‘फायर ऑन दी माउंटन’ ही अनिता देसाई यांची १९७७ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे.ही एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी ठरेल.या कादंबरीसाठी अनिता देसाई यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि अन्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

या कादंबरीचा परिचय करून देताना समीक्षक एम.जी.वासवानी यांनी लिहिले आहे-

‘अनिता देसाई यांची कादंबरी इतिहासातील कोणत्याही मोठ्या घटनेवर आधारित नसते.परंतु माणसाच्या अंतरात्म्याचा संघर्ष ती जरूर दाखवते.देसाई यांच्या कादंबरीतील रोमहर्षकता आणि एकप्रकारचा कच्चेपणा अभारतीय वाचकांना सहज आकर्षून घेतो.अनिता देसाई व्यक्तीच्या दडलेल्या ,खाजगी आयुष्याच्या काळ्या बाजूचे दर्शन घडवतात.या ( फायर ऑन दी माउंटन ) कादंबरीत त्यांनी एका प्रतिष्ठित, उच्चभ्रू वृद्ध स्त्रीच्या मनातील एकाकीपणात डोकावून पाहिले आहे आणि वाचकांनाही डोकावण्याची संधी दिली आहे.’

कादंबरीचा कालावकाश व कथानक:

कादंबरीच्या रूढ संकल्पनेनुसार ती व्यामिश्र असावी ,दीर्घ असावी अशी अपेक्षा असते.परंतु ‘फायर ऑन दी माउंटन’ या कादंबरीच्या कथानकात घटना, व्यक्तिरेखा यांची गुंतागुंत नाही.दोन तीन मुख्य व्यक्तिरेखा वगळता अन्य व्यक्तिरेखा या कादंबरीत नाहीत.कादंबरीचा प्रत्यक्ष काळ साधारण आठ दहा दिवसांचा आहे.तर अवकाश कसौनी या उत्तर भारतातील गावातील डोंगररांगेतील करिग्निनो हा बंगला, कसौनीच्या जवळील लहान खेडी, पंजाब विद्यापीठाच्या कुलगुरूंचा बंगला असे आहेत.पण प्रामुख्याने कथानक घडते ते व्यक्तिरेखांच्या मनोवकाशात.

‘फायर ऑन दी माउंटन’ या कादंबरीचे कथानक तसे सरळ रेषीय आहे पण अधूनमधून ते व्यक्तिरेखांच्या भूतकाळात जाते.

कादंबरीच्या कथानकाची सुरूवात ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात होते.या बंगल्याला स्वतःचा इतिहास आहे.तो ब्रिटीश अधिकाऱ्याने उन्हाळ्यात आपल्या बायकांना थंड हवेच्या ठिकाणी रहाता यावे म्हणून बांधला आहे.काही ब्रिटीश अधिका-यांनी या बंगल्याच्या बागेत बसून काही वर्षे कसौनीची उबदार सकाळ,संध्याकाळ चिरूट ओढत ,चहा पित उपभोगली आहे.काही जोडपी याच बंगल्यातून एकामागोमाग एक परलोकवासी झाली आहेत.नंतर याच ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात अविवाहित ब्रिटीश स्त्रिया वास्तव्य करून आपल्या विक्षिप्त वागण्याने कुप्रसिद्ध ठरल्या आहेत.शेवटी तर एका अविवाहित ब्रिटीश महिलेने याच बंगल्यात आपल्या स्वयंपाक्याच्या गळ्यात काटा खुपसून त्याचा खून केला आहे आणि ब्रिटिश वैद्यकीय अधिकाऱ्याने तो अपघात ठरवून तिला दोषमुक्त केले आहे.’कॅरिग्निनो’ बंगल्याची बाग या सर्व पूर्वीच्या ब्रिटीश मालकांनी लावलेल्या झाडांनी सुशोभित झालेली आहे.बंगल्याच्या आवारात जर्दाळूची उंच झाडे आहेत , बंगल्याच्या मागेच डोंगर कडा आहे आणि बंगल्याच्या कुंपणावरून पिवळ्या गुलाबांच्या वेली दरीत उतरल्या आहेत.ज्या मोसमात ती फुले फुलतात तेव्हा जणू आगीचा लोळच डोंगर उतारावरून गेल्यासारखा दिसतो.अन्य मोसमात मात्र तो उतार राखाडी दिसतो.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्याने अचानक ब्रिटिश मंडळींनी ‘कॅरिग्निनो’ बंगला बेवारस सोडून इंग्लंडला प्रयाण केले आणि त्यानंतर कॅरिग्निनोचा ताबा भारतीय मालकांनी घेतला आहे.आता कॅरिग्निनोची मालक आहे नंदा कौल ही पंजाब विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची पत्नी .पती निधनानंतर ती वैधव्यावस्थेत या बंगल्यात एकटीच रहाते आहे.

कथानकाच्या प्रारंभी नंदा कौल ‘कॅरिग्निनो’ बंगल्याच्या आवारात फिरत असताना त्यांना डोंगराच्या पायथ्यापासून एक पोस्टमन हळूहळू वर चढत येताना दिसतो.म्हटलं तर, ही घटना सामान्य आहे पण कथानकात तीच नंदा कौल यांच्या मनाचा तोल बिघडवणारी घटना ठरते.

नंदा कौल यांना पोस्टमन पत्र आणेल आणि ते वाचून आपल्या शांततेत व्यत्यय येईल अशी भीती वाटते आहे.आपण स्वतःला आपल्या नातलगांपासून अलिप्त केले आहे.पण पत्र एखाद्या नातलगाचे असणार आणि ते वाचून आपल्या मनाची अलिप्तता भंग पावून अस्वस्थता येणार याची त्यांना खात्री वाटते आहे.आपली मन:शांती त्यांना ढळू द्यायची नाही.एक अभेद्य कवच त्यांनी जणू आपल्या व्यक्तिमत्वावर घालून टाकलं आहे.जे कोणत्याही परिस्थितीत तोडायला त्यांचे मन तयार नाही.

नंदा कौल यांना वाटते की आपले आयुष्य कौटुंबिक गोतावळ्यात गेले आहे. तर आता वृद्धावस्थेत कुटूंबाचे पाश आपल्याला नकोत.पंजाब विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या पत्नी म्हणून अनेक वर्षे विद्यापीठाच्या परिसरातील मोठ्या बंगल्यात नंदा कौल राहिल्या आहेत.आपल्या पतीला भेटायला येणा-या मंडळींचे आदरातिथ्य त्यांनी नेहमीच केले आहे.आपली तीन मुले ,त्यांची दुखणीखुपणी,चोचले, अभ्यास,शिकवण्या हेही त्यांनी सांभाळले आहे.पण पती निधनानंतर त्यांचे वास्तव्य कॅरिग्निनो या कसौनीच्या बंगल्यात राहिले आहे.इथे त्यांच्यासोबत रामलाल हा एक वृद्ध नोकर आहे.पण कसौनीतील अन्य कोणाशीही त्यांनी मैत्री जुळवलेली नाही की कधी कोणत्या नातेवाईकांना आपल्यासोबत रहायला आमंत्रण दिलेले नाही.त्यांना माणसांपासून दूर एकटे,शांत जगायचे आहे असे त्या स्वतःला सांगत रहातात.

नंदा कौल यांना आलेले पत्र त्यांच्या मुलीचे आशाचे आहे.ही त्यांची मुलगी फॅशन,पार्ट्या,खरेदी यात रमणारी आहे.पत्रात तिने आपल्या तारा या विवाहित मुलीचा पतीच्या बाहेरख्यालीपणाची चाहूल लागल्याने नर्व्हस ब्रेक डाऊन झालेला आहे हे आईला कळवले आहे.ताराचा पती जो सरकारी अधिकारी आहे त्याची स्वित्झर्लंडला बदली झाली आहे आणि लग्नसंबंध टिकवायचे असतील तर ताराने पतीसोबत स्वित्झर्लंडला जावे असे आशाला वाटते आहे.पण ताराची लहान मुलगी राका ही टायफाईड या आजारातून नुकतीच उठली आहे.आणि तिला स्वित्झर्लंडला नेणे शक्य नाही ही समस्या पत्रात आशाने आईला सांगितली आहे.आई कसौनीला एकटीच आहे तर तिची पणती राका तिच्याकडे येऊन राहिली तर तिलाही सोबत होईल असा युक्तिवाद आशाने केला आहे.आशाला स्वतःवर राकाची जबाबदारी घ्यायची नाही ही खरं तर मेख आहे.

राका ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात येते.ती एक झुकलेल्या खाद्यांची काटकुळे पाय , बटबटीत डोळे असणारी दहा बारा वर्षांची मुलगी आहे.नंदा कौल आपल्याला अलिप्त रहायचे आहे याचं भूमिकेतून तिचे कोरडे स्वागत करतात.राकाही अलिप्तपणे आपल्याला दिलेल्या खोलीत राहू लागते.तिचे वैशिष्ट्य हे आहे की ती ब्रेकफास्ट आणि जेवणाला आपल्या पणजीबरोबर असते पण अन्य वेळी ती न सांगताच घरातून गायब होते.स्वयंपाकी रामलाल यांच्याशी बोलून तिने कसौनीच्या डोंगरावरून दिसणारा परिसर समजून घेतला आहे आणि आल्या दिवसापासून ती एकटीच या डोंगरावर भटकू लागली आहे.नंदा कौल यांना वाटते की राकाने आपल्याला सांगून जावे,आपल्याशी बोलावे पण ती पणजीच्या वा-यालाही थांबत नाही.कधी डोंगराच्या कड्यावर ती चढते,कधी दरीत ती उतरत असताना नंदा कौल तिला बागेतून पहातात.कधी ती डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लुई पाश्चर इन्स्टिट्यूटच्या मागील बाजूस काहीतरी शोधताना दिसते.राकाला कसौनीतील प्रेक्षणीय, निसर्गरम्य पॉईंट्स आपण दाखवावे असे नंदा कौल यांना वाटते म्हणून एका संध्याकाळी त्या ठरवून तिला मंकी पॉईंट पहायला आपल्यासोबत नेतात. वाटेत त्या राकाशी संवाद साधण्याची संधी घेतात पण तिचा थंड प्रतिसाद त्यांनाही थंड करतो.पॉईंटवर गेल्यावर राका परत डोंगरावर गायब होते आणि नंदा कौल तिची वाट पहात खाली बसतात.पुन्हा काही त्या तिला काही दाखवायला घेऊन जाऊ धजावत नाहीत.

इथेच कादंबरीत संघर्ष सुरू होतो.नंदा कौल आपण अलिप्त रहायचे असे मनोमन म्हणत असल्या तरी राकाने आपल्याला महत्त्व द्यावे,आपल्याशी गप्पा माराव्यात अशी त्यांची अंतर्मनातील इच्छा आहे.राका स्वतः काही विचारत नाही तेव्हा नंदा कौल स्वतःच तिला समोर बसवून आपले बालपण कसे काश्मीर खोऱ्यात गेले,आपले वडील कसे घोड्यावरून तिबेटला गेले होते आणि तिथून येताना त्यांनी कशा मौल्यवान गोष्टी आणल्या.आपण कसे शिका-यातून तलावात फिरत असू,घरामागील झ-यात खेळत असू, वडिलांनी आणलेले नानाविध प्रकारचे प्राणी कसे घरातच असतं आणि आपण कसे त्यांच्याशी खेळत असू अशा गोष्टी नंदा कौल राकाला सांगत रहातात.लग्नानंतर आपण कशा आलिशान घरात राहिलो ,तिथेही कसे विविध प्राणी,पक्षी येत,आपण कसे आवारात बॅडमिंटन खेळत असू अशा आठवणीही नंदा कौल राकाला सांगतात.राका केवळ या गोष्टी ऐकत रहाते.नंदा कौल यांना वाटते की राकाला या गोष्टी ऐकून आपल्याबद्दल आदर वाटेल,ती कुतूहलाने काही प्रश्न विचारेल पण तसे काही घडत नाही.राका आपली पणजी बोलायची कधी थांबेल आणि आपण कधी बाहेर पळ काढू याची वाट पहात चुळबुळत रहाते.त्यामुळे राकाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा हाही प्रयत्न फसला आहे हे नंदा कौल यांना कळते.त्या अस्वस्थ होतात,मनोमन चिडतात.

कादंबरीत आताआणखी एक व्यक्तिरेखा अवतरते.ती आहे नंदा कौल यांची बाल मैत्रीण ईला दास.ही देखील वृद्ध आहे.पण परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्याने ती अजूनही कसौनीजवळील गारखाल भागात शासनाने नेमलेली समाजसेविका म्हणून नोकरी करते आहे.ग्रामीण लोकांच्या अंधश्रद्धा दूर करणे, त्यांना जादूटोणा- जडीबुटी यापेक्षा, वैद्यकीय सेवा घेण्याकडे वळवणे, बालविवाह करू नये यासाठी त्यांना सल्ला देणे अशी ही कामे आहेत.

ईला दास यांना त्यांची गारखाल प्रांतात नेमणूक झाल्यापासून नंदा कौल यांना भेटायला यायचे आहे.नंदा कौल यांनीच काहीतरी कारणे देऊन ईला दास यांना कॅरिग्निनो बंगल्यात येऊ दिलेले नाही.पण ईला दास चिवटपणे आपल्या मैत्रिणीला फोन करत रहातात.आता राका आली आहे हे कळताच तिला भेटायला येते असे सांगून ईला दास एकदाचे नंदा कौल यांचे आमंत्रण मिळवतात.

ईला दास यांचा आवाज चिरका आहे आणि त्या लंगडत चालतात.डोंगर चढून ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात येईपर्यंत त्यांची दमछाक होते.पण नंदा कौल यांना भेटल्यावर त्या खूप उत्साहाने बोलू लागतात.ईला दास चहाला येणार म्हणून नंदा कौल यांनी राकाला पण घरी थांबायला सांगितले आहे.परत एकदा ईला दास यांचे त्यांच्या बालपणाबद्दल,तारूण्यातील काळाबद्दल आणि शेवटी पंजाब विद्यापीठाच्या होम सायन्स कॉलेजमध्ये नंदा कौल यांच्या पतीच्या शिफारशीमुळे त्यांना मिळालेल्या नोकरीबद्दल राकाला काहीच उत्सुकता नसतानाही ऐकत बसावे लागते.नंदा कौल यांना राकाची चुळबुळ दिसते पण ईला दास यांचे बोलणे थांबवणे त्यांना शक्य होत नाही.ईला दास विद्यापीठातील बंगल्याच्या आवारात नंदा कौल आणि त्या बॅडमिंटन कशा खेळत आणि दरवेळी श्रीयुत कौल आणि त्यांची पार्टनर मिस डेव्हिड हेच कसे जिंकत हे सांगू लागतात नी चपापून थांबतात.ती संधी साधून नंदा कौल राकाला रामलालला बोलावून आणायला सांगतात नी राकाची सुटका होते.

राकाला त्या दोन्ही म्हाता-या बायकांची बडबड नकोशी वाटते.तिला त्यात काही स्वारस्य वाटत नाही.कारण त्या बायका भूतकाळात अडकून पडलेल्या आहेत आणि राकाला वर्तमानात काही तरी जगण्यालायक हवे आहे.डोंगरात एकटीने फिरताना जो रोमहर्षक अनुभव येतो तो तिला हवाहवासा वाटतो.ती एक कुटूंबापासून तुटलेली , उपेक्षित मुलगी आहे.तिला सतत काहीतरी कृती कराविशी वाटते, काहीतरी गूढ शोधून काढावे असे वाटते. शेजारच्या क्लबमध्ये एकदा रात्री ती चोरून शिरते आणि तेथील बिभत्स नाच-गाणी पाहून अस्वस्थ होते .कधी समोरच्या डोंगरावर लागलेला वणवा पाहून ती उत्कंठीत होते.तिला तो जवळून पहायचा आहे.दुस-या दिवशी ती सकाळीच वणव्याने उद्ध्वस्त झालेले गाव पाहून येते.’कॅरिग्निनो बंगल्यातील वेडपट मुलगी’ अशीच तिची ओळख तिने फार थोड्या अवधीत आसपासच्या लोकांमध्ये करून टाकली आहे.

राका निघून गेल्यावर ईला दास आपण किती तळमळीने गावकऱ्यांना जुनाट प्रथांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहोत पण देवळातील पुजारी जे सांगेल त्यावर गावकरी विश्वास ठेवतात आणि आपल्या सर्व प्रयत्नांवर कसे पाणी फेरतात हे चिडून सांगत रहातात.त्यात त्यांचा आवाज आणखीच चिरका होतो.तेजपूर गावातील एका सात वर्षांच्या मुलीचे तिचा बाप प्रीत सिंग एका बिजवराशी लग्न लावायला निघाला आहे आणि आपण त्याला समजावले तरी तो कसा थोड्याशा पैशांसाठी आपली मुलगी विकायला निघाला आहे हे सांगताना ईला दास दु:खी होतात आणि नंदा कौल यांनाही वाईट वाटते.ईला कौल यांच्या आयुष्यातील फरफट त्यांनी पाहिली आहे.एका श्रीमंत बापाची मुलगी म्हणून लहानपणी ईलाची ऐट त्यांनी पाहिली आहे.फ्रेंच क्लास,पियानो क्लासला जाणारी ईला त्यांची शाळासोबती होती.तिला आणि तिच्या धाकट्या बहिणीला रिमाला सांभाळायला खास ख्रिस्ती धर्मीय इंग्रजी बोलणारी नॅनी होती.पण ईलाचे वडील व्यसनाधीन झाले, भाऊ परदेशी शिकायला गेले होते पण त्यांनीही व्यसने केली , त्यांना पैसे पाठवताना वडील कर्जबाजारी झाले.स्वत:चे घोडे,गाडी,घरं त्यांनी विकले.वडिलांच्या निधनानंतर ईला बहीण रिमा आणि आईला घेऊन भाड्याच्या घरात राहू लागली.रिमाला पियानो ट्युशन मिळत पण ईलाला नोकरी नव्हती.नंदा कौल यांनी आपल्या पतीला विनंती करून एका महाविद्यालयात ईलाला शिक्षिकेची नोकरी मिळवून दिली होती.पण नंदा कौल यांच्या पतीच्या निधनानंतर ईलाच्या महाविद्यालयातील प्राचार्य तिचा अपमान करू लागले आणि ईलाने नोकरी सोडून दिली.अर्धवट वयात नोकरी सोडल्यानंतर तिला पेन्शनही मिळेना.नंदा कौल यांनी तिला समाजसेविकेचे शिक्षण घेऊन परत शासकीय नोकरी करायचे सुचवले होते.ईलाने ते ऐकून समाजसेविका म्हणून काम मिळवले होते.पण आता समाजसेवक म्हणून काम करताना तिला पदोपदी असहाय्य वाटत होते.एकाकी दयनीय ईलाला आपण आपल्या घरी रहायला बोलवावे असे क्षणभर नंदा कौल यांना वाटते.पण क्षणात त्यांनी स्वतःच्या अलिप्त कवचात प्रवेश केला आहे.ईला दासलाही स्वतःहून नंदा कौल यांच्या कडे आश्रय मागणे प्रशस्त वाटत नाही.त्या आपल्या वाटेने गारखाल भागाकडे जायला निघतात.वाटेत स्वयंपाकासाठी काही घेणेही त्या टाळतात कारण तेवढे पैसे त्यांच्याकडे नाहीत.आईचे निधन झाले आहे आणि वेडसर झालेल्या रिमाला त्यांनी कलकत्त्याला बालपणीच्या नॅनीच्या आश्रयाला ठेवले आहे.तिच्यासाठी पैसे त्यांना पाठवावे लागतात त्यामुळे तुटपुंज्या पगारातून त्यांच्या हाती फारसे काही उरत नाही.पण तरीही लटक्या उत्साहाने ईला दास यांना समाजसेवक म्हणून तळमळीने काम करत रहावे लागते.त्या कामातील निराशा त्यांना सहन होत नाही.ईला दास गारखाल भागातील आपल्या घराकडे चालत जात असताना अंधार पडतो.आणि प्रीत सिंग अंधारातून पुढे येऊन त्यांच्यावर अत्याचार करतो.आपल्या मुलीच्या बिजवराशी होणा-या लग्नात ही म्हातारी समाजसेविका अडथळा आणते आहे म्हणून तो ईला दासवर संतापलेला आहे.हिंसेचा मार्ग तो स्वीकारतो.

ईला दासच्या निघृण हत्येची बातमी कसौनीचे पोलिस निरीक्षक नंदा कौल यांना देतात आणि ईलाच्या शवाची ओळख पटवण्यासाठी कसौनीत नंदा कौल या एकट्याच आहेत.

ईलाच्या हत्येची बातमी नंदा कौल यांच्या मनावरील अलिप्ततेचे कवच टरटरा फाडते.ईला ही आपला भूतकाळाशी सांधा जुळवणारी एकमेव बालमैत्रीण होती आणि तीच गेली यामुळे नंदा कौल समूळ हादरतात.आपण अलिप्ततेला कवटाळून का बसलो होतो असा प्रश्न त्यांना पडत असावा. आपले बालपण सामान्य परिस्थितीमध्ये गेले,पतीने कायम मिस डेव्हिड हिच्याशी प्रेमसंबंध ठेवून आपली कदर केली नाही आणि तीनही मुलांना त्यांच्या घरात आपली अडगळ होते म्हणून आपली कसौनीत रवानगी झाली आहे हे वास्तव एकदम प्रखर होऊन नंदा कौल यांच्या मनावर आदळते.राकाशी संवाद साधण्याची गरज आपली होती आणि आपल्याशी संवाद साधण्याची गरज ईलाची होती आपण दोघींनाही फसवले आहे,राकाला आपण भूतकाळाविषयी भूलथापा सांगितल्या पण ती भूलली नाही. तिची प्रेमाची गरज आपण समजून घेतलीच नाही.स्वतःचा अहंकार तिच्याकडून सुखावून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण केला.दुसरीकडे ईलाला आपली अतीव गरज आहे हे जाणवूनही आपण अलिप्त राहिलो हे नंदा कौल यांना उमजते.पण तोपर्यंत खूप उशीर झाला आहे.राकाने घरातील काडेपेटी रामलालच्या नकळत पळवली आहे आणि ‘कॅरिग्निनो’ बंगल्याच्या मागे जाऊन आग पेटवली आहे.आता तिला खरा वणवा जवळून पहायला मिळणार आहे.नंदा कौल यांना ते सांगायला ती उत्साहाने धावत आली आहे! दोन प्रेमशून्य आयुष्ये डोंगरावर लागलेल्या वणव्यात भस्मसात होणार आहेत.

अशाप्रकारे खरे आणि खोटे यांचा गुंता असलेली ‘फायर ऑन दी माउंटन’ ही कादंबरी आहे.नंदा कौल यांनी मनाला शांतता हवी म्हणून,कायम मनाला शिस्त लावत जबरदस्तीने घातलेले अलिप्ततेचे कवच,राकाने तिच्या प्रेमशून्य ,निराश आयुष्यात उत्कंठा वाढवण्यासाठी चालवलेली खटपट आणि ईला दास यांनी आपले एकाकी आयुष्य जगताना समाजपरिवर्तन करण्यासाठी चालवलेली अवास्तव आणि अयशस्वी खटपट यातून तीन प्रेमशून्य आयुष्यांची अपरिहार्य शोकांतिका होते.यात राका निरागस,अज्ञानी आहे त्यामुळे तिने शोधलेला मार्ग उद्ध्वस्त करणारा ठरेल याची तिला जाणीव नाही पण नंदा कौल अनुभवी असूनही अहंकारामुळे त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या फसवणूकीचा ,जणू सूडाच्या मार्ग स्वीकारला आहे .ईलाने स्वीकारलेला मार्ग परिस्थितीने तिच्यावर लादला आहे.नंदा कौल राका आणि ईला दोघींची आयुष्ये बदलू शकल्या असत्या का ? असा प्रश्न वाचकांना पडतो.पण नंदा कौल यांची आपल्या अलिप्ततेच्या कवचात राहायची,मन:शांती जपण्याची दुबळी असंवेदनशील वृत्ती सर्वांना घातक ठरली असे वाटत राहते.

कथासूत्रे:

‘फायर ऑन दी माउंटन’ या कादंबरीला वास्तवाचा स्वीकार करता न आल्याने माणसे कशी अवास्तव मार्ग कवटाळून ठेवतात हे दाखवायचे आहे.सात्रे हा अस्तित्ववादी तत्वज्ञान मांडणारा विचारवंत बॅड फेथ ही एक संकल्पना मांडतो.ती या कादंबरीतील तीन व्यक्तिरेखांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल.त्याअनुषंगाने कादंबरीतील कथासूत्रे पुढीलप्रमाणे ठरतील :

१) प्रेमशून्य वास्तवाचा स्वीकार करणे आपल्या दुबळेपणामुळे माणसांना जमत नाही तेव्हा ती आपण अलिप्त राहू इच्छितो,मन:शांती जपतो असा डिफेन्स मेकॅनिझम तयार करतात.सात्र म्हणतो त्याप्रमाणे बॅड फेथमध्ये जगू लागतात.

२) लहानपण प्रेमशून्य असलेली निराश मुले वास्तवाचे भान नसल्याने जगण्यात उत्कंठा वाढवणारे मार्ग शोधत रहातात आणि अखेरीस हिंसक,क्रूर होतात.

३) तळागाळातील लोकांमध्ये जागृती निर्माण करायला निघालेल्या मध्यमवर्गीय माणसांना समाजपरिवर्तन एका रात्रीत होणार नाही या वास्तवाचे भान नसते आणि त्यांच्या दूराग्रहाचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.ज्या समाजातील लोकांना बदलण्याचा प्रयत्न हे समाजसेवक करू इच्छितात त्यांची भौतिक परिस्थिती बदलणे, त्यांना उदरनिर्वाहासाठी चांगली संधी देणे हाच त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनचा राजमार्ग ठरेल पण तेच शक्य नसल्याने समाजसेवकांचा स्वीकार मागासलेली माणसे करत नाहीत उलट ते अशा समाजसेवकांचा बळी घेतात.

तुम्ही ‘फायर ऑन दी माउंटन’ ही अनिता देसाई यांनी लिहिलेली ही कादंबरी जरूर वाचा.पुढील ब्लॉगमध्ये आपण या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करू.

. -गीता मांजरेकर

———————————————————————————————————————————————————————–

4 प्रतिसाद

  1. हो खरंच प्रेमशून्य वास्तवाचा स्वीकार करणे गरजेचे आहे.कथासूत्रांमधील व्यक्तीरेखांच्या दुबळेपणामुळे होणारे परिणाम वाचल्यावर ब्लॉग लेखिकेपेक्षा एखादा मानसशास्त्रज्ञ बोलत असल्याचा भास होतो, इतका खोल विचार आणि संवेदनशीलता तुम्ही ‌ मांडली आहे.

    Like

    1. आभारी आहे चैतन्या ..तू पटकन वाचून चटकन अभिप्राय देतेस !

      Like

  2. It’s a very interesting analysis and the novel was very popular during my college days. It will help all the scholars.

    Like

    1. Yes Mythili..it is psychoanalytical novel I feel.

      Like

Leave a reply to Mythili Mukund उत्तर रद्द करा.