मागील ब्लॉगमध्ये आपण नयनतारा सेहगल यांनी लिहिलेल्या ‘दी डे इन शॅडो’(१९७१) या कादंबरीतील कथासूत्रांची आणि कथानकाची चर्चा केली.आज आपण ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून त्यातून लेखिकेची कोणती अंतर्दृष्टी दिसून येते ते पाहणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटत असेल त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे कथन तृतीय पुरूषी आहे.त्यामुळे व्यक्तिरेखांच्या मनात चाललेल्या उलथापालथीदेखील कथनातून उलगडल्या गेल्या आहेत. ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीच्या कथानकात सिमरीत आणि राज या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्याखालोखाल सुमेरसिंग आणि रामकिशन या अन्य महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा ठरतील.या व्यक्तिरेखांच्या मनोवकाशात काय घडते ते कथनातून कळते.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीला स्वातंत्र्योत्तर काळातील दुसऱ्या-तिसऱ्या दशकाची  राजकीय पार्श्वभूमी आहे. दिल्लीतील उच्चभ्रू मंडळीं व राजकीय व्यक्तींचे राहणीमान,त्यांच्या मेजवान्या, गाठीभेटी हे वातावरण या कादंबरीतील सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणून ठळकपणे जाणवते. कादंबरीचा प्रारंभ एका बड्या पेट्रोलियम कंपनीने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये घडणाऱ्या गाठीभेटींच्या वर्णनाने होतो.या पार्टीला सिमरीत ही राज गर्गची मैत्रीण म्हणून हजर आहे. राज गर्ग हा ख्रिस्ती धर्मीय आहे.तो  संसदेतील अपक्ष खासदार आहे. सुमेरसिंग हा पेट्रोलियम खात्याचा तरूण राज्यमंत्री या पार्टीचा केंद्रबिंदू आहे.अशा पार्ट्या सिमरीतला नवीन नाहीत. तिचा नवरा सोम दिल्लीतील एक बडा उद्योगपती असल्याने तिला अशा पार्ट्यांमध्ये वावरण्याची सवय आहे. पण आता ती सोमपासून घटस्फोट घेऊन विभक्त झालेली आहे आणि जणू तिची ओळखच हरवली आहे. खरं तर, सिमरीत एक लेखिका आहे. पार्टीतील काही मंडळी तिला एक लेखिका म्हणून ओळखतात परंतु तरीही सिमरीतला या पार्टीत हरवून गेल्यासारखे वाटते आहे.याउलट राज मात्र अतिशय मोकळेपणाने पार्टीत वावरतो आहे. सिमरीतने घटस्फोट घेतला असला तरी आपले आयुष्य जगायचे थांबवू नये उलट आक्रमकपणे नवीन आयुष्याला सामोरे जावे असे राजला वाटते. त्यासाठीच त्याने सिमरीतला या पार्टीत बोलावले आहे. नवीन लोक भेटतील, ओळखीपाळखी होतील तर सिमरीतला पुन्हा एकदा जगण्याचा सूर गवसेल असे राजला वाटते आहे. पण सिमरीत काही पार्टीत फारशी खुलत नाही.घरी आपली मुले वाट पाहत असतील हे देखील सतत तिच्या मनात आहे.

सिमरीत डिफेन्स वसाहतीतील भाड्याच्या घरात आपल्या चार मुलांना घेऊन नुकतीच रहायला आली आहे. तिचे बरेच सामान  अजूनही  खोक्यांतून बाहेर आलेले नाही.अव्यवस्थीतपणा हा सिमरीतचा स्वभाव नाही पण नाइलाजाने तिला या भाड्याच्या अव्यवस्थीत घरात रहावे लागते आहे. त्यामुळे एकप्रकारची असुरक्षितता, असमाधान तिच्या मनात आहे. तिचा मोठा मुलगा ब्रिज जो साधारण सतरा वर्षांचा आहे त्याने आईसाठी घरमालकाच्या बागेतील गुलाबाच्या वेलीवरची कळी त्याला न विचारताच तोडून आणली आहे. ब्रिजचे वागणे सिमरीतला पटत नाही. ब्रिजला आईच्या मनातले भय अनाकलनीय वाटते. मालक काही म्हणाला तर मी त्याला धडा शिकवेन असे ब्रिज म्हणतो.त्याला व्यायामाची आवड आहे आणि शाळेतही आपण मित्राला कसे मारले हे तो सिमरीतला गर्वाने सांगतो.तेव्हा सिमरीतला मात्र काहीतरी वेगळेच वाटते. त्याबद्दल कथक म्हणतो-

