मागील ब्लॉगमध्ये कमला मार्कंडेय या देशांतरीत भारतीय इंग्रजी लेखिकेच्या एकूण लेखन कर्तृत्वाचा धावता आढावा आपण घेतला. आता कमला मार्कंडेय यांच्या निवडक तीन कादंबऱ्यांचा अधिक सखोल शोध घेता येईल का ते पाहायचे आहे.तसे करताना लेखिकेचा सामाजिक दृष्टिकोन आणि तिच्या कादंबऱ्यांची रचना वैशिष्ट्ये या अंगाने मी साक्षेपी लेखन करणार आहे.या लेखात मी ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ ( १९६०) या कादंबरीचा आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने विचार करायचे ठरवले आहे.ज्यांना ब्लॉग वाचणे शक्य नसेल पण ऐकणे सोयीचे आहे अशा श्रोत्यांसाठी सोबत या लेखनाची श्राव्य (ऑडिओ) फाईल जोडली आहे.
काही समकालीन संदर्भांची पार्श्वभूमी
नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली. सर्व संतांच्या वचनांची आठवण काढली गेली. मध्ययुगातले हे संत ईश्वराला अनन्यभावे शरण जातात . त्यांना ईश्वराची नीजखुण कळली आहे.आपल्या अंतरात्म्यातील सर्व भूतमात्रांसाठीची दया,क्षमा,शांती आणि सर्वांभूती परमेश्वर असल्याची जाणीव हेच त्यांना कळलेले ब्रह्मज्ञान आहे.म्हणूनच…..
“मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त”असे संताचे वर्णन तुकोबा महाराज करतात. ढोंगी संत तेव्हाही होतेच ! त्यांचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात-
“मुखे बोले ब्रह्मज्ञान I मनी धनअभिमान
ऐशियाची करी सेवा Iकाय सुख होय जीवा
पोटासाठी संत I झाले कलीत बहुत
विरळा ऐसा कोणी I तुका त्यासि लोटांगणी”
अलीकडे घडलेल्या काही घटना आठवा…हातरस येथे एका अध्यात्मिक बाबाच्या प्रवचनाला जमलेल्या लाखो लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन कित्येक निरपराध माणसे मरण पावली.अशीच घटना नवीमुंबईजवळ एका प्रवचनकाराच्या सभेतही काही महिन्यांपूर्वी झाली होती. प्रखर उन्हाच्या तडाख्याने त्या प्रवचनाला जमलेल्या जमावातील काहींचा बळी गेला होता. खरं तर, कितीतरी साधू, बाबांचे व्यभिचार उघडकीस आले आहेत.आणि तरीही लोकांना एखाद्या अध्यात्मिक गुरू,बाबा, बुवावर अंधविश्वास ठेवावासा वाटतो. ही कशाप्रकारची मानसिकता आहे? आपण आधुनिकता केवळ बाह्यात्कारी स्वीकारली आहे की काय ?असा प्रश्न पडावा असे हे प्रसंग.
युरोपात आधुनिकता आली ती विज्ञान आणि विवेकाला सोबत घेऊन. अनेक वैज्ञानिक शोध आधुनिक काळात ( १४ वे शतक ते १७वे शतक ) युरोपात लागले. तसेच ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरूंवरील श्रद्धेला लोक प्रश्न विचारू लागले.यातूनच विवेकवादाचा (Rationalism) जन्म झाला.लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रूजू लागली.भारतात आधुनिक काळाचा प्रारंभ इंग्रज आल्यानंतर त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे झाला.विशेषतः बंगाल प्रांत आणि मुंबई प्रांत इथे नवशिक्षितांमध्ये वैचारीक घुसळण होऊ लागली, सुधारणावादी चळवळी सुरू झाल्या. याच काळात ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज ,सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.बंगाल प्रांतात राजा राममोहन रॉय,ईश्वरचंद्र विद्यासागर तर मुंबई प्रांतात न्यायमुर्ती रानडे,लोकहितवादी, महात्मा फुले,पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर,महर्षी कर्वे हे समाजसुधारक आपल्या वैचारिक लेखनातून आणि प्रत्यक्ष सामाजिक चळवळीतून समाजप्रबोधन व सुधारणा रूजवण्याचा प्रयत्न करू लागले.त्याही काळात त्यांना प्रतिगामी विचारांच्या मंडळींचा विरोध सहन करावा लागलाच पण तरीही ते नेटाने आपले कार्य करत राहिले.या समाजसुधारकांत पुढे विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,साने गुरूजी, गाडगे बाबा अशा अनेकांची भर पडली.
या पूर्वेतिहासामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एक प्रागतिक विचारांचा समाज यापुढे वाढत राहील अशी रास्त अपेक्षा अनेक सामाजिक जाणीव असलेल्या असलेल्या नेत्यांनी केली. सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार,विषमता दूर करण्यासाठी कृषी व उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या.एक विवेकवादी, विज्ञानवादी भारत निर्माण करण्याचाच प्रारंभीच्या राजकीय , सामाजिक नेतृत्वाचा प्रयत्न होता.या पार्श्वभूमीवर कमला मार्कंडेय यांनी लिहिलेली ‘अ सायलन्स ऑफ डिझायर’ ही कादंबरीतील कथानक आपण जाणून घेऊया.

कथानक
‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ ही १९६० साली प्रकाशित झालेली कमला मार्कंडेय यांनी लिहिलेली कादंबरी आहे. स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारतात अंधश्रद्धा विरूद्ध विवेकवाद यात घडलेल्या संघर्षाची ही एक अतिशय साध्या शैलीत सांगितलेली कहाणी आहे.या कथेत गूढ असे काही नाही पण सर्वसामान्यांच्या जगण्यातला वास्तववाद मात्र आहे.कुटुंबकथा आहे ही साधीच पण आजही लक्षात घेण्यासारखी. कुटुंबातील गृहिणी जर अज्ञानामुळे,भयामुळे वा अहंकारामुळे पतीशी संवाद साधण्याऐवजी भलत्याच कोणावर अंधविश्वास ठेवू लागली तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य कसे बिघडते ते कमला मार्कंडेय या कादंबरीतून दाखवतात.
दांडेकर हा ब्रिटीशांच्या शिक्षणव्यवस्थेतून तयार झालेला एक कारकून या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. दांडेकरला आपल्या या मध्यमवर्गीय चौकटीतील यशाबद्दल अभिमान आहे.तो एक साधा कारकून आहे आणि तरी एका चाळीत सहा खोल्या त्याला भाड्याने घेता आलेल्या आहेत.त्याही तळमजल्यावर आहेत.सार्वजनिक नळाचे पाणी त्याला सर्वप्रथम मिळते आहे.पारंपरिक कुटुंबवत्सल, श्रद्धाळू, सगळ्या मागण्या पुरवणारी निष्ठावान बायको, दोन मुली एक मुलगा ही दांडेकरसाठी भाग्याची गोष्ट आहे.
अचानक त्याच्या पत्नीची सरोजिनीची वर्तणूक बदलते .त्यामुळे दांडेकरला प्रथम तिचा कोणी लग्नापूर्वीचा प्रियकर पुन्हा तिच्या आयुष्यात आलाय की काय असा संशय येतो. तो त्याबद्दल तिच्यावर दोषारोप करतो. पण नंतर त्याच्या लक्षात येते की सरोजिनी ज्या माणसाला भेटायला जाते तो एक लोकांना श्रद्धेच्या बळावर बरं करणारा स्वामी आहे.सरोजिनी तिच्या पोटात वाढणारी गाठ बरी करायला त्याच्याकडे जात असते.दांडेकरला त्याच्या शिक्षणाबद्दल अभिमान आहे. एका सुशिक्षित माणसाच्या बायकोने कोणत्यातरी स्वामीच्या नादी लागणे ही त्याच्यासाठी अप्रतिष्ठेची गोष्ट आहे.ब्रिटीशांच्या शिक्षणव्यवस्थेतून तयार झालेल्या त्याच्या मानसिकतेला सरोजिनीचे वागणे अजिबात पटत नाही. सरोजिनीने उचित डॉक्टरी सल्ला घेऊन शस्त्रक्रिया करवून घ्यावी असे त्याचे मत आहे.सरोजिनी मात्र या गोष्टीसाठी राजी नसते कारण तिने तिची आजी,आई या दोन्ही स्त्रियांना तिच्यासारखाच आजार झालेला पाहिलेला असतो. त्या दोघी डॉक्टरी सल्ल्यानुसार वागल्या पण त्यांच्या तब्येती अधिकाधिक ढासळत गेल्या आणि त्यातच त्या मरण पावल्या. त्यामुळे आपण आपल्याला झालेल्या आजारावर जर शस्त्रक्रिया किंवा कोणताही वैद्यकीय इलाज केला तर मरू असे भय सरोजिनीच्या मनात आहे.
दांडेकर सरोजिनीची , आपल्या बायकोची मनःस्थिती समजू शकतो.तिच्या वेदना त्याला जाणवतात. त्यामुळे तिच्या मनाविरूद्ध जावून तिच्या श्रद्धेला धक्का देऊन ,त्या स्वामीच्या छत्रछायेतून तिला ओढून काढणे त्याला निर्दयपणाचे वाटते. त्याचवेळी तिचा आजार बळावत जाऊन हाताबाहेर गेला तर आपण आणि मुले तिला कायमचे गमावून बसू अशी चिंताही त्याला सतावत राहते.सरोजिनीच्या सदानकदा स्वामीकडे जाऊन प्रवचने ऐकत बसण्याने दांडेकरच्या आयुष्याची सुव्यवस्थीत बसलेली रोजची घडी साफ विस्कटू लागते.रोजचे जेवणही त्याला वेळेवर मिळेनासे होते, आपल्या मुलांची होणारी अबाळही त्याला अस्वस्थ करू लागते.घरातील स्वच्छता, शांतता ,सुव्यवस्था सगळेच बिघडल्याने दांडेकरच्या कार्यालयातील कामावरही त्याचा परिणाम होऊ लागतो.मनाला दुबळे बनवणाऱ्या या काळात दांडेकर आपली सरळ वाट सोडून भरकटू लागतो. वेश्यावस्तीकडे त्याची पावले वारंवार वळू लागतात.
कार्यालयातील त्याचा मित्र शास्त्री हा त्याचा एकमेव दिलासा आहे की ज्याच्याकडे दांडेकर मनातील अस्वस्थता आणि त्यामागची कारणे याबद्दल बोलू शकतो.शास्त्री दांडेकरला स्वामीला जाऊन भेटण्याची आणि सरोजिनीचे मन वैद्यकीय सल्ला घेण्यास वळवण्याची विनंती करायला सांगतो.दांडेकर स्वामीला शोधत त्याच्या गावातील मठापर्यंत पोहोचतो. तिथे बरेच जण आलेले पाहून दांडेकरच्या मनावर दडपण येते. स्वामी आपले म्हणणे ऐकतील का याबद्दल तो साशंक होतो. स्वामी दांडेकरचे म्हणणे ऐकतो पण सरोजिनीला आपल्याकडे येऊन बरे वाटणार आहे तर वैद्यकीय सल्ला कशाला हवा असे त्याचे म्हणणे आहे. सरोजिनीला आपल्याकडे येऊ नये हे सांगणे त्याला पटणारे नसतेच.दांडेकरलाही स्वामीशी वाद घालणे तर शक्यच नसते.त्यामुळे स्वामीकडे त्याच्या जाण्याचे काहीच निष्पन्न होत नाही. उलट स्वामीच्या थैलीत काही नाणी टाकून आपण आपल्या महिन्याचा ताळेबंद मात्र बिघडवला आहे असे त्याला वाटते.स्वामी ढोंगी आहे की त्याच्या बोलण्यात तथ्य आहे याबद्दल दांडेकरच्या मनात गोंधळ सुरू होतो. सरोजिनीचा स्वामीकडे असलेला ओढा वाढत जातो आणि दांडेकरच्या घरातील एकेक मौल्यवान वस्तू सरोजिनी स्वामीला दान देऊ लागते. दांडेकर याने अधिकच अस्वस्थ होतो.आपण कष्टाने, घाम गाळून मिळवलेला पैसा सरोजिनी नाहक संपवते आहे याची त्याला चीड येऊ लागते. विशेषतः जेव्हा त्याच्या छोट्या बाळाची सोन्याची साखळीही दिसेनाशी होते तेव्हा दांडेकर संतापतो. आपल्या वयात आलेल्या मुलीला कसे सांभाळायचे हेही त्याला कळत नाही. सरोजिनीचे घरात लक्ष नसल्याने मुलीही बिघडतील , वाईट मार्गाला लागतील अशी चिंता दांडेकरला सतावते.त्याचे स्वतःचे वेश्येकडे जाणेही त्याच्या अपराधी भावनेत भर घालते.
कार्यालयात वेळेवर न जाणे, कामात चुका होणे यामुळे दांडेकरने एक चांगला कारकून म्हणून मिळवलेली प्रतिष्ठाही कमी होऊ लागते.त्यामुळे त्याचे मन बधिर होते. शास्त्रीलाही दांडेकरला त्याच्या विचित्र मानसिक कोंडीतून कसे बाहेर काढावे, त्याची कौटुंबिक समस्या कशी सोडवावी हे कळत नाही.आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान, अनुभवी माणसाचा सल्ला दांडेकरने घ्यावा आणि असा माणूस म्हणजे आपल्या कार्यालयातील वरिष्ठ चारी साहेबच आहे असे शास्त्री दांडेकरला सुचवतो.सुट्टीवर गेलेले चारी साहेब परत कार्यालयात आल्यामुळे दांडेकरला दिलासा वाटतो. योग्य वेळ शोधून तो चारी साहेबांसमोर आपली समस्या मांडतो. चारी साहेब काही तरी निश्चित मार्ग काढतील असे वाटल्याने दांडेकर आश्वस्त होतो. त्याचे मन परत ताळ्यावर येऊ लागते. चारी साहेब स्वामींची चौकशी करायला अधिकारी नेमतात. आपली चौकशी होते आहे,मठाची तलाशी घेतली जाते आहे आणि त्यातून कदाचित आपले बिंग फुटले तर.. या भयाने स्वामी गाशा गुंडाळायचे ठरवतात.
मठ सोडून जाण्यापूर्वी सर्व भक्तांचा स्वामी निरोप घेतात. सरोजिनीलाही ते न घाबरण्याचा व योग्य ते उपचार करून घेण्याचा सल्ला देतात.स्वामींचा संपर्कच न राहिल्याने व त्यानीच सल्ला दिलेला असल्याने सरोजिनी वैद्यकीय उपचारांना राजी होते. तिची शस्त्रक्रिया यशस्वी होते. तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही हे कळल्यावर दांडेकरला फार शांत वाटते पण हे सगळे स्वामींनी सरोजिनीला त्यांच्या प्रभावातून करायला लावले असे जाणवून स्वामींबद्दल कृतज्ञताही त्याच्या मनात जागी होते. दांडेकर पुन्हा स्वामीला शोधायला त्याच्या मठात पोहोचतो. तिथे स्वामीच्या जाण्याने दुबळी झालेली माणसे त्याला दिसतात, स्वामीजी असताना तिथे धनधान्याची मुबलकता होती हे त्याला आठवते. तेथील सेवक त्याला स्वामी निघून गेल्याने शेकडो लोकांसाठी अन्नछत्र बंद झाल्याचे सांगतात आणि स्वामींची चौकशी करणाऱ्यांना अश्रद्धेबद्दल दोष देतात. सरोजिनीने स्वामींच्या चरणी अर्पण केलेले ऐवजही सेवक रागाने दांडेकरच्या पायावर फेकतात.पण आता दांडेकरला त्या भौतिक वस्तूंचा मोह वाटत नाही. सरोजिनी बरी असेल, तिची साथ असेल तर आपण आपले कौटुंबिक सौख्य परत मिळवू आणि भौतिक संपन्नता देखील स्वतःच्या कर्तृत्वाने परत मिळवू शकू याबद्दल दांडेकरला खात्री वाटते.
उपसंहार
तीन माणसांच्या तीन आंतरीक इच्छा. दांडेकर-सरोजिनी हे उभयता पती-पत्नी पण त्यांची जीवनदृष्टी परस्परांपेक्षा भिन्न आहे. ज्यांच्यात संवाद असणे अपेक्षित असूनही तसा तो होत नसल्याने दोघांनाही मानसिक त्रासातून जावे लागते.दांडेकरला आधुनिक वैद्यकीय उपचारांनी सरोजिनीने तिच्या आजारातून बरे व्हावे अशी इच्छा आहे. सरोजिनीचे स्वामीच्या प्रभावात जाणे त्याला पटत नाही.सरोजिनी तन-मनाने आपलीच राहावी अशी त्याची तीव्र इच्छा आहे.पण सरोजिनीचे शारीरिक क्लेष पाहून तो गप्प आहे. तो सरोजिनीवर हक्क गाजवत नाही. सरोजिनीच्या मनाला कोणताही धक्का पोहचवण्याची त्याची इच्छा नाही .सरोजिनीला दांडेकरची ही भूमिका आणि प्रेम माहीत असल्यानेच ती गप्प राहून आपले स्वामींकडे जाणे दांडेकरपासून लपवून ठेवते. तर तिसरा स्वामी, ज्याची आंतरीक इच्छा सरोजिनीला आपल्यावर अवलंबून ठेवण्याची, तिच्या मानसिक दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर सत्ता गाजवण्याची आहे.स्वामीही न बोलता आपले ध्येय गाठू पाहतो आहे.अशाप्रकारे कादंबरीतील पती-पत्त्नीच्या नात्यातील मौन त्यांना भरकटवत नेते.पण जेव्हा त्यांच्यात संवाद होऊ लागतो तेव्हा सरोजिनीला स्वामींच्या ताब्यातून बाहेर काढणे दांडेकरला शक्य होते. हा संवाद स्वामींमुळेच होऊ शकला असे वाटल्याने दांडेकर स्वामीबद्दल कृतज्ञ आहे.तर आपले काळे धंदे उघडकीला येतील या भयाने स्वामी गप्प आहे.अशाप्रकारे तीन व्यक्तिरेखांचे स्वतःच्या इच्छा दुसऱ्याला कळू नयेत यासाठी निःशब्द होणे आणि ही निःशब्दता संपून संवादाचा पूल उभा राहण्याची शक्यता वाढत गेल्यावर अंधश्रद्धेच्या सावटातून सरोजिनी बाहेर पडू लागणे आणि एक कुटुंब पुन्हा एकदा सुखी-समाधानी होण्यास सुरूवात होणे असे या कादंबरीचे कथासूत्र आहे.जे लेखिकेने आपल्या संथ,शांत शैलीने खुलवले आहे.
पुढील ब्लॉगमध्ये ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीतील काही प्रसंगांची, व्यक्तिरेखांची व कमला मर्कंडेय यांच्या लेखनशैलीची झलक आपण पाहणार आहोत.आजच्या ब्लॉगसंदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
– गीता मांजरेकर
*******************************************************************************************************

Leave a reply to Shubhada Kirkire उत्तर रद्द करा.