‘रिच लाईक अस’ ही नयनतारा सेहगल यांची १९८५ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे.या कादंबरीसाठी नयनतारा सेहगल यांना लंडनमधील मानाचा सिन्कलेयर पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच भारतातील साहित्य अकादमी पुरस्कारही ‘रिच लाईक अस’ या पुस्तकाला देण्यात आला होता. जो सेहगल यांनी दाभोळकर, पानसरे,कलबुर्गी व गौरी लंकेश या चार विचारवंतांच्या क्रमाने निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ परत केला.

‘रिच लाईक अस’ ही ३०१ पृष्ठांची दीर्घ कथानक असलेली  कादंबरी आहे.ते दीर्घ कथानक आणि त्यातून व्यक्त झालेली कथनसूत्रे या ब्लॉगमध्ये आपण समजून घेणार आहोत. अर्थातच या ब्लॉगची लांबी त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक असणार आहे. ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहेच.

‘रिच लाईक अस’या कादंबरीचा कालावकाश आणि कथानक :

 ‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या कथानकाचा काळ भारतात आणिबाणी लागू झाली तेव्हाचा म्हणजे १९७५ते १९७७ दरम्यानचा आहे. म्हणजे ‘रिच लाईक अस’ या कादंबरीचा प्रत्यक्ष कालखंड साधारण १८ ते २० महिन्यांचाच आहे. परंतु या कादंबरीचे कथानक विविध व्यक्तिरेखांच्या भूतकाळाच्या निमित्ताने साधारण १९०५ पर्यंत मागे जाते. त्यामुळे कादंबरीचा कालपट सुमारे ७० वर्षांएवढा ताणला जातो.स्वाभाविकच ‘रिच लाईक अस’ या कादंबरीचे कथानक सरळरेषीय नाही ते काळाच्या अक्षावर मागे-पुढे जात राहते.आणि कदाचित एवढ्या विस्तृत कालपटामुळेच ही कादंबरी घटनाप्रधान बनली आहे. एक -दोन व्यक्तिरेखा वगळता अन्य व्यक्तिरेखांची  केवळ रेखाचित्रेच कादंबरीच्या कथानकातून वाचकांना दिसू शकतात.

 कथानकाच्या अनुषंगाने जागतिक इतिहासातील दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ ‘रिच लाईक अस’या कादंबरीत येतो.तसेच भारतातील राजाराममोहन रॉय यांची सतीबंदीची चळवळ ,महात्मा गांधींची सत्याग्रहाची आणि ‘चले जाव’ची चळवळ, भारताची फाळणी,पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणूनची कारकीर्द अशा ऐतिहासिक संदर्भांची पार्श्वभूमी कथानकाला आहे.भांडवलवाद,हिटलरचा फॅसिझम, कार्ल मार्क्सचा साम्यवाद आणि गांधीवाद अशा विचारसरणींची चर्चा या कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या संवादांतून होत राहते. मात्र कोणत्याही एका विचारसरणीचा प्रभाव ‘रिच लाईक अस’ या कादंबरीवर आहे असे म्हणता येणार नाही.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीचे कथानक प्रत्यक्षात दिल्ली शहराच्या परिघातच घडते परंतु कथानकातील व्यक्तिरेखांच्या भूतकाळांच्या अनुषंगाने ते फाळणीपूर्व भारतातील लाहोर,ब्रिटीशांची राजवट सुरू असतानाचे व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे लंडन,बिहारमधील कुठलेसे खेडे आणि महाराष्ट्रातील कुठलेसे शहर या व्यापक अवकाशात फिरते.

‘रिच लाईक अस’चे कथानक व्यामिश्र आहे. कथानकात प्रामुख्याने भारतातील श्रीमंत वर्गाचे चित्रण केले गेले असले तरी मध्यमवर्ग आणि गरीब वर्गाच्या जगण्याचे संदर्भही कथानकात आहेत.

या कादंबरीच्या कथानकात कथन कधी तृतीय पुरूषी आहे तर कधी ते प्रथम पुरूषी आहे. कथानकातील प्रमुख व्यक्तिरेखा आहे रोझ ही साठीची मूळची ब्रिटिश पण साधारण वयाच्या पंचविशीपासून भारतातच वास्तव्याला असलेली स्त्री व्यक्तिरेखा आहे.रोझ म्हटलं तर विवाहित आहे पण खरं तर, ती केवळ राम एल. सूर्या या भारतीय व्यापाऱ्याची जोडीदार म्हणून सुमारे पस्तीस वर्षे भारतात राहिली आहे.आपला देश, माणसे सोडून ती भारतात आली आहे आणि तिने तिच्या प्रेमळ,लाघवी,गप्पीष्ट स्वभावाने इथे माणसं जोडली आहेत.तिच्या नजरेतून भारतीय समाज,संस्कृती वाचकांना दिसत राहते.हे कथन तृतीय पुरूषी आहे.

 या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा सोनाली रानडे ही साधारण पस्तीशीची, मूळ भारतीय पण परदेशात उच्चशिक्षण घेऊन आलेली,प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारी अविवाहीत स्त्री आहे.तिची सगळी नात्यातील माणसे या देशात असूनही तिच्या वेगळ्या विचारांमुळे,दृष्टीकोनामुळे तिचे वडील वगळता अन्य कुटूंबियांशी  तिचा संवाद जुळत नाही. ती त्रयस्थपणे भारतीय समाज व संस्कृतीकडे पाहू शकते आहे.तिचे कथन प्रथम पुरूषी आहे.

 रोझ आणि सोनाली या दोन्ही स्त्रियांची प्रवृत्ती बरीचशी सारखीच आहे. दोघींनाही जगाबद्दल, माणसांबद्दल, माणसांच्या संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल कुतूहल आहे.दोघीही अतिशय संवेदनशील आहेत.त्यांची स्वतःची अशी आयुष्याबद्दलची वेगळी समज,प्रेम आणि स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पना व स्वप्ने आहेत.आपापल्या तत्वांशी त्या प्रामाणिक आहेत.पण जग अत्यंत व्यवहारी, क्रूर असल्याने परंपरेच्या अवडंबराचे, परिस्थितीचे आणि प्रतारणेचे धक्के दोघींनाही बसलेले आहेत.कादंबरीच्या अखेरीस रोझची हत्या झाली आहे पण रोझचीच जिज्ञासा आणि आशावाद घेऊन सोनालीने पुढील आयुष्य जगायचा निर्णय घेतलेला दिसतो.

‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी सूर्या हे पंजाबी व्यापारी कुटुंब आहे. या कुटुंबाच्या परिघातील रानडे , कचरू आणि किशोरीलाल ही तीन कुटुंबेही कादंबरीतील उपकथानकांचे विषय बनतात. सूर्या कुटुंबातील प्रमुख  लालाजी सूर्या यांचे औपचारीक शिक्षण झालेले नाही पण ते अत्यंत मेहनती,दूरदृष्टी असलेले आणि चोख व्यापार करणारे गृहस्थ आहेत.त्यांनी आपल्या व्यापाराची सुरूवात तिबेटच्या सीमेवर खेचरांच्या पाठीवरून भारतातून मीठ नेऊन विकायचे आणि तेथून लोकर घेऊन यायचे अशा वस्तुविनिमयातून केली आहे.दुर्गम प्रदेशातून प्रवास,प्रचंड कष्ट, वेगवेगळ्या माणसांवर विश्वास ठेवून केलेले व्यवहार यातून लालाजी शिकले आहेत.पहिल्या महायुद्धकाळात त्यांनी केरोसिन, आगपेट्या विकून गुजराण केली आहे.हळूहळू अनुभवांतून व थोडेफार शिकून लालाजींनी शेयर बाजारात उलाढाली केल्या आहेत.पण मूलतः त्यांची वृत्ती सचोटीने व्यापार करण्याची आहे.फाळणीपूर्वीच्या अखंड भारतात लाहोरच्या बाजारात त्यांनी कापड व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.त्यांची रहाणी साधी आहे.स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तर ते गांधीवादीच झाले आहेत. सुती कपडे वापरणारे हे गृहस्थ जमिनीवर बसून आपली कामे करतात. पण ते व्यापारात इतके निष्णात आहेत की ब्रिटीश व्यापारीही लालाजींच्या दुकानात जमिनीवर बसून व्यापाराची बोलणी करतात.मिळालेल्या पैशातून लालाजींनी लाहोरच्याजवळ स्वतःची हवेली बांधली आहे.

लालाजींनी आपला एकुलता मुलगा राम याला उच्च शिक्षण आणि व्यापारासाठी  लंडनला पाठवले आहे.रामचे ब्रिटनला जाण्यापूर्वीच मोना या खानदानी पंजाबी मुलीशी लग्न करून देण्यात आलेले आहे.पण रामला लंडनमधील एका  चॉकलेटसची विक्री करणाऱ्या दुकानातील रोझ तिच्या आधुनिक राहणीमुळे, धीट, परखड स्वभावामुळे,चमकदार डोळ्यांमुळे, भुऱ्या केसांमुळे आणि तिच्या काहीशा रांगड्या इंग्रजी भाषेमुळे इतकी आवडते की तो तिला सोबत घेऊनच लाहोरला परततो.खरं तर, रोझला लाहोरला आणण्यापूर्वीच रामला आपण बाप झाल्याची तार मिळाली आहे.रोझपासून त्याने काहीच लपवलेले नाही.

रोझ लंडनमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे.तिचे वडील काचेच्या बाटल्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत काम करतात.तिचा एक ब्रिटीश प्रियकरही आहे. राम विवाहीत आहे हे कळलेले असूनही  रामचे लाघवी वागणे, तिच्या भावनेचा आदर करणे  आणि प्रेम जिंकून घेणे रोझला आवडते. विशेष म्हणजे राम ज्या भारतातून आला आहे तेथील इतिहास,परंपरा, संस्कृतीबद्दल तिला प्रचंड कुतूहल वाटते आणि आई-वडीलांचा विरोध असतानाही रोझ रामबरोबर भारतात येण्याचा धाडसी निर्णय घेते.

लाहोरमधील हवेलीत रोझचे स्वागत होत नाही. लालाजींना रामने रोझला घेऊन येणे पटत नाही. पण राम रोझला आपली सहचर बनवण्याबद्दल  आग्रही आहे.त्यापुढे लालाजींचे व मोनाचे (रामची पत्नी) काहीच चालत नाही. अखेरीस लालाजी आणि रामची पत्नी मोना यांचे वास्तव्य तळमजल्यावर आणि राम-रोझचे वास्तव्य पहिल्या मजल्यावर अशी हवेलीची विभागणी होते. मोनाला रामच्या वागण्याचा प्रचंड धक्का बसतो आणि ती पूजाअर्चा,जपजाप्य यात दिलासा शोधण्याचा प्रयत्न करते. मात्र घरातील कर्ती स्त्री म्हणून तिच्याकडे असलेली सत्ता ती अजिबात सोडत नाही.स्वयंपाक काय करायचा याचा निर्णय,नोकरांकडून काम करवून घेणे, भिकाऱ्यांना दानधर्म करणे हे सगळे तिच्या मताप्रमाणे ती करत राहते. तिचा मुलगा देव याला ती खूप लाडाकोडात वाढवते.त्याला शिस्त लावण्याऐवजी त्याला कायम पाठीशी घालत राहते.

 राम आणि रोझ स्वतःचे स्वतंत्र दुकान लाहोरच्या बाजारात सुरू करतात. त्यात ते मौल्यवान खडे,कलाकुसरीच्या वस्तू यांची विक्री करू लागतात.ब्रिटीशांच्या राहणीमानाचे आकर्षण असलेला राम आपल्या मुस्लीम आणि ब्रिटीश मित्रांना पार्ट्या देत राहतो.रोझला आपले हवेलीतले स्थान रामची दुसरी बायको आणि परदेशी स्त्री म्हणून दुय्यमच राहणार हे कळून चुकते. मोनाचे दुःख तिला कळते आणि रामला ती स्वतःशी बांधून न ठेवता मोनाकडेही जाण्यासाठी प्रवृत्त करते.पण मोनाकडे ती समज नसल्याने ती रोझचा स्वीकार करायला तयारच होत नाही.परिणामी  रोझच्या मनातही मोनाबद्दल चीड निर्माण होऊ लागते. रोझला रामपासून मुल न झाल्याने देखील एक प्रकारचे दुय्यमपण तिच्यावर लादले गेले आहे. इतके असूनही आपल्या स्वदेशापासून, स्वगृह व स्वजनांपासून दूर आलेली रोझ रामचे कुटुंब आपले कुटुंब मानते.लाहोरमधील ब्रिटीश लोकांशी ती दोस्ती करते,रामबरोबर पार्ट्यांना जाते , स्वतःचे मन रमवते.पन्नाशीच्या वयात राम लाहोरमध्ये आलेल्या मार्सेला नामक त्याच्या अर्ध्या वयाच्या ब्रिटीश तरूणीच्या आकर्षणात अडकतो.रोझला ते जाणवते तेव्हा तिला आपल्या प्रेमावरचा विश्वास उडाल्यासारखा वाटतो.कालांतराने मार्सेला लंडनमध्ये निघून जाते, विवाहबद्ध होते.दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत रोझला आपल्या आई-वडीलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत राहते.तिचा लंडनमधील मित्र लष्करातला अधिकारी म्हणून लाहोरमध्ये येतो तेव्हा ती मोकळेपणाने त्याच्याबरोबर नृत्य करून मनावरील ताण हलका करते. रामला मात्र ते खटकते.युद्ध काळात थंडावत चाललेल्या दुकानातील विक्रीमुळे आणि मार्सेलाच्या जाण्यामुळे चैतन्य हरवून बसलेल्या रामला रोझ प्रोत्साहीत करण्याचे ठरवते.त्यासाठी लालाजींच्या मदतीने रोझ आपल्या दुकानात भारताच्या विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण कापडाची, साड्यांची विक्री सुरू करते. ‘राम-रोझ फॅशन्स’ हा हातमागाच्या तयार कपड्यांचा ब्रॅंड ती सुरू करते.तिच्या कल्पकतेमुळे,लोकसंग्रहामुळे व मेहनतीमुळे रामच्या धंद्याला पुन्हा बरकत येते.

 युद्ध संपल्यावर सुरू झालेल्या ‘चले जाव’च्या चळवळीत लालाजी सामील होतात तेव्हा त्यांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभांना रोझ जाऊ लागते. मध्यंतरी मोना नैराश्याच्या भरात स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा रोझ प्रसंगावधान राखून मोनाला वाचवते.आपल्या चांगल्या वागण्याने रोझ मोनाला आपलेसे करते.लालाजी तर रोझच्या व्यापारकौशल्याचे ,स्वीकारशील स्वभावाचे पदोपदी कौतुक करू लागतात.रामचे कुटुंब आता खऱ्या अर्थाने रोझचे कुटुंब बनते. महायुद्धात लंडनवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात रोझचे आई-वडील मारले जातात तेव्हा मोना आणि लालाजी रोझला धीर देतात , तिचे सांत्वन करतात.तेच रोझचे कुटंबीय बनतात.

फाळणीची चाहूल लागताच लालाजी आपला व्यापार आणि कुटुंब स्वतंत्र भारतात कसे स्थलांतरीत होईल याची तजवीज करतात. मात्र मनोमन त्यांना लाहोर सोडायचे नसल्याने ते जणू स्वतःच मृत्यूला बोलावणे देतात.

राम आणि कुटुंबीय दिल्लीत दोन स्वतंत्र फ्लॅटमध्ये स्थलांतरीत होते.स्वतंत्र फ्लॅटमध्ये  राहताना मोना अभ्यासात कोणतीच गती नसलेल्या देवला जास्तच लाडावून ठेवते. त्याचे लग्न ठरवण्यासाठी ती रोझच्या मदतीने वधूसंशोधन करते पण त्याच दरम्यान तिला कॅन्सरचे निदान होते आणि मोनाचे निधन होते.राम आणि रोझ देवचा निशी या मध्यमवर्गीय पंजाबी मुलीशी विवाह लावून देतात. दिल्लीत पुन्हा एकदा व्यापाराचा जम बसवत असतानाच रामला लंडनमधून मार्सेलाचे बोलावणे येते. लंडनमध्ये रामने आपल्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू करावा असे तिला वाटते आहे. राम पूर्वीच्या ओढीने मार्सेलाकडे खेचला जातो. रोझ त्याच्यासोबत लंडनला जाते. ‘राम-रोझ फॅशन्स’चे दुकान लंडन आणि न्युयॉर्कमध्येही सुरू होते. पण कालांतराने मार्सेलाशी आपले बौद्धिक साहचर्य आहे असे म्हणून राम रोझला एकटीलाच भारतात पाठवून देतो.पाच वर्षे रोझ रामचा वियोग सहन करते.मार्सेलाबरोबर व्यवसाय करणे न जमल्याने निराश होऊन राम परत दिल्लीत येतो. तो पुन्हा एकदा कुटुंब एकत्र  आणावे या हेतूने दिल्लीबाहेर स्वतंत्र बंगला बांधून घेतो.लाहोरच्या हवेलीची आठवण यावी असाच हा बंगला आहे.देवला कसेही करून स्थिरस्थावर करावे असे रामला वाटते आहे.त्यामुळे तो दिल्लीतील राजकीय वर्तुळाच्या संपर्कात राहतो.देवला सरकारी कंत्राटे मिळावीत असा त्याचा प्रयत्न आहे.

नव्या हवेलीजवळ फिरायला गेले असताना रोझला एक भग्नावस्थेतील कबरीची इमारत दिसते.या इमारतीच्या आतला गारवा आणि शांतता तिला अतिशय आवडते. ती रोजच संध्याकाळी त्या कबरीला भेट देऊ लागते.तिथेच एक लंगडा आणि थोटा भिकारी आसऱ्यासाठी आलेला तिला दिसतो. एखाद्या सरपटणाऱ्या किड्याप्रमाणे चालणारा हा भिकारी रोझच्या सहानुभूतीचा व कुतूहलाचा विषय बनतो. हळूहळू रोझ त्याची कहाणी समजून घेते. या भिकाऱ्याच्या जेवणाखाण्याची सोय तर ती करतेच पण त्याला कृत्रिम हात मिळावेत यासाठीही ती प्रयत्न सुरू करते.हा भिकारी बिहारच्या एका खेड्यातील आहे.जमिनदारी कायदा झाल्यावर त्याला व त्याच्या भाईबंदाना  मिळालेल्या जमिनीवर ते कसू लागतात पण पिक काढण्याच्या वेळी जमिनदाराची माणसे येऊन त्यांच्या बायकांना पळवतात. बायकांचा शोध घेत या गुंडांचा पाठलाग करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंड मारहाण करतात.पळवलेल्या बायकांवर ते सामुहिक बलात्कार करतात.रोझला भेटलेल्या भिकाऱ्याच्या बायकोला तर गुंडांनी बलात्कार करून नदीत टाकून दिले आहे. आणि त्याचे हात-पाय तोडले आहेत.कसाबसा भावाच्या मदतीने तो दिल्लीत आला आहे आणि जीवाच्या भयाने कबरीत वास्तव्य करतो आहे. भिकाऱ्याच्या या करूण कहाणीमुळे रोझच्या मनात भारतातील जातीव्यवस्था, जमिनदारी आणि स्त्रियांच्या दुरवस्थेचे वास्तव याबद्दल प्रश्न निर्माण होतात.एका बाजूला देवसारख्याची बापकमाईवर चाललेली उधळपट्टी व निष्क्रियता आणि दुसरीकडे कष्ट करून जगू इच्छिणाऱ्यांवर होणारे क्रूर अत्याचार यातील विरोधाभास रोझला अस्वस्थ करतो.

देवने राम आणि रोझ यांनी सुरू केलेला हातमागावरील कपड्याच्या तयार कपड्यांचा  व्यापार व्यवस्थित काम करून पुढे सुरू ठेवावा अशी रामची अपेक्षा आहे. परंतु देवला मेहनतीचा कंटाळा आहे.तो परस्पर रामची सही करून राम-रोझच्या खात्यातून पैसे काढतो आहे हे रामला कळते आणि त्याबद्दल त्याने देवला टोकले असता दोघांमध्ये वादावादी होते. तो ताण सहन न होऊन रामला अर्धांगवायूचा झटका येतो. उपचारांना प्रतिसाद न देता राम अखेरीस कोमामध्ये जातो.त्याच्या आजारपणात रोझला अधिकच एकाकी वाटते. विशेषतः देव जे आर्थिक व्यवहार करत आहे त्यात पारदर्शीपणा नसल्याने तिला असुरक्षित वाटत राहते.रामचे निधन झाले तर आपल्याला देवपुढे लहानसहान रक्कमेसाठीही हात पसरावे लागतील ही जाणीव रोझला अस्वस्थ करते.देवची बायको निशी मनाने चांगली असली तरी तिला स्वतःची मते नाहीत. कधीही न पाहिलेले वैभव तिला देवशी विवाह केल्याने मिळाले आहे.ते कसे जपायचे हे तिला कळत नाही.  देवसोबत ती ‘राम-रोझ फॅशन्स’ या दुकानासाठी काम करते.पण देवचे कारागिरांबरोबरचे उद्दाम वागणे ती रोखू शकत नाही.फ्रान्स,ब्रिटनमधील परदेशी व्यापाऱ्यांबरोबर राम-रोझने व्यावसायिक संबंध निर्माण केले आहेत.ही परदेशी  मंडळी मालाच्या बाबतीत चोखंदळ आहेत. त्यांच्या अटींप्रमाणे व्यवस्थीत कपडे पुरवण्यासाठी लागणारी कामातील निष्ठा,मेहनत घेण्याची तयारी देव आणि निशी दोघांकडेही नसल्याने परदेशी व्यापारी नाराज होतात. विशेषतः देवला फारशी मेहनत न करताच श्रीमंत व्हायचे असल्याने त्याच्या हातातला धंदा  हळूहळू निसटू लागला आहे.निशी मात्र व्यवसायात ओळखी लागतात म्हणून श्रीमंत बायकांच्यात उठबस करू लागली आहे. रवी कचरूशी( पंतप्रधानांचा सल्लागार आणि देवचा मित्र) हितसंबंध दृढ करण्यासाठी ती या बायकांना पंतप्रधानांच्या मुलाने आणलेली नसबंदीची योजना कशी क्रांतीकारी आहे आणि आपण आपल्या घरोघरीच्या नोकरचाकरांची अशी नसबंदी करून घेतली पाहिजे हे ठसवत राहते. तशातच आणिबाणी लागू झाल्याने परदेशी व्यापारावर निर्बंध आले आहेत.रोझ हे सगळे पाहते आहे. तिला लालाजी आणि रामची व्यापारातील सचोटी,मेहनत आठवते.आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांसमोर ती भूतकाळातल्या आठवणींची उजळणी करते. देवला अर्थातच ते आवडत नाही. आणि निशीला तर स्वतःचा आवाजच नाही.

निशीचे वडील किशोरीलाल एक मध्यमवर्गीय दुकानदार आहेत. फाळणीच्या काळात तेही लाहोरहून दिल्लीत स्थलांतरीत झाले आहेत. ते सचोटीने स्वच्छतागृहांसाठी लागणारे साहित्य विकण्याचे दुकान चालवत आहेत.त्यांना पाच मुलीच झाल्याने मुलींच्या हुंड्यापायी त्यांची सगळी जमा मिळकत खर्च झाली आहे.निशी ही त्यांची सगळ्यात धाकटी मुलगी सुदैवाने कोणताही हुंडा न देता रामसारख्या श्रीमंत व्यापाऱ्याची सून झाल्याने ते सुखावले आहेत. पण आणिबाणीच्या काळात छोट्या दुकानदारांवरही प्रचंड निर्बंध आले आहेत.ते सगळे पाळून दुकान चालवणे मोठे कर्मकठीण होऊन बसले आहे. अशातच पोलीस किशोरीलाल यांच्या दुकानात तपासणीसाठी येतात आणि त्यांच्या टेबलाच्या खणात आर.एस.एस. या संघटनेला देणगी दिल्याची पावती मिळाली म्हणून अटक करतात. दुबळे किशोरीलाल पोलीसांशी हुज्जत न घालता पोलीस कोठडीत जातात. तिथे त्यांना एक सायकली चोरणारा भुरटा चोर भेटतो. त्याला स्वतःलाच एक सायकल कारखाना सुरू करायची इच्छा आहे. तो सायकलींचे सुटे भाग जमवतो आहे. तर दुसरा एक तरूण मुलगा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणारा आहे आणि पोलीसांनी त्याला तो नक्षलवादी असल्याचा आरोप करत पकडले आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असूनही पोलीस त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. किशोरीलालांना पोलीस कोठडीत ठेवल्याची बातमी त्यांची मुलगी निशी हिला आठवड्याभरानंतर कळते. कारण किशोरीलाल यांच्या घरातील फोन कनेक्शन तोडले गेले आहे, वीज तोडली आहे आणि सिलेंडरही न मिळाल्याने तिची आई हतबल झाली आहे.निशी रवी कचरूशी रदबदली करून आपल्या वडिलांना जामिनावर सोडण्याची ऑर्डर काढून घेते. निशी आणि रोझ किशोरीलाल यांना पोलीस कोठडीतून घरी आणायला जातात. पण किशोरीलाल घरी यायला तयार होत नाहीत. नक्षलवादी असल्याचा खोटा आरोप करून अटक केलेल्या जखमी तरूणाला जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत मलाही जामीन नको अशी भूमिका ते घेतात.अखेर रोझ पोलीस सुपरिंटेंडशी बोलून दोघांची जामिनावर सुटका करवून घेते.

लालाजींच्या कुटुंबाचे जुने स्नेही कचरू हे काश्मिरी पंडित कुटुंब आहे. त्यांचा मुलगा रवी हा ऑक्सफर्डमध्ये उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे. तो भारताच्या प्रशासकीय सेवेत आहे आणि सत्तेपुढे हुजरेगिरी करण्याच्या वृतीमुळे तो पंतप्रधानांच्या मर्जीतला आहे.आणिबाणीच्या काळात तोच त्यांचा प्रमुख सल्लागार बनला आहे.नवे उद्योगधंदे सुरू करू इच्छिणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना त्यासाठी लागणारे परवाने मिळवून देताना रवी कचरू लाच घेतो. त्याला पंतप्रधानांच्या मुलाचा देशी गाड्यांचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणीतरी गुंतवणूकदार हवाच आहे.देव नेमका त्याच्या जाळ्यात येतो.हवेलीपासून जवळच बरीच मोठी जमीन त्याने शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत हस्तगत केली आहे.त्यांची घरे बुलडोझर वापरून तोडली आहेत.रोझ याबद्दल देवकडे व रवी कचरूकडे नाराजी व्यक्त करते.पण ते तिच्याकडे दुर्लक्ष करतात.

हस्तगत केलेल्या जमिनीवर ‘हॅपीओला’ ही थंड पेय बनवण्याची कंपनी सुरू आहे असे दाखवत तिथे मोटारीचे सुटे भाग गोळा केले जाऊ लागतात. गाडीची जुळणी करण्यासाठीची तज्ज्ञता नसतानाही देवने या धंद्यात हात घातलेला असतो.भविष्यात येऊ घातलेल्या देशी गाडीसाठी ग्राहकांकडून मागणी नोंदवली जाऊ लागते आणि देवकडे बेहिशोबी पैसा जमू लागतो. तो मॉरिशसला पाठवण्याचा त्याचा बेत आहे. रोझला निशीकडून याबद्दल अर्धवट माहिती मिळते आणि ती परखडपणे देवला त्याबद्दल विचारते.राम अंथरूणाला खिळलेला असताना देव त्याची खोटी सही करून राम आणि रोझच्या खात्यातून पैसे काढतोच आहे हेही रोझच्या लक्षात येते. त्याला त्यासंदर्भात समज देण्याची विनंती ती रवी कचरूला करते. देवला रोझचा राग येतो.संधी मिळताच तो भाडोत्री गुंडांकरवी रोझचा काटा काढतो.आणि स्वतः मंत्री झाल्यावर तर तो रवी कचरूलाही त्याच्या पदावरून हटवतो.

लालाजींच्या परिचयातले आणखी एक कुटुंब आहे ते केशव रानडे यांचे. केशव रानडे स्वतः प्रशासकीय सेवेत अनेक वर्षे नोकरी करून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी काश्मिरी ब्राह्मण कुटुंबातील आहे.रानडेंना किरण आणि सोनाली अशा दोन मुली आहेत. किरणचे लग्न झाले आहे तर सोनाली प्रशासकीय सेवेत नोकरी करते.रवी कचरूची आई ही केशव रानडेंच्या बायकोची भाभी आहे.या नात्यामुळे रवी कचरू आणि रानडेंच्या दोन्ही मुली परस्परांचे लहानपणापासूनचे दोस्त आहेत.

  केशव रानडे मूळचे महाराष्ट्रातले आहेत.अतिशय निष्ठेने त्यांनी ब्रिटीशांची सत्ता असल्यापासून शासकीय नोकरी केली आहे.आणिबाणीच्या काळातच ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त होतात आणि दुर्दैवाने लौकरच निधन पावतात. त्यांची डायरी त्यांची धाकटी मुलगी सोनाली हिला मिळते. ती वाचल्यावर तिला आपल्या वडीलांचा सगळा भूतकाळ उलगडतो.

केशवचे  वडीलही ब्रिटीश कारकिर्दीत शासकीय सेवेत होते, आधुनिक विचारांचे होते.सतीबंदीचा कायदा होऊन काही वर्षे झाली असली तरी आपल्या सभोवतीच्या प्रतिष्ठीत कुटुंबात आजही विधवांना सती जायला भाग पाडले जाते हे केशवच्या वडिलांनी पाहिले होते आणि त्याबद्दल आपला विरोधही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या सनातनी कुटुंबात त्यांना शत्रूच जास्त होते. त्यांचे अकाली निधन नैसर्गिक होते की ती हत्या होती हे लहानग्या केशवला कधीच कळले नव्हते.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावांनी मालमत्ता मिळवण्याच्या दुष्ट हेतूने केशवच्या आईला सती जाण्यास भाग पाडले होते.सुदैवाने केशवच्या वडिलांचा मित्र आणि त्यांच्या आधुनिक विचारांची कदर  असणारा ब्रिटीश अधिकारी  मिस्टर टिमन्स   याने केशवला आश्रय देऊन त्याला परदेशात शिकण्याची सोय करून दिल्याने तो प्रशासकीय सेवेत शिरू शकला होता.केशवचे विचारही त्याच्या वडिलांप्रमाणेच आधुनिक होते.लोकशाही व स्वातंत्र्यावर त्याची श्रद्धा होती. परंतु निवृत्तीच्या वयात भारतात लादली गेलेली आणिबाणी केशव रानडेंना अस्वस्थ करते.दुर्दैवाने निवृत्तीनंतर लगेचच त्यांचे निधन होते.

 केशव रानडे यांची धाकटी मुलगी  सोनाली लंडनमध्ये उच्चशिक्षण घेऊन भारतात आली आहे आणि तीही प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे.तिच्यावरही वडिलांचे निष्ठेने काम करण्याचे संस्कार आहेत.नेहरूंच्या काळापासून भारताचे धोरण परकीय गुंतवणूक टाळून देशी उद्योगांना चालना द्यायचे हे आहे.आणिबाणीच्या काळात मात्र हॅपीओला नावाची थंड पेय निर्मिती करणारी कंपनी भारतात गुंतवणूक करू पाहते. सोनाली त्यांना परवानगी नाकारते तेव्हा तिची तडकाफडकी बदली केली जाते.या बदलीमागे तिचा एकेकाळचा ऑक्सफर्डमधला सहाध्यायी व प्रियकर रवी कचरू हाच आहे हे कळल्यावर सोनाली अस्वस्थ होते. परदेशात शिकत असताना साम्यवादाच्या गप्पा मारणारा रवी सत्तेच्या जवळ गेल्यावर एवढा बदलू शकतो हे तिला आश्चर्यकारक वाटते. केशव रानडे आणि सोनाली दोघांनाही बॅंकाचे तडकाफडकी झालेले सरकारीकरणही पटलेले नाही. ‘गरीबी हटाव’च्या नावाखाली सरकारी बॅंकांतून टॅक्सीचालक वा अन्य सर्वसामान्यांना माफक व्याजदराने कर्जवाटप करणे हे फक्त सत्तेत राहण्यासाठी दाखवलेले आमिष आहे हे सोनाली व तिचे वडील केशव यांना खटकते.पण त्यांच्यासारख्यांना विरोध नोंदवण्याची संधीही कोणी देत नाही.भ्रष्ट व्यवस्थेबद्दलच्या विरोधी मतांमुळे सोनालीला प्रशासकीय सेवेतून बाहेरच पडावे लागते.स्वतःची मोठी बहीण किरणशी आणि मेहुणा नीलशी बोलताना पदोपदी सोनालीला विसंवाद जाणवला आहे.ते दोघे आणि त्यांचा मित्रपरिवार सोनालीला ढोंगी वाटतो.आपण जो विचार करतो आहोत तो आपल्या वडिलांशिवाय   घरातील कुणालाच कळत नाही ,कळून घ्यायचा नाही हे जाणवून सोनालीची कोंडी होते. खेरीज ‘तू अविवाहीत आहेस,तुला मुलबाळ नाही’ असे म्हणून दरवेळी होणारी हेटाळणीही सोनालीला अस्वस्थ करते. अशावेळी फक्त रोझ आपले विचार , आपल्या भावना समजू शकते हे तिला माहीत आहे. अगदी ती ऑक्सफर्डला शिकत असतानाही रोझने तिचा आणि रवी कचरूमधील विसंवाद समजून घेतला होता हे सोनाली विसरू शकलेली नाही.

रोझलाही आपल्या मनातील अस्थिरता, भय व्यक्त करण्यासाठी सोनालीच जवळची वाटते.रोझच्या मृत्यूनंतर सोनाली राम सूर्या यांच्या हवेलीवर पोहचते तेव्हा रोझ दारूच्या नशेत रात्री भग्न कबरीकडे गेली आणि तिथल्या विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला असे देव तिला सांगतो.निशीच्या बोलण्यात रोझ रामच्या कोमात जाण्यामुळे निराशाग्रस्त झाली होती आणि तिने स्वतःच तिचे आयुष्य संपवले असावे असे येते.या दोन्ही कारणांत काही एकवाक्यता नाही आणि तथ्यही नाही हे सोनालीला जाणवते.रोझ दारू प्यायली तरी स्वतःचा तोल जाऊ देणारी नव्हती की निराशेने आत्महत्या करणारीही नव्हती हे सोनालीला माहीत आहे. त्यामुळे लालाजींच्या घरातील जुना नोकर कुमारशी ती बोलते आणि खरी गोष्ट भग्न कबरीतील भिकाऱ्यालाच माहीत असणार हे कुमारचे बोलणे ऐकून ती त्या भिकाऱ्याला गाठते. भिकारी रोझला काही गुंडांनी डोक्यावरून पोतं घालून बेशुद्ध केले आणि विहिरीत टाकले हे सत्य सांगतो. हे गुंड देवच्या सांगण्यावरूनच रोझची हत्या करायला आले असणार हे सोनालीला लक्षात येते. मालमत्ता आणि सत्ता माणसाला किती क्रूर बनवते हे पाहून सोनाली अवाक होते.

भिकाऱ्यालादेखील देवचे गुंड शोधून काढतील व मारतील अशी भीती असल्याने सोनाली भिकाऱ्याला स्वतःकडे घेऊन जाते. त्याच्यासाठीचे कृत्रिम हात रोझच्या सांगण्यावरून तिने करून घेतले आहेत.सोनाली पुनःपुन्हा रोझच्या आठवणी जपत भग्न कबरीजवळ जात राहते. रोझची हत्या पोलिसांत नोंदवली न गेल्याने विस्मृतीतच जाते.देव मात्र मंत्रीमंडळात स्थान मिळवतो. रवी कचरूने रोझच्या म्हणण्याखातर एकदा देवला खोट्या सह्या करून रामच्या खात्यातील पैसे काढणे चुकीचे आहे हे सांगितले असल्याने देव संधी मिळताच रवी कचरूला त्याच्या पदावरून खाली आणतो. तेव्हा रवी सोनालीला भेटायला येतो आणि आपल्याला तिच्यातील स्वतंत्रपणाचे तेज कायमच आवडले होते हे कबूल करतो.पण आता खूपच उशीर झालेला आहे.

लंडनहून मार्सेला व तिचा नवरा रामला भेटायला  दिल्लीत येतात. त्यांना रोझबद्दल कळते आणि रामची अवस्था पाहून यापुढे तो आपल्याला व्यवसायात मदत करू शकणार नाही याची जाणीव होते. सोनालीबद्दल रोझने कधीतरी सांगितलेले असल्याने ते तिचा शोध घेतात आणि १७व्या शतकातील भारताचा शोध घेऊन त्याबद्दल एक प्रकल्प करण्याचा प्रस्ताव सोनालीसमोर ठेवतात.सोनाली सुरूवातीला नाही म्हणते पण नंतर तिला अशा प्रकल्पाबद्दल तिच्या मनात खूप ओढ असल्याचे लक्षात येते.विशेषतः असा १७व्या शतकातील इतिहास जेव्हा सोनाली वाचू लागते तेव्हा अकबराच्या काळात आपला देश किती धर्मनिरपेक्ष होता,विवेकाने विचार करणारा होता,सामान्य माणसांच्या सुखासमाधानाचा विचार करणारा होता आणि जगात त्याची ख्याती होती हे वाचून सोनालीला अभिमान वाटतो.अशा सर्वसमावेशक संस्कृतीचा इतिहास असलेल्या देशाचा भावी काळही उज्ज्वलच असेल असा आशावाद तिच्या मनाला उभारी देतो. आपणही आपल्या मनातील खऱ्या ऊर्मीं ऐकून रोझसारखेच जीवन जगले पाहिजे …ते असुरक्षित असले तरी तेच आपल्याला खरे समाधान देऊ शकेल असे सोनालीला वाटते. आणिबाणी कायम असू शकत नाही,ती कधीतरी संपेलच आणि आपल्याला जगण्याची नवी दिशा मिळेल ही आशा सोनालीला सुखावून जाते.

‘रिच लाईक अस’ मधील कथासूत्रे-

‘रिच लाईक अस’ या कादंबरीचे हे गुंतागुंतीचे, प्रदीर्घ कथानक व त्यातील उपकथानके लक्षात घेतली की खालील काही कथासूत्रे आपल्याला गवसतात.

  • स्वतंत्र भारतातील श्रीमंत वर्गाचा चंगळवाद,त्यांची आत्मकेंद्रीत वृत्ती आणि ढोंगीपणा लेखिकेला दाखवायचा आहे.पैसा कमावण्यासाठी कोणतीही मेहनत न करणारेही बापकमाईवर, वडिलोपार्जित पैशांवर ऐषोआरामात जगणे हा आपला हक्कच आहेत असे समजत असतील तर खरी समता येणारच कशी असा प्रश्न लेखिकेला विचारायचा आहे. अशावेळी जमिनदारी नष्ट करणारे कायदे केले काय , ‘गरीबी हटाव’ सारख्या घोषणा केल्या काय आणि बॅंकांचे सरकारीकरण करून त्यातून कमी व्याजदरात गरीबांना कर्ज देऊ केले काय अशाने गरीबी कशी दूर होणार? श्रीमंतांना मनातूनच आपली श्रीमंती ही कामगारांच्या किंवा कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणातून आलेली आहे हे जर जाणवले नाही तर गरीबी मूळातून दूर होऊ शकेल का ? असे लेखिकेला ‘रिच लाईक अस’ या कादंबरीतून विचारायचे आहे.
  • ब्रिटीशांनी शिक्षणातून आधुनिकवादी विचार,विवेकवाद रूजवला. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांनी समाजसुधारणेसाठी चळवळी करून कायदे संमत करून घेतले.महात्मा गांधींनी अस्पृष्यता निवारणाची चळवळ राबवली.असे असूनही भारतातील जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रियांविषयीच्या क्रूर रूढी-परंपरा  का संपू शकलेल्या नाहीत ?असा प्रश्न लेखिकेला उपस्थित करायचा आहे.
  • भारतातील घरंदाज, श्रीमंत कुटुंबे असोत की सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबे असोत कोणालाही पुरूषप्रधान कुटुंबव्यवस्था अजून का संपवता आलेली नाही? हाही प्रश्न लेखिकेला ‘रिच लाईक अस’ या कादंबरीतून उपस्थित करायचा आहे.विशेषतः सत्तेच्याविरूद्ध जाणाऱ्या स्त्रियांना समाज गायब करतो,त्यांची सीतेसारखी शोकांतिका करतो आणि ‘त्यांना भूमीने गिळले’ यासारखी नवी मिथके रचतो असे निरीक्षण लेखिकेने नोंदवले आहे.
  • स्वतंत्र भारतातील सर्वसामान्यांनाही सुखा-समाधानाने जगता येईल असा जो स्वदेशीचा मंत्र गांधीजींनी दिला होता तो प्रत्य़क्षात यशस्वी का ठरला नाही ?खेड्यांपेक्षा शहरांनाच महत्त्व का आले ?परकीय गोष्टींचे व परकीय भांडवलाचे आकर्षण व गरज भारतीयांना का वाटत राहिली? असाही प्रश्न लेखिकेला उपस्थित करायचा आहे.
  • स्त्री-पुरूषांचे खरे प्रेम आणि परस्परांवरचा विश्वास, निष्ठा या गोष्टी एखाद्या कपोलकल्पित गावासारख्या (‘सिंथेरा’या गावाचा संदर्भ कादंबरीत आहे) केवळ काल्पनिकच असतात का ? असाही प्रश्न ‘रिच लाईक अस’ च्या कथानकातून हळूहळू ठळक होत जातो.

एकंदरीत, ‘रिच लाईक अस’ च्या लेखिकेला समाजपरिवर्तनाबद्दल बोलायचे आहे.  ज्या देशाचा इतिहास सर्वसमावेशकतेचा,शांततापूर्ण सहजीवनाचा आहे आणि अहिंसेच्या मार्गाने जाऊन ज्या देशातील अबालवृद्धांनी आपले स्वातंत्र्य खेचून आणले आहे त्या देशातील काही अनिष्ट गोष्टी कधीच बदलू शकणार नाहीत इतक्या दृढ कशा असू शकतात ? की विवेकाने, जाणीवपूर्वक  प्रयत्न केले तर त्या बदलू शकतात  असा मूलभूत प्रश्न ‘रिच लाईक अस’ या कादंबरीतून नयनतारा सेहगल यांना उपस्थित करायचा आहे.हा बदल शिक्षण,रोजगार संधी या मार्गाने गरीबांकडून श्रीमंतांकडे झाला पाहिजे हे खरे असले तरी त्याहीपेक्षा तो श्रीमंताकडून गरीबांकडे झाला पाहिजे असे लेखिकेला म्हणायचे आहे. ‘रिच लाईक अस’या शीर्षकातून श्रीमंतांची जी दर्पोक्ती दिसते ती कधी संपणार? गरीबांनी ‘आमच्यासारखी मेहनत करावी आणि श्रीमंत व्हावे’ असे जे श्रीमंतांचे म्हणणे असते ते लेखिकेला खटकते आहे.असे म्हणणारे अहंकारी असतात आणि त्यांना गरीबांच्या परिस्थितीचे,त्यातील अडथळ्यांचे काहीच भान नसते.श्रीमंती ही केवळ मेहनतीमुळे येते का? की बहुतेकवेळा ती कष्टकऱ्यांच्या शोषणातूनच येते ? हे आत्मकेंद्री वृत्तीचे श्रीमंत स्वतःपलीकडे जाऊन इतरांचा सहानुभूतीने कधी विचार करणार का,गरीबांचे शोषण कधी संपवणार का? असे  मूलगामी प्रश्न ‘रिच लाईक अस’या कादंबरीला  विचारायचे आहेत.

या प्रश्नांचे गांभीर्य तुम्हाला जाणवत असेल तर ‘रिच लाईक अस’ ही कादंबरी तुम्ही मूळातून वाचावी अशी विनंती आहे.पुढील ब्लॉगमध्ये ‘रिच लाईक अस’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण आपल्याला करायचे आहे.

-गीता मांजरेकर

*******************************************************************************************************************************************************************

2 प्रतिसाद

  1. कादंबरी फार गुंतागुंतीची असली‌ तरी प्रत्येक व्यक्तीरेखेचे स्वभाव‌, प्रत्येकाची विचार पद्धती, परिस्थितींमुळे त्यांच्या जीवनात आलेले चढ उतार‌ आणि इतरांना मदतीचा हात देणं हे सर्व काही कादंबरी सांगून जाते.

    Liked by 1 person

    1. वाच तू मूळ कादंबरी तुला वेळ मिळेल तेव्हा चैतन्या!

      Like

यावर आपले मत नोंदवा