नयनतारा सेहगल या स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती केलेल्या महत्त्वाच्या भारतीय लेखिका आहेत. त्यांचा जन्म १० मे १९२७ ला झाला आणि आज त्या ९७ वर्षांच्या आहेत.आजच्या ब्लॉगमध्ये आपण नयनतारा सेहगल यांचे व्यक्तित्व कसे घडले आणि त्याचा परिणाम त्यांच्या साहित्यनिर्मितीवर कसा झाला याचा मागोवा घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी ब्लॉगची ऑडियो फाईल सोबत जोडली आहे.
स्वतंत्र भारताच्या अमेरिकेतील पहिल्या राजदूत होण्याचा मान पंडित नेहरू यांच्या भगिनी असणाऱ्या ज्या विजयालक्ष्मी पंडित यांना लाभला त्यांच्या नयनतारा या द्वितीय कन्या.त्यांचे वडील रणजित सीताराम पंडित हे काठेवाडमधील एक प्रख्यात वकील होते. विशेष म्हणजे ते संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक होते आणि कल्हणाच्या ‘रजतरंगिणी’ या संस्कृत काव्याचा इंग्रजी भावानुवाद त्यांनी केला होता.रणजित पंडित यांचे एक काका न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्यात त्यांचे एक सहकारी होते. त्यामुळे नयनतारा सेहगल यांचा आणि महाराष्ट्राचा परात्परसंबंध जोडता येईल. पण खरं तर, अशा कुठल्याही संबंधांच्या संदर्भाची त्यांची ओळख करून देताना गरज नाही इतक्या त्या त्यांच्या स्वप्रतिभेच्या बळावर कर्तृत्ववान ठरल्या आहेत.

नयनतारा यांचे बालपण अन्य मुलांपेक्षा वेगळे होते. कारण त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी झाले होते.त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू, आजी कमला नेहरू, मामा पंडित नेहरू, आई -वडील हे सगळेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन बराच काळ तुरूंगवासात होते.नयनतारांचे शालेय शिक्षण भारतात वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांत झाले.शालांत परीक्षा त्या ‘वुडस्टॉक स्कुल’, मसुरी येथून उत्तीर्ण झाल्या.त्या शाळेत शिकत असतानाच १९३९ साली त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी दोषी ठरून तुरूंगात गेले.शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९४३ साली नयनतारा यांना अमेरिकेत ‘वेलस्ली कॉलेज’ येथे कला शाखेतील पदवी मिळवण्यासाठी पाठवले गेले.तिथे त्यांची थोरली बहीण चंद्रलेखा शिकत होती.नयनतारा यांनी १९४८ साली पदवी प्राप्त केली. पण तत्पूर्वीच त्यांच्या वडिलांचे तुरूंगातच निधन झाले होते.अमेरिकेहून नयनतारा भारतात परतल्या तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि दुर्दैवाने महात्मा गांधी यांची हत्या झाली होती.हा नवा स्वतंत्र भारत नयनतारा यांच्या संपूर्ण साहित्याचा विषय झालेला दिसतो. एका बाजूला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेल्या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मार्गावर औद्योगिक प्रगती करणारा, पंचवार्षिक योजनांतून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास घेतलेला हा भारत होता. पण फार पूर्वीपासून मूलतत्ववादी प्रतिगामी विचारसरणींनीही आपली पाळेमुळे ज्या भारतात घट्ट रूजवली होती तोही भारत अजून शिल्लक होताच.
पुरोगामी आणि प्रतिगामी अशा परस्पर भिन्न मूल्यांच्या पायावर तोल सावरत उभा असणारा भारतीय समाज हा नयनतारा सेहगल यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय ठरला आहे.विशेषतः अशा अंतर्विरोध असणाऱ्या समाजात स्त्री-पुरूषांचे नातेसंबंधही कसे राजकीय स्वरूपाचे होतात, त्यात स्त्रियांची कशी ओढाताण होते किंवा त्यांना बंड करण्याशिवाय पर्याय उरत नाही हे वास्तव नयनतारा सेहगल आपल्या कादंबऱ्यांतून रंगवताना दिसतात.त्यांनी विविध माध्यमांतून दिलेल्या मुलाखतींतून त्यांचे व सभोवतीच्या माणसांचे अनुभवच त्यांच्या साहित्यनिर्मितीची प्रेरणा ठरले आहेत असे स्पष्ट केले आहे.समाजातील राजकीय परिस्थिती, विचारसरणी यांचा सर्वसामान्य माणसांच्या निर्णयांवर आणि पर्यायाने त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतो असे नयनतारा सेहगल यांचे निरीक्षण आहे.
परदेशातून पदवीधर होऊन आलेल्या नयनतारा यांनी १९४९ मध्ये गौतम सेहगल या उद्योगपतीशी विवाह केला. त्यांना तीन अपत्ये झाली परंतु पतीची अधिकाधिक श्रीमंत होण्याची महत्त्वाकांक्षा आणि नयनतारा यांचा आत्मिक समाधान शोधण्याचा ध्यास या परस्परविरोधी प्रवृत्तींमुळे १९६७ मध्ये दोघे विभक्त झाले.त्यानंतरची १४ वर्षे नयनतारा यांनी स्वतंत्र राहून पत्रकारीता व साहित्यनिर्मिती यात स्वतःला गुंतवून घेतले.या दरम्यान एडवर्ड निर्मल मंगतराय या पंजाबी पण धर्माने ख्रिस्ती असलेल्या विवाहित आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या त्या सहवासात आल्या. १९६९ मध्ये त्या दोघांनी विवाह केला.ए.एन.मंगतराय यांचे २००३ मध्ये निधन झाले.
नयनतारा सेहगल यांनी आपल्या लेखन कारकीर्दीची सुरूवात आत्मकथनात्मक लेखनाने केली.’प्रिझन अँड चॉकलेट केक’ हे त्यांचे आत्मकथन १९५४ मध्ये प्रकाशित झाले. ज्यात त्यांनी प्रामुख्याने आपल्या बालपणीच्या आठवणी कथन केल्या आहेत.त्या सुमारे बारा वर्षांच्या असताना एके सकाळी त्याच्या वडिलांनी त्यांच्यासाठी चॉकलेट केक आणला होता. तो खात असतानाच दरवाजावर पोलीस आले आणि वडील हसत हसत पोलिसांसोबत तुरूंगात गेलेले त्यांनी पाहिले. त्या बालवयात नयनतारा यांनी आपले मामा, आजोबा- आजी, आई असे बरेच जवळचे नातेवाईक हसत हसत तुरूंगात जाताना पाहिले. त्यामुळे तुरूंगात जाणे ही काहीतरी विलक्षण आनंददायक गोष्ट असली पाहिजे असाच त्यांचा समज झाला होता.वडिलांना तुरूंगात भेटायला जाणे, त्यांना पत्रे लिहिणे यातच नयनतारा यांचे बालपण गेले. पुढेपुढे वडिलांना तुरूंगात जाऊन भेटायला ब्रिटीश परवानगी देईनात आणि त्या परदेशात शिक्षण घेत असताना वडिलांचे तुरूंगातच निधन झाले.या सगळ्या आठवणी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीसह नयनतारा सेहगल यांनी त्यांच्या पहिल्याच साहित्यकृतीत उत्कटपणे कथन केल्या आहेत.त्यांची पुढील साहित्यकृती ‘फियर सेट फ्री’ (१९६२) हीदेखील आत्मकथनात्मक होती आणि त्यात त्यांनी आपल्या तारूण्यातल्या आठवणी कथन केल्या होत्या.विशेषतः भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीचे दिवस या पार्श्वभूमीवर त्यांनी घाईने घेतलेला विवाहाचा निर्णय आणि त्यातून वाट्याला आलेले दुःख आणि विवाहातून विभक्त होणे याबद्दल त्या सविस्तर कथन करतात. यापुढे आपण आत्मकथनात्मक लिहिणार नाही असे त्यांनी या दुसऱ्या पुस्तकात म्हटले असले तरी कालांतराने त्यांनी ‘रिलेशनशिप’ (१९९४) हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी त्यांच्या आणि एडवर्ड निर्मल मंगतराय यांच्यातील प्रेमसंबंधाबद्दल त्या दोघांमधील पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सांगितले आहे.घटस्फोटीत स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा उपरोधिक दृष्टिकोन आणि पुनश्च नाते जुळवताना घटस्फोटीत स्त्रीच्या मनात होणारी उलथापालथ याबद्दल नयनतारा सहगल यांना ‘रिलेशनशिप’ या पुस्तकातून भाष्य करायचे आहे.
नयनतारा सेहगल यांनी कादंबरी लेखनाला सुरूवात केली ती १९६३ पासून.’अ टाईम टू बी हॅपी’ ही त्यांची पहिली कादंबरी ठरली. या कादंबरीला १९४० च्या सुमाराची भारतातील घटनांची पार्श्वभूमी आहे.सनद शिवपाल हा या कादंबरीचा नायक परदेशात शिकून भारतात परतला आहे.तो श्रीमंत बापाचा मुलगा आहे.भारतात परतल्यावर त्याच्या मनात येथील गांधीवादी मूल्यविचार आणि पाश्चात्य भांडवलदारी, साम्राज्यवादातून आलेला भौतिक प्रगतीचा विचार यांच्यातील अंतर्विरोधामुळे गोंधळ निर्माण होतो. परदेशी शिक्षणामुळे आपली त्रिशंकू अवस्था झाली आहे. आपण आपल्या मूळांपासूनच तुटले आहोत असे सनदला वाटते.तो जिथे काम करत असतो तिथले त्याचे ब्रिटीश अधिकारी मिस्टर ट्रेन्ट यांना त्याच्या मनातील हा गोंधळ कळतो. सनदला आपली नोकरी सोडविशी वाटत असताना ते त्याला गांधीवादी चळवळीत सहभागी होणे धोक्याचे आहे असे सांगतात परंतु त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळ ही स्वाभाविकच असते हेही सांगतात. त्याच काळात सनदचे कुसुमशी लग्न होते. कुसुमचे कुटुंब भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय असते.सनदला आपल्या मूळांशी पुनश्च नाते कसे जोडावे हा प्रश्न पडलेला असतो तो कुसुमच्या सान्निध्यात सुटतो.विशेषतः हिंदू संस्कृतीतून आलेला कर्म सिद्धांत त्याला त्याच्या द्विधा अवस्थेतून बाहेर पडण्यास उपयोगी ठरतो.आपले पूर्वकर्म आपले वर्तमान ठरवते आणि वर्तमानातील कर्म आपल्या भविष्यावर परिणाम करते ही जाणीव सनदला जीवन आनंदाने कसे जगावे हे शिकवते असे लेखिका नयनतारा सेहगल यांनी दाखवले आहे.
१९६५ मध्ये नयनतारा सेहगल यांची दुसरी कादंबरी ‘धिस टाईम ऑफ मॉर्निंग’ प्रकाशित झाली.याही कादंबरीत दोन भिन्न प्रवृत्तींमधील संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला दिसतो.”साध्य महत्त्वाचे मग त्यासाठी वापरलेली साधने कोणती का असेनात” आणि “साध्य महत्त्वाचे आहेच पण ते मिळवताना वापरलेली साधनेही नैतिक असली पाहिजेत” अशा ह्या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत.या दोन प्रवृत्ती किंवा भूमिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन व्यक्तिरेखा एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या कादंबरीत दिसतात. एक आहेत कैलास व्रिंद जे गांधीवादी विचारसरणीचे आणि साधनसूचितेला महत्त्व देणारे आहेत तर दुसरे आहेत कल्याण सिन्हा जे तळागाळातून आलेले राजकीय नेते आहेत. सत्ता मिळाल्यावर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे अखेरीस कल्याण सिन्हा यांना अटक होते. लेखिकेने गांधीवादी विचारसरणीचा पुरस्कार केला असला तरी भ्रष्टाचारी व्यक्तिरेखेकडेही तिने वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले आहे.
नयनतारा सेहगल यांची पुढची कादंबरी १९६९ मध्ये प्रसिद्ध झाली.तिचे नाव ‘स्टॉर्म इन चंदिगढ’ हे होते. पंजाबपासून हरियाणा हा प्रांत वेगळा काढण्याचा पंडित नेहरूंचा निर्णय आणि चंदिगढ हे नव्याने वसवलेले आधुनिक शहर या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनणे ही वादळी पार्श्वभूमी या कादंबरीला अहे. पण खरे वादळ या कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या मनातील आहे.या व्यक्तिरेखा पुन्हा एकदा नव्या आणि जुन्या मूल्यविचारांच्या संघर्षात अडकलेल्या आहेत. कादंबरीत तीन तरूण जोडपी आहेत जी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत असमाधानी आहेत आणि त्यातून दिलासा म्हणून अन्य स्त्री-पुरूषांच्या भावनिक नात्यात गुंतण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहेत.हा मार्ग तडीला नेणे सोपे नसल्याने अशारीर प्रेम, जोडीदाराची फसवणूक की बंड यापैकी कोणता पर्याय ते स्वीकारतात ते प्रत्यक्ष कादंबरी वाचून समजून घेणे रोचक ठरेल.
‘दी डे इन शॅडो’ (१९७१) ही नयनतारा सेहगल यांची बहुचर्चित कादंबरी आहे. ज्या कादंबरीला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील भावनिक संघर्षाचा संदर्भ आहे. समाजाचे दडपण आणि असुरक्षिततेचे भय यांच्या ताणाखाली दबून नको असलेल्या विवाह संबंधात मन मारून राहायचे की ही फरफट थांबवून स्वतंत्र, असुरक्षित आयुष्याला धैर्याने सामोरे जाण्याचे आव्हान स्वीकारायचे या पर्यांयापैकी कोणता निवडायचा या पेचात अडकलेली मध्यमवयीन स्त्री ‘दी डे इन शॅडो’ या कादंबरीत नयनतारा सेहगल यांनी रंगवली आहे.या कादंबरीबद्दल पुढील ब्लॉगमध्ये आपण स्वविस्तर परिचय करून घेणार आहोत.
१९७१ नंतर सुमारे चौदा वर्षांच्या कालखंडात नयनतारा सेहगल यांनी जे लेखन केले ते प्रामुख्याने इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होण्याचा काळ आणि त्यांनी आणिबाणी लादण्याचा काळ यासंदर्भातील आहे. ‘इंदिरा गांधी इमर्जन्स ऍंड स्टाईल’ , ‘इंदिरा गांधी हर रोड टू पॉवर’ आणि ‘व्हॉईस फॉर फ्रिडम’ अशी नयनतारा सेहगल यांची तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. आणिबाणीच्या काळात आपल्या मामेबहिणीच्या म्हणजे इंदिरा गांधी यांच्या विरोधात नयनतारा सेहगल ठामपणे उभ्या राहिल्या. तो व्यक्तीविरूद्धचा संघर्ष नसून दडपशाही करणाऱ्या प्रवृत्ती विरूद्धचा त्यांचा संघर्ष होता. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला.शासकीय समित्यांमधील त्यांची नेमणूक इंदिरा सरकारने रद्द केली.
‘प्लॅन्स फॉर डिपार्चर’ ही नयनतारा सेहगल यांची कादंबरी १९८५ मध्ये प्रकाशित झाली.या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरणाची पार्श्वभूमी आहे. या काळातील एक शास्त्रज्ञ नितीन बसू यांना सेक्रेटरी हवी असते म्हणून त्यांची बहीण जाहिरात देते आणि या जाहिरातीला प्रतिसाद देत एक डॅनिश मुलगी ऍना हॅनसन हिमापूर येथे बसू यांची सेक्रेटरी म्हणून रूजू होते इथून ही कादंबरी सुरू होते. त्यावेळी हिमापूर येथील ब्रिटीश मॅजिस्ट्रेट हेन्री ब्रेवस्टर यांच्या संपर्कात ऍना येते आणि ती त्यांच्या प्रेमात पडते. ब्रेवस्टर यांची पत्नी स्टेला इंग्लंडमध्ये आहे. ब्रेवस्टर आणि ऍना यांची प्रेमकहाणी मात्र अधुरी राहते कारण दुसरे महायुद्ध आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यामुळे ऍनाला परत युरोपात जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार असतो. सत्ता जेव्हा वंशविद्वेष पसरवणारी असते तेव्हा कोवळ्या प्रेमसंबंधांचे कोमेजणे हेच भागधेय असते असे जणू ही कादंबरी सुचवते.
‘रिच लाईक अस’ ही नयनतारा सेहगल यांची कादंबरी १९८५ मध्ये प्रकाशित झाली आणि अनेक पुरस्कारांची मानकरी ठरली.भारतात ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने ही कादंबरी गौरवली गेली. सर्वोत्कृष्ट कादंबरीचा इंग्लंडमधील ‘सिंक्लेअर पुरस्कार’ त्यावर्षी ‘रिच लाईक अस’ या कादंबरीने पटकावला होता.या कादंबरीत दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत एक आहे रोझ जी परदेशी आहे पण भारतीय उद्योजक राम याच्या प्रेमात पडून त्याची दुसरी पत्नी म्हणून ती भारतात आली आहे. रोझ भारतातील रूढी-परंपरा समजून घेऊन भारतीय समाजाशी एकरून होण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच राम आजारी पडतो. त्याची प्रकृती ढासळत जाते आणि त्याच सुमारास रामचा पहिल्या पत्नीपासून (मोना) झालेला मुलगा देव रोझला आपल्या मालमत्तेतील वाटा मिळू नये यासाठी दुष्ट कारवाया करू लागतो.त्यामुळे अस्वस्थ झालेली रोझ तिची मैत्रीण आणि भारत सरकारची एक प्रशासकीय अधिकारी असलेली सोनाली हिला आपली व्यथा सांगते.सोनाली एका बाजूला आणिबाणीच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहते आहे. तिला स्वतःची महत्त्वाकांक्षा आहे आणि तिच्या घरंदाज कुटुंबातील मानमर्यादांमुळे ती जखडली गेली आहे. या दोन मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखाखेरीज अन्य कितीतरी व्यक्तींची उपकथानकेही या कादंबरीत आहेत.गरीब जर आमच्यासारखे झगडले तर तेही श्रीमंत होतील अशी एक ठरावीक दर्पोक्ती श्रीमंत करत असतात. श्रीमंती ही आम्ही आमच्या कर्तृत्वाने मिळवलेली असल्याने तिचा उपभोग घेणे हा आमचा हक्कच आहे अशी त्यांची अहंकारी भूमिका असते. त्याचे उपरोधिक दर्शन घडवणे हे ‘रिच लाईक अस’ या कादंबरीचे मुख्य कथासूत्र आहे असे म्हणता येईल.श्रीमंती दुबळ्यांच्या पिळवणूकीखेरीज मिळत नसते हे सत्य कादंबरीला दाखवायचे आहे. या कदंबरीचा सखोल विचार आपण पुढील एका ब्लॉगमध्ये करणार आहोत.

याखेरीज ‘मिस्टेकन आयडेंटीटी’ (१९८८) , ‘’सिच्युएशन इन न्यू देल्ही (१९८९) आणि ‘लेसर ब्रीडस’ (२००३), ‘व्हेन मून शाईन्स बाय डे’’(२०१७) आणि ‘दी फेत ऑफ बटरफ्लाईज’ (२०१९) या कादंबऱ्याही नयनतारा सेहगल यांनी लिहिल्या आहेत.
‘मिस्टेकन आयडेंटिटी’ या कादंबरीत एका पूर्वीच्या संस्थानिकाच्या मुलाला पोलीस पकडतात. तुरूंगात असताना त्याची मार्क्सवादी, समाजवादी विचारसरणीच्या लोकांशी गाठ पडते आणि वैचारीक देवाणघेवाणीतून त्याचे विचार कसे बदलतात असे कथानक आहे.
‘व्हेन मून शाईन्स बाय डे’ या कादंबरीत रेहानाला आपल्या इतिहासकार वडिलांचे पुस्तक दुकानातून गायब झालेले दिसते इथून कादंबरी सुरू होते. अमेरिकेत आणि भारतात वाढत चाललेला भौतिकवाद आणि मूलतत्ववाद हा नयनतारा सेहगल यांना भविष्यातील भयंकर वास्तवाचा विचार करायला भाग पाडतो आणि त्यातून ही कादंबरीचे कथानक रचले गेले आहे.
‘दी लेसर ब्रिडस’ या नयनतारा सेहगल यांच्या कादंबरीचा प्रारंभ १९३२ मध्ये होतो. नरुल्ला नावाचा तेवीस वर्षांचा तरूण अमेरिकेतून शिकून अकबराबाद शहरात रहायला आला आहे आणि तो महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी साहित्य शिकवू लागला आहे इथपासून कथानक सुरू होते. नरूल्ला ज्या चॅटर्जी कुटुंबात राहतो आहे ते अहिंसक विचारांचे पुरस्कर्ते आहेत.नरूल्ला देखील अहिंसावादी स्वातंत्र्य चळवळीकडे ओढला जातो.परंतु जसजशी ‘लेसर ब्रिडस’चे कथानक पुढे सरकते तसे नरूल्ला अहिंसक चळवळीच्या विरोधात कर्मठपणे बोलू लागलेला दिसतो. आणि कादंबरी संपते तेव्हा १९६८ साली नरूल्ला हिंसेचा समर्थक झालेला आहे.नयनतारा सेहगल यांनी भारतीय समाजातील वाढत्या मूलतत्ववादी प्रवृत्तीकडे आपल्या या कादंबरीतून वाचकांचे लक्ष वेधले आहे.
नयनतारा सेहगल यांनी डॉ.दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, डॉ.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या निघृणपणे हत्या झाल्या होत्या तेव्हा विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही क्रूर हत्या आहे असे मानून त्याचा निषेध करण्यासाठी आपले साहित्य अकादमीचे पारितोषिक परत केले होते.
‘दी फेत ऑफ बटरफ्लाईज’ ही नयनतारा सेहगल यांची समकालीन परिस्थितीवर भाष्य करणारी कादंबरी आहे.जेव्हा तथाकथित संस्कृती रक्षकांच्या हाती सत्ता येते तेव्हा समाजात हिंसेला कसा ऊत येतो हे या कादंबरीत दिसते.विशेषतः निरागस स्त्रिया,तरूण या हिंसेच्या वणव्यात नष्ट होतात. अनेकांचा आत्मसन्मानाने, स्वतंत्र विचाराने जगण्याचा अधिकारच जणू अशा हिंसक प्रवृत्ती हिरावून घेतात हे ‘दी फेत ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी दाखवते. या कादंबरीचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. पुढील एका ब्लॉगमध्ये आपण या कादंबरीचा सविस्तर परिचय करून घेऊ.
नयनतारा मराठी वाचकांना परिचीत झाल्या त्या २०१९ मध्ये यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांचे नाव जाहीर केले गेले तेव्हा. परंतु नंतर ऐनवेळी त्यांना दिलेले आमंत्रण मागे घेण्यात आले.नयनतारा सेहगलांनी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडे आपले भाषण जेव्हा प्रसिद्धीसाठी पाठवले तेव्हा त्या भाषणातील भूमिका शासनविरोधी आहे आणि संमेलनासाठी तर शासनाकडून अनुदान घेतले जाते त्यामुळे शासनविरोधी भाषण संमेलनात करता येणार नाही या सबबीखाली संमेलनाच्या आयोजकांनी पळपुटी भूमिका घेतली होती.त्यामुळे विवेकी विचारवंतांनी विविध ठिकाणी निषेध सभा घेऊन आयोजकांवर टीकेची झोड उठवली. नयनतारा सेहगल यांचे भाषण मराठीत भाषांतरीत करून विविध वर्तमानपत्रांनी ते बेधडकपणे छापले. त्यामुळे बहुसंख्य वाचकांपर्यंत नयनतारा सेहगल यांची निर्भय भूमिका पोहोचली.आपल्या या भाषणात नयनतारा यांनी वाचकांना थेट प्रश्न विचारला होता की आपल्यामध्ये स्वातंत्र्याची पूर्वीची ती आस शिल्लक राहिली आहे का? आपल्या आधी होऊन गेलेल्या , भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्यात म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरूषांची नावे घेण्यास आपण पात्र आहोत का ? आपण काय खातो-पितो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच ईश्वराची प्रार्थना कशी करतो यावर नजर ठेवली जात असेल आणि या सर्व गोष्टींसंदर्भातील प्रत्येकाची भिन्न निवड अमान्य केली जात असेल तर आपले भविष्य अंधारलेले आहे असे नयनतारा सेहगल यांनी आपल्या साहित्य संमेलनात न झालेल्या भाषणात ठामपणे सांगितले होते. त्यांच्या आचारविचारांतील ही ठाम वैचारीक भूमिकाच त्यांना आणि त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला वेगळे वलय देणारी ठरते.
याखेरीज पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व कथन करणारी दोन पुस्तके नयनतारा सेहगल यांनी लिहिली आहेत. तसेच त्या आणि त्यांच्या दोन भगिनींनी मिळून त्यांच्या आई विजयालक्ष्मी पंडित यांच्या आयुष्यावर व त्यांचा स्वतःच्या जीवनावर पडलेल्या प्रभावाबद्दल एक कादंबरीही लिहिली आहे.
नयनतारा सेहगल यांचे ‘एनकाऊंटर विथ किरण’ हे पुस्तकही मराठी वाचकांना आवडू शकेल. त्यात नयनतारा आणि किरण नगरकर ( ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या मराठी कादंबरीचे लेखक)यांच्यातील मनोज्ञ पत्रव्यवहाराचे संकलन लेखिकेने केले आहे.
पुढील ब्लॉग्जमध्ये नयनतारा सेहगल यांच्या निवडक तीन कादंबऱ्यांचा सखोल परिचय आपण करून घेणार आहोत.
-गीता मांजरेकर

Leave a reply to Tejas उत्तर रद्द करा.