मागील ब्लॉगमध्ये आपण झुंपा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या ‘ दी नेमसेक’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे लक्षात घेतली. आजच्या ब्लॉगमध्ये आपण ‘दी नेमसेक’ या कादंबरीतील कथनाचे विश्लेषण करून लेखिकेची कादंबरीलेखनामागील अंतर्दृष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘दी नेमसेक’ ही २९१ पृष्ठांची कादंबरी आहे. या कादंबरीची रचना करताना लेखिकेने एकूण बारा प्रकरणात कथानकाचे विभाजन केले आहे.प्रकरणांमधील पृष्ठसंख्या सरासरी २३ एवढी असली तरी प्रकरण ६ मध्ये ३३ पाने आहेत आणि प्रकरण ८ मध्ये ३० पाने आहेत. तसेच या कादंबरीतील शेवटची दोन प्रकरणे तुलनेने बरीच लहान आहेत. अकरावे प्रकरण केवळ ५ पानांचे आहे तर बारावे प्रकरण १७ पानांचे आहे.यावरून असे लक्षात येते की कादंबरीतील कथनाचा पहिल्या दहा प्रकरणातील वेग सर्वसाधारणपणे सारखा असला तरी प्रकरण ६ आणि ८ मध्ये तो किंचित मंदावला आहे आणि प्रकरण ११ व १२ मध्ये कथन बरेच वेगवान झाले आहे.

‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या एकूण बारा प्रकरणांपैकी सहा प्रकरणांच्या आरंभी कथानक कोणत्या काळातील आहे याची नोंद लेखिकेने केली आहे.प्रकरण पहिले १९६८ मधील आहे तर प्रकरण तिसरे १९७१ हा कालखंड दाखवते.पण त्यानंतरचे चौथे प्रकरण मात्र एकदम १९८२ हा कालखंड दाखवते आहे. तसेच प्रकरण सहावे एकदम १९९४ हा कालखंड दाखवते आहे.प्रकरण दहावे १९९९मधील घटनांबद्दल कथन करते आहे तर बारावे प्रकरण २००० सालातील आहे. यावरून हे लक्षात येते की लेखिका सुरवातीच्या तीन प्रकरणांत ४ वर्षांच्या काळातील घटना कथन करते आहे. पण १९७१ ते १९८२  या अकरा वर्षांच्या कालखंडातील घटना कथन करण्याएवढ्या तिला महत्त्वाच्या वाटलेल्या नाहीत.प्रकरण ४,५,६ या तीन प्रकरणांत साधारण १२ वर्षांच्या काळातील घटना लेखिका मांडते आहे. यातले सहावे  प्रकरण थोडे मोठे आहे. त्यात अधिक तपशीलवार वर्णन येते. ७,८,९,१० या चार प्रकरणांत मिळून केवळ पाच वर्षांचा काळच लेखिकेने मांडला आहे.आणि शेवटच्या दोन प्रकरणांत लेखिकेने एक वर्षाचा काळ रंगवला आहे.यावरून हे लक्षात येते की लेखिका कादंबरीतील ७,८,९,१० या प्रकरणांत घटनांचे कथन खोलात जाऊन करते आहे.पण प्रकरण चार,पाच या प्रकरणांतील घटनांचे कथन धावते आहे. म्हणजे कादंबरीतील सहावे व आठवे प्रकरण तपशीलात शिरणारे आहे तर शेवटची दोन प्रकरणे  गतीमान पद्धतीने घटनांचा आलेख मांडणारी आहेत.

‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या कथानकाचा हेतू पहिल्या तीन प्रकरणांत अशोक व असिमा गांगुली या दांपत्याच्या भूतकाळाचा आढावा घेण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील वर्तमानातील घटना, विशेषतः गोगलच्या जन्माच्या वेळच्या परिस्थितीचे थोडक्यात कथन करण्याचा आहे.पण कादंबरीतील चौथ्या प्रकरणापासून कथानकाचा केंद्रबिंदू अशोक व असीमा या दांपत्यावरून ढळून त्यांच्या मुलावर म्हणजे गोगोलवर येऊन स्थिरावला आहे.बाराव्या प्रकरणापर्यंत  म्हणजे कादंबरीच्या अखेरपर्यंत गोगोल हाच कथानकाच्या केंद्रस्थानी आहे.

‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या पहिल्याच प्रकरणात गोगोल गांगुलीच्या आई- वडिलांचा म्हणजे असीमा-अशोक यांचा भूतकाळ कथन केला जातो. हे कथन वर्तमान ते भूतकाळ असे हिंदोळत रहाते. असीमा बाळंतपणासाठी बोस्टनमधील इस्पितळात दाखल झाली आहे. तिथे प्रसववेदना एकटीने सहन करताना तिला सतत आपले कलकत्त्यातील माहेर, तेथील नातेवाईक आणि अशोकशी लग्न कसे ठरले ते सगळे प्रसंग आठवत रहातात. त्यामुळे एकीकडे असीमाचा वर्तमान काळ आणि तर दुसरीकडे तिचा भूतकाळ वाचकांना उलगडत जातो. त्याचवेळी असीमाचा नवरा अशोक गांगुली जो आपल्या बाळाच्या जन्माची बातमी ऐकण्यासाठी इस्पितळाच्या आवारात अस्वस्थपणे येरझारा घालतो आहे. त्यालाही आपला भूतकाळ आठवत रहातो. विशेषतः ज्या एका अपघातामुळे त्याने आपल्या आयुष्याची दिशा निश्चित केली व तो अमेरिकेत आला तो रेल्वे अपघाताचा प्रसंग, अपघात होण्यापूर्वी त्याला सहप्रवासी घोषने दिलेला सल्ला हे सगळे अशोकला आठवते. त्यामुळे कथन काळाच्या अक्षावर मागे-पुढे जात रहाते.

‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या दुसऱ्या प्रकरणापासून मात्र कथनाची दिशा पुढे सरकणारीच आहे.पाचव्या प्रकरणात एकदा अशोक गोगोलला त्याच्या नावामागची स्वतःच्या अपघाताची कहाणी कथन करतो तेव्हा कथन थोडा वेळ भूतकाळात जाते तेवढेच. अन्य़था ते वर्तमानातच रहाते आणि कमी-अधिक गतीने गोगोलच्या आयुष्यातील घटना उलगडत रहाते. अनुषंगाने असीमा, अशोक व गोगोलची बहीण सोनियाच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग कथनात येतात पण तरी केंद्रस्थानी गोगोलचा आयुष्यपटच आहे. कथनाचा दृष्टीक्षेत्रनियंत्रक गोगोल हाच आहे.

गोगोलच्या शाळकरी वयातील काही मोजकेच प्रसंग ‘दी नेमसेक’ कादंबरीच्या तिसऱ्या प्रकरणात येतात. त्यात विशेषतः त्याचे नाव शाळेत नोंदवताना शिक्षकांना तो उच्चार न कळणे, शाळेत सहाध्यायांनी त्याच्या नावाची संक्षिप्त रूपे बनवणे असे  प्रसंग आहेत.गोगोल हे रशियन लेखकाचे नाव आहे हे सांगून अशोक गोगोलला विद्यापीठाच्या ग्रंथालयात नेऊन त्या लेखकाची पुस्तके दाखवतो. पण गोगोल फारसा रस घेत नाही. चौथ्या प्रकरणात आपले नाव बदलण्याचा विचार गोगोल आई-वडिलांना सांगतो. चौदाव्या वाढदिवशी अशोक त्याला निकोलाय गोगोलचा कथासंग्रह भेट देतो.पण गोगोल ते पुस्तक वाचतच नाही.त्याच्या मनात आपल्या नावाबद्दल न्यूनगंड आहे.

पाचव्या प्रकरणात गोगोल कॉलेजमध्ये शिकण्याच्या उद्देशाने आई-वडिलांपासून दूर जातो. आपण स्वतंत्र झालो अशी जाणीव त्याला होते. स्वतःच निर्णय घेऊन तो आपले नाव निखिल असे बदलून घेतो.याच प्रकरणात त्याच्या आयुष्यात रूथसारखी अमेरिकन मुलगी येते. पण आपले पालक तिला स्वीकारणार नाहीत हे गोगोलला माहीत आहे. रूथ दुरावल्यावर रेल्वेने घरी येत असता गोगोलच्या गाडीला अपघात होतो. स्टेशनवर त्याला घ्यायला आलेल्या आणि वाट पहाणाऱ्या अशोकला जेव्हा हे कळते तेव्हा तो त्याला झालेल्या रेल्वे अपघाताची घटना गोगोलला कथन करतो. ती ऐकून गोगोलला आपण नाव बदलण्यात चूक केली आहे हे पहिल्यांदा जाणवते व अपराधी वाटते.

‘दी नेमसेक’ कादंबरीच्या सहाव्या प्रकरणात गोगोलचे शिक्षण संपून नोकरी सुरू झाली आहे. न्युयॉर्कमध्ये आपल्या लहानशा भाड्याच्या खोलीत रहाताना रटाळ दिनक्रमाला तो कंटाळतो आहे.आई-वडिलांकडे दर आठ-पंधरा दिवसांनी जाण्याचा नेम त्याने सोडलेला नाही. पण मित्राच्या पार्टीत भेटलेली मॅक्सिन ही अमेरिकन मुलगी गोगोलच्या आयुष्यात येते आणि हळूहळू तो  तिच्यात एवढा गुंततो की स्वतःचे घर, आई-वडील सगळे जणू विसरूनच जातो.मॅक्सिनच्या घरीच तो राहू लागतो. तिथे जणू संपूर्ण स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत असे त्याला वाटते.आई-वडिलांच्या फोनला उत्तर न देणे , त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे यात आपले काही चुकते आहे ही जाणीवच गोगोलला होत नाही.आईला गरज असतानाही गोगोल मॅक्सिनबरोबर तिच्या आजोळी न्यू हॅम्पशायरला जाऊन मुक्तपणे निसर्गाचा आनंद घेतो.आपण हळूहळू स्वतःचे  विचारस्वातंत्र्य, वेगळे अस्तित्व गमावून बसतो आहोत हे गोगोलला कळतच नाही.हे सहावे प्रकरण थोडे मोठे आहे कारण गोगोलला लहानपणापासून असलेले अमेरिकन माणसांच्या जीवनपद्धतीचे आकर्षण आणि तसे रहायला मिळाल्याबरोबर त्याचे स्वैर होत जाणे हा भाग लेखिकेला ठळकपणे वाचकांच्या मनावर ठसवायचा आहे. गोगोलचे मूळांपासून दुरावणे तिला या प्रकरणातील कथनातून अधोरेखीत करायचे आहे.

सातव्या प्रकरणात अचानक अशोकचा हृदयविकाराने मृत्यू होतो आणि गोगोल भानावर येतो. आपली आई, धाकटी बहीण, आपले घर ही सगळी आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्याला होते.आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा गोगोलला उमगतात. मॅक्सिनला  आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख झालेले नाही आणि ती आपल्याला आपल्या दुःखात साथ देऊच शकत नाही ही जाणीव गोगोलला आपले व मॅक्सिनचे  नाते किती कच्चे आहे याचे भान देते. मॅक्सिन गोगोलच्या आयुष्यातून आपोआपच दूर जाते.आपल्या वडिलांच्या आठवणी काढताना त्यांच्यासोबत एका सायंकाळी आपण समुद्रावर दीपगृह पहायला कसे गेलो होतो आणि त्या निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर आपण दोघेच कसे होतो तो प्रसंग गोगोलला आठवतो. आपले वडील निधन पावले असले तरी ते आपल्या मनात कायम असणार आहेत ही जाणीव गोगोलला प्रगल्भ करणारी आहे असे कथनातून लेखिकेला सांगायचे आहे.  