“अशाप्रकारे शरीर कमावले की त्या शक्तीचा इतरांवर  प्रयोग करून पाहण्याची इच्छा होते. आणि त्यात त्याचा तरी काय दोष म्हणा.हजारो वर्षे या पृथ्वी नामक ग्रहावर कोणी शांतीला युद्धाएवढे उदात्त केले आहे का ?ती तिच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाचे शरीर आणि बळ पाहात राहिली. तिला त्याच्या जाणिवांना स्पर्श करून काही वेगळे, शाश्वत मानवी मूल्य त्याच्या मनावर बिंबवावे असे मनोमन वाटत होते.तिला असे वाटत होते की ब्रिजला अशा गोष्टीची जाणीव करून द्यावी की ज्यावर हक्क दाखवता येणार नाही पण त्यावर प्रेम आणि त्याची सेवा जरूर  करता येईल.या तरूणांकडे किती कमी स्वप्न आहेत .. त्यांनी सर्व काही अनुभवले आहे, त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांनी सर्वांवर विजय मिळवला आहे…”

सिमरीतला आपल्या संसाराच्या आठवणीने वाईट वाटते पण तिला माहीत आहे की सोमला तसे अजिबात वाटत नसणार. तिला सोमच्या आणि स्वतःच्या नात्याबद्दल काय वाटत होते हे कथनातून वाचकांसमोर येते.—

“हृदयाचे ठोके एकमेकांपासून तुटक होत जावे तसा संबंध कसा पुढे जात राहील हे आठवणे खूप दुःखद होते.मानवी कृतींनी लग्नाच्या नात्याचा तंतू विरघळू शकतो पण त्याची अंतःस्थ रचना तशीच टिकून राहते. आणि सापळे सहस्त्र वर्षे टिकून राहतात.फक्त एकत्र राहणे, रोजची दैनंदिन कामे करत राहणे यातून तो न संपणारा चिवट टिकाऊपणा येतो नात्यांना. पण प्रश्न हा पडतो की खरंच अशा नात्यात कोणी एकमेकांवर प्रेम करत असतं का? तिच्यासाठी संबंध पुढे सरकत राहिला तो तिच्या मुलांमुळे.सोमसाठी तो कदाचित घरातील फर्निचरमधून पुढे सरकला असावा असे सिमरीतला वाटले.त्याने ते सगळे बाहेर फेकून दिले होते आणि नवे फर्निचर आणून नव्याने सुरूवात केली होती.जसे तो जुने कपडे,जुनी पत्रे, जुन्या आठवणी,जुने मित्र सहज फेकून देत असे.नव्या अस्तित्वासाठी तो सगळे नवे गोळा करू शकत असे.जणू काही भूतकाळ अपराधीपणात भिजलेला असे आणि त्याने त्यावर बोळा फिरवून तो पूर्ण पुसून टाकण्याची शपथ घेतलेली  असे.सोमला अनेक ओळखींशी सामना करावा लागतच नाही.आणि तशा शक्यतांबद्दल त्याला दुःखही वाटत नव्हते.तो त्या क्षणी जो होता तो होता.भूतकाळ नाही, त्याचे चुरलेले कणही नाहीत, की ज्यावर दुसरे काही नवे उगवून येईल असे भूतकाळाचे खतही नाही.सिमरीतला आश्चर्य वाटले की सोम आठवणींना कसे नष्ट करत असेल. तो खिळे ठोकून आठवणींना शवपेटीत टाकून देतो आणि कुजेपर्यंत त्यांना तिथेच ठेवून देतो की काय ?”

सिमरीत मात्र कोणत्याच आठवणी विसरू शकलेली नाही.तिने घटस्फोट घेण्याचे ठरवले त्यापूर्वीची रात्र तिला स्पष्ट आठवत राहते. सोम आणि त्याचा परदेशी भागीदार व्हेटर फार आनंदात रात्री उशीरा घरी परतले होते. आल्यावरही ते आपला आनंद साजरा करायला दारू पित बसले होते आणि त्यांनी सिमरीतलाही आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी दारूचा प्याला दिला होता. सिमरीतला कळले होते की त्यांना आनंद झाला होता तो त्यांना नवीन प्रकारच्या बंदुकांची निर्मिती करण्यासाठी कारखाना उभारायला परवानगी मिळाली होती याचा. सिमरीतला मात्र वेगळेच प्रश्न पडले होते. वेगवेगळे देश त्यांना हवी असलेली शस्त्रास्त्रे कशी निवडतात?  शस्त्रास्त्रांची पण जाहिरात का करत नाहीत अन्य अनेक विकाऊ गोष्टींप्रमाणे? असे तिला वाटते.पार्टीतून बाहेर पडून सिमरीत आपल्या खोलीत गेली तेव्हा तिच्या मनात काय चालले होते याबद्दल कथक लिहितो..

“आपल्याला थरथरायची आणि हलून जाण्याची गरज नाही ती स्वतःला समजावत होती.त्यापेक्षा या शहरात, कधी तर खालच्या रस्त्यावर घडणाऱ्या घटना आठवाव्यात. रस्त्यावर वाढणारी ,भटकणारी मुलं..दिवसेंदिवस भुकेली राहणारी मुलं.रात्री झोपण्यापुरता देखील निवारा नसलेली कित्येक  माणसे.त्यांना कोणतीही भीती नाही युद्धाची.मग आपण आपली कल्पनाशक्ती का ताणावी की सोम आणि व्हेटरने बनवलेला बॉंम्ब एखाद्या गर्भार स्त्रीला तिच्या गर्भासकट संपवून टाकेल..लहान मुलांचे धपापते विखुरलेले तुकडे. ते देऊन नवीन फर्निचर, पडदे,रेशमी उशीची कव्हरे घेता येतील.पाळण्यातील मुलांना सोमसारख्या पुरूषांची भीती वाटली पाहिजे सिमरीत स्वतःशीच म्हणाली.पण मी या सगळ्या गोष्टींसाठी रडत नाही आहे, यापूर्वी कधी रडले नव्हते.तो ‘सोम’ आहे!”

‘सोम’ – ज्याच्यावर आपण तरूण वयात प्रेम करून पालकांची परवानगी नसतानाही बंडखोरी करत विवाह केला तो इतका कसा बदलला की तो तसाच होता पण आपण त्याला नीट ओळखू शकलो नाही? आपण फसलो,प्रेमात आंधळे झालो याबद्दल सिमरीतला खंत वाटते.सोमच्या या भयंकर विध्वंसक रूपाबद्दल सिमरीतला रडू येते. पण सोमला मात्र त्याचे काहीच वाटत नाही हे तिला जाणवते.सिमरीतने रडू नये हे सांगताना आणि तिचे रडणे अनाकलनीय आहे हे सांगतानाही सोमच्या आवाजात तिला प्रेम जाणवलेले नाही. उलट तिला त्याच्या आवाजात जाणवला आहे तो एकप्रकारचा दबलेला उपहास  जणू तो आपल्याला, आपल्या मूल्यांना खिजवतो आहे  असे तिला  वाटते आहे.पैसा आहे आपल्याकडे तर आपण जगभारात कुठेही फिरायला जाऊ शकतो, पूर्ण घर एयरकंडिशनर लावून थंडगार करू शकतो ,तुला काय हवे आहे तेवढे सांग फक्त  हे सोमचे विचारणे सिमरीतला निरर्थक वाटते. त्यावेळी तिच्या मनातला आवाज कथनातून वाचकांसमोर येतो.-

“मला असं जग हवंय की ज्याचा पोत करूणेचा असेल. तिला वाटले, असं जग नक्कीच आहे.कधीतरी लोकांना पृथ्वी सपाट वाटली होती पण नंतर ती गोल आहे असे त्यांना कळले होतेच ना..जर पृथ्वीचा खरा आकार लक्षात येऊ शकतो तर तिचा (नैसर्गिक) पोतही नक्कीच लक्षात येऊ शकेल.”

पण सोमचे म्हणणे आहे की जग नेहमीच हिंसक होते आणि आजवर तिने जर ते स्वीकारले होते तर आताच तिला अशा जगाचे वाईट का वाटावे. सोमच्या या म्हणण्याचा प्रतिवाद सिमरीत करत नसली तरी तिच्या मनात काय येते ते कथनातून वाचकांना कळते.-

“तेच तर आहे ना…तिला वाटले.जेव्हा सगळे जग मरत असते तेव्हा काहीच बिघडत नाही,.  आपण मरू लागतो तोपर्यंत  लक्षात देखील येत नाही ते आपल्या.आता तिला अशी जागा हवी होती जी शांत,थंड असेल आणि तिथे स्वतःच्या प्रगतीखेरीज वेगळे एखादे ध्येय असेल. ही भावना तिच्या मनात  अनेक वर्षांपासून दबा धरून  असावी आणि  आता त्या भावनेने तिच्या मनाची पकड घेतली होती.”

सोम तिच्या शेजारी येऊन निजला आणि तिच्या शरीराशी जवळीक करू लागला तरी तिला शारीर सुखाची कोणतीच इच्छा होईना.तिच्या तनमनाच्या या स्थितीबद्दल विचार करताना सिमरीतच्या मनात काय चालले होते ते कथनातून कळते.-

 “…सेक्स हे सेक्स कधीच नसते ..जसे अन्न हे फक्त अन्न कधीच नसते.आजचे जेवण कितीतरी अधिक होते नेहमीच्या जेवणापेक्षा ..एक देखणा सोहळाच,अगदी जेवणाच्या टेबलावरील गुलाब देखील एक भाग होता जेवणाचा..भूकेची कड ओलांडली की त्यापुढे अन्न हे अन्नापेक्षा अधिक काहीतरी असावे लागते.एका शारीर निकडीपलीकडे सेक्स गेले की त्याला त्याची म्हणून एक वेगळी दृष्टी असते…. एका कोवळेपणाची,एका विनोदीपणाची.. शारीर कृतीपेक्षा वेगळी.सेक्स हा वादविवाद असू शकतो किंवा एखाद्या समस्येवरील चर्चाही…सिमरीतला वाटले की यापुढे सोमची ध्येये आपली मानून त्याचे अनुसरण ती नाहीच करू शकणार.ही अशक्यता तिच्या नसानसातून संपूर्ण शरीरभर पसरताना तिला जाणवली.तिच्या मनातील इच्छेच्या गर्भालाच ती अनिच्छा जाऊन भिडली आणि इच्छेचे कारंजे कोरडे पडले.”

सिमरीतचा नकार हा जणू आपला अपमान आहे असे सोमने मानले, तो चिडला.आपण एकमेकांशेजारी नुसते पहूडू शकत नाही का, आपण एकमेकांकडे भाऊ-बहीण म्हणून किंवा मित्र म्हणून पाहू शकत नाही का असे सिमरीतला वाटले. पण सोमला तिचे हे वाटणे समजू शकले नाही आणि त्यांच्यातील वैवाहिक नाते संपलेच.

सोम व्यवसायानिमित्त परदेशात निघून गेला आणि एके दिवशी सिमरीतची पावले अभावितपणे राजच्या घराकडे वळली. राज काही तिचा खूप वर्षांपासूनचा परिचित नव्हता. तिने नुकतेच त्याचे भाषण एका सभेत ऐकले होते. सभेतील अन्य वक्ते जे बोलले त्याच्या अगदी विरूद्ध सूरात तो बोलला होता आणि त्याचे ते बोलणे सिमरीतला प्रांजळ वाटले होते.राजला  आपली व्यक्तीगत समस्या तिने सांगितली नाही पण तिच्या मुलीबद्दल आणि मुलगी ज्या सहजतेने तिच्या मित्राशी पत्रव्यवहार करते आहे त्याबद्दल एक आई म्हणून तिला वाटणाऱ्या चिंतेबद्दल सिमरीत बोलत राहिली.तेव्हा राजने म्हटले की-

 “तुमची संस्कृती बदलते आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे.पण तुमच्या (हिंदू) संस्कृतीत काय कमी असेल तर ते म्हणजे परिवर्तनाची इच्छा.काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची सकारात्मक इच्छा.तुम्हाला ती इच्छा खणून वर काढली पाहिजे आणि तुमची तत्वे तुम्हाला तसे करू देत नसतील तर दुसरी ,(तुम्हाला आत्मशोधाचे स्वातंत्र्य देणारी) तत्वे तुम्ही शोधली पाहिजेत.संयम ही चांगली गोष्ट आहे पण आताच्या घडीला जेव्हा आपल्याला काही कृती करण्याची व त्याची जबाबदारी घेण्याची नितांत गरज आहे तिथे उत्कटता आणि धडाडीने काम करणेच उपयोगी ठरेल.”

सिमरीतला राजचे बोलणे एखाद्या तिऱ्हाइतासारखे आहे असे वाटले. तिने तसे त्याला म्हटलेही. तेव्हा तो म्हणाला की त्याच्यासारख्या अल्पसंख्याकांना( राज ख्रिस्ती धर्मीय आहे) आपली संस्कृती बाहेरून, अलिप्तपणे पाहता येते आणि त्यातील दोष न्याहाळता येतात. सिमरीतला मात्र त्याचे अल्पसंख्याक असणे काही वेगळी दृष्टी देऊ शकते असे वाटले नाही.राजला ते जाणवले. त्याच्या मनात त्याप्रसंगी काय विचार आले ते कथनातून वाचकांना कळतात-

“तिला हे कळणार नाही कारण ती तिच्या पूर्वजांमध्ये सुरक्षित आहे.तिचा विश्वास जो तिच्या हाडांहाडांत भिनलेला आहे तो तिला  ती जिथून आली आहे त्याची माहिती असल्याने आहे.तिच्यासारख्या हजारोंना (हिंदूंना) ही ओळख जणू त्यांच्या मनात खोलवर स्त्रवणाऱ्या स्त्रोतांतून जाणवते.कोणत्याही समस्येला ही माणसे (त्याच्याप्रमाणे विभक्त,दुभंग न होता) भिडतात ती एका विशिष्ट संस्कृतीच्या प्रकाशात.आणि तिथेच खरी अडचण असते. संस्कृती जर अपरिवर्तनशील,दार्ढ्य आलेली असेल तर अनेक समस्यांना ती समोरीच जात नाही.राजला वाटले एखादा हिंदू कधी एकेकटा त्याच्या समस्येला सामोरा जातो का ?हिंदूंना आपली व्यक्तीगत आणि खाजगी अशी भावना असते तरी का ?जी कोणत्याही व्यवस्थेशी म्हणजे कुटुंब,जात आणि दोन हजार वर्षांच्या पूर्वेतिहासाशी नाते जोडणारी नसेल?”

सोमपासून घटस्फोट घेतल्यावरही सोमने केलेल्या करारामुळे सिमरीतला भरपूर मनःस्ताप सहन करावा लागतो.अशावेळी तिचा थोरला मुलगा ब्रिज खरं तर तिचा आधार बनू शकला असता पण तसे घडत नाही.उलट ब्रिज त्याच्या स्वार्थासाठी वडिलांशी नाते जोडून ठेवतो. राजला वाटते की सिमरीत तिची समस्या ब्रिजला का सांगत नाही. तसे तो तिला विचारतोही. तेव्हा सोमने ब्रिजला घटस्फोटाच्या करारातील अटी समजावून सांगितल्या असतील असे तिने गृहीत धरले आहे हे त्याच्या लक्षात येते. राजला सिमरीतच्या या मानसिकतेबद्दल काय वाटते याबद्दल कथक जे लिहितो त्यात उपरोध आहे-

“सोम हा अधिक खरा आहे याबद्दल खरंच आश्चर्य वाटू नये. अगदी घटस्फोटाच्या करारातील त्याच्या हुकुमशाहीसह.एखाद्याला सावलीचे आकलन कसे होईल आणि तिचे काय करायचे ते कसे कळेल, अगदी ती सावली त्याची स्वतःची आई असली तरीही.संयम हा संस्कारांचा सर्वोच्च बिंदू असेल पण तो सगळ्या ऊर्जेला संपवून टाकणारा आहे.”

अनेक वर्षे केवळ सोमची सावली बनून राहिलेल्या सिमरीतची समस्या सोडवण्याच्या प्रयत्नांत सल्ला घेण्यासाठी राज त्याच्या वडिलांचे मित्र रामकिशन यांच्याकडे जातो.रामकिशन यांची पत्नी विनिता हिचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे आणि तेव्हापासून आपल्या जगण्यातील ऊर्जा संपली आहे असे त्यांनाही जाणवले आहे.राजचे वडील सुरेन यांची ऊर्जा वयाबरोबर कमी झाली नव्हती हे त्यांना आठवते. सुरेनचा आणि त्यांचा संवाद त्यांचा स्मरणात आहे.सुरेनचे म्हणणे असे की-

“ आपला समाज (हिंदू) इच्छेकडे पाठ फिरवणाऱ्याला फार आदरणीय मानतो.त्याग मला समजू शकतो. पण काहीवेळा तो चुकीचाही ठरतो.जर तुमच्या उजव्या हाताला गॅंगरीन झाला आहे आणि तुम्हाला तो कापावा लागला तर तुम्ही आजार काढून टाकता हे पटू शकते. परंतु तुमच्या उजव्या हाताने कोणी तरी चुकतो आहे त्याला रागाने मारले किंवा काही गुन्हा केला तर तो कापून टाकणे हे निश्चितच चुकीचे ठरेल कारण उजवा हात त्या प्रसंगानंतर विचारपूर्वक स्वतःला बदलवून चांगल्या गोष्टी करू शकतो हे तुम्ही नाकारता आहात. म्हणजे केवळ त्याग हा सदगुण ठरणार नाही.पण हे लक्षात घेतले जात नाही आणि हा देश चुकतो.जेव्हा जबाबदारीने काही करण्याची वेळ येते तेव्हा आपण निष्क्रिय राहतो.समस्यांना सामोरे जा आणि ठाम उभे रहा.”

माणसं मित्रत्वाच्या नात्याने जोडली गेली पाहिजेत असे सुरेनला वाटे.दोन माणसे अशी जोडली जातात तेव्हा केवळ माणसांची संख्या दुप्पट होत नसते तर अगण्य अशा काही गोष्टी देखील वाढत असतात.येशू ख्रिस्ताचा मृत्यू अनेकांवर परिणाम करणारा का ठरला असावा ?कारण त्याने अनेकांना प्रेमाने  जोडले होते ,त्यांची सेवा केली होती.

राज,सिमरीत जेव्हा जेव्हा रामकिशन यांना भेटतात तेव्हा तेव्हा तात्विक चर्चा होतात.एका चर्चेत रामकिशन म्हणतात-

“एकेकाळी जरी भारतीय गुलाम होते तरी ते स्वतंत्र असल्यासारखे जगले.त्यांनी गांधींच्या नेतृत्वाखाली  आपली मान कधी खाली झुकवली नाही, छाती बुलंद ठेवली आणि जगण्याची तृष्णा जागी ठेवली.आणि त्यातील एक ठिणगीही आज आपल्यात राहिली नसेल तर हा कसला चमत्कार म्हणावा..ते पुहा घडणार नाही ?”

रामकिशन यांच्या या बोलण्याने सिमरीतला आणि राजलाही नवी ऊर्जा मिळाली.

दैनंदिन वर्तमानपत्र वाचताना राजकारणाच्या झालेल्या अधःपाताने रामकिशन कैकवेळा उद्विग्न होत. हातातील वर्तमानपत्र खाली टाकून देत ते विचार करत राहात. अशावेळी त्यांच्या मनात चाललेले चिंतन कथक वाचकांपर्यंत पोहचवतो.-

“आता ती वेळ आली आहे किंवा नसेल तर तशी वेळ आणावी लागेल आणि राजकारणाला मागे सारावे लागेल. नवीन नेतृत्व अन्य व्यवसायातून पुढे यावे लागेल आणि ते विविध कार्यक्षेत्रातील व्यक्ती, प्रत्यक्ष श्रम करणारी जनता ,वर्गात शिकणारे विद्यार्थी, व्यवस्थापन क्षेत्रातील माणसांच्या श्रद्धांवर अवलंबून असेल.भारतीयांना आता अनुयायित्व पत्करायला राजकीय तारा नको आहे.त्यांना स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.बहुतेकांना तो त्यांच्या धर्मातून मिळेल.आपल्या नववर्षाच्या अंकाचा हाच विषय असावा असे रामकिशन यांना वाटले. हिंदूवादाने(Hinduism) आपल्या शिखरावरून खाली उतरून आता झोपड्यातील आणि कारखान्यांतील सामान्य माणसांच्या जगण्याची ऊर्जा आणि आशा बनले पाहिजे. तत्वज्ञानाला तोपर्यंत अर्थ येणार नाही जोपर्यंत ती जगण्याचा भाग बनत नाही.येशू ख्रिस्ताने जणू प्रेतांना जागवले होते.हिंदूवाद तोच चमत्कार आज घडवू शकेल.तो फक्त पोथ्या आणि कर्मकांडात अडकून न पडता हजारोंच्या कृतींचा पाया बनू शकेल…”

‘दी डे इन शॅडो’ ही केवळ सिमरीतची कहाणी नाही ती भारतातील राजकीय अधःपतनाचीही कहाणी आहे.सिमरीतने तिच्या प्रश्नाला भिडले पाहिजे हे तिला समजावताना रामकिशन राजकीय परिस्थितीबद्दलही भाष्य करताना दिसतात. ते सिमरीतला  सांगतात-

“जे जे चुकीचे आहे त्याबद्दल लढले पाहिजे.माणसाने हा संघर्ष सगळ्यात महत्त्वाचा मानला पाहिजे.तो प्रश्न हजारो वर्षांनंतर किंवा असीम काळाच्या ओघात कितीही नगण्य असो ‘आज’ जर तो तुम्हाला महत्त्वाचा वाटतो तर त्यासाठी प्राणपणाने झगडले पाहिजे. वैश्विकतेचा विचार करण्यापेक्षा वर्तमानाचा विचार आपण करणे श्रेयस्कर आहे हे हिंदू दर्शनांतून खोदून काढले पाहिजे.अशा संघर्षशीलतेचे घटक या मार्गात आधीपासूनच आहेत.कदाचित मौल्यवान हिऱ्यांसारखे काही काळासाठी ते खोल दबले गेले आहेत. आपल्याला ते खणून काढावे लागतील, त्यांना नवीन उजाळा द्यावा लागेल.हादेखील हिंदूवाद आहे हे सर्वांना समजून द्यावे लागेल.यातून ताकद मिळेल, यातून माणसे परस्परांना चिकटून राहतील आणि जे त्यांना पटत नाही त्यासाठी उसळून उठतील. गांधींच्या नेतृत्वाखाली आपण असेच उसळून उठलो होतो.त्यांनी अहिंसा हा मुद्दा घेतला . हिंदूवादातील सर्वात जुने मूल्य आणि संपूर्ण देशाला त्या मूल्याआधारे गांधींनी  संघर्षशील बनवले.कोणाला हे शक्य तरी वाटले असते का ?तू  आणि तुझ्या पिढीतील इतरांनी असे नवे मूल्य शोधले पाहिजे. कल्पनांची काहीच कमतरता नाही आपल्याकडे. अशी कल्पना शोधली पाहिजे की ज्यामुळे माणसाचे सत्व जागे होईल आणि मग अशक्य ते शक्य होईल.”

अशाप्रकारे ‘दी डे इन शॅडो’ या नयनतारा सेहगल यांनी लिहिलेल्या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करताना लेखिकेला एकूणच भारतीयांच्या कुंठीत मनोवस्थेबद्दल, समस्येला सामोरे न जाता निष्क्रीय राहण्याबद्दल बोलायचे आहे हे लक्षात येते.सिमरितची कौटुंबीक समस्या असेल की सुमेरसिंगासारख्या स्वार्थी राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली भ्रष्टाचाराची समस्या असेल त्याबद्दल ताठ मानेने, निधड्या छातीने आणि चिकाटीने झगडत राहणे आवश्यक आहे.हा संघर्ष अर्थातच अहिंसेच्या मूल्यावर आधारीत असेल. पण त्यासाठी स्वतःवर आणि माणूसकीवर श्रद्धा हवी. ती एखाद्या धर्माच्या तत्वज्ञानातून आलेली असली तरी चालेल. पण अश्रद्ध होऊन,निराश होऊन जाणे हे आपल्या संस्कृतीला साजेसे नाही असे नयनतारा सेहगल यांना आपल्या कादंबरीतून सुचवायचे आहे.

‘शॅडो’ -सावली हा शब्द लेखिकेने शीर्षकात अनेकार्थाने वापरला असावा. सिमरीतने सोमच्या सावलीसारखे स्वतःचे अस्तित्व विसरून राहणे असो की सर्वसामान्य भारतीयांचे आहे ती परिस्थिती स्वीकारून निष्क्रीयपणे जगत राहणे असो, हे सावलीतले जगणे कितीही सुरक्षित वाटले तरी अंतिमतः धोक्याचे ठरते असे लेखिकेला सुचवायचे असावे.

हा ब्लॉग तुम्हाला आवडला का ? नयनतारा सेहगल यांची व्यापक जीवनदृष्टी तुम्हाला जाणवली का? जरूर कळवा. पुढील ब्लॉगमध्ये नयनतारा सेहगल यांच्या आणखी एका कादंबरीचा परिचय आपण करून घेऊ.

-गीता मांजरेकर

********************************************************************************************************************************************************************

10 प्रतिसाद

  1. Interesting and helpful to the native speakers of research.

    Like

    1. Thank you Mythili for your prompt comment and kind words!

      Like

  2. हो, हा ब्लॉग आम्हाला आवडला. नयनतारा सेहगल यांची व्यापक द्रुष्टी आम्हाला जाणवली. आभारी आहे.पुढील कथानकासाठी उत्सुक..

    Like

    1. आभारी आहे चैतन्या! वाचत रहा …

      Like

  3. हा आणि आत्तापर्यंतचे सगळे ब्लॉग्ज खूप भावले. दर्जेदार साहित्य, त्यांची कथानके, त्यावरील आपले विवेचन आणि समीक्षा या सर्वांची बौद्धिक मेजवानीच!

    मनापासून धन्यवाद.

    Like

    1. आभारी आहे दीपाली! तुमच्यासारखे नियमित वाचणारे व दाद देणारे वाचक असले की लिहायला हुरूप येतो !

      Like

  4. खुप छान पद्धतीने विश्लेषण केले असल्याने कादंबरी ब्लॉग कादंबरी वाचायला प्रवृत्त करत.

    Like

    1. जरूर सवड मिळाली की मूळ इंग्रजी कादंबरीचे वाचन कर मानसी ..

      Like

  5. सुजाता अवसरमल उपारे अवतार
    सुजाता अवसरमल उपारे

    मॅडम,

    खूपच छान ब्लाॅग्ज. वाचायला प्रेरीत करणारं प्रभावी लेखन. मराठी भाषा आणि वाचन संस्कृती जपणारं दर्जेदार लेखन. उत्तम सादरीकरण.

    Like

    1. आभारी आहे सुजाता.नियमीत वाचत रहा.

      Like

Leave a reply to सुजाता अवसरमल उपारे उत्तर रद्द करा.