‘फास्टींग -फिस्टींग’ ही अनिता देसाई यांची कादंबरी १९९९ मध्ये प्रकाशित झालेली आहे. त्यावर्षी ‘मॅन बुकर प्राईझ’च्या नामांकनांच्या यादीत या कादंबरीचा समावेश होता. दुर्दैवाने त्यावर्षी ‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीला मॅन बुकर प्राईझ मिळाले नसले तरी या कादंबरीची इंग्रजी साहित्य वर्तुळात निश्चितच चर्चा झाली.’फास्टिंग’ म्हणजे उपास आणि ‘फिस्टींग’ म्हणजे भरपेट खाणं !या दोन्ही शब्दांतला विरोधाभास तर कादंबरीच्या शीर्षकातून लक्षात येतोच. पण त्याबद्दल लेखिकेला त्याबद्दल नेमकं काय भाष्य करायचं आहे ते कादंबरीचे सखोल वाचन केल्यावरच उलगडते.

या ब्लॉगमध्ये ‘फास्टिंग फीस्टींग’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे यांचा परामर्श आपण घेणार आहोत.

ज्यांना ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

अनिता देसाई यांचा जन्म ,शिक्षण भारतात दिल्ली शहरात झाले. त्या स्वतः जन्माने ऍंग्लो इंडियन असल्या तरी त्यांनी विवाह भारतीय माणसाशी केला.एवढेच नव्हे तर विवाहानंतर बरीच वर्षे त्यांचे वास्तव्य मुंबई, कलकत्ता आणि उत्तर प्रदेशातील शहरांत होते.त्यानंतर त्यांना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट विद्यापीठात प्राध्यापक होण्याचा मान मिळाला आणि त्यानिमित्ताने त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. अमेरिकेत आल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी ‘फास्टींग-फिस्टींग’ कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या पहिल्या भागात भारतातले त्यांना दिसलेले मध्यमवर्गीयांचे कौटुंबीक वातावरण हा मध्यवर्ती भाग आहे तर दुसऱ्या भागात अमेरिकेतील मध्यमवर्गीयांच्या कौटुंबीक आयुष्याचे दर्शन अनिता देसाई यांनी घडवले आहे.अशी दोन देशांतील कौटुंबीक स्थिती दाखवताना लेखिकेचा हेतू केवळ वास्तव वाचकांसमोर ठेवण्याचा आहे. दोन देशांतील कुटुंब व्यवस्थेची तुलना करून कोणा एका देशातील कुटुंब व्यवस्था आदर्श आहे किंवा दुसऱ्या देशातील कुटुंबव्यवस्थेपेक्षा सरस आहे असे विधान अनिता देसाई यांना अजिबात करायचे नाही.किंबहुना भारत असो की अमेरिका दोन्ही देशांतील कुटुंबात काहीतरी उणीवा आहेत आणि त्याचे परिणाम कुटुंबातील स्त्रियांना,मुलांना भोगावे लागत आहेत असे अनिता देसाई यांना जाणवले आहे.या दोन्ही देशांतील कुटुंब व्यवस्थेतील उणीवा पुरूषप्रधानतेमुळे आहेत असेही अनिता देसाई यांना म्हणायचे नाही. मानवी नात्यातील स्वार्थी,निष्प्रेम प्रवृत्ती मग ती सामाजिक दबावामुळे बनलेली असो की भौतिक समृद्धीमुळे बनलेली असो -ती दाखवणे हा अनिता देसाई यांच्या कादंबरीचा उद्देश वाचकांना प्रकर्षाने जाणवत राहतो. आध्यात्मिक हेतूने किंवा डाएट म्हणून उपास-तापास करून आत्मक्लेष करून घ्या की खाण्यापिण्याची चंगळ करा माणसे समाधानी नसतात, कुटुंबे अस्वस्थ असतात ती का ? या मूलभूत प्रश्नाचा शोध अनिता देसाई ‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीत घेत आहेत असे जाणवते.

‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीच्या कथानकाच्या पहिल्या भागात भारतातल्या पाटणा शहरातील म्हणजे उत्तर प्रदेशातील मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यातील माणसांचे नातेसंबंध केंद्रस्थानी आहेत.या कुटुंबातील कर्ता पुरूष न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेला आहे.त्याचे वडील टॅक्स इन्सपेक्टर होते आणि त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण दिले आहे.योग्य वयात कानपूरच्या एका व्यापाऱ्याच्या मुलीशी त्याचा विवाह लावून दिला आहे. पुढे या तरूणाने स्वतःच्या कर्तृत्वाने वकीली पेशात चांगले बस्तान बसवले आहे.त्याच्या कुटुंबात प्रारंभीच्या दोन मुली असल्या तरी नंतर बऱ्याच वर्षांच्या अंतराने मुलगाही जन्माला आला आहे. तोपर्यंत या वकीलाची पदोन्नती होत तो न्यायाधीश झाला आहे. पाटण्याच्या सिव्हिल लाईन या वस्तीत त्याने स्वतःचा एक मजली बंगला बांधला आहे.स्वतःची मोटार गाडी विकत घेतली आहे.मुलांना त्याने ख्रिस्ती मिशन स्कुलमध्ये घातले आहे. घरात स्वयंपाकी, वरकामाला मोलकरीण,ड्रायव्हर अशी माणसे त्याने स्वतःच्या कुटुंबाच्या दिमतीला ठेवली आहेत. थोडक्यात न्यायाधीशाचे कुटुंब हे पाटण्यातील प्रतिष्ठीत, मध्यमवर्गीय कुटुंब बनले आहे.न्यायाधीश आणि त्यांची पत्नी यांच्यात सहसा वादविवाद झालेले नाहीत कारण त्यांची पत्नीने त्यांच्या मताला कधी विरोध केलेलाच नाही.दोन मुलींनंतर मुलगा झाल्याने तर ती स्वतःला न्यायाधीशांएवढीच प्रतिष्ठीत ,कर्तृत्ववान समजते आहे.

वरकरणी सर्व भौतिक सुखसोयी असलेल्या या कुटुंबात मुलांना भरपूर प्रेम ,माया मिळावी अशी अपेक्षा करायला हरकत नसावी पण प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.न्यायाधीशांच्या सेवेत आणि सोबतीत त्यांची पत्नी कायम गुंतलेली आहे.न्यायाधीश सकाळी न्याहारी करून कामाला जातात आणि घरी परतल्यावर टेनीस खेळायला जातात.आपण उत्तम टेनीस खेळतो असा त्यांचा समज आहे. मुलांकडे लक्ष द्यायचे म्हणजे केवळ त्यांना ओरडायचे,त्यांना त्यांचे स्वतंत्र निर्णय कधीच घेऊ द्यायचे नाहीत असा खुद्द न्यायाधीशांचा आणि म्हणून त्यांच्या पत्नीचाही समज आहे.  समाजमान्य पद्धतीने मुलींना शिक्षणाची फारशी गरज नाही,थोडेफार शिक्षण झाले की त्यांची लग्ने लावून द्यायची अशीच मानसिकता न्यायाधीशांची आहे.एकुलत्या मुलाला मात्र सर्वात चांगले शिक्षण देऊन परदेशात उच्चशिक्षण व नोकरीसाठी पाठवावे असे त्यांनी ठरवले आहे.एकंदरीत एका बाजूला पारंपरीक समाजमूल्ये आणि दुसरीकडे आधुनिक मूल्य याच्यातील काय निवडावे या द्वंद्वात अडकलेले हे न्यायाधिशांचे व्यक्तिमत्व आहे. ते सोयीस्करपणे,समाजात नाचक्की होणार नाही आणि प्रतिष्ठा वाढेल याचा विचार करून यातील एकाची निवड करत रहातात.

न्यायाधीशांची सर्वात मोठी मुलगी उमा ही या कुटुंबातील सर्वात उपेक्षीत व्यक्ती आहे.ती जन्मतःच दिसायला सर्वसामान्य आहे आणि शिक्षणात तिला गती नाही. सेंट मेरी शाळेत ती जात असली तरी दरवर्षी तिच्या प्रगतीपुस्तकात नापासाच्या लाल खुणाच अधिक असतात.उमाला शिक्षणात गती नसली तरी तिला शाळेतील मदर ऍग्नेस आवडते.आपण घरी जाऊच नये, शाळेतच रहावे असे तिला वाटते.घरात तिच्याकडून तिची आई घरकामाची अपेक्षा करत राहते आणि ते उमाला आवडत नाही. विशेषतः तिला धाकटा भाऊ-अरूण जन्मल्यापासून तर आईने तिला शाळेतून काढून टाकून आपल्या सेवेला घरीच ठेवून घ्यायचे  ठरवल्यावर उमा फारच अस्वस्थ होते. घरातून कोणालाही न सांगता ती संध्याकाळी शाळेत मदर ऍग्नेसला भेटायला जाते. मदर ऍग्नेस उमाचे म्हणणे ऐकून घेते , तिच्या वडीलांशी फोनवर बोलते पण उमा सतत नापास होते आहे तर तिला शाळेत पाठवून काय उपयोग या उमाच्या वडिलांच्या प्रश्नाचे उत्तर तिला देता येत नाही.शेवटी मुलींना घरकाम आलेच पाहिजे अशी समजूत घालून ती रडून रडून मुर्च्छीत झालेल्या उमाला मदर मेरी व बाल येशूची फोटोफ्रेम भेट देऊन घरी पाठवून देते.उमाचे शिक्षण इथेच संपते.धाकट्या भावाला अरूणला मालीश करायचे, न्हाऊ घालायचे,त्याच्याशी खेळायचे आणि त्याला सतत संरक्षण देत रहायचे हे काम उमाच्या वाट्याला येते.तिच्या आयुष्यात कधीतरी विरंगुळा येतो तो तिच्या मीरामावशीच्या आगमानाने.

उमाच्या घरी तिच्या आईची एक दूरची बहीण मीरा मावशी अधूनमधून येते. ही विधवा स्त्री सतत वेगवेगळ्या तीर्थस्थानांना भेट देणारी आहे. ती आली की उमाला देवादिकांच्या गोष्टी सांगते. तिच्या मांडीवर डोके टेकून उमा त्या अद्भूत गोष्टी ऐकत राहते.तिने केलेला लाडू खाणे उमाला फार आवडते.मदर ऍग्नेसप्रमाणे ही मीरामावशीही उमाच्या भावविश्वाचा एक आधार आहे.मीरामावशीच्या बरोबर नेहमी तिची शीवमूर्ती असते. पण एकदा ती मूर्ती चोरीला जाते आणि मग तर मीरामावशीच्या तीर्थस्थानांना भेट देण्याला एक नवाच उद्देश मिळतो ! हरवलेली शीवमूर्ती शोधणे हा तो उद्देश आहे. मीरामावशी आपल्यासोबत उमालाही कधी नदीवर घेऊन जाते. उमाची दोन भावंडे नदीत उतरायला घाबरतात पण उमा मात्र कशाचीच पर्वा न करता नदीच्या प्रवाहात उतरते. ती बुडते आहे हे पाहून नावाडी तिला वाचवतात. मीरामावशी आपल्या पूजेत तल्लीन असते. पुन्हा एकदा मीरामावशी उमाला आपल्याबरोबर कोणा स्वामीच्या मठात घेऊन जाते. तिथे उमा आपल्या कल्पनाविश्वात मग्न होऊ लागते. तेव्हा तिच्यावर शीवाची कृपा आहे, शीवाने तिला वरली आहे असे म्हणून मीरामावशी तिला मठातच ठेवू पाहते. सुदैवाने उमाच्या वडीलांना काहीतरी शंका येते आणि ते उमाचा चुलत भाऊ राजूला व सख्खा भाऊ अरूणला उमाला घरी घेऊन यायला पाठवतात.ते दोघे उमाला सावध करतात आणि घरी आणतात.मीरामावशीचे उमाच्या घरी येणे कमी होते

उमाचे लग्न लावून देण्याची खटपट सुरू होते तेव्हा तिचे सामान्य दिसणे,नखरे न करणे या गोष्टींमुळे तिला कोणी पसंत करत नाही. तिला बघायला आलेला एक मुलगा तर तिची धाकटी बहीण अरूणाला पसंत करतो कारण अरूणाचे मान वेळावत बघणे त्याला आकर्षीत करते. अरूणा नापास न होता शाळेच्या शेवटच्या वर्षापर्यंत जाते आणि मॅट्रीक पास होते. ती तिला हवं ते स्वातंत्र्य घेते. आपल्या मैत्रीणींबरोबर सिनेमांना जाते, तरूण मुलांशी बोलते.उमाला ते स्वातंत्र्य घेता येत नाही. उमाचे लग्न दोन वेळा ठरते. त्यातील एकावेळी हुंडा घेऊन मुलाचा बाप घर बांधतो आणि मुलगा रूरकीला उच्चशिक्षण घेण्यासाठी गेला आहे. त्याला इतक्यात लग्न करायचे नाही असे सांगतो. ते लग्न उमाचे वडील नाइलाजाने मोडतात.त्यात त्यांचे हुंड्याचे पैसेही बुडतात.पुढे एका बिजवराशी उमाचे लग्न ठरवले जाते, घाईत उरकलेही जाते. पण सासरी गेल्यावर उमाचा नवरा मिरटला जातो सांगून जो गायब होतो तो परततच नाही. उमा आपल्या घरी हे सांगते तेव्हा तिचे वडील जावयाचा शोध घेतात. तो एका बाईबरोबर राहात असून त्याला मुलेही आहेत हे कळल्यावर आपण आणि उमा फसवले गेलो याचा संताप उमाच्या वडीलांना येतो. ते तातडीने उमाच्या सासरी येऊन तिला परत माहेरी घेऊन जातात. यावेळी तिला दिलेले सगळे दागदागिनेही ते परत मागून घेतात.

दरम्यान उमाची धाकटी बहीण अरूणाचे लग्न तिला अगदी हव्या तशा श्रीमंत,देखण्या माणसाबरोबर होते. त्या लग्नाच्या आधी अरूणा तिच्या नवऱ्याच्या मित्रमंडळींसाठी वडिलांना कॉकटेल पार्टी द्यायला लावते. या पार्टीत उमाला आकडी येते.डॉ.दत्त तिला त्यातून बाहेर काढतात. अरूणाचे टोमणे मात्र उमाला ऐकून घ्यावे लागतात. अरूणाचा लग्न सोहळा दिमाखात पार पडतो.अरूणा मुंबईत रहायला जाते. तिच्या जुहूच्या घराबद्दल ती आपल्या माहेरी कौतुकाने सांगत रहाते. पण कधीही उमाला किंवा अरूणला मुंबईला घेऊन जात नाही. उमाला डोळ्याच्या डॉक्टरांनी मुंबईत एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्यायला सांगितले आहे. पण अरूणाला विनंती करूनही ती उमाला मुंबईला नेत नाही. उलट आपल्या दोन्ही लहान मुलांना,सासूला घेऊन ती जेव्हा जेव्हा पाटण्याला येते तेव्हा तेव्हा ती उमाला त्यांची देखभाल करायला सांगते आणि स्वतः खरेदी करत भटकत राहते.उमाने पण आपल्यासारखी फॅशन केली पाहिजे तर तिचे लग्न जुळेल असा सल्लाही ती देते.

दोन वेळा लग्न मोडल्याने उमा कमनशिबी आहे असे ठरवून तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी प्रयत्न करणे सोडून देतात.प्रौढ कुमारी म्हणून आधी अरूणाचे आणि नंतर समाजाचे टोमणे ऐकत जगणाऱ्या उमाच्या आयुष्यात  काही घडतच नाही. तरीही काळ उलटतो आणि उमा चाळीशीला पोहोचते.तिच्या एकाकी, निरस आयुष्यात सुखाचे क्षण येतात ते तिचा चुलत भाऊ राजू भय्यामुळे. राजू भय्या मुंबईत असतो. पण तो एका पायाने अधू असल्याने आई-वडीलांचा नावडता आहे. काहीतरी कामे करून तो स्वतंत्र जगतो, देशभर फिरत राहतो. तो एकदा उमाच्या घरी येतो आणि उमाला रात्री डिनरला घेऊन जातो. उमा पहिल्यांदाच हॉटेलमध्ये जाते.तिथे राजूभय्या तिच्यासाठी बॅंडवादकांना एक गाणं वाजवायला लावतो, उमाने जीवनाचा आनंद घ्यावा असं राजू भय्याला वाटतं. पण उमाच्या आई-वडीलांना उमाने राजूभय्याबरोबर फिरायला जाणे,आनंद उपभोगणे पटत नाही.समाज काय म्हणेल ही चिंता त्यांना सतावते.

उमाचा धाकटा भाऊ अरूण याला स्वतःचे काही मतच नाही. त्याचे वडील त्याला सगळ्या विषयांना शिकवण्या लावतात,खेळायला वेळच ठेवत नाहीत. अरूण आपला विरंगुळा कॉमिक्समध्ये शोधतो. घरातील वातावरण त्याला अबोल करते. कॉमिक्स वाचतानाही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसतात. वडील म्हणतात ते उच्चशिक्षण अरूण घेतो, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देतो. आणि अखेरीस अमेरिकेतील प्रतिष्ठीत अशा मॅसेच्युसेट विद्यापीठात त्याला प्रवेश मिळतो. पहिल्यांदाच त्याला त्याच्या कुटूंबीयांपासून दूर रहावे लागणार असते.

अरूण अमेरिकेला निघून गेल्यावर उमाला एकटीलाच तिच्या आई-वडीलांची सेवा करत रहावी लागते. मदर ऍग्एनेस यांच्या परिचित एक ख्रिस्ती बाई मिसेस ओ हेन्री उमाला त्यांच्या घरी क्रिसमस पार्टीला बोलावतात पण उमाने तिथे जाऊ नये असेच तिच्या पालकांना वाटते.मिसेस ओ हेन्री उमाला बाटवतील, तिचे धर्मांतर करवतील अशी भीती तिच्या आई-वडीलांना वाटते.ओ हेन्री बाईंना एका प्रदर्शनात मदत करायला उमा जाते हेही त्यांना आवडत नाही.ओ हेन्री बाईंनी उमाला मसुरीजवळच्या लंदौर या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जायची इच्छा व्यक्त केली आहे पण उमाला घरून त्यांच्याबरोबर जायला परवानगी मिळत नाही. डॉ.दत्त उमासाठी एक नोकरी आणतात.नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलची देखभाल करण्यासाठी त्यांना उमा योग्य वाटते. पण उमाची इच्छा असूनही तिचे आई-वडील तिला ही नोकरी स्वीकारू देत नाहीत. उलट डॉ.दत्त यांचाच अपमान करतात.

राजूभय्याची बहीण आहे अनामिका. ही एक अत्यंत बुद्धीमान मुलगी आहे.शाळेत-महाविद्यालयात अनेक बक्षीसे तिने मिळवली आहे.तिने तिच्या हिमतीने परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी अर्जही केलेला असावा.पण तिचे आई-वडील समाजाच्या रूढीनुसार तिचे लग्न लावून देतात.सासरी अनामिकाच्या शिक्षणाबद्दल, बुद्धीमत्तेबद्दल कोणालाच कौतुक नाही.तिच्या घरातून बाहेर पडण्यावरही बंधने येतात. सासरचे लोक जणू अनामिकाला कैदेतच ठेवतात. माहेरच्या कोणत्याही कार्यक्रमात तिला सहभागी होऊ दिले जात नाही.अनामिका सासू-सासरे, नवरा-मुले यांच्या सरबराईत अडकून पडते. अखेरीस तर तिचे निधन झाल्याची तार येते. अनामिकाने आत्महत्या केली की सासरच्यांनी तिला जाळले याबद्दल संभ्रमच राहतो.अनामिकाच्या अस्थीविसर्जनासाठी तिचे आई-वडील पाटण्याला येतात तेव्हा त्यांच्याबरोबर उमाही नदीवर जाते. अनामिकाला परदेशी विद्यापीठातून आलेल्या पत्राचे काका-काकींनी काय केले असा बोचरा प्रश्न ती मध्येच विचारते. नदीच्या मध्यात सर्वजण पाण्यात डुबकी घेतात तेव्हा उमाही पाण्यात उडी घेते. पाण्याचा स्पर्श होताच तिला कोणीतरी मिठीत घेतल्यासारखे वाटते.ती पाण्यात वाहून जात असताना पुन्हा एकदा नावाडी तिला वाचवतो आणि किनाऱ्यावर आणतो.या प्रसंगानंतर उमाला कधीही फिट येत नाही.तिची आई पहिल्यांदाच तिला जवळ घेऊन रडताना ती अनुभवते.आईचे अश्रू अनामिकासाठी आहेत की आपल्यासाठी हे मात्र उमाला कळत नाही.

मीरामावशीला एका तीर्थक्षेत्री देवाच्या मूर्ती विकणाऱ्याच्या दुकानात तिची शीवमूर्ती गवसली आहे अशी बातमी येते. उमालाही नदीच्या पाण्यात आपले असे कोणीतरी भेटल्याचे जाणवते.

‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीच्या दुसऱ्या भागात अनिता देसाई यांनी अरूण अमेरिकेतील मॅसॅच्युसेट विद्यापीठात गेल्यावर त्याला तिथे जुळवून घेणे कसे कठीण वाटते आहे हे दाखवले आहे. वसतीगृहात एका आफ्रिकन विद्यार्थ्याबरोबर त्याला रहावे लागते. ते एका बाजूला त्याला आवडते कारण त्याला काही बोलावे लागत नाही. त्या आफ्रिकन विद्यार्थ्याचे धुम्रपान मात्र त्याला सहन करावे लागते.एकूणच अमेरिकेतील विद्यापीठात विद्यार्थ्यांचा चाललेला बेशिस्त  धुडगूस,त्यांचे संगीत, धुम्रपान आणि मद्यपान या वातावरणात अरूणला शांत राहून अभ्यास करत राहणे कठीणच वाटते.एक सत्र संपल्यावर त्याला विद्यापीठाच्या लायब्ररीत नोकरी मिळते पण सुट्टीत वसतीगृहात राहण्याची विद्यार्थ्यांना मनाई असते. अशावेळी नेमके भारतातून उमाच्या हस्ताक्षरातले पत्र अरूणला मिळते. तिच्या परिचीत ओ हेन्री बाईंची बहीण मिसेस पॅटन मॅसॅच्युसेट शहराच्या उपनगरात बे-बेरी लेन इथे राहात असते आणि तिने अरूणला सुट्टीच्या कालावधीत आपल्या घरी रहायला आमंत्रीत केलेले असते. अरूणला मनोमन स्वतंत्र खोली घेऊन एकटेच राहायचे असते. पण ते त्याच्या आवाक्याच्या बाहेरचे असते आणि तशी खोली उपलब्धही नसते. त्यामुळे नाइलाजानेच अरूण मिसेस पॅटन यांच्याकडे मुक्कामाला जातो.

पॅटन बाई अरूणचे स्वागत करतात पण त्यांची शाळकरी मुलगी मेलनी मात्र अरूणला स्वीकारत नाही.त्यांचा मुलगा रॉड अरूणशी मित्रत्वाने बोलतो. श्रीयुत पॅटन  स्वतःच रोज बार्बेक्यू करून त्यात मांस भाजून आवडीने खात असतात. अरूणला ते पहावत नाही आणि श्रीयुत पॅटन  यांना अरूणचे शाकाहारी असणे त्रासदायक वाटते.मिसेस पॅटन यांना मात्र अनेक दिवसांपासून शाकाहारी होण्याची आपली इच्छा आता अरूणच्या सोबतीने पूर्ण करू असे वाटते आणि त्या अरूणला घेऊन रोजच सुपर मार्केटमध्ये भाज्या,फळे, डाळी व अन्य खाद्यपदार्थ विकत घ्यायला जाऊ लागतात.अरूणला मिसेस पॅटनचे रोजच मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ खरेदी करणे अनाकलनीय वाटते.फ्रिज भरभरून वहात असतानाही मिसेस पॅटन आणखीन खाद्यपदार्थ का विकत घेतात हे अरूण त्यांना विचारतो. तेव्हा आपल्या कुटुंबात सर्वजण आपापले जेवण करून जेवतात आणि आपले काम अन्नपदार्थ भरून ठेवण्याचे आहे असे स्पष्टीकरण मिसेस पॅटन देतात. खरेदी करताना मिसेस पॅटनच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अरूणला वेडगळपणाचा वाटतो. एके रात्री तो मेलनीला उलट्या करताना पाहतो. ती दिवसभर फक्त शेंगदाणे,चॉकलेटस असेच पदार्थ खाताना त्याने पाहिलेले असते.पण मिसेस पॅटन तिला काही समज देत नाहीत उलट त्याच हतबल झालेल्या दिसतात हे अरूणला आश्चर्यकारक वाटते. पालकांच्या शब्दाबाहेर न जाणारा अरूण मिसेस पॅटनची मुले त्यांचे काही ऐकतच नाहीत हे पाहून चकीत आणि अस्वस्थ होतो.

उन्हाळा सुरू होतो तेव्हा मिसेस पॅटन संपूर्ण शरीराला तेल, विविध प्रकारची मलमे लावून सूर्यस्नान करत अंगणात उघड्यावर बसतात ते पाहून अरूण संकोचून जातो. मिसेस पॅटन सूर्यस्नान घेतात तेव्हा अरूणच्या खाण्यापिण्याची जबाबदारी घेत नाहीत. अन्य वेळीही त्या प्रत्यक्ष स्वयंपाकघरात काही शिजवत नाहीत फक्त वेगवेगळे सॅलडस कापून ठेवतात, खाद्याचे डबे उघडून ठेवतात.अरूणला ते आवडत नसेल तर त्याने डाळ शिजवून घ्यावी अशी मुभा त्या देतात पण अरूणने कधी आपल्या आईला स्वयंपाकघरात डाळ शिजवताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याची डाळ फारच बेचव होते. मेलनी तर ती डाळ पाहून किळस आली असे म्हणते. अरूण हे सगळे पाहतो पण प्रतिक्रिया देत नाही.

उन्हाळ्यात पाणवठ्यावर पोहायला जाणे ही अमेरिकन कुटुंबाची पद्धत आहे असे सांगून मिसेस पॅटन अरूणला आग्रहाने पोहायला घेऊन जातात.मेलनीही सोबत येते. मात्र ती रस्ताभर अरूणशी काहीही बोलत नाही. अरूण पाण्यात उतरतो आणि काही काळ त्या पाण्यात त्याला हवा असलेला एकटेपणा त्याला मिळतो. पण कालांतराने पाण्याबाहेर आल्यावर पुन्हा एकदा मिसेस पॅटनचे उघडे शरीर त्याला अश्लिल वाटते. एकांताच्या शोधात जंगलाची पायवाट अरूण चालत राहतो तर एके ठिकाणी त्याला मेलनी उलटी करून ग्लानीत पडलेली दिसते. तो तिला सावध करण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला धुडकावत राहते. अखेरीस मिसेस पॅटन दोघांना शोधत जंगलात येतात आणि मेलनीची अवस्था पाहून गर्भगळीत होतात.घरी गेल्यावर पॅटन पती-पत्नी मेलनीची मानसोपचार केंद्रात रवानगी करायचे ठरवतात.त्यासाठी होणारा खर्च भरून काढायला श्रीयुत पॅटन आणखी एक अर्धवेळ नोकरी करणार आहेत.रॉडला सुदैवाने फुटबॉल खेळण्यासाठी शिष्यवृत्ती मिळते आणि तो दूर निघून जातो.मिसेस पॅटन नेचरोपाथी,वास्तुशास्त्र,ऍक्युप्रेशर अशा नानाविध गोष्टींची माहितीपत्रके गोळा करत रहातात आणि त्याचे प्रयोग स्वतःवर करत रहातात.

दरम्यान अरूणची सुट्टी संपते. त्याच सुमारास उमाच्या हस्ताक्षरातले पत्र आणि एक पार्सल त्याला मिळते. पार्सलमध्ये चहापावाडर आहे आणि काश्मिरी शाल आहे.वसतीगृहात या गोष्टी ठेवायला जागा मिळणार नाही म्हणून अरूण मिसेस पॅटनना त्या भारतातून आपल्या पालकांनी खास भेट म्हणून पाठवल्या आहेत असे सांगतो.पॅजन कुटूंबीयांचे घर सोडून निघताना आईने पाठवलेली काश्मिरी शाल तो मिसेस पॅटनच्या उघड्या खांद्यावर घालतो आणि निरोप घेतो.त्याच्या या कृतीत कृत्रीमपणा नाही. त्याला खरोखरच मिसेस पॅटनबद्दल सहानुभूती, प्रेम वाटते आहे.

अशाप्रकारे सगळ्या प्रकारची सुबत्ता असलेल्या अमेरिकेत मध्यमवर्गीय कुटुंबात असलेली व्यक्तीवादी, आत्मकेंद्री प्रवृत्ती घराचे स्वास्थ्य कसे बिघडवते आहे ,नात्यांमध्ये केवळ कृत्रीमपणा कसा आणते आहे हे अनिता देसाई यांनी प्रभावी पद्धतीने दाखवले आहे.

कथासूत्रेः

१) भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे आजही प्रतिष्ठेच्या विशिष्ट कल्पना मनाशी बाळगून आहेत ज्याचा कुटुंबातील मुलांच्या निरागसतेवर खोल परिणाम होतो आहे.विशेषतः मुलींना शिक्षण देणे, त्यांना निर्णयस्वातंत्र्य देणे भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबात आजही फारसे पटत नाही.शिक्षण घेताना मुलगी अपयशी ठरत असेल तर तिला दुसरी संधी द्यावी, एखादे कौशल्य शिकवावे असे मध्यमवर्गीय कुटुंबांना मान्य होत नाही. मुलींच्या शिक्षणावरचा खर्च त्यांना वायफळ वाटतो. मुलग्यांच्या शिक्षणावर मात्र वारेमाप खर्च करायला ही कुटुंबे तयार असतात.मात्र मुलग्यांनी काय शिकावे ज्याने त्यांना भौतिक सुखसाधने मिळतील, कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल याबाबतही मध्यमवर्गीय कुटुंबाची विशिष्ट मानसिकता आहे.मुलगे परदेशात शिकायला जाणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते.मुलांना खरोखर परदेशात यायचे आहे का हे त्यांना विचारले जात नाही.पालक जो विचार करतात तो मुलांच्या हिताचा असतो आणि मुलांनी पालकांचे निर्णय मानलेच पाहिजेत असा दुराग्रह भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक करताना दिसतात.हे विपरीत वास्तव दाखवणे हे फास्टींग-फिस्टींग कादंबरीचे एक कथासूत्र ठरते.

२) कितीही शिकल्या तरी विवाह हेच मुलींच्या आयुष्याचे  अंतिम उद्दीष्ट असावे अशी मानसिकता बहुतेक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात दिसते.मुलीच्या विवाहासाठी हुंडा देणे,वराची फारशी चौकशी न करताच विवाह लावून देणे आणि मग मुलीचे लग्न फसले की तिलाच कमनशिबी ठरवणे हे भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबात सर्रास घडताना दिसते. ज्या मुलीचा विवाह होत नाही किंवा ज्या स्त्रीला वैधव्य येते तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन फारसा खुला नाही.विवाहीत मुलींना गृहकृत्यदक्ष असलेच पाहिजे आणि सासरच्या कुटुंबासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण,व्यक्तीगत कारकीर्द(Career) यांचा त्याग करण्यात काहीच गैर नाही असे मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात मानले जाते.कौटुंबीक हिंसाचार,मुलींना जणू कैदेतच ठेवल्यासारखे वागवणे हे भारतीय कुटुंबात आजही घडताना दिसते. अविवाहीत मुलींनी तर माहेरी आईवडील, भावंडांची सेवा करतच त्यांचे कंटाळवाणे आयुष्य व्यतीत केले पाहिजे अशी मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांची भूमिका असते.प्रौढ कुमारीका या घराघरांत हक्काच्या गुलाम ठरतात तर विधवा स्त्रियांनी देवादिकांचे करण्यात, उपास-तापासांत स्वतःला गुंतवून घ्यावे अशी अपेक्षा केली जाते.या स्त्रियांना स्वतःच्या आनंदाचे मार्ग शोधू न देणे हे भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाचे  विदारक चित्र  आहे.अशावेळी एका आभासी वास्तवात या स्त्रिया आपला आनंद शोधत रहातात.मग ती देवाची मूर्ती असो की नदीचे उबदार पाणी असो.अशा गोष्टींत आपले हरवलेले श्रेय,न मिळालेले प्रेम भारतीय स्त्रिया शोधत रहात. अनिता देसाई आपल्या कादंबरीचे एक कथासूत्र म्हणून फास्टींग-फिस्टींग कादंबरीच्या कथानकात या चित्राचे तपशीलवार वर्णन करतात.

३) अमेरिकेतील मध्यमवर्गीय कुटुंबात वेगळ्या समस्या आहेत.तिथे बाजारपेठ,समाजमाध्यमे माणसांच्या मनावर ताबा मिळवताना दिसतात.इथे स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. त्यांनी सतत कोणासाठीतरी स्वयंपाक करत रहावे अशी कुटुंबाची अपेक्षा नाही.पुरूष आपाल्याला हवे ते अन्न स्वतः बनवून घेतात.मुले आपापले निर्णय स्वतः घेतात. कोणाचीही सक्ती त्यांच्यावर नाही.घरे मोठी आहेत आणि प्रत्येकाला स्वतःसाठी स्वतंत्र अवकाश आहे.पण या स्वातंत्र्याचे करायचे काय हाच स्त्रियांसमोर प्रश्न आहे.या स्त्रिया मग बराचवेळ सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करण्यात घालवतात. शॉपिंगची एक प्रकारची नशाच त्यांना चढत असावी.अमेरिकन  वस्त्यांत कुजलेल्या अन्नपदार्थांचा वास सतत येत रहातो कारण भरभरून वहाणाऱ्या फ्रिजमधले अर्धेअधिक अन्न स्त्रियांना फेकून द्यावे लागते. त्याखेरीज वास्तुशास्त्र,फेंगशुई,कर्माशास्त्र, निसर्गोपचार व अन्य पर्यायी थेरेपी किंवा उपचारपद्धती याबद्दल अमेरिकन स्त्रियांना कुतूहल असते आणि त्या थोडा थोडा वेळ हे सगळे अनुभवून मग सोडून देतात.कोणत्याही गोष्टीतील सातत्य,जबाबदारी त्यांना नको आहे.मुलांसाठी काही वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा असे अमेरिकन स्त्रियांना वाटत नाही.त्यांनी मुलांची दाखवलेली काळजी बहुतेकवेळा कृत्रिम आणि ढोंगी असते.अमेरिकन मध्यमवर्गीय स्त्रियांचे मानसिक भांबावलेपण, मुलांच्या वागण्यामुळे त्यांना आलेली हतबलता हे कथासूत्र अनिता देसाई विस्ताराने रंगवतात.

४) कुमार वयातील अमेरिकन मुले-मुली टी.व्ही. समोर बसून असतात आणि त्यातील नाच-गाणी यात मश्गुल होतात.जाहिराती या मुलांच्या मनावर गारूड घालतात आणि जाहिरातीतील खाद्यपदार्थ त्यांना खात रहावेतसे वाटते. बारीक होण्यासाठी भलत्याच अघोरी मार्गाचा वापर तरूण मुली करताना दिसतात. त्या खातात आणि ते उलटी करून बाहेर काढत रहातात.या मुलींना लोकांमध्ये मिळूनमिसळून रहायला आवडत नाही. आपलं एकटेपण त्या गोंजारत रहातात. परिणामी त्या एकाकीपणा व वैफल्यग्रस्ततेच्या शिकार होतात.अमेरिकेतील मुलग्यांना शिक्षणापेक्षा फुटबॉल, जॉगिंग या क्रीडाप्रकारात आणि जाझसारख्या संगीतात अधिक स्वारस्य आहे. त्यासाठी ही मुले आटापिटा करत रहातात.विद्यापीठात शिकणारी मुले बेशिस्तीने वागणारी, आत्मकेंद्रीत आहेत. धुम्रपान, मद्यपान  ही त्यांची नित्यकर्मे आहेत असे ते  समजतात. त्यांना त्याबद्दल अपराधीपण वाटत नाही. तरूण मुला-मुलींचे संबंधही मोकळे ढाकळे आहेत.अशा विपरीत प्रेमशून्य,कृत्रिम कुटुंब वास्तवामुळे कित्येक अमेरिकन मुला-मुलींना मानसशास्त्रीय उपचारांची, समुपदेशनाची गरज भासते.हे एक कथासूत्र अनिता देसाई यांनी कमी पृष्ठांत प्रभावीपणे मांडले आहे.

अशाप्रकारे भारतातील कुटुंब वास्तव रूक्ष, निरस आहे कारण नात्यातील व्यक्तींवर प्रेम करणे, ते वेळोवेळी व्यक्त करत रहाणे हेच जणू भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबात निषिद्ध मानले जाते.परिणामी  निष्प्रेम कुटुंबात मुले कशीबशी जगत रहातात.त्यांच्या संवेदना, भावना बोथट होऊन जातात.तर अमेरिकेत मध्यमवर्गीय कुटुंबात वस्तू, खाद्यपदार्थांची रेलचेल असते,भरपूर स्वातंत्र्य सर्वांनाच मिळते पण तरीही व्यक्ती सुखी नसतात.कृत्रीम, आभासी वास्तवात अडकलेली अमेरिकन तरूणाईला मानसोपचाराची गरज भासते अशी कथासूत्रे ‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीत लेखिकेने तिच्या नेमक्या शब्दांच्या शैलीत विस्तृतपणे रंगवली आहेत.

सामाजिक दडपणामुळे व्यक्तीचे स्वातंत्र्य हरवणे आणि भौतिक सुबत्तेतून निर्माण झालेली व्यक्तीची आत्मकेंद्री,स्वैर प्रवृत्ती दोन्ही गोष्टी अंतिमतः कौटुंबीक स्वास्थ्याला आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्याला धोकादायकच ठरतात.अशावेळी विवेकी विचारच व्यक्ती व समाजाला संतुलीततेकडे घेऊन जाऊ शकतो असे अनिता देसाई यांना फास्टींग-फिस्टींग या कादंबरीतून सुचवायचे आहे.

‘फास्टींग -फिस्टींग’ ही अनिता देसाई यांची कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी.पुढील ब्लॉगमध्ये आपण अनिता देसाई यांची कन्या आणि कादंबरीलेखनासाठी बुकर प्राईझ मिळवणाऱ्या किरण देसाई यांचे व्यक्तीत्व आणि साहित्यिक कर्तृत्व याबद्दल जाणून घेऊ.

                                                                                     -गीता मांजरेकर

2 प्रतिसाद

    1. आभारी आहे संगीता !

      Like

यावर आपले मत नोंदवा