आजच्या ब्लॉगमध्ये चित्रा बॅनर्जी-दिवाकारूणी या इंग्रजी कादंबरीकार महिलेचा परिचय आपण करून घेणार आहोत.हा परिचय छोटासाच आहे. तुम्हाला वाचायला पाच मिनिटेच लागतील !त्यामुळे आज ऑडियो फाईल जोडलेली नाही.
चित्रा बॅनर्जा-दिवाकारूणी या भारतीय वंशाच्या अमेरिकन कादंबरीकार आहेत.त्यांचा जन्म १९५६ मध्ये कोलकट्टा येथे झाला.त्यांचे इंग्रजी साहित्यात पदवीपर्यंतचे शिक्षणही कोलकट्टा येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील राईट स्टेट विद्यापीठातून एम. ए. केले आहे आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून नाटककार ख्रिस्तोफर मर्लो यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास करून त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे.

अमेरिकेत शिक्षण घेत असताना आणि आपले बस्तान बसवताना लहान मुलांना सांभाळणे, दुकानात कारकुन म्हणून काम करणे, बेकरीत ब्रेड कापण्याचे काम करणे, प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणे अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केली.त्यानंतर सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी फुटहिल कॉलेज, डियाब्लो वॅली कॉलेज येथे काम केले. आता त्या टेक्सास येथे रहात आहेत,आणि ह्युस्टन विद्यापीठात सर्जनशील लेखनाचे अध्यापन करणाऱ्या ‘मॅक डेव्हिड प्रोफेसर’ हे पद त्या भुषवीत आहेत.
चित्रा बॅनर्जी यांनी मुर्ती दिवाकारूणी यांच्याशी विवाह केला आहे आणि त्यांना आनंद व अभय असे दोन मुलगे आहेत.
‘मैत्री’ या कौटुंबिक अत्याचाराने पिडीत महिलांना मदत पुरविणाऱ्या हेल्पलाईनच्या संस्थापक व अध्यक्ष म्हणून चित्रा यांनी १९९१ पासून सॅनफ्रान्सिस्को येथील प्रामुख्याने दक्षिण आशियाई स्थालांतरीत स्त्रियांसाठी बरेच काम केले आहे.ह्युस्टन येथील ‘दया’ या अशाच प्रकारचे सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या त्या सल्लागार आहेत.भारतीय स्थलांतरीतांच्या शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या ‘प्रथम’ या संस्थेचे कामही चित्रा बॅनर्जी यांनी केले आहे.
चित्रा बॅनर्जी यांनी कविता, लघु कथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यांचा एकूण कल साहित्यकृतीतून कल्पिताची जादुई रचना करण्याकडे आहे.बाल साहित्यही त्यांनी लिहिले आहे.
‘ब्लॅक कॅंडल ऍंड लिव्हिंग युबा सिटी’ हा चित्रा बॅनर्जी यांचा काव्यसंग्रह आहे. तर ‘अरेंज्ड मॅरेज’ या त्यांच्या लघुकथा संग्रहाला ‘अमेरिकन बुक अवॉर्ड’, ‘पेन जोसेफाईन माईल्स अवॉर्ड’ आणि ‘बे एरिया बुक रिव्ह्यु अवॉर्ड’ मिळाला आहे.
‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’, ‘सिस्टर्स ऑफ माय हार्ट’ , ‘क्विन ऑफ ड्रिम्स’, ‘वन अमेझिंग थिंग’ , ‘पॅलेस ऑफ इल्युजन’ , ‘ऑलिऍंडर गर्ल’ , ‘बिफोर वी व्हिजिट दी गॉडेसेस’, ‘इंडिपेन्डन्स’ या चित्रा बॅनर्जी यांनी लिहिलेल्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.’ब्रदरहुड ऑफ कॉंच’ ही बाल-कुमारांसाठीची कादंबरीही त्यांनी लिहिली आहे.या पुस्तकासाठी त्यांचे नाव ‘ब्लुबॉनेट अवॉर्ड’च्या नामांकन यादीत आले होते. अशा बालकुमारांसाठीच्या कादंबऱ्यांची मालिकाच त्यांनी पुढे सादर केली आहे. त्यात ‘दी मिरर ऑफ फायर’ , ‘ड्रिमिंग’ आणि ‘शॅडोलॅंड’ या कादंबऱ्या आहेत.
ऐतिहासिक, पौराणिक कथांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहून त्याची पुनर्रचना करण्याचा प्रयोगही त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून केला आहे. त्यामुळे त्यांचे साहित्य वादग्रस्तही ठरले आहे. चित्रा यांच्या वास्तववादी लेखनात भारत आणि अमेरिका दोन्हीकडील माणसे, घटना यांचा संदर्भ असतो. विशेषतः दक्षिण आशियाई स्थलांतरीतांचे अनुभव त्या आपल्या साहित्यात मांडतात.
चित्रा बॅनर्जी यांचे साहित्य ‘अटलांटिक मंथली’,’ दी न्युयॉर्कर’ या महत्त्वाच्या अमेरिकन नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे.तसेच त्यांच्या साहित्यकृती डच, हिब्रू, बंगाली, तुर्की आणि जपानी भाषांत भाषांतरीतही झाल्या आहेत.
चित्रा यांच्या ‘ दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीवर आधारित चित्रपट त्याच नावाने २००५ साली प्रदर्शित झाला. ‘सिस्टर्स ऑफ माय हार्ट’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित मालिका सुहासिनी मनिरत्नम यांनी तमिळ भाषेत प्रदर्शित केली आहे.’दी पॅलेस ऑफ इल्युजन’ या बहुचर्चित कादंबरीवर आधारित चित्रपटही निर्माण होणार आहे.याच कादंबरीवर आधारित नाटक ‘फायर ऍंड आईस’ या नावाने रंगमचावर सादर झाले आहे.चित्रा यांच्या काही कथांवर आधारित नाट्यकृतीही रंगभूमीवर सादर झाल्या आहेत.
पुढील ब्लॉगमध्ये आपण चित्रा बॅनर्जी- देवकारूणी यांच्या ‘दी मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे यांचा परामर्श घेणार आहोत.
-गीता मांजरेकर
_______________________________________________________

यावर आपले मत नोंदवा