मागील ब्लॉगमध्ये आपण भारतीय पण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या समकालीन इंग्रजी कादंबरीकार मेघा मजुमदार यांच्या ‘अ बर्निंग’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे लक्षात घेतली. खरं तर आजच्या ब्लॉगमध्ये त्या कादंबरीचे कथनाच्या अंगाने विश्लेषण करणे अपेक्षित होते. पण असे लक्षात आले की कथनाच्या अंगाने विश्लेषित करून ‘अ बर्निंग’ या कादंबरीकाराच्या अंतर्दृष्टीचा वेध घेण्याची तशी आवश्यकता नाही. कारण तसे केल्याने काही वेगळे गवसणार नव्हते. कथानकातून लेखिकेने भारतातील आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता किती अन्यायकारक आणि अस्वस्थ करणारी आहे हे सांगितले आहे. तसेच भारतातील मध्यमवर्गीयांच्या दबलेल्या आकांक्षांचा गैरफायदा राजकारणी घेतात आणि त्यांच्या गळाला लागलेले मध्यमवर्गीय अनैतिकतेचा आता जणू प्रतिष्ठेचाच झालेला राजमार्ग स्वीकारून आपल्या आकांक्षा कशा पूर्ण करून घेतात ते वास्तवही मेघा मजुमदार यांनी ‘अ बर्निंग’ या कादंबरीत स्पष्ट दाखवले आहे. लेखिकेच्या लेखनात स्पष्टता आहे. सूचकता नाही त्यामुळे तिची वेगळी काही अंतर्दृष्टी कथनाच्या विश्लेषणातून मिळू शकेल असे दिसत नाही. म्हणून ‘अ बर्निंग’ या कादंबरीच्या कथनाचे वेगळे विश्लेषण करण्याची काही आवश्यकता वाटली नाही.मग आज पुढील कादंबरीकार स्त्रीचा परिचय करून द्यायचे ठरवले .त्या आहेत अवनी दोशी.याही मूळच्या भारतीय, पण आता विवाहानंतर त्या पती आणि दोन मुलांसह बराच काळ त्या दुबई येथे वास्तव्यास असतात.आपण थोडक्यात अवनी दोशी यांचा परिचय करून घेऊ.

अवनी दोशी यांचा जन्म १९८२ मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झाला.त्यांचे आई- वडील अमेरिकेत स्थलांतरीत झालेले भारतीय होते. अवनी बालपणी नियमीतपणे पुणे येथे आपल्या आईच्या कुटुंबीयांकडे येत असत. विशीच्या वयात त्या भारतात वास्तव्यास आल्या आणि सुमारे सात वर्षे त्या भारतात होत्या.त्या काळात त्यांनी दिल्ली आणि मुंबईतील आर्ट गॅलऱ्यांमध्ये काम केले.त्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण बर्नार्ड कॉलेजमध्ये झाले तर एम. ए. त्यांनी लंडन विद्यापीठातून केले आहे. दृष्य कलांचा इतिहास हा त्यांचा अभ्यास विषय होता.
२०१३ मध्ये अवनी यांनी ‘गर्ल इन व्हाईट कॉटन’ या नावाची कादंबरी लिहिली. आशियाई लेखकांच्या अप्रकाशित कादंबऱ्यांसाठी मिळणारा ‘टिबर जोन्स साऊथ एशिया प्राईज’ या कादंबरीला मिळाला.२०१४ साली अवनी दोशी यांना इस्ट ऍंगलिया विद्यापीठाची ‘चार्ल्स पिक फेलोशिप’ मिळाली. ‘गर्ल इन व्हाईट कॉटन’ हीच त्यांची कादंबरी पुढे २०१९ मध्ये ‘बर्न्ट शुगर’ या नावाने अवनी दोशी यांनी प्रकाशित केली. २०२० च्या बुकर पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या पुस्तकांच्या यादीत या कादंबरीचा समावेश होता.आई आणि मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल ही कादंबरी आहे. लेखिकेच्या भूतकाळाचा संदर्भ कादंबरीला आहे.

लेखिकेने एका मुलाखतीत म्हटले आहे की ती १८ वर्षांची असताना बर्नाड कॉलेजमध्ये कलेच्या इतिहासाचा अभ्यास करत होती.विशेषतः देरिदा, फुको यांच्या तत्वज्ञानाने तिला अंतर्मुख केले होते.याच काळात दृष्य कला, माणसांच्या आठवणी आणि पुराणवस्तू अशा गोष्टींनी ती प्रभावीत झाली होती.तिच्या कादंबरी लेखनासाठी कथकाचा शोध ती अनेक वर्ष घेत होती. ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा कच्चा मसुदा तिने त्यात बदल करत करत आठ वेळा लिहिला होता.दर वेळी तिला वाटले होते की कादंबरीलेखन आपल्याला जमणार नाही पण तरी मनात हळूहळू कथासूत्र आकार घेत होतं आणि ते तिचा पिच्छा सोडत नव्हतं. त्यामुळे अखेरीस तिची कादंबरी जन्माला आली.कादंबरी लेखनाची प्रक्रिया तिला खूप काही शिकवून जाणारी वाटली.या प्रक्रियेत लेखक शरीराने आणि मनाने एकटा पडत जातो,अनेक आव्हानांना एकट्याने तोंड देतो असा अवनी दोशी यांचा अनुभव आहे.
‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीबद्दल इंग्रजी समीक्षकांनी गौरवोद्गार काढले आहेत.अवनी यांच्या लेखनात विखार आणि विनोद यांचे मिश्रण एलन हंट या ‘गार्डियन’च्या समीक्षकाला जाणवले आहे.द्वेषाने भरलेली कुटुंबकथा असे ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचे वर्णन ‘ऑबझर्वर’च्या समीक्षकाने केले आहे.हजरजबाबी आणि अतिशय स्पष्ट कथन असे बर्न्ट शुगर या कादंबरीचे वर्णन ‘संडे टाईम्स’च्या समीक्षकाने केले आहे.भूतकाळातल्या भयावह गोष्टी वर्तमानात प्रवेश करतात तेव्हा काय घडते हे या कादंबरीत लेखिका कथन करते असे ‘संडे टाईम्स’चा समीक्षक म्हणतो. ‘बर्न्ट शुगर’ वाचकांना पकडून ठेवणारी, टोकदार कथन असलेली एक शोकांत कादंबरी आहे असे ‘स्क्रोल’च्या समीक्षकाने म्हटले आहे.’गार्डियन’च्या समीक्षकाला ही कादंबरी तरल, बुद्धिमान, थरारक ,तीव्र भावनांनी भरलेली वाटली आहे.
आपली पहिलीच कादंबरी ‘बर्न्ट शुगर’च्या यशानंतर अवनी दोशी यांनी ‘फर्स्ट होम’ या नावाची दुसरी कादंबरी लिहिली आहे जी जुलै २०२६ मध्ये पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे.पती-पत्नीच्या नात्यातील गुंत्यांबद्दल सांगणारी ही कादंबरी असावी.
पुढील ब्लॉगमध्ये अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीच्या कथानक आणि कथासूत्रांचा आपण परिचय करून घेऊ.
-गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा