मित्रहो, आजपासून मी माझ्या अनुदिनी लेखनाला नव्याने सुरूवात करते आहे.’पैस’ हा दुर्गाबाई भागवतांनी वापरलेला शब्द !संत ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्या खांबाला टेकून आपली ज्ञानेश्वरी कथन केली त्या खांबाला पैसाचा खांब म्हणतात.विश्वात्मक देवाकडे सर्वांच्या सुखासाठी,शांतीसाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आपल्या मनाची कवाडे उघडी करायला प्रेरणा देतात.आजवर मी मराठी भाषा आणि साहित्य वाचणे , शिकवणे या मर्यादेतच वावरत होते पण आता निवृत्त झाल्यावर मिळणारा वेळ ऐसपैस वाचनासाठी मला देता येणार आहे.

आज कवी कुलगुरू कालिदास दिन. ‘संस्कृत भाषा दिन’ म्हणून तो ओळखला जातो.कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ हे महाकाव्य वाचून जर्मन कवी ‘गटे’ अतिशय प्रभावीत झाला होता. शाकुंतल ग्रंथ डोक्यावर घेऊन तो नाचला होता अशी एक आख्यायिका सांगितली जाते.कालिदासाचे शाकुंतल तर नितांत सुंदर,अभिजात काव्य आहे. पण इथे मला गटेच्या खुल्या दृष्टिकोनाचे देखील कौतुक वाटते. त्याने संस्कृत भाषेतील एक महाकाव्य कसे वाचले असेल, त्याचा आस्वाद कसा घेतला असेल आणि शाकुंतलाचे महात्म्य त्याने कसे स्वीकारले असेल याबद्दल मला कुतूहल वाटते. तसेच कुतूहल मला इंग्रजीतील महान नाटककार शेक्सपीयर याच्या ‘मॅकबेथ’ या अजरामर नाटकाचे ‘विकारविलसिते’ या नावाने मराठीत भाषांतर करून ते मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याची कामगिरी करणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांचेही वाटते.वि.वा. शिरवाडकर यांनी शेक्सपीयरच्या किंग लियर, मॅकबेथ या नाटकांची मराठीत रूपांतरे केली आहेत तर वसंत कानेटकर यांनी शेक्सपीयरच्या तीन नाटकांतील बीजे मराठीतील ‘गगनभेदी’ या एकाच नाटकात एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.कवी विंदा करंदीकरांनी जर्मन कवी गटे यांचे ‘फाऊस्ट’ हे महाकाव्य मराठीत भाषांतरीत केले आहे.मामा वरेरकर यांनी बंगाली भाषेतील रविंद्रनाथ टागोरांच्या  निवडक कथा त्यांच्या एकविंशती या संग्रहात भाषांतरीत केल्या आहेत.

          इंग्रजी आणि अन्य परदेशी तसेच भारतीय भाषांतील अभिजात साहित्य मराठी वाचकांपर्यंत भाषांतरे, रूपांतरे या मार्गाने पोहचवणे हे मराठी वाचकांच्या वाचनाचा अवकाश व्यापक करणारे ठरणार आहे.मलाही त्यादृष्टीने माझा खारीचा वाटा उचलायची इच्छा आहे. त्यासाठी या ब्लॉगमध्ये मी काहीवेळा परिचयात्मक,समीक्षात्मक आणि काहीवेळा भाषांतर स्वरूपाचे लेखन करायचे ठरवले आहे.

जगभरात जागतिकीकरणाने भाषेच्या सपाटीकरणाचा वरवंटा फिरवला असला तरीही हजारो भाषा अजूनही व्यवहारात वापरल्या जात आहेत.शेकडो भाषांतून आजही साहित्यनिर्मिती होते आहे आणि हे साहित्य अन्य भाषांतून भाषांतरीत झाले तर वाचकांच्या जाणिवांच्या कक्षा रूंदावणारे ठरणार आहे,त्यांच्या अनुभवाचा पैस व्यापक होणार आहे.म्हणूनच मला इंग्रजीतून कादंबरी लेखन करणाऱ्या भारतातील किंवा मूळच्या भारतीय असणाऱ्या पण देशांतर केल्याने आता अनिवासी भारतीय झालेल्या महिलांच्या कादंबऱ्यांची झलक मराठी वाचकांना दाखवावीशी वाटते आहे. देशांतर केलेल्या भारतीय महिलांच्या कादंबरीलेखनाची चर्चा इंग्रजी समीक्षेमध्ये बरीच झाली आहे.या लेखिकांनी परदेशात देशांतर केल्यावर भारतातील संस्कृतीबद्दल स्मरणरमणीय होणे, भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल कौतुकाचे उद्गार काढणे आणि मुख्यतः पाश्चात्त्य आधुनिक संस्कृतीतील नातेसंबंधातील तात्पुरतेपणा,निष्ठेची उणीव अशा गोष्टींवर टीका करणे याबद्दल समीक्षक चर्चा करतात.अशा देशांतरीत लेखकांच्या साहित्याला ‘इंडियन डायस्पोरीक लिटरेचर’ असे म्हणतात.

मी ज्या लेखिकांच्या कादंबऱ्यांबद्दल लिहिणार आहे त्यांची निवड त्या देशांतरीत आहेत आणि पाश्चात्य संस्कृतीवर टीका करतात म्हणून केलेली नाही की त्यांच्या लोकप्रियतेवरूनही केलेली नाही, तर त्यांच्या साहित्यकृतींच्या अभिजाततेवरून केली आहे.विशेषतः या लेखिकांनी आपल्या कादंबऱ्यांतून  घडवलेले भारतीय आणि परदेशातील समाजाचे वास्तव चित्रण हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. मराठी वाचकांनाही  हे समाजदर्शन जाणून घ्यायला आवडेल असे वाटते. त्यासाठी हे ब्लॉगलेखन मी करणार आहे. दर आठवड्याला क्रमशः एकेका देशांतरीत किंवा भारतीय पण इंग्रजीत लेखन करणाऱ्या  कादंबरी लेखिकेचा परिचय,तिच्या निवडक कादंबऱ्यांचे परीक्षण आणि तिच्या कादंबऱ्यांतील निवडक भागाचे भाषांतर (ऑडियोसह) करून मराठी वाचकांपर्यंत पोहचवावे असा माझा मानस आहे.वाचकांच्या मनात या लेखिकांच्या मूळ इंग्रजी कलाकृती वाचनाची इच्छा निर्माण करणे हाही माझा हेतू आहे.

वाचक मित्रांना हा उपक्रम आवडेल आणि त्याबद्दल ते अधिकाधिक सुहृदांना सांगतील अशी आशा वाटते.

भारतीय महिलांच्या इंग्रजी कादंबरी लेखनाची पहाट

इंग्रजांचे आगमन हे भारतीयांना पारतंत्र्यात टाकणारे ठरले हे खरेच पण त्याचबरोबर इंग्रजी शिक्षणामुळे जगभरातील ज्ञान,विज्ञान, साहित्याशी भारतीयांचा संपर्क होऊ शकला हेही अमान्य करता येणार नाही.बंकिंमचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर,सरोजिनी नायडू यांनी आपले साहित्य बंगाली भाषेत लिहिले तसे इंग्रजीतही लिहिले आहे.

मराठीतील पहिली कादंबरी ‘यमुना पर्यटन'(१८५७) ही मूळच्या हिंदू पण ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या व धर्मगुरू झालेल्या बाबा पदमनजी(https://en.wikipedia.org/wiki/Yamuna_Paryatan) यांनी लिहिली होती.आणि इंग्रजीत कादंबरी लेखन करणाऱ्या दोन स्त्रियांची कौटुंबीक पार्श्वभूमी त्यांच्या ख्रिस्ती धर्मांतरामुळे निश्चितच बदलली असावी.या धर्मांतरामुळेच त्यांना इंग्रजी शिक्षणाची व अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली असे म्हणावे लागेल.

बंगालमधील तरूलता(‘तोरू’ याच नावाने प्रसिद्ध) दत्त (१८५६ ते १८७७) https://en.wikipedia.org/wiki/Toru_Dutt ही स्त्री इंग्रजीत लेखन करणारी पहिली लेखिका ठरली. तिने प्रामुख्याने कविता लिहिल्या असल्या तरी ‘बियन्का-यंग स्पॅनिश मेडन’ https://en.wikisource.org/wiki/Bianca,_or,_The_Young_Spanish_Maidenही क्रमशः प्रसिद्ध झालेली पण लेखिकेच्या अकाली निधनाने अपूर्ण लाहिलेली एक कादंबरी तोरू दत्त यांच्या नावावर आहे.ही एक स्वच्छंदवादी म्हणता येईल अशी कादंबरी आहे.उच्चभ्रू युरोपियन तरूण लॉर्ड मूर आणि स्पेनमधून देशांतरीत झालेल्या कुटुंबातील सावळ्या वर्णाची, मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीतील, संवेदनशील तरूणी बियन्का यांची ही अपूर्ण प्रेमकथा आहे.

तोरू दत्त यांचे आई- वडील हे बंगालमधील हिंदू होते परंतु त्यांनी कालांतराने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. आपल्या तीन मुलांसह ते युरोपमध्ये गेले .तिथे काही वर्ष राहिल्याने तोरू व अन्य भावंडांना  चांगले शिक्षण मिळाले. तोरू दत्त यांना अरू दत्त ही मोठी बहिण आणि ओबू दत्त हा मोठा भाऊ होता.यापैकी अरू दत्त ही देखील इंग्रजीत काव्यलेखन करत असे. दुर्दैवाने तोरूच्या मोठ्या भावंडांचे अकाली निधन झाले आणि विशेषतः थोरल्या बहिणीच्या अरूच्या मृत्यूचा संवेदनशील तोरू दत्तच्या मनावर गडद परिणाम झाला.

‘बियान्का-यंग स्पॅनिश मेडन’ या कादंबरीतील बियान्काची थोरली बहिणदेखील अकाली निधन पावली आहे. आणि बियान्का त्या दुःखात बुडालेली असतानाच तिच्या आयुष्यात योगायोगाने लॉर्ड मूर येतो परंतु दोघांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील तफावतीमुळे त्यांच्या विवाहाला विरोध होतो.हळव्या मनाची बियान्का ते सहन न होऊन आजारी पडते. लॉर्ड मूरच्या भावनिक आधाराने व औषधोपचाराने ती बरी होते पण तोपर्यंत त्याची युद्धावर जाण्याची वेळ येते. तो तिच्या बोटात अंगठी घालून रणभूमीवर निघून जातो.इथे ही कादंबरी अपूर्ण राहिली आहे. कारण तोरू दत्त यांचेही तरूण वयात टी.बी.ने निधन झाले.

इंग्रजीत कादंबरी लिहिणारी दुसरी भारतीय स्त्री ‘कृपाबाई सथीआनंदन’(१८६२-१८९४) यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर इथला.हरीपंत आणि राधाबाई खिस्ती यांच्या त्या धाकट्या कन्या होत्या.(https://en.wikipedia.org/wiki/File:Krupabai_Satthianadhan_(1862%E2%80%931894).png)

खिस्ती कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.वडिलांच्या निधनानंतर  कृपाबाईंवर त्यांचा थोरला भाऊ भास्कर याचा मोठा प्रभाव पडला.आपल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत –‘सगुणाः अ स्टोरी ऑफ नेटीव्ह ख्रिश्चन लाईफ’https://scroll.in/article/803104/the-first-indian-woman-novelists-first-book-was-both-beautiful-and-profound मध्ये त्यांनी आपल्या भावाची व्यक्तिरेखा रंगवली आहे.पण भाऊही अल्पायुषी ठरल्याने कृपाबाई एकट्या पडल्या. काही मिशनरी स्त्रियांसोबत त्या राहू लागल्या.मुंबईत वसतीगृहात राहून शिकू लागल्या. पुढे एका अमेरिकन डॉक्टर असलेल्या मिशनरी बाईंच्यामुळे कृपाबाईंना वैद्यकीय शिक्षणाबद्दल कुतूहल निर्माण झाले.परंतु भारतीय मुलींना शिकण्यासाठी तो काळ अनुकूल नव्हता. कृपाबाईंनाही सहजासहजी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना. पुढे मद्रास येथील रेव्हरंड सथीआनंदन यांच्या घरी त्या राहू लागल्या आणि वैद्यकीय ज्ञान मिळवू लागल्या. पण आजारपणामुळे त्यांना शिक्षण सोडून पुण्यात औषधोपचारासाठी जावे लागले. पुढे रेव्हरंड सथीआनंदन यांचा मुलगा सॅम्युअल जो उटकमंड येथे  शाळेत शिक्षक होता त्याच्याशी कृपाबाईंनी प्रेमविवाह केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन कादंबऱ्या व अन्य लेखन केले पण अखेरीस त्यांचेही अकाली निधन झाले. ‘कमलाःअ स्टोरी ऑफ हिंदू लाईफ’ या कादंबरीत त्यांनी तत्कालीन हिंदू स्त्रियांना  बालविवाह, वैधव्य, पुनर्विवाहाला परवानगी नसणे, शिक्षण घेण्यास मनाई असणे अशा ज्या  सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्याबद्दलचे चित्रण केले आहे.

अशाप्रकारे तोरू दत्त आणि कृपाबाई सथिआनंदन या दोघींनी लिहिलेल्या कादंबऱ्यांनी भारतीय महिलांच्या इंग्रजी कादंबरीलेखनाची पहाट झाली.एकीने युरोपीय समाजात अन्य देशांतून स्थलांतर करून आलेल्या लोकांना कसे दुय्यम स्थान होते आणि विशेषतः देशांतरीत कुटुंबातील स्त्रीला उच्चभ्रू इंग्रज तरूणांशी विवाह करण्यात काय अडचणी येत ते दाखवले आहे तर दुसरीने भारतीय समाजात ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या तरूणांना अन्य समाजबांधवांकडून काय त्रास दिला जाई तसेच हिंदू स्त्रीला  समाजात दुय्यम स्थान असे आणि तिला तिच्या विवाहाचा निर्णय घेण्याचा, शिक्षणाचा , पुनर्विवाहाचा अधिकार दिला जात नसल्याने तिचा कसा कोंडमारा होई त्याचे चित्रण केले आहे. शैलीदार इंग्रजी भाषेतून कादंबरी लिहिणे आणि त्यातही तत्कालीन भारतीय समाजाचे वास्तव,समाजातील कुप्रथा चित्रीत करण्यासाठी लागणारे धैर्य व आत्मविश्वास तोरू दत्त आणि कृपाबाई सथिआनंदन या तरूण पण अल्पायुषी ठरलेल्या स्त्रियांनी दाखवला  ही आजही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरेल.

यापुढील अनुदिनीमध्ये मी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पण भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या दशकात लिहू लागलेल्या कादंबरीकार स्त्रियांबद्दल लिहायचे ठरवले आहे. त्यात कमला मार्कंडेय, नयनतारा सहगल या दोन कादंबरीकारांच्याबद्दल आणि त्यांच्या निवडक कादंबऱ्यांबद्दल सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.तुम्हाला ते वाचायला निश्चित आवडेल अशी आशा करते.

—– गीता मांजरेकर

***************************************************************************************

7 प्रतिसाद

  1. फार सुरेख लेखन aahe. एकदम ओघवती bhasha आहे मनाला गुंतवून ठेवले नि पुढील लेखाची उत्सुकता वाढवणारे लेखन आहे

    शुभदा किरकिरे

    Liked by 1 person

  2. फार छान उपक्रम ! भाषा सहज, सुरेख

    या लेखिकांची नव्यानेच माहिती होत आहे.

    वर्षा बापट

    Like

    1. आभारी आहे वर्षा .. जरूर वाचा पुढील ब्लॉगज!

      Like

  3. इंग्रजी वाचू न शकत असलेल्या मराठी वाचकांना या आपल्या या उपक्रमाचा खूप लाभ होणार आहे.

    धन्यवाद मॅडम!

    Like

    1. खरंय राहुल..तो उद्देश आहेच या ब्लॉग लेखनाचा.पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मूळ इंग्रजी कादंबरीचे वाचन केले तर वाचनसंस्कृती अधिक व्यापक होईल !

      Liked by 1 person

  4. इंग्रजी वाचू शकत नसलेल्या मराठी वाचकांना आपल्या या उपक्रमाचा खूप लाभ होणार आहे. धन्यवाद मॅडम!

    Like

    1. आभारी आहे राहुल!.. इंग्रजी येणा-यांनी मूळ कादंबरी पण जरूर वाचावी .. वाचनसंस्कृती संकुचित ठेवू नये.

      Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा