मागील ब्लॉगमध्ये आपण भारतीय इंग्रजी लेखिका नयनतारा सेहगल यांचा अल्पपरिचय आणि त्यांच्या कादंबऱ्यांबद्दल माहिती जाणून घेतली.आजच्या ब्लॉगमध्ये आपण नयनतारा सेहगल यांच्या १९७१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे कथानक आणि  कथासूत्रांबद्दल चर्चा करू.

ज्यांना हा ब्लॉग ऐकणे अधिक सोयीचे वाटते त्यांच्यासाठी ब्लॉगची ऑडियो फाईल सोबत जोडली आहे.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीच्या मुखपृष्ठावर प्रख्यात अमेरिकन लेखिका पर्ल बख यांनी नयनतारा सेहगल यांच्याबद्दल एक विधान केले आहे. ‘गुड अर्थ’ या कादंबरीसाठी पर्ल बख यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता हे लक्षात घेता त्यांनी नयनतारा सेहगल यांच्या कादंबरीची पाठराखण करणे किती प्रतिष्ठेचे आहे हे लक्षात येईल. पर्ल बख यांनी म्हटले आहे की ‘नयनतारा सेहगल या अत्यंत बुद्धिमान लेखिका आहेत.त्यांचे लेखन व्यामिश्र आणि प्रश्न विचारणारे आहे.’

नयनतारा सेहगल यांच्या ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे परीक्षण करताना ‘शिकागो सन टाईम्स’ या वर्तमानपत्रातील समीक्षकाने म्हटले आहे की ‘ही कादंबरी अनेक पातळ्यांवरून वाचता येते. ती एका बाजूला सिमरीतबद्दल आहे. सिमिरीत एका सावटातून बाहेर येते आणि जीवनातील आनंदाचा मार्ग शोधते हे या कादंबरीला दाखवायचे आहे.तसेच ही कादंबरी राजची गोष्ट सांगते जो स्वातंत्र्य या संकल्पनेवर उत्कटपणे विश्वास ठेवतो आणि मानवी समस्यांना प्रारब्ध कारणीभूत आहे या धारणेला विरोध करतो.अखेरीस ही कादंबरी दिल्ली या शहराची आहे जे आधुनिक काळात झपाट्याने बदलते आहे. येथे राजकीय नेत्यांची जणू नवी पिढी तयार झाली आहे जी गांधीजी ज्यासाठी ठामपणे उभे राहिले त्या सगळ्या गोष्टींना बाजूला लोटणारी आहे.’

‘दी डे इन शॅडो’ या पुस्तकाचे परीक्षण ‘दी संडे टाईम्स’मध्येदेखील  करण्यात आले होते. त्यात समीक्षक म्हणतो की ‘नयनतारा सेहगल या नैतिकतेबद्दल लिहिणाऱ्या लेखिका आहेत.तरीही त्या नैतिकतावादी नाहीत हे विशेष.पूर्वीपासून अनेक थोर कलावंतांनी कलेकडे जीवनातील योग्य काय आणि अयोग्य काय याच्यावर भाष्य करणारे साधन म्हणून पाहिले तेच नयनतारा सेहगल करत आहेत.’

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे कथानक, कालावकाश आणि कथासूत्रेः

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीला असलेली सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या कादंबरीतील काळ हा साधारण १९६४ नंतरचा म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतरचा असावा.१९७० च्या आगेमागे दोन-चार वर्षांचा काळ कादंबरीच्या कथानकात सामावलेला दिसतो. हे कथानक भारताची राजधानी नवी दिल्ली येथे घडणारे आहे. दिल्लीमधील संसद भवनाचा भाग,उच्चमध्यमवर्गीयांच्या वसाहतीचा भाग  आणि डिफेन्स वसाहत इथे हे कथानक घडताना दिसते.पण या प्रत्यक्ष अवकाशापेक्षा हे कथानक सिमरित,राज,रामकिशन,सुमेरसिंग,ब्रिज या व्यक्तिरेखांच्या मनाच्या अप्रत्यक्ष अवकाशात अधिक घडते असे म्हणता येईल.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे कथानक अगदी सरळरेषीय आहे. ज्यांनी यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये नयनतारा सेहगल यांचे जीवनचरित्र वाचले असेल त्यांना दी डे इन शॅडो या कादंबरीच्या कथानकाचे लेखिकेच्या जीवनचरित्राशी असलेले साधर्म्य लगेच लक्षात येईल.कथानकात प्रत्यक्ष घडामोडी फारशा नाहीत परंतु व्यक्तिरेखांच्या मनोवकाशात चालणाऱ्या उलथापालथी मात्र बऱ्याच आहेत.

या कथानकात सिमरीत या मध्यमवयीन स्त्रीचे वर्तमान प्रामुख्याने मांडले आहे. कादंबरी भूतकाळात जाते पण क्वचितच.सिमरीत ही दिल्लीतील एका उद्योगपतीची घटस्फोटीत पत्नी आहे.तिने सोम या पंजाबी तरूणाशी साधारण १७ /१८ वर्षे संसार केला आहे.तिला त्याच्यापासून चार मुले झालेली आहेत.सिमरीत मूळात एका ब्राह्मण कुटुंबातील आहे. साधी राहणी-उच्च विचारसरणी या वातावरणात ती लहानाची मोठी झाली आहे. पण विरोधी प्रवृत्ती परस्पराकडे आकर्षित होतात असे म्हणतात त्यामुळेच कदाचित चमकदार पेहराव करणाऱ्या,मित्रमंडळीत प्रभाव पाडणाऱ्या सोमबद्दल सिमरीतला तरूण वयात कुतूहल वाटले असावे. या कुतूहलातूनच पुढे तिने आई-वडीलांचा विरोध पत्करून सोमशी प्रेमविवाह केला आहे.तिचा हा निर्णय तिने तिच्या उत्कट भावनाशील स्वभावातून घेतलेला आहे.विवाहानंतर एखाद्या नदीसारखी ती सोमने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबरोबर वहावत गेली आहे.

सोम मूळचा फाळणीपूर्वीच्या रावळपिंडीतील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे.गडगंज स्थावर मालमत्ता पाकिस्तानातच मागे सोडून देऊन फाळणीमुळे सोमच्या कुटुंबियांना भारतात पलायन करावे लागले आहे.सोम त्यावेळी लहान होता.पण तरूण वयातही तो फाळणीत आपल्या कुटुंबीयांचे फाळणीमुळे प्रचंड नुकसान झाले याचे भांडवल करत राहिला आहे.त्यामुळे त्याच्या स्वभावात ईर्ष्या,सूडबुद्धी निर्माण झाली आहे. एकप्रकारची रानटी, आक्रमक महत्त्वाकांक्षा हा सोमच्या स्वभावाचा पैलू सिमरीतला तिच्या लग्नानंतर काही वर्षांनी खटकू लागला आहे. सोम आपल्या स्वार्थासाठी मित्र जोडतो आणि स्वार्थ साधता येणे संपले की त्याच्यादृष्टीने मैत्री संपते हे सिमरीत पाहते.विशेषतः सोमने आपल्या व्यवसायात जम बसवताना रावळपिंडीचा त्याचा एक मित्र लल्लीला भागीदार बनवले आणि आपला स्वार्थ साधून झाल्यावर मात्र लल्लीला दूर लोटले हे सिमरीतला आवडलेले नाही.ब्रिटीश कंपनीत नोकरी करत असताना युरोपियन साहेबांनी आपल्याला सन्मानाने वागवले नाही असा बहाणा करणारा सोम संधी मिळताच एका युरोपियन साहेबाशी भागीदारीत नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हाही सिमरीतला सोमचे वागणे दुटप्पीपणाचे वाटते.

सिमरीत एक संवेदनशील लेखिका आहे. ती विविध मासिकांतून ललित साहित्य लिहिते.तिला माणसांपेक्षा निसर्गावर लिहिणे अधिक आवडते. तिचे लेखन काहीसे स्वप्नरंजन करणारे असले तरी त्यातून ती तिची जीवनदृष्टी व्यक्त करते आहे.एखाद्या नदीसारखे शुद्ध,शांत पण  प्रवाही जीवन अधिक समाधानकारक असू शकते हे जणू सिमरीत आपल्या लेखनातून सुचवते आहे. प्रत्यक्षात मात्र ती स्वतःच नदीसारखीच भावनेच्या भरात वहात गेली आहे.तिला सोमची मैत्री हवी आहे पण सोम तिची शारीरिक गरज पुरवणारी स्त्री यापेक्षा वेगळ्या दृष्टीने कधीच पाहू शकलेला नाही.सिमरीतच्या प्रतिभेची, तिच्या साहित्यिक कामगिरीची कदर करावी याचे भान सोमकडे नाही. अधिकाधिक धनवान होणे हा आयुष्य अर्थपूर्ण करण्याचा त्याचा मार्ग त्याला अत्यंत प्रिय आहे.खूप आवाज करणे,जोराजोरात गाणी म्हणणे आणि दारू पिणे या सोमच्या मनोरंजनाच्या कल्पना सिमरीतपेक्षा अगदीच भिन्न आहेत.सोम लोकांना पार्ट्या देतो पण त्यामागे माणसांशी नाती जोडण्याचा हेतू नसून  व्यावसायिक हितसंबंध वाढवण्याचा व्यावहारीक हेतू असतो.अशा पार्ट्यांमध्ये त्याला सिमरीतला त्याची मालमत्ता म्हणून मिरवायला आवडते.

   लेखनातून सिमरीत फार पैसा मिळवू शकत नसली तरी तिचा म्हणून एक आत्मसन्मान तिच्याकडे निश्चितच आहे.सोमच्या अत्यंत आत्मकेंद्रीत भावनाशून्य स्वभावाचा संवेदनशील, हळव्या स्वभावाच्या सिमरीतला कालांतराने मनःस्ताप होऊ लागतो.सोम ज्या स्पर्धेत धावतो आहे त्यात आपण त्याला साथ देऊ शकत नाही आणि त्याच्याबरोबर फरपटत जाऊ शकत नाही ही आंतरीक जाणीव सिमरीतला व्याकूळ करते.सोमशी आपला संवाद संपत चालला आहे ही जाणीव सिमरीतला एकाकी करणारी, वैफल्यग्रस्त करणारी ठरते.

सोमला सिमरीतची मनःस्थिती दिसते पण त्याची कारणे तो  समजून घेऊ शकत नाही आणि स्वतःची जगण्याची गती कमी करण्याची किंवा जीवनदृष्टी बदलण्याची त्याची तयारी नाही.  सर्व भौतिक सुखे आपण सिमरीतला देऊ केलेली असतानाही सिमरीत आनंदात का राहू शकत नाही हे सोमच्या आकलनापलीकडचे आहे. त्याचे सिमरीतशी खटके उडतात.आणि अखेरीस तर त्याला सिमरीत मनोरूग्ण आहे असे वाटू लागते.

घटस्फोट घेणे हा सिमरीतसाठी मोठा निर्णय आहे.त्या निर्णयापर्यंत जाण्याआधी तिची मनःस्थिती दोलायमान आहे.पण सोमने आपल्या परदेशी भांडवलदार भागीदाराबरोबर शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना सुरू करायचे ठरवले आहे हे कळल्यावर सिमरीतला आपले विरोधी मत नोंदवावेसे वाटते. पण तेव्हा सिमरीतची बाजू ऐकूनही न घेता सोम तिची खिल्ली उडवतो.आपण शस्त्रास्त्र तयार केली नाहीत तरी जगात युद्धे सुरू रहाणारच असे सोमचे म्हणणे आहे.त्यामुळे सिमरीतचे मत सोमला हास्यास्पद वाटते.सोमच्या या प्रतिक्रियेनंतरच सिमरीतच्या मनात सोमबद्दलचा तिटकारा टोकाला जातो.अशावेळी काही काळापूर्वीच ज्याच्या भाषणाने ती प्रभावीत झाली होती त्या राज गर्गकडे सिमरीत अभावितपणे ओढली जाते. राजला ती आपली व्यक्तीगत समस्या सांगत नाही.उलट आपली शाळकरी मुलगी तिच्या वर्गमित्राला पत्रे पाठवते आहे त्यामुळे वाटणारी चिंता ती राजजवळ व्यक्त करते.तेव्हा स्वातंत्र्य घेणे हे तरूणांचे वैशिष्ट्यच आहे आणि त्यावर नाहक बंधने घालणे योग्य होणार नाही असे सांगून राज सिमरीतला शांत करतो. पण तरीही तिच्या मनातील घालमेल संपलेली नाही हे ओळखून संयम व सहनशीलता हे काहीवेळा गुण नाही तर दोष ठरतात असे राज तिला सांगतो. त्याच्या बोलण्याचा विचार करत असताना घटस्फोट घेण्यासाठीचे धैर्य सिमरीत एकवटते.

 तरीही प्रत्यक्ष घटस्फोटाच्या कागदावर सह्या करताना सिमरीतचे मन गोठून गेले आहे.आजवरच्या स्थिर, शाश्वत आयुष्याला दूर सारत एका अस्थिर, अव्यवस्थित, असुरक्षित आयुष्याचा तिला स्वीकार करावा लागणार आहे. मुलांची जबाबदारी तिला टाळायची नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा व्यवसाय करणेही तिला भाग पडणार आहे.काहीशा अज्ञानामुळे आणि निरागसपणामुळे सिमरीतला सोमने घटस्फोट देताना खेळलेली कुटील चाल समजू शकत नाही. घटस्फोटाच्या करारपत्रातील अटींमुळे सोम आपल्यावर घटस्फोटानंतरही क्रूरपणे सूड उगवत राहणार आहे याचा अंधूकसा अंदाजही सिमरीतला येत नाही. सुन्नपणे ती तिच्या चार मुलांसह सोमचे घर सोडून बाहेर पडते.

सुदैवाने राज गर्ग या लोकसभेत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या खासदाराशी मैत्री असल्यामुळे सिमरीतला डिफेन्स वसाहतीत लहानसे घर भाड्याने मिळू शकते. पण चार मुलांना मोठे करण्यासाठी आवश्यक ती पैशांची तजवीज करणे सिमरीतच्या आवाक्याबाहेरचे असते.

ब्रिज हा सिमरीतच्या मुलाने तारूण्यात पदार्पण केले आहे. त्याच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काही आकांक्षा आहेत. विशेषतः उच्चशिक्षणासाठी परदेशात जावे असे त्याचे स्वप्न आहे. आईची आर्थिक परिस्थिती पाहता ती आपल्या स्वप्नाला बळ देऊ शकणार नाही हे त्याला स्पष्ट झाले आहे. वडिलांशी असलेले नाते न तोडता त्यांच्या मनासारखे वागून त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून आपण परदेशात जाऊ शकू हे समजण्याइतपत व्यवहारी शहाणपण ब्रिजकडे आहे. आईवर अन्याय झाला हे त्याला कळते. आपल्याला स्वार्थासाठी वडिलांशी नाते टिकवावे लागणार याचे अपराधीपणही त्याला वाटते. पण मग पैसे मिळवून ,शिक्षण घेतले तर चांगली नोकरी मिळेल आणि त्यानंतर आपण आपल्या आईला सुखात ठेवू असा विचार करून तो स्वतःचे अपराधीपण विसरतो आहे.आईला भेट म्हणून घरमालकाच्या गुलाबाच्या वेलीवरची कळी त्याला न विचारताच तोडून आणणाऱ्या ब्रिजमध्ये सिमरीतला सोमचेचं पुरूषी अवगुण जाणवतात पण आपल्या स्वार्थासाठी त्याला धरून ठेवणेही तिला पटत नाही.

प्रचंड संपत्ती असणाऱ्या सोमने सिमरीतच्या नावे अनेक कंपन्यांचे शेयर्स घेऊन ठेवलेले असले तरी त्या शेयर्सचा उत्तराधिकारी त्याने त्यांचा मुलगा ब्रिज याला केलेले असते. ब्रिजच्या पंचविसाव्या वर्षी ते सगळे शेयर्स त्याला भविष्यातील स्वतंत्र व्यवसायासाठी गुंतवणूक म्हणून मिळू शकणार असतात.ब्रिज पंचवीस वर्षांचा होईपर्यंत त्या शेयर्सचे मिळणारे प्रिमियम जरी सिमरितला मिळणार असले तरी त्याच्यावरचा प्रचंड करही तिलाच भरावा लागणार असतो.खरे तर सिमरीत किंवा ब्रिजला भेट (Gift) म्हणून शेयर्स हस्तांतरीत करणे सोमला शक्य झाले असते पण तसे केल्यास शेयर्सच्या नफ्यावरील आयकर त्याला भरावा लागला असता म्हणून त्याने मुद्दामच शेयर्स सिमरीतच्या नावावरच ठेवलेले असतात.ब्रिजखेरीज अपल्या  तीन मुलींसाठी मात्र कोणतीही आर्थिक तरतूद घटस्फोटाच्या करारात सोमने करून ठेवलेली नसते.त्यांची सगळी जबाबदारी त्याने सिमरीतवरच ढकललेली असते. सिमरीतला  तिचा मित्र आणि हितचिंतक राज सोमचे हे क्रूर डावपेच  समजावून सांगतो पण तेव्हाही तिला सोमने अशी अट चुकून घातली असेल असे वाटते.

घटस्फोटानंतरही सिमरीतचा सोमवरचा अंधविश्वास राजला आश्चर्यकारक वाटतो. पुरूषप्रधान संस्कृतीतून आलेली ही पतीपरायणता सिमरीतसारख्या सुशिक्षीत, बुद्धीमान बाईलाही खऱ्या अर्थाने स्वतंत्र स्त्री म्हणून जगण्याचे बळ देत नाही हे सत्य राजला धक्कादायक वाटते.फक्त स्त्रियाच नाहीत तर  एकूणच बहुसंख्य हिंदूधर्मीय असे गतानुगतीकतेने जगत असतात. आपल्या जगण्याबद्दल ते सजगपणे विचार करत नाहीत. किंबहूना त्यांना परंपरेतून बाहेर पडून विचारच करता येत नाही.त्यामुळे कैक प्रसंगी हिंदू धर्मीय अमानुषपणे वागतात असे निरीक्षणातून व अनुभवातून ख्रिस्ती धर्मीय राजचे मत झाले आहे.त्याच्या वडिलांनी त्यांच्या तरूण वयात हिंदू धर्मातील याच कुंठीत अवस्थेला कंटाळून ख्रिस्ती धर्म स्वीकारला याचे भान राजला आहे.त्याचा स्वतःचा शैला या मैत्रिणीशी असलेला प्रेमसंबंध निष्ठूरपणे संपवण्यामागे हिंदू धर्मीयांचा संवेदनशून्य कर्मठपणा कारणीभूत झालेला आहे असे  त्याचे  मत झाले आहे.

 सिमरीतने उशीरा का होईना घटस्फोट घेण्याचे दाखवलेले धैर्य राजला कौतुकास्पद वाटते.पण घटस्फोटानंतर सिमरीतवर आलेले जबाबदारीचे ओझे राजला अन्यायकारक वाटते.सोमने घटस्फोट देताना माणुसकीशून्यपणे लादलेल्या क्रूर अटींमुळे सिमरीतची झालेली त्रिशंकू अवस्था राजला अस्वस्थ करते.अशा अधांतरी अवस्थेत सिमरीतला मदत करणे राजला आपले कर्तव्य वाटते. तिच्यासाठी कायदेशीर सल्ला मिळवून देण्याच्या हेतूने तो आधी एका प्रख्यात सनदी लेखापालाला भेटतो. पण तिथून समाधानकारक सल्ला न मिळाल्याने राज त्याच्या वडीलांचे मित्र रामकिशन यांना भेटतो.

रामकिशन यांचे स्वतःचे वर्तमानपत्र आहे आणि ते एक अत्यंत विवेकी, चिंतनशील लेखक आहेत.रामकिशन त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकटे झाले आहेत पण त्यांचे लेखन सुरूच आहे. सिमरीतची दुर्दैवी कहाणी रामकिशन यांनाही विचारात पाडते.रूढी-परंपराग्रस्त हिंदू धर्मीयांची कुंठीत अवस्था सिमरीतसारख्या स्त्रियांना दुःखाच्या खाईत लोटणारी ठरते हे  रामकिशन यांनाही जाणवते.त्यांनी स्वतः आपल्या पत्नीला नेहमीच बरोबरीच्या नात्याने वागवले आहे.समानता आणि  माणुसकीवरचा त्यांचा विश्वास आजूबाजूला अमानुषपणे वागणारी माणसे पाहूनही उडालेला नाही.माणुसकी ही कोणत्याही धर्माच्या केंद्रस्थानी असणारी गोष्ट आहे आणि तिच्यावरची श्रद्धा गमावून मानवजातीचे भले होणार नाही असा व्यापक विचार रामकिशन करतात.  आयकर खात्याला पत्र पाठवून सिमरीतची अवस्था जर नीट समजावून सांगितली तर कदाचीत अपवादात्मक परिस्थिती म्हणून ते माणुसकी दाखवून तिला करात सवलत देऊ शकतील असा मार्ग रामकिशन सुचवतात.जो राज आणि सिमरीत दोघांनाही पटतो. याबाबतीत न्याय कधी ना कधी मिळेलच  पण  तोपर्यंत सिमरीतने मनावर ताण आणि कडवटपणाचे ओझे बाळगत जगण्याचे कारण नाही असेही रामकिशन सुचवतात.त्यांच्या या प्रगल्भ सल्ल्यामुळे सिमरीत आणि राज दोघेही आश्वस्त होतात आणि त्यांच्या मनावरील अस्थिरतेचे, अश्रद्धेचे सावट दूर होते.त्यामुळे त्या दोघांमध्ये सर्व प्रतिकूलतेवर मात करत नात्याचा अतूट बंध निर्माण होण्याची शक्यता बळावते.रामकिशन यांच्या एकाकी आयुष्यातही सिमरित आणि राज या दोघांशी जुळलेल्या अनामिक नात्यामुळे एक नवचैतन्य निर्माण होते.

सोम,सिमरीत ,राज,रामकिशन यांच्या मुख्य कथानकाला समांतर एक उपकथानक ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीत आहे.ते सुमेरसिंग या भारताच्या संसदेतील खनिजतेल खात्याच्या राज्यमंत्र्यासंदर्भातील आहे.सुमेरसिंग हा एक अत्यंत राजबिंडा राज्यमंत्री आहे. पण यापलीकडे त्याच्याकडे कुठलेही वैशिष्ट नाही. तो एका श्रीमंत जमिनदाराचा एकुलता मुलगा आहे. शिक्षणात त्याने गटांगळ्याच खाल्लेल्या आहेत. वडिलांची प्रतिष्ठा आणि उच्च जात ही सुमेरसिंगला राजकारणात प्रवेश मिळवून देण्यास कारण झाली आहे.सुमेरसिंगचा विवाह झालेला असून त्याला दोन मुले आहेत. पण तरीही तो बाहेरख्याली आहे. आपल्या शारीर सुखासाठी अनेक असहाय्य मुलींचा गैरफायदा त्याने घेतलेला आहे. आपल्या जमिनदार वडीलांबद्दल त्याच्या मनात भय आहे पण आदर आणि प्रेम मात्र नाही.उलट वडिलांच्या भोचक प्रश्नांमुळे सुमेरसिंगला न्यूनगंड वाटतो. खनिज तेल खात्याचे कॅबिनेट मंत्री सरदार यांच्याबद्दलही सुमेरसिंगच्या मनात आदर किंवा प्रेम नाही. केवळ नाईलाजाने तो आजारी असणाऱ्या सरदारांना इस्पितळात भेटायला जातो .मात्र सरदार यांनी दिलेला खनिज तेल खाणीच्या कामाचे कंत्राट रशिया किंवा अमेरिकेऐवजी  कॅनडाला देणे देशाच्या संरक्षणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने अधिक हिताचे आहे हा सल्ला सुमेरसिंग मानत नाही.त्यामागे त्याची अभ्यास न करण्याची वृत्ती,अहंकार आणि त्याच्यासारख्या अन्य कॅबिनेट मंत्र्यांचा राजकीय व आर्थिक स्वार्थही असावा.सिमरीतचा मित्र आणि लोकसभेतील अपक्ष खासदार राज निस्पृहपणे सुमेरसिंगच्या निर्णयाला विरोध करतो.सुमेरसिंगने दाखवलेल्या आमिषाला तो बळी पडत नाही. पण त्याचे म्हणणे अर्थातच बहुसंख्य मतांच्याद्वारे डावलले जाते.सुमेरसिंगची आंधळी राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि सिमरीतचा नवरा सोमने अधिकाधिक श्रीमंत बनण्यासाठी शस्त्रास्त्र उत्पादन कंपनीशी करार  करून दाखवलेली आंधळी महत्त्वाकांक्षा यात असलेले साम्य कथानकात ठळक होते.

 ‘दी डे इन शॅडो’ ही कादंबरी रूढार्थाने सुखांतिका ठरते.पण या कादंबरीचा आत्मा मात्र शोकाचा आहे असेच म्हणावे लागेल.ही शोकात्मिका केवळ सिमरितची नाही तर रूढी-परंपरेत आणि भौतिक सुखांच्या आकांक्षात अडकून पडलेल्या  संपूर्ण भारतीय समाजाची आहे.तसेच अहिंसेच्या चळवळीतून स्वातंत्र्य मिळवूनही अहिंसेचा व नैतिकतेचा अर्थच न कळलेल्या भारतीय राजकीय नेत्यांची व त्यांच्यावर अंधश्रद्धा ठेवून प्रवाहपतीत झालेल्या भारतीय नागरिकांचीही आहे असे जाणवत राहते.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे कथानक समजून घेतल्यावर त्यातील  कथासूत्रे समजून घेणे  अधिक अर्थपूर्ण ठरेल.

  • स्वातंत्र्योत्तर काळात भौतिक साधनसंपत्तीच्या बाबतीत भारत आधुनिक बनत असताना येथील सामाजिक व्यवहारात मात्र धर्मांधता,जातीभेद,रूढी- परंपरा, प्रारब्धवाद आणि अंधश्रद्धांचाच पगडा आहे. सरंजामशाही  आणि पुरूषप्रधान व्यवस्थेतून आलेल्या सत्तेच्या उतरंडीत कोणतेही बदल  समाजाला नको आहेत. स्त्रियांना समानता न देणाऱ्या आणि त्यांना अज्ञानात ठेवणाऱ्या या समाजात कौटुंबिक नातेसंबंधांत ताण निर्माण झाले आहेत. दुर्दैवाने आत्मकेंद्रीत नेते आणि त्यांनी नैतिकतेला दिलेली तिलांजली यामुळे भारतातील सामाजिक-राजकीय परिस्थितीतही ताण निर्माण झाले आहेत हे दाखवणे हे ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे प्रमुख कथासूत्र ठरेल.
  • स्वातंत्र्योत्तर काळात एका बाजूला इंग्रजांना पिळवणूक केली म्हणून दोष देणाऱ्या नव उद्यमींनी परकीय भांडवलदारच  गाठले आणि अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी कामगारांची पिळवणूकच ते करत आहेत.आयुष्यात पैसा  केंद्रस्थानी आल्याने  वरवर पाश्चात्यांसारखा पेहराव करणाऱ्या या नवश्रीमंतांच्या व्यवहारी वर्तनात पाश्चात्यांसारखी सभ्यता,परस्पर आदर मात्र नाही.उलट एकप्रकारचे रानटी क्रौर्य आणि ढोंगीपणा मात्र त्यांच्या वागण्यात जाणवू लागला आहे हे ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे एक कथासूत्र आहे.
  •  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केली ती पिढी हळहळू संपत चालली आहे.जमिनदारी कायद्याने संपली असली तरी संपत्ती आणि बाहुबळावर जमिनदारांची मुले नवे राजकीय नेते बनत आहेत.त्यांना शुद्ध चारित्र्याची गरज वाटत नाही.परिणामी गांधीवादातून पुढे आलेली सत्य,अहिंसा,निःस्वार्थ सेवा ही तत्वे,  आणि साधनसुचीतेची मूल्ये नव्या नेत्यांना कुचकामाची वाटू लागली आहेत. राजकीय नेत्यांमधील परस्परांवरचा विश्वास,एकमेकांबद्दलचा आदर संपून त्याची जागा व्यक्तिगत स्वार्थाने घेतली आहे.उजव्या व डाव्या विचाराच्या अशा सर्व नेत्यांनी विचारविनिमयातून  भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विवेकाने निर्णय घेण्याची लोकशाही प्रक्रियाच जणू संपुष्टात आली आहे हे दाखवणे हे ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे आणखी एक कथासूत्र म्हणता येईल.
  • आधुनिक भारतात उद्योगधंदे, मोटारगाड्या, यंत्रे वाढत चाललेली असताना खनिज तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे.त्यामुळे प्रत्यक्ष भारतीय भूभाग व समुद्र यांच्या अंतर्भागातील  खनिज तेलाचे साठे शोधण्यासाठी पाहणी करणे,परकीय मदतीने खनिज तेलाच्या खाणी खोदणे, तेल हस्तगत करणे ही अग्रक्रमाने करण्याची गोष्ट झाली आहे. पण असे तेलसाठे हस्तगत करताना कंत्राटात व्यवहार्यता ठेवणे आणि भारताची सुरक्षिततेला धोका न निर्माण करणे आवश्यक ठरते.  पण तशी खबरदारी न घेता नवे नेते स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी अविवेकी निर्णय घेत असतील तर हा भ्रष्टाचार भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्याच्याच पायाला सुरूंग लावणारा ठरू शकतो हे दाखवणे हेही ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे एक कथासूत्र म्हणता येईल.

अशाप्रकारे सिमरीतसारख्या संवेदनशील, बुद्धिमान स्त्रियांचे आयुष्य स्वातंत्र्योत्तर काळातील नवश्रीमंतांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे असुरक्षिततेच्या, भयाच्या सावटाखाली लोटले गेले आहे हे तर ‘दी डे इन शॅडो’ ही कादंबरी सुचवते आहेच पण तेवढेच या कादंबरीला सांगायचे नाही. भारतातील कुंठीत झालेल्या,प्रारब्धवादी, गतानुगतीक समाजाने जर आधुनिकता ही केवळ वरवरच्या भौतिक सुधारणांत नसते तर ती विचारांत असावी लागते हे लौकर समजून घेतले नाही तर संपूर्ण समाज अज्ञानाच्या सावटाखाली भरकटत जाईल हेदेखील ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीला सुचवायचे आहे.तसेच भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करणारे तरूण नेते जर न्यूनगंडाने ग्रस्त असतील आणि आत्मकेंद्रीत राहून अविवेकी निर्णय घेत असतील तर भारतीय स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर सावट पसरेल असेही ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीला व्यापकपणे सुचवायचे आहे.

‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीमधील वास्तव १९६०-७० च्या कालखंडातील  भारतीय समाजाचे असले तरी आजही ते बदलले आहे असे म्हणता येणार नाही.किंबहुना आजच्या भारतीय समाजाच्या मर्यादा आणि लोकशाहीपुढील आव्हाने पूर्वीपेक्षा अधिक जटील झाली आहेत.विवेकी विचार आणि व्यापक मानवता हाच या सर्व मर्यादा व आव्हानांना पार करण्यासाठीचा एकमेव मार्ग भारताकडे आहे. प्राचीन काळापासून तो मार्गच संपूर्ण मानवजातीच्या भल्याचा ठरला आहे. अहिंसा,मानवता,समानता ही वैश्विक मूल्ये सर्वांनी समजून घ्यावीत आणि आचरणात आणावीत  अशी अपेक्षा  ‘दी डे इन शॅडो’ ही नयनतारा सेहगल यांची कादंबरी ठेवते.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ? हे जरूर कळवा. पुढील ब्लॉगमध्ये ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीचे संरचना आणि कथनाच्या अंगाने अधिक सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

-गीता मांजरेकर

*******************************************************************************************************************************************************************

2 प्रतिसाद

  1. भौतिक आधुनिकतेपेक्षा विचारांची आधुनिकता महत्त्वाची .. छान आहे कथानक आणि त्यातील कथासुत्रे!

    Liked by 1 person

Leave a reply to Chaitanya Sandav उत्तर रद्द करा.