मागील ब्लॉगमध्ये आपण चित्रा बॅनर्जी-दिवाकरूणी या भारतीय वंशाच्या अमेरिकन कादंबरीकार स्त्रीचा परिचय करून घेतला. आज आपण त्यांच्या ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे समजून घेणार आहोत. ही कादंबरी १९९७ मध्ये प्रकाशित झाली आणि त्यानंतर तिच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यामुळे ही कादंबरी लोकप्रिय गटातील आहे असे म्हणता येईल.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ ही एक अद्भुतरम्यता आणि वास्तव यांची सांगड घालणारी कादंबरी आहे.तिचे स्वरूप प्रामुख्याने घटनाप्रधान आहे.कादंबरीचे कथन प्रामुख्याने प्रथम पुरूषी आहे. या कादंबरीतील घटना तिल्लो या एका भारतीय स्त्री व्यक्तिरेखेच्या कथनातून आणि नजरेतून आपल्याला पाहता येतात. काही घटना रेवन या एका अमेरिकन माणसाने त्याच्या दृष्टिकोनातून कथन केलेल्या आहेत.
या कादंबरीचा काल नेमका किती मोठा आहे हे सांगता येत नाही कारण कादंबरीचे कथानक अद्भुतरम्य आहे. या कादंबरीचे कथन वर्तमान आणि भूतकाळात फिरतेच पण कधीकधी भविष्याचाही वेध घेते. कादंबरीतील कथानकाचा अवकाश भारतातील एक गावापासून ते कोणत्याशा एका अद्भुत बेटावर जातो आणि अखेरीस ओकलॅंड या अमेरिकन शहरापर्यंत येऊन स्थिरावतो.

‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ म्हणजे मसाल्यांची स्वामिनी ! ही कल्पनाच वाचकांना अद्भूतरम्य वाटेल. पण कथानकात ती तर्कसुसंगत केली गेली आहे. ही स्वतःला मसाल्यांची स्वामिनी म्हणवणारी स्त्री म्हणजे तिलोत्तमा किंवा तिल्लो जी भारतातील एका खेड्यातील गरीब घरातील एका जोडप्याची शेवटची मुलगी आहे. लहानपणी तिचे नाव नयनतारा होते. जन्मतःच तिच्याकडे लोकांचे भविष्य जाणण्याची आणि ते बदलवण्याची अतिंद्रीय शक्ती होती.तिने अनेकांना आजारातून बरे केले होते, संकटांपासून वाचवले होते त्यामुळे ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बंगाली बाऊलांनी म्हणजे भाटांनी तिची स्तुती करणारी गीते रचली होती आणि तिची प्रसिद्धी ऐकून दूरदूरहून लोक आपली समस्या सोडवण्यासाठी तिच्याकडे येत असत.ज्यांना नयनतारा संकटांतून वाचवे ते तिच्यासाठी सोने-नाणे भेटवस्तू घेऊन येत. त्यामुळे घरातली धाकटी मुलगी असूनही आई-वडिलांना नयनताराचे अप्रूप होते. सगळे कुटुंबीय नयनताराची सेवा करण्यात धन्यता मानत असत. परिणामी नयनताराही रूबाबात सर्वांना आज्ञा देई, आपल्यामुळेच घरातील सगळे ऐषोआरामात राहात आहेत याची जाणिव असल्याने नयनतारा सगळ्यांना कमी लेखत असे.पण नयनतारा समाधानी नव्हती. आपले आयुष्य तिला कंटाळवाणे वाटत होते. लोकांना भविष्य सांगणे, त्यांची स्तुती ऐकणे हे सगळेच तिच्यासाठी यांत्रिक ,नकोसे झाले होते. खोल मनात तिला एक पोकळी जाणवत होती. तिच्या या असमाधानामुळेच तिने केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांना संकटात टाकले होते.कुठूनतरी तिला समुद्री चाच्यांबद्दल कहाण्या ऐकायला मिळाल्या होत्या. या चाच्यांबद्दल कुतूहल वाटून नयनताराने आपली अतिंद्रीय शक्ती वापरून चाच्यांच्या बोटी आपल्या गावाजवळील बंदरावर खेचून आणल्या होत्या. चाचे गावात शिरून लुटमार करू लागले, जाळपोळ करू लागले तेव्हा मात्र आपण काय चूक केली ते नयनताराला उमगले होते. तिच्या नजरेसमोर तिचे घर, गाव जळताना तिला पहावे लागले होते. तिने कितीही आरडाओरडा केला तरी या संकटातून ती कोणालाही वाचवू शकली नव्हती. खुद्द तिलाच चाच्यांनी बंदिवान करून बोटीवर नेले होते.आता ती चाच्यांची नायिका झाली होती. त्यांनी तिचे नाव भाग्यवती ठेवले होते. तीही शूरपणे त्यांची बोट रौद्र समुद्रातून लिलया पार नेत होती. पण याही आयुष्यात ती समाधानी नव्हतीच. त्यामुळे एका वादळातून बोट पुढे नेत असताना तिने कोणाच्याही नकळत समुद्रात उडी घेतली होती. जीवाची बाजी लावून भाग्यवती पोहत राहिली होती आणि एका बेटावर येऊन पोहोचली होती.
समुद्र किनाऱ्यावर पडलेली भाग्यवती शुद्धीवर आली होती ती एका शुभ्र वस्त्रातील वृद्ध स्त्रीच्या मृदु-मुलायम स्पर्शाने आणि गोड बोलण्याने.ही वृद्ध स्त्री मसाल्यांचे प्रशिक्षण देणारी गुरू होती.ती त्या निर्जन बेटावर जगभरातील निवडक स्त्रियांना विविध मसाल्यांतील अदृश्य शक्तींचा प्रत्यय देऊन त्यांना मसाल्यांच्या स्वामिनी होण्यासाठी प्रशिक्षित करत असे. हे प्रशिक्षण भाग्यवतीलाही मिळते. पण प्रशिक्षण संपल्यावर ती वृद्ध स्त्री या प्रशिक्षित मुलींची नावे बदलते, रूप बदलते आणि दैवी शक्तीने त्यांना जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मसाल्यांची दुकाने चालवण्यासाठी पाठवून देते. ही दुकाने या स्त्रियांनी अत्यंत व्रतस्थपणे चालवायची असतात. त्यासाठी त्यांना अविवाहीत राहून दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे मन जाणून घ्यायचे असते आणि नकळत त्यांना त्यांच्या सुखाचा मार्ग सापडावा यासाठी विशिष्ट मसाला मंत्रून द्यायचा असतो. जर हे व्रत पाळण्यात या मसाल्यांच्या स्वामिनींनी हयगय केली तर मात्र शंपती नावाचा ज्वालामुखीतून जन्मलेला पक्षी त्यांना भस्मसात करणार असतो.
भाग्यवती बेटावरील वृद्ध स्त्रीने शिकवलेली मसाल्यांबद्दलची सगळी रहस्ये,मसाल्यांमधील शक्ती वापरण्यासाठीचे मंत्र मनापासून शिकते. प्रशिक्षणाच्या अखेरीस तिचे नाव तिलोत्तमा असे बदलले जाते.आणि तिने मागितलेल्या अमेरिकेतील ओकलॅंड शहरातील मसाल्यांच्या दुकानात जणू तिचा जादुई पुनर्जन्म होतो. आपल्या वृद्ध शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे तिलोत्तमा म्हणजेच तिल्लो व्रतस्थपणे अनेक वर्ष शहरातील केवळ भारतीयांचेच नव्हे तर अन्य स्थलांतरीतांचेही दुःख जाणून घेत त्यांना सुखाचे मार्ग दाखवणारे मसाले मंत्रून देत रहाण्याचे काम मनापासून करत रहाते.
तिल्लोचे शरीर सुरकुतलेले झाले आहे. ती वृद्ध दिसली तर कोणी तिच्याकडे आकर्षित होणार नाही असे तिच्या वृद्ध गुरूचे म्हणणे आहे. तिल्लो साध्या मळकट सुती साड्या नेसते.स्वतःचे केस,त्वचा यांची काळजी ती घेत नाही. तिचे डोळे मात्र तेजस्वी आणि अनेक आशा-आकांक्षा व्यक्त करणारे , सुंदर आहेत.
तिल्लोच्या दुकानात ललिता अहुजा गॉगल लावून येते. ती एका उत्तर प्रदेशातील खेड्यातून विवाह करून आलेली तरूण मुलगी आहे. पण तिचा नवरा तिच्याकडून जी शरीरसुखाची व अपत्याची अपेक्षा करतो ते देण्यात ती कमी पडते आहे. त्यामुळे नवऱ्याने तिला डोळ्यावर मारले आहे याचा अंदाज तिल्लोला येतो. ती हळूच हळद पूड मंत्रून ललिताच्या पिशवीत टाकते. ललिता परत येते तेव्हा अधिक विश्वासाने ती तिल्लोला आपले दुःख सांगते. तिल्लो तिला मंत्रून बडिशेप देते जेणेकरून तिच्या मुखाच्या सुगंधाने तिचा नवरा तिच्याकडे आकर्षित होईल.ललिताला या उपायाने काही होऊ शकेल असे वाटत नाही. ललिताचे मन रिझवायला एक हिंदी मासिक तिल्लो तिला देते. योगायोगाने त्यावर अमेरिकेत आलेल्या भारतीय स्त्रियांसाठीच्या हेल्प लाईनचा नंबर ललिताला मिळतो. ललिता नवऱ्याला सांगून स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेते आणि स्वतःमध्ये काहीही दोष नाही हे कळल्यावर नवऱ्याला वैद्यकीय तपासणी करून घेण्याची विनंती करते. पण तो भयंकर चिडतो, ललितावर बलात्कार करतो.ललिताला हे असह्य होते. नवरा कामावर निघून गेल्यावर ती हेल्पलाईनला फोन करते आणि त्यांची मदत घेऊन घर सोडते. अनेक महिने ती दुकानात आली नाही म्हणून चिंतेत असलेल्या तिल्लोला ती दुकान कायमचे बंद करण्याचा निर्णय घेते त्याच दिवशी ललिताचे खुशालीचे पत्र येते. ती लौकरच संस्थेच्या मदतीने शिवणकाम करून स्वतःच्या पायावर उभी रहाणार आहे हे ऐकून तिल्लोला बरे वाटते.
तिल्लोच्या दुकानात एक निवृत्त बंगाली लष्करी अधिकारी येतात. ते त्यांच्या मुलाकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. त्यांची नात गीता आता तरूण झाली आहे आणि तिचे भारतातील एखाद्या बंगाली मुलाशी थाटात लग्न लावले पाहिजे असे या आजोबांना वाटत असते. पण एके दिवशी गीता आपला कोणी मेक्सिकन मित्र आहे आणि त्याच्याबरोबर आपण रहाणार आहोत असा गौप्यस्फोट करते.गीताचे आई-वडील हे ऐकून हादरतात. मला आता भारतात परत जाऊदे असे म्हणून आजोबा मुलगा व सुनेच्या अस्वस्थतेत आणखीनच भर घालतात.गीता तर घर सोडून निघूनच जाते.या आजोबांना कुठून तरी तिल्लोकडील मसाल्यांच्या जादूई शक्तीबद्दल कळते आणि ते तिल्लोकडे मदतीची याचना करतात. तिल्लो त्या कुटुंबातील कटूता दूर करण्यासाठी मिरी मंत्रून देते. स्वतः आयुष्यात पहिल्यांदा दुकान बंद ठेवून गीताला भेटायला अमेरिकन पेहरावात तिच्या कार्यालयात जाते. तिच्या मनातील तिच्या कुटुंबियांबद्दलचा राग नाहीसा व्हावा म्हणून मसाले मंत्रून देते. ती अजूनही आपल्या मित्राबरोबर रहायला गेलेली नाही. पालकांच्या परवानगीशिवाय तसे करावे असे तिलाही वाटत नाही हे कळल्यावर तिल्लो ते तिच्या आजोबांच्या कानावर घालते. एवढ्या चांगल्या मुलीने निश्चितच आपला जोडीदार विचारपूर्वक निवडला असणार हे तिल्लो त्यांना समजावून सांगते आणि एक मसाला असा मंत्रून देते की ज्याने ते आजोबा तात्पुरते आजारी होतील. तसेच घडते. वडिल आजारी झाले म्हणून मुलगा आणि सुन व्याकूळ होतात. आजोबा नातीला भेटायची इच्छा व्यक्त करतात आणि गीता त्यांना भेटण्यासाठी घरी येते तेव्हा कुटुंबातील ताण संपतो. हळूहळू गीताच्या मित्राचा स्वीकार करायला सगळेच तयार होतात. तिल्लोला आनंद होतो.
तिल्लोच्या दुकानात लहानपणापासून त्याच्या आईसोबत जगदीश येत असतो. तो पंजाबमधल्या छोट्या गावातून आलेला असतो. त्याला शाळेत इतर मुले सतावतात. त्याचे डोक्यावर बांधलेले केस, त्याचे उच्चार याची खिल्ली उडवतात.जगदीश एकटा पडू लागतो. तिल्लो त्याला नकळत मंत्रून काही मसाले देते. पण जगदीश ड्रग्ज विकणाऱ्या मुलांच्यासोबत तिला दिसतो तेव्हा ती निराश होते. आपले मसाले व मंत्र काम करत नाहीत कारण आपण आपल्या गुरूने घातलेली बंधने नीट पाळलेली नाहीत असे तिल्लोला वाटते. पण ज्या दिवशी ती मसाल्याचे दुकान कायमचे बंद करण्याचा निर्णय घेते त्याच दिवशी जगदीश काही सामान घेण्यासाठी तिच्या दुकानात येतो आणि तिने दुकानाच्या बाहेर लावलेली एका स्थलांतरीताने सुरू केलेल्या कराटे क्लासची जाहिरात टक लावून पहात रहातो. त्याला कराटे शिकायला तिल्लो प्रवृत्त करते आणि त्या दिवशी जमलेला गल्ला कराटे क्लासची फी म्हणून त्याला देऊन टाकते. आपले एक कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान तिला मिळते.
तिल्लोच्या व्रतस्थ आयुष्यात दुसऱ्यांना सुखी करण्याचा आनंद असला तरी एक क्षण असा आलेला असतो की जेव्हा तिला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील व्यर्थता जाणवू लागते, एकटेपणा सतावू लागतो आणि एका अमेरिकन एकाकी माणसाचे दुःख जाणून घेताना ती नकळत त्याच्या प्रेमात पडते.आपण चूक करतो आहोत. आपला संयम सुटला तर आपल्या मंत्रांचा, मसाल्याचा लोकांवर प्रभाव पडणार नाही अशी भीती तिल्लोला वाटते. विशेषतः तिला सामान आणून देणारा टॅक्सीवाला तरूण हरून जेव्हा तिच्यासोबत त्या अमेरिकन माणसाला दुकानात पाहून तिच्यावर चिडतो आणि काळे जिरे घ्यायला यायचे बंद करतो तेव्हा तिल्लोला पश्चात्ताप होतो. काहीही करून हरूनला शोधून काढून त्याची क्षमा मागितली पाहिजे असे तिल्लोला वाटू लागते. पण तिच्याकडे हरूनचा संपर्कच नसतो.
तिल्लो ज्याच्या प्रेमात पडते तो अमेरिकन माणूस आहे रेवन.तो एक मध्यमवयीन माणूस आहे. त्याची स्वतःची एक कहाणी आहे जी कथानकात तो स्वतःच तिल्लोला सांगत जातो. रेवन हा एका मध्यमवर्गीय अमेरिकन कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील रिफायनरीमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे. आई-वडिलांच्या प्रेमळ सहवासात रेवनचे बालपण जात असतानाच एके दिवशी दरवाज्याशी आलेल्या एका भणंग माणसाशी आईला भांडताना रेवन पाहतो. तो माणूस त्याच्या आईला ती कोणाला तरी सोडून आली आहे आणि तो माणूस आता मरणोन्मुख आहे असे सांगत असतानाही आई त्याला निघून जायला सांगते हे रेवन पाहतो.त्या दोघांच्या बोलण्यातून आपली आई कोणत्याशा हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती हेही रेवनला कळते. आईचा एक अज्ञात भूतकाळ आहे आणि तो आपल्या वडिलांनाही माहीत नसावा अशी जाणीव रेवनला होते. नेहमी हसतमुख असणारी ,टापटिप राहणारी आणि त्याच्याशी हळूवारपणे बोलणारी आई त्या दिवशी रेवनला वेगळीच वाटते. त्या प्रसंगानंतर काही दिवसांनी आई रेवनला गाडीत घालून त्यांच्या शहराबाहेरील एका बकाल वस्तीत घेऊन जाते.तिथे एका झोपडीत माणसांच्या गर्दीत एका खाटेवर मरणोन्मुख पडलेल्या वृद्धासमोर ती रेवनला घेऊन उभी रहाते तेव्हा तो वृद्ध रेवनचा हात हातात घेऊन त्याला इथेच ठेवून जा अशी विनवणी रेवनच्या आईकडे करतो. रेवनची आई त्याला नकार देत रहाते पण वृद्ध जो तिचा आजोबा आहे तो मात्र रेवनला मी आपल्या जमातीकडे असलेली अद्भुत शक्ती तुला देईन असे म्हणतो. रेवनला या गूढ शक्तीबद्दल कुतूहल वाटून तिथेच रहावेसे वाटते. एवढ्यात एक काळा पक्षी ज्याला रेवन असे म्हणतात तो अचानक त्या अंधाऱ्या खोलीत येतो आणि वृद्ध माणसावर घिरट्या घालू लागतो. त्या पक्ष्याचे आणि आपले नाव सारखे आहे हे लक्षात येऊन रेवनला तो पक्षी हवासा वाटतो. तो पक्ष्याला पकडायला हात पुढे करतो पण तेवढ्यात त्याची आई जोरात किंचाळून त्याला मागे खेचते. नेमक्या त्याच क्षणी आईचे आजोबा गतप्राण होतात. मात्र आई तिथे न थांबता रेवनला घेऊन आपल्या घरी परतते. या प्रसंगाबद्दल आई रेवनच्या वडिलांना काहीही सांगत नाही. आणि रेवनच्या नजरेतून आई उतरते. आपल्या आईचे आपल्यावरील प्रेम हे त्याला बेगडी, खोटे वाटू लागते. तो हळूहळू तिच्याशी बोलेनासा होतो. त्याचा परिणाम त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागते.तो वाईट मुलांशी संगत जोडतो.रेवनची आई रेवनच्या वागण्याने काळजीत पडते पण आपल्या मुलाची समजुत कशी काढावी, त्याच्याशी संवाद कसा साधावा हे तिला कळत नाही. मात्र वडिलांच्यासमोर आई- रेवन काहीच बिनसलेले नाही असे भासवत राहतात. वडिलांना त्यांचे हे नाटक जाणवते पण आई-मुलामध्ये कोंडी का आहे हे त्यांना उमगत नाही.तेही रेवनशी संवाद साधू शकत नाहीत. अचानक एके दिवशी रेवनचे वडिल रिफायनरीमधील अपघातात गंभीर जखमी होतात. इस्पितळात त्यांच्या मृत्युप्रसंगी रेवन व त्याची आई दोघेही असतात. आई आक्रोश करत असताना रेवन तिला कवटाळतो पण त्याला जाणवते की आपल्या स्पर्शात केवळ औपचारीकता आहे आणि आपला स्पर्श कोरडा झाला आहे.
वडिलांच्या मृत्युमुळे दुबळ्या झालेल्या रेवनला लक्षात येते की आपण शिक्षण घेऊन, पैसा कमावला तरच आपल्याला सुरक्षितता मिळेल. तो जिद्दीने शिकू लागतो. त्यासाठी घरापासून दूर जातो. शिक्षणाच्या आधारे रेवनला उत्तम प्रकारे स्वतःचा व्यावसाय उभा करता येतो. खूप संपत्ती तो मिळवू शकतो. या सगळ्या काळात त्याने त्याच्या आईकडून आलेल्या पत्रांना एकदाही उत्तर दिलेले नसते. पण आपण मिळवलेले धन हीच आपली शक्ती आहे आणि आता ती एकदा आईला दाखवली पाहिजे असे वाटून तो जेव्हा परत आपल्या घरी जातो तेव्हा त्याला कळते की आईने ते घर कधीच सोडले आहे. तिचा ठावठिकाणा त्याला मिळत नाही तेव्हा त्याला आपली चूक कळते.त्याच्या मनातील एकटेपणा त्याला सतावू लागतो. उद्विग्नतेने तो व्यवसाय बंद करतो आणि वेगवेगळ्या छंदात स्वतःला गुंतवून आनंद शोधू पाहतो. बाया- दारू कशानेही त्याला समाधान मिळत नाही तेव्हा कुठूनतरी तिल्लोच्या दुकानाची माहिती त्याला मिळते आणि तो तिथे आलेला असतो. तिल्लोला त्याला बघता क्षणीच त्याचे एकाकीपणाचे दुःख जाणवलेले असते. पण त्याचवेळी स्वतःचे एकाकीपणही तिला छळू लागते आणि ती रेवनकडे आकर्षित होते. मात्र एकीकडे आपल्यासारख्या वृद्ध, कुरूप, सुरकुतलेल्या त्वचेच्या बाईकडे रेवन कशाला पाहील असेही तिला वाटत असते. आपण व्रत तोडतो आहोत आणि त्याचे प्रायश्चित्त आपल्याला भोगावे लागेल याचे भयही तिच्या मनाला ग्रासत असते.स्वतःवर ती मसाल्यांचा प्रयोग करून संयम टिकवण्याचा प्रयत्न करते. पण अखेरीस तिला असे वाटू लागते की आपण इतरांच्या आनंदासाठी, सुखासाठी अनेक वर्ष व्रतस्थ राहिलो असलो तरी स्वतःच दुःखी असलो तर इतरांना सुखी तरी कसे करू शकू ?
वृद्ध गुरूशी स्वप्नात भेट होते तेव्हा तिल्लोला कळते की आपण रेवनशी नाते जोडले तर शंपतीचा पक्षी येऊन आपले दुकान आगीत भस्मसात करेल. हेच भविष्य खरे होणार असेल तर आपले दुकान रिकामे करून ज्यांना ज्यांना मदत करून सुखी करता येईल त्यांना आपण मदत केली पाहिजे असे तिल्लोला वाटते. तसे ती करतेही. फक्त हरून ज्याला गुंडांनी मारले आहे तो पूर्ण बरा झालेला नाही याचे शल्य तिच्या मनात रहाते. पण हरूनला त्याच्या शेजारी रहाणारी तलाक घेऊन अमेरिकेत भावाकडे आलेली हमीदा आपल्या प्रेमाने व शुश्रुषेने नक्की बरे करेल याची तिला खात्री वाटते. त्या दोघांच्या सुखी सहजीवनासाठी कमळकंदाची भुकटी मंत्रून त्याचा ताईत बनवून ती त्यांना देते तेव्हा आपले हेही कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान तिल्लोला मिळते.
मकरध्वज ही औषधी वापरून केवळ एका रात्रीसाठी आपण रेवनसाठी तरूण व सुंदर व्हावे आणि ज्या सुखासाठी आपण तळमळतो आहोत ते मिळवावे असे तिल्लो ठरवते.प्रत्यक्षात तसे करून तिल्लो रेवनचे व स्वतःचे एकाकीपणही एका रात्रीसाठी दूर करते. पण त्यानंतर ती दुकानात परत जायचे ठरवते. रेवनच्या गाडीतून त्याला आपण नेमके काय करणार आहोत याची कल्पना न देता तिल्लो अपरात्री तिच्या दुकानात येते आणि ज्वालामुखीच्या राखेत उगवलेली लाल मिरची हाती धरून शंपतीचा पक्षी कधी सर्वनाश करेल याची वाट पाहू लागते. रेवन तिल्लोला अनिच्छेने तिच्या दुकानात सोडून त्याच्या घरी परततो. तिल्लो परत कधीच येणार नाही आणि आपल्याला एकट्यालाच पुन्हा एकदा आपल्या स्वप्नातील सुखाचा स्वर्ग शोधावा लागणार आहे हे लक्षात येऊन रेवन तिरीमिरीत आपले सामान बांधून घर सोडून जाण्याची तयारी करत असतो. पण खोल अंतर्मनात त्याला तिल्लोची काळजी वाटत रहाते, मन तिच्याकडे ओढ घेत रहाते. अखेरीस तो सामान तसेच ठेवून गाडी काढून परत तिल्लोच्या दुकानाकडे निघतो. वाटेतील पुलावर त्याला लक्षात येते की भूकंप होतो आहे. त्याची गाडी भेलकांडते पण सुदैवाने कोणताही अपघात न होता तो तिल्लोच्या दुकानापर्यंत पोहचतो. दुकान उद्वस्थ झालेले त्याला दिसते पण तरीही त्याचे मन त्याला तिल्लो जिवंत असेल असे सांगत रहाते. तो उद्वस्थ घरात तिल्लोला हाका मारत शोधू लागतो, तिचा कुठेच मागमूस दिसत नाही म्हणून निराश होऊन तो थबकतो तेव्हात ढिगाऱ्याखालून त्याला तिल्लोचा हात बाहेर आलेला दिसतो. ढिगारा जिद्दीने उचलत रेवन तिल्लोला वाचवतो. तिला घेऊन तो तसाच जळणारे शहर, जागोजागी पडलेल्या इमारती, पूल,खचलेले रस्ते चुकवत शहराबाहेरची वाट पकडतो. आता आपण दोघेच आपल्या स्वप्नातील स्वर्गीय ठिकाणी जाऊ नी शांतपणे जगू असे तो तिल्लोला समजावतो. पण शहराबाहेरच्या घाटरस्त्यावर तिल्लो त्याला गाडी थांबवायला लावते. गाडीतून उतरून ती खाली पाहते तेव्हा जळणारे शहर तिला असह्य वेदना देते.आपणच शहराच्या या वाताहतीला कारणीभूत आहोत असे तिल्लोला वाटू लागते. रेवन तिला समजावू पाहतो की ऑकलंड हे नेहमीच भूकंपप्रवण क्षेत्र होते.पण ज्या शहरातील लोकांना सुखाचा मार्ग दाखवायला आपल्याला वृद्ध गुरूने पाठवले होते ते शहर दुःखाने तडफडत असताना आपण स्वतःचे सुख मिळवण्यासाठी पळून जाणे हा स्वार्थीपणा होईल असे तिल्लोला वाटू लागते. ती रेवनला सांगते की त्याने स्वर्गीय सुख शोधायला निघून जावे पण तिला येता येणार नाही. सुरवातीला रेवन तिच्यावर चिडतो पण अखेरीस तिच्याशिवाय आता आपण कुठेच सुखी होऊ शकणार नाही हे लक्षात येऊन तोही परत ऑकलंडला जायचा निर्णय घेतो. परतीच्या वाटेवर तिल्लो त्याला सांगते की आता परत एकदा तिचे नाव बदलावे लागेल. माया हे नाव ती धारण करते आणि पुनश्च रेवनसह आपल्या कर्मभूमीकडे वळते.मायाचा अर्थ जादू असा आहे आणि प्रेम असाही आहे.

‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचे कथानक असे नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले, अद्भूतरम्य वाटावे असे आहे. या कथानकातून कोणता कथासूत्रे ठळक होतात ते आता लक्षात घेऊ.
१) तिल्लो आणि रेवन दोघांच्याही जीवनदृष्टीतला फरक हा भारतीय व अमेरिकन संस्कृतीतला फरक आहे असे लेखिकेला म्हणायचे असावे.पण कोणतीही एक संस्कृती श्रेष्ठ नी दुसरी वाईट असे काही लेखिका म्हणत नाही हेही लक्षात घ्यावे लागेल.तिल्लो आणि रेवन यांनी सुखी होण्यासाठी शोधलेले मार्ग दोघांनाही पुनःपुन्हा असमाधानाकडे नेणारे ठरले आहेत हे लेखिका दाखवते आहे.
तिल्लोने व्रतस्थ जीवनसरणी स्वीकारून दुसऱ्यांच्या सुखात स्वतःचे सुख शोधण्याचा निवडलेला मार्ग अखेरीस तिला अतृप्तीकडे, असमाधानाकडे घेऊन गेला आहे. आणि स्वतःच्या सुखासाठी तिला रेवनचे प्रेम स्वीकारावे लागले आहे.
रेवनने एका क्षणी आईशी संवाद तोडणे आणि पैशातून सर्व सुखे मिळवण्याचा आत्मकेंद्री हव्यास त्याला लागणे हे चित्र लेखिका दाखवते. पण तोच रेवन प्रचंड संपत्ती मिळवूनही अस्वस्थ आहे, एकाकी आहे. भौतिक सुखे मिळवूनही तो मनातून असमाधानी आहे असेही लेखिका दाखवते.अनेक बायकांशी संग करूनही जे प्रेम रेवनला गवसलेले नाही ते तिल्लोशी मनमोकळेपणाने बोलताना त्याला गवसल्यासारखे वाटते.
प्रेमशून्यता माणसाला दुःखी करते हे तिल्लो व रेवन दोघांनाही अनुभवाअंती पटले आहे.
२) तिल्लोकडे जन्मतःच अतिंद्रीय शक्ती आहे पण तशी ती असूनही अंतिमतः ती मानवी गुण-दोषांनी भरलेली आहे.नयनतारा ते माया या प्रवासात तिल्लो कशी हळूहळू बदलत गेली हे लेखिकेला दाखवायचे आहे. कधी अतीआत्मविश्वास, अहंकार तर कधी नेतृत्व करण्याचा आलेला वीट आणि अखेरीस संयमी, व्रतस्थ जगण्यातून वाट्याला आलेल्या एकाकीपणाची असह्यता यातून एक स्त्री कशी बदलत जाते हे तर लेखिका दाखवतेच पण शेवटी स्वार्थ व परमार्थ या दोहोंच्या संतुलनातूनच स्वर्गसुखाची प्राप्ती मनुष्याला होऊ शकते असे कथासूत्र लेखिका तिल्लो व रेवन या दोघांच्याही जीवनप्रवासातून स्पष्ट करते आहे.
३) अमेरिकेतील लोकांची सुखासीन जीवनसरणी, त्यांच्या समाजाातील तरूणांना असलेले गतीचे वेड, त्यांच्या आलिशान गाड्या, महागड्या मोटारसायकली आणि त्यावरून प्रचंड आवाज करत जाणारी मद्यधुंद जोडपी हे चित्र लेखिका दाखवते. जगदीशसारख्या मूळच्या सरळमार्गी मुलालाही या तरूणांनी ड्रग्जच्या धंद्यातून मिळणाऱ्या पैशांच्या नादी लावलेले तिल्लो पहाते तेव्हा ती अस्वस्थ झालेली लेखिका दाखवते. अमेरिकन संस्कृतीतला हा भाग वाईट आहे असे कथासूत्र लेखिकेला ठळक करायचे आहे.
४) ललिता अहुजासारखी साधी-सरळ स्त्री लग्न होऊन नवऱ्याबरोबर अमेरिकेला आली तरी त्याच्या पुरूषी अहंकारामुळे तिच्या वाट्याला असह्य शारीर व मानसिक वेदना आली आहे.अमेरिकेसारख्या आधुनिक विचारसरणीच्या देशात ललिताचा नवरा मात्र जुनाट पुरूषी वर्चस्वाच्या विचारांना कवटाळून बसला आहे आणि दुःखी झाला आहे हे लेखिका दाखवते. ललितासारख्या स्त्रियांना अशा जुलमी नवऱ्यांपासून सुटका करून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वातंत्र्य मिळवावे लागेल तरच त्या सुखी होतील हेही कथासूत्र लेखिका ठळक करते.
५) बंगाली निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने आपल्या नातीने गीताने मेक्सिकन मुलासोबत रहायचे ठरवले म्हणून त्रागा करणे हा त्याच्या प्रेमातील आंधळेपणा आहे असे एक कथासूत्र लेखिका मांडते. अशा माणसांना या आंधळेपणातून बाहेर आल्याशिवाय आणि वास्तवाचा स्वीकार खुल्या दिलाने केल्याशिवाय सुखी होता येणार नाही असे लेखिका सुचवते आहे.
६) हरूनसारखा सरळमार्गी मुस्लिम तरूण तिल्लोसारख्या व्रतस्थ बाईला देवस्थानी ठेवतो त्यामुळे तिने रेवनबरोबर असणेही त्याच्या मनातील तिच्या प्रतिमेला हादरा देते. पण गुंडांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्यावर आपण बरे होतो आहोत ते केवळ हमीदासारख्या तलाक घेतलेल्या स्त्रीच्या प्रेमामुळे व शुश्रुषेमुळे हे जेव्हा हरूनला जाणवते तेव्हा तिल्लोलाही प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे हे त्याला पटते व तो तिला आहे तसे स्वीकारू शकतो हे दाखवून प्रेमाच्या सर्वव्यापकतेचे सूत्र लेखिका ठळक करते.
७) अखेरीस तिल्लो रेवनसोबत स्वर्गसुख मिळवण्यासाठी शहर सोडून जायला निघालेली असतानाही दुःखाच्या धगधगत्या दर्शनाने भानावर येऊन परत फिरते व तिच्यासोबत रेवनलाही परत फिरून दुःखितांचे अश्रू पुसण्याचा मार्ग स्वीकारावासा वाटतो असे लेखिका दाखवते तेव्हा जगाला प्रेम अर्पावे हाच खरा धर्म , खरा सुखा-समाधानाचा मार्ग आहे हे कथासूत्र तिला अधोरेखीत करायचे आहे हे स्पष्ट होते.अतिरेकी भोग किंवा अतिरेकी त्याग यापैकी कशानेच व्यक्ती सुखी होऊ शकत नाही तर या दोहोंच्या संतुलनातून निघालेला मध्यममार्गच केवळ व्यक्तीला नाही तर संपूर्ण मानवजातीलाच सुखी करू शकते असा संदेश लेखिका आपल्या कादंबरीतून देते आहे.
अशाप्रकारे ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या चित्रा बॅनर्जी-देवकारूणी यांच्या कादंबरीचे कथानक व कथासूत्र आपण लक्षात घेतली. आता ही कादंबरी तुम्हाला मूळातून वाचावयाची आहे का हा निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे.कधीकधी वास्तवाच्या प्रखर दर्शनापेक्षा ते असे नाट्यपूर्ण, अद्भुतरम्य शैलीत व्यक्त झालेले पहाण्यातही गंमत वाटू शकते.
पुढील ब्लॉगमध्ये आपण ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचे कथनाच्या अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-गीता मांजरेकर
________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा