मागील दोन ब्लॉग्जमध्ये आपण भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी यांनी लिहिलेल्या ‘नेमसेक’ या कादंबरीचा परिचय करून घेतला. आज आपण झुंपा लाहिरी यांनी लिहिलेल्या ‘दी लोलॅंड’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे जाणून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी ऑडियो फाईल सोबत जोडली आहे.

झुंपा लाहिरी यांची ‘दी लोलॅंड’ ही कादंबरी २०१३ मध्ये प्रकाशित झाली आहे. ही एक व्यामिश्र कथानक असलेली ३४० पृष्ठांची दीर्घ कादंबरी आहे.वाचकांना अंतर्मुख करणारी ही कादंबरी ठरते.कादंबरीचा काळ साधारण १९५० ते २००० असा सुमारे पन्नास वर्षांचा आहे.ही कादंबरी घटनाप्रधान आहे पण लेखिकेने कादंबरीतल्या मोजक्याच व्यक्तिरेखांची स्वभावरेखाटनेही तपशीलवार केली आहेत.प्रत्येक व्यक्तिरेखेचे वागणे तार्किक वाटेल अशी कार्यकारणपरंपराही कथानकात आहे. त्यामुळे कादंबरी कुठेही असंभवनीय वाटत नाही.

या कादंबरीतील घटनांचे  अवकाश प्रामुख्याने कलकत्त्यातील टॉलिगंज ही वस्ती आणि अमेरिकेतील ऱ्होड आयलंड हे शहर हे आहे. क्वचित काही घटना अमेरिकेतील अन्य काही ठिकाणीही घडलेल्या आहेत.कादंबरीतील कथानक  प्रामुख्याने सरळ रेषेत पुढे सरकणारे  आहे पण ते अधूनमधून भूतकाळात जाते. भूतकाळातील  एका घटनेकडे ते परतपरत येत रहाते.कारण ती घटना मित्रा कुटुंबाचे शांत आयुष्य ढवळून टाकणारी घटना ठरली आहे.कथानकाला कलाटणी देणारी ही घटना वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून कथानकात तीन-चार वेळा सांगितली जाते.

‘दी लोलॅंड’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी मित्रा या आडनावाचे एक मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब आहे. या कुटुंबातील तीन पिढ्यांतील व्यक्ती कथानकाच्या ओघात वाचकांना उलगडत जातात.

सुभाष आणि उदयन ही मित्रा कुटुंबातील मुले साधारण दुसऱ्या महायुध्दाच्या काळात जन्माला आली आहेत.त्यांचे वडील सरकारी कार्यालयात काम करणारे पापभिरू गृहस्थ आहेत. त्यांनी थोडीफार बचत करून कलकत्त्यातील टॉलिगंज या भागात छोटासा जमिनीचा तुकडा खरेदी करून त्यावर साधेच बैठे घर बांधले आहे. पुढेमागे अधिक पैसे हाती आल्यावर या घरावर मजला चढवण्याचा त्यांचा बेत आहे.टॉलिगंज ही कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. या भागात कधीकाळी टिपू सुलतानाची इंग्रजांनी आश्रय दिलेली मुले व कुटुंबीय रहात होते. त्यामुळे मुस्लीम आणि हिंदू असे दोन्ही धर्माचे लोक या वस्तीत रहातात. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वस्तीत एका बाजूला पाणथळ खोलगट जागा आहे. पावसाळ्यात तिथे पाणी साचते, पाऊस संपला की त्या साचलेल्या पाण्यात जलपर्णी माजते. या पाणथळ भागापलीकडे ओसाड शेतजमीनी आहेत.मुले त्या भागात फुटबॉल आणि अन्य खेळ खेळतात. टॉलिगंज हे नाव ‘टॉली’ या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नावावरून पडले आहे. या अधिकाऱ्याने ब्रिटीशांसाठी आणि शहरातील श्रीमंतांसाठी तयार केलेले गोल्फ ग्राउंड वस्तीला लागूनच आहे.एकेकाळी या मैदानाला तारेचे कुंपण होते आणि आम्ही ब्रिटीशांचा गोल्फचा खेळ कुंपणापलीकडून पहात असू असे सुभाष व उदयनच्या वडिलांनी त्यांना सांगितले आहे. पण आता या मैदानाला उंच दगडी कुंपण घातले गेले आहे. त्यामुळे सुभाष व उदयन या मुलांना त्या कुंपणापलीकडील मैदान , त्यातील गोल्फ खेळणारी माणसे पाहण्याचे कुतूहल आहे.वस्तीतील बिस्मिल्ला या मैदानातून फेकून दिलेले चेंडू आणि गोल्फ स्टिक या मुलांना पाच -दहा पैशांना विकतो.त्यामुळे तर मुलांच्या मनात गोल्फ ग्राउंड बघण्याची उत्सुकता वाढते. रात्र पडली की ते दोघे हळूच घरून बाहेर पडतात. रॉकेलचा रिकामा पत्र्याचा डबा सोबत घेऊन ते गोल्फ ग्राउंडच्या कुंपणापाशी येतात नी डब्यावरून कुंपणावर चढून पलीकडे उड्या मारतात. सोबत डबाही पलीकडे आणतात. मैदानात कडेला पडलेले बॉल खिशात भरून परत कुंपणावरून उडी मारून घरी पळायचे हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे. पण एके दिवशी गोल्फ ग्राऊंडचा पहारेकरी त्यांना रंगेहात पकडतो आणि गोल्फ स्टिकनेच मारतो.तेव्हापासून त्या गोल्फ ग्राउंडबद्दल आणि तिथे खेळणाऱ्या श्रीमंतांबद्दल उदयनच्या मनात अढी निर्माण झाली आहे.

सुभाष आणि उदयन या टॉलीगंजच्या काहीशा बकाल वस्तीतच लहानाचे मोठे झाले आहेत. त्या दोघांच्या वयात केवळ पंधरा महिन्यांचेच अंतर आहे त्यामुळे ते दोघे परस्परांचे सवंगडी आहेत. शाळेत, खेळताना आणि कुठेही जाताना ते दोघे सतत एकत्र असत.दोघांचे स्वभाव मात्र भिन्न आहेत. सुभाष मोठा आहे आणि स्वभावाने शांत आहे याउलट धाकटा उदयन उचापती करणारा,आक्रमक स्वभावाचा आहे.त्यांच्या आई-वडिलांची अर्थातच मुलांनी शिकावे, चांगल्या नोकऱ्या पत्कराव्यात अशीच अपेक्षा आहे. मुले अभ्यासात हुशार आहेत. शाळेत ती चांगल्या गुणांनी पास होतात.उच्च शिक्षणासाठी दोघेही विज्ञान शाखा निवडतात.पण भिन्न महाविद्यालयांत प्रवेश घेतात.दोघांचे मित्रमंडळही त्यामुळे आपोआपच बदलते. उदयन जुन्या सामानातून टाकून दिलेले रेडियोचे सुटे भाग मिळवून घरातच रेडियो बनवतो. रोज रात्री त्या रेडियोवर दोघेही जगभरातल्या बातम्या ऐकू लागतात.एके दिवशी याच रेडियोवर त्यांना बंगालच्या सीमेवरील नक्षलबाडी या गावात काही शेतकऱ्यांनी त्यांची पिळवणूक करणाऱ्या जमिनदाराला कसे पेटवून दिले आणि ते शेतकऱ्यांच्या बंडाचे लोण हळूहळू कसे बंगालमध्ये पसरते आहे त्याबद्दल बातमी ऐकू येते. उदयनला ही बातमी नवचैतन्य देणारी वाटते तर सुभाषला मात्र न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी उचललेले हे हिंसक पाऊल चुकीचे वाटते.

 उदयन पहाता पहाता कनु सन्याल आणि मुझुमदार या कम्युनिस्ट नेत्यांच्या भाषणांनी प्रभावीत होतो. चीनची माओनो केलेली क्रांती त्याला आशादायी वाटते. भारतातील वाढती विषमता संपवण्यासाठी कम्युनिस्टांचा क्रांतीचा मार्गच अवलंबावा लागेल यावर उदयनचा ठाम विश्वास बसतो.हळूहळू तो नक्षलवादी संघटनेच्या गुप्त सभांना जाऊ लागतो. सुभाषलाही एकदा तो अशा सभेला घेऊन जातो पण सुभाषला त्या सभेतील विचार पटत नाहीत.तो उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला जाता यावे यासाठी खटपट करू लागतो आणि पूर्ण स्कॉलरशिप देणाऱ्या ऱ्होड आयलंड येथील विद्यापीठात प्रवेश मिळवतो. सुभाष अमेरिकेला जातो आणि उदयनची नक्षलवादी संघटनेकडे असणारा ओढा आणखीनच वाढतो.

सुभाष ऱ्होड आयलंडला एकटाच राहून आपल्या आवडत्या ओशोनोग्राफी या विषयात संशोधन करू लागतो. अमेरिकेतले वातावरण, संस्कृती सगळेच त्याच्यासाठी अगदी वेगळे असल्याने तिथे जुळवून घेणे त्यालाही सोपे नसतेच. १९६० च्या सुमाराचा हा काळ आहे. अमेरिकेतून कलकत्त्याच्या आपल्या कुटुंबिय़ांशी संपर्क साधण्यासाठी पत्र हा एकच मार्ग त्याच्याकडे आहे. पण अशी पत्रे लिहिण्याची सुभाषला आवड नसल्याने तो कुटुंबापासून अधिकाधिक दुरावत जातो.त्याच्या खोलीत रहायला आलेला अमेरिकन मुलाशी सुभाषची थोडीफार मैत्री होते.पण बराचसा वेळ तो प्रयोगशाळेतच घालवू लागतो.

सुभाषला उदयनची काळजी वाटते पण ती तो व्यक्त करत नाही. उदयन सुभाषला पत्र पाठवतो. त्यातून तो हेतूतः नक्षलबारी चळवळीतल्या आपल्या सहभागाबद्दल लिहित नाही. उदयनच्या खुशालीच्या पत्रांतूनच एकदा सुभाषला कळते की उदयनने गौरी नावाच्या त्याच्या मित्राच्या बहिणीशी प्रेमविवाह केला आहे. सोबत गौरीचा फोटोही त्याने पाठवलेला असतो.सुभाषला वाटते की ही गौरी आता उदयनच्या आयुष्यातील आपली उणीव कदाचित भरून काढेल.आपल्या एकटेपणाबद्दल त्याला प्रकर्षाने जाणीव होते.त्याच सुमारास समुद्रकिनारी फिरत असताना एका अमेरिकन बाईशी सुभाषचा परिचय होतो. ती एक घटस्फोटीत स्त्री आहे आणि तिला जोशुआ हा छोटा मुलगा आहे.सुभाषची जोशुआशी दोस्ती होते. तो त्याला पोहायला शिकवतो, माशांची माहिती देतो.जोशुआची आई दर शनिवारी त्याला त्याच्या वडिलांकडे पाठवते. एके शनिवारी ती सुभाषला तिच्या घरी आमंत्रीत करते आणि त्याची हरकत नसेल तर दर शनिवार रविवारी त्याने आपल्याकडे य़ावे असेही सुचवते. सुभाषसाठी स्त्रीचे असे वागणे आश्चर्यकारक असले तरी तोही तिचे आमंत्रण धुडकावू शकत नाही. पण सुभाष आणि जोशुआच्या आईचे हे नाते लौकरच संपुष्टात येते कारण जोशुआच्या आई-वडिलांनी परत एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला असतो.सुभाषला हा प्रेमभंगाचा अनुभव पचवणे जड जाते.

 दोन वर्ष सरतात आणि सुभाषला तार येते की उदयन पोलिसांकडून मारला गेला आहे.सुभाषला तातडीने कलकत्त्याला परतावे लागते.टॉलिगंजच्या त्यांच्या घरी त्याच्या आई-वडिलांची दुःखाने दयनीय झालेली अवस्था सुभाषला पहावत नाही. पण त्याही परिस्थितीत आपल्या आईने उदयनच्या बायकोला- गौरीला जणू वाळीतच टाकल्यासारखे वागवणे सुभाषला खटकते.सुभाष उदयनच्या बायकोशी- गौरीशी हळूहळू संवाद साधतो. जेमतेम चोवीस वर्षांची ही मुलगी गरोदर आहे आणि वैधव्य आल्याने यापुढे तिच्या वाट्याला विरक्त जगणे येईल , तिचे शिक्षण बंद होईल, प्रगतीचे सगळे मार्गच बंद होतील हे कळल्यावर सुभाष गौरीशी विवाह करून तिला अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. त्याचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना आवडत नाही. पण सुभाष ठामपणे आपला निर्णय प्रत्यक्षात आणतो. गौरीचा भाऊ मानस त्याला पाठिंबा देतो. गौरीशी विवाह करून सुभाष अमेरिकेला जातो आणि काही महिन्यांतच तो तिची अमेरिकेला येण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विमानाचे तिकिट पाठवतो.

गौरी ही तिच्या आई-वडिलांचे शेंडेफळ आहे. आई-वडिलांचे प्रेम तिच्या वाट्याला आलेले नाही. कारण शिक्षणासाठी ती आणि तिचा एक भाऊ मानस लहानपणापासून आपल्या आजीआजोबांकडे, कलकत्त्यात राहिले आहेत.त्या शहराच्या मध्यवर्ती भागातील घरात काका-काकी व त्यांच्या मुलाबाळांत गौरीने स्वतःला नेहमीच वेगळे ठेवले आहे. ती एक मनस्वी ,स्वतःतच रमणारी मुलगी आहे. पुस्तके हेच तिचे मित्र आहेत. तिचा सख्खा मोठा भाऊ मानस आणि आजी-आजोबा  तेवढे तिला जवळचे वाटतात. त्या घराची गॅलरी गौरीसाठी सर्वस्व आहे. त्या गॅलरीतून दिसणारी वहातुक ती तासनतास पहात बसते. तिथेच ती अभ्यास करते, तिथेच ती आपले अंथरूण घालते.गौरीच्या या आत्ममग्न स्वभावाला तडा देतो उदयन- मानसचा कॉलेजमधील मित्र.उदयन मानस नसताना कधी घरी आला तर गौरीशी बोलत बसतो.हळूहळू तो स्वतःचा प्रभाव तिच्यावर पाडतो, तिला आकर्षीत करतो, धीट बनवतो आणि प्रेमविवाहासाठी तिला राजी करतो.उदयन नक्षलवादी चळवळीत आहे याची गौरीला कल्पना असते. पण ही चळवळ नेमकी काय आहे आणि त्यात उदयनला किती धोका आहे याची तिला जाणीव नसते. उदयनच्या घरची परिस्थितीही तिला माहीत नसते. ती एक पुस्तकात रमणारी मुलगी असल्याने वास्तवापासून अनभिज्ञच असते.उदयनशी लग्न झाल्याने गौरीला एकदम वास्तवाला सामोरे जावे लागते. घरी सासू तिच्याकडून घरकामाची अपेक्षा करते आणि गौरीला मात्र पुस्तके वाचावीत, अभ्यास करावासा वाटतो.परिस्थितीशी ती जुळवून घेत असतानाच उदयन तिला एक शिकवणी घेण्यासाठी प्रवृत्त करतो. तो स्वतःही शाळेत शिकवत असतो.गौरी ज्या घरी शिकवणी घेण्यासाठी जाते त्या घराच्या खिडकीतून तिने खाली रस्त्यावर नजर ठेवावी आणि एक पोलिस त्या रस्त्याने किती वाजता जातो-येतो त्यावेळा नोंदवाव्या असे काम उदयन तिला देतो. याआधीही चळवळीची पत्रके, निरोप पोहचवण्याचे काम गौरीने केलेले असते. तिला सांगितल्याप्रमाणे ती पोलिसावर पाळत ठेवते आणि तो आपल्या शाळकरी मुलाला घरी आणायला कधी जातो, कोणत्या दिवशी त्याला रजा असते वगैरे सगळी माहिती ती उदयनला पुरवते. ती माहिती उदयनला का हवी आहे याची तिला कल्पनाही नसते. उदयन नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येत रहातो. त्याच्या हाताला काहीतरी लागले आहे ते ती पाहते. पण नव विवाहीत तरूणी म्हणून ती उदयनच्या सगळ्याच गोष्टींनी भारावून जाणारी आहे.त्याला ताप येतो, तो झोपेतून उठतो तेव्हा थरथरत असतो आणि त्याने जे काही केले आहे त्यामुळे आपल्याशी त्याच्या वागण्यातही बदल झाला आहे हे कळूनही न कळल्यासारखे करणे गौरीला सोयीचे वाटते. पोलिस आपल्या पाळतीवर आहेत हे उदयनला माहीत आहे. पण तरीही पळून जाण्यापेक्षा घरी परतणेच तो पसंत करतो. पोलिस दरवाजाशी येतात तेव्हा तो हलकेच घरामागच्या पाणथळीतील जलपर्णीत जाऊन लपतो. गौरीला ते माहीत आहे.पाण्यात लपले असताना उदयनच्या मनात विचार येतो की आपण एका पोलिसाला मारण्याचे हिंसक कृत्य करून नेमकी कोणती क्रांती घडवली ? एका मुलाला आपण अनाथ केले हे जाणवून तो हळहळतो.आपल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप होतो.

 पोलिस घराची झडती घेतात पण उदयन सापडत नाही. पण गौरीला ते प्रश्न विचारतात तेव्हा ती गडबडते. पोलिसांना उदयन पाणथळीत लपला आहे हे कळते. ते त्या धमकी देतात की तो शरण आला नाही तर त्याच्या कुटुबीयांना मारले जाईल. उदयनला ते ऐकू येतेच असेही नाही पण पाण्याखाली फार काळ श्वास रोखून बसणेही त्याला अशक्य होते आणि तो पाण्याबाहेर येतो. पोलिस त्याला ताब्यात घेतात. तो गयावया करतो.पण पोलिस त्याला गाडीत बसवतात. ते आता आपल्याला तुरूंगात नेतील असे उदयनला वाटत असतानाच ते ओसाड शेतात त्याला उतरवतात आणि माघारी आई-वडिलांकडे चालत जा असे सांगून पाठमोऱ्या उदयनवर गोळ्या झाडून ते त्याला ठार करतात.गौरी घराच्या गच्चीवरून ते दृष्य पाहते.ते कायमचे तिच्या मनात ठसून रहाते.गौरी गरोदर आहे हे उदयनच्या मृत्यूनंतर तिच्या सासूच्या लक्षात येते.एका बाजूला गौरी उदयनचा अंश आपल्या उदरात बाळगून आहे हे कळल्याने तिच्या सासु-सासऱ्यांना दिलासा वाटतो पण उदयन ज्या प्रकारे मारला गेला आहे त्याने तेही सुन्न झाले आहेत.परिणामी ते गौरीशीही प्रेमाने वागू शकत नाहीत.

सुभाष जी सहानुभूती दाखवतो त्यामुळे तसेच उदयनच्या व त्याच्या आवाजातील साधर्म्यामुळे गौरी सुभाषशी लग्नाला तयार होते. आहे त्या वास्तवापासून दूर जाण्याचा तोच एक मार्ग तिला दिसतो.ऱ्होड आयलंडला विद्यापीठ परिसरातच सुभाष गौरीबरोबर संसार सुरू करतो. गौरीचे बाळंतपण आणि छोट्या बेलाला सांभाळायची मोठी जबाबदारी आपला अभ्यास सांभाळून सुभाष पार पाडतो.बेला त्याच्यासाठी जगण्याचा आधारच बनते.इतकी की गौरीपेक्षा बेला सुभाषच्या सहवासातच अधिक आनंदात राहू लागते.गौरी सुभाषशी शारीर संबंध ठेवते पण उदयनचे रोमॅंटिक प्रेम तिला सुभाषकडून मिळत नाही.सुभाषच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून रहावे असेही तिला वाटत नाही.  लौकरच तिच्या मनात सुभाषबद्दल असुया निर्माण होते. बेला त्याच्याशी अधिक जोडलेली आहे ही गोष्टही तिला संसारापासून अलिप्त करते. ती विद्यापीठात तत्वज्ञानाची व्याख्याने ऐकण्यात, पुस्तके वाचण्यात रमू लागते. आपण तत्वज्ञान या विषयातच पुढील शिक्षण घ्यावे ही आकांक्षा तिच्या मनात रूजू लागते. सुभाष गौरीला बेलाची हेळसांड करू नकोस असे सांगत रहातो. पण गौरीला आता बेलाची जबाबदारी नकोशी वाटते.

आपले वडील गेल्याची बातमी सुभाषला कळते आणि बेलाला घेऊन कलकत्त्याला जाण्याचा निर्णय सुभाष घेतो.गौरी कामाचे निमित्त सांगून कलकत्त्याला यायला नकार देते. बेला बारा वर्षांची आहे.ती पहिल्यांदाच आपल्या आजीला भेटते.सुभाष बेलाला कलकत्त्यातील सगळी प्रेक्षणीय ठिकाणे दाखवतो.अगदी लहानपणी अप्राप्य वाटलेल्या गोल्फ ग्राऊंडवरही तिला घेऊन जातो. पण उदयनबद्दल तो तिला काहीच सांगत नाही.

सुभाष आणि गौरी ऱ्होड आयलंडच्या घरी परततात तेव्हा त्यांना गौरीची चिठ्ठी मिळते. ती त्यांना सोडून कॅलिफोर्नियाला निघून गेलेली असते आणि परत कधीही येणार नसते.हा धक्का पचवणे सुभाष आणि गौरी दोघांनाही कठीण जाते. गौरी तिच्या कामात मग्न रहाणारी असली आणि अलिप्तपणे वागणारी असली तरी तिच्या घरातच असण्याचीही सवय दोघांना असते.सुरवातीला कोलमडलेल्या सुभाषला बेला तिच्या वागण्याने कणखर बनवते.पण जसजशी बेला वयात येत जाते तसतसे तिचे वागणेही कोरडे होत जाते.तिला समुपदेशकाची मदत सुभाष देतो. त्यामुळे एकाकी, कुढत रहाणारी बेला मित्रमंडळीत खूपच मिसळू लागते. पण सुभाषशी मात्र ती   तुसडेपणेच वागते.पदवीधर झाल्यावर तर ती ऱ्होड आयलंड सोडून वेगवेगळ्या ठिकाणी काम पत्करते.शेतात काम करणे, सेंद्रीय शेतीचे धडे देणे, पर्यायी ऊर्जास्त्रोतांबद्दल मुलांना शिकवणे अशा प्रकारची कामे ती करत रहाते आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत रहाते.सुभाष प्रयोगशाळेत काम करत रहातो पण एकाकी पडतो.बेलाची चिंता त्याला सतावत रहाते. ती अधूनमधून येते तेव्हा त्याला थोडा दिलासा मिळतो पण ती येते तशीच झटक्यात निघूनही जाते. स्वतःचा ठावठिकाणा सुभाषला सांगत नाही.एकदा बेला घरी आली असता सुभाष तिला उदयनबद्दल सांगतो. आपण तिचे खरे पिता नसल्याचेही सांगतो. या धक्क्याने बेला सैरभैर होते आणि तडकाफडकी निघून जाते. पण आठवडाभराने तीच फोन करून सुभाषला तिने समुद्रात देवमासा पाहिल्याचे कळवते. उदयनबद्दल कळले असले तरी आपल्याला प्रेमाने वाढवणारा सुभाषच आहे हे तिने जाणलेले असते.सुभाषला त्यामुळे हायसे वाटते.

सुभाष जमेल तसा स्वतःचा जीव रमवत रहातो पण आपण वृद्ध होत चाललो आहोत आणि कोणीतरी सोबत असावे असे त्याला वाटत रहाते.त्याचा फार पूर्वीचा रूमपार्टनर रिचर्ड त्याला परत ऱ्होड आयलंडमध्ये भेटतो तेव्हा त्याला थोडा दिलासा वाटतो. ते मित्र अधूनमधून भेटू लागतात. पण अचानक त्या मित्राचे निधन होते आणि सुभाष मनोमन हादरतो.मित्राच्या शोकसभेला गेलेला असताना सुभाषला बेलाच्या शाळेतील इतिहासाची शिक्षिका एलीस भेटते.सुभाषशी ती आपुलकीने बोलते. तीही एकटी आहे. तिची मुले मोठी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत झालेली आहेत. सुभाषला ती डोंगरात फिरायला नेते. काही पुरातन इतिहासाचे पुरावे ती त्याला दाखवते. सुभाषलाही तिचा सहवास आवडू लागतो.

बेला सुभाषला कळवते की ती गरोदर आहे आणि बाळंतपणासाठी ऱ्होड आयलंडला येणार आहे. ती एकटीच आपल्या अपत्याला वाढवणार आहे आणि त्यासाठी तिला सुभाषची मदत लागणार आहे. सुभाषला बेला परत येणार याचा आनंद होतो पण तिचं मुलं आपण सांभाळू शकू का याबद्दल मात्र शंका वाटते.बेलाला मात्र सुभाष आपल्या मुलीचाही पालक होईल यावर ठाम विश्वास आहे.ती ऱ्होड आयलंडला येते. तिला मुलगी होते. सुभाष त्या मुलीचे नाव मेघना असे ठेवतो. बेला आणि सुभाष मिळून मेघनाला वाढवू लागतात. एलिसचही त्यांना मदत मिळते.मेघना चार वर्षांची होते तेव्हा बेला पुन्हा कामे करू लागते. त्याच सुमारास ड्र्यु हा अमेरिकन माणूस तिच्या जीवनात येतो. तो सेंद्रीय शेती करणारा शेतकरी आहे. तोही एकटा आहे.मेघनाशी तो छान मैत्री करतो. हळूहळू बेला ड्र्युच्या सहवासात रमू लागते. ते दोघे विवाह करण्याचा निर्णय घेतात. सुभाषलाही एलिसशी विवाहबद्ध व्हावेसे वाटते. पण त्यासाठी त्याला गौरीकडून घटस्फोट घ्यावा लागणार असतो.

गौरी कॅलिफोर्नियातील एका कॉलेजमध्ये तत्वज्ञान विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत असते.अमेरिकेत मिळणाऱ्या व्यक्तीस्वातंत्र्याचा फायदा तिने स्वतःची ओळख निर्माण करण्याठी करून घेतलेला असतो.शैक्षणिक वर्तुळात ती तत्वज्ञान विषयातील विद्वान गणली जाऊ लागलेली असते. आपले विद्यार्थी, आपले संशोधन यातच तिने स्वतःला गुंतवून टाकलेले असते. इतर कोणाला तिने जवळ येऊ दिलेले नसते.सुभाष आणि बेलाशी तर तिने संपर्क तोडलेलाच असतो.एकदाच ती तिच्या पीएच.डी. करणाऱ्या मध्यमवयीन स्त्रीच्या प्रेमात पडते. पण थोडेच दिवसात तेही नाते संपते.उदयनची आठवण ती मनातून कधीच पुसू शकलेली नसते.एके दिवशी सुभाषचे पत्र तिला मिळते. त्याने तिच्याकडे रितसर घटस्फोटाची मागणी केलेली असते.कागदोपत्री का होईना सुभाष आजवर आपला नवरा होता आणि आपण त्याच्यावर व बेलावर अन्याय केला आहे याची खंत गौरीला वाटते. पण तिनेच तर नाते तोडलेले असते. आता घटस्फोटाच्या अर्जावर सही करून ते कागद प्रत्यक्ष भेटूनच सुभाषला द्यावेत असे गौरीला वाटते. लंडनला एका चर्चासत्राला जाण्याआधी ऱ्होड आयलंडला जावे असा बेत ती करते. सुभाषला न कळवताच ती त्यांच्या घरी पोहोचते. सुभाष घरी नसतो पण बेला आणि तिची मुलगी मेघना घरी असतात.बेला गौरीला घरात घेते खरी पण आईशी ती अगदी तुसडेपणाने वागते. तिचा अपमान करते. गौरी घटस्फोटाचे कागद तिथे ठेवून मेघनाच्या डोक्यावर हात ठेवून हताश मनाने सुभाषच्या घरातून निघते.लंडनच्या चर्चासत्रात सामील न होता ती भारतात जाते. कलकत्त्यात ती तिचे कॉलेज, आजीचे घर आणि टॉलिगंजचे उदयनचे घर या तीनही ठिकाणी जाते.चाळीस वर्षात बदललेले कलकत्ता तिला आपलेसे वाटत नाही. हॉटेलच्या रूमवर परतलेल्या गौरीच्या मनात आत्महत्येचे विचार दाटून येतात. पण तसे काही न करता ती परत कॅलिफोर्नियाला परत जाते. आपल्या कामात स्वतःला गुंतवून टाकते.काही महिन्यांनी बेलाचे तिला पत्र येते की मेघनाला आजीला भेटायचे आहे. आणि ती थोडी अधिक समझदार झाली की आपण भेटू.

अशाप्रकारे नात्यांचे जुळणे, तुटणे , पुन्हा जुळणे किंवा नवी नाती निर्माण होणे माणसांच्या आयुष्यात कसे अव्याहतपणे सुरू असते हे दाखवणारी  कादंबरी असे ‘दी लोलॅंड’ या कादंबरीचे वर्णन करता येईल. पण लेखिकेला तेवढेच दाखवायचे नाही हे स्पष्टच आहे.एका बाजूला भारतासारखा गरीब देश, त्यातील आर्थिक विषमता आणि ती नाहीशी करावी या स्वप्नाने पछाडलेल्या तरूणांची क्रांतीकारी चळवळ लेखिकेला दाखवायची आहे.मात्र ही चळवळ कित्येक तरूणांचे बळी घेणारी, त्यांच्या कुटुंबियांची वाताहत करणारी, त्यांचे संसार उद्वस्थ करणारी कशी ठरली हेही लेखिका दाखवते.प्रेमशून्य आयुष्याचा अनुभव घेणारी माणसे दुसऱ्यांनाही प्रेम देऊ शकत नाहीत हेही गौरी या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून लेखिका दाखवते आहे.बेला मात्र ती चूक करत नाही. ती सुभाष आणि गौरी दोघांचाही प्रसंगी अपमान करते पण आपली चूक मान्य करून ती पुन्हा त्यांच्याशी नाते जोडूही शकते हेही लेखिका दाखवते आहे.सुभाष त्याच्या स्वभावाप्रमाणे नेहमीच सगळ्यांशी चांगला वागला आहे. एकाकीपणाच्या दुःखात पोळून निघाला आहे.पण तो स्वप्नाळू नाही. वास्तवाचा स्वीकार करून जुळवून घेण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच तो सकारात्मक राहू शकला आहे. अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्य देणारे वातावरण सुभाष,गौरी आणि बेला या तिघांनाही आपापले मार्ग निवडायला आणि त्यावरून जाताना सकारात्मक रहायला पोषक ठरले आहे. भारतातील पारंपरिक वातावरणात हे शक्य झाले नसते असेही लोलॅंड वाचताना जाणवत रहाते.

अशाप्रकारे ‘दी लोलॅंड’ ही दीर्घ कादंबरी मानवी नात्यांचे पदर सावकाश, हळूवारपणे उलगडते आणि त्याचवेळी आर्थिक विषमतेचा प्रश्न आणि ही विषमता दूर करण्यासाठी उभ्या राहिलेल्या हिंसक आंदोलनाचे अपय़श, व्यर्थता याबद्दलची खंतही व्यक्त करते. त्यामुळेच   कादंबरी रूढार्थाने शोकांत नसूनही ती वाचून पूर्ण केली की एक खिन्नपणा वाचकाच्या मनात रेंगाळत रहातो.

तुम्ही झुंपा लाहिरी यांची ‘दी लोलॅंड’ ही कादंबरी मूळातून जरूर वाचा. तुम्हाला ती निश्चित बांधून ठेवेल.

पुढील ब्लॉगमध्ये ‘दी लोलॅंड’ या कादंबरीतील कथनाचे विश्लेषण करून लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा वेध आपण घेऊ.

                                                                                                -गीता मांजरेकर

__________________________________________________________________________——————————————————–

१ प्रतिसाद

  1. झुम्पा लाहिरी यांची कादंबरी “दी लोलँड” ही राजकीय हिंसाचार, वैयक्तिक आणि कौटुंबिक ओळख आणि विस्थापन यांचे विश्लेषण आहे, जे उदयन आणि सुभाष या दोन भावांवर केंद्रित आहे, ज्यांचे जीवन उदयनच्या नक्षलवादी कट्टरतावादामुळे वेगळे होते. नक्षलवादी चळवळ, ज्याची मुळे साम्यवादात होती, जी  उदयन आणि गौरीच्या वैयक्तिक जीवनात परिपूर्णपणे विणली गेली होती, सुरुवातीला गौरीचा संयमी आणि लाजाळू स्वभाव, मग भ्रमनिरास होणे आणि नंतर ती कशी एक मजबूत स्त्री बनते,याचे कथानकात चित्रण आहे.सुभाष स्वतःला सामूहिक सुधारणेऐवजी वैयक्तिक सुधारणांसाठी समर्पित करतो. गौरीला तिच्या  धूसर भविष्यातून देखील वाचवतो…पण वैचारिक संघर्ष आणि त्यांच्या विभक्ततेनंतर सुभाषने अनुभवलेला एकांत इतक्या अचूकतेने आणि सहानुभूतीने कथानकात मांडला गेला आहे.. हे कथानक प्रेम, दुर्लक्ष, एकांत,कर्तव्य, इच्छा, राजकीय आदर्शांबद्दलचा भ्रमनिरास शिवाय खंत इ. गोष्टींशी निगडीत आहे. शेवटी राजकीय मतभेद हिंसाचाराने नाही तर सामोपचाराने सोडवले पाहिजेत..

    Like

यावर आपले मत नोंदवा