या पूर्वीच्या दोन ब्लॉग्जमध्ये आपण चित्रा बॅनर्जी दिवाकारूणी यांच्या ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचा सविस्तर परिचय करून घेतला. आज आपण त्यांच्याच ‘सिस्टर ऑफ माय हार्ट’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे थोडक्यात समजून घेऊ.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.

‘सिस्टर ऑफ माय हार्ट’ ही चित्रा बॅनर्जी दिवाकारूणी यांनी लिहिलेली कादंबरी १९९९मध्ये प्रकाशित झालेली आहे. ३४७ पृष्ठांची या कादंबरीचे स्वरूप घटनाप्रधान आणि  स्त्री केंद्री आहे असे म्हणता येईल. अंजू आणि सुधा या दोन बहिणींचे परस्परांत गुंतलेले  आयुष्यपट या कादंबरीत उलगडत जातात. या कादंबरीचे कथानक १९६०-७० च्या दशकांतील हिंदी चित्रपटासारखे सनसनाटी घटनांनी भरलेले आहे. ‘मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीत प्रामुख्याने आढळलेला जादुई वास्तववाद याही कादंबरीत अधूनमधून दिसतो.

‘सिस्टर ऑफ माय हार्टस’ या कादंबरीतील कथानकाचा अवकाश कलकत्ता शहर, बर्धमान हे पश्चिम बंगाल मधील छोटे नगर आणि अमेरिकेतील एक शहर असा बदलता आहे. कथानकातून जाणवणारा कालखंड १९७०-८० च्या दशकातील आहे.कादंबरीचे कथानक प्रामुख्याने एकरेषीय आहे पण अधूनमधून ते भूतकाळात जाते.या कादंबरीचे कथन प्रथमपुरूषी आहे आणि अंजू व सुधा असे दोन कथक आळीपाळीने स्वतःची कथा उलगडत जातात असे दिसते.

कथनाच्या सोयीसाठी लेखिकेने कथानक दोन भागात विभागले आहे. एका भागाचे नाव ‘दी प्रिन्सेस इन दी पॅलेस ऑफ स्नेक्स’ असे आहे तर दुसऱ्या भागाचे नाव ‘दी क्विन ऑफ स्वोर्डस’ असे आहे.ही नावे लक्षात घेतली तर लेखिकेला ही कादंबरी बसुधा या एकाच बहिणीचा आयुष्यपट केंद्रस्थानी ठेवून मांडायची आहे असे जाणवते. कथानकाच्या पहिल्या विभागात बसुधा ही एक स्वप्नाळू, भाबडी तरूण मुलगी आहे.ती एखाद्या राजकन्येसारखी सुंदर आहे पण  जणू संकटांच्या सापांनी घेरलेली आहे.या संकटांतून तिला बाहेर काढणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तिची तथाकथित चुलत बहीण अंजू ही आहे.अंजूच्या लग्नात अडथळा येऊ नये म्हणून बसुधा तिच्या प्रियकराच्या प्रेमाचा  त्याग करते आणि कलकत्त्यापासून दूर ग्रामीण भागातील स्थळाला होकार देते.

 कथानकाच्या दुसऱ्या भागात बसुधाचे लग्न होऊन ती सासरी आली आहे. इथेही तिच्या वाट्याला संकटे आहेतच.आणि आता अंजू विवाह करून दूर अमेरिकेला गेली आहे. पण तरीही अंजू- बसुधा यांना परस्परांच्या संकटांची चाहूल जणू स्वप्नांतून जाणवते.बसुधाला संकटांतून बाहेर पडण्याचा मार्ग अंजू सुचवते.बसुधा अमेरिकेत आली तर पुन्हा एकदा आपण कोणत्याही संकटात तिची साथ देऊ असे अंजूला वाटते. बसुधाने अमेरिकेत येता यावे म्हणून अंजू नवऱ्याला न सांगताच एक नोकरी पत्करते. बसुधाच्या विमान प्रवासाचा खर्च आपण केला तर ती अमेरिकेत येऊ शकेल असे अंजूला वाटते. म्हणून ती गरोदर असतानाही काम करत राहते. दुर्दैवाने तिचा गर्भपात होतो.बसुधा माहेरी परत येते आणि झाशीच्या राणीप्रमाणे आता आपल्याला स्वतःच्या संकटांशी झगडलं पाहिजे, कणखर बनले पाहिजे हे जाणून स्वतःच्या हिंमतीने उभी राहू पहाते.अखेर आपल्या लहानग्या मुलीला घेऊन ती अंजूकडे -अमेरिकेत पोहोचते. प्रवास करत असतानाच आपल्या जन्मदात्या वडिलांचे रहस्य तिला कळते.त्यामुळे तिचे मन करूणेने भरून येते. बसुधासाठी अंजूने जय्यत तयारी करून ठेवली आहे. बसुधाने आता कायमच अमेरिकेत रहावे असे अंजूला वाटते आहे. मात्र बसुधा कायमची अमेरिकेत राहील का ?की तिला परत भारतात जावेसे वाटेल ? या प्रश्नाचे उत्तर मात्र कथानकात मिळत नाही.

कथानकात थोडे खोलात जाऊ. ‘सिस्टर ऑफ माय हार्ट’ या कादंबरीच्या कथानकाचा आरंभ होतो, कलकत्त्यातील प्रतिष्ठीत अशा चॅटर्जी कुटुंबाच्या जुन्या वाड्यात. या वाड्यात गौरी , नलिनी या दोन अकाली वैधव्य आलेल्या मध्यमवयीन स्त्रिया , त्यांच्या अंजली,बसुधा या लहान मुली आणि त्यांची वृद्ध बालविधवा नणंद पिशी मॉं असे रहात आहेत. घरात कामाला रामूची आई आहे आणि दरवाज्याशी उभ्या गाडीचा ड्रायव्हर सिंग घराच्या आवारातच रहात आहे.

घर चालवण्याची जबाबदारी गौरी मॉं यांनी घेतली आहे. त्या चॅटर्जी कुटुंबाचे वडिलोपार्जीत पुस्तकांचे दुकान चालवून घरखर्च भागवत आहेत. पण घरातील दोन पुरूष बिजॉय आणि गोपाळ यांच्या अकाली गूढ मृत्यूच्या धक्क्यातून चॅटर्जी कुटुंब सावरलेले नाही.  हे दोन पुरूष अमुल्य रत्ने शोधण्यासाठी सुंदरबनच्या अरण्यातील एका गुहेत गेले असता,  तिथून परत आली ती त्यांच्या मृत्यूची खबर. त्यांचे मृतदेह ओळखण्यापलीकडचे असल्याने पोलिसांना सुंदरबनमध्येच त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे सांगितले गेले होते. घरातील या दोन पुरूषांचा मृत्यू झाला तेव्हा त्या दोघांच्याही पत्नी अनुक्रमे गौरी आणि नलिनी या गरोदर होत्या.दोघींनी कालांतराने अंजली व बसुधा या दोन मुलींना जन्म दिला आहे.मुलींना वाढवण्याची जबाबदारी अंगावर पडल्याने गौरी मॉंनी दुकानाचा कारभार सांभाळायला सुरवात केली होती. नलिनी आणि पिशी मॉं या घरातील स्वयंपाक-पाणी व अन्य गोष्टी सांभाळत होत्या.गौरी मॉं चा स्वभाव विवेकी,करारी होता तर नलिनी मात्र कायम असंतुष्ट, तुलना करणारी बाई होती. पिशी मॉं कष्टाळू,भावाने त्याच्या कुटुंबात आपल्याला सामावून घेतले म्हणून कायम कृतज्ञ असलेली स्त्री होती.

अंजली व बसुधा या लहानपणापासूनच एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.एकीने चूक करायची नी दुसरीने तिला पाठीशी घालायचे नी ओरडा खायचा ही सवय त्या दोघींनाही आहे. शाळेत त्यांना वेगळे बसवण्याचा प्रयत्न शिक्षक करतात पण तरी त्या दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत.इतर मैत्रिणी त्यांना चिडवतात, नलिनी मॉं तर बसुधा अंजलीमुळे बिघडते आहे असा कांगावा करते पण तरीही या दोन बहिणींना वेगळे करणे कुणालाच शक्य होत नाही.रोज सकाळी सिंग ड्रायव्हर त्यांना गाडीतून शाळेत सोडतो आणि संध्याकाळी त्यांना गाडीतून घरी घेऊन येतो. उर्वरीत वेळ दोघी मुली मोठ्ठ्या वाड्यात हुंदडण्यात घालवतात. विशेषतः घराची गच्ची, सभोवतीची बाग या त्यांच्यासाठी आवडत्या जागा आहेत.

खरं तर अंजली आणि बसुधा या दोघींच्या आवडीनिवडी,स्वभावप्रकृती भिन्न आहेत.अंजलीला पुस्तके अतिशय आवडतात. ती तासन तास पुस्तके वाचत बसते. तर बसुधाला विणकाम, भरतकाम अधिक आवडते. पण दोघींचा एक समान छंद म्हणजे पिशी मॉंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे. या गोष्टी राजकुमार-राजकन्येच्या,विषारी सापांच्या, राक्षसांच्या,जादूगारीच्या आहेत. दोघी मुली पिशी मॉंच्या गोष्टीत रंगून जातात आणि गोष्टीतील वर्णने ऐकताना कल्पनेत हरवून जातात.मग त्या स्वतःही अशा गोष्टी रचून एकमेकींना सांगत रहातात. त्यांच्या गोष्टीत बसुधा ही नेहमी राजकन्या असते आणि अंजली ही तिला संकटांतून वाचवणारा राजपुत्र बनलेली असते.स्वभवतःच बसुधा नाजूक ,भोळी-भाबडी आहे तर अंजली धाडसी, शोधक, व्यवहारी, तर्कशुद्ध विचार करणारी आहे.त्यामुळे त्या एकमेकींना पूरक होऊन जातात. बसुधाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे असेच अंजलीला वाटू लागते.बसुधाला पिशी मॉंकडून आपल्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, आपले काका कसे होते याबद्दल जाणून घेण्यात अधिक रस आहे.ती पिशी मॉंच्या खनपटीला बसून आपल्या वडिलांबद्दल माहिती तिला सांगायला लावते. ती माहिती ऐकून मात्र ती दुःखी होते. तिला अपराधी वाटू लागते.

बसुधाला पिशी मॉंकडून कळते की तिचे वडील गोपाळ हे खरं तर चॅटर्जी कुटुंबाचा भागच नव्हते. तरूण असताना फाळणीच्या दिवसांत ते बांगला देशातील खुलना प्रांतातून कलकत्त्यात हे सांगत आले होते की चॅटर्जींचा एक चुलता जो भांडून घर सोडून निघून गेला होता त्याने खुलन्यात जम बसवला होता आणि आपण त्याचा मुलगा आहोत. फाळणीत खुलन्यातला वाडा जमिनदोस्त झाला, घरातील माणसे मारली गेली पण तो आणि त्याची नवविवाहित बायको तेवढे वाचले. वडिलांकडून कलकत्त्यातील मूळ घराबद्दल ऐकले असल्याने आपण इथे आलो आहोत असे गोपाळने सांगितले होते. अंजलीचे वडील बिजॉय हे प्रेमळ असल्याने त्यांनी गोपाळवर विश्वास ठेवून घरात त्याला समावून घेतले होते. लौकरच गोपाळ घरातला झाला होता. बिजॉय त्याच्यावर विश्वास ठेवू लागले होते. पण कालांतराने गोपाळ काही काम करत नाही, घरातील आर्थिक भार उचलत नाही हे त्यांना खटकले होते. गोपाळची बायको नलिनी दिसायला सुंदर असली तरी तिलाही फारशी रितभात माहीत नाही हेही बिजॉय,पिशी मॉं यांना खटकले होते. खुलन्यातील आपल्या परिचितांकडून गोपाळची माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना कळले होते की खुलन्यातील त्यांच्या चुलत्याला मुलगाच नव्हता. केवळ मुलीच होत्या. फाळणीत ते सगळे पळाले असले तरी नंतर त्यांच्या मुलीने वाडा ताब्यात घेतला होता आणि ती सहकुटुंब तिथेच राहते होती.गोपाळने आपल्याला फसवले आहे हे बिजॉयच्या लक्षात आले होते. गोपाळबद्दलची खरी माहिती त्यांनी आपल्या बहिणीला म्हणजे पिशी मॉंना दिली होती पण इतर कोणालाही सांगितली नव्हती. योग्य वेळी आपण गोपाळला त्याबद्दल विचारू असे त्यांनी ठरवले होते. दरम्यान गोपाळ बायकोची भुणभुण सहन न होऊन काहीतरी काम शोधायला जो घराबाहेर पडला होता तो अचानक काही महिन्यांनी परतला होता. त्याने सुंदरबनमध्ये आपल्याला कशी एक रत्नांनी भरलेली गुहा पहायला मिळाली हे सांगून तिथून आणलेले एक रत्न सर्वांना दाखवले होते. बिजॉयने पुस्तकांच्या दुकानावर झालेले कर्ज फेडायचे असेल तर आपल्याबरोबर सुंदरबनमधील रत्नांची गुहा पहायला यावे आणि तिथून आणलेली रत्न विकून कर्ज फेडावे असा मार्ग गोपाळ सुचवतो. बिजॉय आणि गोपाळ आपल्या बायका गरोदर असताना आणि त्यांनी दोघांनाही सुंदरबनात जाऊ नका असे विनवले असूनही हट्टाने सुंदरबनात जातात. कालांतराने त्यांच्या मृत्यूची खबरच येऊन थडकलेली असते.पिशी मॉंकडून आपल्या वडिलांबद्दलची ही माहिती ऐकल्यावर बसुधाला फार वाईट वाटते. आपल्या वडिलांमुळेच अंजूचे वडिलही मरण पावले किंवा आपल्या वडिलांनीच अंजूच्या वडिलांची हत्या केली असावी असे तिला वाटते.शिवाय आपण चॅटर्जींच्या घरात केवळ घुसखोर आहोत, मूळचे आपले काही नाते नाही हे कळून तर ती खूपच अस्वस्थ होते. पिशी मॉंने ताकीद दिलेली असल्याने अगदी अंजूलाही ती आपल्या वडिलांबद्दलचे सत्य सांगत नाही.

तरूण होत असताना अंजली आणि बसुधा दोघींनाही आपल्या घरातील तिघी बायकांनी घातलेले निर्बंध जाचक वाटू लागतात. आपल्याला तर कायम शाळा ते घर आणि घर ते शाळा एवढेच वावरता येते याचा त्यांना राग येतो.एके दिवशी अंजली शाळेतून मधल्या सुट्टीतच पळून जायचे आणि शहरात गाजणारा ‘पाकिजा’ हा चित्रपट पहायचा असा बेत करते. बसुधा अंजलीसोबत घाबरत घाबरत चित्रपट पहायला जाते. शाळेचा युनिफॉर्म नको म्हणून अंजली दुकानातून दोघींसाठी सलवार खमिस विकत घेते. वाढदिवसाच्या दिवशी आईने दिलेले पैसे तिने जपून ठेवलेले असतात.दोघी थिएटरमध्ये पोहोचतात आणि आपल्या जागा पकडून बसतात. थोड्या वेळाने एक तरूण मुलगा येऊन बसुधाच्या शेजारच्या सिटवर बसतो. बसुधाने शेजारच्या रिकाम्या सिटवर स्वतःची बॅग ठेवलेली असते. तो मुलगा तिला बॅग उचलण्याची विनंती करतो आणि त्यानिमित्ताने दोघे परस्परांकडे पहातात, दोन शब्द बोलतात. बसुधा त्या मुलाच्या सभ्य वागण्याने प्रभावीत होते. संपूर्ण चित्रपट पाहताना तिची नजर वळून वळून त्या शेजारच्या मुलाकडे जात रहाते. चित्रपट संपल्यावर तो मुलगा आपले नाव अशोक घोष आहे असे तिला सांगून तिचे नाव विचारतो.बसुधाने आपले नाव सांगू नये असे वाटून अंजली तिला दूर खेचते पण तरीही बसुधा आपले नाव अशोकला सांगतेच.

चित्रपट पहायला आलेली  नलिनीची मैत्रीण या दोन मुलींना पहाते आणि शाळा चुकवून त्या दोघी चित्रपट पाहात आहेत हे ओळखून त्यांना स्वतःच पकडून घरी नेते.दोघींनाही नलिनी मॉं कडून खूप ओरडा खावा लागतो. दुसऱ्या दिवसापासून तर रामुची आईदेखील गाडीतून त्यांना शाळेत सोडायला येऊ लागते.एवढा पहारा असूनही बसुधाला गाडीतून जाताना अशोक दिसतो.ती हळूच त्याला हात करते. गाडी चालवणाऱ्या सिंग यांच्या नजरेतून ते सुटत नाही. अंजलीलाही बसुधातील बदल जाणवतो. ती सुरवातीला तिला अशोकपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. पण बसुधा अशोकवरील प्रेमाने जणू वेडीच झाली आहे. आपण लग्न करायचे तर फक्त अशोकशीच असे तिला वाटते आहे. अशोकनेही अचनाक सिग्नलवर तिला गाठून आपली अंगठी तिला दिली आहे.
अचानक एके रात्री गौरी मॉंच्या छातीत दुखू लागते. डॉक्टर बोलावले जातात. ते सगळी तपासणी करून गौरी मॉंना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला आहे आणि यापुढे त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे असे सांगतात.गौरी मॉं हतबल होतात.खरं तर, हृदयाची शस्त्रक्रिया करून त्यांना दीर्घायुष्य मिळू शकणार आहे. पण तेवढे पैसे त्यांच्याकडे नाहीत आणि शस्त्रक्रिया झालेले लोक लौकर दगावलेले त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्या घाबरल्या आहेत. आपल्या हयातीत अंजली आणि बसुधा दोघींची लग्न झाली पाहिजेत असे त्यांना वाटते.दोघी मुलींचे शालेय शिक्षण संपल्यावर पुढील शिक्षण , कॉलेजमध्ये जाणे वगैरे स्वप्ने न पाहता मुलींनी विवाहाला तयार व्हावे असा निर्णय गौरी मॉं घेतात. त्यामुळे शिक्षणाची ओढ असणारी अंजली हिरमुसते. पण गौरी मॉं तिला लग्नानंतरही शिकता येईल अशी समजुत घालून शांत करतात. बसुधाला पुढे शिकण्याची इच्छा नाही. पण विणकाम, भरतकामाचे काम लोकांना करून देऊन चार पैसे मिळवू शकू असे तिला वाटते.

अंजली व बसुधासाठी स्थळे शोधली जाऊ लागतात. बसुधा अशोकला निरोप पाठवते की त्यानेही आपली माहिती तिच्या घरी पाठवावी.तशी तो स्वतःची माहिती पाठवतोही. पण तो घोष म्हणजे आपल्या जातीचा नाही असे ठरवून गौरी मॉं, नलिनी मॉं यांनी त्याच्या अर्जाकडे दुर्लक्ष केलेले असते.बसुधाला हे अशोकडून कळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. तिचे लग्न रमेश सन्याल या रेल्वेतील इंजिनीयरशी ठरवले गेलेले असते. अंजूला हे कळल्यावर असे वाटते की नेहमीप्रमाणे आपण या संकटातून बसुधाला वाचवावे. बसुधाचे अशोकवर प्रेम असल्याचे आपल्या आईला सांगून रमेश सन्यालशी बसुधाचे ठरलेले लग्न रोखावे पण बसुधाच अंजूला तसे करू देत नाही.अशोक चोरून बसुधाला भेटतो आणि आपण पळून जाऊन लग्न करू असे तिला सुचवतो. बसुधा या गोष्टीला तयारही होते. सिंग ड्रायव्हर तिला पळून जायला मदत करणार असतो.पण त्याच दिवशी अंजूचे लग्न ठरते. तिचा होणारा नवरा सुनील अमेरिकेत नोकरी करणारा असतो,अंजलीलाही तो आवडलेला असतो. पण सुनीलचे  वडील कसे अहंकारी आहेत हे बसुधा पाहते. विशेषतः जर त्यांना कळले की चॅटर्जींच्या घरातील मुलींनी काही अनैतिक केले आहे तर ते अंजलीचे लग्न सुनीलशी होऊ देणार नाहीत हे बसुधाच्या लक्षात येते. आपण अशोकबरोबर पळून गेलो तर अंजलीचे लग्न मोडेल याचे भान बसुधाला येते. शिवाय चॅटर्जी कुटुंबाने आपल्याला कोणतेही नाते नसताना इतकी वर्षे सांभाळले आहे त्या  उपकारांची  परतफेड आपण अशोकच्या प्रेमाचा त्याग करून करावी असे बसुधाला तीव्रपणे वाटते. अंजलीला बसुधाच्या मनात काय चालू आहे हे कळत नाही. अखेरीस बसुधाचे रमेश सन्यालशी आणि अंजलीचे सुनीलशी एकाच मांडवात लग्न होते. लग्नाच्या आहेरात एका पाकिटावर आपल्या वडिलांचे गोपाळचे नाव पाहून बसुधा चक्रावते. आपले वडील हयात आहेत हे कळणे तिच्यासाठी आनंददायक नसते. जर ते हयात आहेत आणि स्वतःची ओळख दडवून कलकत्त्यात रहात आहेत तर त्यांनी नक्कीच काहीतरी चुकीची गोष्ट केली असणार असा अर्थ बसुधा लावते.त्या आहेराच्या पाकिटातील सगळी रक्कम कालीघाटावरील गोरगरीबांना वाटून टाकावी म्हणून ती पिशी मॉंना देते आणि त्याबद्दल इतर कोणालाही कळू देत नाही.

अंजली व बसुधाच्या लग्नाआधी सुनील बसुधाला जेव्हा पहातो तेव्हा त्यापूर्वी ऐवढी सुंदर मुलगी त्याने कधीच पाहिलेली नाही असे तो मोकळेपणाने बोलतो. पण अंजलीला ते आवडत नाही. तिच्या मनात कधी नाही तो बसुधाबद्दल मत्सर निर्माण होतो. बसुधालाही ते जाणवते. प्रत्य़क्ष लग्न लागत असतानाही सुनील बसुधाकडे पाहतो तेव्हा त्याच्या नजरेत बसुधाबद्दल आकर्षण आहे असे अंजलीला दिसते आणि ती बसुधावर चिडते.

अंजली आणि बसुधाच्या लग्नाच्या प्रसंग या घटनेपाशी ‘सिस्टर ऑफ माय हार्ट’ या कादंबरीचा पहिला विभाग संपतो.दुसऱ्या विभागात सुरूवातीला या दोघी नवविवाहित मुलींचे त्यांच्या सासरी जुळवून घेण्याचे चाललेले प्रयत्न वाचकांना कळतात. वसुधाची सासू वरवर फाऱ गोड बोलणारी असली तरी ती नवविवाहीत म्हणून सन्यालांच्या घरी आली असताना तिचा कसा पदोपदी अपमान केला गेला होता हे ती कधीच विसरलेली नाही. तिने पतीच्या अकाली निधनानंतर आपल्या तीन मुलांना शिकवून मोठे केले आहे. घराची घडी बसवली आहे. या गोष्टीचा तिला अहंकार आहे. ती वसुधाला स्वयंपाकघराची सूत्रे सोपवते पण तिजोरीची चावी स्वतःकडेच ठेवते. वसुधाचा नवरा रमेश नोकरीतील कामानिमित्त सतत बाहेरगावी असतो त्यामुळे बसुधाला घरकामात, शिवण टिपणात मन गुंतवणे हाच एकमेव मार्ग आहे. सासूचे वागण्यातले छक्के-पंजे बसुधाला कळतही नाहीत. पण एकदा अमेरिकेला जाण्यापूर्वी अंजू बसुधाला भेटायला येते तेव्हा तिला बसुधाच्या सासूचा खाष्ट स्वभाव खटकतो. बसुधा गप्प बसून हे सहन करते आहे हे अंजूला आवडत नाही. बसुधाची मात्र कोणतीच तक्रार नसते.तिने आहे ते वास्तव स्वीकारलेले असते.

अंजूच्या सासरी तिची सासू गरीब गायीसारखी आहे आणि सासरा अत्यंत अहंकारी आहे. त्याला सगळ्यांनी आपण म्हणू तसे वागावे असे वाटते. एके दिवशी जेवणाच्या टेबलावर अंजूचा सासरा त्याच्या बायकोने मुलाला- सुनीलला खजुराची चटणी करून दिली म्हणून चटणीची वाटी फेकून मारतो हे पाहून अंजू हादरते. सुनीलचे त्याच्या वडिलांशी पटत नाही हेही तिला कळते.  सुनीलला अमेरिकेला आपणच पैसे खर्च करून पाठवले हा उपकार सुनीलने लक्षात ठेवावा असे त्याचा बाप त्याला सुनावतो.सुनील अमेरिकेत दारू पितो, बायकांचे नाद करतो ते आपल्याच पैशांवर असे जेव्हा बाप म्हणतो तेव्हा मात्र सुनील चिडतो.  बापाला ‘तुझी पै न पै परत फेडीन’ असे सुनील सांगतो आणि तडकाफडकी अमेरिकेला निघून जातो. सुनील खरोखरच बाई-बाटलीचा नाद करत असेल तर आपले कसे होणार असे अंजूला वाटते आणि ती घाबरते.अंजूला लौकरच अमेरिकेचा व्हिसा मिळतो. तिथे जाण्यापूर्वी ती बसुधाला भेटून जाते.

अमेरिकेत सुनील आणि अंजू यांचा संसार एका छोट्या अपार्टमेंटमध्ये सुरू होतो.इथे कोणी नोकरचाकर नसल्याने सगळीच कामे स्वतः करावी लागतात. अंजूला कामांची सवय नसल्याने तिची चीडचीड होते. पण सुनील तिला पुढे शिकायला कॉलेज प्रवेश मिळवून देतो, गाडी चालवायला शिकवतो तेव्हा तिला थोडे बरे वाटते. दिवसभर कॉलेज, अभ्यास करून संध्याकाळी घरी येताना सगळा भाजीपाला घेऊन यायचा , मग सुनीलला स्टेशनवरून आणायला परत गाडी घेऊन बाहेर पडायचे आणि त्याला घरी आणल्यावर स्वयंपाक करायचा हे अंजूला खूपच थकवणारे वाटते. सुनील तिला स्वयंपाकात मदत करत असूनही तिच्या तक्रारी सुरूच रहातात.सुनील कधीकधी घरी येत नाही तेव्हा तो नक्कीच दुसऱ्या बाईकडे जात असणार असा संशय अंजूच्या मनात आहे. सुनील पगारातील बरीच रक्कम वडिलांनी केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून पाठवत असल्याने कमी पैशांत घर चालवण्यासाठी करावी लागणारी काटकसरही अंजूला नकोशी वाटते.पैसे पुरत नसल्याने एवढ्यात मुलही परवडणार नाही असे सुनीलचे म्हणणे आहे. अंजूला गर्भनिरोधाची साधने वापरावी लागत आहेत . हे सगळेच तिला त्रासदायक वाटते आहे.पण हे सगळं बोलणार तरी कोणाशी? भारतात गौरी मॉं,पिशी मॉं दोघींशीही हे बोलता येणार नाही हे अंजूला कळते आहे.बसुधाला पत्र ती पाठवत राहते पण पूर्वीसारखे मनातले तिला लिहिता येत नाही. बसुधाची पत्रेही तशीच वरवरची असतात.पण तरीही दोघींना एकमेकींबद्दल काळजी वाटत राहते.

बसुधाच्या लग्नाला चार वर्षे झाली तरी तिला मुल विशेषतः मुलगा झालेला नाही हे तिच्या खाष्ट सासूला खुपते. सासूची नणंद तारिणी जेव्हा तिला पहिला नातू झाला असे सांगून मिरवते तेव्हा तर बसुधाची सासू खूपच अस्वस्थ होते. ती गावातील स्त्रीरोग तज्ज्ञाकडून बसुधाची चाचणी करून घेते. बसुधामध्ये काहीही दोष नाही हे कळूनही, रमेशमध्ये काही दोष असू शकतो हे  स्वीकारायला ती तयार होत नाही.अखेरीस कलकत्त्यातील प्रख्यात डॉक्टरकडे ती बसुधाला घेऊन जाते.तिथे डॉक्टर बसुधामध्ये कोणताही दोष नाही असे म्हणून रमेशची तपासणी करून घ्या असे म्हणत त्या डॉक्टरचा फोन नंबर बसुधाला देतात. बसुधा तो नंबर पाठ करून ठेवते आणि चिठ्ठी सासूच्या हाती लागू नये म्हणून टाकून देते.रमेशला समजावून बसुधा त्याला डॉक्टरी तपासणीसाठी घेऊन जाते. डॉक्टर काही औषधे रमेशला देतात. पण हे सासूला ती सांगू शकत नाही. सासू तिला एका जागृत देवीच्या देवळात व्रत करायला घेऊन जाते. तिथे बसुधाला अनेक स्त्रिया मुल नाही म्हणून कित्येक दिवस व्रत करत देवळातच राहात असलेल्या दिसतात. एका तळ्याच्या मध्यभागी ही जागृत देवी आहे आणि स्त्रियांनी पाण्यातून त्या देवीकडे जाऊन आपले मागणे मागायचे आहे.कित्येक स्त्रियांनी आपले दागिने त्या देवीला वाहिलेले बसुधा पाहते. ती स्वतः मात्र  तिथे आलेल्या एका गरीब, अडाणी बाईला आपली सोन्याची बांगडी देते आणि तिला बांगडी विकून त्या पैशांत शहरात जाऊन स्वतःची व नवऱ्याची तपासणी करून घेण्याचा सल्ला देते.

कालांतराने बसुधा गरोदर होते. सासू तिला फुलासारखी जपू लागते.पण आपल्याला पहिला नातूच हवा असा सासूचा हट्ट आहे.बसुधाला कळत नाही की जर तसे झाले नाही तर सासू आपले काय करेल. सासू बसुधाला गर्भ लिंग चिकित्सा करायला भाग पाटते आणि बसुधाला मुलगी होणार आहे हे कळल्यावर तिने गर्भपात केला पाहिजे असे दडपण आणू लागते. रमेशही त्यावेळी बसुधाची बाजू घेऊ शकत नाही. बसुधा सासूच्या नकळत गावातील पोस्टात जाऊन अंजूला ट्रंककॉल करते.तिथे अंजूही गरोदर आहे. तिला स्वप्नात बसुधावर संकट आल्याचे जाणवले आहे. ती बसुधाला तात्काळ ट्रेन पकडून कलकत्त्याला गौरी मॉं कडे जायला सांगते.बसुधा ते ऐकते.बसुधाची आई नलिनी बसुधाला सासूचे ऐकले पाहिजे असे सांगते पण गौरी मॉं व पिशी मॉं या दोघीही बसुधाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहातात आणि तिला गर्भपात करायची गरज नाही , होणारं मुल आपण वाढवू असं सांगून दिलासा देतात. अर्थातच सासू रमेशला बसुधाला घटस्फोट द्यायला लावते. अशोकला बसुधाविषयी कळून तो तिला भेटायला येतो. आपण परत लग्न करू पण तू होणारी मुलगी काही वर्षे आजीकडे ठेव असे अशोक सांगतो. बसुधाला ते मान्य होत नाही .

बसुधाची परिस्थिती अंजूला कळत असते. विशेषतः भारतात एकट्या स्त्रीने मुलीला वाढवायचे म्हटल्यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया कशा वाईट असतील याची अंजूला कल्पना आहे. त्यामुळे वसुधाने अमेरिकेसारख्या व्यक्तीस्वातंत्र्य देणाऱ्या देशात यावे, इथे तिच्यासारख्या अनेक एकल माता असल्याने तिला कोणाच्याही तिरकस बोलण्याचा सामना करावा लागणार नाही असे अंजूला वाटते. ती आपल्या मनातील ही गोष्ट सुनीलला सांगते. पण सुनीलचे म्हणणे असते की बसुधाला तिच्या संकटातून स्वतःच मार्ग काढू द्यावा. अंजलीने तिचा पत्कर घेऊ नये.अंजलीला मनोमन सुनीलचे म्हणणे पटत नाही. बसुधा आणि तिच्या होणाऱ्या मुलीला अमेरिकेत येण्यासाठीच्या तिकिटाचे पैसे आपण पाठवायचे असे ती मनाशी ठरवते. त्यासाठी ती कॉलेजच्या लायब्ररीत काम करू लागते.सुनीलला हे ती कळू देत नाही. पण घरकाम, अभ्यास, नोकरी आणि भारतात बसुधाचे कसे होईल याची चिंता हा ताण हळूहळू अंजूला पेलता येईनासा होतो.तिची चीडचीड वाढू लागते, रक्तदाब वाढू लागतो.अखेरीस वैद्यकीय मदत मिळूनही अंजलीचा गर्भपात होतो.असे काहीतरी संकट अंजलीवर येणार आहे असे स्वप्न नेमके बसुधाला पडते. गौरी मॉं बसुधापासून अंजलीच्या गर्भपाताची बातमी लपवून ठेवतात पण त्या घरी नसताना बसुधा अमेरिकेत फोन लावते आणि सुनीलकडून तिला अंजलीचा झालेला गर्भपात, तिला आलेले वैफल्य याबद्दल कळते. ती अंजलीशी बोलण्याचा आग्रह धरते. आधी अंजली काहीच प्रतिसाद देत नाही पण मग बसुधा पिशी मॉंप्रमाणे गोष्ट सांगू लागते तेव्हा अंजलीही त्या गोष्टीचे धागे जोडू लागते. आता बसुधाला आपली नाही तर, आपल्याला तिची तीव्र गरज आहे  हे अंजलीला कळते. सुनीललाही ते पटते.

बसुधा मुलीला जन्म देते.घरातील तिघी -गौरी मॉं, नलिनी मॉं आणि पिशी यांना अतिशय आनंद होतो. दरम्यान त्यांनी आपला जुना वाडा विकून छोटं घर विकत घेतलं आहे. बसुधानेही सिंग चाचांच्या मदतीने विणकामाची कामे मिळवायला सुरूवात केली आहे.  बसुधाच्या मुलीला वाढवण्याची सगळी तयारी त्यांनी केली आहे.पण अंजूचा आग्रह आहे की बसुधाने अमेरिकेत यावे. इथे तिला उदरनिर्वाहाचे अधिक मार्ग मिळू शकतील.बसुधाला वाटते की अंजूसाठी आपण आता अमेरिकेत जाणे गरजेचे आहे. तिथे कायमचे रहायचे की नाही हे नंतर ठरवता येईल.दरम्यान अशोकने परत बसुधाकडे येऊन मुलीसह तिचा स्वीकार करायची तयारी दर्शवली आहे. पण बसुधाच्या मनात आता अंजूकडे जायचे पक्के झाले आहे.

मुलगी दयिता काही महिन्यांची होताच बसुधा तिला घेऊन अमेरिकेत जायला निघते.प्रवासात तिच्या बॅगेत तिला दोन पाकिटे कोणतरी ठेवलेली दिसतात. एका पाकिटात तिला तिच्या वडिलांनी एके काळी आणलेल्या लाल रत्नाचा खडा असलेली माळ दिसते. ती तिघी आयांनी दयितासाठी करून घेतलेली असते.तर दुसऱ्या पाकिटात तिला तिच्या वडिलांचे पत्र मिळते. त्यात त्यांनी सुंदरबनला ते बिजॉयला घेऊन गेले असता नेमके काय घडले ते सविस्तर लिहिलेले असते. त्यावरून तिला कळते की बिजॉयला आपल्या वडिलांनी मारलेले नाही. जो माणूस आपल्या होडीतून या दोघांना रत्नाच्या गुहेकडे घेऊन गेला त्यानेच रत्ने मिळाल्यावर या दोघांना जेवणातून विष घालून मारायचा प्रयत्न केला होता.त्यात बिजॉय मरण पावला. गोपाळने संपूर्ण ताकद वापरून त्या विष देणाऱ्या होडीवाल्याला मारले आणि तो सुंदरबनात लपला. पण अंगात भिनलेल्या विषाने त्याची त्वचा जळल्यासारखी झाली . आपला विद्रुप चेहरा कलकत्त्यात येऊन आपल्या बायकोला दाखवणे आणि गौरी मॉंना बिजॉयच्या मृत्यूची खबर देणे गोपाळला नकोसे वाटले. तो कलकत्त्याला आला पण ड्रायव्हरचे प्रशिक्षण घेऊन नोकरी शोधू लागला. तीही मिळेना तेव्हा त्याने आपण शिख आहोत असे भासवत आणि घरचे सगळे आगीत मरण पावले आहेत असे सांगून चॅटर्जींच्या घरी ड्रायव्हरची नोकरी पत्करली होती. सिंग ड्रायव्हर म्हणजे खरे तर आपले वडील गोपाळच होते हे कळल्यावर बसुधाच्या मनात त्यांच्याबद्दल करूणा भरून आली.गोपाळच्या याच पत्रातून त्याचा पूर्वेतिहासही बसुधाला उलगडला होता. गोपाळ हा खुलन्याच्या चॅटर्जींचा घरातील मोलकरणीपासून झालेला अनौरस मुलगा असल्याने आपणही चॅटर्जीच आहोत असा दिलासा बसुधाला मिळाला.विशेषतः आता अंजूशी आपण अपराधीपणाचे ओझे बाजूला ठेवून मोकळेपणाने बोलू शकू असे बसुधाला वाटले.गोपाळने आपली ओळख मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि त्याला येत गेलेले अपयश पाहून बसुधाला त्याच्याबद्द करूणा वाटू लागली.

इथे अमेरिकेत बसुधासाठी कपाट रिकामे करताना अंजूला सुनीलच्या खणात बसुधाचा लग्नातला पिशी मॉंनी विणून दिलेला रूमाल मिळाला होता. सुनीलला आजही बसुधाबद्दल आकर्षण वाटत असेल  का ? अशी शंका अंजूच्या मनाला चाटून गेली. पण आता ती आनंदाने बसुधाचे आणि दायिताचे स्वागत करणार होती.

अशाप्रकारे ‘सिस्टर ऑफ माय हार्ट’ या कादंबरीचे गुंतागुंतीचे, सनसनाटी घटनांनी भरलेले कथानक आपण लक्षात घेतले आहे. या कथानकातून जाणवणारी कथासूत्रे पुढीलप्रमाणे –

१) भारतातील अगदी प्रतिष्ठीत कुटुंबांतील स्त्रियांनाही सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वी कोणत्या संकटांतून जावे लागत होते ते ही कादंबरी ठळकपणे सांगते.मग ते विधवेचं दुःख असो , निपुत्रिकेचं दुःख असो की अनौरस मुल जन्माला घालणाऱ्या स्त्रीची होणारी अवहेलना असो.विशेषतः बायकाच बायकांना कशा छळतात ते बसुधाच्या सासूच्या वागण्यातून दिसते. विज्ञानाचा उपयोगही गर्भलिंग चाचणी करण्यासाठी होणार असेल आणि त्याने स्त्रीभृणहत्या होत असतील तर हे किती विसंगत आहे हेही कादंबरीतून सुचवले जाते.

२) स्त्रियांनी स्वतःवरील संकटांना तोंड देण्यासाठी आणि स्वाभिमानाने, कोणावरही अवलंबून न रहाता जगण्यासाठी शिक्षण घेणे, अर्थार्जन करणे, निर्भय होणे, विवेकाने निर्णय घेणे गरजेचे आहे हेही या कादंबरीतून पुढे आलेले एक कथासूत्र आहे.तसेच अंजू आणि बसुधा यांनी परस्परांसाठी त्याग करणे, एकमेकींच्या संकटांत मदतीला उभे रहाणे यातून भगिनीभावाची संकल्पनाही ही कादंबरी अधोरेखीत करते आहे.

३) अमेरिकेतही भारतातून गेलेल्या स्त्री-पुरूषांना अनेक अडचणींना तोंड देत जगावे लागते हे एक कथासूत्रही कादंबरीतून स्पष्ट होते.

४) माणसांच्या मनातील लोभ,मत्सर या विकारांपेक्षा करूणा, दया, माणुसकी या भावना त्याला अधिक चांगले बनवू शकतात हे दाखवणे हेही कादंबरीचे एक कथासूत्र ठरेल.

अशाप्रकारे सिस्टर ऑफ माय हार्ट या अमेरिकन भारतीय लेखिका चित्रा बॅनर्जी-दिवाकरूणी यांनी लिहिलेल्या इंग्रजी कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण समजून घेतली. पुढील ब्लॉगमध्ये आणखीन एका भारतीय इंग्रजी लेखिकेबद्दल आपण जाणून घेऊ.

  –गीता मांजरेकर

________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा