मागील ब्लॉगमध्ये भारतीय इंग्रजी कादंबरीकार अनिता देसाई यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या एकूण कादंबरीलेखनाचा स्थूल परिचय आपण करून घेतला.आता त्यांच्या ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे यांचा विचार आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत. ‘दी व्हिलेज बाय दी सी’ ही कादंबरी १९८२ मध्ये प्रकाशीत झाली आहे.या कादंबरीला बालसाहित्य गटात इंग्लंड येथील गार्डियन पुरस्कार प्राप्त झाला आहे.या कादंबरीच्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.

ज्यांना ब्लॉग वाचण्यापेक्षा तो ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईलही जोडली आहे.

मी अनिता देसाई यांची हीच कादंबरी विश्लेषणासाठी निवडली याचे कारण या कादंबरीने अनिता देसाई यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बक्षीस मिळवून दिले हे तर आहेच. पण त्याखेरीज या कादंबरीच्या कथानकाला असलेली महाराष्ट्रातील अलिबागजवळील थळ या समुद्राकाठच्या गावाची आणि मुंबई महानगराची पार्श्वभूमी यामुळे मला या कादंबरीबद्दल अधिक जिव्हाळा वाटतो आहे ! अनिता देसाई या काही काळ मुंबईत वास्तव्याला होत्या. तेव्हा त्या आपल्या मुलांना प्रत्येक सुट्टीत थळ या गावी घेऊन जात.त्या काळात थळ गावातील सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या समस्या, त्यांच्यापुढील आव्हाने आणि जीवनसंघर्ष याचे जवळून निरीक्षण अनिता देसाई यांना करता आले.त्याआधारे त्यांनी कालांतराने दी व्हिलेज बाय दी सी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी जरी त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली असली आणि विशिष्ट मूल्यसंस्कार या कादंबरीच्या माध्यमातून मुलांच्या मनावर होणे स्वाभाविक असले  तरी कादंबरीची ती मर्यादा नाही.कारण ही कादंबरी प्रौढ वाचकांनाही अंतर्मुख करू शकेल अशीच आहे.

‘दी व्हिलेज बाय दी सी’ कादंबरीचा कालावकाश आणि कथानक-

‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीचा काळ १९७०-८० च्या दरम्यानचा असावा. कादंबरीत काळाचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु कादंबरीतील वर्णनांवरून आणि घटनांवरून तसा अंदाज बांधता येतो.कादंबरीचे कथानक सुमारे एक-दीड वर्षाच्या काळात सामावलेले आहे.थळ-वायशेत येथील रिफायनरी आणि खतनिर्मिती प्रकल्प ज्या काळात सुरू झाला तो काळ या कादंबरीत चित्रीत झाला आहे.

कादंबरीच्या कथानकाचा अवकाश प्रामुख्याने थळ हे भारताच्या पश्चिमेच्या समुद्रकिनाऱ्यावरील गावाचा आहे.पण त्याबरोबरच हे कथानक मुंबई या महानगरात आणि अलिबाग या थळजवळील जिल्ह्याच्या ठिकाणीही घडते आहे.

‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीचे कथानक एकरेषीय आहे. काळाच्या अक्षावर ते पुढे-पुढे सरकत जाते. भूतकाळात जात नाही.पण थळमधील गावकऱ्यांना भविष्याची भयकंपीत करणारी सूचना मात्र निश्चित देते.हे कथानक थळ गावातील एका मच्छिमार कुटुंबावर केंद्रीत झाले असले तरी एका कुटुंबाची ही कहाणी त्या गावातील सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करेल अशीच आहे

कथानकाची सुरूवात थळ गावातील लीला या तरूण मुलीची सकाळ समुद्रातील एका खडकावर कुंकू, फुले वाहून पूजा करण्याने कशी होते हे दाखवते.समुद्रकिनाऱ्यावरील या गावातील अबालवृद्धांची समुद्रातील या खडकावरच श्रद्धा आहे.कारण समुद्र हाच त्यांचा पोशिंदा आहे आणि त्याचे रौद्र रूप हे नेहमीच धोकादायक राहिले आहे.

लीला ही मच्छिमारीचा व्यवसाय करणाऱ्या एका गरीब कुटूबांतील थोरली मुलगी आहे. तिच्या वडीलांनी मासेमारीसाठी समुद्रात खोलवर जाणे सोडून दिले आहे, आपली होडी विकून टाकली आहे आणि ते ताडी पिऊन तर्र होण्यापलीकडे काहीच करत नाहीत.कधीतरी त्यांनी अलिबागला नोकरी मिळवण्याच्या आशेने गावात आलेल्या एका माणसावर विश्वास ठेवून थोडे पैसे त्याला दिले पण तो गायब झाला आणि नोकरी मिळालीच नाही ही खंत त्यांच्या मनात आहे. थोडी-फार जमीन तेवढी त्यांच्याकडे शिल्लक आहे.ज्याच्यात थोडी नारळाची झाडे आहेत आणि थोडीशी भाजी पिकते.लीलाची आई नवऱ्याच्या मारहाणीने आणि कुपोषणाने आजारी पडली आहे, अंथरूणाला खिळली आहे.

लीलाला एक  मागचा भाऊ हरी आणि कमला-बेला या दोन धाकट्या बहिणी आहेत.लीला थोरली असल्याने आपल्या आईची सेवा-शुश्रुषा करणे, भावंडांना जेवू-खाऊ घालणे, सांभाळणे ही सगळी जाबाबदारी तिच्याच खांद्यावर येऊन पडली आहे.हरी थोडी धडपड करेल आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह होईल यासाठी काहीतरी करेल एवढीच आशा तिला आहे.तिने आणि हरीने घरच्या परिस्थितीमुळे शाळा शिक्षण अर्धवटच सोडून दिले आहे.कमला-बेलाचे शिक्षण अर्धवट राहू नये असे मात्र लीला आणि हरी दोघांनाही वाटते आहे. दुर्दैवाने आपले जीवनमान सुधारण्याचे कोणतेच मार्ग त्यांना मिळत नाहीत. हरी जमीनीत थोडी भाजी लावतो, इतरांच्या शेतावर राबतो, नारळाच्या झाडाला नारळ आले तर ते विकतो आणि जमतील तसे पैसे मिळवतो.हरी आणि लीला दोघेही  त्यांच्या जवळच असणाऱ्या एका बंगल्यावर सुट्टीत मुंबईतील श्रीमंत असे डिकास्टा कुटूंबीय रहायला आले की कामाला जातात आणि चार पैसे मिळवतात.पण त्याच्या वडिलांच्या ताडीच्या व्यसनामुळे आणि आईच्या आजारामुळे मिळालेले पैसे फार काळ पुरत नाहीत.हरीला सतत वाटत राहाते की त्याला अधिक पैसे मिळवण्यासाठी मुंबईत गेले पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या बोटीवर काम मिळवले पाहिजे.लीला घरातील जेवणासाठी गावातून किराणा आणते पण अनेकवेळा तिला अगदी काटकसरीने सामान आणावे लागते. स्वयंपाक जेमतेमच होतो आणि सर्व अर्धपोटीच रहातात. वडिलांचे रात्री-अपरात्री ताडी पिऊन येणे, शिव्या घालणे, आईला मारहाण करणे यामुळे लीलाच्या कुटूंबात शांतता आणि सुरक्षितता शिल्लक उरलेली नाही. एकप्रकारची धास्ती घेऊनच सगळी मुले आणि त्यांची आई जगत आहेत.

हरीसारखी बरीच मुले थळ गावात आहेत.त्यातील काही कोणाच्यातरी बोटीवर काम करतात, काहीजण जमिनी कसतात तर बरीच तरूण मुले बेकार आहेत.अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष व्यसनी आहेत.गावात एकाच मच्छिमाराकडे- बिजूकडे बऱ्यापैकी संपत्ती आहे. ती त्याने स्मगलर्सना मदत करून मिळवली अशी शंका गावकऱ्यांना आहे.तो सधन मच्छिमार एक मोठी बोट बांधून घेतो आहे. त्या बोटीचे इंजिन अधिक ताकदीचे असणार आहे ज्यामुळे ती किनाऱ्यापासून पन्नास किलोमिटर आतपर्यंत जाऊ शकणार आहे आणि मोठे मासे पकडून ते ठेवण्यासाठी फ्रिजही बोटीत बसवला गेला आहे.हरीला वाटते की आपल्याला या मोठ्या बोटीवर जिचे नाव जलपरी आहे -त्यावर नोकरी मिळावी.तशी धडपड तो करणार आहे. पण त्याच सुमारास गावात एक पत्र्याची शेड बांधली जाते आणि एका जमिनीला कुंपण बांधून तिथे पहारेकरी बसवला जातो.या पहारेकऱ्याकडून हरीला कळते की गावात फर्टिलायझर कंपनी सुरू होणार आहे. आपल्याला तिथे नोकरी मिळू शकेल अशी आशा हरीला वाटते. पण पहारेकरी त्याची खिल्ली उडवतो आणि त्या कंपनीत मोठे शिकलेले इंजिनियर्स कामाला नेमले जातील, अशिक्षितांना तिथे काही काम मिळणार नाही असे सांगून तो हरीला निराश करतो. अशातच त्या पहारेकऱ्याकडून गावातील लोकांना हेही कळते की गावात येणारी सरकारी खत उत्पादन कंपनी एवढी मोठी असणार आहे की त्यामुळे अनेकांच्या जमिनी सरकार विकत घेईल, त्यांना शेती सोडावी लागेल.खतनिर्मिती कारखान्यात खत निर्माण करताना तयार झालेली मळी समुद्रात फेकली जाईल आणि त्यामुळे समुद्रातले मासे मरतील, मच्छिमारांना यापुढे चांगले  मासे मिळणे कठीण होईल.हे ऐकून गावातले मोठे जमिनदार आणि सगळे मच्छिमार अस्वस्थ होतात कोणालाच आपल्या उत्तम भात पिकवणाऱ्या, नारळाच्या बागा असलेल्या जमिनी सरकारला देण्याची इच्छा नाही. पण पाहरेकऱ्याच्या बोलण्यातून हे लक्षात येते की सरकार कोणाचेच ऐकणार नाही. थळ गावातली सगळीच जमिन सरकार हस्तगत करणार आहे. खत निर्मिती कारखाना, तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी वसाहत. शाळा असे सगळेच या जमिनीवर उभे रहाणार आहे.गावातील लोक हे ऐकून हादरतात.त्यांना आपल्या जमिनी गमावून हा तथाकथित विकास नको आहे.

अलिबागहून एक तरूण गावात येतो आणि जर गावकऱ्यांचा थळ प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी आपल्याबरोबर मुंबईला यावे तिथे मंत्रालयात आपण प्रकल्पाच्या विरोधात अर्ज देऊ असे तो म्हणतो.हे ऐकून हरी भारावतो.त्याला काहीही करून मुंबईला जायचेच आहे.आईला बरे वाटत नसतानाही, कोणालाही न सांगताच  हरी रेवस बंदरावरून सर्व मोर्चेकऱ्यांप्रमाणे लॉंचने मुंबईत जायला निघतो. तो कधीच इतक्या दूर गेलेला नसतो. नेत्यांची भाषणे ऐकतो. पण इतर गावकऱ्यांप्रमाणे गावात परतत नाही. मुंबईतच काहीतरी काम शोधावे असे तो ठरवतो.

