‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी, ही किरण देसाई यांनी लिहिलेली २०२५ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे.गेल्या वर्षीच्या बुकर पारितोषिकाच्या नामांकन यादीत तिचा समवेश होता.
किरण देसाई आपल्याला ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’(१९९८) या काहीशा विनोदी पण खरंतर आपल्या सगळ्या व्यवस्थांवर उपरोधिकपणे भाष्य करणाऱ्या कादंबरीमुळे तसेच ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’(२००६) या बुकर पारितोषिक प्राप्त कादंबरीमुळे परिचित आहेत.प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार अनिता देसाई यांची कन्या ही त्यांची ओळखही आपल्याला आहे.

हा ब्लॉग वाचण्यापेक्षा तो ऐकणे ज्यांना सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ ही कादंबरी किरण देसाई यांनी ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीनंतर १९ वर्षांचा प्रदीर्घ विराम घेऊन लिहिली आहे. त्यामुळे या कादंबरीबद्दल बरीच उत्सुकता होती. ६७० पृष्ठांची ही महाकादंबरी आहे.कधी ती संथपणे पुढे सरकते तर कधी गतीमान होते.कधी या कादंबरीच्या कथानकात व्यक्तिरेखांच्या वास्तवातील दैनंदिन घटनांखेरीज विशेष काही घडत नाही. पण काहीवेळा मात्र कथानकातील घटना सनसनाटी किंवा कल्पनारंजक म्हणाव्यात अशाही होतात.
किरण देसाई यांच्या कादंबरीत त्यांची आई अनिता देसाई यांच्या ‘फायर इन दी माऊंटन’ आणि ‘फास्टिंग फिस्टींग’ या कादंबरीच्या कथानकातील काही संदर्भ नव्या रूपात आलेले दिसतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘हल्लाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीतील गोष्टीचा संदर्भही ‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीत एखाद-दोन ठिकाणी आला आहे.
साधारण १९८० ते १९९२ पर्यंतचा काळ या कादंबरीच्या कथानकात प्रत्यक्ष सामावलेला आहे.पण व्यक्तिरेखांच्या भूतकाळामुळे कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळाचे काही उल्लेख येतात.बाबरी मशिदीचे प्रकरण आणि अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवरील अतिरेकी हल्ला हे दोन प्रसंग काळाचे संदर्भ म्हणूनच केवळ कथानकात येतात.
‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीतील घटना कधी अलाहाबादमध्ये घडतात , कधी दिल्लीत , कधी उत्तराखंडमधील लांडोर या गावात, कधी गोव्यात, कधी राजस्थानात तर कधी अमेरिकेतील व्हरमॉंन्ट राज्यातील लहानशा गावी, न्युयॉर्क शहरात,तर कधी इटालीतील रोममध्ये,कधी मेक्सिकोमधील समुद्रकिनारा असलेल्या छोट्याशा गावात,तर कधी मेक्सिकोतील खाणींच्या रूक्ष प्रदेशातही घडतात.त्यामुळे कादंबरीतील अवकाश बराच विस्तारलेला,सतत बदलणारा आहे.व्यक्तिरेखांच्या खोल मनोवकाशात देखील ही कादंबरी वाचकांना घेऊन जाते.
‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीतील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा म्हणजे सोनिया आणि सनी या दोन तरूण वयातील व्यक्ती आहेत. पण त्यांच्या निमित्ताने त्यांचे पालक, अन्य नातेवाईक, मित्र-मंडळी, त्यांचे प्रेमिक अशा बऱ्याच व्यक्तिरेखा कादंबरीच्या कथानकात येत रहातात.
किरण देसाई यांची ही कादंबरी खूप विस्तृत आहे आणि कथानकात अनेक बारीकसारीक तपशील आहेत. पण कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे थोडक्यात वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
सोनिया शहा आणि सनी भाटिया यांच्या एकाकीपणाबद्दलचे हे कथानक आहे असे कादंबरीचे शीर्षक सांगते आहेच. सोनिया शहा ही मानव शहा आणि सेहर शहा यांची मुलगी आहे. शहा कुटुंब मूळचे गुजराथमधील एका छोट्या खेड्यातील पण मानवचे वडील वकील झाल्यानंतर अलाहाबादच्या न्यायालयात वकिली करू लागले आणि त्यांनी आपले घर अलाहाबादला वसवले.त्यांची बायको गुजराथमधील खेड्यातील जुन्या वळणाची बाई होती.आपल्या नवऱ्याची सेवा करण्यात तिचे पूर्ण आयुष्य गेले होते.वकीलसाहेबांना दोन मुले. मोठी मीना जिला त्यांनी थोडेफार शिकवले होते.पण पुढे ती एका ख्रिस्ती मुलाच्या प्रेमात पडली आहे हे कळल्यावर वकिल साहेबांनी तिला घरीच बसवले होते.परदेशात नोकरी करणाऱ्या एका गुजराथी मुलाशी तिचे लग्न त्यांनी घाईघाईत उरकून टाकले होते. पण तो नवरा मुलगा परत नोकरीवर गेल्यावर कोणाचे तरी निनावी पत्र वकिलसाहेबांच्या पत्त्यावर आले होते ज्यात त्या मुलाचे पूर्वीच लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुले आहेत हे फोटोसहीत दाखवले गेले होते.त्यामुळे मीनाला नवऱ्याकडे पाठवले गेलेच नव्हते. ती आपल्या म्हाताऱ्या होत चाललेल्या आई-वडिलांची सेवा करत अलाहाबादलाच राहिली होती.अधूनमधून रहायला येणारी भाची सोनिया आणि कधीतरी भेटणारे मिशन शाळेतले तिचे परिचित हेच तिचे विरंगुळे होते.
आपला धाकटा मुलगा मानव याला मात्र शहा वकिलांनी डेहराडूनच्या शाळेत शिकवले,तो उच्चशिक्षित होऊन दिल्लीत नोकरी करू लागला आणि त्याने डेहराडूनमध्ये त्याच्या सहवासात आलेल्या सेहर बार्बियर या ऍंग्लोइंडियन मुलीशी प्रेमविवाह केला.
सेहर बार्बियरचे वडील जर्मन होते. ते ब्रिटीशांच्या काळात इंजिनीयर म्हणून भारतात आले होते.हिमालयाच्या दुर्गम भागात रस्ते, पुल , घरे बांधताना ते इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले होते. जर्मनीत असताना त्यांचा मित्र झालेल्या बिभू रॉय या बंगाली मुलाच्या कलकत्त्याच्या घरी गेले असताना बार्बियर त्याच्या बहिणीच्या म्हणजे अंजोलीच्या सहवासात आले. दोघांनी प्रेमविवाह केला होता.या दांपत्याला सेहेर आणि मेहेर अशा दोन मुली झाल्या. भारत स्वतंत्र झाल्यावरही जर्मनीत परत न जाता डेहराडूनजवळच्या लांडोर या गावात ‘क्लाऊड कॉटेज’ हा बंगला बांधून बार्बियर तिथेच स्थाईक झाले होते. हिमालयाच्या डोंगररांगातून फिरायचे आणि निसर्गाची चित्रे रंगवायची आवड त्यांनी जोपासली होती. निसर्गातच त्यांना अध्यात्मिक आनंद गवसला होता. त्यामुळे एकेदिवशी हिमालयात फिरायला गेलेले बार्बियर परत आलेच नव्हते.त्यांची पत्नी अंजोली हिनेच मुलींना शिक्षण देऊन सक्षम केले होते. सेहरने मानवशी प्रेमविवाह केला होता तर मेहर प्रेमविवाह करून परदेशात स्थाईक झाली होती. आपल्या आईच्या निधनानंतरही त्यांचा बंगला मुलींनी सांभाळला होता.आपल्या वडिलांची आठवण म्हणून त्यांनी काढलेल्या एका मिनीएचर पेंटींगचे लॉकेट सेहरने स्वतःकडे ठेवले होते. त्या पेंटींगमध्ये चीनी देवतांप्रमाणे एक भडक रंगातील देवता वडिलांनी रंगवली होती. पण त्या देवतेचा चेहराच नव्हता. वडील त्याला ‘बादलबाबा’ म्हणत.आपल्या वडिलांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी स्वतःला बादलबाबामध्येच रूपांतरीत केले असावे अशी सेहरची श्रद्धा होती.कोणत्याही संकटात ती त्या बादलबाबाला आठवे आणि तिला दिलासा मिळे.
यथावकाश मानव आणि सेहेर यांना सोनिया ही मुलगी झाली. जिला त्यांनी दिल्लीतील उत्तम शाळेत शिक्षण देऊन उच्चशिक्षणासाठी व्हरमॉंट या अमेरिकेतील राज्यातील विद्यापीठात पाठवले होते. सेहेरने आपल्या वडिलांचे बादलबाबाचे चित्र असलेले लॉकेट श्रद्धेने सोनियाच्या गळ्यात घातले होते. संकटात हा बादलबाबा तुला मदत करेल असे तिने सोनियाला सांगितले होते. सोनिया अमेरिकेत सर्जनशील लेखनासंदर्भातील प्रशिक्षण घेत होती. हिवाळ्याच्या सट्टीत तिला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तेथील वाचनालयात काम करावे लागत होते.प्रचंड थंडी, सतत पडणारे बर्फ यामुळे आणि सोबतीला कोणीही चांगला मित्र-मैत्रीण नसल्याने सोनिया नैराश्यग्रस्त झाली होती. आपल्या आई-वडिलांना फोन करून ती आपले नैराश्य व्यक्त करत राही.
अलाहाबादला सोनियाचे आजोबा वकिलसाहेबांना जेव्हा नातीच्या हे नैराश्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी फोनवरून तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या या नातीला योग्य जोडीदार मिळाला तर तिचे हे नैराश्य संपू शकेल असे आजोबांना वाटले. आजोबांचे अनेक वर्षांपासूनचे मित्र आणि शेजारी जे लष्करातील कलोनेल पदावरून निवृत्त झाले होते त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) सनी हा देखील अमेरिकेत शिकून नोकरी करत होता. आजोबांना वाटले की आपण आपल्या मित्राकरवी त्याच्या नातवाकडे आपल्या नातीची माहिती पाठवून त्यांची जोडी जुळवण्याचा प्रयत्न करावा. लगेच त्यांनी आपल्या कोर्टातील क्लार्कला बोलावून सोनियाचे गुण-दोष सांगणारे पत्र वकिली भाषेत लिहून कलोनलकडे पाठवले. ते त्यांनी आपली मुलगी बबिता भाटियाला पाठविले.
बबिता भाटिया ही दिल्लीतील माजी अर्थमंत्र्याच्या थोरल्या मुलाची बायको होती. अर्थमंत्री भ्रष्टाचारी होते. त्यांनी सत्तेत असताना बरीच मालमत्ता मिळवून ठेवली होती. पण त्यांचा थोरला मुलगा रणजित अगदी त्याच्या विरूद्ध स्वभावाचा होता. भ्रष्टाचार त्याला अजिबात आवडत नसे. पण त्याच्या अत्यंत नैतिक वागण्यामुळेच त्याला वरिष्ठांच्या रोषाला कारण ठरावे लागले होते आणि त्या ताणामुळे त्याचे अकाली निधन झाले होते.पुढे अर्थमंत्र्याचे व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांच्या मालमत्तेच्या अन्य दोन मुलांनी तीन भागात वाटण्या करून टाकल्या होत्या बबिताच्या वाट्याला बंगल्यातील एक भाग आणि काही पैसा आला होता. आपल्या मुलाला सनीला तिने उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. जो शिकून नोकरी करू लागला होता. बबिताने दोन छोट्या मुलींना मोलकरणी म्हणून ठेवले होते.घरातील सगळी कामे त्या करत आणि बबिता तिला हवे तेव्हा हवे तिथे फिरत असे.अमेरिकेतील मुलगा आणि इस्टेट ही तिच्या प्रतिष्ठेची गोष्ट होती. आपल्या वडिलांकडून म्हणजे कलोनलकडून आलेली सोनियाची माहिती तिने वाचली पण तिला काही आपल्या मुलाचे लग्न व्हावे आणि आपल्यापासून तो दुरावावा असे वाटत नव्हते.तिने ती माहिती सनीकडे पाठवली पण सनीने ते पत्र वाचण्याची तसदीही घेतली नाही कारण तो त्याची अमेरिकन मैत्रीण उल्ला हिच्या सहवासात गुंतला होता.
अलाहाबादच्या सोनियाच्या आजोबांनी- शहा वकिलांनी- सनीची माहिती दिल्लीत रहाणारा आपला मुलगा मानवच्या माध्यमातून सोनियाकडे पाठवली पण तिनेही ती नीट वाचली नाही कारण तोपर्यंत आपल्या नैराश्यातून बाहेर पडायचा दुसराच मार्ग तिने शोधला होता. ती जिथे काम करत होती त्या ग्रंथालयात येणाऱ्या एका मध्यमवयीन चित्रकाराने इलानने तिला भुलवले होते आणि आपल्या लैंगिक वासना पूर्ण करण्यासाठी तो तिला वापरू लागला होता. दुबळ्या मनाच्या निरागस, अननुभवी सोनियाला हा चित्रकार आपल्यावर भावनिक ,लैंगिक हक्क गाजवतो,जणू आपल्याला त्याच्या तुरूंगातच ठेवतो हे कळलेच नव्हते.
मानव आणि सेहेर यांनी प्रेमविवाह केला असला तरी मानवची वर्चस्ववादी वृत्ती सेहरला आवडत नसे. सोनिया मोठी होईपर्यंत तिने मानवचे वागणे सहन केले होते. पण सोनिया अमेरिकेत गेल्यावर तिने स्वातंत्र्य घ्यायला सुरूवात केली.सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात काम करण्यात तिला स्वारस्य होते. तशाप्रकारचे काम तिने शोधले आणि ती ते मनापासून करू लागली. पण मानवला ते आवडले नाही. सेहरने केस कापले, ती अन्य पुरूषांमध्ये वावरते हे पाहून तो संशय घेऊ लागला. एकदा तर मित्रांना घरी बोलावले असताना तो सेहरबद्दल अपमानास्पद बोलला होता. तेव्हाच सेहरने मानवला सोडून वेगळे रहाण्याचा निर्णय घेतला. आपल्या आई-वडिलांच्या लांडोर येथील बंगल्यात जाऊन रहायचे तिने ठरवले. तिची एक मैत्रीण फिरोजा हिने तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.वडिलांच्या काळापासूनचा स्वयंपाकी मूलचंद आणि मांजर बाबायागा यांच्यासोबत सेहर लांडोरला राहू लागली. तिचे वाचन , लेखन तिथे राहून करू लागली.
मानव दिल्लीत त्यांच्या घरात चंदू या नोकरासह राहू लागला. पण त्याला सेहरचा निर्णय कधीच पटला नाही. सेहर गेल्यानंतर हळहळू त्याने मित्रांपासून स्वतःला अलग केले. कामाच्या निमित्ताने त्याचा प्रवास होत राहिला पण एकूण कामातही त्याचे मन रमेना. सेहरने ठेवलेल्या पुस्तकांकडे तो वळला. कवितांमध्ये दिलासा शोधू लागला.
सोनिया व्हरमॉन्टमध्ये ज्या इलान नावाच्या चित्रकाराच्या आकर्षणात गुंतली होती त्याने कालांतराने व्हरमॉन्ट सोडून त्याच्या मेक्सिकोच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सोनियाने आपले सुट्टीतील प्रशिक्षण संपवून न्यूयॉर्कला यावे तिथे तो तिला नोकरी मिळवून देईल असे आश्वासन आणि न्युयॉर्कमधील एका स्टुडियोचा फोन नंबर देऊन इलान निघून गेला होता. सोनियाला पुन्हा नैराश्य सतावू लागले. तिचे प्रशिक्षण संपल्यावर ती न्युयॉर्कला गेली, इलानने सांगितल्याप्रमाणे लाला नावाच्या बाईच्या स्टुडियोत ती काम करू लागली. कालांतराने इलान न्युयॉर्कच्या त्याच्या घरी आला आणि त्याने सोनियाशी संपर्क साधला. पुन्हा एकदा सोनिया इलानच्या आहारी गेली. इलान हा मानसिक आजार असलेला माणूस आहे हे तिच्या लक्षात आले.त्याच्या आईने त्याला प्रेम दिले नाही म्हणून तो असा झाला आहे असा समज सोनियाने करून घेतला. इलान त्याची चित्रे सोनियाला दाखवत नसे.पण सोनियाच्या गळ्यातील बादलबाबाचे लॉकेट त्याला फार आवडले होते. ते चित्र आपण मोठे करणार असे तो सोनियाला सांगे आणि त्यासाठी ते लॉकेट त्याने सोनियाकडून मागून घेतले होते.

सोनियाने काही खाद्यपदार्थ बनवला तर काहीतरी निमित्त सांगून इलान ते खात नसे. कारण तो संशयी होता. तो आपला ताबाच घेऊन टाकतो हे सोनियाला कळत होते पण आपण जर त्याला सोडून गेलो तर त्याला चित्र काढता येणार नाहीत , तो आजारी होईल या इलाननेच तिच्या मनात भरवलेल्या भ्रमामुळे सोनिया इलानपासून दूर जाण्याचा निर्णय ठामपणे घेऊ शकत नव्हती. पण एके रात्री ती आणि इलान बाहेरून घरी आले तेव्हा इलानची बायको घरी आलेली होती.तिने सोनियाचा अपमान करून रातोरात सामानासकट सोनियाला घराबाहेर काढले. इलान त्यावेळा काहीही बोलला नव्हता. त्याने सोनियाची बाजू घेऊन बायकोला काहीच सांगितले नव्हते. सोनिया कशीबशी होस्टलमध्ये पोहचली होती. आपल्या आईने दिलेले बादलबाबाचे लॉकेट इलानकडेच राहिले याची चुटपुट सोनियाच्या मनाला लागून राहिली होती.
सोनियासाठी इलानकडून झालेली प्रतारणा हा प्रचंड मोठा मानसिक धक्का होता. तिने नोकरी आणि उर्वरीत शिक्षण सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.भारतात परतल्यावर तिला कळले होते की तिची आई लांडोरला आजोबांच्या बंगल्यात राहते आहे आणि वडील एकटेच दिल्लीत आहेत.सोनियाने आईला भेटून आपला एकाकीपणा तिला सांगितला होता पण त्यामागचे कारण विशेषतः इलानने तिची केलेली फसवणूक ती आईला सांगू शकली नव्हती. बादलबाबाचे लॉकेट कुठे गेले हेही ती आईला सांगू शकली नव्हती.’क्लाऊड’ बंगल्यावर रहाताना अज्ञात डोळे आपल्याला खिडकीतून रोखून पहात आहेत असे भास सोनियाला होत राहिले.हे डोळे कोणा प्राण्याचे आहेत की इलानचीच अदृष्य नजर अजूनही आपल्यावर पहारा ठेवून आहे हे सोनियाला कळले नव्हते.ती दिल्लीत आल्यावर काही दिवसांत अलाहाबादच्या तिच्या आजोबांचे निधन झाले होते.आणि वडिलांबरोबर तिला मीना फोईला भेटायला अलाहाबादला जावे लागले होते.
सनीचा लहानपणापासूनचा मित्र सत्या हादेखील सनीसारखाच अमेरिकेत स्थलांतरीत झालेला होता. तो डॉक्टर होता आणि अमेरिकेत वैद्यकशास्त्राचे उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेतील ग्रामीण भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करू लागला होता. सनीने निदान उल्लाशी मैत्री करून आपला एकाकीपणा घालवण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्याला सनीखेरीज कोणीच मित्र-मैत्रिण नव्हते. सनीचे अमेरिकन मुलीला जोडीदार करून एकत्र रहाणे सत्याला पसंत नव्हते. त्याला भारतीय मुलीशी विवाह करून कायमचे सुस्थिर वैवाहिक आयुष्य पाहिजे होते. सनीने आपल्याबरोबर भारतात यावे आणि वधूसंशोधनात सहकार्य करावे असा सत्याचा आग्रह होता. सनीनेही भारतात जाण्याची ही संधी दवडली नव्हती तो सत्यासोबत दिल्लीत येऊन दाखल झाला होता.सत्या सनीला घेऊन मुली बघण्याच्या कार्यक्रमांना जाऊ लागला होता. पण त्याच्या लक्षात आले होते की सनीला घेऊन गेले तर मुली सनीकडेच आकर्षित होतात आणि आपल्याला मुलींशी बोलायची संधी मिळत नाही. त्यामुळे त्याने सनीला वधूसंशोधनाच्या कार्यक्रमांना घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला होता.
अमेरिकेत परतण्यापूर्वी सनीने आपल्यासोबत अलाहाबादला यावे आणि आजी-आजोबांना भेटावे असे त्याची आई बबिता भाटीयाला वाटत होते. ते दोघे अलाहाबादला जायला ज्या ट्रेनने निघाले होते त्याच ट्रेनमध्ये मानव आणि सोनिया देखील होते.मानव कामानिमित्त ओरिसाला गेला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आणि त्याची बहीण मीना त्याच्याशी संपर्क करू शकली नव्हती. आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने तिने वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपले होते. मानवला वडिलांच्या मृत्युबद्दल कळल्यावर तो सोनियाला घेऊन अलाहाबादला निघाला होता. ट्रेनमध्ये त्याची आणि बबिताची भेट झाली, जुजबी बोलणेही झाले. पण बबिताला त्याच्या वडिलांच्या मृत्युबद्दल त्याने काही सांगितले नव्हते.सनीने ट्रेनमध्ये एक मुलगी इंग्रजी पुस्तक वाचताना पहिली होती आणि ती काय वाचत असावी हे पाहण्यासाठी तिच्या बाजूने दोनदा फेरीही मारली होती. पण ती मुलगी अलाहाबादच्या आजोबांच्या शेजारच्या घरातील सोनिया आहे हे त्याला माहीत नव्हते.
अलाहाबादला पोहचल्यावर बबिताला वडिलांकडून त्यांचे मित्र वकिलसाहेब शहा यांचे निधन झाल्याचे कळले होते. आईने तयार केलेले खाणे घेऊन ती संध्याकाळी शेजारी सांत्वनाला गेली होती. पण ती शेजारी गेल्यानंतर काही वेळातच वीज गेल्याने तिला परत घरी घेऊन यायला सनी टॉर्च घेऊन शेजारच्या घरी पोहोचला होता. तिथे बाहेरच्या पडवीत खुर्चीवर त्याने एक इंग्रजी पुस्तक पाहिले होते आणि हेच पुस्तक आपण ट्रेनमध्ये दिसलेल्या मुलीच्या हाती आपण पाहिले होते हे त्याने ओळखले.पण ती मुलगी काही त्याला घरात दिसली नव्हती. मुलीची आत्या आणि वडील मात्र त्याला भेटले होते.ही तीच मुलगी जिच्याबद्दल आपल्या आजोबांकरवी आपल्याला कळवले गेले होते हे सनीला आठवले. त्या मुलीला भेटण्याची उत्सुकता असल्याने तो दुसऱ्या दिवशी सकाळी रपेट करायच्या हेतूने बाहेर पडला आणि तिचे वडील त्यांच्या घराच्या पडवीत दिसले म्हणून बोलायचे निमित्त करून घरात शिरला. त्या दिवशी सोनियाची आणि त्याची पहिली भेट झाली.सोनिया फारशी बोलकी नाही हे त्याला कळले. पण पुढील दोन-तीन भेटीत सोनियाचा आणि सनीची मैत्री झाली. आपला ईमेल आय.डी. सनीने सोनियाला दिला.
सोनियाला अलाहाबादचा आपल्या आजोबांचा अनेक वर्षांपासूनचा भाड्याचा बंगला आता आपला राहिला नाही याचे वाईट वाटत होते. जिने आपल्या लहानपणी आपला सांभाळ केला ती मीना फोई आपल्या वडिलांच्या घरी दिल्लीला येऊ शकणार नाही तर अलाहाबादच्या मिशनऱ्यांच्या संस्थेतच तेथील होस्टेलची रेक्टर म्हणून रहाणार हेही सोनियाला मनातून पटले नव्हते.सोनिया आणि सनी दोघेही दिल्लीत परतल्यावर पुन्हा एकदा तिच्या घरीच भेटले.त्या भेटीत शारीर जवळीक होती. या भेटीचा बभ्रा सोनियाच्या शेजाऱ्यांनी खूपच केला. त्यामुळे सोनियाचे वडील सनीवर चिडले.त्यांनी बबिताला फोन करून आपला राग व्यक्त केला.
दरम्यान सत्याने पंजाबमधील आपल्या मित्राच्या परिचयातील एका गावातील मुलीला पसंत केले होते. सत्याच्या लग्नाची तारीख ठरवून सनी आणि सत्या अमेरिकेत निघून गेले.अमेरिकेत आपल्या घरी पोहोचल्यावर सनीला धक्का बसला कारण उल्ला तिच्या सगळ्या वस्तू घेऊन घरातून निघून गेली होती.ती का गेली, कुठे गेली याबद्दल तिने काहीही लिहून ठेवले नव्हते.
सनी पुन्हा एकदा एकाकी झाला.उल्लाची आठवणच नको म्हणून त्याने घर बदलले आणि तो अगदी सामान्य लोकांच्या वस्तीत राहू लागला. अनेक लोकांच्या गर्दीत त्याला थोडा दिलासा मिळू लागला.त्याच दरम्यान बबिताने आपला मुलगा कोणा अमेरिकन मुलीच्या प्रेमात तर पडलेला नाही ना हे पहायला अचानक अमेरिकेत यायचे ठरवले.तिने आपली रहाण्याची सोय एका मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे केली होती. ते कुटुंब काही महिन्यांसाठी युरोपात गेले होते आणि त्यांचे न्युयॉर्कमधले आलिशान घर रिकामेच होते. बबिता तिथे येऊन राहिली. एकदाच ती सनी कुठे रहातो ते पहायला त्याच्या खोलीवर आली आणि तिचा भ्रमनिरास झाला. अमेरिकेतही भारतातल्याप्रमाणे दाटीवाटीने लोक रहात असतात हे पाहून तिला धक्काच बसला. इथे रहाण्यापेक्षा सनीने भारतातच परत यावे असे तिला वाटले. आपला मुलगा अमेरिकन मुलीच्या प्रेमात नाही ही गोष्ट तिला आवडली नाही. तो जर अमेरिकन मुलीच्या प्रेमात असता तर तिच्या दृष्टीने ती प्रतिष्ठेची , मिरवण्याची गोष्ट ठरणार होती.
बबिता भारतात परतली आणि सनीला ग्रिन कार्ड मिळाले. मात्र ती बातमी त्याने कोणालाच कळू दिली नाही.सोनियाशी त्याचा थोडासा पत्रव्यवहार झाला होता. पण उल्लाबद्दल तो तिला काही सांगू शकला नव्हता.सत्याच्या लग्नाच्या निमित्ताने सनीला पुन्हा एकदा भारतात जावे लागणार होते. सनीने आपण हनीमुनला गोव्याला जाऊ तेव्हाही आपल्या सोबत असावे असा सत्याचा आग्रह होता. सनीने ते सोनियाला कळवले होते आणि आपण गोव्यात भेटू शकतो का ते विचारले होते.
सोनियाने दिल्लीत तिच्या आईच्या मैत्रिणीच्या ओळखीने ‘कला’ नावाच्या नियतकालिकात लिहायला सुरवात केली होती. तिचा पहिलाच लेख दिल्लीत मिळणाऱ्या कबाबांबद्दल होता. कबाबांचा इतिहास ,त्यांचे वेगवेगळे प्रकार , त्यांच्या विशिष्ट चवींची खासियत याबद्दल तिने तिने जुन्या दिल्लीत अनेक हॉटेलांमध्ये जाऊन भरपूर माहिती गोळा केली होती आणि अभ्यासपूर्ण पण रंजक लेख लिहिला होता.त्या लेखाचे तिच्या वडिलांना फारच कौतुक वाटले होते आणि त्यांनी तो अंक स्वतःच अनेकांना पाठवला होता.बबिता भाटियालाही तो अंक मिळाला होता. सोनियाने लिहिलेला लख तिला आवडलाही होता. पण तरी सोनिया आणि सनी एकत्र यावेत असे मात्र तिला वाटत नव्हते.
सत्याच्या हनीमुनच्या निमित्त गोव्यात आलेल्या सनीची नेहमीप्रमाणे सत्याला अडचण वाटू लागली. आपली बायको पुजा सनीकडे आकर्षित होईल ही भीती त्याने सनीकडे व्यक्त केली. त्यामुळे सनीने ततातडीने सोनियाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. सोनिया जुन्या गोव्याजवळच्या एका जुन्या बंगल्यात राहिली होती आणि गोव्यातील लोकांनी जपलेल्या संस्कृतीचा, तेथील पुरातन वास्तुंचा, पोर्तुगिजांच्या काळात बांधल्या गेलेल्या आणि अजूनही दिमाखात उभ्या असणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्या बंगल्यांचा अभ्यास करून लेख लिहीत होती.सनी गाडी करून सोनियाच्या भेटीला गेला. त्याचा ड्रायव्हर आनंद हा गोव्यातील पर्यावरणाबद्दल अत्यंत जागरूक नागरिक असल्याने रस्त्यात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक पिशव्या उचलायला थांबत राहिला. सोनियाने सांगितलेला बंगला मिळायलाही वेळ लागला आणि सनी खूपच उशीरा सोनियाकडे पोहोचला. पण आश्चर्यकारकरित्या त्या दोघांनीही त्या गोष्टीवर वाद न घालता एकमेकांना समजून घेतले.गोव्यातील ते चार-पाच दिवस सोनिया आणि सनी एकमेकांत मिसळून गेले. समुद्र किनाऱ्यावर पोहायला जाण्याने तर त्यांच्या एकत्र येण्याला वेगळी खोली दिली.
अमेरिकेत परत आल्यावर सनी आपल्या कामात व्यस्त झाला.सोनिया दिल्लीत परतली आणि शांतपणे लिहिण्यासाठी आईकडे ‘क्लाऊड’ बंगल्यावर जाऊन राहिली.तिथून परतल्यावर तिला तिचे वडील आजारी असल्याचे कळले. त्यांना डॉक्टरांकडे नेणे सुरू झाले. दरम्यान सनीला भेटायला अमेरिकेत जावे असेही तिला वाटू लागले पण व्हिसा मिळेना. तेव्हा सनी आणि सोनियाने इटलीत भेटायचे ठरवले. आपण ‘कला’या मासिकासाठी नवीन लेखासंदर्भात माहिती गोळा करायला इटलीला जातो आहोत असे सोनियाने घरी सांगितले. सनीलाही त्याच्या वर्तमानपत्राकडून असेच काही सांगून सुट्टी मिळवावी लागली. इटलीत पुन्हा एकदा सोनिया आणि सनी यांच्यात गाढ जवळीक निर्माण झाली. एके दिवशी सोनियाच्या आईची मैत्रीण फिरोजा हिच्या परिचयाच्या एका कुटुंबाकडे ते दोघे गेले असताना त्यांनी जवळच असलेले एक म्युझियम दोघांनी जरूर पहावे असे सुचवले.ते म्युझियम पहात असताना अचानक इलानने काढलेले ‘मदर स्विमिंग’ हे चित्र सोनियाला दिसले आणि त्याच्याच एका चित्रात एका पुरूषाच्या मांडीवर पहुडलेल्या नग्न स्त्रीचे चित्र आपलेच आहे असे वाटून सोनिया वेडीपिशी झाली. सनी ही चित्रे मजेत पहात असताना सोनिया त्याला इथून जाऊया असे सुचवू लागली. तो गोंधळला असताना तिने त्याचे केस ओढून त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघेही बाहेर पडले.बराच वेळ भरकटले. सोनिया थरथरतच होती. अखेर कसेबसे ते हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा सनीने सोनियाला नेमके काय झाले आहे म्हणून तू एवढी घाबरली आहेस असे विचारले. सोनियाने इलान आणि तिच्या नात्याबद्दल आणि इलानने तिला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कसा केला होता त्याबद्दल सनीला सांगितले. आपली बादलबाबाचे चित्र असलेली चेन इलानकडेच राहिली आहे याबद्दल खंतही तिने व्यक्त केली. आता फक्त सनीच ती घेऊन येऊ शकतो असेही तिने सुचवले. सनी सोनियाची ही कहाणी ऐकून सुन्न झाला, त्याला सोनियापासून आपण दुरावलो आहोत हे जाणवले. दोघेही दुसऱ्या दिवशी अलिप्तपणे एकमेकांकडे पाठ फिरवून आपापल्या विमानाने भारतात व अमेरिकेत निघून गेले.
दिल्लीत परतल्यावर वडिलांच्या सखोल तपासण्या करून घेताना सोनियाला कळले की तिच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे.त्यांना इस्पितळात दाखल केल्यावर सोनियाला असहाय वाटले. लिम्फ नोडच्या कॅन्सरची चौथी पातळी गाठली असल्याने वडिलांना जेमतेम वर्षभर आयुष्य मिळेल असे डॉक्टरांकडून सोनियाला कळले. तिने आपल्या आईला लांडोरहून बोलावून घेतले. आई आली. तिने डॉक्टरांशी नीट चर्चा केली आणि किमोथेरेपी सुरू झाल्यावर ती पुन्हा तिच्या वडिलांच्या बंगल्यत निघून गेली. सोनियाला वडिलांचा विक्षिप्तपणा सहन करत त्यांच्यावरील इलाज करून घ्यावे लागत होते. अधूनमधून तिची चीडचीड होई पण आईची मैत्रीण फिरोजाशी बोलणे हा एकमेव दिलासा तिच्याकडे होता.वडिलांच्या किमोथेरपीचे एक सत्र पूर्ण झाल्यावर त्यांना थोडे बरे वाटू लागले आणि इस्पितळातून त्यांना घरी पाठवले गेले. सोनियाने ‘कला’ या नियतकालिकासाठी राजस्थानवर आधारित लेख लिहिण्यासाठी परवानगी घेतली आणि ती एकटीच राजस्थानला गेली. तिथे तिला भेटलेल्या मार्गदर्शकाने सुरवातीला तिच्याशी चांगले वर्तन केले पण संधी मिळताच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या धक्क्यातून कशीबशी सावरलेली सोनिया दिल्लीत परतली. तिने या प्रसंगाबद्दल कोणालाच सांगितले नाही.
सनी सत्याच्या लग्नाच्या निमित्ताने दिल्लीत आलेला असतानाच त्याच्या दोन काकांनी त्याला त्यांची सामाईक प्रॉपर्टी विकून तीन हिस्से करावेत असे सुचवले होते. सनीने तसे त्याच्या आईच्या-बबिताच्या कानावर घातले होते. बबिताला जेव्हा सोनिया सनीला गोव्यात भेटली होती हे कळले होते तेव्हापासून सनियाबद्दल असुया वाटत होती. सोनिया आणि सनी इटलीत भेटले हे कळल्यावर तर ती आणखीनच बिथरली होती.त्या रागात ती गोव्याला आपली मैत्रीण वान्या हिच्याकडे काही दिवस जाऊन राहिली होती. वान्या आणि तिच्यासारख्या अनेक श्रीमंत विधवा स्त्रिया गोव्यात मजेत रहात आहेत असे बबिताला वाटत होते. आपण बंगला विकला तर आपली मैत्रीण वान्या म्हणते त्याप्रमाणे गोव्यातच एखादा जुना बंगला विकत घ्यावा असे तिने मनोमन ठरवले होते. प्रत्य़क्षात बंगला विकल्यावर थोडे पैसे चेकने तिला मिळाले पण उर्वरित रक्कम सनीच्या खात्यावर जमा केली जाईल असे तिला तिच्या दोन्ही दिरांनी सांगितले. त्यामुळे बबिता सतत सनीला फोन करून त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली का ते विचारू लागली. सनीला बंगला विकण्यात गैरव्यवहार झाल्याचे जाणवले आणि त्याच्या मनावर नाहक ताण येऊ लागला. इथे बबिताने मिळालेल्या पैशांत गोव्यातील एक बंगला वान्याच्या शिफारशीने विकत घेतला होता. पण ती गोव्यात स्थलांतरीत होण्यपूर्वीच तिच्या बंगल्यातच रहाणाऱ्या तिच्या दोन्ही दिरांचा खून झाला. पोलिसांची चौकशी वगैरे चक्रातून जाताना बबिता थकून गेली. तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती आरामासाठी इस्पितळात दाखल झाली. खरं तर तेव्हाच सोनिया तिच्या वडिलांवर इलाज करण्यासाठी त्या इस्पितळात येत होती. सोनियाने बबिताला पाहिले होते पण सनीशी संबंध तुटलेला असताना बबिताशी बोलणे तिला योग्य वाटले नाही. बबिताच्या दोन्ही दिरांच्या खुनाबद्दल वर्तमानपत्रात वाचल्यावर ते कुटुंबच सोनियाच्या मनातून उतरले होते.
सनीने आपल्या काकांच्या खुनाबद्दल ऐकल्यापासून तो घाबरून गेला होता. जर काकांनी बंगला अंडरवर्ल्डमधील कोणा माणसांना विकला असेल आणि त्यांनी काकांना मारले असेल तर ते पुढे जाऊन आपली आई आणि आपल्यालाही संपवू शकतील अशी भीती सनीला वाटत होती. त्या भयाने त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता.सत्याही त्याच्यापासून दुरावलेला असल्याने कोणापाशी बोलून ताण हलका करावा अशी व्यक्तीही त्याच्या आयुष्यात नव्हती.सोनियाशी बोलावे असे मनातून वाटत असूनही इलान प्रकरणामुळे त्याला सोनियाबद्दल संशय वाटू लागला होता.
सोनिया दिल्लीत वडिलांची तब्येत खालावल्याने अतिशय दुःखी झाली होती.वडिल आपल्यापासून थोड्याच दिवसांत दुरावणार हे स्वीकारणे तिला अशक्य वाटत होते. आईने तिला दिल्लीत येऊ का विचारले असूनही तिने तिला बोलावणे टाळले होते.वडिलांचे हळूहळू खंगत जाणे ती एकटीच सहन करत होती, चीडचीड करत होती, एकाकीपणाला सामोरी जात होती.अखेरीस सोनियाच्या वडिलांचे निधन झाले.आई दिल्लीत आली. आईनेच पुढील क्रियाकर्म पार पाडली.मीना फोई परत अलाहाबादला परतली. आईने सोनियाला घेऊन तिच्या वडिलांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी हिमालयात गंगेच्या उगमापाशी जाण्याचे ठरवले. किमान तिथे तरी गंगा शुद्ध असेल असे तिला वाटत होते. प्रत्यक्षात हिमालयात उंच उंच जाताना गंगेच्या प्रवाहावर धरणे उभारण्याची चाललेली कामे,विकासाच्या नावाखाली गंगेचा प्रवाह बंदिस्त करण्याचे चाललेले प्रयत्न पाहून सोनियाची आई आणि सोनिया दोघीही दुःखी झाल्या.हिमालयाच्या या प्रवासात एके ठिकाणी त्यांना एक स्थानिक माणूस भेटला त्याने सोनियाच्या आईला ओळख दाखवली. तो तिच्या वडिलांबरोबर-चित्रकार बार्बियर यांच्याबरोबर हिमालयातील अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाला होता.बार्बियर यांचे अचानक गायब होणे म्हणजे त्यांचे बादलबाबात रूपांतर होणे आहे अशी त्याची समजुत होती.शक्य तेवढे स्वच्छ पाणी पाहून मानवच्या- सोनियाच्या वडिलांच्या अस्थी दोघींनी विसर्जित केल्या.
‘क्लाऊड’ बंगल्यात परत आल्यावर सोनिया आपल्या आजोबांनी काढलेली चित्रे, त्यांनी लिहिलेली डायरी यातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिली.पण इलानचे डोळे पुन्हा तिच्यावर पहारा करत आहेत असे तिला वाटू लागले. आपण इथून दूर जाऊन एकटेच राहिले पाहिजे आणि आपल्या मनातील भीतीचा सामना केला पाहिजे असे सोनियाला वाटले. तिच्या आईने आणि आईची मैत्रीण फिरोजा यांनी गोव्यातील एक सुरक्षित अशी बंगल्यांची कॉलनी शोधून तिथे सोनियाने काही दिवस रहावे अशी योजना केली . सोनियाला गोव्यात सोडून दोघी परत निघून गेल्या.
बबिता दिल्लीहून गोव्यात स्थलांतरीत झाली. पण एकटीने त्या जुन्या बंगल्यात रहाणे सोपे नाही हे तिला लौकरच लक्षात आले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती सनीला फोन करू लागली. त्यामुळे सनी आणखीनच वैतागून गेला.सोनियाच्या आईला बबिता गोव्यात आहे याची माहिती होती. तिने सोनियाला गोव्यात सोडून जाताना गरज लागली तर बबिताशी संपर्क करायला हरकत नाही असे सांगून ठेवले होते.
दरम्यान सनीने एका नियतकालिकाला पाठवलेल्या त्याच्या कथेला पारितोषिक मिळून त्याला अन्य देशांत फिरून नवीन कथा लिहिण्यासाठी मोठी शिष्यवृत्ती जाहीर झाली होती. वर्तमानपत्रातील आपल्या नोकरीतून सवलत घेऊन सनीने दुसऱ्या देशात जायचे ठरवले. बबिता भारतात ये अशी गळ घालत असतानाही सनीने मेक्सिकोला जाण्याचा निर्णय घेतला. मेक्सिकोकडे जाताना विमानात मिळालेल्या अंकात त्याने इलान या चित्रकाराने मेक्सिकोत आपल्या चित्रांचा संग्रह ठेवण्यासाठी बंगला बांधला आहे आणि एका मोठ्या चित्रावर काम करण्यासाठी तो मेक्सिकोत आहे असे वाचले होते.
मेक्सिकोतल्या ज्या छोट्या गावी सनी एक छोटा बंगला घेऊन राहू लागला तो समुद्र किनाऱ्यावर होता. समुद्रात पोहताना हळूहळू सनीला स्वतःच्या एकाकीपणातून थोडे बाहेर पडता आले.तो त्या गावात असतानाच न्युयॉर्कला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर अतिरेक्यांचा विमानहल्ला झाल्याची बातमी आली.सत्याने ईमेलवरून सनी सुखरूप आहे ना याची चौकशी केली.सनीने तो मेक्सिकोत असल्याचे त्याला कळवले. बबिताने ती आणि तिची मैत्रीण मेक्सिकोत येऊ इच्छितात असे सनीला कळवले.सनीने तिला इथे आवडणार नाही असे कळवले. आणि काही दिवसांनी अनपेक्षीतपणे सत्या सनीला भेटायला आला. त्याच्याकडून त्याच्या संसारात त्याला किती अडचणी आल्या हे सनीला कळले. विशेषतः सत्याची बायको पुजा सुरवातीला कोणत्याही बदलाला कशी तयार नव्हती पण प्रसंग आल्यावर तीच कशी खंबीरपणे सत्याच्या बरोबर उभी राहिली आणि त्यामुळे सत्याला मोठा दिलासा मिळाला हे ऐकल्यावर आपल्याही आयुष्यात अशी साथ देणारी स्त्री असावी असे वाटून गेले.सत्याने सोनियाची चौकशी केली आणि सनीने ती आपल्यापासून कोणत्या कारणाने दुरावली आहे हे सांगितल्यावर सत्याने सनीने पुढाकार घेऊन इलानला शोधले पाहिजे आणि सोनियाची बादलबाबाची लॉकेट असलेली अत्यंत श्रद्धेची माळ तिच्यासाठी परत मिळवली पाहिजे असे सनीला समजावले. हळूहळू सनीने इलानची माहिती काढायला सुरूवात केली. मेक्सिको सोडण्यापूर्वी इलानला गाठायचे आणि सोनियाची माळ त्याच्याकडून हस्तगत करायची असे त्याने ठरवले.
सोनिया आपल्या भीतीशी सामना करत गोव्यातील बंगल्यात रहात होती. तिथे एका समलिंगी जर्मन माणसाशी तिचा परिचय झाला होता. त्याच्याशी बोलताना जगण्याचा आनंद कसा घ्यायचा हे सोनियाला उलगडत होते.समुद्रात खोल पोहायला जाताना आणि समुद्रातील लाटांशी सामना करत परत किनाऱ्यावर येताना आपली भीती हळूहळू कमी होते आहे असे सोनियाला जाणवत होते. पण भीतीची झडप कधीही आपल्यावर पडू शकते असेही तिला वाटत होते.
बबिताने घेतलेल्या गोव्यातील बंगल्याच्या कागदपत्रांत घोटाळा होता. बंगल्याच्या आजुबाजुच्या जागेवर शेजारची कुटुंबे हक्क सांगू लागली होती. आपण फसवले गेलो हे बबिताला कळले होते. पण कोर्टात गेल्यास केस हळहळू चालत राहील आणि तोपर्यंत कोणीच बंगल्याचा ताबा घेऊ शकणार नाही हे वकिलाने सांगितल्याने ती चिवटपणे केस लढवत होती. अधूनमधून येणारे निनावी फोन तिला भयग्रस्त करत होते.मेक्सिकोत जाण्याचा बेत तिला रहीत करावा लागला होता.
एके दिवशी अचानक वाळूने भरलेले अंग घेऊन सोनिया बबिताच्या घरी आली. कधीच न वाजणारी दरवाजाची बेल वाजल्याने बबिता घाबरली. पण नंतर सोनियाने हाक मारून ती कोण आहे हे सांगितल्यावर बबिताने दरवाजा उघडला होता.आपला झगा सोनियाला रात्री घालायला देत बबिताने तिला घरीच ठेवून घेतले. त्या रात्री सोनियाने आणि बबिताने आपापल्या मनातील भयाचे अनुभव परस्परांना सांगितले होते.दोघींनाही एकमेकींचा आधार वाटला होता.बबिताने ‘कला’ या मासिकातले सोनियाचे सगळे लेख वाचले असल्याचे सोनियाला सांगितले होते आणि विशेषतः दिल्लीतील कबाबांची माहिती देणारा आणि गोव्याबद्दलचा लेख तिला फार आवडला असे सांगितले होते. काही दिवासांनी सोनियाने पत्र पाठवून बबिताला आवडणाऱ्या कबाबची रेसिपी कळवली होती. बबिताला आपण आजवर सोनियाचा दुःस्वास केला, तिच्याबद्दल असुया मनात बाळगली याबद्दल खंत वाटली होती.तिने सोनियाला बोलावून जपून ठेवलेली तिच्या सासूकडून आलेली गळ्यातील कंठी तिला देऊन टाकली होती. दोघी टी.व्ही. वरील भयपट एकत्र पहात बसल्या होत्या आणि रात्री गप्पा मारत झोपल्या होत्या.आपल्या मनातील प्रेम जागे झालेले पाहून बबिताला आश्चर्यही वाटले होते आणि बरेही वाटत होते.
सनीने मेक्सिकोतील रूक्ष अशा खाणींच्या भागात जाऊन इलानचा विचित्र बांधणीचा बंगला कसाबसा गाठला होता. शक्कल लढवून इलानच्या घरात तो शिरला होता. इलानची मुलाखत घ्यायची आहे असे सांगत त्याने त्याची चित्रे पाहून घेतली होती.पण बादलबाबाचे चित्र त्याला मिळाले नव्हते. काहीतरी संशय आल्याने इलानने सनीला बंगल्यातून बाहेर काढले होते आणि तोही खाणींच्या भागात गेला होता. इलान जवळपास नाही हे पाहू दबा धरून बसलेल्या सनीने त्याच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या भुयारातून परत एकदा बंगल्यात प्रवेश मिळवला होता. तिथे त्याला रडत बसलेली एक तरूणी भेटली होती. ती त्याला सोनियासारखीच फसवली गेलेली मुलगी वाटली होती. तिच्या मदतीने त्याने इलान ज्या चॅपलचे काम बंगल्यातच करत होता ती जागा उघडून घेतली होती. तिथे सोनियाच्या बादलबाबाच्या लॉकेटमधील चित्रासारखेच भव्य चित्र भिंतीवर साकारले जात आहे हे त्याने पाहिले होते. तिथेच पडलेले सोनियाचे लॉकेट हस्तगत करून इलान जवळ येत असल्याची चाहूल लागतात सनी दुसऱ्या दरवाजाने सुसाट पळत सुटला होता.काही पर्यटकांच्या मदतीने तो सुखरूप पुन्हा आपल्या घरी पोहोचला होता.इलानच्या बंगल्यात अडकलेली स्त्री ही वास्तवातील नाही तर तो आपल्याला झालेला भास होता हे सनीला कळले होते. काही दिवसांत इलान त्याच्या बंगल्यातून गायब झाल्याची बातमी त्याने स्थानिक वर्तमानपत्रात वाचली होती.आपले काम झाले आहे हे लक्षात येऊन सनीने गोव्याला जाणारे विमान पकडले होते.
गोव्यातील आईच्या घराची बेल वाजवताना आत त्याला बबिताच्यासोबत दुसरीही आकृती दिसली होती. सोनियाला तिथे पाहून तो चकीत झाला होता. काहीही न बोलता दोघेही परस्परांच्या मिठीत शिरले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोनिया जवळ नाही हे पाहिल्यावर ती समुद्रकिनाऱ्यावर लाटांशी खेळत असणार हे समजून सनी समुद्रावर पोहोचला होता.
असे हे ‘लोन्लीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या किरण देसाई लिखित कादंबरीचे कथानक आहे.
तुम्हाला ते कसे वाटले ते जरूर कळवा. पुढील ब्लॉगमध्ये या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करता करता कादंबरीची कथासूत्रे उलगडत जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा