‘बॉम्बे टायगर’ ही कमला मार्कंडेय यांची कादंबरी २००८ मध्ये म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी प्रकाशित झाली. त्यांची ‘शालिमार’ (१९८२) ही कादंबरी आणि ‘बॉम्बे टायगर’ ही शेवटची कादंबरी या दरम्यान पंचवीस वर्षांचा काळ गेलेला दिसतो.पती निधनाचे दुःख, स्वतःच्या आरोग्याच्या समस्या आणि ब्रिटीश प्रकाशकांकडून मिळालेली सापत्न वागणूक यामुळे निराशाग्रस्त असतानाही कमला मार्कंडेय यांनी भारतीय वर्तमानपत्रांचे वाचन सुरू ठेवले होते.भारतात होणाऱ्या परिवर्तनांबद्दल त्या सजग होत्या. आपले लेखनही त्यांनी सुरू ठेवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर (२००४) एक टंकलिखीत बाड त्यांच्या मुलीला-किम ऑलिव्ह हिला मिळाले.या लेखनाला ‘दी कॅटॅलिस्ट तथा बॉम्बे टायगर’हे नाव लेखिकेने दिले होते. किमने आपल्या आईचे ते लेखन अमेरिकन विद्यापीठातील इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आणि कमला मार्कंडेय यांचे स्नेही चार्ल्स लार्सन यांना संपादनासाठी दिले. २००८ मध्ये चार्ल्स लार्सन यांच्या प्रस्तावनेसह ‘बॉम्बे टायगर’ या नावाने ही कादंबरी प्रसिद्ध झाली.आजच्या ब्लॉगमध्ये आपण ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीमधील कथासूत्रे आणि कथानक-उपकथानके थोडक्यात समजून घेणार आहोत.ज्यांना हा ब्लॉग वाचणे शक्य नसेल पण ऐकण्याची इच्छा असेल अशा श्रोत्यांसाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
पार्श्वभूमी, कालावकाश आणि कथासूत्रे
‘बॉम्बे टायगर’ ही ३२७ पृष्ठांची प्रदीर्घ कादंबरी आहे. या कादंबरीत कथानक आणि उपकथानकांचे आडवे-उभे ताणेबाणे एकमेकांत घट्ट गुंतलेले आहेत.त्यामुळे कथासूत्रे किंवा आशयसूत्रेही एकापेक्षा अधिक आहेत.

कादंबरीचे नावच ‘बॉम्बे टायगर’ हे असल्याने स्पष्टच आहे की कादंबरीच्या कथानकाचा अवकाश ‘मुंबई’ महानगर हेच आहे. साधारण १९८० च्या दशकातील मुंबईच्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी तरलपणे या कादंबरीत जाणवत राहते. काळाच्या अक्षावर कादंबरी क्वचित भूतकाळात श्रीरंगपट्टण गावात जात असली तरी प्रामुख्याने ती मुंबईत घडणारी आणि पुढे पुढे जाणारी सरळरेषीय कादंबरी म्हणावी लागेल.कादंबरीतील कथन कधी तृतीय पुरूषी आहे तर बरेचवेळा ते पात्रमुखी झालेले दिसते.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे चाळीस वर्षांपर्यंत भारतीय शासनाची ध्येयधोरणे समाजवादी विचारसरणीशी नाते सांगणारी होती. पण साधारण ८० च्या दशकापासून ती हळूहळू अधिकाधिक उजवीकडे झुकू लागली आणि भांडवलदारीला चालना मिळू लागली. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे परदेशी गुंतवणूक वाढू लागली. उद्योगधंदे वाढू लागले, भांडवलदार अधिकाधिक श्रीमंत होऊ लागले.तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांत क्रांती घडवली पण कामगारांची परिस्थिती मात्र फारशी बदलली नाही.विषमतेची दरी रूंद होऊ लागली. उद्योगधंद्यांची वाढ नैसर्गिक पर्यावरणाला धोकादायक ठरू लागली.
संपूर्ण जगात अशाच प्रकारचे परिवर्तन या काळात दिसू लागले होते.अशावेळी भारतासारख्या विकसनशील देशाने कोणत्या प्रकारच्या विकासाला प्राधान्य द्यायचे ? केवळ मूठभरांचा भौतिक विकास भारतातील सर्वसामान्यांचे कल्याण करू शकेल का ?बाजारकेंद्री अर्थव्यवस्था भारतात सर्वांगीण विकास आणू शकेल का?उच्चभ्रू आत्मकेंद्रीत युवापिढी भारताचे भविष्य घडवू शकेल का ? असे प्रश्न निर्माण होऊ लागले. ‘बॉम्बे टायगर’ ही कादंबरी या सगळ्या प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधते. आपण ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीतून सामोरी येणारी कथासूत्रे किंवा आशयसूत्रे पाहूः
- ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीचे मध्यवर्ती कथासूत्र माणसाची भौतिक संपन्नता आणि आंतरीक समृद्धी यांच्यातील संघर्ष हे आहे. माणसांचा भौतिक समृद्धतेचा हव्यास आणि अविवेक संपूर्ण मानवजातीला विनाशाकडे नेणारा ठरेल याची जाणीव ही कादंबरी वाचकांना देते.
- द्वेषाची अखेर दुःखातच होते हे सांगणे हेही कादंबरीचे एक कथासूत्र आहे.
- व्यक्तीवादी आत्मकेंद्रीतता आणि गुलामगिरीकडे जाणारी भावनाधीनता (अंधश्रद्धा) शेवटी सर्वनाश करणारी ठरते असे कादंबरीचे एक आशयसूत्र आहे असे म्हणता येईल.
- पाश्चात्य विशेषतः ख्रिस्ती धर्मातून आलेल्या विचारसरणीच्या अंधानुकरणाने भारतीय समाजातील विशेषतः उच्चमध्यमवर्गीय तरूणांची वागणूक अवास्तव बनत चालली आहे हेही ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीला दाखवायचे आहे.
कथानक आणि व्यक्तिरेखा
‘ बॉम्बे टायगर’ या कादंबरीतील ‘टायगर’ ठरेल अशी प्रमुख व्यक्तिरेखा गोपाळ गोखले (ज्याने पुढे गांगुली हे टोपणनाव घेतले आहे) जो मुंबईतील सर्वात वेगाने श्रीमंत होच चाललेला भांडवलदार आहे.आणि दुसरी प्रमुख व्यक्तिरेखा डॉ.राजीव पांडे जो गांगुलीने सुरू केलेल्या महात्मा गांधी दवाखान्याचा संचालक आहे. कादंबरीच्या कथानकात या दोघांचा संघर्ष तात्विक पातळीवरचा आहे.एकाकडे भौतिक संपत्तीतून आलेली सत्ता व आक्रमकता आहे तर दुसऱ्याकडे मानवी मूल्यांवरील श्रद्धा,सेवावृत्ती यामुळे मिळालेले सर्वसामान्य माणसांच्या प्रेमाचे धन आहे.दोघेही आपापल्या तत्वांवर ठाम आहेत.
गांगुलीचा तपशीलवार जीवनपट मांडणारी ही कादंबरी आहे. गांगुली ही विकसनशील व्यक्तिरेखा आहे.आयुष्यातले अनेक चढ-उतार अनुभवलेल्या या व्यक्तिरेखेत हळूहळू कसे परिवर्तन होत जाते हे ‘बॉम्बे टायगर’च्या कथानकातून वाचणे औचित्यपूर्ण ठरेल.गांगुली ही त्याच्या सभोवतीच्या माणसांच्या आयुष्यात बदल आणणारी आणि त्या प्रक्रियेत स्वतःही बदलत जाणारी व्यक्तिरेखा आहे असे म्हणता येईल. त्यामुळे ‘दी कॅटॅलिस्ट’ हे या कादंबरीचे पर्यायी शीर्षकही समर्पक ठरेल.
भारताच्या इतिहासात ब्रिटीशांनी भारतावर लादलेली गुलामी, एतद्देशियांची केलेली पिळवणूक, फसवणूक ही फार खोल जखम आहे.’बॉम्बे टायगर’च्या कथानकात अगदी अल्पकाळ येऊन गेलेली व्यक्तिरेखा म्हणजे पंडित पांडे या जखमेबद्दल उद्वेगाने बोलतो.पंडित पांडे हा गोखले आणि त्याचा शाळा सोबती नरहरी राव यांचा इतिहासाचा शिक्षक आहे.कर्नाटकातील श्रीरंगपट्टण या एके काळी टिपू सुलतानाची राजधानी असलेल्या नगरात गोपाळ गोखले आणि नरहरी राव ही मुले स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आली आहेत. तिथल्याच सरकारी शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पार पडले आहे. संस्कृत,गणित आणि इतिहास हे तीन विषय शिकवणारे पंडित पांडे यांचा प्रभाव या मुलांच्या बालमनावर खोल झाला आहे. विशेषतः इतिहास शिकवताना पंडित पांडे “त्यांचा(ब्रिटिशांचा) हव्यास आणि आपला (भारतीयांचा) मूर्खपणा” हे आपल्या गुलामगीरीचे, पिळवणुकीचे मुख्य कारण आहे असे विधान पुनःपुन्हा करत. ते गोखलेच्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. ब्रिटिशांनी व्यापाराच्या बळावर आपली पिळवणूक केली आणि आपण मूर्खासारखे ही फसवणूक सहन करत राहिलो हा भूतकाळ आपण बदलायचा असे गोखलेने मनोमन ठरवून टाकले आहे. त्याला ब्रिटीशांसारखे व्यापारी व्हायचे आहे, सत्ताधारी व्हायचे आहे.त्यासाठी शिक्षण घ्यावे लागणार आहे,उद्योगधंदा सुरू करावा लागणार आहे, व्यापार करावा लागणार आहे. गोखलेच्या दुर्दैवाने हे सगळे करण्यासाठी अनुकूल परिस्थिती त्याला मिळालेली नाही.भाऊबंदकीमुळे श्रीरंगपट्टणमधील त्यांचा राहता वाडा अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडताना त्याने पाहिला आहे.(पुढे त्यामागचा कर्ताकरविता त्याचा शाळामित्र राव होता हे त्याला कळले आहे) तरीही जिद्दीने शिक्षणासाठी त्याने मुंबई गाठली आहे.
गोखलेचा शाळासोबती नरहरी राव हा मूळचाच हुशार आहे. विशेषतः गणितात त्याला गती आहे. शिवाय त्याची घरची परिस्थितीही अनुकूल आहे.गोखले खूप हुशार नसला तरी जिद्दी,मेहनती आहे. अभ्यास असो की पोहणे गोखलेने आपली शारीरिक आणि मानसिक ताकद पूर्ण पणाला लावून अव्वल स्थान मिळवले आहे.नरहरी रावला गोखलेबद्दल शाळेत असल्यापासूनच असूया वाटते आहे .त्याचे ध्येय पैसा कमावणे हे आहे.पण आपण कसे पैशाच्या मागे नाही,साधी राहणी-उच्च विचारसरणी मानणारे आहोत हे दाखवायला नरहरी रावला आवडते.त्याचे एकूण जगणेच ढोंगीपणाचे,सामाजिक प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना असणारे आहे. खरं तर, गोखलेच्या आधीच राव मुंबईत दाखल झाला आहे.गणितात गती असल्याने त्याने बॅंक आणि आर्थिक सल्लागार क्षेत्रात आपले बस्तान बसवले आहे.परंतु नंतर मुंबईत आलेल्या शाळासोबत्याला- गोपाळ गोखलेला तो कोणतीच मदत करू शकलेला नाही. आणि गोखलेचे स्वप्न तर खूप मोठ्ठं आहे.ते पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छाशक्तीही त्याच्याकडे आहे.
गोखले (गांगुली) मुंबईत शिक्षण तर घेतोच पण त्याबरोबर भारताची आर्थिक राजधानी म्हणून वाढणाऱ्या मुंबई शहराच्या गरजा काय आहेत याबद्दल निरीक्षण करत राहतो.मुंबईत इमारती वाढणार आहेत,रस्ते,पूल मोटारी वाढणार आहेत हे गोखलेच्या लक्षात येते. कमी भांडवल आणि स्वस्त श्रमशक्ती याआधारे आधी विटा,मग सिमेंट, त्यानंतर यंत्रे बनवणारे उद्योग गांगुली (मुंबईत आल्यावर गोखले नाव बदलून गांगुली करतो) सुरू करतो. कर्नाटकात त्याने आपला चंदनाचे तेल बनवण्याचा कारखानाही सुरू केला आहे. बाजारात आपली विश्वसनीयता वाढवून गांगुली परदेशी गुंतवणूकदारांना त्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करतो.नुसते बोलायचे नाही तर प्रत्यक्षात आणायचे ही गांगुलीची पद्धत आहे. तो मोठी स्वप्ने पाहतो आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करतो.त्यामुळे अल्पावधीत गांगुली हा मुंबईचा ‘टायगर’ , मुंबईतला एक बडा उद्योजक म्हणून नावारूपाला आला आहे.स्पर्धेत टक्कर देण्यासाठी साम, दाम, दंड,भेद यापैकी कोणतेही मार्ग वापरायची गांगुलीला सवय झाली आहे.त्याबद्दल त्याला वैषम्य वाटत नाही. एखाद्या दगडासारखा त्याचा स्वभाव कठोर,व्यवहारी झाला आहे.
नरहरी रावने आपल्या नोकरी-व्यवसायात यश मिळवले होते. माटुंग्यात स्वतःचे घर बांधले होते. वृद्ध आई-वडील,पत्नी,दोन मुले असे त्याचे कुटुंब झाले होते.शेषू हा नरहरी रावचा मुलगा अभ्यासात फारसा हुशार नसल्याने वडिलांच्याच कार्यालयात काम करत असे. नुकतेच शेषूचे लग्न होऊन त्याला एक मुलगा झाला होता.खरं तर, यात त्याने समाधानी असायला हवे होते पण रावच्या मनातील गांगुलीबद्दलची लहानपणापासूनची असूया संपलेली नव्हती.गांगुलीचे प्रस्थ मुंबईत वाढत चालले आहे ही गोष्ट नरहरी रावला अस्वस्थ करणारी होती. वरवर तो गांगुलीबद्दलचा मत्सर दाखवत नसला तरी त्याच्या अंतर्मनात हा मत्सर,द्वेष कायम धगधगत होता. या द्वेषानेच अखेरीस त्याचे आयुष्य दुःखी झालेले दिसते.त्यामुळे द्वेषाची अखेर दुःखातच होते हे सांगणे हेही कादंबरीचे एक कथासूत्र आहे.
गांगुली कौटुंबीक सुखाच्याबाबतीत दुर्दैवी ठरला होता.त्याचे लग्न झाले होते पण मुलीला जन्म दिल्यावर क्षुल्लक आजार होऊन त्याच्या पत्नीचे अकाली निधन झाले होते.तो आणि चंद्रलेखा ही एकुलती मुलगी हेच काय ते गांगुलीचे कुटुंब झाले होते.आपल्या व्यस्ततेमुळे चंद्रलेखाला (लेखा याच नावाने ती ओळखली जाते) गांगुली पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता.लहान असताना आपल्या कारखान्यांत तो तिला सोबत घेऊन जाई.कामगारांची ती लाडकी बनली होती. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेखाला नाटकात काम करायला मिळे आणि त्यावेळी होणारे कौतुक पाहून आपण मोठेपणी नाटक किंवा चित्रपटात कलावंत व्हायचे हे तिने ठरवून टाकले होते.गांगुलीने आपल्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. तिला पाहिजे ते सगळे त्याने नेहमीच तिला आणून दिले आहे.लेखाला पाळीव प्राणी आवडतात,मुक्तपणे भटकायला आवडे.तरूण झाल्यावर तिने आपल्याला स्वतंत्र,एकटं राहायचं आहे हे वडिलांना सांगून स्वतःसाठी आलिशान फ्लॅट वडिलांकडून मागून घेतला होता.पण मूळात लेखा एक नाजूक, भावनाशील, स्वप्नाळू मुलगी होती. तिच्या या स्वभावामुळेच ती भावनेच्या आहारी जाऊन वहावत गेली.त्यामुळे तिच्या आयुष्यात एवढी गुंतागुंत निर्माण झाली की ज्यात ती स्वतः तर संपलीच पण स्वतःच्या वडीलांनाही तिने संकटात टाकले.म्हणून,व्यक्तीवादी आत्मकेंद्रीतता आणि गुलामगीरीकडे जाणारी भावनाधीनता(अंधश्रद्धा) शेवटी सर्वनाश करणारी ठरते असे कादंबरीचे एक आशयसूत्र आहे असे म्हणता येईल.
नरहरी राव आणि गोखले यांचे शाळाशिक्षक पंडित पांडे यांच्या दुसऱ्या बायकोपासून त्यांना झालेला एकुलता एक मुलगा राजीव पांडे. हा देखील हुशार आहे आणि वडिलांच्या निधनानंतर तोही मुंबईत शिक्षण घेण्यासाठी येतो. त्याच्यातील बुद्धीची चमक आणि सेवाभाव पाहून मुंबईतील त्याच्या शाळेतील फादर बेंजामिन यांचा तो लाडका विद्यार्थी होतो. ते राजीवला परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करतात.राजीव परदेशातून मुंबईत परततो पण तोपर्यंत फादर बेंजामिन यांचे निधन झाले आहे. नरहरी रावचा मुलगा शेषू राजीवच्याच शाळेत शिकला होता आणि राजीवने त्याला दांडगट मुलांपासून नेहमी वाचवले होते. ही मैत्री आणि उपकार स्मरून शेषू नोकरी मिळेपर्यंत राजीवला आपल्या घरी रहायला बोलावतो.राजीवला मुंबईत लहानशी नोकरी मिळते पण घर मिळेपर्यंत तो राव यांच्याच घरी मुक्कामाला आहे. नरहरी राव यांची पत्नी त्याला आपला भावी जावई बनवण्याची योजना आखते आहे. पण राजीवला रावांच्या कन्येपेक्षा शेषूची पत्नी शकुंतलाच अधिक आकर्षक वाटते. नुकतीच आई झालेली शक्कु ,तिच्या चेहऱ्यावरील बाळासाठीच्या वात्सल्यामुळे त्याला विलक्षण सुंदर वाटते. शेषू शक्कुला पुरेसे सुख देत नसावा असे राजीव पांडेला वाटते आहे. मात्र आपापली मर्यादा राजीव वा शक्कु दोघेही शेवटपर्यंत ओलांडत नाहीत. नरहरी रावला गांगुली काहीतरी नवा समाजोपयोगी प्रकल्प सुरू करणार आहे आणि त्या प्रकल्पाची व्यवस्था पाहण्यासाठी त्याला डॉक्टरची गरज आहे असा सुगावा लागताच तो डॉ.राजीव पांडेला गांगुलीकडे पाठवायचा बेत करतो. गांगुलीच्या गोटातील सगळी बित्तंबातमी राजीवच्या मार्फत आपल्याला कळेल असा त्याचा अंतःस्थ हेतू आहे.
राजीव पांडे हा पैशांच्या मागे नाही आणि त्याची सेवाभावी वृत्ती ही आपल्या मनातील कामगारांच्यासाठीच्या दवाखान्याला साजेशी आहे हे पाहून गांगुली त्याच्यावर नियोजित दवाखान्याची सगळी जबाबदारी सोपवतो.डॉ.राजीव निरलस प्रयत्न आणि सेवाभावी वृत्तीने महात्मा गांधी दवाखाना नावारूपाला आणतो. केवळ गांगुलीच्या कारखान्यातील कामगारच नव्हेत तर मुंबईतले अनेक गोरगरीब या दवाखान्यात उपचार घेऊन बरे होतात.डॉ.राजीवला दुवा देतात.
गांगुलीच्या सहवासातले सगळे त्याच्या आक्रमक, सत्ता गाजवणाऱ्या वृत्तीमुळे दबलेले असताना डॉ.राजीव पांडे मात्र गांगुलीशी निर्भयपणे, स्पष्ट बोलतो.गांगुलीला कामगारांसाठी दवाखाना का सुरू करायचा आहे याबद्दल तो जाणून घेतो. गांगुली त्याच्या कामगारांशी मित्रत्वाने वागणारा असला तरी कामगारांकडे तो अधिकाधिक उत्पादन, कमीत कमी वेळात आणि कमी पैशांत करणारे लोक म्हणूनच पाहतो आहे हे राजीव पांडेला जाणवते. परदेशी गुंतवणूक हवी असेल तर कामगार कल्याणाचे उपक्रम करतो आहोत हे दाखवणे भाग आहे या नाइलाजापोटीच गांगुली कामगारांसाठी दवाखाना सुरू करणार आहे हे डॉ.पांडेला कळते.गांगुलीला परदेशी गुंतवणूकदारासोबत रेफ्रिजरेटरचे उत्पादन करायचे आहे. मुंबईतल्या कामगारांनाही परवडतील असे रेफ्रिजरेटर त्याला बनवायचे आहेत. त्यात त्याला मोठेपणा वाटतो आहे. परंतु डॉ.राजीव पांडे त्याला जाणीव देतो की परदेशी गुंतवणुकदाराकडून भांडवल घेऊन गांगुली जे फ्रिज बनवणार आहे ते जुन्या तंत्रज्ञानावर आधारलेले असणार आहेत.हे जुने तंत्रज्ञान वापरले तर फ्रिज बनवणारा त्याचा कारखाना प्रचंड प्रमाणात दूषित वायू हवेत फेकणार आहे ज्याने पर्यावरणाची न भरून निघणारी हानी होणार आहे.गांगुलीला त्याबद्दल पर्वा वाटत नाही. प्रदूषण परदेशी कंपन्याना करतात आणि त्यांना जगातील प्रदूषणाची काळजी नसेल तर आपण ती का करावी असा गांगुलीचा सवाल आहे. राजीव पांडे त्याला जाणीव करून देतो की परदेशी लोक प्रदूषण करणारे जुने तंत्रज्ञान नाकारत आहेत आणि स्वतःच्या देशांतील पर्यावरण जपत आहेत. आपण मात्र सगळ्यांना परवडणारे फ्रिज देण्याच्या नादात पर्यावरण आणि पर्यायाने लोकांचे प्राण धोक्यात आणणार आहोत. पूर्वी त्यांचा (ब्रिटीशांचा) असलेला हव्यास आता आपल्यातही भिनला आहे आणि पूर्वीचा आपला (भारतीयांचा) मूर्खपणा शिक्षणाने संपला असला तरी वैज्ञानिक दृष्टी न स्वीकारल्याने अविकेकी प्रवृत्ती संपलेली नाही.आपला हा हव्यास आणि अविवेक संपूर्ण मानवजातीला विनाशाकडे नेणारा ठरेल याची जाणीव गांगुलीला आणि पर्यायाने वाचकांना देणे हे कादंबरीचे मध्यवर्ती कथासूत्र ठरेल.
गांगुलीच्या मुलीच्या भावनिक दुबळेपणामुळे जे काही प्रसंग गांगुलीच्या आयुष्यात येतात तिथे डॉ.राजीव त्याला साथ देत नाही.आपल्या तत्वांवर तो ठाम राहतो.परिणामी गांगुली एकटा पडतो,झुंडीच्या भावनेच्या लाटेवर स्वार झाल्याने त्याच्याकडून हिंसक कृती होते.गुन्हेगार म्हणून तो तुरूंगात जातो.डॉ.राजीवबद्दलच्या सूड भावनेने तो कामगारांसाठीचा महात्मा गांधी दवाखाना बंद करतो.डॉ.राजीवचे कार्यक्षेत्र, त्याचे माणुसकीवर आधारलेले साम्राज्यच गांगुली हिरावून घेतो. डॉ.पांडे एकाकी होतो ,काम त्याला मिळते पण त्याने उभारलेला दवाखाना नामशेष होतो.गांगुलीबद्दल अतीव चीड पांडेच्या मनात निर्माण होते.तो त्या भेटायला जाणेही टाळतो.पण जेव्हा तुरूंगात निराशाग्रस्त होऊन गांगुली आत्महत्येचा प्रयत्न करतो.तेव्हा मात्र गांगुलीने उगवलेला सूड विसरून पुन्हा एकदा डॉ.राजीव पांडेच गांगुलीच्या मनात जगण्यासाठी एक चिवट आशावाद जागवतो.
वस्तुतः डॉ.राजीवच्या वाट्यालाही एकटेपणा आला आहे.पण त्याने त्याच्या कामालाच जणू देव मानल्याने तो त्यात सतत व्यस्त राहतो. त्याच्यासाठी योग्य जोडीदार शोधायला कोणी नातेवाईक नाहीत.मुंबईत आल्यावर ज्या दोन स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या आहेत त्यातील शक्कु अप्राप्य आहे तर मिस थेरेसा पिंटो त्याच्यावर प्रेम करत असली तरी तिच्या आवाहकतेत राजीवला तिचे दैन्य व याचना दिसते.तिचा उत्फुल्ल सहवास त्याला आवडतो पण जोडीदार म्हणून ती त्याला साजेशी वाटत नाही.डॉ.जीनवालासारखा मित्र राजीवला आहे पण तोही एका मर्यादेपलीकडे राजीवला दिलासा देऊ शकत नाही.फादर बेंजामिन या संततुल्य माणसावर डॉ.राजीवची श्रद्धा आहे पण अमेरिकन दिग्दर्शक सॅबेस्टियनने फादर बेंजामिनवर बनवलेल्या चरित्रपटातून त्यांची जी भ्रष्ट प्रतिमा उभी केली आहे त्यामुळे राजीव मनोमन दुखावला गेला आहे.विशेष म्हणजे या दिशाभूल करणाऱ्या चित्रपटासाठी गांगुलीने भांडवल पुरवले हे त्याला अधिकच उद्विग्न करणारे ठरले आहे.अखेरीस त्याच्या महात्मा गांधी दवाखान्यातील सिस्टर चॅटर्जी यांच्या मांडीवर आपले प्राण सोडताना डॉ.राजीव पांडेला क्षणभरासाठी हवे असलेले वात्सल्य मिळते.डॉ.पांडेची ही शोकांतिका वाचकांच्या मनाला चटका लावून जाते.
कामगारांसाठी दवाखाना उभारणे हा गांगुलीचा केवळ दिखावा आहे आणि त्याने आपल्या अंतर्मनाची साक्ष काढून मूळातूनच आपली उद्योग धोरणे बदलली पाहिजेत असे डॉ.राजीव पांडेला वाटते.तसे तो गांगुलीला परोपरीने पटवू पाहतो. गांगुली अर्थातच राजीव पांडेला वेड्यात काढतो. फक्त साध्य चांगले असून चालत नाही तर ते साध्य करण्यासाठी वापरलेली साधनेही नैतिक असावी लागतात असे डॉ.पांडेचे म्हणणे आहे. गांगुलीच्या मते श्रीमंत होण्यासाठी असे मार्ग निवडावेच लागतात आणि ते क्षम्य असतात.पण पुढे अशा काही घटना घडतात की ज्यामुळे अखेरीस गांगुलीला खरोखरच आपल्या अंतर्मनातील माणुसकी जागवावी लागते.डॉ.राजीवची तत्वे त्याला स्वीकारावी लागतात. कामगारांसाठी महात्मा गांधी दवाखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गांगुली घेतो. प्रत्यक्ष डॉ.राजीव पांडे त्याच्यातील हे परिवर्तन पाहू शकत नाही पण दुसरा एक छोटा राजीव मात्र गांगुलीचे दोलायमान मन हळूहळू त्याच्या निर्णयावर ठाम झालेले पाहतो.
या कादंबरीचा आणखीन एक हेतू पाश्च्यात्य देशांतून आणि ख्रिस्ती धर्मातून येणाऱ्या आचारविचारांचे आकलन करून न घेता,त्यांना नको एवढे महत्त्व देणारी स्वातंत्र्योत्तर काळातील उच्चमध्यमवर्ग तरूण पिढी दाखवणे हाही आहे. ही मुले मिशनरी शाळेत शिकतात.तिथल्या उपदेशकांच्या उपदेशाने भारावून जातात.पण प्रत्यक्ष समाजात न वावरल्यामुळे या तरूणांना वास्तवाशी नाते न जोडता येत नाही.त्यामुळेच त्यांचे आयुष्यातील निर्णय चुकतात असे म्हणता येईल.विशेषतः लेखा,मंजुळा आणि त्यांचे श्रीमंत ,व्यक्तीवादी मित्रमैत्रिणी असेच वास्तवाचे भान नसलेले आहेत.तर शेषूला त्याच्या वडिलांनी त्याची कायम हेटाळणी केल्यामुळे न्यूनगंड आहे आणि तो भरकटत गेला आहे.
याखेरीज ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीत अनेक छोट्या व्यक्तिरेखा आहेत.लॉयर कोठारी, अकाउंटंट कृष्णा, पार्टनर माथुर,डॉ.जीनवाला या पुरूष व्यक्तिरेखा त्यात आहेत तशाच मिसेस राव,मिसेस कोठारी,मंजुला आणि भटक्या तांड्यातील मनमुक्त नृत्य करणारी पण वस्तुनिष्ठ विचार करणारी धीट तरूणीही या कादंबरीत आहे.या सर्वांचे स्वतःचे असे जगण्याचे तत्वज्ञान आहे जे लेखिकेने कथनातून वाचकांसमोर ठेवले आहे.
एखाद्या गुंतागुंत असलेल्या आणि उकल होत जाणाऱ्या चित्रपटासारखे ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीचे हे कथानक तुम्हाला वाटेल.या कथानकात अनेक छोटे छोटे दुवे आहेत पण ते लेखिकेने मोकळे सोडलेले नाहीत तर नेमके जोडले आहेत.कथानक प्रारंभी संथ आहे पण ते योग्यवेळी कलाटणी घेते आणि शेवटाकडे येताना गतीमान होते.कथानकातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना लेखिकेने अचूक परस्परांशी जुळवल्या आहेत.त्यामुळे कथानकात असंभवनीयता वाटत नाही.एक सुघटीत आणि निश्चित दृष्टिकोन असलेले कथानक हे ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीचे वैशिष्ट ठरते.

तुम्हाला हा ब्लॉग वाचून ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीबद्दल उत्सुकता वाटली का ते जरूर कळवा.पुढील ब्लॉगमध्ये ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीच्या कथनाचे आपण विश्लेषण करू.
-गीता मांजरेकर
**************************************************************************

यावर आपले मत नोंदवा