आठव्या प्रकरणात गोगोल स्वतःला अमेरिकन मित्र-मैत्रीणींपासून हेतूतः दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक ब्रिगेड ही विवाहीत अमेरिकन स्त्री त्याला स्वतःकडे आकर्षित करते. तिच्याशी शारीर संबंध ठेवणे हा व्यभिचार आहे आणि आपण तिच्या पतीची प्रतारणा करतो आहोत याचे भान गोगोलच्या संवेदनशील मनाला टोचणी लावते तेव्हा तो आपोआपच ब्रिगेडपासून दुरावतो. याच प्रकरणात असीमाच्या आग्रहामुळे गोगोल मौशमी मुझुमदार या बंगाली मुलीला भेटतो. ती त्याच्यासारखीच जन्माने अमेरिकन आहे. पण वंशाने भारतीय,बंगाली असल्याने तिच्यावरचे संस्कार बंगाली घरातल्यासारखेच आहेत.गोगोल व मौशमीला परस्परांच्या जवळ यायला वेळ लागत नाही.हे प्रकरण थोडे तपशीलात जाणारे आहे.

‘दी नेमसेक’ कादंबरीच्या नवव्या प्रकरणात गोगोल व मौशमीचे बंगाली पद्धतीने लग्न लागते. पण लग्नानंतर मौशमीला गोगोलचे मध्यमवर्गीय असणे, सतत कार्यमग्न असणे हे सगळेच खटकू लागते. घर चालवण्यासाठी तिला स्वतःलाही नोकरी करावीच लागणार आहे हेही तिला आवडेनासे होते.तिलाही अमेरिकन माणसांच्या व्यक्तीकेंद्रीत स्वैर जीवनपद्धतीचे आकर्षण आहे.गोगोलला मौशमी आणि त्याच्यातील विसंवाद जाणवू लागतो. भारतीय समाजतील कुटुंबकेंद्री, बांधिलकी मानणारी जीवनपद्धती मौशमीला आवडत नाही हे त्याला कळून चुकते.

 कादंबरीच्या दहाव्या प्रकरणात मौशमी गोगोलपासून मनाने दुरावत जाते आणि संधी मिळताच दिमित्री या आपल्या लहानपणीच्या मित्राकडे आकृष्ट होते. गोगोलची प्रतारणा करू लागते.

कादंबरीच्या अकराव्या प्रकरणात गोगोलला मौशमीच्या दुराव्याची चाहुल लागली आहे पण तरीही त्याला आपले वैवाहिक नाते टिकावे अशी आशा वाटते आहे.

‘दी नेमसेक’च्या बाराव्या प्रकरणात गोगोल मौशमीपासून विभक्त झाला आहे. त्यांचा संसार अवघ्या एक-दीड वर्षांतच संपला आहे.सुरूवातीला हा धक्का पचवणे गोगोलला जड गेले असले तरी नंतर तोही एकटाच इटलीत जातो,नोकरी बदलण्याचा निर्णय घेतो.आईकडे नियमीतपणे जात राहतो. त्याच्या आईला त्याचा संसार मोडल्याने अपराधी, दुःखी वाटत असले तरी अखेरीस तिनेही वास्तव स्वीकारले आहे. आजवर ती कुटुंबात अडकलेली असली तरी आता ती स्वतंत्र झाली आहे. अमेरिका सोडून भारतात जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आपले घर विकून ती कलकत्त्यात जाणार आहे हे कळल्यावर गोगोलला पहिल्यांदाच आपल्या भावविश्वातील घराशी, आपल्या कुटुंबाशी असलेले नाते किती महत्त्वाचे होते ते जाणवते.आपली खोली आवरताना वडिलांनी चौदाव्या वाढदिवासाला त्याला भेट दिलेला निकोलाय गोगोलचा कथासंग्रह गोगोलच्या हाती लागतो आणि त्यातील वडिलांचे हस्ताक्षर पहाताना, गोगोलची ‘ओव्हरकोट’ कथा वाचताना आपल्या मनात आई- वडिलांशी,कुटुंबाशी, घराशी जुळलेले नाजूक बंध किती अतूट आहेत हे गोगोलला जाणवले आहे असे लेखिका कथनातून सुचवते.

‘दी नेमसेक’ या कादंबरीती बारा प्रकरणांची रचना आणि त्यात सामावलेला गोगोलचा ३२ वर्षांचा आयुष्यपट, त्यातील चढ-उतार कथनातून उलगडण्याचा लेखिकेचा प्रयत्न आपण लक्षात घेतला. इथे एक प्रश्न पडतो की लेखिकेला ‘दी नेमसेक’ या कादंबरीतून केवळ गोगोलची कहाणीच सांगायची आहे का ? कादंबरीचे कथन बारकाईने वाचताना लक्षात येते की लेखिकेचा कादंबरी लेखनामागचा उद्देश तेवढाच नसावा. तिला गोगोलच्या कहाणीच्या निमित्ताने भारतीय व अमेरिकन जीवनपद्धतीमधील बलस्थाने व मर्यादा वाचकांसमोर ठेवायच्या आहेत असे दिसते. तसेच अमेरिकेत भारतीय आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या मनातील गोंधळ, द्विधा अवस्था लेखिकेला दाखवायची आहे.असे करताना भारतीय ते चांगले नी अमेरिकन ते वाईट असा न्यायनिवाडा लेखिकेला करायचा नाही. ती कथनातून फक्त वस्तुस्थिती वाचकांसमोर कशी ठेवते आहे ते समजून घेण्यासाठी  कथनातील काही भाग आपण वाचू.

 कादंबरीच्या सहाव्या प्रकरणात कथक मॅक्सिनच्या व्यक्तिमत्वाविषयी तपशील देतो आणि गोगोल व मॅक्सिनची विचार करण्याची पद्धत, त्यांना आई-वडिलांकडून मिळालेली भिन्न प्रकारची वागणूक याबद्दल तपशीलात जाऊन सांगतो.  तो म्हणतो-

“मॅक्सिन तिच्या भूतपूर्व मित्रांविषयी विनासंकोच बोलत असे. अल्बममध्ये लावलेले त्यांचे फोटोही त्याला दाखवी. त्यांच्याबद्दल ना खंत ना खेद आणि ना लाजदेखील असा तिचा अविर्भाव असे. जीवन जे देतंय ते खुल्या दिलाने स्वीकारण्याची कला तिला अवगत होती. आपण जशा आहोत, जशा आणि जिथे वाढलो त्यात जराही बदल नको, सारं कसं छान , परिपूर्ण आहे असाच तिचा एकूण खाक्या असे. तिची ही विचारपद्धती त्याला(गोगोलला) संपूर्णतया नवीन होती. तिच्या उच्चभ्रू जीवनशैलीपेक्षा तिची विचारशैली हाच त्या दोघांमधील सर्वात मोठा फरक होता….गोगोलच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी सतत एक प्रकारचा असंतोष ,संताप खदखदत असे,त्याचा मागमूसही मॅक्सिनच्या वागण्यात दिसत नसे. गोगोलकडून त्याच्या आई-वडिलांच्या खूप साऱ्या अपेक्षा असत. त्याने आयुष्यात असं करावं, तसं करू नये असा दबाव असे. ..”

कादंबरीच्या सहाव्या प्रकरणातच गोगोल मॅक्सिनच्या सहवासात आकंठ बुडाला आहे. तो तिच्या घरातच रहातो आहे, घरातला जणू एक सभासदच झाला आहे. अतिशय स्वैर असे त्या दोघांचे रहाणे आहे. कधीतरी मॅक्सिन गोगोलला त्याच्या आई-वडिलांबद्दल विचारते आणि गोगोल जे सांगतो ते ऐकून चकित होते. कथक सांगतो –

“त्याच्याविषयी काही गोष्टी ऐकून ती चकितच झाली होती. त्याच्या आई-बाबांची केवळ बंगाली लोकांशीच मैत्री आहे, त्यांचा प्रेमविवाह झाला नसून आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशी त्यांनी लग्न केलं, त्याची आई अनेक वर्ष इथे रहात असूनदेखील भारतीय पद्धतीचं जेवण बनवते, साडी नेसते, कुंकू लावते ह्या साऱ्या गोष्टींवर तिचा विश्वासच बसेना. …(मॅक्सिनचे आई-वडील)लिडिया-जेरॉल्ड देखील पती-पत्नी आहे, तेदेखील संसार करताहेत. परंतु त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या शृंगाराची, रोमॅंटिकपणाची पुसटशी झलकही त्याला (गोगोलला) कधी आपल्या आई-बाबांच्या वागण्यात दिसून आली नाही.आई-बाबांविषयी अशा प्रकारची एकही आठवण आपल्याजवळ नाही. मिठीत घेणं वा चुंबन घेणं तर सोडूनच द्या , त्यांनी एकमेकांचा साधा हात पकडल्याचंही आयुष्यात एकदाही पाहिलं नाही ह्याची जाणीव होऊन गोगोल दुःखी होई..”

खरं तर, गोगोल मॅक्सिनच्या घरात स्वतःचे स्वातंत्र्य घालवून बसला होता. स्वैर वागण्याची मुभा हे त्याला स्वातंत्र्य वाटत होतं पण ते तर केवळ वरवरचं होतं. प्रत्यक्षात गोगोल परावलंबी झाला होता. त्याबद्दल कथक म्हणतो-

“ह्यापूर्वीही गोगोल मॅक्सिनबरोबरच रहात होता. परंतु आता फक्त दोघंच असल्याने आपण खरोखरच एकत्र राहतोय, ह्याची गोगोलला अखेर खात्री पटली. आणि तरीही आपण मोठे झालो, प्रौढ झालोत असं काही त्याला वाटत नव्हतं. ह्या घरात त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नव्हती. त्याच्याकडून कसल्या अपेक्षाही नव्हत्या. बहुदा त्यामुळेच एक प्रकारची अवलंबित्वाची भावना त्याच्या मनात घर करून होती.संपूर्ण घरावर जेराल्ड आणि लिडियाचं वर्चस्व होतं. दोघांच अस्तित्व घरामधील प्रत्येक वस्तूमधून जाणवत असे.”

मॅक्सिनबरोबर तिच्या आजोळी न्यू हॅम्पशायरला गेल्यावर तेथील निसर्गात मुक्तपणे विहरताना, एकांतात तिच्या मिठीमध्ये असताना ‘सरतेशेवटी आपण मुक्त झालो, साऱ्या बंधनातून, ऋणांमधून सुटका झाली …’ असे गोगोलला वाटले होते.

आपले मुक्तपण हा केवळ आभास आहे याची जाणीव गोगोलला त्याच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर झाली. वडिलांच्या मृत्यूनंतरच्या गोगोलने घेतलेल्या  कोणत्याही निर्णयांत त्याने मॅक्सिनला सामावून घेतले नव्हते. आई आणि बहीण सोनियाला घेऊन वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित करायला  जायचे त्याने ठरवले तेव्हा मॅक्सिनने त्याच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली होती पण गोगोलने ते हेतूतः टाळले होते.मॅक्सिनच्या आकर्षणातून, तिच्या मुक्त रहाण्याच्या विचारपद्धतीच्या आकर्षणातून गोगोल बाहेर आला होता. त्याची द्विधा अवस्था, आभासात रहाणे संपले होते.पण गोगोल खऱ्या अर्थाने प्रगल्भ झाला तो असीमाने बंगला विकून कलकत्त्यात धाकट्या भावाकडे जाऊन रहायचा निर्णय घेतला त्यावेळी.गोगोलच्या मनातील चलबिचल कथक वाचकांसमोर उलगडतो. तो म्हणतो –

“आई खरोखरच जाणार. एवढे महिने ती अशी दूर रहाणार ह्यावर अजूनही त्याचा विश्वास बसत नव्हता.आई-बाबांनी आपापले परिवार सोडून इथे एवढ्या दूर , एवढी वर्षे कशी काय काढली कोणास ठाऊक !…. गोगोलने भारतीयत्वापासून, त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींपासून कायम दूर रहायचा प्रयत्न केला. आपण मूळ भारतीय आहोत हे त्याला विसरायचं होतं. त्याच्या आई-बाबांनी हे अंतर मिटवायचा सतत प्रयत्न केला. त्यांच्याशी देखील तो फटकून वागे.कॉलेजशिक्षणासाठी तो मुद्दाम दुसऱ्या शहरात गेला , नंतर न्युयॉर्कला पोहोचला तरीही ह्या शांत, छोट्याशा शहराबरोबरचे त्याचे अनुबंध तुटले नाहीत. कुठेही गेला तरी ह्या घराची ओढ त्याला खेचून आणत असे.”

कादंबरीच्या अखेरीस गोगोलला आपल्या पूर्वीच्या वागण्याची खंत वाटते, ज्या गोष्टीबद्दल आपण हट्टीपणा केला त्या खरं तर किती क्षूद्र होत्या ते त्याला जाणवले आहे.शेवटी वरवरच्या क्षणभंगूर सुखांपेक्षा शाश्वत आनंदाचा ठेवा कसा महत्त्वाचा असतो आणि तो आपल्यावर मनापासून , निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांकडूनच मिळत असतो याची उपरती गोगोलला होते. त्याबद्दल कथक म्हणतो-

“त्याला नाव देणारे आई-बाबा आता दूर झाले. बाबा तर  कायमचेच आणि आईदेखील दूर देशी निघाली आहे. …हे प्रियजन त्याला गोगोल नावाने हाक मारतात, ओळखतात म्हणूनच केवळ गोगोल गांगुली जिवंत आहे.हळूहळू एकेकजण गळायला लागेल. त्याला गोगोल म्हणणारं कोणी उरणार नाही आणि त्यांच्याबरोबर गोगोलचादेखील अंत होईल….शेवटी मी जिंकलो, माझ्या मनासारखं झालं म्हणून त्याला समाधान व्हायला हवं होतं. परंतु त्याला ना समाधान वाटलं, ना आनंद.किंबहुना त्या विचाराने तो काहीसा खिन्न झाला.”

आपण जन्माने अमेरिकन असलो तरी आपले सत्व आपल्या भारतीय आई-वडिलांच्या प्रेमावर, त्यागावर,नकळत झालेल्या संस्कारांवर पोसलेले आहे याची गोगोलला अखेरीस झालेली जाणीव हीच ‘दी नेमसेक’ या कादंबरीची  अखेर आहे.वडिलांनी ललित साहित्याकडे लक्ष वेधूनही ते न वाचणारा गोगोल अखेरीस स्वेच्छेने ते वाचू लागतो तेव्हा तो स्वतःलाही शोधू लागतो असे लेखिकेला सुचवायचे असावे.आपल्या नावाबद्दल न्यूनगंड बाळगणाऱ्या गोगोलला अखेरीस आपल्या नावाचे महात्म्य तर पटते.आपले नाव कोणतेही असले तरी आयुष्य आपल्या कृतींनी,निर्णयांनी स्वतःलाच घडवायचे असते हेही गोगोलला लक्षात येते तेव्हा त्याची द्विधा अवस्था, अस्थिरता संपली आहे.कदाचित नात्यांचा खोल अर्थ त्याला उमगला आहे. नाती केवळ नावापुरती असून चालत नाहीत तर ती जबाबदारीने, प्रेमाने, त्यागाने निभावावी लागतात हे गोगोलला आपल्या पालकांच्या जगण्यातून दिसले आहे.भविष्यातले निर्णय घेताना ही परिपक्वता त्याच्या गाठीशी असणार आहे.

इथे काही प्रश्न पडतात. गोगोल आणि मौशमी दोघेही मूळचे भारतीय, दोघांच्याही मनात अमेरिकन जीवनपद्धती व भारतीय जीवनपद्धती यांच्यातील काय निवडावे याचा गोंधळ कायमच दिसतो. गोगोलने अखेरीस आपले भारतीयत्व मनोमन स्वीकारले आहे. पण मौशमी मात्र अमेरिकन पद्धतीच्या आकर्षणातच खेचली गेली आहे.असे का व्हावे ?  कदाचित हा तिच्या व्यक्तिमत्वाचा दोष असावा. तिला भौतिक सुखांचे असलेले आकर्षण हा भागही त्यात आहे. गोगोलची बहीण सोनिया ही बेन या अमेरिकन मुलाच्या प्रेमात आहे.ती लौकरच त्याच्याशी लग्न करणार आहे. पण तिने हा निर्णय केवळ अमेरिकन जीवनपद्धतीच्या वरवरच्या आकर्षणातून घेतलेला दिसत नाही. ती बेनबरोबर सुखाने संसार करेल याची तिच्या आईला खात्री आहे आणि गोगोलही तसा विश्वास वाटतो आहे.मौशमी आणि सोनिया या दोघींच्या व्यक्तिमत्वातील फरक हे याचे कारण असावे.

एकंदर वरवरची स्वैर, आत्मकेंद्रीत जीवनपद्धती स्वीकारायची की परस्परांवरील निष्ठेच्या,विश्वासाच्या पायावर परस्परांना साथ देत स्वातंत्र्य घेण्याची जीवनपद्धती स्वीकारायची ही प्रत्येकाची व्यक्तिगत निवड असणार आहे.लेखिका ‘दी नेमसेक’ या कादंबरीतून कोणत्याही एका जीवनपद्धतीचे समर्थन करत नाही.पण परस्पर विश्वासावर आधारित जीवनपद्धती शाश्वत समाधान देणारी ठरते हे मात्र लेखिका निश्चित सुचवते आहे.

तुम्ही झुंपा लाहिरी यांची ‘दी नेमसेक’ ही कादंबरी मूळातून वाचा किंवा तिचे उल्का राऊत यांनी केलेले मराठी भाषांतर तरी सवडीने जरूर वाचा ही विनंती.पुढील ब्लॉगमध्ये झुंपा लाहिरी यांच्या ‘दी लो लॅंड’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे आपण जाणून घेणार आहोत.

                                                                  -गीता मांजरेकर

१ प्रतिसाद

  1. लेखकाला खूप अंतर्गत संघर्षातून जावे लागले आहे असे वाटले कारण, इतक्या पात्रांसाठी इतक्या खोलवर लिहिता येत नाही. मृत्यू, नैराश्य, ब्रेकअप, घटस्फोट, बेवफाई, संस्कृतीशी जुळवून न घेणे, कौमार्य गमावणे आणि बरेच काही गोगोल सहन करतो.निःसंशयपणे, पुस्तकात बरेच विचार, चिंतन, निरीक्षण आणि वेदना मांडलेल्या दिसतायत.. कादंबरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर गोगोल ज्या वेगाने स्त्रियांकडे आकर्षित होतो ते गोगोलचे वागणे मला दिलफेक वाटते ..पण अपयश मिळाल्यावर वाईटदेखील वाटते.. आणि तो परत त्याच भानगडीत का पडतो ? हा प्रश्न पडतो ..पण शेवटी प्रेम ही स्वतंत्रपणे शोधण्याची गोष्ट आहे ..कधीही प्रेम न करण्यापेक्षा प्रेम करून हरवणे चांगले! या वाक्याचा मला आत्मबोध होतो..जीवनात येणाऱ्या चढउतारांमुळे गोगोल उलटा पडल्यानंतर जड अंतःकरणाने पुन्हा उठण्यासाठी आणि उडण्यासाठी धडपडतो..मला शेवट आवडला जिथे गोगोल त्याच्या वडिलांप्रमाणेच आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी जे हवे होते तेच गोगोल वाचू लागतो, नाव स्वीकारतो..अमेरिकेत राहत असतानाच मुळात त्याला भारतीय विस्तारित कुटूंब पद्धती नि अमेरिकन जीवनपद्धती यातील फरक कळतो..

    Like

यावर आपले मत नोंदवा