‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही नयनतारा सेहगल यांची २०१९ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. यानंतर त्यांनी कादंबरी लिहिलेली नसल्याने हीच त्यांची आजवरची शेवटची कादंबरी ठरेल.या कादंबरीचा मराठी अनुवाद त्याच नावाने उपलब्ध आहे. तो अश्विनी धोंगडे यांनी केलेला असून दिलिपराज प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे.
आज आपण ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीचे कथानक समजून घेणार आहोत आणि त्यातील कथासूत्रे लक्षात घेणार आहोत. ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी ऑडियो फाईल सोबत जोडली आहे.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी लेखिकेच्या अन्य कादंबऱ्यांच्या तुलनेत अगदी लहान आहे. या कादंबरीच्या कथानकाचा कालावकाश म्हटलं तर मर्यादीत आहे. म्हणजे या कादंबरीचे कथानक समकालीन आहे आणि अवकाश दिल्ली हे महानगर आहे.परंतु कथानकातील व्यक्तिरेखांच्या भूतकाळामुळे अप्रत्यक्षपणे ही कादंबरी काळाच्या अक्षावर दुसऱ्या महायुद्धापर्यंत,भारतीय स्वातंत्र्यचळवळीपर्यंत मागे जाते आणि रशिया, फ्रान्स, बंगालमधील एक शहर,लंडन असा या कादंबरीच्या कथानकाचा अवकाश बदलत राहतो.कादंबरीचे कथानक व्यामिश्र नाही पण ते अनेक घटनांनी, अनेक व्यक्तिरेखांनी भरलेले आणि समकालीन समस्यांना स्पर्श करणारे निश्चितच आहे. त्यामुळे एखाद्या कोलाज चित्रासारखे तिचे स्वरूप झाले आहे. कोणत्याही एक विचारसरणीचा शिक्का दी फेट ऑफ बटरफ्लाईज या कादंबरीवर मारता येणार नाही पण कथानक व व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने कादंबरीत भांडवलवादी, मार्क्सवादी, गांधीवादी, स्त्रीवादी, समलैंगिकतावादी अशा विविध दृष्टिकोनांची चर्चा होत राहते.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथानकाचे वैशिष्ट्य हे की ते अतिशय गतीमान आहे आणि यात बहुतेक व्यक्तिरेखा विकसनशील आहेत.त्यामुळे कादंबरीच्या अखेरीस सभोवतालची परिस्थिती अंधःकारमय आहे हे कथानकात जाणवत असले तरी काही घटनांनी वाचकांना आशावादी वाटते.

या कादंबरीच्या कथानकात विविध देशातील,विविध धर्माच्या, विविध भाषिक आणि वेगवेगळ्या वयाच्या स्त्री-पुरूष व्यक्तिरेखा वावरताना दिसतात.त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा सर्गेई, प्रभाकर,रेहमान, प्रल्हाद व फ्रँको,कतरिना,लिझेट या आहेत तर दुय्यम व्यक्तिरेखांमध्ये सर्गेईचे वडील दिमित्री,विभक्त पत्नी सुझान,मुलगी इरीना, मुलगा इव्हान,जावई टॉम हे आहेत तसेच प्रभाकरचे आई-वडील-आजी हेदेखील आहेत त्याचप्रमाणे रेहमानची पत्नी सलमा, रफिक, कतरिनाच्या सहकारी या अन्य व्यक्तिरेखाही ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीत आहेत.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथानकाची सुरूवात एका शांत सकाळी प्रल्हाद-फ्रँकोच्या ‘बॉंजो’ या रेस्टॉरंटमध्ये सर्गेई हा शस्त्रास्त्र बनवणाऱ्या उद्योगातील एक व्यापारी सकाळच्या न्याहारीसाठी आला आहे अशी होते.सर्गेईला या उपहारगृहातील अभिजात पद्धतीने केलेली सजावट आवडते आणि तेथील विशेषतः मातीच्या कुल्हडमध्ये दिली जाणारी कॉफी व अंड्याचा बेनेडिक्ट हा खाद्यप्रकार फार आवडतो. या उपहारगृहाचे दोघे मालक प्रल्हाद व फ्रँकोज जातीने येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या आवडीनिवडीकडे, त्याला शांतपणे अन्नपदार्थांचा आस्वाद घेता येईल याकडे लक्ष पुरवणारे असल्याने सर्गेई जेव्हा जेव्हा दिल्लीत येतो तेव्हा या उपहारगृहातच न्याहारीसाठी येतो.
सर्गेई मूळचा रशियन आहे. त्याचे वडील दिमित्री हे रशियात जन्मलेले आणि रशियन साम्यवादी क्रांतीत भाग घेतलेले कम्युनिस्ट होते. पण लेनिनच्या मृत्यूनंतर स्टॅलिनने सत्ता हाती घेतल्यावर कम्युनिस्टांची बांधिलकी तपासायला सुरूवात केली तेव्हा पुढे होऊ घातलेल्या बदलांची चाहूल लागून दिमित्री रशियातून पत्नीसह फ्रान्समध्ये आले. फ्रान्सने त्यांना आश्रय दिल्याने पुढे ते फ्रेंच म्हणूनच जगले. सर्गेई तर पॅरिसमध्येच जन्माला आला होता.आणि ब्रिटीशांबरोबर वाढला होता.सर्गेईची आई तो लहान असतानाच एका अपघातात मरण पावली होती. पण दिमित्रीने पुन्हा विवाह न करता सर्गेईला एकट्याने मोठे केले होते. सर्गेईवर वडिलांचा मोठा प्रभाव होता. खरं तर, त्याला आवड होती साहित्याची. तो चांगले लिहूही लागला होता. पण पोट भरण्यासाठी त्याचा उपयोग होणार नाही. व्यापार हाच जगण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे हे दिमित्रीने पटवून दिल्यावर सर्गेई व्यापारात उतरला होता.दिमित्रीनेच सर्गेईला जगातील सत्ताकारण समजावून दिले होते. राजकारणाच्या मागेही व्यापारवर ताबा मिळवणे,साम्राज्य वाढवणे याच गोष्टी कशा कार्यरत असतात हे दिमित्रीने सर्गेईला दाखवले होते. सर्गेई लष्करी साधनसामुग्रीच्या व्यापाराच्या निमित्ताने भारतातील अनेक प्रशासकीय व लष्करी अधिकाऱ्यांना, अन्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखत होता.पूर्वीपेक्षा भारताशी व्यापार करणे आता नव्या सत्ताधाऱ्यांमुळे, त्यांच्या भांडवलवादी ध्येयधोरणांमुळे सोपे झाले आहे असे त्याला त्याचे भारतातील अमेरिकन राजनैतिक प्रतिनिधी तर सांगत होतेच पण वाटाघाटीच्या दालनातील बदललेल्या सजावटीवरूनही सर्गेईला ते जाणवले होते.
सर्गेईची पत्नी सुझान ही लेखिका होती पण तिने सर्गेईपासून विभक्त होणे पसंत केले होते. त्या दोघांना इरीना आणि मुलगा टॉम ही मुले होती. इरीना विवाहीत होती आणि तिला एक मुलगी झाली होती.टॉम अमेरिकेत वडिलांचा व्यापार सांभाळत होता.आता मुलावरच सर्व व्यापार सोपावून आपण निवृत्त व्हावे असे सर्गेईला वाटू लागले होते.
प्रभू प्रभाकर हा दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र या विषयाचा सहाय्यक प्राध्यापक ही ‘फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथानकातील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे.प्रभू प्रभाकरचा भूतकाळ दुःखाने भरलेला आहे. त्याचे वडील हे असंघटीत बांधकाम मजूरांपैकी एक होते.जिथे जिथे बांधकामाची कामे सुरू असत तिथे तिथे ते कुटूंबासह स्थलांतर करत.त्यांच्या कुटूंबात त्यांची बायको ,छोटा मुलगा आणि वृद्ध आई हे सदस्य होते. प्रभाकरच्या वडिलांचे बांबुच्या पराचीवरून खाली पडून निधन झाले होते.दुर्दैवाने ते ज्या विटांच्या ढिगावर पडले तो ढीग त्यांच्या पत्नीच्या अंगावर पडल्याने तिचेही चिरडून निधन झाले होते.आई-बापाचे छत्र हरवलेल्या प्रभाकरची भय आणि दुःखाने वाचाच गेली होती. अशा मूक मुलाला वाढवायचे तरी कसे असा प्रश्न पडल्याने त्याच्या आजीने त्याला कलकत्त्यातील मिशनरी अनाथाश्रमात दाखल केले होते. तेथील प्रेमळ वातावरण, नन्सनी केलेली देखभाल यामुळे ते अनाथ मुल बोलू लागले होते. प्रभू प्रभाकर हे त्याचे नाव अनाथाश्रमानेच त्याला दिले होते. धर्माने प्रभू ख्रिस्ती झाला होता.उच्चशिक्षणाची संधी मिशनरी लोकांच्या कृपेने मिळाल्याने प्रभाकर शिकून प्राध्यापक झाला होता.त्याला रक्ताचे नातेवाईक कोणीच नव्हते.संशोधनासाठी सुट्टी घेतल्यावर प्रभाकरने जगभरात बदलत गेलेल्या कपड्यांच्या फॅशन्सचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले होते. तसेच जर सामान्य लोकांची मानसिकता बदलवायची असेल तर त्यांच्या मनातील प्रस्थापित प्रतिमांना हटवून नव्या प्रतिमा तेथे रूजवाव्या लागतील अशी कल्पना मांडणारी एक कादंबरीही प्रभू प्रभाकरने लिहिली होती.मूलतत्ववादींना ही कादंबरी त्यांच्या ध्येयधोरणांशी मिळतीजुळती वाटली होती. खरे तर, प्रभाकरचा मूलतत्ववादींकडे अजिबातच ओढा नव्हता. तो तर स्वतःला कम्युनिस्ट विचारांचा मानत होता. पण त्या कादंबरीतील आशयसूत्राबद्दल गैरसमज करून घेऊन भारतातील सरकारचा एक सल्लागार मिरजकर यांनी त्याला भेटीला बोलावले होते. तेथे जमलेल्या अन्य देशांतील प्रतिनिधींशी प्रभाकरला बोलायला लावून त्यांनी प्रभाकरला त्यांच्या शासनात जबाबदारीचे पद स्वीकारण्याची विनंती केली होती . पण प्रभाकरने काहीतरी निमित्त सांगून ते पद स्वीकारले नव्हते.
प्रभाकरला रेहमान हा प्राध्यापक जवळचा वाटे. ते विद्यापीठाच्या वातावरणापासून दूर एका गर्दीच्या ठिकाणी असलेल्या ‘कैफ’ या सामान्य दिसणाऱ्या उपहारगृहात रूमाली रोटी आणि रेशमी कबाब खायला जात. त्या उपहारगृहातील रफिक हा फारच उत्तम दर्जाचा आचारी आहे अशी प्रभाकर व रेहमान दोघांची खात्री पटली होती.
प्रभाकरला फ्रँको आणि प्रल्हादकडे लिझेट भेटली होती.ती भारतातील रेस्टॉरंटसमधील अन्नाचा दर्जा ठरवण्यासाठी इंग्लंडमधून आलेल्या समितीची एक सदस्य होती.प्रभाकरने तिला कैफमध्ये नेले. तिथले वातावरण फारसे चांगले नसले तरी रफिकच्या हातचा मुघलाई खाना इतका चविष्ट होता की लिझेट रफिकचे भरभरून कौतुक करू लागली.
प्रभाकर हमरस्त्यावरून गाडीने जात असताना एके ठिकाणी त्याला एका नागव्या केलेल्या, गोल टोपी घातलेल्या माणसाचे प्रेत पडलेले दिसले. त्याने गाडीतून उतरून पाहिले तर तिथे जवळच एक कुऱ्हाड ठेवण्यात आली होती आणि ज्यावर ‘तुमच्यासारख्यांचीव हीच गत होईल’ असा इशारा लिहिलेला होता. प्रभाकर अतिशय अस्वस्थ झाला. चौकातल्या पोलीसाला त्याने प्रेताबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाल की त्याला ते आधीच कळले आहे आणि पुढील कार्यवाही होणार आहे. अस्वस्थ मनाने प्रभाकरने घरी परतीचा मार्ग घेतला तेव्हा गाडी वळवताना ती त्याला एका लहान मुलांच्या अंगणात भरलेल्या शाळेत घालावी लागली. ती लहान लहान मुले आणि त्यांची शिक्षिका पाहून कुतूहलाने प्रभाकर शाळेत शिरला. काही तरूण मुली ती शाळा चालवत होत्या. प्रयोगशील अशा एका शिक्षिकेशी बोलताना तिच्या बोलण्यातून प्रभाकरला कळते की लहान मुलेही फुलपाखरांना पकडतात आणि त्यांचे पंख कुस्करतात,त्या फुलपाखराला ही मुले टाचणी टोचून कौतुकाने आपल्या बोर्डवर टाचून टाकतात. पण पालकांना त्याचे काहीच वाटत नाही.खरं तर, हे किती क्रूर आहे. हे घडू नये यासाठी शिक्षणातूनच मुलांना अहिंसेचे, संवेदनशीलतेचे धडे दिले पाहिजेत असे तिला वाटते आहे. एका बाजूला भर रस्त्यात पाहिलेली हिंसा आणि इथे शाळेतील मुलांना अहिंसेचे धडे शिकवणारी तरूण शिक्षिका यातील विरोधाभास कथानकात हेतूतः येतो.
फ्रँको आणि प्रल्हादकडेच प्रभाकरला काही दिवसांपूर्वी कतरिना ही रशियन तरूणी भेटली होती. ती भारतात व अन्य विकसनशील देशांतील उपेक्षित महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील एक स्त्री आहे. कतरीनाने तिच्या देशात हिंसाचार पाहिला आहे. पण ती स्वतः अहिंसेच्या मार्गावर विश्वास ठेवणारी आहे. तिच्यात असं काहीतरी आहे की ज्यामुळे प्रभाकरला तिला परत भेटायचा जणू ध्यासच लागला होता. स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त प्रभाकरने जी पार्टी दिली त्यात येण्यासाठी त्याने कतरीनालाही आमंत्रण दिले होते. पण ती आली नव्हती. प्रभाकर निराश झाला होता. त्याच सुमारास त्याला कतरीनासंदर्भातील खटल्याबद्दलची वृत्तपत्रीय कात्रणे वाचायला मिळाली. कतरीना आणि तिच्या संस्थेतील तिच्या अन्य देशातील स्त्रीवादी सहकारी आदिवासी स्त्रियांमध्ये अन्यायाविरूद्ध जागृती निर्माण करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी वस्त्या वस्त्यात जाऊन काम करणाऱ्या होत्या.दुर्दैवाने एकदा त्या वस्तीत गेल्या असताना गावातील जमिनदाराचे काही गुंड वस्तीत आले आणि त्यांनी आदिवासी स्त्रियांवर अत्याचार केले. त्याचवेळी तिथे असलेली कतरीनाही त्यांच्या क्रूर बलात्काराची शिकार बनली होती.सुदैवाने ती अत्याचारात मरण पावली नव्हती आणि तिच्या सहकारी स्त्रियांच्या मदतीने तिने अन्यायाविरूद्ध आवाज उठवला होता.प्रभाकर कतरीनावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून खूपच अस्वस्थ झाला. आपण काही करून कतरीनाला भेटावे आणि आपले तिच्यावरील प्रेम व्यक्त करावे असे त्याला वाटू लागले.फ्रँकोजकडून कतरीनाचा पत्ता मिळवून तो कतरीनाकडे गेला. तिला अधिरतेने मिठी मारताच मात्र ती ओरडू लागली,सैरभैर झाली. त्यामुळे आपले प्रेम तिच्यासमोर कसे व्यक्त करावे असा प्रश्न प्रभाकरला पडला. पण कालांतराने कतरीना शांत झाली आणि प्रभाकरने आपण तिला दिलासा द्यायला आलो आहोत असे सांगितले.
रेहमान आणि प्रभाकर पुन्हा ‘कैफ’ मध्ये गेले असता त्यांना कळते की आता तिथे मटणाचे कोणतेही पदार्थ मिळत नाहीत आणि रफिकला तर कायमचे घरीच बसवले गेले आहे.ते दोघे रफिकचा शोध घेत त्याच्या वस्तीत जातात .कालांतराने रफिक ज्या वस्तीत राहात होता तिथे अत्याचार झाल्याची बातमी त्यांना कळते त्यामुळे रफिक बहुदा मारला गेला असावा असाच त्यांचा समज होतो.लिझेटलाही प्रभाकर रफिक बेपत्ता झाल्याचे कळवतो.
रेहमानला वाईट वाटते आहे की ज्या कब्रस्थानात त्याच्या पूर्वजांना दफन केले ते कब्रस्थान खोदून काढले जात होते आणि जमीन सरकारजमा होणार होती.
प्रल्हाद आणि फ्रँकोजच्या रेस्टॉरंटला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी फ्रँकोजच्या घरी निवडक पाहुण्यांसाठी गाणे,नृत्य व मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीत सर्गेईलाही आमंत्रण होते. प्रभाकर,रेहमान,लिझेट आणि कतरीनाही या मेजवानीत आमंत्रीत होते. प्रल्हाद आणि त्याचे साथीदार मणीपुरी नृत्य सादर करत असतानाच सर्गेई तिथे पोहोचला होता. त्याला ते नृत्य आवडले होते पण ते कोणत्या प्रदेशातले, कशाबद्दलचे ही सगळी माहिती त्याला शेजारी बसलेल्या मुलीने रशियन भाषेत दिली.त्या मुलीकडे वळून पाहिले तेव्हा तिच्या तिच्या शरीरावरचे व्रण पाहून सर्गेई हादरला होता. ती कतरीना होती. पार्टी चालू असतानाच कतरीनाने सर्गेईला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. केवळ आपल्यावरच नाही तर अन्य देशातील स्त्रियांवरही असे अत्याचार सत्ताधारी करत असतात असे कतरीना म्हणाली. युद्ध म्हणजे तर अशा अत्याचारांना पर्वणीच असते हेही ती म्हणाली तेव्हा सर्गेई विचारमग्न झाला. प्रभाकरने सेर्गेईला शहरातील महात्मा गांधींचा पुतळा तोडून टाकला जाताना त्याने पाहिले तेव्हा त्याला काय वाटले ते सांगितले .तिथे लंडनमध्ये त्याची मुलगी इरीना देखील युद्धविरोधी निदर्शनात भाग घ्यायला गेलेली त्याला कळले.एका बाजूला नुकत्याच आई झालेल्या मुलीची चिंता त्याला वाटली पण आपली पत्नी सुझान आपल्यापासून विभक्त झाली असली तरी इरीनाची काळजी घेते आहे हे कळून त्याला दिलासा मिळाला होता.आपल्या नातीचे नाव कतरीना ठेवावे असे तो इरीनाला कळवतो.
प्रल्हाद आणि फ्रँकोजने त्यांच्या पार्टीच्या अखेरीस ते दोघे सर्वांच्या साक्षीने विवाह करत आहेत असे जाहीर केल्यानंतर सगळेच त्या समलैंगिक जोडप्याला शुभेच्छा देतात. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचे रेस्टॉरंट ‘बॉंजो’ फोडल्याची बातमी वर्तमानपत्रात येते. ती वाचून प्रभाकर तातडीने प्रल्हाद-फ्रँकोजला भेटायला जातो. उद्वस्थ झालेल्या रेस्टॉरंटमध्ये सैरभैर अवस्थेत उभ्या असलेल्या प्रल्हादला आधार द्यायला प्रभाकर पुढे सरकला तेव्हा गुंडांनी त्याच्यावरही हल्ला केला.तोंडात बोळा कोंबलेल्या,जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला असताना प्रभाकरने पाहिले की गुंड प्रल्हादला जाळायचा प्रयत्न करत होते पण नंतर त्यांनी त्याला नग्न करून हिणवले आणि ते निघून गेले. प्रभाकरला आणि प्रल्हादला फ्रँकोजने इस्पितळात नेले. दोघेही मनाने कोलमडले होते.प्रल्हादला पायाला इतकी खोल जखम झाली होती की तो पुन्हा नृत्य करू शकणार नव्हता. प्रभाकरला पोटावर खोल जखम झाली होती.रेहमानने येऊन दोघांना धीर दिला. डिसचार्ज मिळाल्यावर रेहमाननेच प्रभाकरला घरी पोहचवले.कतरीना प्रभाकरला भेटायला आली.आपले प्रभाकरवरचे प्रेम तिने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
सर्गेई परत लंडनमध्ये गेला तेव्हा सुझानने आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा बेत करून मुलगा इव्हानला अमेरिकेहून बोलावले. इरीना आणि तिचा नवरा टॉम यांनी युद्ध किती संहारक असतात आणि निरपराधांचा जीव घेतात याबद्दल इव्हानशी वाद घालायला सुरूवात केली. सर्गेईला हे वाद नवीन नव्हते. तसे ते त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्येही झाले होते. पण यावेळी पार्टी संपवून घरी परतल्यावर सर्गेई गांभिर्याने विचार करू लागला की आपणही कित्येक निरपराधांच्या मृत्यूला कारण ठरलो आहोत. शस्त्रास्त्रांचा व्यापार करून आपण युद्धाला चालनाच दिली आहे. आपले हे आत्मपरीक्षण पुस्तक लिहून मांडण्याचे तो ठरवतो.
लिझेटने प्रभाकरला आपल्या लग्नाचे आमंत्रण पाठवलेले असते. याआधी तिने लग्न ठरवल्याचे कळवलेले असते तेव्हा प्रभाकरने तिला रफीकची हकीगत सांगितलेली असते. लिझेटने प्रभाकरला लग्नाचे आमंत्रण पाठवले आहे आणि तू येच असे सांगण्यासाठी फोन केला असताना ती त्याला सांगते की ती आणि तिचा नवरा नवे रेस्टॉरंट उघडणार आहोत. त्याचेही आमंत्रण मेलवर पाठवले आहे. प्रभाकरने हजर राहावे असा तिचा आग्रहच आहे. प्रभाकर ते मेल उघडतो तेव्हा त्याला लिझेटच्या रेस्टॉरंटचा मुख्य शेफ म्हणून रफिकचा फोटो दिसतो. तो पाहून तो चकीत होतो आणि लिझेटला फोन करतो. तेव्हा लिझेटने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे काका भारतातील अमेरिकन वकिलातीचे मुख्य आहेत हे सांगितले. तिने त्यांच्या मदतीने रफिकला शोधून काढून एक कुशल कामगार म्हणून सुरक्षितपणे कुटुंबासह त्याचे लंडनमध्ये स्थलांतर करविलेले असते.या बातमीने प्रभाकर खुष होतो आणि आपणही कतरीनाबरोबर विवाह करणार असल्याची खुषखबर लिझेटला देतो. मध्यंतरी झालेल्या हल्ल्यामुळे तो सावध असणार आहे आणि कतरीनाची काळजी त्याला वाटते आहे हेही प्रभाकर सांगतो.त्याच्या मते स्वातंत्र्यावर सर्व प्रकारची बंधने आणणारा हा काळ दुःखाचाच आहे पण म्हणूनच आनंदाचे प्रसंग शोधून सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि नाचले पाहिजे.इथे नृत्य हा शब्द दोन अर्थांनी येतो. एक लालित्यपूर्ण कलाविष्कार म्हणून तर नृत्य हा शब्द वापरला गेला आहेच. पण त्याबरोबरबरच जीवनावरील प्रेमाचा लालित्यपूर्ण आविष्कार म्हणून नृत्य हा शब्द हेतूपूर्वक वापरला गेला आहे. सभोवताली दुःख आहेच पण तरीही जीवन अप्रतिहत पुढे गेले पाहिजे आणि ते प्रेमाने,आनंदाने जगणेच दिलासादायक ठरेल असे लेखिकेला म्हणायचे आहे.

‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या मलपृष्ठावर मराठीतील एक प्रख्यात कादंबरीकार किरण नगरकर यांनी या कादंबरीचा पुरस्कार करताना तिला धीट कादंबरी म्हटले आहे. अशा या ‘फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीचे गतीमान कथानक प्रामुख्याने पुढील कथासूत्र उलगडते.
१.स्वातंत्र्य आणि शांतता हाच मानवी संस्कृतीचा पाया आहे.
२.सर्व धर्मभेद, जातीभेद, वर्गभेद,लिंगभेद यापलीकडे असणारी परस्पर सन्मान देणारी माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे.
३.युद्ध सर्वंकष सत्ता मिळवण्यासाठी होतात आणि व्यापारावर ताबा मिळवणे हे देखील युद्धाचेच एक रूप असते.सर्व प्रकारची युद्धे संहारक आणि मानवजात संपवणारी ठरतात त्यामुळे ती कायमची थांबवणे,शस्त्रास्त्र उत्पादन व व्यापार थांबवणे आणि अहिंसेचा आचरणात अंगीकार करणे हाच मानवजात वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.लहान मुलांच्या मनावर संस्कार करताना अहिंसेचे महत्त्व त्यांना सातत्याने पटवून दिले पाहिजे. युद्धविरोधी तरूणांच्या संघटना तर जगभर कार्यरत आहेतच. पण ज्यांनी आजवर युद्धाला खतपाणी घातले अशा शस्त्रास्त्र निर्मात्यांनी व व्यापाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतःत परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे असे ‘ दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथानकातून नयनतारा सेहगल यांना सांगायचे आहे.
तुम्हाला ही कादंबरी वाचायची असल्यास ती मराठीतूनही उपलब्ध आहे.तेव्हा जरूर वाचा.हा ब्लॉग कसा वाटला ते कळवावे ही विनंती. पुढील ब्लॉगमध्ये ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण आपण करू.
-गीता मांजरेकर

Leave a reply to SEFALI RAVJI GHADI उत्तर रद्द करा.