मागील ब्लॉगमध्ये आपण मेघा मजुमदार या मूळच्या भारतीय पण आता अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या समकालीन इंग्रजी कादंबरीकार तरूणीबद्दलची माहिती जाणून घेतली. मेघा यांच्या पहिल्याच कादंबरीची ‘अ बर्निंग’(२०२०) ची बरीच प्रशंसा झाली. या ग्यासी या मूळच्या घानाच्या पण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रथितयश तरूण कादंबरीकार स्त्रीने ‘अ बर्निंग’बद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत तसेच अमिताव घोष या बुजुर्ग भारतीय इंग्रजी कादंबरीकारानेही एखाद्या लेखिकेची पहिलीच कादंबरी चांगली असणे अनेक वर्षांनी अनुभवले असे कौतुकाचे उद्गार मेघा मजुमदार यांच्याबद्दल काढले आहेत.काही पारितोषिकांनी ही कादंबरी सन्मानीतही झाली हे आपण वाचलेच असेल.म्हणूनच या कादंबरीबद्दल लिहिणे गरजेचे वाटते आहे. आज ‘अ बर्निंग’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे आपण समजून घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
मेघा मजुमदार यांची ‘अ बर्निंग’ ही कादंबरी २०२० मध्ये पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केली.सुमारे २८९ पृष्ठांच्या या कादंबरीचे कथानक प्रामुख्याने कलकत्त्याच्या दक्षिणेकडील कालाबागान व अन्य उपनगरांत तसेच कलकत्त्यातील तुरूंगात घडते.या कादंबरीत सामावलेला काळ हा नेमका किती आहे हे सांगता येणार नाही पण साधारणपणे तो एक-दोन वर्षांचा असावा. ‘अ बर्निंग’ या कादंबरीचे कथानक प्रामुख्याने सरळरेषीय आहे पण क्वचित ते भूतकाळात व भविष्यातही डोकावते.या कादंबरीत जीवन आणि लव्हली या दोन व्यक्तिरेखा प्रथमपुरूषी निवेदनातून साकार होतात.पण पी.टी. सर ही व्यक्तिरेखा मात्र तृतीय पुरूषी निवेदनातून सामोरी येते.या तीन व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील एक-दोन वर्षांतील घटना कथन करण्यावर या कादंबरीतील कथानकाचा भर आहे. पण क्वचित सभोवताली घडणाऱ्या अन्य काही घटनाही कथानकाच्या अनुषंगाने उलगडत जातात. जीवन, लव्हली आणि पी.टी. सर यांच्या आयुष्यातील घटना परस्पर समांतर असल्या तरी कधीकधी त्या एकमेकांना छेद देतात.कादंबरीचे मुखपृष्ठ त्याअर्थी सूचक आहे.

‘अ बर्निंग’ या कादंबरीच्या कथानकाची सुरूवात जीवनच्या कथनातून होते.जीवन ही कालाबागान या कलकत्त्याच्या उपनगरातील एका झोपडपट्टीत रहाणारी २२ वर्षांची मुस्लीम तरूणी आहे.तिच्या अंगाला धुराचा वास येतो असे तिची अम्मी म्हणते म्हणून ती आंघोळ करते आहे.आधल्या रात्री तिने कालाबागान या स्टेशनवर एक ट्रेन पेटताना पाहिलेली आहे.त्या आगीच्या धुराचा वास आपल्या अंगाला येत असावा असे वाटून जीवन आंघोळ करते आहे.आंघोळीनंतर ती बाहेर येऊन आपला नवीनच घेतलेल्या मोबाईलवरील फेसबुकवर काल रात्रीच्या दुर्घटनेबद्दल आलेल्या पोस्टस पाहते. शेजारच्या देशातील दहशतवाद्यांनी हे कृत्य केले असणार असे बहुतेक लोकांनी लिहिले आहे.या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी ऐंशी हजार रूपये राज्य शासन देईल अशी घोषणा झाल्याचे जीवनला फेसबुकवरून कळते. मरणाऱ्यांच्या जीवाची किंमत एवढी कमी आणि तीही कधी मिळेल कोण जाणे असे मनात येऊन जीवन कडवटपणे हसते. पण असा हल्ला होऊच कसा शकतो ?आपली पोलिस यंत्रणा दक्ष नसते का ? या प्रश्नाची जी चर्चा फेसबुकवर चालू असते त्यात डोकं खाजवणाऱ्या पोलिसाचे व्यंगचित्र पाहून जीवनला हसू येते.फेसबुकवर मोकळेपणे व्यक्त होणाऱ्या लोकांबद्दल जीवनच्या मनात कौतुक आहे.आपल्याकडे अधिक पैसे आले की कदाचित आपणही अशाच मोकळेपणाने फेसबुकवर व्यक्त होऊ असे असे जीवनला वाटते.
फेसबुकवरील एका व्हिडियोत कोणीतरी जळणाऱ्या ट्रेनमधल्या वाचलेल्या एका महिलेची मुलाखत घेतलेली दिसते. ती महिला रडत रडत म्हणत असते की दुर्घटना घडली, ट्रेनला आग लागली तेव्हा एक जीपभर पोलिस ते दृष्य पाहात होते पण कोणी आपल्या जळणाऱ्या नवऱ्याला वाचवायला पुढे आले नाही.जीवन हा व्हिडिय़ो इतरांना पाठवते.त्याच्या खाली ती लिहिते की पोलिस, ज्यांना सरकार पगार देते ते दुर्घटना बघत राहिले पण त्याचवेळी या निष्पाप महिलेचे सर्वस्व हरपलं.
सुट्टी असल्यामुळे जीवन थोडा वेळ झोपते आणि उठल्यावर ती पुन्हा फेसबुकवर आपल्या प्रतिक्रियेबद्दल कोणी काही म्हटले आहे का ते पाहू लागते.दोन जणांनी तिची व्हिडियोवरील प्रतिक्रिया आवडल्याची खूण केलेली असते.अर्धा तास झाला तरी फक्त दोनच लाईक्स ..असा विचार जीवनच्या मनात येतो. त्यानंतर एका बाईची प्रतिक्रिया येते की व्हिडियोतील बाई कशावरून खोटं बोलत नसेल ?कदाचित तिला लोकांचे लक्ष खेचून घ्यायचे असू शकेल. जीवन वैतागून त्या स्त्रीला लिहिते की तुम्ही व्हिडियो पूर्ण पाहिला तरी आहेत का ?त्या संवेदनशून्य बाईची जीवनला चीड येते.एका बाजूला इतरांच्या प्रतिक्रियांना किती तरी लाईक्स मिळत असताना आपली प्रतिक्रिया मात्र दुर्लक्षित रहावी याचे जीवनला वैषम्य वाटते.आणि त्या निराशेत ती एक घातक गोष्ट करते. ती अजून एक प्रतिक्रिया लिहिते.की जर पोलिस सर्वसामान्यांना मदत करत नसतील आणि ही सामान्य माणसे मरत असताना केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर त्याचा अर्थ असाही निघत नाही का की सरकार देखील दहशतवादी आहे?
‘अ बर्निंग’ कादंबरीच्या दुसऱ्या प्रकरणात लव्हली हा तृतीय पंथी युवकाचे प्रथम पुरूषी कथन येते.रविवार आहे आणि लव्हलीला अभिनयाच्या क्लासला जायचे आहे. तो लगबगीने स्टेशनकडे चालला आहे.कोणाला तरी तो वेळ विचारतो. साडे आठ वाजल्याचे कळल्यावर लव्हली धावतच रेल्वे स्टेशन गाठतो. ट्रेनच्या गर्दीत तो मनातल्या मनात याच स्टेशनवर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत निधन पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देतो. कोणीतरी बाई त्याला या डब्यात शिरल्याबद्दल दुषणे देते.आपल्यासारख्या तृतीय पंथीयांना समाजात वावरणे किती कठीण आहे असा विचार लव्हलीच्या मनात येतो. एका तासाच्या ट्रेन प्रवासातही आपल्याला स्वस्थ उभे रहाता येत नाही या अनुभवाने लव्हली वैतागतो. कोणी एक गरीब, अपंग भीक मागत गर्दीत शिरला आहे आणि अन्य प्रवासी त्याच्यावरही वैतागले आहेत. आपल्याला बसायला जागा नाही आणि त्यात हा भिकारी त्यांच्या वैतागात भर घालतो आहे.लव्हलीला लोकल ट्रेन आवडते. प्रत्येक ट्रेन त्याला निरीक्षणाला माणसं पुरवते. लोकांचे चेहरे, हालचाली लव्हली पहात रहातो. लव्हली देबनाथ यांच्या घरी अभिनयाचे प्रशिक्षण घ्यायला जातो. तिथे त्याच्याखेरीज अन्य आठ विद्यार्थीही अभिनय शिकायला उपस्थित असतात. देबनाथ लव्हली आणि ब्रिजेश यांना एक दृष्य अभिनीत करायला सांगतात.संशयी नवरा ही भूमिका ब्रिजेश करणार आहे तर नवऱ्याला प्रामाणिकपणे आपला भूतकाळ कथन करणारी स्त्री ही भूमिका लव्हली साकारणार आहे. लव्हली मनापासून या दृष्यात शिरलेला असताना त्याला जाणवते की ब्रिजेश त्याला स्पर्श करताना बिचकतो आहे. त्याबद्दलची नाराजी तो उघड व्यक्त करतो आणि ब्रिजेशने भूमिकेत शिरावे असे सुचवतो. देबनाथनाही ते पटते. लव्हलीच्या अभिनयाचे ते कौतुक करतात.लव्हलीला आठवते की वर्षभरापूर्वी देबनाथ आपल्याला त्यांच्या वर्गात प्रवेश द्यायलाही नाखुष होते . आता त्याने देबनाथकडून कौतुक मिळवले असल्याने त्याचे मन भविष्याची सुखस्वप्ने पाहू लागते. आपल्याला लौकरच कॅमेऱ्यासमोर अभिनय करायची संधी मिळेल आणि आपला अभिनय पाहून सर्व आपल्यावर फिदा होतील असे ते स्वप्न आहे.
पुढच्याच प्रकरणात जीवनला तिच्या झोपडीत शिरून पोलिस पकडून नेतात. ती गयावया करून महिला पोलिसांना सांगत राहते की मी निष्पाप आहे. मी पॅन्टालूनच्या दुकानात काम करते.पण कोणीही तिचे काही ऐकून घेत नाहीत आणि तिला जिपमध्ये टाकतात.जिपमधून जाताना जीवन पाहते की तरूण मुलांचे नशेने झिंगलेले एक टोळके वेगात गाडी हाकत असते, रस्त्यावर फटाके फोडले जात असतात पण त्यांना पोलीस काहीच करत नाहीत.त्या मुलांचे बाप श्रीमंत आहेत, त्यांच्या राजकीय नेत्यांशी ओळखी आहेत.आपल्यासाठी कोण वशिला लावणार असा विचार जीवनच्या मनात येतो.
पुढल्या प्रकरणात लव्हली आणि त्याचा मुस्लीम मित्र आझाद यांच्यातील प्रेमसंबंध वाचकांसमोर उलगडतो. लव्हलीला माहीत आहे की आझादच्या घरून या संबंधाला विरोध आहे. आझादने लग्न करावे यासाठी त्याचा मोठा भाऊ प्रयत्न करतो आहे.लव्हलीही आझादला आपल्या प्रेमातून मुक्त व्हायला सांगतो.पण आझादला लव्हलीशी लग्न करायचे आहे.
जीवनला कोर्टात न्यायाधीशांसमोर उभे करण्याआधी तिला एक वकील दिला जातो.ती त्या वकिलाला विचारते की तिला अटक का करण्यात आली आहे.वकील तिला तिच्या काही फेसबुक पोस्टस दाखवतो. कोणा एका अनोळखी मुलाबरोबर तिने सहज काही चॅटिंग केलेले असते. पोलिसांच्या मते तो भारतातील मुलांना दहशतवादी कारवायांत खेचणारा माणूस असतो. जीवन परोपरीने सांगते की तिने त्या मुलाबरोबर दोन-चारवेळा काही चॅटींग केले असेल पण ती त्याला प्रत्यक्ष कधी भेटलेली नाही की ओळखतही नाही.जीवनच्या विरूद्ध दुसरा पुरावा म्हणजे तिच्या घरी काही रॉकेलमध्ये बुडवून ठेवलेले कपडे मिळाले होते.ट्रेन पेटवताना हे बोळेच वापरले गेले असणार असा आरोप जीवनवर करण्यात आला आहे.जीवनच्या मते ते तिच्या आईने तेलकट गोष्टींची साफसफाई करण्यासाठी ठेवलेले कापडी बोळे असावेत. आणि त्याचा ट्रेन जाळण्याशी काहीही संबंध नव्हता.जीवनविरूद्ध आणखीन एक पुरावा म्हणजे काही लोकांनी तिला स्टेशनकडे जाताना पाहिले होते. तिच्या हातात एक पुडके असल्याचेही त्यांनी पाहिले होते. जीवन कबुल करते की ती स्टेशनकडे गेली होती. तिच्या हातातील पुडके तिच्याच जुन्या पाठ्यपुस्तकांचे होते. ती पुस्तके ती लव्हली नावाच्या तृतीय पंथियाला देणार होती कारण तो तिच्याकडून इंग्रजी भाषेची शिकवणी घेत होता.सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे जीवनने पोलिसांनी सादर केलेले तिचे कबुलीपत्र. जीवन परत परत सांगत रहाते की तिला कोणताही कबुलिजबाब द्यायाचा नव्हता पण पोलिसांनी बळजबरीने त्यावर तिची सही घेतली आहे.
इथे जीवनच्या झोपडीच्या दाराशी अनेक पत्रकार जमा झालेले असतात. त्यातील पूर्णेंदू सरकार हा पत्रकार जीवनच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो. जीवनचे वडील जे एके काळी सायकल रीक्षा चालवत ते पाठदुखीने बेजार आहेत आणि बिछान्यावर पडून आहेत. आपल्या मुलीबद्दल चुकीचे घडते आहे हे जीवनच्या आई-वडिलांना कळते आहे. पण दाद कुठे मागणार ?पूर्णेंदु सरकार जीवनच्या आईला त्याच्या मोटरसायकलवरून कलकत्त्यातील पोलिसठाण्यात घेऊन जातो. तिथेही पत्रकारांची गर्दी जमलेली आहे. जीवनच्या आईला मुलीला भेटायचे आहे. ती जीवनची काही सर्टिफिकेटस घेऊन आली आहे. आपली मुलगी शाळा शिकली आहे, ती निष्पाप आहे असे तिला पोलिसांना सांगायचे आहे पण तिला पोलिस ठाण्यात प्रवेश दिला जात नाही. दहशतवादीला कोणाचीच भेट घेऊ देऊ नका असे आदेश आहेत.
जीवन आणि लव्हली यांच्या कहाण्या पुढे सरकत असतानाच अकराव्या प्रकरणात पी.टी. सर ही तिसरी व्यक्तिरेखा कादंबरीत येते. हे एस.डी. घोष कन्याशाळेत पी.टी. शिकवणारे मध्यमवयीन गृहस्थ आहेत. त्यांना टी.व्ही. वरील बातम्यांमध्ये जीवनला दहशतवादी म्हणून पकडले गेल्याचे दृष्य दिसले आहे. ते पहाताना त्यांना जीवन ही काही वर्षांपूर्वी आपली विद्यार्थिनी होती हे आठवते.ती त्यांच्या विशेष लक्षात राहिली आहे कारण ती खेळात चांगली होती. त्या शाळेत खेळाबद्दल उत्साही कोणीच नसताना जीवनमध्ये मात्र ती चमक पी.टी. सरांना दिसली होती. पण ती अशक्त आहे , खेळताना हवी असणारी ताकद तिच्यात नाही म्हणून पी.टी. सरांनी बरेचवेळा तिला स्वतःचा डबा, अन्य खाणे दिलेले त्यांना आठवते. पण जीवनमध्ये एक अलिप्त कोरडेपणा तेव्हाही त्यांना जाणवला होता तेही त्यांना आठवते. आपण तिला मदत करण्याचा प्रयत्न करत असता तिने मात्र कधी कृतज्ञता व्यक्त केली नव्हती हे त्यांना विचित्र वाटले होते. दहावीनंतर काहीही न सांगता जीवनने शाळा सोडली होती हेही त्यांना खटकले होते.जीवनला दहशतवाद्यांना मदत करणारी म्हणून पकडले जाणे हे मात्र पी.टी. सरांना अन्यायकारक वाटत होते.आपल्याला जीवनबद्दल जी माहिती आहे ती पोलिसांना सांगावी की नाही याबद्दल पी.टी. सरांची द्विधा मनःस्थिती होते. पण अखेरीस बायकोने त्याबद्दल आग्रह धरल्यावर ते पोलिस ठाण्यावर जाऊन जीवनबद्दलची त्यांना ठाऊक असलेली माहिती नोंदवून येतात. पी.टी. सर एके दिवशी शाळेतून घराकडे जायला ट्रेनची वाट पाहात स्टेशनवर उभे असताना ट्रेन लेट होणार आहे अशी घोषणा होते. मधला वेळ काढायला ते स्टेशनबाहेर पडतात तेव्हा तिथेच जवळ जनकल्याण या राजकीय पक्षाची सभा सुरू झालेली ते पाहतात .तिथे केटी बॅनर्जी ही प्रसिद्ध सिनेमा नटीही येणार आहे.
सभेचे ते वातावरण पाहून पी.टी. सर भारावून जातात.ती लोकांची जमलेली गर्दी, त्यांच्या कपाळावरील गुलाल, हातातील झेंडे, घोषणा हे सगळे पाहात आणि व्यासपीठावरील बिमला पाल यांचे भाषण ऐकत असताना पी.टी. सरांना वाटते की आपणही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले पाहिजे.सभा संपवून ते स्टेशनवर येतात तेव्हा त्यांची ट्रेन निघून गेलेली असते. दुसरी ट्रेन ते पकडतात तेव्हा त्यांच्या कपाळावरील गुलाल वगैरे पाहून ट्रेनमधील लोक त्यांना बसायला जागा करून देतात.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जी प्रतिष्ठा मिळते ती एका शिक्षकाला मिळणाऱ्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक असते हे जाणवल्याने तर पी.टी. सरांच्या मनात राजकीय कार्यकर्ता होण्याचा विचार अधिकच पक्का होतो.
जीवनला तुरूंगात देखील कशी एक वेगळीच शोषणव्यवस्था असते ते काही दिवसांतच लक्षात येते. एक परदेशी दिसणारी गोरी गुन्हेगार बाकीच्या गुन्हेगार बायकांना तिची कामे करायला लावत असते आणि त्याबदल्यात तुरूंग अधिकाऱ्याकडून काही छोट्या-मोठ्या सवलती मिळवून देत असते.जीवनला वाटते की पूर्णेंदु सरकारसारख्या पत्रकाराने आपली बाजू वर्तमानपत्रातून लोकांसमोर मांडली तर आपल्याला न्याय मिळू शकेल. पण पूर्णेंदुला भेटण्यासाठी आधी गोऱ्या बाईला आपलेसे करावे लागणार असते आणि मग तुरूंगाधिकारी स्त्रीच्या विश्वासाला पात्र ठरायचे असते.
अधून मधून जीवनला तिच्या आईला भेटता येत असते.आपलं तुरूंगात ठीक चाललं आहे असंच ती आईला सांगत असते.पण प्रत्यक्षात त्यांना मिळणारे जेवण निकृष्ट असते. ते जेवण करण्याची जबाबदारीही गुन्हेगारांवरच टाकलेली असते. जीवनला रोजच्या शंभर सवाशे पोळ्या चुलीसमोर बसून भाजाव्या लागतात. एकदा ती आईला थोडे साजुक तूप आणून द्यायला सांगते. मग रोज एक पोळी तूप घालून खरपूस भाजून ती तुरूंग अधिकारी बाईंना देऊ लागते. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करून ती पूर्णेंदु सरकार हा आपला भाऊ आहे आणि त्याला भेटायची परवानगी द्या अशी विनंती तुरूंग अधिकारी ऊमा यांना करते. पूर्णेंदु सरकार जीवनचा भाऊ नाही हे माहीत असूनही तुरूंगाधिकारी जीवनला पूर्णेंदुला भेटण्याची संधी देतात.पूर्णेंदु दर आठवड्याला थोडा थोडा वेळ जीवनला भेटू लागतो. जीवन आपली बालपणापासूनचा जीवनक्रम त्याला कथन करू लागते. तिला वाटते की पूर्णेंदूने ती सांगते तेवढा अंश प्रत्येक आठवड्याला वर्तमानपत्रात लिहावा म्हणजे क्रमशः तिची कहाणी लोकांना कळेल. पण पूर्णेंदुला तसे करणे व्यवहार्य वाटत नाही. तो जीवनची सगळी कहाणी ऐकून मगच ती पूर्णच छापणार असतो. ती कहाणी अखेरीस छापून येतेही.
जीवनचे बालपण कोळशाच्या खाणी असलेल्या प्रदेशात गेलेले असते. तिथे तिची अम्मी खाणी बाहेर पडलेला कोळशाचा भुसा उचलण्याचे काम करत असते. अब्बू सायकल रीक्षा चालवत असतात.पत्र्याच्या झोपड्यांमध्ये ही कुटुंबे रहात असतात. पण एके दिवशी काही तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या सांगण्यावरून या गरीबांच्या झोपड्या तोडून टाकण्यासाठी पोलिस येतात.विरोध करणाऱ्या गरीबांना मारहाण केली जाते. जीवनच्या वडिलांची रीक्षा तोडून टाकली जाते.अचानक बेघर झालेल्या लोकांवर पोलिसांना विरोध केला म्हणून गुन्हे नोंदवले जातात.पण कालांतराने या गरीबांना एका सरकारी पुनर्वसन वसाहतीत तात्पुरता निवारा दिला जातो. ती घरे म्हणायलाच इमारतींत आहेत. त्या घरांची अवस्था झोपड्यांसारखीच आहे. ओल आलेल्या भिंती, अशुद्ध पाणीपुरवठा,खंडित होणारा वीजपुरवठा अशा सगळ्या दुरवस्था असलेल्या घरालाही आसरा म्हणत लोक जीव जगवत रहातात. पाणी नीट मिळत नाही म्हणून जीवनची आई सरकारी कार्यालयात तक्रार घेऊन जाते. तिला दाद दिली जात नसते. पण एकदा जीवन तिच्यासोबत जाते आणि इंग्रजीत आपली तक्रार मांडते तेव्हा तिची दखल घेऊन पाणीपुरवठ्याची सोय केली जाते.जीवनच्या अम्मीला शाळा शिकणाऱ्या आपल्या मुलीचा अभिमान वाटतो.जीवनने आपल्या वडिलांना औषधोपचार मिळावेत यासाठी सरकारी आरोग्य केंद्रात अनेकवेळा त्यांना नेलेले असते. पण तिला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नसतो.जीवन हाच तिच्या आई-वडिलांचा एकमेव ठेवा असतो, तिच्या भविष्याची काळजी त्यांना सतावत असते.
कालांतराने कलकत्त्याच्या कालाबागान या उपनगरातील झोपडपट्टीत जागा मिळू शकेल असे कळल्याने जीवनची आई जीवनला व आजारी नवऱ्याला घेऊन स्थलांतर करते.स्टेशनजवळच्या भाजी बाजारातून पहाटे जाऊन स्वस्त भाजी आणायची आणि सकाळपासून परिसरातील लोकांना भाजी-पोळीची न्याहारी द्यायची हा व्यवसाय करत जीवनची आई कुटुंबाचा गाडा ओढत असते. याच झोपडपट्टीत आईने सांगितलेल्या वस्तू आणायला जाताना एका चांगल्या कपड्यातील बाईच्या बॅगेतून बाहेर डोकावणारी पर्स चोरण्याचा मोह जीवनला होतो. खरं तर ती पर्स चोरत नाही पण तिचा हात त्या पर्सकडे जाणार असतानाच ती बाई तिची चोरी करण्याची इच्छा ओळखून तिचा हात पकडते. सुदैवाने ही बाई समजसेविका असते. ती जीवनची सगळी परिस्थिती समजून घेते, जीवनच्या शिक्षणात परिस्थितीने खंड पडलेला असतो.समाजसेविका एस.डी.घोष गर्ल्स स्कुल या चांगल्या कन्याशाळेत जीवनला प्रवेश मिळवून देते. जीवनच्या शिक्षणाचा खर्च समाजसेवी संस्था उचलते. याच शाळेत जीवनला पी.टी. सरांनी चांगली क्रीडापटू होऊ शकणारी मुलगी म्हणून हेरलेले असते. पण जीवनला आपली घरची परिस्थिती बदलावी असे वाटत असते. विशेषतः आईचे कष्ट कमी व्हावेत, वडिलांना चांगले औषधोपचार मिळावेत असे तिला मनापासून वाटत असते. दहावीचा अभ्यास ती मनापासून करते. पंचावन्न टक्के गुणांनी ती दहावी पास होते. तिच्या शाळेत तिला सगळ्यात कमी गुण मिळालेले असतात. पण वस्तीत दहावी पास झाली म्हणून तिची आई पेढे वाटते. लोक कौतुक करतात. आई जीवनला पुढे शिक अशी विनवणी करत असतानाही जीवन शिक्षण सोडते आणि पॅन्टालून दुकानात सेल्सवुमन म्हणून काम पत्करते.पैसे मिळवू लागल्याने जीवनला आपण स्वतंत्र झालो असे वाटू लागलेले असते. इतरांचे पाहून तीही कधीमधी सिगारेट ओढू लागलेली असते.एक मनमुक्त आनंद तिला त्यातून मिळत असतो.पॅन्टालूनमध्ये काम करून मिळालेले पैसे साठवूनच तिने स्वस्तातला मोबाईल घेतलेला असतो. पण त्या मोबाईलमुळेच ती वेगवेगळ्या अपरिचितांच्या संपर्कात येते आणि अडचणीत येते.कालाबागान वस्तीतच रहाणारा लव्हली देबनाथकडे अभिनय प्रशिक्षण घेत असतानाच आपल्याला लोकांशी इंग्रजीत बोलता यावे म्हणून जवळच रहाणाऱ्या दहावी पास झालेल्या जीवनकडून इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवू लागलेला असतो. जीवन त्याला मनापासून शिकवत असते. आपली जुनी इंग्रजी पाठ्यपुस्तके लव्हलीला द्यायला ती कालाबागान स्टेशनवर त्या रात्री गेलेली असते. लव्हली ट्रेनमध्ये त्याच्या साथीदार बहिणीबरोबर लोकांना दुवा देऊन पैसे मिळवत जगणारा तृतीयपंथी असतो.तो कालाबागान स्टेशनवर येणार असतो. पण तो वेळेवर न आल्याने जीवन एक सिगारेट घेऊन ती ओढत उभी असतानाच फलाटावर उभ्या गाडीला आग लागलेली ती पहाते. बघता बघता आग पसरते. जीवनच्या समोरच्या डब्यातील माणसे ओरडून आम्हाला बाहेर काढा असे सांगत असतात पण डब्याचा दरवाजा उघडत नसतो. जीवन ते हतबलतेने पहाते आणि घाबरून घरी पळत सुटते. आपण काहीच मदत करू शकलो नाही याचा अपराधीपणा तिला सतावतो.आपणच या आगीचे सूत्रधार म्हणून पकडले जाऊ हे तिच्या स्वप्नातही नसते.पूर्णेंदू सरकारला जीवनच्या मुलाखतीतून समजलेली ही कहाणी तो वर्तमानपत्रात छापतो पण त्याने दिलेले शीर्षक जीवनला खटकते. तिच्या वस्तीतील कालू आणि इतर काही लोक ती मुलाखत पूर्ण वाचतात तेव्हा पूर्णेंदुने जे लिहिले आहे ते जीवनला सहानुभूती मिळवून देऊ शकेल असे त्यांना वाटते.जीवन गोविंदच्या मदतीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करते.ती वयाने लहान आहे आणि अनवधानाने तिच्याकडून फेसबुकवर काही दहशतवादी लोकांशी संपर्क साधला गेला आहे , तिला माफ करावे. ती तुरूंगातून बाहेर पडली की संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेईल अशा आशयाचा तो अर्ज असतो.
जीवन पकडली गेल्याचे लव्हलीला कळते तेव्हा तोही कासावीस होतो. जीवन ही एक चांगली मुलगी आहे हे आपण सांगितले पाहिजे असे त्याला वाटते.पण ते कुणाला सांगणार ? लोक तर जीवनवर भडकलेले असतात. ती एक मुस्लीम तरूणी आहे एवढी एकच गोष्ट त्यांना तीच दहशतवाद्यांना मदत करणारी आहे असे मानून तिच्यावर गुन्हेगाराचा शिक्का मारायला पुरेशी वाटते.कोणीही जीवनला निष्पाप समजायला तयार नसते. वर्तमानपत्रे तर जीवनविरूद्ध गरळ ओकत असतात आणि जीवनला तुरूंगात ठेवून तिची केस लांबवत ठेवणे हा सार्वजनिक पैशांचा अपव्यय आहे असे जनमत हळूहळू तयार होऊ लागलेले असते.जीवन आपला वकील गोविंद याला सांगते की लव्हलीला शोधून काढ, तो माझ्या बाजूने साक्ष देईल.पण गोविंदने लव्हली भेटलाच नाही असे जीवनला सांगितलेले असते. जीवनच्या आईने लव्हलीला शोधून काढून त्याचा संपर्क गोविंदशी घडवलेला असतो. लव्हलीने साक्ष देण्याची तयारी दाखवलेली असते.
लव्हलीला वाटत असते की देबनाथ सरांनी स्वतःच्या ओळखीने त्याला चित्रपटात काम मिळवून द्यावे. आपला अभिनय उत्तम होतो आहे असे देबनाथ सर म्हणत असतील तर आपण चित्रपटात चमकलेच पाहिजे असे लव्हलीला वाटत असते.दरम्यान त्याचा प्रियकर आझादचे लग्न झालेले असते. लव्हली मनावर दगड ठेवून त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेला असतो.लहानपणीच आपल्या घरच्यांनी आपल्याला नाकारले तेव्हापासून खरे प्रेम आपल्याला मिळालेच नाही ही वेदना लव्हलीला सतावत असते. त्याच्या गुरू आणि भगिनींबरोबर तो पोटापाण्यासाठी ट्रेनमध्ये जाऊन लोकांना दुवा देत पैसे मागत असला तरी ते काम त्याला आवडत नसते. मुल झालेल्या जोडप्याच्या दारी जाऊन नाचून पैसे मिळवणे त्याला कमीपणाचे वाटत असते. म्हणून तर त्याने अभिनयाचे धडे घेणे , इंग्रजी शिकणे सुरू केलेले असते. पण म्हणावी तशी संधी त्याला मिळत नसते. देबनाथ सर त्याला संधी देऊ शकणार नाहीत हे लक्षात आल्यावर तो स्वतःच एका व्हिडियो बनवून देणाऱ्या एजंटला भेटून त्यातल्या त्यात स्वस्त व्हिडियो बनवून घेतो.पण तो व्हिडियो घेऊन जेव्हा तो झुनझुनवाला नावाच्या कलाकरांना कामे मिळवून देणाऱ्या एजंटकडे जातो तेव्हा तो त्याला चित्रपटात हिजड्याचे काम असेल तेव्हा तुला बोलावू असं म्हणत त्याची बोळवण करतो. लव्हली ते ऐकून अतिशय निराश होतो. निराशेच्या भरात तो आझादला भेटायला त्याच्या घराजवळ जातो पण आता आझादशी आपला काही संबंध नाही. तो आता शबनमचा पती आहे आणि तिला दुखावण्याचा आपल्याला अधिकार नाही हे जाणवून आझादला भेटत नाही.त्याच्या तृतीयपंथी गुरू व भगिनी त्याला या परिस्थितीत उभारी देतात.पण तरी लव्हली मनातून निराश होतो.दरम्यान जीवनची अम्मी आणि वकील गोविंद लव्हलीला भेटतात आणि कोर्टात साक्ष द्यायला बोलावतात. लव्हली अतिशय प्रामाणिकपणे जीवन ही कशी चांगली, सर्वांना मदत करणारी मुलगी आहे त्याबद्दल कोर्टात सांगतो.त्याचे फोटो वर्तमानपत्रांत आणि टी.व्ही. वर झळकतात.लोकं त्याला ओळखू लागतात.त्यातच आपल्या अभिनयाचा देबनाथ सरांकडे काढलेला व्हिडियो जो त्याने आपल्या तृतीयपंथी भगिनींना पाठवलेला असतो तो त्यांच्याकडून इतरांना जात जात व्हायरल होतो. त्यातील लव्हलीचा उत्कट अभिनय अनेकांना आवडतो. कलकत्त्यातील व्हिक्टोरीया पार्कमध्ये नेहमीप्रमाणे लोकांना दुवा देत पैसे मागायला गेलेल्या लव्हलीला झुनझुनवाला गाठतो आणि एका चित्रपटात कामाची ऑफर देतो. बघता बघता लव्हलीला चांगल्या जाहिरात कंपन्यांकडून , चित्रपट कंपन्यांकडून बोलावणी येऊ लागतात. पण एक अट मात्र काहीजण घालू लागतात ती म्हणजे लव्हलीने यापुढे जीवनबद्दल सुरू असलेल्या केसमध्ये साक्षीदार होऊ नये. नाइलाजाने लव्हली ती अट मान्य करतो.
पी.टी. सर राजकीय पक्षाच्या सभांना जाऊन आपली उपस्थिती नोंदवू लागलेले असतात. एकदा एका सभेत बिमला पाल या जनकल्याण पक्षाच्या नेत्या बोलत असतानाच माईक चिरकणारे आवाज करू लागतो तेव्हा पटकन स्टेजवर चढून पी.टी. सरांनी माईक नीट करून दिलेला असतो. त्यानंतर बिमलाजी शाळेजवळून जाताना मुद्दाम पी.टी. सर घेत असलेली मुलींची कवायत पहायला आलेल्या असतात. एक राजकीय नेत्याला पी.टी. सर ओळखतात हे कळल्याने सरांची किंमत वधारलेली असते. पावसाळ्यात शाळेच्या गल्लीत पाणी साचल्याने सगळ्यांची गैरसोय होते तेव्हा मुख्याध्यापिका बाईंनी पी.टी. सरांना त्यांची राजकीय ओळख वापरून काही मार्ग काढावा असे सुचवलेले असते. पी.टी. सरांच्या वशिल्यानेच गटारे साफ होऊन गल्लीत पाणी साचण्याची समस्या सुटलेली असते. पी.टी. सर आता शाळेत अधिकच महत्त्वाचे ठरू लागलेले असतात. पण पी.टी. सरांना शाळेत मिळणाऱ्या प्रतिष्ठेपेक्षा राजकीय पक्षात मिळू शकणारी प्रतिष्ठा खुणावू लागलेली असते.त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे हे ओळखूनच बिमलाजींनी त्यांना वेगवेगळ्या खटल्यात अडकवलेल्या त्यांच्या हितशत्रूंच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी पी.टी. सरांना वापरायला सुरवात केलेली असते. पहिल्यांदा घाबरत पण नंतर सराईतपणे पी.टी. सर खोट्या साक्षी देऊ लागलेले असतात. दरवेळी मिळणारे पैशाचे पाकिट त्यांच्या घरात चांगला टी.व्ही., फ्रिज, तंदुर आणायला उपयोगी ठरू लागलेले असते, बायको तर त्यांच्यावर विलक्षण खुष होऊ लागलेली असते.
आता, राजकीय पक्षाला आपण अधिक उपयोगी ठरावे कारण ते ‘अर्थपूर्ण’ आहे असे पी.टी. सरांना वाटू लागलेले असते ! बिमला मॅडम हे ओळखून पी.टी. सरांना गावा गावांतल्या शाळांची स्थिती पाहून त्या शाळांचा पुनर्विकास राजकीय पक्ष कसा करून देईल याबद्दल भाषणे करण्याचे काम देतात. त्यासाठी त्यांच्या दिमतील गाडी, ड्रायव्हर वगैरे सगळे मिळणार असते. पहिल्यांदा थोडेसे नाखुषीने पी.टी. सर हे काम सुरू करतात. त्यांना मनातून शहरातच काम करण्याची इच्छा असते. एका गावात सभा घेताना शाळेत हिंदु -मुस्लिम सर्व मुलांना शिकता येईल असे विधान ते करतात. पण त्याचवेळी एकजण कुणा मुसलमानाच्या घरी गायीचे मांस आहे अशी आवई उठवतो आणि सगळे गावकरी त्वेषाने त्या मुस्लीमाच्या घरावर हल्ला करतात. पी.टी. सर हल्लेकरूंना समजावण्याचा प्रयत्न करत त्यांच्यामागे जातात पण कोणतीही विचारपुस करण्याच्या आधीच हल्लेखोरांनी त्या मुस्लीम माणसाला मारलेले असते.पी.टी. सर सुन्न होतात. ते बिमला मॅडमना भेटून घडलेली घटना सांगतात आणि आपले अपराधीपण व्यक्त करतात. पण बिमला मॅडम त्यांना समजावतात की घडलेल्या घटनेत त्यांची काहीच चूक नाही. घरी बायकोही पी.टी. सरांच्या मनातील अस्वस्थता दूर करते.पी.टी सरांना हळूहळू निर्ढावलेपण येत जाते. ते अनेक गावांत फिरून भाषणे करू लागतात. शाळेची नोकरीही सोडून देतात.बिमला मॅडमच्या निवडणुक प्रचारात तर ते आघाडीवर रहातात. निवडणुकीत विजयी झाल्यावर बिमला मॅडम पी.टी. सरांना शिक्षण खात्यात विशेष अधिकारी म्हणून नेमणूक देतात. टॉलिंगंज सारख्या श्रीमंती वस्तीत रहायला घर, गाडी असा सगळा मानमरातब आपोआपच पी.टी. सरांना मिळतो. निवडून आल्यावर बिमला मॅडम आपली लोकप्रियता अधिक वाढावी म्हणून बरेच दिवस चाललेली जीवनविरूद्धची केस निकालात काढायचे ठरवतात. जीवनने केलेला दयेचा अर्ज नामंजुर व्हावा यासाठी पी.टी. सरांनी विशेष प्रयत्न कारावेत असे बिमला मॅडम सुचवतात. पी.टी. सर तत्परतेने हे काम करतात. जीवनचे वकिल गोविंद यांनाच त्यासाठी ते भरीला घालतात.
जीवनला तिच्यावरील गुन्हा शाबित झाल्यापासून आणि तिला फाशीची शिक्षा सुनावली गेल्यापासून एकटीला एका तळमजल्यावरील कोठडीत ठेवलेले असते. अत्यंत घाणेरड्या अशा त्या कोठडीत तिला कोणी दिसत,भेटत नसते. दोन वेळचे निकृष्ट जेवण तेवढे तिला दिले जात असते. जीवन तरीही दयेच्या अर्जाला सकारात्मक न्याय मिळेल, पूर्णेंदुने प्रसिद्ध केलेल्या आपल्या कहाणीने लोकांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल, लव्हलीने दिलेल्या साक्षीने आपले निष्पापपण सिद्ध होईल या अंधुक आशेवर जगत असते. तिच्या आईला भेटायचीही तिला आता परवानगी नसते. आणि अखेर गोविंद तिला दयेचा अर्ज नामंजुर झाल्याची खबर देतो.जीवन तुटून पडते. शेवटी तरी आईला भेटता यावे असे तिला वाटते. पण तुरूंगाधिकारी तेवढीही इच्छा पूर्ण करत नाहीत. पहाटेच्या वेळी तिला उठवले जाते, आंघोळ करून फाशीच्या वेदीकडे नेले जाते. आणि फाशी दिले जाते. आपण आता आपल्या आईच्या स्वप्नांत जगू , तिची माफी मागू, तिच्या प्रेमाची परतफेड तर आपण करू शकलो नाही पण तिचे तिच्या स्वप्नात जाऊन सांत्वन करू असे अखेरच्या क्षणी जीवन मनातल्या मनात म्हणत असते. आई जेवण करत असताना बाजूच्या झाडाच्या पानांतून आपण सळसळू, ती वाटेने जात असताना तिला सावली देणारा ढग आपण होऊ, पाऊस येणार आहे , खोलीत पाणी भरणार आहे याची सूचना देऊन सावध करणारा वीजेचा कडकडाट आपण होऊ , आई पहाटे बाजारातून परतेल तेव्हा तिच्या पाऊलखुणा आपण होऊ असे जीवनला वाटते.जीवनचे आयुष्य तरूण वयातच संपून जाते, तिच्या आई-वडिलांचा एकमेव ठेवा हरपतो. दूर दिल्लीत काही विद्यार्थी या घटनेचा निषेध नोंदवतात.
पी.टी. सरांचा राजकीय उत्कर्ष सुरू रहाणार असतो.या वाक्यापाशी कादंबरी संपते.
अ बर्निंग या कादंबरीची कथासूत्रे थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१ ) सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जगण्याचे, अस्तित्वाचे संघर्ष दाखवणे हे ‘अ बर्निंग’ या कादंबरीचे प्राथमिक कथासूत्र म्हणता येईल. सर्वसामान्यांना आपल्या जगण्याला अर्थ द्यायचा असतो, एक ओळख, प्रतिष्ठा हवी असते.पण सभोवतीची परिस्थिती सर्वांना समान संधी देत नाही, कित्येकांकडे क्षमता असूनही त्यांना हवी तशी ओळख मिळवता येत नाही.त्याला कारण कधी त्यांची गरीबी हे असते तर कधी त्यांचा धर्म, त्यांची लैंगिक ओळख हेही त्याचे कारण ठरते. कधीकधी ही माणसे दिशाभूल होऊन भरकटतात. आपली निष्पापता ते व्यवस्थेसमोर सिद्ध करू शकत नाहीत. जनतेच्या नजरेतून उतरतात, त्यांच्या रोषाला कारण ठरतात. एका अर्थाने ही माणसे जणू जळत रहातात, त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते.कादंबरीचे शीर्षक बर्निंग हे एका बाजूला एका रेल्वेच्या डब्यांचे पेटणे आहे पण त्याबरोबर ते जीवनसारख्या सामान्य मुलीच्या आयुष्याची फरपट आणि राखरांगोळी दाखवणारे आहे.

२) क्वचित यापैकी लव्हलीसारख्या एखाद्याला त्याच्या क्षमतेआधारे संधी मिळतेही पण कित्येकवेळा पी.टी. सरांसारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या आकांक्षाचा, भौतिक संपत्तीच्या हव्यासाचा गैरफायदाच राजकीय नेते घेतात आणि त्यातून निर्ढावलेली कार्यकर्त्यांची फौज तयार होते.काहींना त्यातून लाभाची पदेही मिळून जातात.पण ही एकेकाळी प्रामाणिक असलेली माणसे संपून तिथे स्वार्थी ,ढोंगी अधिकारी तयार होतात हे कादंबरीतून ठळक होते.
३) लव्हलीसारख्या तृतीयपंथीय व्यक्तिरेखेचे रोजचे जगणे किती कष्टप्रद, अपमानास्पद आहे हे दाखवणे हे कादंबरीचे एक कथासूत्र आहे. लव्हलीचे बालपणापासूनच घरापासून दुरावणे, तिच्या हिजडा गुरू अर्जुनी मा आणि अन्य भगिनी विशेषतः रागिणीबरोबर असलेले तिचे प्रेमाचे नाते. त्यांनी लव्हलीला कायम दिलेली साथ या गोष्टीही लेखिका दाखवते. एकूणच तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन किती अन्यायकारक आहे हे लेखिकेला ठळक करायचे आहे.
४) जीवन, लव्हली आणि पी.टी. सर या तिघांमध्ये पी.टी. सरांची आर्थिक परिस्थिती सगळ्यात चांगली पण त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या आकांक्षा कितीतरी अधिक आहेत. एकदा पैशाची चटक लागल्यावर मूळचा प्रामाणिक माणूस किती खोटेपणा करू लागतो, निर्ढावलेला,स्वतःच्या स्वार्थासाठी संवेदनशून्य बनत जातो याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे पी.टी. सर आहेत. अर्थात त्यांना अशाप्रकारे खोटेपणा करायला भाग पाडणारे राजकीय नेते हे किती संवेदनशून्य असू शकतात तेही यात स्पष्ट होते.एकूणच मानवता, प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा या मूल्यांची होत चाललेली राखरांगोळी देखील अ बर्निंग या कादंबरीला दाखवायची आहे.
५) प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्याच्यामुळे फसणारी तरूण पिढी हा एक मुद्दाही कथासूत्रातून अनुषंगाने पुढे येतो. जनमत पेटवणारे, भडकवणारे, विकले गेलेले पत्रकार हा देखील एक मुद्दा सामोरा येतो.
६) जीवन, लव्हली आणि पी.टी. सर यांच्या कहाण्या उलगडताना मध्यांतर म्हणून काही छोट्या घटनाही लेखिकेने नोंदवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जीवनचं बालपण ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणची त्यांची वस्ती उखडून काढणारे लोकच हायवेवर उभे राहून ट्रकस अडवतात आणि त्यातून गोमांस नेले जात आहे का तपासतात, ड्रायव्हरवर संशय घेतात. पी.टी. सरांच्या एका भाषणाच्या वेळी तर गावातील मुस्लीम माणसाला घरात गोमांस आहे या संशयावरून मारलेही जाते. नंतर कळते की तसे काही त्याच्या घरात नव्हतेच.एका प्रसंगात लव्हलीचा अभिनय वर्गातला मित्र ब्रिजेश जो इलेक्ट्रीकची कामे करतो आणि त्याचा रंगाचे काम करणारा मित्र राजू एका नवीन उघडलेल्या मॉलमध्ये जातात तेव्हा दारवान त्यांच्याकडून पन्नास रूपये प्रवेश फी मागतो. त्यांच्या पुढे असणाऱ्या गोऱ्या, लठ्ठ बाईकडून त्याने प्रवेश फी घेतलेली नसते हे दाखवल्यावरही दारवान आपली मागणी सोडत नाही. नियम आहे असे सांगत रहातो. नियम नेमका काय ? गरीब दिसणाऱ्या लोकांकडून मॉलमध्ये प्रवेशासाठी पैसे घ्यायचे ?का केला असेला हा नियम ..गरीबांना प्रवेशापासून वंचित ठेवायलाच ना ? असा प्रश्न लेखिका वाचकांच्या मनात उभा करते.तसाच आणखी एक प्रसंग बिमला पाल या राजकीय नेत्या असणाऱ्या बाईच्या सहकाऱ्याबाबतही घडतो. तो मुस्लिम आहे. त्याचे घर तो घरात नसताना फोडले गेले आहे. आई,लहान मुले सगळे रस्त्यावर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर उपकार केल्यासारखे त्यांना विस्थापितांसाठीच्या वसाहतीत ठेवले आहे. काही वर्षांनंतर अचानक ती विस्थापितांची वस्तीही सरकारला खुपू लागते आणि ती तोडली जाते. मग कुठे तरी एक रिकामा प्लॉट आहे , तुम्ही तो घ्या, स्वतःचे घर बांधा, वीज, पाणी सगळे मिळेल असे आश्वासन दिल्यावर हा माणूस पैसे गुंतवतो. पण प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर त्याला कळते की आपल्याला दाखवलेली जागा आणि आता ज्या जागेचे आपण मालक आहोत ती जागा वेगळीच आहे. आपण मालक म्हणून विकत घेतलेली जागा वादग्रस्त आहे, आपण हेतूतः फसवले गेलो आहोत.एका केसमध्ये पी.टी. सर खोटी साक्ष देतात की त्यांनी एक बुटाचा जोड आठशे रूपयांना विकत घेतला होता आणि दोन दिवसांत तो खराब झाला. गुन्हेगार आहे बुटांची वहातुक करणारा ट्रक ड्रायव्हर आझाद. आझाद परोपरीने सांगतो की तो फक्त बुट आणून दुकानदारांना देतो. तो बुट तयार करत नाही. पण न्यायाधीश काहीही ऐकून न घेता त्याला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावतात. आझादकडे तेवढे पैसे नसल्याने त्याला तुरूंगात डांबतात.लेखिका या छोट्या छोट्या प्रसंगातून सभोवती घडणारा अन्याय, विषमता, क्रौर्य दाखवत रहाते.
अशाप्रकारे जीवन, लव्हली आणि पी.टी. सरांच्या परस्पर समांतर आणि कधी एकमेकांना छेद देणाऱ्या कहाण्या उलगडत असताना एकूणच आपल्या समाजातील गरीबांवरील,अल्पसंख्याकांवरील अन्याय, विषमता, अत्याचार, फसवणूक, व्यवस्थांची, प्रसारमाध्यमांची व राजकीय नेत्यांची संवेदनशून्यता , प्रसंगी दिशाभूल झालेली, समाजकंटक बनलेली तरूणाई असे अनेक मुद्दे कादंबरीकार मेघा मजुमदार ‘अ बर्निंग’ या कादंबरीतून वाचकांसमोर आणते आणि त्यांना अस्वस्थ करते, वास्तवाची प्रखर जाणीव करून देते.
तुम्हाला ‘अ बर्निंग’ या कादंबरीचे कथानक आवडले का ?एखाद्या चित्रपटासारखे हे कथानक गतीमान आणि तरीही समाजाचे सखोल वास्तवचित्रण करणारे वाटते. तुम्ही मूळ कादंबरी जरूर वाचा. पुढील ब्लॉगमध्ये या कादंबरीचा कथनाच्या अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
-गीता मांजरेकर
________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा