले दिवस आणि स्वच्छ चमकदार काळ्या रात्री.उजाडताच पानांच्या जाळीतून येणारा सूर्यप्रकाश,हलता-डुलता,सरकता,फांद्यांना उष्णता देणारा, अधूनमधून संपतवर पडणारा. जणू काही संपत ही काही भरीव गोष्टच नाही आणि ते पाणी आहे असे मानून त्याला इतस्ततः पसरवून टाकणारा हा सूर्यप्रकाश.संपतला इथे आपण वजनरहीत झाल्यासारखे वाटत होते.प्रकाश त्याला हिंदोळत होता गवत,पाने आणि फुले आपल्या मांडीवर त्याला जोजवत होती आणि फळे आपल्या सुगंधांनी त्याला उदवत होती.उंच डोंगर आकाशात झेपावत होते आणि त्याला समुद्रासारखे अथांग वाटत होते त्यांचा पांढुरके ठिपके जणू संपतच्या डोळ्यांना सुखावत होते.”
कथक सांगतो संपतला त्याच्या कुटूंबात,सभोवतीच्या समाजात, कार्यालयातील सहकाऱ्यात,झाडाखाली जमणाऱ्या भक्तगणात कधीही जी स्वस्थता मिळाली नव्हती ती त्याला झाडावर निसर्गाच्या सान्निध्यात मिळत होती.पण या निसर्गावर तो कायमचा हक्क सांगू शकत नव्हता.जर निसर्गानेच त्याच्यापर्यंत पोहचून त्याच्यावर हक्क सांगितला तर .. संपतला ते हवेसे वाटत होते.
संपतला अचानक शाळेत असताना ब्रदर जोन्स या शिक्षकाने केलेली आणि विद्यार्थ्यांना म्हणून दाखवलेली कविता आठवते. त्या कवीहृदयाच्या ब्रदरची अर्थातच नंतर शाळेतून हकालपट्टी झालेली असते. त्याच्या कवितेत एका मुलीला उद्देशून कवी म्हणत असत असतो की तुझे दहा कुटूंबीय तुला पुन्हा पुन्हा हाका मारून परत बोलावतील पण तू परत फिरू नकोस. त्यांना कुठे माहीत आहे की पाण्यातून सोन्यासारखा चमकदार मासा उसळी मारून येणार आहे.संपतला ती कविता आपल्या परिस्थितीचे वर्णन करणारी वाटते. आपले कुटूंबीय आपल्याला परत बोलावत आहेत पण आपण त्यांना परत न फिरण्याचे काय कारण सांगणार आहोत? आपल्याला असे काय दिसणार आहे की जे त्यांना माहीत नाही नी आपल्याला माहीत आहे ? असा प्रश्न संपतला पडतो. तो आपले हे प्रश्न मुंगीला, पोपटाला विचारतो पण त्यांच्याकडे उत्तर मिळत नाही.आपल्याला जे काही पहायचे आहे ते आपल्यालाच सर्वांपासून दूर जाऊन शोधले पाहिजे यावर संपतचा निर्णय ठाम होत जातो.

पेरूबागेत येऊन झाडावर बसल्यापासून संपतने एका पत्र्याच्या पेटीत पक्ष्यांची पिसे, उडत आलेला कापूस, पाने, फुले, सापाची कात,अनेक बिया असा खजिना साठवला आहे. तो आपल्या खाटेवर मांडून तो बसतो.त्याला जाणवते माणसाने साठवलेल्या गोष्टी तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात की जेव्हा तो त्यांच्यापासून अलिप्त राहू शकतो.पण त्याने साठवलेल्या निसर्गातील गोष्टींत आणि किटक,पाने,फुले,पक्षी,माकडे यांच्याशी जोडलेल्या नात्यांत तर तो गुंतला आहे. आता तेच सगळे त्याला अर्थपूर्ण वाटू लागले आहे. आता निसर्गानेच आपल्याला सामावून घेतले तरच आपण आनंदी होऊ असे त्याला वाटते आहे.
कथकाला संपतचा एक समाजाच्या कोलाहलात आपला आवाज हरवलेली, अस्तित्व हरवलेली व्यक्ती ते स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज शोधून काढण्यासाठी विजनवासात जाण्याची हिंमत,आत्मविश्वास मिळवलेली व्यक्ती असा झालेला प्रवास दाखवायचा आहे.संपत पेरूबागेत येऊन राहू लागल्यानंतर त्याच्या वडिलांची हतबलता पाहून त्याने सहज गंमत म्हणून झाडाखाली जमलेल्या लोकांच्या पत्रांतून त्याला ज्ञात झालेल्या रहस्यांमुळे केलेली भाकिते लोक गांभिर्याने घेतात. पण हा खेळ संपतला पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. आपण लोकांना वाटतो तसे ज्ञानी नाही याची त्याला जाणीव आहे.म्हणूनच पेरूबाबा,मंकीबाबा या आपल्या ओळखी कितीही अहंकार सुखावणाऱ्या असल्यातरी त्याला त्या नको आहेत.कारण त्याने शांत पेरूबागेत पुन्हा एकदा नको असलेला कोलाहल निर्माण झालेला त्याने अनुभवला आहे.या कोलाहलापासून कायमचे दूर जाऊन निसर्गात एकरूप व्हावे ही संपतची आंतरीक गरज आहे.आपल्या मनाची ही हाक संपत ऐकतो आणि बुद्धाच्या आकाराच्या पेरूत जाऊन बसतो आणि माकडे तो पेरू घेऊन जंगलात निघून जातात. हे कथनातील कल्पनारंजन असले तरी ते सूचक आहे.माणसाचा परमात्म्याचा शोध म्हणजे स्वतःचाच शोध असतो आणि तो माणसांच्या कोलाहलापासून दूर गेल्याशिवाय, अहंकारातून मुक्त झाल्याशिवाय आणि निसर्गाचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याच्यात एकरूप झाल्याशिवाय घेताच येत नाही असे ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या कथकाला सुचवायचे आहे.
अशाप्रकारे किरण देसाई यांच्या ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीतील कथनातून, वाचकांना लेखिकेला एकूणच समाजजीवन आणि लोकशाहीसारख्या व्यवस्था याबद्दल जाणवणारी व्यर्थता प्रतीत होते.वस्तुतः या व्यवस्था माणसांनीच निर्माण केल्या पण त्या योग्य पद्धतीने,विवेकाने,प्रामाणिकपणे व्यक्तीच्या भल्यासाठी वापरल्या गेल्या नाहीत तर केवळ कोलाहलच निर्माण होतो आणि त्यात एखाद्या संवेदनशील व्यक्तीचा नव्हे माणुसकीचाच श्वास घुसमटू शकतो असे लेखिकेला सुचवायचे आहे.
‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही कादंबरी तुम्ही स्वतः वाचा ही पुन्हा एकदा विनंती.आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का तेही कळवा.पुढील वाचन,लेखनाला त्यामुळे हुरूप येतो.पुढील ब्लॉगमध्ये आणखी भारतीय इंग्रजी कादंबरीकार शशी देशपांडे यांचा परिचय आपण करून घेऊ.
-गीता मांजरेकर

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.