मागील ब्लॉगमध्ये आपण अवनी डोशी या समकालीन इंग्रजी कादंबरीकार स्त्रीचा परिचय करून घेतला. त्यांची पहिलीच कादंबरी ‘बर्न्ट शुगर’ ही २०२० साली बुकर पारितोषिकाच्या निवड यादीत आली होती.इंग्रजी समीक्षकांनी या कादंबरीची चांगली दखल घेतली होती.म्हणून ती वाचून तुमच्यापर्यंत तिचे कथानक आणि कथासूत्रे पोहोचवावीत असे वाटले.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.
‘बर्न्ट शुगर’ ही २२९ पृष्ठांची कादंबरी आहे. कादंबरीच्या कथानकाचा अवकाश प्रामुख्याने पुणे शहर आहे. तर या कादंबरीचा कालखंड १९८१ ते २००३ असा सुमारे २२ वर्षांचा आहे.कथानक काळाच्या अक्षावर पुढे-मागे सरकणारे आहे.गुंतागुंतीचे आणि काहीसे सनसनाटी वाटेल असे हे कथानक सरळ करून घेऊन सांगण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगमध्ये करणार आहे.त्यानंतर त्या कथानकातून कोणती कथासूत्रे दिसतात तीही शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचे कथन प्रथम पुरूषी( अंतरा या स्त्रीने केलेले) आहे आणि संपूर्ण कथनाचा दृष्टीक्षेत्रनियंत्रक अंतरा हीच आहे.कादंबरीच्या अर्पणपत्रिकेनंतरच्या पानावर रेहाना सुलताना यांच्या मदर या काव्यातील बंगाली भाषेतील एक ओळ उधृत केली आहे आणि त्याचे इंग्रजी भाषांतरही दिलेले आहे. Mother I am so tired, tired of introducing myself to you. अशी ती ओळ आहे.
‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचे कथानक प्रामुख्याने अंतरा ही मध्यमवयीन स्त्री आणि तिची आई तारा यांच्याभोवती फिरते.आपल्या आईच्या अन्य स्त्रियांपेक्षा अगदी भिन्न व्यक्तिमत्त्वामुळे आणि मानसिकतेमुळे लहानपणापासून उपेक्षेचा अनुभव आलेल्या अंतराचे मन आईबद्दल कडवट झाले आहे.आईशी प्रेमाने वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आईच्या प्रतिसादाने आपली ओळख, आपले अस्तित्वच जणू पुसले जाते आहे अशी भावना अंतराच्या मनाला ग्रासून राहिली आहे. ही कादंबरी म्हणजे जणू अंतराची आत्मकथनात्मक कैफियत आहे असे म्हणावे लागेल.
कादंबरीचा आरंभ होतो तेव्हा आपली आई तारा हिला विस्मरणाचा आजार (अल्झायमर) सुरू झाला आहे असे आपल्याला कथक अंतरा सांगते. पण आईच्या या विकल परिस्थितीमुळे आपल्याला आनंद झालेला नाही असे म्हटले तर आपण खोटं बोलणाऱ्या ठरू या वाक्यापासून कादंबरीची सुरूवात होते.आई-मुलीच्या नात्याच्या आदर्श, पारंपरिक प्रतिमेला तडा देणाऱ्या या वाक्याने कथक वाचकांना सुरूवातीलाच हादरा देते.
आपली आई विस्मरणात देखील आपली हेटाळणी करते याचे अंतराला वैषम्य वाटते.ती एक लोकांची सहानुभूती खेचून घेणारी नाटकी बाई आहे असे अंतराचे निरीक्षण आहे. लहानपणापासून तिने आईला खोटे बोलून खुद्द तिच्या आजी-आजोबांना फसवताना पाहिले आहे. पण त्यावेळी आई खोटं बोलतेय हे आजी-आजोबांना सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती. आणि आता आपला नवरा दिलीप आईचा भूतकाळ माहीत नसल्याने तिच्या प्रत्येक बोलण्याने कसा प्रभावीत होतो हे अंतरा पाहते तेव्हा तिला चीड येते.पण आईचा आणि तिला जोडून असलेला स्वतःचाही भूतकाळ कळला तर दिलीप आपल्याला सोडून तर देणार नाही ना याचे भयही तिला वाटते.
अंतराच्या आईचा- ताराचा भूतकाळ थोडक्यात सांगायचा तर ती एका पंजाबी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी होती.तिच्या वडिलांचा पुण्यात हॉटेल व्यवसाय होता.ताराच्या कुटुंबात तिच्याशिवाय अन्य कोणी भावंड आहेत का याचा उल्लेख अंतराच्या कथनात येत नाही.तारा तरूण वयात सुस्वरूप होती,तिचे केस काळेभोर आणि लांबसडक होते.ती धीटही होती.शाळकरी वयातच ती शाळेतून पळून हमरस्त्यावरच्या पंजाबी ढाब्यात जाऊन बियर पिऊ लागली होती.तिच्या शाळेच्या बॅगेत सिगारेटचे पाकीट ती बाळगत असे.तिथे जवळच जगभरात प्रसिद्ध असलेल्या अध्यात्मिक बाबांचा आश्रम होता. ढाब्यावर येणाऱ्या परदेशी लोकांनी बाबांच्या आश्रमाचा पत्ता विचारला तर त्यांना आश्रमात नेऊन सोडायला तिला आवडे. तेव्हापासूनच कदाचित तिला आश्रमाचा ओढा वाटू लागला होता. ती पांढरे सुती कपडे वापरू लागली होती.पंजाबी स्त्रियांमध्ये दुप्पटा ही स्त्रीची प्रतिष्ठा मानली जाते. पण ताराने कधी दुपट्टा घेतला नव्हता.पुढे तिचे लग्न ठरले.लग्न ठरल्यावर ताराने आपले केस कापले होते, ती रंगीत कपडे वापरू लागली होती.तिचा होणारा नवरा इंजिनीयरींग करत होता. त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपणही हॉटेल मॅनेजमेंट शिकू असे ताराने ठरवले होते. ज्या पंजाबी पुरूषाशी ताराने विवाह केला होता त्याच्या कुटुंबातील सगळे पुरूष लष्करातून निवृत्त झालेले होते.घरात सुबत्ता होती.ताराचे सासरे तिच्या लग्नापूर्वीच हृदयविकाराने निधन पावले होते.ताराची सासू विचित्र बाई होती. तिला शास्त्रीय संगीत ऐकत बसायची सवय होती. गाणं ऐकायला सोबत म्हणून ती दिवसभर ताराला स्वतःसोबत बसवून ठेवे. काही घरकाम करण्याची ताराच्या सासूला आवड नव्हती आणि गरजही नव्हती. नोकर-चाकरच सगळी कामे करत.ताराने आपल्या नवऱ्याशी पारंपरिक स्त्रीप्रमाणे हांजी हांजी करत रहावे असे तिच्या सासूचे म्हणणे होते. पण ताराला ते पटणारे नव्हते. ती एक बंडखोर बाई होती.ती आपल्या खोलीत बसून राही. हळूहळू तिने परत केस वाढवले, पांढरे कपडे वापरणे सुरू केले.
सासू आणि नवऱ्याच्या बोलण्यातून ताराला कळले होते की तिचा नवरा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता आणि तिथेच स्थाईक होणार होता. तारा भविष्यात अमेरिकेत जाण्याची आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहू लागली.
लग्नानंतर वर्षभरातच ताराला मुलगी झाली होती.सासूला नातूच हवा होता त्यामुळे ती नाराज झाली.ताराने तिचे अंतरा हे नाव हट्टाने ठेवले होते.जी तारासारखी नसेल ती अंतरा असा अर्थ तिला अपेक्षीत होता.मुलीला सांभाळत,नवऱ्याची वाट बघत एकाच खोलीत बसून दिवस घालवणं ताराला अजिबात आवडत नव्हतं.
सासूला न जुमानता तारा गुरूच्या सत्संगाला जाऊ लागली. सासूने मुलीलाही घेऊन जा असे सांगितल्यावर ती लहानग्या मुलीलाही सोबत नेऊ लागली.हळूहळू तर तिने आश्रम हेच आपलं घर करून टाकलं. आश्रमातले बाबा तिला सर्वस्व वाटू लागले. त्यांच्या अधिक जवळ कसे जाता येईल यासाठी ती धडपडू लागली. या सर्व खटाटोपात आपल्या मुलीकडे- अंतराकडे लक्ष देणे ताराला दुय्यम वाटू लागले. अंतरा आश्रमातल्या भक्तांच्या गर्दीत आईला शोधत राही. रडवेली होई. आश्रमातील बाबांची एक आवडती परदेशी भक्त ,जिचे नाव बाबांनी काली माता ठेवले होते, तीच अंतराची काळजी घेई.कालीमाताचा पती आणि मुले अकाली गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन तिने बाबांकडे येऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेला होता.बाबांचा हा अध्यात्मिक मार्ग मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करणार आहे.प्रेम हाच माणसाच्या जगण्याचा एकमेव आधार आहे आणि ते शारीर जवळीकीने व्यक्त करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे असा बाबांच्या तत्वज्ञानाचा मतितार्थ असावा.बाबांच्या आश्रमाच्या परिसरात सगळे मुक्तपणे एकमेकांची अलिंगने, चुंबने घेताना, नृत्यात मग्न असे दिसतात.छोट्या अंतरासाठी हे सगळे अनाकलनीय आहे.तिला प्रत्यक्ष आईची जवळीक हवी आहे पण ती तिला मिळतच नाही. तारा दिवसेंदिवस बाबांच्या खोलीच्या बंद दरवाजाआड राहू लागते आणि अंतराचे खाणे-पिणे, तिला खेळवणे, फिरवणे हे बरेचदा काली माताच करू लागली.
काही काळाने बाबांच्या खोलीत जाणारी स्त्री बदलली आणि ताराला तो तिचा अपमान वाटू लागला. तिने आश्रम सोडून बाहेर पडायचा निर्णय घेतला.सर्वांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला ते मान्य झाले नाही.खरं तर काली माता प्रमाणे ती आश्रमातच राहू शकली असती पण ते तिला पटले नाही.एके रात्री ती अंतराला घेऊन आश्रम सोडून बाहेर पडली. एका ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने ती पुण्यातील क्लबपर्यंत आली. तिचे आई-वडील या पुना क्लबचे सभासद होते. तारा या क्लबमध्ये खेळायला, पोहायला नेहमी येत असे.त्यामुळे क्लबचे दारवान तिच्या परिचयाचे होते. त्यांनी तिला क्लबचे बाथरूम वापरायला दिले. ताराने आपल्या नवऱ्याला फोन करून ती आश्रम सोडून बाहेर पडल्याचे कळवले पण त्याने तिला परत घरी न्यायला नकार दिला. ताराने आपल्या माहेरी फोन करून ती आश्रम सोडून बाहेर आली आहे आणि पुना क्लबजवळ आहे असे कळवले पण तिथूनही तिला अव्हेरले गेले. आठ-दहा दिवस तारा अंतराला घेऊन क्लबबाहेर भीक मागत बसली. या दोघींमुळे आपल्या प्रतिष्ठेला बाधा येते आहे हे कळल्यावर ताराचा नवरा एके पहाटे गाडी घेऊन क्लबच्या दरवाज्याजवळ आला. त्याने ताराला आणि अंतराला गाडीत बसायला सांगितले आणि गाडी ताराच्या माहेरी नेली. तारा अंतराला घेऊन आई-वडिलांबरोबर राहू लागली.तिच्या नवऱ्याने एके दिवशी घटस्फोटाची कागदपत्रे तिला पाठवून दिली. तारा सही करायला राजी झाली पण तिने नवऱ्याला सतत फोन करून इतके अपशब्द उच्चारले की त्याने तातडीने पैशाने भरलेलं पाकिट तिला पाठवून दिले. लौकरच ताराच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आणि तो या दुसऱ्या पत्नीला घेऊन अमेरिकेला निघून गेला.काली माताने ताराला आश्रमाकडून आर्थिक मदत मिळवून दिली. ती तारा आणि अंतराला भेटायला येत राहिली.
ताराने आणि तिच्या आई-वडिलांनी अंतराला पाचगणीच्या शाळेत घातले.आश्रमात राहिल्यामुळे अंतराने शाळेतली शिस्त कधी अनुभवली नव्हती. त्यामुळे पाचगणीच्या ख्रिस्ती मिशनरी शाळेत तिला शिस्तीचे धडे गिरवताना खूप त्रास झाला. अभ्यासातही ती मागे पडू लागली.फक्त चित्र काढण्यात तिला दिलासा मिळत होता. मानसिक आणि शारीरिक ताणामुळे अंतरा आजारी पडली. अखेर तिला पालकांबरोबर घरी पाठवले गेले.
दरम्यान ताराने स्वतःचे घर घेतले. पुण्यातील शाळेतून अंतरा कशीबशी दहावी झाली. तिच्या लक्षात आले की आपल्याला फक्त चित्रकलेत गती आहे.त्यामुळे तिने मुंबईला जे. जे. स्कुल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. पण तिथे चित्र रंगवावीही लागतात हे पाहून ती वैतागली. तिला फक्त रेखाचित्रे काढण्यातच रस होता.
घराजवळच्या बेकरीत तारा अधूनमधून अंतराला घेऊन जात असे. तिथे रझा नावाचा वेटर तिच्या परिचयाचा झाला. तो चांगला छायाचित्रकारही होता. हळूहळू तो ताराच्या घरी येऊ लागला आणि नंतर तर चक्क त्यांच्याच घरी राहू लागला. ताराला रझाबद्दल शारीर ओढ वाटू लागली. अंतरालाही रझा आवडे कारण तो चित्र देखील काढे.त्या दोघींना आपल्या स्कुटरवर बसवून दूर दूर हिंडवून आणे.एकदा रझा या दोघींना घेऊन गोव्याला गेला. तिथे मनमुक्तपणे फिरून आल्याने ताराला आणि अंतराला खूप आनंदी वाटू लागले. ऱझा त्यांना हवासा वाटू लागला. पण रझाने अचानक निघून जाण्याचा निर्णय घेतला. रझाच्या तडकाफडकी जाण्याने तारा-अंतरा दोघीही काहीशा खचल्या.पुढे अंतरा चित्रकलेचं शिक्षण घेत असताना वर्गात उपस्थित न रहाता वेगवेगळ्या आर्ट गॅलऱ्यांत जाऊन चित्र प्रदर्शन पाहू लागली. अशाच एका प्रदर्शनात रझा अंतराला परत भेटला.
वयात आलेली अंतरा रझाच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मुंबईत आणि मुंबईबाहेरही ठिकठिकाणी हिंडू लागली. कधी रझाच्या घरात राहू लागली. रझाशी शारीर संबंध ठेवू लागली.ताराला याबद्दल तिने काहीच सांगितले नव्हते.आजी-आजोबांकडून अंतराला नियमीत पैसे येत आणि मुंबईत मिळणारे स्वातंत्र्य ती मनसोक्त उपभोगे. आणि पुन्हा एकदा रझा अंतराला एकटीला टाकून निघून गेला होता.चित्रकलेतील पदवी न मिळवताच अंतरा पुण्याला परत आली. तिच्या चित्रात एकच एक चेहरा ताराला दिसू लागला आणि तो असे रझाचा. ताराला ते आवडत नसे.अंतरा असे का करते हा प्रश्न तिला सतावे.
अंतराचे वडील बरीच वर्षे अमेरिकेत राहून परत पुण्यात आले होते. त्यांनी अंतराशी संपर्क साधला होता.अंतरा अधूनमधून त्यांना भेटायला जात असे.पण आपली सावत्र आई आणि भाऊ तिला आवडत नसत.
पुण्यातील क्लबमध्ये अंतरा पोहायला जाई, चित्र काढत बसे. तिथेच दिलीप तिला भेटला आणि अंतराच्या प्रेमात पडला. तो अमेरिकेत शिकलेला होता, तिथेच नोकरी करत होता पण काही कारणाने भारतात आला होता. त्याची आई अमेरिकेतच होती.दिलीपने अंतराशी लग्न करून भारतात-पुण्यातच रहायचा निर्णय घेतला होता.ते दोघे स्वतंत्र घर घेऊन पुण्यात राहू लागले होते. अंतराने घरातच आपला स्टुडियो बनवला.दिलीपला तिची रेखाचित्रे अनाकलनीय वाटत.ताराला तर अंतराची चित्रे आवडतच नसत.
लग्नानंतर अंतराला आपल्या आईला विस्मरणाचा आजार झाला आहे हे जाणवले होते.तारा अचानक आपल्यालाही ओळखत नाही हे पाहून ती हादरली होती. तिने ताराला डॉक्टरांकडे नेले होते. वेगवेगळ्या चाचण्या करवल्या होत्या.पण तारा अत्यंत नाटकी आहे , लोकांची सहानुभूती खेचून घ्यायला ती मुद्दामच वाढवून-चढवून काहीही सांगू शकते हेही अंतराला माहीत होते. तिला सर्वात वाईट वाटत असे ते तारा कोणाहीसमोर आपली हेटाळणी करायची संधी सोडत नसे याचे.अगदी दिलीपलाही ताराने इतके प्रभावीत केले होते की अंतराच आईच्या आजाराबद्दल उगाच जास्तच सांगते, खोटे बोलते असा दिलीपचा समज झाला होता.अंतराने आपल्या आजीला जेव्हा आईच्या विस्मरणाबद्दल सांगितले तेव्हा तिने अनुवंशिकतेचा दाखला दिला होता आणि तारा खूप स्थुल झाली आहे , ती मेली तर तिच्या हातातील बांगड्या कशा काढता येतील याची चिंता तिने व्यक्त केली होती !
अंतराला विज्ञानाची आवड नव्हती पण आईच्या आजाराबद्दल समजून घेण्यासाठी तिने बरीच माहिती इंटरनेटवरून मिळवली होती. हा आजार झालेल्या माणसांना त्यांच्या भूतकाळाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी सतत दिसत राहिल्या तर त्यांच्या मेंदूला चालना मिळते हे समजल्यावर अंतरा आपल्या बालपणीच्या आठवणींचे संक्षिप्त तुकडे कागदावर लिहून आईच्या घरात ठिकठिकाणी चिकटवू लागली होती. पण ताराने आपल्या मुलीचे हस्ताक्षर इतके वाईट आहे याची कधी कल्पनाच नव्हती असं म्हणून अंतराची हेटाळणी केली होती.ताराच्या घरात डोशासाठी भिजत ठेवलेले डाळ-तांदुळ कुजले तरी तिला ते जाणवत नाही हे पाहून अंतरा वैतागली होती. तारा गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क करते, भर ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर सिग्नल मिळाला तरी गाडी सुरू करायलाच विसरते असे काही प्रसंग अंतराला चिंतेत टाकत होते.पण म्हणून ताराला तिने स्वतःच्या घरी आपल्या स्टुडियोच्या खोलीत आणून ठेवले तर ताराने रझाचा चेहरा तिच्या चित्रात आहे म्हणून अंतराची कितीतरी चित्रे फाडून जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो.ताराला आपल्या आजीकडे ठेवण्याचा प्रयत्नही अंतरा करते पण तिथेही कटकटी होतात हे पाहून ताराला एकटे ठेवणेच तिला शेवटी योग्य वाटते.ताराच्या एकेक गोष्टी पाहून या ती मुद्दाम करते की ती खरेच विसरते हे न कळल्याने अंतराची चीडचीड होते. आपल्याच डोक्यात कापूस भरलाय असे तिला वाटू लागते.
अंतराचे सारखे आईबद्दल चिंतेत असणे पाहून दिलीप वैतागतो. आपण मुल होऊ द्यायचे की नाही असा त्याचा प्रश्न आहे.दिलीपच्या मित्राचे आणि त्याच्या बायकोचे पूर्वीचे अधूनमधून घरी येणे अंतराला आनंददायक वाटण्यापेक्षा कंटाळवाणे वाटते. त्यांच्या गप्पा तिला ढोंगी वाटतात.पण तरी ती पूर्वीशी मैत्री ठेवते. अधूनमधून दोघी बाहेर भेटून खरेदी करतात, हॉटेलात जातात.
अंतरा गरोदर होते. तिची सासू बाळंतपणासाठी अमेरिकेहून भारतात येते. अंतरा तारालाही आपल्या घरी आणून ठेवते. एकदा अंतरा थोडी उशीरा उठते तेव्हा तिला दिसते की तारा तिच्या खोलीत शिरून काहीतरी शोधते आहे. ती काय शोधते आहे हे विचारल्यावर तारा अंतराला तिच्या खणातला एक जुना रझाचा फोटो दाखवते. तिच्या मते रझाचा हा फोटो तिने काढला होता. पण त्यानंतर रझा लगेचच निघून घेला होता मग अंतराला हा फोटो कुठे सापडला ? अंतरा थातूरमातूर उत्तर देते. पण ताराला ते पटत नाही. ती अंतराने खरं सांगितलं नाही तर दिलीपला तिच्याबद्दल सांगेन अशी धमकीच देते. अखेर अंतरा ताराला मुंबईत असताना रझा भेटला होता हे सत्य सांगते.तरीही आपली आई दिलीपसमोर आपले वाभाडे काढेल, आपले लग्न मोडू पाहिल अशी भीती तिच्या मनात रहातेच.
त्याच सुमारास अंतराच्या वाचण्यात आलेले असते की विस्मरण होण्याचे एक कारण अधिक गोड पदार्थ सेवन करणे हेही आहे. ताराला न चुकता तिची औषधे देणारी अंतरा न चुकता तिला गोड पदार्थही देऊ लागते. ताराला विस्मरण झाले तरच बरे असा तिचा सूप्त हेतू असतो.दिलीप मात्र ताराला तिच्या भूतकाळातील गोष्टी आठवू देत असे सांगत रहातो. अंतरा स्वतःच्या बालपणीच्या आठवणी ताराला सांगते आणि आपली कशी उपेक्षाच ताराने केली हा सूर त्या सांगण्यात असतो हे दिलीपला खटकते. ताराला तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या पाहिजेत असे त्याचे मत आहे.
अंतराला मुलगी होते. तिच्या घरातील सगळी जबाबदारी तिच्या सासूने सहजी अंगावर घेतलेली असते.मुलीसाठी नावेही तिने शोधून ठेवलेली असतात. अंतराला ते फारसे आवडत नाही पण मग मुलीसाठी नाव शोधताना तिला जाणवते की आपल्याकडे असे काय वेगळे आहे की आपण ते मुलीला देऊ शकणार आहोत ?स्वतःबद्दलचा न्यूनगंड तिला जाणवतो. शेवटी ती सासू आणि दिलीपलाच मुलीचे नाव ठरवू देते. ते अन्निका असे नाव ठरवतात.अन्निकाला दुध पाजणे, तिला झोपवणे, खेळवणे यातच अंतराचा सगळा वेळ जाऊ लागतो. हळूहळू आपण एक स्थुल, बेढब बाई बनत चाललो आहोत हे अंतराला खुपते. ताराला अन्निकाला हातात घ्यायचे असते पण कोणालाच तिच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे ते अन्निकाला तिच्या हातात देत नाहीत.
एके दिवशी अंतराच्या वडिलांचा फोन येतो. त्यांना अंतराला मुलगी झाल्याचे दुसऱ्यांकडून कळले आहे. त्यांना आपल्या नातीला पहायचे असते. ताराची चौकशी ते करतात. तिची तब्येत बरी नाही हे कळल्यावर तिलाही भेटून जाईन असे ते म्हणतात. आपली दुसरी बायको आणि मुलगा यांच्यासह ते अंतरा-दिलीपच्या घरी येतात. ते येणार हे कळवल्याने अंतराची आजीही अंतराकडे येते. नेमके तेव्हाच पूर्वी आणि तिचा नवराही बाळासाठी खेळणी घेऊन येतात. अंतराची सासू सगळ्यांचे आदरातिथ्य करू लागते. अंतरा बाळंतीण असल्याने ती सगळ्यांसोबत दिवाणखान्यात बसते. तिच्या कुशीतल्या बाळाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सगळेच आळीपाळीने अन्निकाला आपल्या हातात घेऊ लागतात.अंतराची आजी आजारी ताराला तिच्या खोलीतून दिवाणखान्यात घेऊन येते. तारा आपल्या नवऱ्याकडे, त्याच्या दुसऱ्या बायको-मुलाकडे पहातही नाही. ती थेट दिलीपकडे येते आणि त्याला लगटून बसते. अंतराच्या हातातून अन्निकाला घेऊन ही आपली अंतरा आहे असे सांगून ती दिलीपला बिलगते.हे सगळे पाहून जमलेले बाकीचे पाहुणेही हसतात, ताराचा भ्रमाला न पुसता सगळेच तिच्या भ्रमाला दुजोरा देतात. पूर्वी अन्निकासाठी गाणे गाऊ लागते. ते बंगाली की गुजराथी गाणे आहे हे अंतराला कळत नाही पण आश्चर्य म्हणजे ती वगळता सगळ्यांना ते येत असते आणि सगळे ते गाणे गाऊन अन्निकाबरोबर स्वतःचीही करमणूक करून घेऊ लागतात.ती सगळी ढोंगी माणसे अंतराला डोळ्यासमोर नकोशी वाटतात. आपली आई इथेही आपली ओळख मुद्दाम पुसून टाकण्याचा प्रयत्न करते आहे असे अंतराला वाटू लागते. ते सगळे असह्य होऊन ती दरवाजा उघडून खाली निघून जाते. अनवाणी पायाने ती इमारतीतून बाहेर पडते आणि कोपऱ्यावरील दुकानातून सिगारेट घेऊन ओढू लागते. आपण घरातल्या कपड्यात, विचित्र अवतारात रस्ता मिळेल तिथे चालत सुटलो आहोत, आपल्या घरापासून दूर दूर निघून चाललो आहोत असा भास तिला होतो. पण भानावर येताच तिला जाणवते की आता आपल्याला पूर्वीसारखे मनमुराद भटकता येणार नाही, कोणतेही स्वातंत्र्य घेता येणार नाही. आणि नाइलाजाने ती परत घरी येते.

बर्न्ट शुगर या कादंबरीतील कथासूत्रे-
बर्न्ट शुगर ही कादंबरी अंतरा आणि तारा या दोन स्त्रियांभोवती फिरणारी स्त्रीकेंद्री कादंबरी असल्याने तिच्याकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पहाता येईल. तसेच मानसशास्त्रीय दृष्टीनेही पहाता येईल. तसे पहाताना खालील कथासूत्रे गवसतात-
१) तारा ही उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली आहे आणि सुस्वरूप आहे.तिच्या घरात हॉटेल व्यवसाय असल्याने तिला हॉटेल मॅनेजमेन्ट शिकायची इच्छा आहे पण ते ती शिकते का ? किंवा शिक्षणाच्या आधारे ती स्वतःचे कर्तृत्व दाखवते का ?तर तसे काही दिसत नाही. तिला आपल्या सौंदर्याची जाणीव आहे आणि त्या शारीर सौंदर्याची भूल पुरूषांना पडते हेही तिला कळले आहे. घरच्या वातावरणामुळे आणि मोकळीकीमुळे ती खूप बिनधास्त वागू शकते. पण लग्नानंतर तिला कधी नाही ते घरातच अडकून रहावे लागू लागते. नवऱ्याची वाट बघत बसणे, त्याची सेवा करणे अशा पारंपरिक स्त्रीच्या चौकटीत बसणारा तिचा स्वभाव नाही आणि स्वतंत्रपणे स्वतःचे मन रमवण्यासाठी काही करायची तिला सवय नाही. परिणामी ती सत्संगाच्या नावाखाली आश्रमात जाऊ लागते आणि तिथल्या मुक्त वातावरणात तिला सुटका झाल्यासारखे वाटते. स्वातंत्र्याचा उपयोग स्वतःच्या बौद्धिक , भौतिक प्रगतीसाठी करावा असे ताराला वाटलेले नाही. अध्यात्माच्या नावाखाली लैंगिक स्वातंत्र्य तारा घेऊ लागते. मुलीच्या संगोपनाची जबाबदारीही टाळते. कादंबरीत हे सगळे अंतराच्या कथनातून वाचकांपर्यंत पोहोचते. अंतराला ते कधी तिच्या आजीकडून कळले आहे आणि काही गोष्टी तिने स्वतःच पाहिल्या आहेत.ताराच्या वागण्याचं ती वर्णन करते. त्या वागण्यामुळे आपल्याला उपेक्षीत वाटत राहिले,न्यूनगंड जाणवली हेही सांगते. ताराचे वागणे चांगले की वाईट याचा न्यायनिवाडा अंतरा करत नाही पण आपल्याला ताराच्या या वागण्यमुळे प्रेमशून्य बालपण मिळाले ही तिची खंत आहे.
एकंदरच लेखिकेला स्वातंत्र्याचा अर्थ न कळलेल्या स्त्रीचा कल लैंगिक स्वातंत्र्यालाच स्वातंत्र्य मानण्याकडे कसा असतो हे दाखवायचे असावे.ताराची मुलगी अंतराही तीच चूक प्रारंभी करते.परिणामी दोघींच्या नात्यात गोडवा नाही.साखर करपली तर तिचा कोळसा होतो. तसे तारा-अंतरामधील नाते कोळशासारखे करपलेले आहे. प्रेमशून्य बालपण अनुभवलेल्या अंतराच्या मनात आईबद्दल चीड आहे.तर अंतराचा आत्मविश्वास पदोपदी खच्ची करण्यात, तिची हेटाळणी करून स्वतःचा मोठेपणा दाखवण्यात तारा धन्यता मानते.दोन अप्रगल्भ स्त्रियांच्या नात्यात निर्माण झालेली ईर्ष्या, द्वेष लेखिकेला दाखवायचा आहे.
२) तारा आणि अंतरा दोघींनाही स्वतःची स्वतंत्र ओळख आपल्या बुद्धीचातुर्याने, कलाकौशल्याने निर्माण करता आलेली नाही आणि पारंपरिक स्त्रियांप्रमाणे अमुकची बायको, तमुकची आई असल्या ओळखीसाठी आवश्यक बांधिलकी त्यांना नकोशी वाटते.त्यामुळे तारा भावनिक आंदोलनात वहात रहाते, मुलीचीही हेळसांड करते. अंतरालाही स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वैर वागावेसे वाटते.आणि मुलगी झाल्यावरही तिला ती जबाबदारी नकोशी वाटते.पण ताराने अन्निकाला अंतरा मानून दिलीपशी लगट करणेही तिला आवडत नाही.आपली दिलीपची बायको, अन्निकाची आई ही ओळखही आई पुसते आहे याचा तिला संताप येतो.तसेच आपण आता शरीराच्या आधारे कोणाला आकर्षित करून लैंगिक स्वातंत्र्यही घेऊ शकणार नाही याची खंतही अंतराच्या मनात आहे.एकूणच अस्तित्वशून्य आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे दुःख, निरर्थक आयुष्यामुळे त्यांची होणारी घुसमट लेखिकेला दाखवायची आहे.
३)या कादंबरीत कोणा एका बाबाचे उदात्तीकरण करणाऱ्या असंख्य स्त्री-पुरूषांची अचंबीत करणारी अंधभक्तीही लेखिकेला दाखवायची आहे.हे असंख्य लोक असे का वागत असतील ?आपली खरी ओळख त्यांना निर्माण करता आलेली नसल्याने , आयडेंटीटी क्रायसीसमुळे, आपले सत्व गमावल्याने अशा अंधभक्तांची संख्या वाढते आहे असे लेखिकेला सुचवायचे असावे.तसे एक कथासूत्र कादंबरीत दिसते.
४) ताराचे खोटे बोलून स्वतःकडे सहानुभूती मिळवणे, आपल्या वडिलांचे औपचारीकता निभावणे, सावत्र आई आणि भावाचे तोंडदेखले हसून बोलणे, सासूबाईंनी घरातील गोष्टींचा ताबा घेऊन आपल्याला गृहीत धरणे, सर्वांनीच ताराच्या भ्रमिष्टपणाकडे दुर्लक्ष करून तिला सामावून घेऊन अन्निकाला की स्वतःलाच रिझवण्यासाठी बडबडगीत म्हणणे, नाच करणे हे सगळे अंतराला ढोंगीपणाचे वाटते. समाजातील बरेचसे नातेसंबंध केवळ दिखावू, खोट्या पायावर उभे आहेत असे लेखिकेला या दृष्यातून सुचवायचे असावे.
अशाप्रकारे ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचे कथानक आणि काही कथासूत्रे आपण समजून घेतली आहेत.पुढील ब्लॉगमध्ये किरण देसाई यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘लोनलीनेस ऑफ सोनिया ऍंड सनी’ या कादंबरीचे कथानक आपण समजून घेऊ.मात्र ही कादंबरी खूपच दीर्घ असल्याने वाचायला, लिहायला अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढील ब्लॉग महिन्याभरानंतर प्रकाशित करू शकेन असे वाटते. तोपर्यंत आभार !
-गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा