मागील ब्लॉगमध्ये आपण चित्रा बॅनर्जी- दिवाकारूणी यांच्या ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे लक्षात घेतली होती. त्यानंतर मी प्रत्यक्ष मसाल्याच्या भूमीत श्रीलंकेला गेले आणि ब्लॉग लेखनास विलंब झाला.आज आपण ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून लेखिकेची अंतर्दृष्टी शोधायचा प्रयत्न करणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ ही ३०० पृष्ठांची कादंबरी आहे. या कादंबरीत एकूण पंधरा प्रकरणे आहेत. प्रकरणांची पृष्ठसंख्या सरासरी २० आहे.पाचवे प्रकरण तसेच नववे व दहावे प्रकरण तुलनेने मोठे आहेत. कादंबरीतील तेरा प्रकरणांची नावे हळद, दालचिनी, मेथी दाणे, बडिशेप अशी मसाल्यांच्या पदार्थांची आहेत.फक्त दोन प्रकरणांची नावे व्यक्तींची आहेत. ही व्यक्ती तिलोत्तमा ऊर्फ तिलो. जी या कादंबरीतील मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा आहे. तिच्यात झालेले परिवर्तन दाखवणे हे कादंबरीचे एक कथासूत्र आहे.त्यामुळे कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाचे नाव तिलो तर अखेरच्या प्रकरणाचे नाव माया असे आहे.माया हे तिलोचेच परिवर्तीत रूप आहे.

‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ हे शीर्षक तिलोला उद्देशून असले आणि ती या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असली तरी ही कादंबरी व्यक्तीप्रधान म्हणण्यापेक्षा घटनाप्रधान आहे असेच म्हणावे लागेल. तिलोचे आयुष्य अनेक सनसनाटी, अशक्यप्राय वाटणाऱ्या घटनांनी भरलेले आहे जे कादंबरीत उलगडत जाते.तिलोच्या आयुष्यात आलेला अमेरिकन प्रियकर रेवन याचेही आयुष्य असेच काही विलक्षण घटनांनी भरलेले आहे. तेही कथानकात उलगडते. तिलो आणि रेवन दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील घटनांनी घडवले आहे हे तर कादंबरी सांगतेच पण त्याबरोबरच तिलो तिच्या दुकानात येणाऱ्या माणसांच्या आयुष्यातील घटनाही कथनात सांगत रहाते. त्यामुळे ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ ही कादंबरी एका किंवा दोन व्यक्तींच्या मध्यवर्ती गोष्टींच्या अनुषंगाने अनेकांच्या गोष्टी सांगणारी आहे असे म्हणता येईल. घटनांची रंगीबेरंगी जादुई चटईच जणू असे या कादंबरीचे स्वरूप वाटते. या घटना कथन करणारे दोन कथक या कादंबरीत लेखिकेने योजले आहेत. एक म्हणजे तिलो आणि दुसरा तिचा अमेरिकन प्रियकर रेवन.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीत कथन एकरेषीय नाही ते काहीवेळा भूतकाळात जाते तर काहीवेळा भविष्यातही जाते.कादंबरीचे कथानक तीन अवकाशांत घडले आहे.पहिल्याच प्रकरणाची सुरूवात अमेरिकेतील ओकलँड या शहरातील मसाल्याच्या दुकानात होत असली तरी या प्रकरणाची कथक तिलो स्वतःच सांगते की दुकानाआधी ती एका बेटावर होती आणि त्यापूर्वी ती तिच्या भारतातील जन्मगावी होती.स्वतःच्या जन्मापासून ते समुद्री चाच्यांनी तिचे अपहरण केल्यापर्यंतचा भूतकाळ तिलोने पहिल्या दोन प्रकरणांत झपाट्याने कथन केला आहे.पण त्या कथनात मध्येच तिच्या वर्तमानातील ललिता अहुजा आणि हारून यांच्या कहाणीच्या कथनालाही सुरूवात होते.ललिताच्या कहाणीचा पुढील भाग सहाव्या आणि बाराव्या प्रकरणात येतो.तशाच प्रकारे हारून या काश्मिरी तरूणाच्या कहाणीचा पुढील भाग पाचव्या, आठव्या,अकराव्या व तेराव्या प्रकरणात येतो.कथनाचे हेच तंत्र लेखिकेने पुढेही वापरले आहे. त्यामुळे तिलोच्या दुकानात येणाऱ्या जगजीतची, गीताच्या आजोबांची व गीताची गोष्ट अशीच तुकड्या तुकड्याने उलगडत जाते.
ललिता,हारून, जगजीत, गीता यांच्या गोष्टींबरोबरच अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या इतर अनेक भारतीयांच्या कहाण्यांचे तुकडे कथनात पेरलेले आहेत. त्यातून कधी उच्चभ्रू अमेरिकन भारतीयांची सामान्य भारतीय स्थलांतरीतांची पिळवणूक करण्याची वृत्ती दिसते तर कधी अतिशय कष्टाने भारतीय खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या मोहनला स्थानिक लोकांनी वंशवादी दृष्टीने केलेली मारहाण दिसते.नर्सचे काम करणारी दक्षासारखी अमेरिकेतील भारतीय स्त्री तिथेही नवरा, सासू यांच्या आवडीनिवडी, उपासतापास सांभाळताना थकलेली दिसते. अमेरिकेत शिकणारा मुलगा आई भारतातून येणार म्हणून तिच्यासाठी भारतीय खाद्यपदार्थ बनवून ठेवावेत यासाठी धडपडताना दिसतो.नवऱ्याला कंपनीतून ले ऑफ मिळाल्याने काळजीत पडलेली त्याची बायको दिसते.अमली पदार्थाच्या आहारी जाणारी, क्रूर झालेली अमेरिकन मुलांची पिढी दिसते. अमेरिकेतील सामान्य भारतीय माणसांच्या वाट्याला येणारे अतोनात कष्ट आणि त्यांची स्वप्न दिसतात. अमेरिकेत स्थलांतरीत झालेले सगळेच भारतीय सुखी, संपन्न आयुष्य जगत नसतात आणि अमेरिकेतही बेरोजगारी, असुरक्षितता,दहशतवाद,व्यसनांच्या आहारी गेलेली तरूणाई अशा अनेक समस्या आहेत हे लेखिकेला या क्षणचित्रांसारख्या कहाण्यांतून वाचकांसमोर ठेवायचे आहे.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीतील तिलोबरोबचा दुसरा कथक म्हणजे तिचा अमेरिकन प्रियकर रेवन. त्याच्या कथनातून अमेरिकेतील आदिम रेड इंडियन्सच्या वाट्याला आलेले बकाल जगणे,दैन्य, त्यांच्या अंधश्रद्धा हा भाग येतो तसेच भौतिकवादी जीवनदृष्टीमुळे अमेरिकन कुटुंबातील संपलेला संवाद, ताणलेले नातेसंबंध या समस्याही कशा आहेत हे वाचकांना कळते.
तिलोच्या कथनात अधूनमधून तिची बेटावरील वृद्ध गुरू ही व्यक्तिरेखा भेटत रहाते.बेटावर मुलींना मसाल्यांतील शक्तीचे ज्ञान देत असतानाच या वृद्ध गुरूने त्यांना जीवनातील बांधिलकी, निरलस सेवेचे महत्त्व, सहजीवनातील आनंद शिकवला आहे. तिलोचा बंडखोर स्वभाव ओळखूनही तिलोवर तिने प्रेम केले आहे. वरवर कठोरपणे बोलणारी ही वृद्ध गुरू तिलोसाठी एकमेव आदर्श आहे.तिने तिलोला जगण्यासाठी एक ध्येय, एक व्रत दिले आहे. तिलो ते सांभाळत असली तरी तिच्याही मनात मोह, मत्सर असे विकार आहेतच. दुकानात येणाऱ्या तरूण नखरेबाज, नटव्या भारतीय मुलींना तिलो बोगनवेला गर्ल्स म्हणते. या मुलींना स्वयंपाकातील काही कळत नाही पण मादक सौंदर्याने त्यांना दिलेला आत्मविश्वास पाहून तिलोला त्यांचा मत्सरही वाटतो.आपली कोणतीही कृती वृद्ध गुरूने दिलेल्या ध्येयदृष्टीच्या निकषांत न बसणारी असेल तर आपण लोकांना दिलेल्या मसल्यांचा, औषधांचा गुण येणार नाही याचे भान तिलोच्या मनात सतत आहे. अमेरिकन प्रियकराच्या प्रेमात पडल्यावर तर आपला शेवट तिलोला जवळजवळ येताना दिसतो. एकदाच प्रियकराकडून शरीरसुख भोगू आणि मरणाला, संपूर्ण विनाशाला सामोरे जाऊ असे तिलोने मनोमन ठरवले आहे. वृद्ध गुरूने सांगितल्यप्रमाणे व्रतभंगाचा परिणाम म्हणजे संपूर्ण विनाश हे तिलोच्या मनावर बिंबले आहे.प्रत्यक्षात ओकलँडमधील भूकंप, त्यातून तिच्या दुकानाची झालेली पडझड या गोष्टी तिलोच्या विनाशासारख्याच आहेत. पण अमेरिकन प्रियकर तिला वाचवतो आणि जणू तिलोचा पुनर्जन्मच होतो.प्रेम मिळवणे हा आपला हक्क आहे आणि ते मिळाले तरी आपली ध्येयदृष्टी बदलण्याची गरज नाही याची जाणीव तिलोला होते. माया म्हणून ती पुन्हा एकदा ओकलँडमधील दुःखितांच्या-मग ते भारतीय असोत, अमेरिकन असोत की कृष्णवर्णीय त्यांच्या सेवेसाठी माघारी फिरते हा शेवट फिल्मी वाटला तरी अशक्य नाही.

जादुई वास्तववाद हे ‘मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीच्या कथनाचे एक वैशिष्ट्य असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे.तिलो तिच्या गावी नयनतारा या नावाने जगत असताना समद्री चाच्यांच्या गोष्टी ऐकून मनोमन ते आपल्याला भेटावेत असे आवाहन करते आणि एकेदिवशी सायंकाळी गावावर समुद्री चाच्यांचा हल्ला होतो हे वर्णन कथक करतो ते जादुई वास्तववादाचे उदाहरण ठरेल.तिलो समुद्री चाच्यांच्या बोटीचे नेतृत्व करत असताना समुद्रातील साप तिला मसाल्याचे ज्ञान देणाऱ्या बेटाबद्दल सांगतात आणि तिने बोटीतून समुद्रात उडी घेतल्यावर तिला जणू बेटाची दिशा दाखवतात हेही जादुई वास्तववादाचे उदाहरण ठरेल. बेटावर मसाल्यांचे ज्ञान मिळवून झाल्यावर वृद्ध गुरू एका ज्वालामुखीच्या विवरात सर्व मुलींना घेऊन जाते आणि त्यांच्या हातातील नारळाच्या झावळ्यांच्या पंख्यांनी जेव्हा ज्वालामुखीतील सूक्ष्म राखेचे कण उडू लागतात नी जणू एक धुक्याचा पडदाच तयार होतो तेव्हा त्यात बघा तुम्हाला तुमचे कार्यक्षेत्र निवडायचे आहे असे सांगते. मुलींना त्या धुळीच्या पडद्यावर जणू जगभरातील सर्व शहरे दिसू लागतात आणि मग त्यातून त्या आपल्यासाठीचे कार्यक्षेत्र निवडतात असा एक प्रसंग तिलोच्या कथनात आहे. हेही जादुई वास्तववादाचे उदाहरण म्हणावे लागेल. याखेरीज तिलो रोज संध्याकाळी दुकान बंद करून आतल्या कोठीच्या खोलीत झोपायला जाते तेव्हा तिला तिच्या दुकानात येऊन गेलेल्या लोकांच्या घरातली दृष्य दिसू लागतात.तिने वर्तमानपत्र वाचले की त्यातील भारतीय स्थलांतरीतांवरच्या क्रूर हल्ल्याच्या बातम्या तिच्या डोळ्यासमोर प्रत्ययकारी होत जातात ही सगळी जादुई वास्तववादाची उदहरणे ठरतील असे वाटते.तिलोकडे जन्मतःच काही विशिष्ट अतींद्रिय शक्ती आहे हे कथनातून स्पष्ट झालेले आहे त्यामुळेच कथनातील ही जादुई वास्तवातून साकारलेली वर्णने वाचक सहज स्वीकारू शकतो.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’मधील रेवन या अमेरिकन व्यक्तिरेखेला आपल्या मूळच्या रेडइंडियन आजोबांकडून काळ्या पक्ष्याची शक्ती मिळवता आली नाही याची खंत आहे.त्याबद्दल त्याने कायमच आपल्या आईला दोषी ठरवले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर रेवनला शक्ती स्वकष्टांतून मिळवता येते याची जाणीव झाली आहे. शिक्षण आणि व्यावसायिक यशातून त्याने ती शक्ती प्राप्त केली आहे.पण तोपर्यंत त्याने आईला पर्यायाने खऱ्या प्रेमाला गमावले आहे.त्या खऱ्या प्रेमाच्या ओढीने तो मसाल्याच्या दुकानातील तिलोकडे आकर्षित होतो.रेवनच्या कथनातही जादुई वास्तववाद येतो. रेवन आजोबांना ते मृत्युशय्येवर असताना भेटायला गेलेला असताना काळा पक्षी त्यांच्या डोक्यावरून उडत येताना रेवन पाहतो तो प्रसंग जादुई वास्तववादाचे उदाहरण ठरेल.तसेच खरे प्रेम मिळाल्यावर आपण अशा एका ठिकाणी जाऊ जिथे झरे झुळझुळू वहात असतील, कुरणावर हरणे चरत असतील जणू ते नंदनवनच असेल असे एक दृष्य रेवनला दिसत राहते हाही जादुई वास्तववाद म्हणता येईल.अन्यवेळी मात्र रेवन वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीने कथन करताना दिसतो. तिलो मीलनाचा आनंद घेऊन रात्रीच तिच्या दुकानात निघून जाते तेव्हा रेवन अनामिक काळजीने तिला भेटायला परत तिच्या दुकानात जायला निघतो. वाटेतच भूकंपाचा धक्का त्याच्या गाडीला भरकटवतो पण तरीही रेवन कसाबसा तिलोच्या दुकानात पोहचतो. जिद्दीने तिला वाचवतो हे सगळे कथन वस्तुनिष्ठ आहे.तिलोच्या दृष्टीने भूकंप हा तिने केलेल्या व्रतभंगाचा परिणाम आहे. शंपती पक्ष्याने तो तिचा विनाश करण्यासाठी घडवला आहे. पण रेवनच्या मते भूकंप ओकलॅंडला होणे यामागचे प्राकृतिक कारण ते भूकंप प्रवण क्षेत्र आहे. त्या भूकंपातून वाचल्यावर मात्र त्याला त्याच्या स्वप्नातील नंदनवनात निघून जायचे आहे. तिलोही त्याच्यासोबत निघते पण थोडा रस्ता पार केल्यावर जळणारे, उद्वस्थ झालेले शहर तिला पुन्हा एकदा वास्तवाचे भान देते आणि आपली जबाबदारी लोकांना दिलासा देण्याची, त्यांची सेवाशुश्रुषा करण्याची आहे हे जाणवून ती रेवनलाही वास्तवात आणते.
अशाप्रकारे कधी जादुई वास्तवात जाणारे तर कधी वस्तुनिष्ठपणे घटनांकडे पाहणारे असे हे ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ कादंबरीचे कथानक आहे. अमेरिकेतील विरोधाभास असलेले वास्तव दाखवणे आणि मानवतावादी जीवनदृष्टी देणे हीच लेखिकेची कादंबरीलेखनामागील अंतर्दृष्टी कथनाच्या विश्लेषणातून सामोरी येते असं म्हणता येईल.
पुढील ब्लॉगमध्ये चित्रा बॅनर्जी-दिवाकरूणी यांच्या आणखी एका कादंबरीच्या कथानकाचा परिचय आपण करून घेणार आहोत.तोपर्यंत तुम्ही ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ हा चित्रपट यु ट्यूबवर पाहू शकता !
- गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा