मागील ब्लॉगमध्ये आपण नयनतारा सेहगल यांच्या ‘रिच लाईक अस’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे यांचा परिचय करून घेतला. या ब्लॉगमध्ये आपण ‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून लेखिकेची कोणती अंतर्दृष्टी त्यातून ध्वनित होते त्याचा शोध घेणार आहोत.ज्यांना ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीतील कथन दोन पातळ्यांवर होताना दिसते. एका पातळीवर त्रयस्थ निवेदक कथानकाची पार्श्वभूमी, घटना आणि व्यक्तिरेखांचे भूतकाळ, स्वभाव याबद्दल बोलत राहतो तर दुसऱ्या पातळीवर कादंबरीतील सोनाली ही व्यक्तिरेखा सभोवतीची राजकीय, सामाजिक परिस्थिती, स्वतःचा भूतकाळ आणि स्वतःच्या मनातील उलथापालथी याबद्दल बोलत राहते.या दोन्ही कथनांचा परस्पर छेद अधूनमधून घडत राहतो.त्यामुळे कथानकात सुसूत्रता येते.खरं तर, अशी ही दोन प्रकारची कथने नयनतारा सेहगल यांनी हेतुपूर्वकच योजली आहेत. तृतीय पुरूषी कथक कथानकातील घटना,रोझ व अन्य व्यक्तिरेखांचे भूतकाळ याबद्दल संवादांतून सांगत राहतो आणि कथानक पुढे सरकवतो.तर प्रथम पुरूषी कथन जे सोनाली रानडे या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून लेखिकेने केले आहे त्यातून लेखिका आपली अंतर्दृष्टी,राजकीय-सामाजिक परिस्थितीवरचे भाष्य करत राहते.तो भाग कथानकात अडथळा ठरू नये म्हणून लेखिकेने दोन प्रकारची कथने वापरली आहेत.आपला भर प्रामुख्याने ‘रिच लाईक अस’ मधील प्रथम पुरूषी कथनाच्या विश्लेषण करण्यावर राहणार आहे कारण त्यातून लेखिकेची जीवनदृष्टी प्रकर्षाने दिसू शकेल.

कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाची सुरूवात त्रयस्थ निवेदनाने होते. दिल्लीतील राम सूर्या यांच्या आलिशान बंगल्याचा अवकाश या कथनाला लाभला आहे. राम सूर्या यांचा मुलगा देव यांच्या आमंत्रणावरून  न्युमन हा परदेशी व्यापारी रात्रीच्या भोजनाला त्यांच्याकडे आला आहे. देव आणि त्याची पत्नी निशी परदेशी पाहुण्याची सरबराई करताना सतत त्याला उंची मद्य घेण्याची विनंती करत आहेत. पण त्याला मद्यात फारसे स्वारस्य नाही. त्यापेक्षा भोजन लौकर झाले तर बरे असे त्याला वाटते आहे. कथक म्हणतो-

“जेवढे जास्त श्रीमंत तेवढे रात्रीचे भोजन उशीरा हे जणू भारतीय श्रीमंतांचे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते”

पण न्युमनला लौकर जेवून लौकर हॉटेलवर जावेसे वाटते आहे.यजमानीण निशीने भारतातील आणिबाणीबद्दल बोलायला सुरूवात केली आहे. न्युमन ते ऐकतो पण त्याला कोणत्याही देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये स्वारस्य नाही. आपल्याला फक्त व्यापाराची बोलणी करायची आहेत आणि परतायचे आहे असा त्याचा स्पष्ट हेतू आहे.देवने न्युमनला भेटण्यासाठी त्याचा मित्र आणि पंतप्रधानांचा प्रमुख सल्लागार रवी कचरू यालाही भोजनाचे आमंत्रण दिले आहे. रवी कचरू न्युमन आणि देवच्या व्यापारासाठी लागणारे आवश्यक परवाने मिळवून देणारा मध्यस्थ ठरणार आहे. अर्थात तो त्यासाठी लाच घेणार आहे.भारतीय प्रशासन व्यवस्थेतील नोकरशाही ,भ्रष्टाचार याचे सूचन कथनातून होते.रवी कचरू वेळेत न आल्याने न्युमनलाही भोजनासाठी ताटकळावे लागले आहे. पण देव आणि निशी यांना त्याबद्दल भानच नाही.

पहिल्याच प्रकरणात न्युमन आणि रोझच्या संवादातून रोझ तिचे सासरे  लालाजी सूर्या यांनी व्यापार उभा करण्यासाठी केलेली मेहनत,तिचा पती राम आणि तिने राम-रोझ फॅशन्स हा ब्रँड परदेशापर्यंत पोहचवणे हा भूतकाळ उलगडत जाते.पण रामचा मुलगा देवला श्रीमंती केवळ वारसाहक्काने मिळाली आहे आणि ती जपण्यासाठी लागणारी सचोटीही त्याच्याकडे नाही हे रोझच्या बोलण्यातून सूचीत होते.

एकदाचे रवी कचरूचे आगमन होते, तोपर्यंत न्यूमनची भूक मेली आहे. काहीतरी थोडेसे खाऊन तो जेवण आटोपतो आणि गाडीत बसून आपल्या हॉटेलकडे निघतो. संध्याकाळी देवच्या बंगल्यावर येताना दिसलेली मुघल बांधकामाचा नमुना असलेली कबर आता अंधारात झाकोळून गेली आहे पण गाडीच्या दिव्याच्या झोतात रस्त्यावरून जणू सरपटत जाणारा एक अपंग भिकारी मात्र न्युमनला दिसतो.कथक हेतूतःच हे वर्णन करतो. हा भिकारी पुढे कथानक पुढे नेणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.पण तेवढाच भिकाऱ्याच्या वर्णनामागचा हेतू नाही. एका बाजूला हा अपंग भिकारी तर दुसरीकडे न्युमन नुकताच ज्याच्याकडून जेवून निघाला त्या देवचे गोबरे गाल, स्थूल शरीर यातील विरोधाभास कथकाला वाचकांच्या मनावर ठसवायचा आहे.भारतातील लब्ध श्रीमंत आणि दरिद्री शोषित  यांच्यातील दरीवर कथक प्रकाशझोत टाकतो आहे.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या दुसऱ्याच प्रकरणात कथन प्रथम पुरूषी झाले आहे. सोनल रानडे ही प्रशासकीय अधिकारी २६ जून रोजी लागू झालेल्या आणिबाणीनंतरचे  नवी दिल्लीतील वातावरण कथन करते.रस्त्यांवर सर्वत्र कडेकोट पोलीस पहारे आहेत.एकप्रकारचा तिरस्कार आणि भय जाळीदार पोलिसी वहानांच्या आत पसरलेले सोनालीला जाणवते आहे.जमावबंदीचे आदेश लागू झाल्याची कागदी पत्रके सगळीकडे लावण्यात आली आहेत. हा आदेश तोडणाऱ्या कोणाचीही हयगय केली जात नाही हे सोनालीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.एका रात्री कॅनॉट प्लेस जवळ कॉफी हाऊससमोर सात -आठ तरूणांचा घोळका जमला असताना पोलिसांनी त्यांची धरपकड करून त्यांना खेचत आपल्या वाहनाकडे कसे नेले हे सोनालीने पाहिले आहे. एका तरूणाने थोडासा विरोध करताच त्याला कसे मारले गेले, त्याचा पडलेला चष्मा आणि त्यावरून गेलेले पोलिसी वाहनाचे चाक हे सगळे दृष्य सोनालीला ठळकपणे आठवते. सत्तेचा उद्दाम क्रूरपणा पाहूनही आपण गप्प राहिलो याची तिला खंत वाटते.एकूणच प्रशासनातील माणसे मूक बाहुल्यांसारखी झाली आहेत हे सोनालीला जाणवते आहे. ती म्हणते – 

“तो जेव्हा फरपटत नेला जात होता आणि त्याचा चष्मा खाली पडला होता ..नक्कीच  बिनचूकपणे ते  आमच्यासारख्यांच्या आधुनिक अधिकारवादी प्रणालीच्या साधनानेच घडत होते आणि आम्ही  एका गोष्टीबद्दल निश्चित जाणून होतो की सगळं काही ठीक चाललेलं नाही.तरीही मी आणि माझे सहकारी एकमेकांच्या बाजूने जाताना, जिन्यावरून उतरताना परस्परांना पाहून ओळखीचे स्मित देताना,एकमेकांना पाहून आदराने मान झुकवताना एकदाही हे विचारायला थांबलो नव्हतो की आपण हे साधन, हे प्रशासन काहीच न घडल्यासारखे का  खेचून नेतो आहोत?…कोणे एके काळी प्रशासकीय सेवेबद्दल विचार करताना राजकीय नेते ‘ते’ होते आणि आम्ही वेगळे होतो, स्वतंत्र होतो.जणू एका नाण्याच्या त्या दोन बाजू होत्या.आम्ही शिस्तीने बांधलेले होतो.जणू काहीतरी गूढ होतं आमच्यात.आमची कामे आम्हाला राजकीय सर्कसपासून स्वतंत्र  राहून  करायची होती.आम्ही ब्रिटीश सत्तेने भारताचा कारभार चालवताना उभ्या केलेल्या आय.सी. एस. या पोलादी संरचनेचे उत्तराधिकारी होतो.पण दोनशे वर्ष ही पोलादी संरचना जेवढी सत्ताधाऱ्यांची होती त्यापेक्षा किती तरी अधिक ती स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हा प्रशासकांची होती.आणि आम्हाला नवी परंपरा निर्माण करायची होती.प्रशासनाचे स्वतःचे स्वातंत्र्य आम्हाला सिद्ध करून दाखवायचे होते.पप्पा जे आय.सी.एस.होते ते,मी प्रशासकीय सेवा परीक्षेत सर्वोच्च गुणांनी यशस्वी झाले तेव्हा अभिमानाने म्हणाले होते की सोनाली तुझ्यासारखे अधिकारी, विशेषतः प्रशासनातील महिला अधिकारी भारताला त्याचे भारतीयत्व मिळवून देणार आहात….आणि जरी माझ्या स्वतःच्या धारणा आणि ऊर्मी पपांपेक्षा वेगळ्या असल्या तरीदेखील ब्रिटीश सत्तेकडून स्वतंत्र भारताकडे झालेला भारतीय  प्रशासकीय सेवेचा ऐतिहासिक प्रवास आम्हा दोघांच्या मनाला स्पर्शून गेला होता.कोणत्याही खडखडाटाशिवाय ब्रिटीश प्रशिक्षित यंत्रणा भारतीय यंत्रणेत परावर्तित झाली होती. मग आम्ही जी परंपरा बांधू इच्छित होतो ती कुठे चुकली होती ?राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा गेल्या काही वर्षांत किती धूसर झाली होती …”

सोनालीला प्रशासनातील अधिकारी सत्ताधाऱ्यांचे हुजरे झालेले दिसत होते. विशेषतः तिचा ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असतानाचा सहाध्यायी आणि प्रियकर रवी कचरू असा राजकीय नेत्यांचा मिंधा झालेला, लाचखोर झालेला ती पाहते तेव्हा त्याचे सर्वसाधारणपण पाहून ती अस्वस्थ होते.पण आत्मपरीक्षण करताना तिला वाटते –

“आणि आम्ही सर्व तरी कितीसे चांगले होतो,आणिबाणी ही खरंच गरजेची आहे असे भासवत होतो.जेव्हा की प्रशासकीय सेवेतील कोणालाही माहीत असते की खरी आणिबाणी केव्हा  असते.त्यांनी सर्व प्रकारच्या आणिबाणींना तोंड दिलेले असते. मग ती फाळणी असो, दुष्काळ असो , पूरपरिस्थिती असो की युद्ध आणि स्थलांतरे असोत आणि ते स्वतःही काही प्रमाणात स्थलांतर करतच असतात.आम्हाला माहीत होते की ही आणिबाणी नव्हती. तशी ती असती तर आमचे अग्रक्रम वेगळे राहिले असते. आम्ही सगळे अतिशय तलम वेषांतरीत अशा संहाराचा आणि देशाला एका कुटुंबाच्या सत्तेखाली नेणाऱ्या कपटनाट्याचा भाग होतो.शांतपणे त्यात आपल्या भूमिका वठवत होतो.म्हणूनच आम्ही एकमेकांजवळून गेलो तरी केवळ नमस्कार-चमत्कार करत होतो पण त्याउप्पर चकार शब्द बोलत नव्हतो.कामाच्या तासानंतरही काही बोलत नव्हतो.त्यामुळे सगळे अगदी शांत ,चिडीचूप, निःस्तब्धपणे चालले होते. कोणालाच कोणत्या अडचणीत अडकायचे नव्हते.जोपर्यंत आम्हाला कसला स्पर्श होत नव्हता तोपर्यंत आम्ही ‘राणीची वस्त्रे किती सुंदर’ असे म्हणत राहायचे …”

सोनालीने नियमाप्रमाणे वागून हॅपिओला नावाच्या थंड पेयाच्या परदेशी कंपनीला  परवाना नाकारला.आणि रवी कचरूने संधी साधून तिची कशी उचलबांगडी होईल व स्वतःला उद्योग खात्याच्या सचिवपदी विराजमान होता येईल ते पाहिले. सोनालीने पदावनती स्वीकारण्यापेक्षा प्रशासनातून राजीनामा देणेच पसंत केले.मनाच्या खचलेल्या अवस्थेत तिला हेपिटायटीसने गाठले.उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला दूषित पाण्यातून या काविळीची लागण झाली आहे असे म्हणून प्रशासनालाच दोष दिला.अश्रू ढाळणाऱ्या सोनालीला, आपली आई किती कष्ट करणारी, सहनशील होती असे सांगून डॉक्टरांनी  जणू तिच्या दुःखावर डागण्याच दिल्या. तेव्हा सोनाली काहीशी भानावर आली. आपलेच दुःख गोंजारणाऱ्या तिला आपल्यापेक्षा अन्य लोकांची दुःखे  जाणवू लागली. वर्तमानपत्रात दिल्ली जवळच्या एका भागातील महिलेचा हुंडाबळी गेल्याची बातमी आली होती, पोलिसांनी एका गुन्हेगाराला डोळ्यांत सुया टोचून कायमचे अंध केले होते, शेतात कसणाऱ्या कुळाने आपला पिकाचा हिस्सा मागितला म्हणून जमिनदाराने त्याची हत्या केली होती.कितीतरी दुःख सभोवती आहे याचे  भान हे सोनालीला तिच्या मनाचा तोल सावरायला उपयोगी ठरले.कॅनॉट प्लेसला तिने पाहिलेले पोलिसांनी तरूणाचे फरपटत नेले जाणे तिला परत परत आठवू लागले. आपण त्या प्रसंगी काहीच विरोध का केला नाही असा प्रश्न तिला पडला. आपण भ्याड झालो आहोत याची जाणीव तिला बोचू लागली. सोनालीच्या मनातील उलथापालथी सांगताना  प्रथम पुरूषी कथक म्हणतो-

 “कोणी एक तत्वज्ञ म्हणतो की, ‘भ्याड माणूस हा हृदय किंवा फुफुस दुबळे असल्याने भ्याड झालेला नसतो.तो तसा असतो कारण त्याने आपल्या कृतीने स्वतःला भ्याड केलेले असते.’-मी रात्रीच्या अंधारात एकटीच घामाघुम होऊन झोपेतून खडबडून उठून बसू लागले.जर समूहाने स्वेच्छेने भ्याड व्हायचे ठरवले असेल तर ? जर कोट्यवधी पुरूष आणि महिलांनी , संपूर्ण देशानेच भेकड कृती केली तर ?तर त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग असतो ?आणि मला अशा कोणत्या पोलादी तत्वांची शिकवण देऊन घडवलं होतं जी मला मूक बनवत होती ?मला मोठं होताना नेहमी असं सांगितलं गेलं होतं की आपण मध्यममार्गी असावे, सहिष्णू असावे,सभ्यतेने वागावे.मला वेगळ्या गोष्टी शिकवल्या जायला हव्या होत्या.आपण क्रौर्याबद्दल,उपेक्षेबद्दल किती सहज राहावे हे शिकवायला हवे होते मला.माझे संगोपन प्रचंड भूलथापांवर झाले होते….अशा रात्री मी स्वतःला मानवजात ही मूळात क्रूर,रानटीच असते असे समजावत दिलासा शोधत असे..धर्म मला कधीच शिकवला गेला नव्हता.हिंदुत्ववाद पुढे जाऊ नये असे मानून हेतूपूर्वकच तसे केले गेले होते…त्यामुळे माझ्याकडे कोणता ग्रंथ किंवा पोथी नव्हती की जी मी खिडकीबाहेर भिरकावून देऊन माझी अश्रद्धा जाहीर केली असती. पण मला माहीत होते की ज्यावर विश्वास ठेवावा असे मूलभूत सत्य  काही नसतेच. जर मला कसले आश्चर्य वाटले असेल तर ते याचे की मी माझ्या टेबलावर बसून नीट  काम करत राहिले तर समाजपरिवर्तन होईल, परिस्थिती बदलेल या धारणेने  निर्णय घेत होते.कारण माझ्या प्रशासकीय इमारतीपलीकडे एक संसद भवन आहे असे मी मानत होते.पण असे युग आले होते की ते सगळे संपुष्टात आले होते आणि मी ती वेळ ओळखलीच नव्हती…”

रामची मालमत्ता केवळ त्याच्या मुलाला देवला मिळता कामा नये आणि रोझ जरी रामची द्वितीय पत्नी असली,परदेशी असली तरी तिलाही रामच्या मालमत्तेचा हिस्सा मिळावा असे सोनालीलाही वाटत होते. तिची बहीण किरणने एके दिवशी रात्री त्यांच्या वकील मित्राला जेवायला बोलावले होते. रोझसाठी कायदेशीर सल्ला मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे असे ठरवून सोनालीदेखील किरणकडे जेवायला गेली.तिथे किरणच्या नवऱ्याचे इतरही मित्र आले होते. त्यात वकिलाखेरीज एक प्राध्यापक होते तर एक वर्तमानपत्राचे संपादक होते. सोनालीने देव रोझवर कसा अन्याय करत आहे याबद्दल बोलायला सुरूवात केल्यावर तेथील आमंत्रित जे  देवला ओळखत होते त्यांनी तो कसा चांगला उद्योगपती आहे आणि विशेषतः मॅडमच्या मर्जीतला आहे याबद्दल बोलायला सुरूवात केली. एकूणच त्यांची  आणिबाणीबद्दलची मतेही सोनालीच्या मतापेक्षा अगदी वेगळी होती.कथक त्या सगळ्यांची चर्चा वाचकांसमोर ठेवतो तेव्हा त्या लब्धप्रतिष्ठीत माणसांच्या स्वार्थी वृत्तीबद्दल आणि ढोंगीपणाबद्दल उपरोध कथनात डोकावतो. कथक म्हणतो-

“…आणि मग राजधानीतील उच्चवर्गीय व्यावसायिकांनी या तिसऱ्या जगातील वरच्या वर्गाची  त्यांच्या देशातील लोकशाही भरतीच्या लाटेने जणू गिळंकृत करून टाकलेली असताना काय मते असतात ती सादर केली.प्राध्यापक महोदयांची पत्नी तत्परतेने मॅडमने आणलेल्या आणिबाणीचे समर्थन करत होती आणि प्राध्यापक महोदय ते रशियात असताना तिथे त्यांना त्यांच्या सांधेदुखीवर कसे आठ महिने मोफत उपचार मिळाले त्याचे वर्णन करत होते.संपादक महोदय आपल्या दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रातील अग्रलेखाची रूपरेषा सांगताना मॅडमनी संविधानावर श्रद्धा ठेवून  संविधानावर कुरघोडी करणे ही आपली संविधानिक जबाबदारीच कशी आहे असे स्पष्ट केल्याचे सांगत होते.संपादक महोदयांना स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे याबद्दल खेद वाटत असला तरी अग्रलेखाच्या शेवटी ते आणिबाणीला पर्यायच नव्हता असेच म्हणणार होते.वकिलांनी चर्चेचा समारोप करताना आपले व्यावसायिक मत मांडले की संविधानात आमूलाग्र बदल झाले पाहिजेत आणि मॅडमना समाजविघातक शक्तींना संपवण्यासाठी,संविधानाचा स्वतःच्या हितसंबंधासाठी वापर करणाऱ्यांविरूद्ध झगडण्यासाठी अमर्याद सत्ता मिळालीच पाहिजे.दिल्ली ही नेहमीच राजेशाहीची राजधानी होती.इथे नेहमीच सार्वभौम सत्ता असणाऱ्या तसेच देवदूत व देवही जणू आपल्या पाठीशी आहे असे मानणाऱ्या राजांची सत्ता होती.त्यामुळे इथे एखाद्याला अधिक हक्क मिळणे,अनुवांशिकतेने सत्ता मिळणे यात नवे ते काय ?”…..मी(सोनाली) खोलीत गेले आणि चष्मा लावून विचार करू लागले.पंतप्रधानांना तरी आणिबाणीसाठी का दोष द्यावा ?इथे सगळ्या संमिश्र लोकांची रांगच आहे  जी रोझ म्हणते त्याप्रमाणे ‘सायमन म्हणाला थम्स अप तर थम्स अप’ करणारी आहे.”  

सोनाली आणि रवी कचरू हे तरूण असताना ऑक्सफर्ड विद्यापीठात सहाध्यायी होते.खरं तर, ते लहानपणापासून मामेभाऊ-आतेबहीण म्हणून वाढले होते पण लंडनमधील  मोकळ्या वातावरणात ते एकमेकांचे फक्त भाऊ-बहीण राहिले नव्हते. त्यांच्या आपापसात विविध विचारसरणींबद्दल चर्चा होत.त्या चर्चेत रवी नेहमीच साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करत असे. त्याला साम्यवाद आवडत होता तो गोरगरीबांना समान मालमत्ता मिळेल म्हणून नाही तर  त्यातील शिस्तीमुळे.साम्यवादातून आलेली हुकूमशाही देखील चांगलीच असते ती गोरगरीबांना शिस्त लावते आणि त्यामुळेच त्यांचा आर्थिक विकास होतो अशी रवीची भूमिका होती. सोनाली मात्र नेहमी महात्मा गांधींच्या विचारांचे समर्थन करे.तिच्या मते महात्मा गांधींनी खरा साम्यवाद आचरणात आणला होता. भारतातील गिरणी कामगारांची पहिली संघटना महात्मा गांधींच्या पुढाकारानेच स्थापन झाली होती.त्यांचे केवळ अस्तित्वही सर्वसामान्यांच्या उठावाला चालना देणारे असे. सोनालीच्या मते पाचशे दशलक्ष बंडखोर भारतीयांना गांधीजीच्या नेतृत्वावर विश्वास वाटला कारण ते केवळ तत्वज्ञान सांगत नव्हते तर त्यांचे जीवन हाच त्यांचा संदेश होता.सोनालीचे हे म्हणणे रवी कचरूचा रागाचा पारा चढवणारे ठरे. तो म्हणे की जर पाचशे दशलक्ष बंडखोरांचा गांधीजींवर विश्वास होता तर त्यांनी आपल्या आज्ञेनुसार त्या पाचशे दशलक्ष बंडखोरांच्या जगण्याला शिस्त लावायला हवी होती.रवीचे असले हुकूमशाहीचे समर्थन करणारे बोलणे ऐकले की सोनालीला काय वाटे ते तिच्या कथनातून येते. कथक म्हणतो –

“मला वाटतं तो तसं म्हणाला कारण तो पुरूष होता. त्याने स्वातंत्र्यासाठीचा लढा कधीच दिला नव्हता.जेव्हा त्याचे रक्त सळसळत होते तेव्हा त्याला कोणीही ठामपणे पाठीवर थोपटून शांत केले नव्हते,जेव्हा तो वाऱ्यात किंवा बस पकडायला धावला होता तेव्हा त्याच्या पायात साडीच्या निऱ्यांचा कधी अडथळा झाला नव्हता आणि त्याला भयाने दुबळे वाटले नव्हते,त्याने केस कापले तेव्हा त्याच्या आईने तिच्या ओरडण्याने घर डोक्यावर घेतले नव्हते. त्याला साधी कल्पनाही नव्हती की दमन काय असते.मला ते माहीत होते आणि म्हणूनच कोणत्याही साखळ्यांनी एखाद्या विचारसरणीला बांधून घेण्याचा माझा विचार नव्हता.आताच तर कुठे मी काही साखळ्यांतून सुटले होते.माझ्या अस्ताव्यस्त पलंगावर, आजूबाजूला भरपूर पुस्तके व कागदपत्रांचा पसारा असूनही आरामात सफरचंद खाणाऱ्या मला कोणाच्याही हुकमतीत राहण्याची इच्छा नव्हती.अगदी सामान्य माणसांचाही हुकूम मला नको होता. एक तात्पुरती अवस्था म्हणूनही मला कोणाची गुलामगिरी नको होती.कारण ती अवस्था कधी संपेल की नाही याबद्दल मला शाश्वती नव्हती.”

रवीने अर्थातच सोनालीच्या बेशिस्तपणाबद्दल आणि गोंधळलेल्या मनोवस्थेबद्दल तिची हेटाळणी केली.पण सोनालीला आपल्या गोंधळलेपणाबद्दल खंत नव्हती.युरोपियन संस्कृती, आधुनिकता ब्रिटीशांची वसाहत म्हणून भारतीयांना आतापर्यंत केवळ थेंबाथेंबाने कळली होती आणि आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर  प्रत्यक्ष युरोपात राहून ती संस्कृती भरभरून चाखताना गोंधळ होणे स्वाभाविकच आहे असे सोनालीचे मत होते.तिच्या मते भारतातील एका छोट्याशा गटालाच ही आधुनिकता, हे स्वातंत्र्य चाखायला मिळत होते आणि ते नेमके काय आहे हे त्यांनाही कळले नव्हते. रवीला वाटत होते की म्हणूनच आपण बांधिलकी मानली पाहिजे आणि इतरांना शिस्त लावली पाहिजे.सोनालीला त्याच्या मनातील निःशंकतेचे कौतुक वाटले होते. पण ती स्वतः असे मानत होती की आधुनिकता, स्वातंत्र्य आपण ब्रिटीशांकडून जसे आहे तसे का घ्यावे ? आपले भारतीयत्व, आपला वेगळा विचार या स्वातंत्र्यात का असू नये. आणि तिथे तिला महात्मा गांधींचे म्हणणे, वागणे पटत होते.त्यांनी मानवी मूल्यांना शेकडो वर्षे पुढे नेले असे तिचे मत होते. त्यांनी आणलेले दरिद्रीनारायण, हरिजन हे शब्द गरीबांना, दलितांना आदर देणारे ठरतील असे सोनालीचे मत होते.

नयनतारा सेहगल यांनी ‘रिच लाईक अस’ च्या कथानकात पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्थेतील क्रौर्य ठळकपणे वाचकांसमोर ठेवले आहे.  ब्रिटीशांनी सतीबंदीचा कायदा केलेला असतानाही केशव रानडे यांच्या  आईचे पुरूषी दमनकारी व्यवस्थेमुळे सती जाणे लेखिका दाखवते.कुळांनी शेतीतला हिस्सा मागितला म्हणून कुळांच्या बायकांवर बलात्कार करणारे जमिनदार हे पुरूषप्रधानतेचे हिडीस रूपदेखील कादंबरीत दिसते. रोझच्या कुटुंबातील पुरूषप्रधानता आणि त्यामुळे मोनावर तसेच नंतर रोझवरही अन्याय झाला हेही लेखिकेने कादंबरीत दाखवले आहे.विशेषतः रामने मार्सेलासाठी रोझला पाच वर्षे वियोगाचे दुःख भोगायला लावले आहे,आपल्या पश्चात रोझला मालमत्तेतील हिस्सा मिळावा यासाठी कोणतीही कायदेशीर तजवीज करून ठेवलेली नाही असे ‘रिच लाईक अस’च्या कथानकात दिसते.देवची बायको निशीने देवच्या कामगारांशी अरेरावीच्या वागण्याला विरोध न करणे,त्याने व्यवसायात घेतलेले निर्णय,त्याचे भ्रष्ट आचरण चुकीचे आहे हे कळूनही त्यापुढे मान तुकवणे हेही पुरूषी दमनशाहीचेच निदर्शक आहे. तसेच सोनालीच्या बहिणीने,आईने तिला कायम पुरूषांना आवडेल असे राहण्याचा सल्ला देणे,तिचे लग्न झालेले नाही म्हणून तिला कमी लेखणे यातूनही पुरूषसत्ताक व्यवस्थाच सामोरी येते आहे.’रिच लाईक अस’च्या कथानकात दुसऱ्या बाजूला असे दिसते की अशी हुकूमशाहीची प्रवृत्ती,दुसऱ्यांचे दमन करण्याची. दुसऱ्यांना सन्मानाने न वागवण्याची वृत्ती फक्त भारतीय कुटुंबातच नाही तर संपूर्ण भारताच्या राजकीय व्यवस्थेत देखील रूजली आहे.खरं तर, महात्मा गांधींसारखा सर्वांचा आदर करणारा आणि कोणावरही आपली मते न लादणारा नेता भारताला लाभला होता. आणि भारतीयांनी अशा नेत्याच्या नेतृत्वाला स्वीकारून अहिंसेच्या मार्गाने जुलमी ब्रिटीशांकडून आपले स्वातंत्र्य खेचून घेतले होते. हा इतिहास ताजा असतानाही भारतीय समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आजही कोणा एकाची गुलामगिरी,हुकूमशाही का पत्करते याचे गूढ कसे उलगडायचे असा प्रश्न लेखिका वाचकांना विचारते आहे.

सोनाली ऑक्सफर्डला शिकत असताना राम आणि रोझ मार्सेलासोबत व्यवसाय करण्याच्या निमित्ताने लंडनला येतात.रोझला रामची मार्सेलाबद्दलची आसक्ती कळते आहे.ज्या रामच्या प्रेमासाठी आपण स्वदेश, स्वतःची माणसे सोडून भारतात गेलो तोच आपल्याशी प्रतारणा करतो आहे हे समजून स्वतःच्या प्रेमावरचा रोझचा विश्वास उडाला आहे. त्यातच आपल्या बालपणीच्या घराच्या शोधात ती जाते तेव्हा ते दुसऱ्या महायुद्धात उद्वस्थ झाल्याने तिथे दुसरीच इमारत उभारलेली तिला दिसली आहे.आपले प्रेम खरे असूनही आपली उपेक्षा होते आहे या जाणिवेने रोझला एकाकी वाटते आहे. अशा अवस्थेत ती सोनालीला आपल्या हॉटेलवर  बोलावते. सोनालीलाही रवी कचरूच्या वागण्या-बोलण्यातून आपला भ्रमनिरास झालेला जाणवतो आहे. रवी आपला प्रियकर असू शकत नाही याबद्दल तिला खात्री पटली आहे.तिलाही एकाकीपण जाणवते आहे. सोनाली व रोझ दोघीही एका बागेत फिरायला गेले असताना एक लहानगा मुलगा कागदाची होडी तेथील झऱ्यात सोडतो. पण ती एके ठिकाणी मध्येच अडकते.सोनाली ते पाहून चटकन पुढे होते ,मधला अडथळा काढून ती त्या लहानग्याच्या होडीला प्रवाही करते.रोझला सोनालीच्या उत्साहाचे कौतुक वाटते. पण तिला स्वतःला मात्र रामने केलेल्या प्रतारणेमुळे तिच्या जगण्याचा प्रवाह खुंटीत झाल्यासारखा वाटतो आहे.जवळच्याच एका पुस्तकांच्या दुकानात दोघी जातात तेव्हा सोनाली तेथील मार्क्सच्या विचारसरणीवरचे पुस्तक उचलते आणि रोझला एक जुने पिक्चर पोस्टकार्ड आवडते. ज्यात चित्रकाराने स्पष्टीकरण दिले आहे की ते अशा एका प्रवाशाचे चित्र आहे,जो सिंथेरा या स्वर्गीय ठिकाणाचा शोध घेत निघाला आहे.पण  सिंथेरा केवळ स्वप्नासारखे, काल्पनिकच आहे, तो कधीच तिथे पोहचू शकणार नाही.सोनालीला ते चित्र जुनाट शैलीतले,कृत्रिम वाटते.  रोझला मात्र ते आवडते.एकूणच परिवर्तन होऊ शकते आणि खरे प्रेम असू शकते यावरचा रोझचा विश्वासच उडाला आहे.सोनाली मात्र परिस्थिती बदलेल, लोकशाहीचा, नैतिकतेचा प्रवाह पुन्हा एकदा खळाळून वाहू लागेल यावर विश्वास ठेवणारी आहे असे कथनातून सुचवले गेले आहे.

कादंबरीच्या अखेरीस रोझची हत्या होते आणि सोनाली रोझची आठवण जपण्यासाठी तिच्या खोलीतून तिच्या वस्तू गोळा करत असते तेव्हा रोझने जपून ठेवलेले सिंथेराचे पोस्टकार्ड तिला मिळते. रोझ आयुष्यभर खऱ्या प्रेमाचा शोध घेत राहिली, इतरांवर भरभरून प्रेम करत राहिली पण तिची हत्या झाली, महात्मा गांधी जे संपूर्ण देशातील बांधवांवर प्रेम करत राहिले, अहिंसेचा संदेश देऊन गेले त्यांचीही हत्या झाली हे साम्य सोनालीला जाणवते.खरे प्रेम कधी अस्तित्वातच नसते का ?असा प्रश्न तिला पडतो. मार्सेलाच्या येण्याने आणि तिने १७व्या शतकातील भारतीय इतिहासाचा शोध घेण्याचा प्रकल्प सोनालीने सुरू करावा असे सुचवल्याने सोनालीच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळते. जणू रोझकडून अधुरा राहिलेला सिंथेराचा शोध ती पुढे नेणार आहे. सोनाली १७व्या शतकातील अकबर बादशहाच्या काळातील इतिहास वाचू लागते तेव्हा तिला सुखद आश्चर्य वाटते.त्यावेळची राजव्यवस्था, समाजव्यवस्था आजच्यापेक्षा किती सुसंस्कृत,भयमुक्त,सर्वांना प्रेमादराने वागवणारी होती याबद्दलचे ते आश्चर्य आहे. आजच्या काळातील संस्कृतीत दिसणारी विसंगती,विरूपता सामुहीक प्रयत्नाने विवेकाने ,जाणीवपूर्वक बदलण्याची गरज सोनालीला प्रकर्षाने जाणवते.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीत काही पौराणिक संदर्भांचा उल्लेखही आहेत.त्याआधारे लेखिका तिची वेगळी दृष्टी व्यक्त करताना दिसते. कथानकात मोना रोझला घेऊन महाभारतावरील नाटकाचा खेळ पाहण्यासाठी गेली असताना द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग रोझला अस्वस्थ करतो.द्रौपदीवर अन्याय होत असताना तिचे पती मूक आहेत आणि तिने देवाचा धावा करताच देव तिला वाचवायला आला आहे हे पाहून रोझला प्रश्न पडतो की सीतेला तिचा पती राम जंगलात पाठवून देतो तेव्हा देव तिला वाचवायला का येत नाही?म्हणजे देव देखील पक्षपाती आहे , तो त्याच्यासमोर याचक झालेल्यांना वाचवतो. स्वाभिमानाने जगणारी सीतेसारखी स्त्री सत्तेला नकोशी वाटते आणि मग ती भूमीत गडप झाल्याची कथा समाज रचतो असे रोझला वाटते. एकूणच भारतीय स्वाभिमानाने जगण्यापेक्षा लाचारीने जगणे स्वीकारतात कारण स्वाभिमानाने जगणे धोकादायक आहे,आपल्याला सत्ता संपवून टाकेल याचे भय त्यांना आहे. भारतातील महाकथनेही लोकांच्या मनावर हेच ठसवत आहेत असे रोझला वाटते.मोनाने आयोजित केलेल्या होमहवनाच्या प्रसंगी पंडित एकेका मंत्राबद्दल ज्या गोष्टी सांगत राहतात त्याही रोझला निरर्थक वाटतात. मंत्र फक्त पठन करण्यासाठी असतात असे तिचे प्रांजळ मत आहे.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या कथानकात किशोरीलाल ही एक व्यक्तिरेखा आहे. देवची पत्नी निशीचे ते वडील आहेत. आणिबाणीत पोलिसांच्या हाती अमर्याद सत्ता आल्याने त्यांनी अनेक निरपराधींना पकडून तुरूंगात टाकले आहे. त्यात किशोरीलालदेखील आहेत.तुरूंगाच्या कोठडीत त्यांना एक विद्यापीठात शिकणारा विद्यार्थीदेखील केवळ गैरसमजातून पोलिसांनी पकडून आणलेला दिसतो.त्या विद्यार्थ्याला पकडताना पोलिसांनी त्याला पायावर मारले आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. पण पोलीस त्यावर कोणतेही उपचार करत नाहीत.किशोरीलाल या मुलाचे दुखणे त्याला सहन करता यावे म्हणून त्याने रचलेली नाटकाची गोष्ट ऐकत राहतात.तरूणाच्या या नाटकात एक रथातून येणारा सत्ताधीश आहे आणि तो काहीही बोलला तरी सगळी जनता मोठमोठ्याने हसून त्याला दाद देते आहे.तरूण ही गोष्ट सांगता सांगताच थकून झोपतो आणि कण्हू लागतो. तेव्हा किशोरीलाल यांना वाटते की आपण भगवतगीतेवर का विश्वास ठेवावा? गीतेत अर्जुनाचे सारथ्य करणारा, रथात उभे राहिलेला भगवंत तर जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी पुन्हा जन्म घेईन असे म्हणतो आहे. पण आता तर अधर्माने सगळी व्यवस्था कुजली आहे आणि भगवंतांच्या आगमनाची चाहुलही नाही मग का विश्वास ठेवायचा भगवतगीतेवर ?

सोनाली रानडे  आपले वडील केशव रानडे यांच्या मृत्यूनंतर त्यांची डायरी वाचते. त्यातील स्वतःच्या आजीच्या सती जाण्याचा प्रसंग व त्यावरचे वडिलांचे भाष्य वाचून ती अंतर्मुख होते.केशव रानडे यांनी लिहिलेले असते-

“म्हणून मी हिंदूत्वावर विश्वास ठेवू शकत नाही. हिंदुत्ववाद जो काही असेल तो. सतीची दुष्ट चाल हिंदू धर्मात होती म्हणून नाही तर या दुष्टपणामागचा कार्यकारणभाव हिंदू धर्म स्पष्ट करत नाही म्हणून.जर विश्व हा एक भास आहे,माया आहे आणि अनंत काळ म्हणजे केवळ काही क्षण आहेत आणि अशी अनंतता जन्मामागून जन्म घेऊन सिद्ध होणार आहे तर मग विश्वाच्या संदर्भाने माझ्या आईची वेदना काहीच नाही.सगळे दुःखच निरर्थक आहे.पण तो एक क्षण जेव्हा मी तिला चितेवर पाहिले की जेव्हा मी स्वतःचे जीवन संपवून  तिला आयुष्य देऊ शकलो असतो आणि तिला सतीच्या वेदीवर चढवणाऱ्यांना मारू शकलो असतो त्या क्षणाचे स्पष्टीकरण मला हवे आहे.आणि  पापी,दुष्कृत्यांनी जर आम्हाला इथे आणून सोडले असेल तर जिथे आम्ही उभे आहोत ती जमीन स्थिर असणे अशक्य आहे.”

सोनालीने  वडिलांनी लिहिलेली डायरी बाजूला ठेवली तेव्हा तिचे डोळे पाणावले होते.तिला आपल्या मनातील अंधार उजळून निघाल्यासारखे वाटले होते. दिवा विझवताना तिला जगाचे रूप उघड झाल्यासारखे वाटले होते.तिला दुष्कृत्य,पाप दिसले नव्हते. एका चिंचोळ्या जागेवर उभे राहून आपल्या चितेवरील आईला खेचून काढू पाहणारा आणि तिला बळजबरीने चितेवर चढवणाऱ्यांशी संघर्ष करणारा तरूण तिला दिसला होता.त्याचवेळी कॅनॉट प्लेसजवळून पोलिसांनी फरपटत नेले जात असतानाही पोलिसांना विरोध कऱणारा तरूण तिला आठवला होता. सगळेच क्रौर्यासमोर आणि दुष्कृत्यांबद्दल  हतबल,उदासीन नसतात. आपले वडील नव्हते, तो तरूण नव्हता, रोझला भेटलेला तो हात तुटलेला भिकारीही तसा नव्हता.स्वप्नातही हे अन्यायाला विरोध करणारे, संघर्षशील  नायक सोनालीला दिसत राहिले होते.

अशाप्रकारे ‘रिच लाईक अस’ या नयनतारा सेहगल यांच्या कादंबरीतून त्यांच्या काही आंतरीक जाणिवा ठळक होतात.ज्यात अर्थातच स्वातंत्र्य,समता,बंधुता या लोकशाहीतील मूल्यांवरील  श्रद्धा,नैतिक आचरण,स्वाभिमान आणि संघर्षशीलतेचे महत्त्व या जाणीवा सर्वात उठून दिसतात.

‘रिच लाईक अस’ हे कादंबरीचे शीर्षक अनेकार्थसूचक आहे.आमच्यासारखे श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल असे म्हणणाऱ्या श्रीमंतांच्या म्हणण्यातील अहंकार आणि व्यर्थता तर हे शीर्षक व्यक्त करतेच. पण त्याबरोबरच ज्या संस्कृतीत आजही स्त्रियांवर अत्याचार होतात,गरीबांवर,दलितांवर अन्याय होतो आणि हुकूमशाहीला राजमान्यता मिळते ती आमची भारतीय संस्कृती श्रीमंत आहे असे म्हणण्यातही केवळ अहंकार व दिशाभूल  आहे असेही या शीर्षकातून लेखिकेला सुचवायचे आहे.

तुम्हाला ‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या कथनाच्या  विश्लेषणातून लेखिकेच्या जीवनदृष्टीबद्दल अधिक स्पष्टता आली असेल अशी आशा करते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला का ते जरूर कळवा.पुढील ब्लॉगमध्ये नयनतारा सेहगल यांच्या आणखी एका कादंबरीचे कथानक व कथासूत्र आपण लक्षात घेणार आहोत.

                                                                                      -गीता मांजरेकर

__________________________________________________________________________________________________________________

4 प्रतिसाद

  1. “रिच लाईक अस” या कादंबरीत लेखिकेने मांडलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. खरे प्रेम अस्तित्वात असते की नाही?, हिंदू धर्मात असलेल्या कोणत्याही कारणाशिवाय चालत आलेल्या प्रथा पाळणे हे मला देखील पटत नाही. प्रश्न तर लेखिकेने त्याबद्दल अगदी तर्कासहित उदाहरणे देऊन मांडली आहेत . ज्या मला पुरेपुर पटल्या आहेत . पुरुषप्रधानता, वगैरे सर्व काही हा ब्लॉग जरा इतर ब्लॉगपेक्षा वेगळा होता. तर्कप्रमाणे विचार करायला लावणारा!

    Like

    1. तू वाचत रहा नियमितपणे चैतन्या

      Like

    1. आभारी आहे फाल्गुनी!

      Like

Leave a reply to geeta manjrekar उत्तर रद्द करा.