मुंबईत रहायचे कुठे, करायचे काय कशाचाच विचार हरीने केलेला नसतो. एक संपूर्ण दिवस तो उपाशीच असतो.त्याच्या खिशात काही चिल्लर नाणी असतात आणि थळच्या बंगल्यात काही महिन्यांनी येणाऱ्या डिकास्टा कुटूंबीयांचा मुंबईतल्या घराचा पत्ता असतो.त्यांनी कधीतरी हरीला आश्वासन दिलेले असते की तो मुंबईत आला तर ते त्याला त्यांची गाडी धुवायचे काम देतील.हरी त्या आशेवर  विचारपूस करत मुंबईतील मलबार हिल भागातील डिकास्टा यांच्या घरी पोहचतो. पण नेमके डिकास्टा कुटूंबीय थळला गेले असल्याने हरीची त्यांची भेट होत नाही.उलट त्यांच्या घरातली घऱगडी हरीशी अपमानास्पद वागतो.त्या इमारतीखालचा सुरक्षा रक्षक मात्र  हरीला माणूसकीने वागवतो.हरीला तो गवालिया टॅंकजवळ आपल्या मित्राच्या खाणावळीत त्या रात्रीपुरती राहायची-जेवायची सोय करून देतो.संपूर्ण प्रवासात उपाशीपोटी असलेल्या हरीला जेवून तरतरी येते.दुसऱ्या दिवशी तो पाहतो की खाणावळीचा मालक जग्गू सतत कामात असतो आणि दोन लहान मुलगे त्याला स्वयंपाकात मदत करत असतात. हरी धिटाई करून जग्गूला आपल्याला काही काम मिळेल का ते विचारतो आणि सुदैवाने जग्गू त्याला मदतनीस म्हणून खाणावळीत कामावर ठेवतो. जेवून-खाऊन महिन्याला तीस रूपये हरीला मिळणार असतात.खानावळीत झोपणे मात्र त्याला फारच त्रासदायक वाटते.खानावळीत इतर दोन मुलांशी हरीचा फारसा संवाद होऊ शकत नाही कारण त्यांना मराठी भाषा अवगत नसते.त्यामुळे हरीला थोडा कंटाळा येतो पण हळहळू हरी कामांना सरावतो.दुपारी थोडा मोकळा वेळ मिळाला की तो खानावळीच्या आजूबाजूला फिरू लागतो. खानावळीशेजारच्या टपरीत घड्याळे दुरूस्त करण्याचे दुकान त्याला दिसते. तेथे पारशी  म्हातारे गृहस्थ पानवाला सतत घड्याळे दुरूस्त करत असलेले त्याला दिसतात.ते आस्थेने हरीची चौकशी करतात. खानावळीतील दोन मुलांची करूण कहाणी या म्हाताऱ्या गृहस्थांकडूनच हरीला कळते. त्या दोन मुलांचे आई-वडील लोकल ट्रेनखाली येऊन मरण पावलेले असतात आणि जग्गूने त्यांना आपल्या खाणावळीत आसरा दिलेला असतो.हे कळल्यावर हरीला त्या मुलांबद्दल सहानुभूती वाटते आणि जग्गूबद्दल कृतज्ञताही वाटते.

वृद्ध घड्याळजी पानवाला हरीला हळूहळू घड्याळे कशी दुरूस्त करतात हे शिकवू लागतात.हरीने परिस्थितीबाबत निराश न होता काहीतरी कौशल्य सतत शिकत रहावे तर त्याला तो गावी जाईल तेव्हा नवा व्यवसाय सुरू करता येईल असे पानवाला आजोबा हरीला समजावतात.शिक्षण अर्धवट सोडलेले असले तरी हरीला नवीन कौशल्य शिकण्यात स्वारस्य असते.तो लौकरच घड्याळ दुरूस्तीचे तंत्र शिकतो.पानवाला आजोबा त्याला रोज दुपारी आपला मदतनीस म्हणून जोडीला घेतात. त्यामोबदल्यात थोडे पैसेही ते हरीला देऊ करतात.हरीची रात्री होणारी गैरसोय पाहून ते हरीला रात्री बागेत जाऊन झोपण्याबद्दल सुचवतात. हरी तसा रात्री गवालिया टॅंक बागेत झोपायला जातो पण तेथील पोलीस त्याची अडवणूक करतो. सुदैवाने तिथे चालायला येणारे एक वृद्ध गृहस्थ हरीकडे सहानूभूतीने पहा असे पोलिसाला समजावतात आणि पोलिस हरीला रात्री बागेच्या बाकावर झोपायची परवानगी देतो. त्यामुळे त्याला गावाची येणारी आठवण आणि अस्वस्थता कमी होते.पानवाला आजोबांच्या मदतीनेच हरी एक पोस्टकार्ड घेऊन आपली खुशाली थळला आपल्या बहिणींना कळवतो.

इथे थळला हरी न सांगता निघून गेल्याने लीलाच्या अंगावरच कुटूंबाची सगळी जबाबदारी पडते. विशेषतः आजारी आई आणि दारूच्या नशेत येणारे वडील यांना कसे सांभाळायचे हा तिच्यासमोरचा प्रश्न असतो.त्यातच आईचे आजारपण खूपच वाढते. शेजारच्या हीराबाईच्या मदतीने ती एका मांत्रिकाकडून आईवर उपचार करून घेते. पण त्यात तिचे पैसे खर्च होतात आणि आईला गुण येतच नाही. शेजारचे दारूडे लीलाच्या घरी येऊन शिवीगाळ करतात. त्यातच त्यांचा कुत्रा पिंटोलाही शेजारी विष घालून मारतात. त्यामुळे लीला आणि बहीणी दुःखी होतात.योगायोगाने बंगल्यातील डिकास्टा सुट्टीसाठी राहायला येतात आणि लीला त्यांच्याकडे काम करून थोडे पैसे मिळवते. मग धाडस करून ती त्यांनाच मोटारीने तिच्या आजारी आईला अलिबागच्या इस्पितळात घेऊन जाता येईल का अशी विनंती करते. ते तत्परतेने लीलाला मदत करतात. अलिबागच्या इस्पितळात गेल्यावर लीलाला कळते की आईच्या अंगात रक्त कमी झाले आहे आणि तिला क्षयरोगाची लागण झाली आहे.सरकारी इस्पितळ असल्याने मोफत औषधोपचार आईला मिळू शकणार असतात. डॉक्टर आणि परिचारीका लीलाला नीट समजावतात की तिने आईला बरी होईपर्यंत इस्पितळातच ठेवावे. डिकास्टाही लीलाला आश्वस्त करतात की ते अधूनमधून तिला आईला भेटायला इस्पितळात मोटारीने घेऊन येतील.लीला आईला अलिबागलाच ठेवून घरी परतते.पण रात्री तिचे वडील दारू पिऊन येतात आणि बायको खाटेवर दिसत नाही म्हणून लीलाला जाब विचारतात. घरातील मातीची भांडी फोडतात. आपल्याला न सांगता मुलीने आपल्या बायकोला इस्पितळात ठेवण्याचा निर्णय घेतला हे त्यांना आवडत नाही.ते दुसऱ्याच दिवशी सकाळी लीलाकडून पैसे घेऊन बायकोला भेटायला अलिबागला जातात. बायको बरी होईपर्यंत ते तिथेच इस्पितळाच्या आवारात राहणार असतात.सुदैवाने अलिबागला गेल्यावर ते दारूची नशा करत नाहीत आणि विडीवर समाधान मानतात. लीला दर आठवड्याला घरून काही पदार्थ करून त्यांच्यासाठी  घेऊन जाऊ लागते. पैसेही देऊ लागते.आईची तब्येत झपाट्याने सुधारताना पाहून लीलाला दिलासा वाटतो. डिकास्टा सुट्टी संपवून मुंबईला जातात पण त्यांचे मित्र सय्यदभाई हे बंगल्यात राहायला येतात. ते वृद्ध गृहस्थ पक्षीनिरीक्षक असतात आणि थळच्या किनाऱ्यावरील पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी ते दोन-चार महिने तिथेच राहणार असतात. त्यांना जेवण करून देणे, घराची स्वच्छता करणे ही कामे लीला आणि तिच्या दोघी लहान बहिणी मनापासून करू लागतात.त्याचा चांगला मोबदला त्यांना सय्यदभाई देऊ लागतात. त्यातच हरीचे मुंबईहून खुशालीचे पत्र येते त्यामुळे लीला आणि तिच्या दोघी बहिणींना अतिशय आनंद होतो.

मुंबईत पावसाळा सुरू झाल्यावर हरीला गोवालिया टॅंक मैदानात झोपणे अशक्य होते. त्यातच पानवाला आजोबाही आजारी पडतात आणि हरीशी बोलायला कोणीच रहात नाही.एके दिवशी तर प्रचंड पाऊस पडतो आणि मुंबई ठप्प होते. तेव्हा रस्त्यावर अडकलेल्या एका ट्रकचा ड्रायव्हर जग्गूच्या खानावळीत येऊन बसतो. त्याच्याकडील ट्रान्झिस्टरवर हरीला बातमी कळते की थळच्या कितीतरी मच्छिमारांच्या बोटी समुद्रात अडकल्या आहेत. ते ऐकून तो खूप अस्वस्थ होतो. मन हलके करायला तो पानवाला आजोबांचे घर शोधून त्यांच्याकडे जातो. त्यांना ब्रॉंकायटीस झालेला असल्याने ते खूपच अशक्त झालेले असतात पण सगळे चाळकरी आजोबांना सर्वप्रकारची मदत करताना पाहून हरीला बरे वाटते. पाऊस संपल्यावर पानवाला आजोबा दुकानावर परत येणार असतात. त्यांच्याशी बोलून हरीला दिलासा मिळतो. पण पावसात अंगावर सतत ओले कपडे राहिल्याने हरी आजारी पडतो. त्याला तापाने फणफणलेले पाहून जग्गू त्याला आग्रहाने आपल्या घरी म्हणजे वरळीच्या झोपडपट्टीत नेतो. जग्गूच्या घरात पाणी शिरलेले असते, त्याचे लहान बाळ आजारी असते आणि बायको वैतागलेली असते. ते पाहून आपण उगाचच जग्गूकडे आलो आणि त्याची अडचण केली असे हरीला वाटते. दुसऱ्यादिवशी डॉक्टरांकडे लाईन लाऊन हरी औषध घेतो आणि पुन्हा खानावळीत येतो.लौकरच त्याला बरे वाटते. नारळीपौर्णिमेचा सण येतो आणि पानवाला आजोबा दुकानावर येऊ लागतात. ते हरीला गिरगाव चौपाटीवर फिरायला नेतात. तेथील गर्दी, लोकांचा उत्साह हे सगळे पाहून हरीला मजा वाटते.हरीच्या चेहऱ्यावर कधी नाही ते हास्य उमलते आणि पानवाला आजोबाही खूष होतात.हरीकडे  आता थोडे पैसे साठले असतील तर त्याने थळला जावे आणि तिथेच छोटा-मोठा व्यवसाय सुरू करावा असे पानवाला आजोबा त्याला सुचवतात.हरी थळला येणाऱ्या प्रकल्पाबद्दल त्यांना सांगतो आणि आपली जमीन जाणार, मच्छिमारी बंद होणार आणि खत कारखान्यात नोकरी मिळण्याचीही शक्यता नाही हे वास्तव पानवाला आजोबांपुढे उघड करतो.घड्याळ दुरूस्तीचे कौशल्य गावी कसे उपयोगी ठरणार ? तिथे तर कोणीच घड्याळ वापरत नाही ही अडचणही हरी पानवाला आजोबांना सांगतो.पण ते म्हणतात की कोणतेही कौशल्य फुकट जात नाही. जर खतनिर्मिती कारखाना थळला आला तर वस्तीही वाढेल , कारखान्यातले इंजिनियर्स येतील ते घड्याळे वापरणारे असतील आणि तेव्हा थळ गावात हरी एकमेव घड्याळ दुरूस्त करणारा ठरेल.पण कारखाना येईपर्यंत हरीने अन्य काही व्यवसाय सुरू करावा आणि संधी मिळताच घड्याळ दुरूस्तीचे दुकान टाकावे अशी कल्पना पानवाला आजोबा हरीला सुचवतात.हरीसारख्या मुलाला शहराची धकाधक,वाईट हवामान, एकटेपणा मानवणार नाही असे पानवाला आजोबांचे म्हणणे असते. तसेच गावी हरीच्या आई- बहिणींना त्याच्या मदतीची गरज असताना त्याने शहरात राहण्याचा हट्ट धरू नये हे पानवाला आजोबा हरीला पटवतात. हरीलाही ते पटते आणि तो जग्गूला खानावळीचे काम सोडून त्याला गावी जायचे असल्याचे सांगतो. जग्गूला ते थोडे अडचणीचे वाटते पण आपला भाऊ गावाहून येईपर्यंत हरीने थांबावे म्हणजे आपली गैरसोय होणार नाही असे तो सुचवतो. दिवाळीच्या एक दिवस आधी पानवाला आजोबा आणि जग्गू खानावळवाला हरीला अलीबागच्या एस.टी. मध्ये बसवून देतात. तत्पूर्वी हरीने पानवाला आजोबांच्या मदतीने आपल्या बहिणींसाठी कपडे, दागिने , खाऊ घेतलेला असतो.मुंबईत प्रेम देणाऱ्या जग्गू आणि पानवाला आजोबांना सोडून जाताना हरीला वाईट वाटते. पण थळबद्दलची,आई-बहिणींची ओढही त्याला आतूर करते.

हरी गावी पोहचतो.तेव्हा त्याच्या बहिणी दिवाळीची तयारीच करत असतात. हरीला पाहून लीला, कमला-बेलाला अतिशय आनंद होतो. आई-वडिलांबद्दल लीला हरीला सांगते. तेव्हा दुसऱ्याच दिवशी जाऊन हरी आई-वडिलांना भेटतो, डॉक्टरांना भेटतो आणि त्यांच्या सल्ल्याने तो आई-वडिलांना घरी घेऊन येतो. दिवाळीचे चार दिवस संपूर्ण कुटूंब अतिशय आनंदात असते.कधी नाही ती आईही समुद्रावर येऊन सणाचा आनंद इतरांबरोबर लुटते.पावसाळ्यात वादळात अडकलेल्या बोटीतले लोक कसे वाचले ते लीला हरीला सांगते तेव्हा हरीला हायसे वाटते. हरी लीलाला तिने त्याच्या माघारी घर कसे सांभाळले त्याबद्दल विचारतो. लीलाही हरीची सगळी हकीकत ऐकते.मग हरीच तिला सुचवतो की आपण घराच्या अंगणात कोंबड्या पाळू ,पिले व अंडी विकू.त्यातून घर चालवू. कारखाना आला की मग गावात एखादे दुकान सुरू करू असेही  हरी लीलाला सांगतो.लीलाला आणि तिच्या धाकट्या बहिणींनाही ते पटते. आई बरी झाल्यावर तीही हरीला मदत करणार असते.हरी बंगल्यातील सय्यदभाईंना भेटायला जातो.थळमध्ये होऊ घातलेला प्रकल्प थळमधील पर्यावरणाची हानी करणार आहे आणि विशेषतः प्राणी-पक्षी-मत्स्यजीवन धोक्यात येणार आहे ही सय्यदभाईंची चिंता आहे. ते हरीची मुंबईतली हकीकत ऐकतात आणि सगळे प्राणी-पक्षी बदलशी जसे जुळवून घेतात तशी माणसेही बदलांना समोरी जातात असे म्हणून निसर्गनियमच हरीला समजावतात. त्यांचे बिघडलेले घड्याळ ते हरीला दुरूस्त करायला देतात तेव्हा हरीला मनस्वी आनंद होतो.आता तो निराश होणार नसतो, काहीतरी धडपड करून आपले कुटूंब आपल्याला सुखात ठेवायचे आहे हे त्याने मनोमन ठरवलेले असते.

अशाप्रकारे ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीचा शेवट आशादायी आहे. माणसांना परिवर्तन स्वीकारावेच लागते आणि त्याच्याशी जुळवून घेत जगण्याचे नवे मार्ग शोधून ते चोखाळावे लागतात हे सुचवणारी ही कादंबरी आहे.

‘दी व्हिलेज बाय दी सी’ कादंबरीतील कथासूत्रे-

‘दी व्हिलेज बाय दी सी’ ही कादंबरी अनिता देसाई यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली असल्याने ती सरळसोट कथानक असलेली आणि स्पष्ट कथासूत्रे असणारी कादंबरी आहे.ही कथासूत्रे पुढीलप्रमाणे-

  • आधुनिक औद्योगिक जगाचे आक्रमण ग्रामीण भागावर होण्याची शक्यता आहे आणि त्यात ग्रामीण शेती,मच्छिमारी हे पारंपरिक उद्योग धोक्यात येणार आहेत.शासन जेव्हा हे नवे प्रकल्प आणते तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेत नाही, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी देत नाही,पर्यावरणाची विनाश करते.असा विकास खरोखर दूरदृष्टीचा ठरेल का ?
  • शहरात असो की गावात माणसांना आपल्या परिस्थितीचा स्वीकार करून जगण्याच्या नवनव्या संधी शोधाव्या लागतात.माणसांनी परिस्थितीने निराश होऊ नये.माणसे निराशेने व्यसनाच्या आहारी जातात,त्यामुळे स्वतःचे आयुष्य तर बरबाद होतेच पण त्यांच्या कुटूंबालाही ते दुःखात टाकतात.
  • आरोग्याच्या सोयी प्रत्येक गावात आजही नाहीत. माणसांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे ते जडीबुडी,मांत्रिक-तांत्रिकाच्या नादी लागतात. फसतात,पैसे वाया घालवतात.
  • कष्टांना पर्याय नाही.कष्टाला जर कौशल्यांची, कल्पकतेची जोड मिळाली आणि संपूर्ण कुटूंबाची साथ मिळाली तर एखादे कुटूंब गरीबीतून मध्यमवर्गात प्रवेश करू शकते.
  • प्रयत्न करणाऱ्या माणसांना आपोआपच मदत करणारी माणसे भेटत जातात. माणूसकी संपलेली नाही. विशेषतः गरीबीतून मध्यमवर्गात येणारे गरीबांची व्यथा समजू शकले आणि त्यांनी गरीबांना मदतीचा हात दिला तर गरीबांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हुरूप मिळतो.
  • माणूसकी ही जात, धर्म,वय,प्रदेश या सगळ्यापलीकडे जाणारी निरपेक्ष प्रेमाची वृत्ती असते.ही माणूसकी ज्याच्याकडे असते तो प्रतिकूल परिस्थितही स्वतः तर आनंदी राहतोच पण इतरांच्या आयुष्यातही आनंद आणू शकतो.

मला ही कादंबरी वाचताना साने गुरूजींच्या धडपडणारी मुले, नवा प्रयोग, क्रांती, आपण सारे भाऊ-भाऊ यासारख्या कादंबऱ्यांची आठवण येत होती.माझ्या लहानपणी आई-वडिलांनी ही आणि अशी अनेक पुस्तके आम्हाला वाचायला दिली. ज्यातून नकळत झालेले सर्वधर्म समभावाचे,समानतेचे, प्रयत्नवादी राहण्याचे संस्कार पुढील आयुष्यात मला खूपच उपयोगी ठरले.

अनिता देसाई यांची ‘दी व्हिलेज बाय दी सी’ ही कादंबरी आजच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना जरूर वाचायला देता येईल. ती एक हृद्य आणि तितकीच आशावादी कादंबरी आहे. त्यामुळे मुले संवेदनशील बनतील, त्यांना वास्तवाची जाणीव होईल.आजच्या वर्तमानातही समर्पक ठरणारी ही अनिता देसाई यांची कादंबरी मुलांच्या पालकांनीही  जरूर वाचावी,त्यातील कथासूत्रांचा गांभिर्याने विचार करावा.पुढील ब्लॉगमध्ये आपण ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करू.

                                                                                                       -गीता मांजरेकर

2 प्रतिसाद

  1. अगदी आशावादी कादंबरी आहे. संकटात साथ देणार्या माणसांची किमया दाखवणारी आणि काया झिजवून कष्ट करणार्यांची ही वास्तववादी कादंबरी आहे. गाफिलांना पुढे येऊ घातलेल्या संकटाबद्दल खडखडावून जागं करणारी आणि सावधांना सुज्ञ करणारे कादंबरीचे कथासूत्र आहे.

    Like

यावर आपले मत नोंदवा