मेघा मुझुमदार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९८७ ला कोलकाता शहरात झाला.शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता शहरात घेऊन मेघा यांनी पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील हार्वर्ड आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठांतून घेतले.सामाजिक मानववंशशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबच ऑडियो फाईल जोडली आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मेघा न्युयॉर्क येथील ‘कॅटापुल्ट बुक्स’ या  प्रकाशनसंस्थेत संपादक म्हणून काम करू लागल्या.नोकरी करत असतानाच २०२० मध्ये त्यांनी त्यांची पहिली कादंबरी ‘अ बर्निंग’ ही लिहून पूर्ण केली.या कादंबरीने मेघा यांना एक कादंबरीकार म्हणून मान्यता मिळवून दिली कारण याच कादंबरीमुळे त्यांना भारतातील साहित्य अकादमीचा युवा लेखक पुरस्कार मिळाला. ‘अ बर्निंग’ ही कादंबरी ‘न्यु यॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राने ‘बेस्ट सेलर’ ठरवली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्रात मेघा मुझुमदार यांच्या ‘अ बर्निंग’  कादंबरीवर रॉन चार्ल्स यांनी जे परीक्षण लिहिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की मेघा यांनी भारतीय महानगरातील परिघावर रहाणाऱ्या तीन व्यक्तिरेखांच्या मनातील आशा-आकांक्षा आणि भय याचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे. समकालीन भारतातील दहशतवाद आणि राजकीय वास्तवावर प्रकाशझोत टाकणारी अशी ही कादंबरी आहे. ‘अ बर्निंग’ या कादंबरीची निवड ‘अन्ड्रु कार्नेजी मेडल’ या पुरस्कारासाठी झाली होती. तसेच ‘व्हायटिंग अवॉर्ड’ हा पुरस्कारही या कादंबरीला मिळाला.कादंबरीसाठीच्या नॅशनल बुक अवॉर्डच्या निवड यादीतही ‘अ बर्निंग’ या कादंबरीचा समावेश होता. अमिताव घोष या नावाजलेल्या इंग्रजी कादंबरीकाराने पहिल्याच कादंबरीत छाप पाडणारी लेखिका अशा शब्दांत मेघा मुझुमदार यांचा गौरव केला आहे.

२०२१मध्ये ‘कॅटापुल्ट बुक्स’ या प्रकाशनसंस्थेत मेघा मुझुमदार प्रमुख संपादक झाल्या. २०२२ मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि लेखनावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.मेघा मुझुमदार यांच्या लेखनशैलीवर झुंपा लाहिरी आणि या ग्यासी यांच्या शैलीचा प्रभाव आहे असे मानले जाते.

२०२५ मध्ये मेघा मुझुमदार यांची दुसरी कादंबरी ‘अ गार्डियन ऍंड अ थिफ’ ही प्रकाशित झाली. ही कादंबरीही कादंबरीसाठीच्या नॅशनल बुक अवॉर्डच्या निवड यादीत होती.या कादंबरीतून कलकत्ता शहरातील एक तरूण विवाहीत मुलगी आपल्या छोट्या बाळासह नवऱ्याकडे अमेरिकेत जायला निघाली असताना तिचा पासपोर्ट, व्हिसा विमानतळावरून चोरीला जातो आणि तो कोणी चोरला असेल याचा शोध घेत असताना त्या चोराची कहाणी तिला कशी कळत जाते त्याबद्दलचे कथानक उलगडते.

पुढील ब्लॉगमध्ये आपण मेघा मुझुमदार यांच्य ‘अ बर्निंग’ या कादंबरीच्या कथानकाचा व कथासूत्रांचा परिचय करून घेणार आहोत.

तुम्हा सर्व वाचक मित्रांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या २०२६ च्या शुभेच्छा ! येणाऱ्या वर्षात इंग्रजीतून कादंबऱ्या लिहिणाऱ्या भारतीय लेखकांची व त्यांच्या कादंबऱ्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. तुम्हा वाचक मित्रांचा असाच प्रतिसाद त्याही ब्लॉग्जना मिळेल अशी आशा करते. आभार !

  • गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा