‘ दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या किरण देसाई यांनी लिहिलेल्या कादंबरीचे कथासूत्र आपण मागील ब्लॉगमध्ये समजून घेतले. आज त्याच कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून , कादंबरीची कथासूत्रे आपण लक्षात घेऊया.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ ही ६७० पृष्ठांची प्रदीर्घ कादंबरी आहे.या कादंबरीचे विभाजन लेखिकेने एकूण २१ विभागांत केले असून या सर्व विभागांत मिळून एकूण ७५ प्रकरणे या कादंबरीत आहेत.यातील विभाग २, ३,४, ५, ६ आणि २० हे तुलनेने अधिक मोठे आहेत. त्यांत ५, ६ किंवा ७ प्रकरणे आहेत.या विभागांत अधिक घटना सामावलेल्या आहेत.कथनाची गती अधिक आहे.त्यामानाने ९,१०,११,१३,१४,१५ आणि २१ हे विभाग मध्यम लांबीचे आहेत म्हणजे त्यात ३ किंवा ४ प्रकरणे आहे. तर उरलेल्या ९ विभागांत १ किंवा २ प्रकरणे आहेत.त्यात कथनाची गती संथ आहे.

‘दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीतील कथन प्रामुख्याने तृतीय पुरूषी आहे.हा तृतीय पुरूषी कथक कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या मनात काय चालले आहे हे सांगू शकतो आणि आवश्यक तिथे स्वतःच भाष्यही करू शकतो. कथन प्रामुख्याने वर्तमानकाळात घडणाऱ्या घटनांबद्दल सांगत असले तरी व्यक्तिरेखांच्या पूर्वेतिहासाच्या अनुषंगाने ते भूतकाळात जाते आणि काहीवेळा भविष्याचे सूचनही करते.
या कादंबरीच्या शीर्षकात सोनिया आणि सनी यांच्या एकाकीपणाच्या भावनेबद्दल ही कादंबरी सांगेल असे स्पष्ट म्हटलेले असल्याने, या दोघांच्या एकाकीपणाची कारणे तरी काय असा प्रश्न वाचकांना पडेल.त्या दोघांच्या संवादांतून यावर प्रकाश पडतो का ते पाहू.
कादंबरीच्या ३१व्या प्रकरणात सनी सोनियाला तिच्या एकाकीपणाबद्दल विचारतो , विशेषतः ती अमेरिकेतून भारतात परत का आली याबद्दल त्याला कुतूहल आहे.खरं तर हाच प्रश्न सनीच्या आईने -बबिताने सोनियाला विचारलेला असताना सोनियाने दिलेले उत्तर सनीने ऐकलेले आहे. सोनियाने त्यावेळी बबिताला सांगितलेले असते की अमेरिकेत रहाताना सगळ्या गोष्टी एकटीलाच कराव्या लागतात याचा तिला कंटाळा आला आणि ती परत आली.ते उत्तर ऐकून सनीला त्याची अमेरिकन मैत्रीण उल्ला कशी स्वतःच ड्रायव्हिंग करते, स्वतःच टायरमधील पंक्चर काढते, हायवेवरील वात्रट लोकांना पुरून उरते, घरातील कामेही करते आणि आई-वडिलांच्या गरजेलाही हजर रहाते हे आठवते. पण आपण असे सगळ्या आघाड्यांवर काम करू शकत नाही, तेवढी चिकाटी आपल्याकडे नाही हे सनीलाही जाणवलेले असते.त्यामुळे सोनियाला देखील अमेरिकेत सगळी कामे एकट्याने करायचा कंटाळा येणे सहाजिक आहे हे तो समजू शकतो. पण तरीही सोनियाच्या एकाकीपणाचे तेवढेच कारण नसावे असे सनीला वाटले असावे म्हणून तो तिला एकटीला भेटतो तेव्हा ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सोनिया म्हणते –
“मी परत आले कारण ज्या सगळ्या गोष्टी तिथे मी एकटीने करायला शिकले होते त्याच सगळ्या गोष्टी एकटीने करणे सोडून देण्याचा विरोधाभास मी गाठला.जणू काही माझ्या जीवनात एक छिद्र तयार झाले आणि जीवन मोठे होण्यापेक्षा ते अधिकाधिक रिते होऊ लागले.जितके अधिक दिवस मी अमेरिकेत राहिले तितके मला माझे जीवन रिते, लहान होते आहे हे जाणवले.मी मला स्वतःला बाहेरून शोधायचा प्रयत्न करत होते कारण स्वतःला अंतर्मुख होऊन शोधण्याची संवेदना मी हरवून बसले होते….सगळ्यात श्रीमंत देशात मला पैशाचीच भीती वाटू लागली.मी संकुचीत मनोवृत्तीची होऊ लागले.मी बागेत खेळणाऱ्या लहान मुलांकडे मत्सराने पाहू लागले आणि पार्ट्या आयोजित करणाऱ्या, सेंट्रल पार्कमध्ये सहलींना येणाऱ्या सनातनी वर्गाकडे मी असूयेने पाहू लागले….शेवटी मला वाटले की हे सगळे काय आहे ?मी अशी स्वार्थी का होते आहे ?मी भारतात का परतत नाही ?…”
एकूण एकाकीपणामुळे जगण्याचा आनंद सोनियाला अमेरिकेत घेता येईना आणि ती भारतात परत आली होती.
सोनियाने तिच्या आयुष्यात ही पोकळी इलानने तिच्यावर सर्वच बाबतीत ताबा मिळवल्याने आली हे स्पष्ट केले नसले तरी स्वतःचा आनंद शोधण्यात ती कमी पडली आहे हे तिच्या कथनातून स्पष्ट होते.
सनी म्हणतो की एकाकी तीच माणसं पडतात की जी चांगली असतात. जी कळपात जात नाहीत. त्याला कळपात जाणारी माणसे आवडत नाहीत हे तो स्पष्ट करतो.
खरं तर, सनीने स्वतःही अमेरिकेत असताना भारतीय मुलांच्या कळपात रहाणे टाळले होते. एक सत्या हा लहानपणापासूनचा मित्र सोडला तर अन्य भारतीयांशी नाते सनीने जोडले नव्हते.त्याउलट उल्ला य़ा अमेरिकन मुलीसोबत तो राहू लागला होता.पण ते तरी आनंददायक होते का ?उल्लाबरोबर रहाताना सगळ्या भारतीयांना तिखट खाणे आवडते आणि ज्यात-त्यात मसाला घालून खाणे आपल्याला चालणार नाही असे म्हणून उल्लाने सनीला टोकलेले असते. भारतीय पुरूष खूप बडबडे आणि वर्चस्ववादी असतात असे उल्लाचे निरीक्षण असते. भारतीय स्वतःला नेहमी कसे श्रेष्ठ सिद्ध करू पहातात हे तिने तिच्या मैत्रीणीच्या मालाच्या उदहरणातून सनीला सांगून तसे त्याने करू नये असे म्हटले होते. सनीच्या आईचे रोज येणारे फोन, तिने पाठवलेल्या पत्रात सनीसाठी आलेला लग्नाचा प्रस्ताव या गोष्टी उल्लाला आवडलेल्या नव्हत्या. विशेषतः सनी त्याच्या आईला आपल्याबद्दल काही सांगत नाही, आपण एकत्र रहातोय हे उघड करत नाही आणि त्याने भारतीय मुलीशी लग्नाचा पर्याय खुला ठेवला आहे हे उल्लाला अपमानास्पद वाटले होते. ती सनीला तिच्या आई-वडिलांकडे कान्सासला घेऊन गेली असताना , आपले आई-वडील सनीशी नैसर्गिकपणे बोलू शकत नाहीत आणि सनीलाही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही हे उल्लाला खटकले होते.सनीला स्वतःलाही उल्लाच्या आई-वडिलांकडे सगळे कृत्रिम, तकलुपी वाटले होते.सत्याने सनीला सांगितले होते की जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिच्या बरोबर रहाणे आनंदाचे होणार नाही. पण सनीला मात्र अशा अनोळखी व्यक्तीच्या सहवासातच काही वेगळे आनंददायक घडेल अशी आशा वाटत होती.तो भारतातून परत अमेरिकेत गेला तेव्हा उल्ला काहीही न सांगता निघून गेली होती आणि सनी एकाकीपणाच्या गर्तेत पडला होता. मग ते घर सोडून तो गजबजलेल्या भागात रहायला गेला, सर्वसामान्य माणसांच्या समस्या पहाताना स्वतःची समस्या त्याला क्षूद्र वाटू लागली. पण एकाकीपण संपले नव्हते.वर्तमान पत्रात राजकीय बातम्या देण्यात त्याला रस नव्हता पण सामाजिक बातम्या गोळा करणेही काही सोपे नव्हते.त्यासाठी समाजात मिसळणे गरजेचे होते. पण अमेरिकन समाज आपल्याला स्वीकारत नाही असेही सनीला जाणवले होते. पण मग भारतात परतावे तर तिथेही काही आश्वासक करियर त्याला दिसत नव्हते.सनीची आणखी एक समस्या होती ती म्हणजे त्याची आई. आपण अमेरिकेतून परत भारतात गेलो तर आपल्या आईच्या नजरेतून आपण उतरू अशी त्याला भीती वाटत होती.कथक त्याच्याबद्दल म्हणतो-
“ तो(सनी) फुलपाखरू होण्याचे स्वप्न पहात होता का की फुलपाखरू माणूस होण्याचे स्वप्न पहात होते ?त्याला हेही निश्चित कळत नव्हते की त्याच्या भावना प्रामाणिक, उत्कट आहेत की तो केवळ एक भूमिका निभावतो आहे…एक गोष्ट निश्चित होती की जर भारत अस्तित्वात असेल तर अमेरिका असणार नव्हती. ते दोन्ही देश एकमेकांपेक्षा अगदी वेगळे होते.पण तरीही त्याच्या मनात ते वेगळे राहू शकत नव्हते.जगाच्या दुसऱ्या टोकाकडून भारत त्याच्या मनात शिरकाव करत होता आणि इथले आयुष्य कमालीचे कृत्रिम,कुत्सित, खोटे, आभासी वाटू लागले होते.”
सोनिया आणि सनी या दोघांनाही अमेरिकेतील आयुष्यात आनंद शोधता आला नव्हता.पण मग भारतात सगळे आनंदात होते का ? सोनियाचे आई-वडील, आत्या, आडी-आजोबा हे आनंदी होते ? सनीचे आई-वडील, काका ,आजोबा हे आनंदी होते ?
‘दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीच्या शीर्षकात दोनच व्यक्तिरेखांच्या एकाकीपणाचा उल्लेख असला तरी खरं तर, कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखांनाही एकाकीपणाचा सामना करावा लागतो आहेच.म्हणजे एकाकीपणा व्यक्ती कोणत्या देशात आहे यावर अवलंबून नाही तर तो व्यक्तीच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे असे लेखिकेला सुचवायचे असावे. व्यक्तीने आपापल्या परीने स्वतःच्या आनंदाचे मार्ग शोधायचे असतात असे तिला सांगायचे असावे.
सोनियाच्या आईचे वडिल बार्बियर हे तर जर्मन होते पण त्यांनी भारतात आपल्या आनंदाचा मार्ग शोधला होता.ते पेशाने इंजिनीयर होते. भारतीय मुलीशी प्रेमविवाह करून बंगालमध्ये रहात होते. पण दुसऱ्या महायुद्धात नोकरी संपली आणि ते उत्तराखंडात त्यांनी बांधलेल्या बंगल्यात रहायला आले. बंगल्यातील खोल्या भाड्याने देऊन त्यांनी उदरनिर्वाहाची सोय केली आणि मग मात्र ते हिमालयात हिंडून ढग,जलाशय अशी निसर्गदृष्ये रंगवू लागले.तोच त्यांचा आनंदाचा मार्ग होता. एके दिवशी ढगांचे चित्र काढायला गेले असताना ते परत आलेच नाहीत. जणू स्वतः ढगच होऊन गेले.त्यांनी आपल्या डायरीत लिहिले होते – “To learn about Pine trees said Basho , go to the Pine tree. To paint clouds Barbier went to the clouds.”
सोनियाची आई सेहेर हिने लग्नानंतर अनेक वर्ष तिचा नवरा मानव याचे वर्चस्व सहन केले आहे. पण सोनिया अमेरिकेत गेल्यानंतर तिने आपल्या आनंदाचा मार्ग शोधताना इंडिया अर्ट सेंटरच्या वाचनालयात नोकरी केली आहे आणि नंतर तर तिने मानवसोबत रहाणे असह्य झाल्यावर वडिलांच्या बंगल्यात जाऊन एकटीने रहाणे पसंत केले आहे.तिथे तिने वाचन, लेखन करण्यात समाधान शोधले आहे.सोनिया तिच्याकडे आल्यावर ती सोनियाला विचारते की तू कथा लिहिणे का थांबवलेस ?तिच्या मते जर एखाद्याने आपले अस्तित्व कलेत शोधले तर तो अगदी आनंदात राहू शकतो.
सोनियाला लेखनाची आवड आहे, ती चांगले लिहूही शकते पण इलानबरोबर रहाताना आपले हे सत्व तिने हरवले आहे. तिच्याबद्दल कथक म्हणतो –
“जेव्हा आईने तिला विचारले की तू कथालेखन का थांबवलेस सोनियाने उत्तर दिले नव्हते.व्यक्ती जर दुसऱ्याच्या नजरेतून जगाकडे पहात असेल तर ती कथा कशी लिहिणार ?जर त्याचाच आवाज मेंदूच्या आतून ऐकू येत असेल आणि तिला जर कळत नसेल की तिचे विचार तिचेच आहेत की दुसऱ्याचे आणि ते खरे आहेत की खोटे तर …”
सोनिया व्हरमॉन्ट इथे शिक्षण घेताना वाटलेल्या एकाकीपणात एका बेसावध क्षणी इलान या चित्रकाराच्या जाळ्यात अडकली होती. ‘वाईफ ऑफ अ डिक्टेटर’ हे चित्र काढणारा हा चित्रकार स्वतःच एक हुकुमशहा होता. पण सोनियाच्या दुबळ्या मनाने त्याला सर्वस्व मानले होते.कथक सांगतो, एका पहाटे तो झोपला असताना ती त्याची चित्रे पहायला उत्सुकतेने चित्रे ठेवलेल्या खोलीत डोकावते आणि एक डोळा तिला दिसतो. हा डोळा जणू तिला सांगतो की तू आता अडकली आहेस आणि यापुढे आनंद दुसऱ्यांसाठी असेल तुझ्यासाठी नाही.
कथक एक प्रसंग असा सांगतो की जेव्हा इलानने सोनियाला सांगितलेले असते की मी तुझे असे चित्र काढेन की सगळ्या जगाला तू कळशील आणि तू चिडशील , तुला वाटेल की या चित्रापलीकडे तुला अस्तित्वच उरलेले नाही.आणि सोनिया जेव्हा इटलीतील म्युझियममध्ये इलानने काढलेले स्वतःचे नग्न चित्र पहाते तेव्हा नेमके हेच घडते. आपण इलानची गुलाम, बटीक झालो, स्वतःचा स्वाभिमान, स्वतंत्र प्रतिभा, बुद्धी जणू आपण घालवून बसलो या जाणिवेने सोनिया शरमिंदी होते, अपराधी भावनेने हादरून जाते.
सोनिया तिने लिहिलेली एक माणूस कसा व्यवस्थेला कंटाळून माकडात रूपांतरीत झाला हे सांगणारी तिची कथा इलानला दाखवते पण त्याला ती भारताची बदनामी करणारी आणि वसाहतिक वृत्तीतून लिहिलेली वाटते. मात्र सोनियाने सांगितलेली तिच्या मीना फोईच्या उपेक्षेची कथा मात्र त्याला भारी आवडते. भारतात परत आल्यावर सोनियाला जाणवले आहे की मीना फोईची कथा तिला आवडलेली नाही उलट ती कथा लिहिल्याची लाजच तिला वाटते आहे. पण मग काय लिहावे हेही तिला कळत नाही. अखेर पिरोजाने सुचवलेल्या ‘कला’ या नियतकालिकात ती लिहू लागते. तिच्या पहिल्या लेखाचा विषय तिला तिचे वडीलच सुचवतात. दिल्लीतील विविध प्रकारच्या कबाबांचा इतिहास , त्यांच्या चवींमागची रहस्ये याबद्दल ती लिहिते तेव्हा तिला थोडा सूर सापडतो. गोव्यातील जुन्या बंगल्यांबद्दल लिहितानाही तिला आनंद वाटतो. पण गोव्याच्या समुद्र किनारी एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या आक्रमणाने आणि अचानक गायब होण्याने ती घाबरते. इटलीत तर इलानच्या चित्रांतील स्वतःची प्रतिमा पाहून सोनियाचा तोलच ढासळतो. पुन्हा एकदा इलानचा डोळा आपल्यावर नजर ठेवून असल्याचा भास तिला होऊ लागतो आणि तिचा आत्मविश्वास संपतो.

आपल्यावर सतत एक नजर असल्याची जाणीव सनीनेही अनुभवलेली असते. ती नजर आहे त्याच्या आईची. सरकारी नोकरीत असूनही भ्रष्टाचार करायला नकार देणारे आपले वडील तो विसरलेला नसतो. पण आईने तिच्या अहंकारासाठी त्याच्या मनात यशाचे वेगळे चित्र भरवलेले असते. सनीने त्या यशाच्या मागे धावत अमेरिका गाठलेली असते.तिथे आनंद वाटत नसूनही परत जाऊन तरी काय करणार अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेला सनी सोनियाला आपली गरज आहे हे मानायलाही तयार नसतो.जगण्यावरची श्रद्धा उडालेली सोनिया त्याला अस्वस्थ करून गेलेली असते पण तिच्या मनात पुन्हा एकदा ती श्रद्धा जागवण्यासाठी आपण इलानकडून तिची बादलबाबाचा ताईत असलेली माळ हस्तगत केली पाहिजे हे सनीला सुचत नाही किंवा तेवढे धैर्यही तो एकवटू शकत नाही. मेक्सिकोला असताना सत्या त्याला भेटायला येतो आणि त्याच्याशी बोलल्यावर सनीला जाणवते की आपण सोनियावर प्रेम करतो आहोत.मग मात्र तो इलानकडून सोनियाची माळ परत मिळवण्यासाठी शर्थ लढवतो.ती मिळवल्यावर समुद्रात पोहताना सनीला वाटते-
“जर तुम्हाला प्रेम मिळाले नाही तर तुम्हाला तुमचे अस्तित्वच मिळत नाही,आणि जर तुम्हाला तुमचे अस्तित्व नीट मिळाले नाही तर तुम्हाला प्रेम मिळत नाही.” कथक पुढे सांगतो-
‘त्या दिवशी आरशात पहाताना सनीला जाणवते की आपण पहिल्यांदाच स्वतःचे प्रतिबिंब आईच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या नजरेतून पहात आहोत.आईचे डोळे आपल्या पाठीवर नाहीत की आपल्या हृदयातही नाहीत..’
सोनियाची माळ परत मिळवून आणल्यावर समुद्रकिनारी बसले असताना वडिलांच्या आठवणींनी सनी गहिवरतो. वडिलांच्या अकाली मृत्युनंतर त्यांची कागदपत्रे चाळताना त्यांचे एक मनोगत सनीने वाचलेले असते.त्यांनी लिहिलेले असते-
“जंगले तोडली जात आहेत, गावकरी विस्थापित केले जात आहेत, निष्पाप मुलींवर अत्याचार होत आहेत. हे मी पाहू शकत नाही.सत्तेत असूनही मी हे थांबवू शकत नाही आणि भ्रष्टाचारही करू शकत नाही. मग मृत्युशिवाय मला पर्याय नाही.किमान निष्पापांच्या हत्या, आपल्या वडिलांनी आणि भावांनी केल्या ते पाप तरी आपण करू नये असे मला वाटते. सनीला निदान एवढे कळावे की त्याच्या घरातले सगळेच पुरूष भ्रष्ट नव्हते.त्याने कौटुंबीक इतिहासापासून मुक्त व्हावे, सन्मानाने जगावे.”
सोनियाची बादलबाबाचा ताईत असलेली माळ परत मिळवल्यावर सनीला आत्मविश्वास वाटतो, भारतात परत फिरायचा त्याचा निर्णय ठाम होतो.
सोनिया आणि सनी यांना आपले अस्तित्व सापडते, प्रेम सापडते पण सोनियाच्या वडिलांना मानवला मरेपर्यंत ते सापडलेले नाही. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो डेहराडूनच्या वसतीगृहात राहून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला आहे.त्याचे वडील अलाहाबादला वकील आहेत पण आई ग्रामीण भागातून आलेली साधी स्त्री आहे. शाळेतून सुट्टीसाठी घरी येणाऱ्या मानवला आपल्या आईशी काय बोलायचे, कोणत्या भाषेत बोलायचे हा प्रश्न पडतो. आपण भारतात राहून आपल्याला हिंदी नीट बोलता येत नाही याची खंत त्याला उतारवयात जाणवते. हिंदी कविता तो वाचतो तेव्हा त्याला थोडा दिलासा मिळतो. टी.एस. इलियटच्या वास्तववादी कवितांपेक्षा हिंदीतील गूढगुंजन करणाऱ्या, भूतकाळातील आठवणीत रमणाऱ्या, तरल, भावुक गजला मानवला आवडू लागतात.आपला सगळा मार्गच चुकला अशी जाणिव त्याला ओरिसातील शिल्प पहाताना, सौंदर्याचा साक्षात्कार झाल्यानेही होते.पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.
मानव वाईट आहे असे नाही पण पारंपरिक संस्कारांमुळे तो वर्चस्ववादी झाला आहे. बायकोवर तो संशय घेतो, तिला स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही.पण सोनियावर तो जीवापाड प्रेम करतो. म्हणूनच समुद्रातील अक्राळविक्राळ लाटांशी झगडताना आणि स्वतःच्या मनातील अनामिक भयाशी झगडताना सोनियाला वडिलांचेच शब्द आठवतात. ते म्हणालेले असतात-
“नेहमी पुढे पहावं. कधीही मागे पाहू नये. जे घडलंय ते घडून गेलं आहे. राहिलेल्या आयुष्यात त्याचा विचारही करू नये. थेट गूढात शिरावे .”
सोनियाची आत्या मीना फोई हिलाही आपले अस्तित्व मिळत नाही. तरूण वयात तिने ख्रिस्ती मुलावर असफल प्रेम केले आहे. त्याच्याबरोबर पळून जाण्याचे धैर्य ती दाखवू शकलेली नाही. नंतर एका तिच्याच जातीच्या माणसाशी तिचे लग्न झाले असले तरी त्या माणसाचे आधीच एक लग्न झालेले होते हे कळल्यावर मीना फोईला वैवाहिक सुख मिळण्यापूर्वीच विभक्त व्हावे लागले आहे. त्यानंतर तिचे सगळे आयुष्य म्हाताऱ्या आई-वडिलांची आज्ञा पाळण्यात, त्यांची सेवा करण्यातच गेले आहे. एकदा तर तिने चिडून त्यांना सांगितले आहे-
“तुमचे अस्तित्व माझ्या दुःखावर पोसलेले आहे.”
पण हे कळत असूनही तिला तिचा आनंद शोधण्याचा दुसरा पर्याय शोधता आलेला नाही.आई-वडिलांच्या निधनानंतर आपला भाऊ आपल्याला दिल्लीला नेईल ही तिची आशाही फोल ठरली आहे. अखेरीस मिशनरी संस्थेत मुलींच्या होस्टेलची रेक्टर म्हणून नोकरी स्वीकारल्याने तिथे तिची रहायची सोय झाली आहे.ते आयुष्य तिने मुकाट्याने स्कीकारले आहे.आपल्यासारखे सोनियाचे होऊ नये, कोणाचेच होऊ नये असे तिला वाटते.
सनीची आई बबिता हिने नेहमीच पैसा, बंगला , सोने-नाणे यात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आहे. नवरा रणजीत वेगळ्या विचारांचा असल्याने त्याच्यावरही तिने कधी प्रेम केलेले नाही. त्याच्या निधनानंतर तिने सनीवर आपल्या सगळ्या आकांक्षा लादल्या आहेत. तिला वेगवेगळ्या देशांत फिरायचे आहे, खरेदी करत मजेत रहायचे आहे. सनीला अमेरिकन मैत्रीण असली तर तिला चालणार आहे पण अमेरिकेतून भारतात परतलेली सोनिया तिला सून म्हणून नको आहे. दिल्लीतला बंगला विकून पैसा हाती आला की मनसोक्त जगायचे तिने ठरवले आहे. पण प्रत्यक्षात बंगला विकल्यावर सगळे पैसे हाती येतच नाहीत. ते मिळण्यापूर्वीच तिच्या दीरांचा खून होतो. तेव्हा बबिता हादरते. मिळालेल्या पैशात ती गोव्यातला जुना बंगला विकत घेते. पण तिथे अनेक अडचणींना तोंड देताना ती मनस्वास्थ्य हरवून बसते.भय़भीत होते. अशावेळी नेमकी तिच्यासारखीच भयग्रस्त सोनिया तिच्याकडे येते आणि तेव्हा मात्र बबिताला सोनियाचा आपण मत्सर केला हे चुकले हे जाणवते. ते कबुल करण्याचा प्रांजळपणा तिच्यात आहे म्हणूनच सनी आणि सोनिया एकत्र येतात यात तिला पुन्हा एकदा आनंद सापडला आहे.
अशाप्रकारे ‘दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ ही कादंबरी माणसांचे अस्तित्व, त्यासाठी त्यांना हवे असणारे प्रेम, ध्यास या एका कथासूत्राभोवती गुंफलेली आहे. त्या अनुषंगाने अन्य गोष्टीही कादंबरीत येतात उदा. विनी-पुनी या दोन गरीब मुलींचे फसवले जाणे, श्रीमंतांनी चालवलेली गरीबांची पिळणूक, भारतातील हिंदू-मुस्लीम तेढ, अमेरिकेतील वर्णद्वेष आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करून अमेरिकेच्या उद्दाम अहंकाराला इस्लामी लोकांनी दिलेला शह अशा काही गोष्टींचे उल्लेख कादंबरीत आहेत.पिरोजासारखी खानदानी मुस्लीम बाई एकटीच निराधार बायकांसाठी स्वयंसेवी संस्था चालवते आहे आणि धैर्याने जगते आहे याबद्दलही कादंबरी बोलते.सत्या आणि त्याची अगदी सामन्य पार्श्वभूमीतून आलेली प्रारंभी कोणताच बदल नको असणारी आणि प्रसंगपरत्वे स्वतःचे प्रेम ,जिद्द दाखवून बदललेली बायको पुजा याचीही कथा कादंबरीत आहे. लाझलो आणि अरमांडो या सोनियाच्या दोन मित्रांना समलिंगी आकर्षण वाटते त्याबद्दलची एक कथाही कथानकात आहे.
खरं तर, या छोट्या कथासूत्रांतूनही परस्परांवर वर्ण,धर्म,जात, वर्ग,लिंग निरपेक्ष प्रेम केले तर प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व मिळेल, सन्मान मिळेल आणि हाच जगातील आनंदाचा एकमेव मार्ग आहे असे लेखिकेला सुचवायचे आहे.
‘दी लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ ही किरण देसाई यांची कादंबरी तुम्हाला शक्य असेल तर जरूर वाचा.पुढील ब्लॉगमध्ये काय लिहावे ते अजून ठरवलेले नाही. काही इंग्रजीतून लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार स्त्रियांची माहिती तर काढली आहे पण त्यांच्या कादंबऱ्या उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यासाठी प्रयत्न करते आहे. त्या एकदा हाती आल्या की पुन्हा एकदा ब्लॉग लिहीन. तोपर्यंत नमस्कार.
-गीता मांजरेकर
________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा