मागील ब्लॉगमध्ये आपण झुंपा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिकेचे चरित्र आणि साहित्यिक कामगिरी याचा थोडक्यात परिचय करून घेतला. आज आपण झुंपा लाहिरी यांच्या ‘दी नेमसेक’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे समजून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

 ‘दी नेमसेक’ ही झुंपा लाहिरी यांनी लिहिलेली पहिलीच कादंबरी आहे. ती २००३ मध्ये प्रकाशित झाली.तत्पूर्वीच त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाला – ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडिजला’ पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.त्यामुळे लेखिकेच्या पहिल्या कादंबरीबद्दल वाचकांमध्ये मोठी उत्सुकता होती.२९१ पृष्ठांच्या या दीर्घ कादंबरीने वाचकांना चांगलेच गुंतवून ठेवले आणि झुंपा लाहिरी यांच्या या कादंबरीला समीक्षकांकडूनही दाद मिळाली.पुढे २००६ साली या कादंबरीवर आधारित चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला.मराठीमध्ये ‘दी नेमसेक’ या कादंबरीचे उल्का राऊत यांनी केलेले भाषांतर २००७ साली प्रकाशित झाले आहे.

‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या कथानकात इ.स. १९६८ ते २००० असा एकूण ३२ वर्षांचा काळ प्रत्यक्ष सामावलेला आहे.व्यक्तिरेखांच्या भूतकाळामुळे हा काळ साधारण कधी दहा-पंधरा वर्षे मागे म्हणजे १९५० पर्यंतही जातो.कथानक सुरवातीला भूतकाळात जात असले तरी नंतर मात्र ते व्यक्तिरेखांच्या वर्तमानाबरोबर पुढेच सरकते.

कथानकातील घटना प्रामुख्याने अमेरिकेतील मॅसेच्युसेट  शहर आणि न्युयॉर्क शहर येथे घडणाऱ्या असल्या तरी क्वचित काही घटना भारतातील कलकत्ता शहरात, काही पॅरिसमध्ये आणि काही अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर भागातही घडताना लेखिकेने दाखवल्या आहेत.

‘दी नेमसेक’चे कथानक घटनाप्रधान म्हणता येणार नाही.ते प्रामुख्याने व्यक्तिरेखांच्या मनोवकाशात जाणारे आहे.पण या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात कधी अपघाताने तर कधी त्यांच्या विशिष्ट निर्णयांमुळे जे प्रसंग घडतात ते मात्र कथानकाला कलाटणी देणारे म्हणावे लागतील.

गांगुली या एका स्थलांतरीत बंगाली कुटुंबातील चार माणसांचा आयुष्यक्रम म्हणजेच ‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या कथानक आहे.या कुटुंबातील कर्ता पुरूष अशोक आपली पत्नी असीमाला घेऊन  त्याच्या तरूण वयात उच्चशिक्षण व नोकरीची चांगली संधी शोधण्यासाठी अमेरिकेत स्थलांतरीत झाला आहे. कालौघात त्यांना गोगोल(पुढे निखील) आणि सोनिया ही दोन मुले झाली आहेत.गांगुली हे मध्यमवर्गीय कुटुंब अमेरिकेत रहात असताना त्यांच्या आयुष्यात कोणते उतार-चढाव आले.आणि या उतार-चढावांशी सामना करत हे कुटुंब बराच काळ परस्परांशी कसे जोडलेले राहिले पण शेवटी अपरिहार्यपणे दुरावले याची हकिकत ‘दी नेमसेक’ या कादंबरीत तपशीलवारपणे उलगडत जाते.

अशोक गांगुली हा कलकत्त्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला आहे. कुटुंबातील तो सगळ्यात मोठा मुलगा आहे. त्याच्या आईचे वडील हे कलकत्ता विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत. ते इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने त्यांनी आपल्या नातवाला लहानपणापासून इंग्रजी साहित्य वाचून दाखवले आहे. विशेषतः त्यांच्या आवडत्या रशियन लेखकांच्या इंग्रजीत भाषांतरीत झालेल्या कथा-कादंबऱ्या वाचायची आवड आजोबांनीच अशोकमध्ये रूजवली आहे. अशोक चालताना, प्रवासातही वाचत राहतो.त्यामुळे त्याच्या आईला तो कुठेतरी धडपडेल याची चिंता वाटत राहते.अशोक असा रस्त्यात धडपडत नाही पण एका सुट्टीत रेल्वेने जमशेदपूरला आजोबांकडे जात असताना त्या ट्रेनला भीषण अपघात होतो.अशोक रेल्वेच्या डब्याखाली चिरडला जातो पण जिवंत असतो. सुदैवाने अशोकने  हाताच्या मुठीत घट्ट पकडून ठेवलेले निकोलाय गोगोल या रशियन लेखकाच्या पुस्तकाचे पान त्याच्या मुठीतून सुटते आणि अंधारात शोधकार्य करणाऱ्यांना तो जिवंत आहे हे कळते. वेळीच उपचार मिळाल्याने अशोक वाचतो.वर्षभर त्याला अंथरूणात पडून राहायला लागते. पण त्याच वेळी अशोक, रेल्वे अपघात होण्यापूर्वी त्याचा सहप्रवासी असणाऱ्या टॉलिगंजच्या घोष या माणसाने त्याला परदेशी स्थलांतर करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचा गांभिर्याने विचार करतो. बरे वाटताच तो अमेरिकन विद्यापीठात संशोधन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज करतो. बोस्टनच्या विद्यापीठात त्याला ‘ऑपटीकल फायबर’ या विषयात पीएच.डी. करण्यासाठी संपूर्ण शिष्यवृत्ती मिळते तेव्हा तो लगेचच बोस्टनला जाण्याचा निर्णय घेतो.अशोक अमेरिकेत जाण्यापूर्वीच असीमा भादुरी या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले जाते.अशोक आणि असीमा हे अमेरिकेबद्दल काहीही माहीत नसलेले तरूण दांपत्य बोस्टनमध्ये येते.अशोकला मिळालेल्या एम.आय.टी.च्या शिष्यवृत्तीच्या पैशांत,विद्यापीठाच्या जवळच्या परवडेल अशा लहानशा भाड्याच्या घरात दोघांचा संसार सुरू होतो.अशोक संशोधनात गुंततो पण असीमाला सतत आपल्या माहेरची, कलकत्त्याची आठवण येत रहाते.हळूहळू ती स्वतंत्रपणे शहरात वावरू लागते, शहरातील बंगाली कुटूंबीयांशी परिचय झाल्यावर तिला थोडा दिलासा मिळतो.लौकरच या गांगुली दांपत्याला मुलगा होतो. त्याचे नाव काय ठेवायचे हे असीमाची आजी कळवणार असते पण आजीचे पत्र येतच नाही आणि हॉस्पिटलमध्येच बाळाचे नाव नोंदवायचे असल्याने अशोक ज्या गोगोलमुळे आपण अपघातातून वाचलो त्याचेच नाव बाळाला देतो. गोगोलचे बारसे, दिवाळी,दुर्गापुजा, ख्रिसमस, वाढदिवस अशा वेगवेगळ्या निमित्ताने अशोक आणि असीमा आपल्या बंगाली मित्रमंडळींना सहकुटुंब आमंत्रीत करतात.खास बंगाली स्वयंपाक असीमा निगुतीने करते आणि बंगाली गाणी म्हणत, गप्पा मारत असे प्रसंग गांगुली दांपत्य आनंदाने साजरे करतात.या स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांनी त्या दोघांची आपल्या कलकत्त्यातील कुटुंबीयांपासून दुरावल्याची खंत कमी होते.

अशोक गांगुली एम. आय. टी. विद्यापीठातच प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागतो तेव्हा विद्यापीठाच्या परिसरापासून थोडे दूर स्वतःचे घर तो विकत घेतो. एक मजल्याचा, पुढे-मागे मोकळे आवार असलेला हा बंगला जणू संपूर्ण कुटुंबाची पाळे-मुळे अमेरिकेत रूजवणारा घटक ठरतो.इथेच सोनियाचा म्हणजे गोगोलच्या बहिणीचा जन्म होतो.गोगोल आणि सोनिया याच परिसरातील शाळेत जाऊ लागतात.त्या दोघांचा जन्मच अमेरिकेत झालेला असल्याने त्यांना अमेरिका हाच आपला देश वाटू लागतो. गोगोल आणि सोनिया इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असले तरी घरी त्यांचे आई-वडील त्यांच्याशी बंगाली भाषेतच बोलतात. त्यामुळे दोन्ही मुलांना बंगाली बोलता चांगले येते. पण लिहिता-वाचता येत नाही.आपले आई – वडील सतत कलकत्त्यातील आपल्या कुटूंबीयांशी फोनवर बोलत रहातात. कोणा नातेवाईकाचे निधन झाल्याचे कळल्यावर शोकाकूल होतात हे सगळे गोगोल-सोनियाला काहीसे विचित्र वाटते.जमेल त्या प्रत्येक सुट्टीत आपले पालक आपल्याला भारतात आणि तेही कलकत्त्यालाच का घेऊन जातात? त्यामागे त्यांच्या मनात कोणती ओढ असते याची जाणीव गोगोल-सोनियाला लहान वयात होत नाही.क्वचित एखाद्या सुट्टीत पालकांबरोबर ते दिल्ली-आग्रा शहरांना भेट देतात पण एकूणच भारत,भारतातील आपले नातेवाईक यांच्याबद्दल गोगोल-सोनियाला फारसे अप्रूप वाटत नाही.

शाळेत असताना सहाध्यायी नावावरून चिडवतात म्हणून गोगोलला आपल्या नावाबद्दल न्यूनगंड वाटू लागतो.त्याबाबत तो सतत आई-वडिलांना सांगत राहतो.आपलेच नाव असे विचित्र का आहे याबद्दल तो चीडचीड करू लागतो.वडील त्याला निकोलाय गोगोल हा फार मोठा रशियन लेखक आहे हे सांगून गोगोलची पुस्तके त्याला विद्यापीठाच्या ग्रंथालयात नेऊन दाखवतात, त्याच्या वाढदिवसाला त्याला गोगोलचे पुस्तक भेट देतात. पण गोगोलला तरीही आपल्या नावाचा तिटकारा वाटतो. नाव कसे बदलता येईल याची माहिती तो मिळवत रहातो.

गोगोल आणि सोनिया मोठे होत जातात तसे आई- वडील प्रत्येक सणाला त्यांच्या ज्या बंगाली मित्रमंडळींना घरी बोलावतात त्यांच्यातही रमेनासे होतात.शाळेच्या शेवटच्या वर्षात असतानाच गोगोल पहिल्यांदा आपल्या अमेरिकन मित्रांसोबत पार्टीला जातो.तिथेच एका मुलीशी तो पहिल्यांदाच जवळीक करतो.सोनिया रोजच अमेरिकन मैत्रिणींकडे खेळायला जात असते.

वडीलांनी एम.आय.टी. मध्येच उच्चशिक्षण घे असे सांगितले असतानाही गोगोल घरापासून दूर येल विद्यापीठात प्रवेश घेतो.तिथे तो वास्तुविशारद होण्यासाठी आलेला असतो.पण खरे तर इथे त्याला पहिल्यांदाच मनासारखे स्वातंत्र्य मिळते.इथेच तो आपले गोगोल हे नाव बदलून निखिल करून घेतो.चुकून एकदा लेडिज होस्टेलमध्ये शिरलेल्या गोगोलची अमेरिकन मुलीबरोबर मैत्रीही होते.येलवरून आपल्या घरी तो अधूमधून येत राहतो. त्या रेल्वेच्या प्रवासात एकदा रूथ नावाच्या मुलीशी त्याची ओळख होते. तीही येल विद्यापीठातच इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेते आहे. हळूहळू रूथ आणि गोगोल परस्परांच्या अधिक जवळ येतात.गोगोल दोनदा रूथच्या वडिलांच्या फार्म हाऊसवर जाऊन येतो. तिथे त्याला सहजच स्वीकारले जाते. पण त्याच्या घरी रूथला बोलावणे त्याला प्रशस्त वाटत नाही. आपले आई-वडील तिला सहज स्वीकारणार नाहीत याची त्याला कल्पना आहे.रूथ तिच्या विषयातला एक कोर्स करण्यासाठी काही आठवडे इंग्लंडला जाते तेव्हा तिच्या विरहाने गोगोल कासावीस होतो.रूथ इंग्लंडहून परतते ती गोगोलला वेगळीच भासते. आता ती गोगोलला टाळू लागते, त्यांची भांडणे होऊ लागतात आणि हळूहळू दोघे परस्परांपासून दुरावतात. रूथशिवाय ट्रेनने आई-वडिलांच्या घरी परतण्याचा प्रवास आता गोगोलला कंटाळवाणा वाटू लागतो. एकदा तो असाच घरी परतत असताना ट्रेन बराचवेळ एकाच ठिकाणी थांबू रहाते. नंतर कळतं की कोणीतरी ट्रेनखाली आले आहे. नेहमीच्या वेळी गोगोलला घ्यायला त्याचे वडील स्टेशनवर येतात. पण बराच काळ गाडी न आल्याने ते काळजीत पडतात. एकदाची ट्रेन येते आणि गोगोलला घेऊन त्याचे वडील गाडीने घरी निघतात. त्यावेळी ते गोगोलला त्याचे नाव कोणत्या प्रसंगावरून ठेवले गेले तो ते स्वतः ज्या रेल अपघातात सापडले होते तो कथन करतात. ती हकिकत ऐकून गोगोल सून्न होतो. आपले वडील रेल्वे अपघातातून निकोलाय गोगोलच्या पुस्तकामुळे वाचले आणि म्हणून आपले नाव गोगोल असे ठेवले गेले हे कळल्यावर आपण नाहक आपले नाव बदलून निखिल केले असे गोगोलला वाटते.

गोगोल वास्तुविशारद होतो आणि न्युयॉर्कमधील एका मोठ्या फर्ममध्ये त्याला नोकरी मिळते.मिळणाऱ्या पगारात न्युयॉर्कमध्ये त्याला अगदी लहानशीच खोली भाड्याने मिळू शकते.त्याची आर्किटेक्चर फर्म मोठी आहे आणि जगभरातील हॉटेल्स, मोठमोठ्या इमारतींचे आराखडे या फर्ममध्ये तयार होतात.गोगोलला त्या फर्ममध्ये त्याचे काम आणि स्थान नगण्य आहे हे जाणवते पण जोपर्यंत दुसरी चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याला हीच नोकरी करावी लागणार असते.या नोकरीत असतानाच एका अमेरिकन मित्राबरोबर तो पार्टीला जातो आणि तिथे मॅग्झिन नावाच्या एका मुलीशी त्याची ओळख होते.तिचे उच्च शिक्षण इतिहासातले आहे आणि गोगोललाही इतिहासात, विशेषतः ऐतिहासिक वास्तूंत रस असल्याने त्या दोघांची मैत्री होते. मॅग्झीनच्या पुढाकारानेच ही मैत्री लौकरच नातेसंबंधात परिवर्तीत होते. मॅग्झीनचे आई- वडील श्रीमंत आहेत, त्यांचा स्वतःचा बंगला आहे. मॅग्झीन गोगोलला आपल्या बंगल्यावर बोलावते. तिचे आई-वडील त्याचा सहज स्वीकार करतात. इतका की तो जणू त्यांच्या कुटुंबाचाच भाग बनून जातो.मॅग्झीनच्या बरोबरच तो राहू लागतो. मॅग्झीनबरोबरचे त्याचे हे नाते गोगोलच्या आई-वडिलांना पूर्णपणे माहीतच नसते. एका सुट्टीत मॅग्झीन गोगोलला आपल्या आई-वडिलांच्या फार्म हाऊसवर न्यू हॅम्पशायर येथे घेऊन जाते. वाटेत ते गोगोलच्या घरी काही वेळ थांबतात.तेवढीच गोगोलच्या कुटुंबाशी मॅग्झीनशी तोंडओळख होते.न्यु हॅम्पशायरमधील सुट्टी गोगोल मॅग्झिनसोबत अतिशय आनंदात घालवतो आणि नंतर न्युयॉर्कला आल्यावर लगेच कामात गुंतून जातो. याच सुमारास त्याचे वडील संशोधनासाठी क्लेव्हलॅंड या ठिकाणी जातात. तिथे त्यांना नऊ महिने रहावे लागणार आहे.या काळात गोगोलची आई एकटीच त्यांच्या बंगल्यात रहाणार आहे. कारण गोगोलची बहीण सोनिया देखील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली आहे.

एके संध्याकाळी अशोकचा असीमाला फोन येतो की त्याच्या पोटात दुखतं आहे म्हणून तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये जातो आहे. काळजीचे काही कारण नाही. डॉक्टरांशी बोलून तो तिला त्यांचे निदान कळवेल. असीमा ख्रिसमस कार्ड बनवण्यात व्यस्त आहे पण दोन तास झाले तरी अशोकचा फोन येत नाही तेव्हा तीच त्याला फोन लावायचा प्रयत्न करते. तो फोन उचलत नाही तेव्हा ती हॉस्पिटलचा फोन नंबर शोधून तिथे फोन करते. तिला कळते की अशोकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तो मरण पावला आहे. अशोकच्या मृत्यूची ही घटना इतकी अचानक घडते की असीमाला स्वतःला सावरणं कठीण जाते. पण मग ती गोगोल आणि सोनियाला फोन करून काय झाले आहे ते कळवते. सोनिया तातडीने आईकडे यायला निघते आणि गोगोल क्लेव्हलॅंडला वडिलांचे शव ओळखून त्यावर अंत्यसंस्कार करायला जातो.

वडिलांचे शव ओळखून त्याचे दहन करण्याची सोय गोगोलला करावी लागते. अस्थी त्याला पाठवण्यात येणार असतात.त्या एकाच दिवसात गोगोल अचानक प्रौढ होतो. आपल्या वडिलांचे क्लेव्हलॅंडमधील घर शोधून तो तिथे जाऊन त्यांच्या वस्तू गोळा करू लागतो तेव्हा त्याला अगदी आदल्या दिवशीपर्यंत त्या घरात आपले वडील वावरत होते या कल्पनेनेही वाईट वाटते.वडिलांच्या बुटांत तो आपले पाय घालून पहातो. वडिलांचा स्पर्श आता कधीच होणार नाही, ते कधीच दिसणार-बोलणार नाहीत ही जाणीव गोगोलला असहाय्य करते.

त्या रात्री गोगोलने वडिलांच्या घरात रहाण्यापेक्षा हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेऊन रहावे असे मॅक्झिन त्याला फोनवरून सुचवते. तिला तो होकारही देतो. पण प्रत्यक्षात त्याला वडिलांचे घर सोडवून निघवत नाही. ती रात्र वडिलांच्याच घरात राहून गोगोल दुसऱ्या दिवशी आईकडे जातो. मॅग्झीनने तिथे येण्याची इच्छा व्यक्त केलेली असताही तो तिला नकार देतो.महिनाभर तो आईबरोबरच रहातो. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरचे सर्व रितीरिवाज तो पार पाडतो.सांत्वनाला येणाऱ्या वडिलांच्या अनेक बंगाली मित्रमंडळींशी तो आणि सोनिया बोलतात. सोनिया आईच्या घरापासून जवळच्या अंतरावर नोकरी करायचा निर्णय घेते.त्यामुळे ती आईसोबत राहणार आहे. गोगोल न्युयॉर्कला राहणार असला तरी सतत येत राहणार असतो.त्यामुळे असीमा एकटी पडणार नसते.

न्युयॉर्कला परतल्यावर गोगोलला मॅग्झीनचे लग्नाचे आमंत्रण मिळते. पण मॅग्झीन आपल्या आयुष्यातून गेल्याचे दुःख वडिलांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा त्याला सुसह्य वाटते. आपण तिच्याबरोबर कायम राहू शकलो नसतो हे वास्तव तो स्वीकारतो.काही दिवसांनी असीमा गोगोलला सुचवते की त्यांच्या बंगाली मित्रमंडळींतील एका कुटुंबातील मुलगी मौशमी मुझुमदार ही न्युयॉर्कमध्येच नोकरी करते आहे आणि तिचे एका अमेरिकन मुलाबरोबर ठरलेले लग्न अचानक मोडले आहे. तेव्हा गोगोलने एकदा तिला भेटून तिची चौकशी करावी. गोगोल बरेच दिवस ते टाळत रहातो. पण एके दिवशी तो मौशमीला फोन करून तिला भेटायचे निश्चित करतो.

मौशमी ही फ्रेंच साहित्याची अभ्यासक आहे. ती एका विद्यापीठात शिकवते आहे.  ती फ्रेंच साहित्यातील उच्चशिक्षण घेण्यासाठी पॅरिसला गेली असता तिथे एका पार्टीत तिला ग्रॅहम भेटतो. तो अमेरिकन असतो, गुंतवणूक उद्योगात काम करत असतो. त्याला व्यवसायासाठी फ्रेंच शिकणे गरजेचे असते. मौशमी त्याला शिकवू लागते आणि ते दोघे परस्परांच्या प्रेमात पडतात.दोघेही अमेरिकेत येतात. परस्परांना भेटत रहातात आणि मौशमी ग्रॅहमला विवाहाबद्दल विचारते. ग्रॅहम तिची मागणी स्वीकारतो. मौशमीचे आई-वडील त्यांचा  साखरपुडा कलकत्त्यात आयोजित करतात. त्यानिमित्ताने कलकत्त्यातील त्यांच्या कुटुंबीयांशी ग्रॅहमशी ओळख होईल हाच त्यांचा हेतू असतो. ग्रॅहम कलकत्त्याला येतो. मौशमीच्या कुटुंबीयांशी मोकळेपणाने वागतो. त्यांच्या पद्धतीचे रितीरिवाज, पेहराव करतो. अमेरिकेत आल्यावर मौशमी आणि ग्रॅहमच्या लग्नाची जय्यत तयारी होते, आमंत्रणे पाठवली जातात. आणि त्याचवेळी ग्रॅहम फोनवर आपल्या मित्रांशी बोलताना मौशमीच्या कलकत्त्यातील नातेवाईकांच्या गोतावळ्याबद्दल, बंगाली रितीरिवाजाबद्दल उपरोधाने बोलताना मौशमी ऐकते. ग्रॅहम आपल्या नातेवाईकांशी मोकळेपणाने वावरण्याचे ढोंग करत होता आणि आता तो मित्रांशी बोलताना त्यांची, आपल्या रितीरिवाजांची खिल्ली उडवतो आहे हे ऐकल्यावर मौशमी खवळते आणि तडकाफडकी लग्न मोडून टाकते.

गोगोल मौशमीला भेटतो तेव्हा त्या दोघांना त्यांची भाषा,संस्कृती, कौटुंबीक पार्श्वभूमी सारखीच असल्याने खूपच मोकळेपणाने बोलता येते. तीन महिन्यांतच ते एकमेकांच्या निकट येतात आणि लग्न करायचे ठरवतात. बंगाली पद्धतीने हे लग्न होते.मौशमी गोगोलच्या भाड्याच्या लहानशा अपार्टमेंमध्ये रहायला येते. पण ते लहान घर  आणि तिच्या व्यक्तीगत आकांक्षा यांचा काही मेळ बसत नाही हे तिच्या लौकरच लक्षात येते. मौशमीच्या मित्रमंडळींच्या पार्ट्यांना गोगोल जातो पण तिथे त्याचे मन रमत नाही हे त्याला कळून चुकते.विशेषतः  मौशुमीचे मित्रमंडळ फ्रेंच भाषेत आणि साहित्य,कलेबद्दल बोलणारे असल्याने गोगोलला त्यांचे परस्परांशी बोलणे काहीच कळत नाही.मौशमीला एक संशोधनपर निबंध पॅरिसमध्ये वाचायचा असल्याने गोगोल सुट्टी घेऊन तिच्यासोबत जातो. तिथेही गोगोलला असं वाटतं की आपण उपेक्षीत आहोत.अखेरीस तो मौशुमीला सांगून एकटाच पॅरिसमध्ये भटकतो. त्याला हव्या त्या इमारती, वस्तुसंग्रहालये तो सावकाश पाहतो.मौशमीला पॅरिस फार आवडते. आपण काही वर्षांनी इथेच स्थलांतरीत होऊ असे ती गोगोलला सांगते.

गोगोलला लक्षात येते की मौशुमी केवळ स्वतःचा विचार करते आहे.तिच्या मनातून ग्रॅहमची प्रतिमा अजून पूर्ण नाहीशी झालेली नाही हेही गोगोलला कळते.

पॅरिसहून परत आल्यावर गोगोल आपल्या कामात व्यस्त होतो. याच काळात मौशमी सकाळच्या लेक्चरसाठी कॉलेजला येते.तिथे तिला दिसते की त्यांच्या विद्यापीठाच्या कार्यालयातील एक कर्मचारी महिला अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली आहे. या कर्मचारी महिलेने आलेल्या सर्व पत्रांचे वर्गीकरण करून ती प्रत्येक विभागाकडे सुपूर्द करायची अशी पद्धत आहे.ती महिला हे काम करतानाच अचानक मरण पावली आहे. तिचे अर्धवट राहिलेले काम मौशमी करायला घेते. तेव्हा तिला अचानक त्यात दिमित्रीचा – तिच्या शाळकरी वयातील प्रियकराचा नोकरीसाठी पाठवलेला अर्ज दिसतो.तिचे मन भूतकाळात जाते. शाळेत असताना घरी न सांगता एका निषेध मोर्च्याला मौशमी आणि तिची मैत्रीण त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत शहरात गेलेल्या असतात.या प्रवासात दिमित्री मौशमीशी शारीर जवळीक करतो. मौशुमीला हा पहिलाच अनुभव असतो.दिमित्री तिच्यापेक्षा बराच मोठा असला तरी ते दोघेही फ्रेंच साहित्याचे अभ्यासक आहेत. दिमित्री एक पुस्तक स्वतःची सही करून मौशमीला भेट देतो.मौशमीने ते कायम जपलेले असते.अनेक वर्षांनी दिमित्रीने तिच्याच विद्यापीठात नोकरीसाठी केलेल्या अर्जावरील  अक्षर पाहून मौशमीला त्याला भेटायची तीव्र ओढ लागते. ती दिमित्रीच्या अर्जावरील त्याचा पत्ता शोधत त्याच्या घरी पोहोचते. तो एकटाच रहातो आहे ,वयपरत्वे तो शरीराने बेढब झाला असला तरी पूर्वी होता तसाच मजेशीर आहे हे पाहून मौशमी दिमित्रीच्या प्रेमात पडते. गोगोल कार्यालयात असताना रोजच दुपारी मौशमी दिमित्रीकडे जाऊ लागते. त्याच्या सहवासाचा आनंद लुटू लागते.

ख्रिसमस सुट्टीत ट्रेनने मौशमी आणि गोगोल असीमाकडे जायला निघतात.तेव्हा वाटेत आपल्याला थोडे मोठे घर भाड्याने घोतलेो पाहिजे असे गोगोल म्हणतो. ते कुठे घ्यावे याची चर्चा करत असताना अनवधानाने दिमित्रीचा उल्लेख मौशमी करते आणि गोगोलला तिचा संशय येतो. तो थेटच तिला दिमित्री कोण आहे, त्याचे तुझे प्रेमसंबंध आहेत का असे प्रश्न विचारतो आणि मौशमीला खरे सांगावे लागते. दोघेही सामोपचाराने विभक्त व्हायचे ठरवतात. ख्रिसमसच्या दिवसांत याबद्दल असीमाकडे कोणतीही वाच्यता न करता गोगोल न्युयॉर्कला परततो. दोघेही कायदेशीर रित्या घटस्फोट घेतात.कालांतराने मौशमी दिमित्रीबरोबर तिच्या आवडत्या पॅरिसला निघून जाते. गोगोलला मौशमी आपल्याशी निष्ठेने वागली नाही, तिने प्रेमाचे ढोंगच केले हे जाणवून काही दिवस दुःख होते. पण मग तोही खूप दिवसांपासून त्याने मनात योजलेली रोमची टूर करतो. तेथील जुन्या वास्तुंची चित्रे काढण्यात दिलासा शोधतो.

न्युयॉर्कला परतल्यावर गोगोल एका लहान आर्किटेक्चर फर्ममध्ये नोकरी पत्करायचे ठरवतो. तिथे त्याला त्याच्या कल्पनेतील वास्तुचित्रे कागदावर काढता येतील, प्रत्यक्ष तशा वास्तू बांधता येतील असे त्याला वाटते.त्याच सुमारास गोगोलला त्याची आई कळवते की तिने आता त्यांचा बंगला विकून भारतात परतण्याचे ठरवले आहे. ती आता वर्षातील सहा महिने कलकत्त्यात आपल्या धाकट्या भावाबरोबर रहाणार आहे आणि उरलेले सहा महिने अमेरिकेत सोनिया व गोगोलकडे आळीपाळीने रहाणार आहे. गोगोल आणि सोनियाने बंगल्यातील ज्या वस्तु त्यांना हव्याशा वाटतात त्या घेऊन जाव्यात अन्यथा ती बऱ्याच वस्तू गरजूंना वाटून टाकणार आहे असे असीमा कळवते.

असीमाचे भारतात जायचे तिकिट काढले जाते. ती भारतात जाण्यापूर्वी आपल्या सर्व बंगाली मित्रमंडळींना बंगल्यात अखेरची पार्टी देण्यासाठी आमंत्रीत करते.स्वतः राबून वेगवेगळे रूचकर पदार्थ बनवते. दोन्ही मुले सुट्टी घेऊन असीमाकडे येतात. सोनियाने तिचा अमेरिकन मित्र बेन यालाही आणले आहे. बंगल्यात तळमजल्यावर पार्टी चालू असताना गोगोल आपल्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत येतो. तेथील वस्तु हाताळताना त्याला आपले वडील आठवतात.त्याला याच बंगल्यातील चौघांचे सुखाचे, उबदार, सुरक्षित दिवस आठवतात.अचानक वडिलांनी तेराव्या वाढदिवसाला दिलेला निकोलाय गोगोलचा कथासंग्रह त्याच्या हाती लागतो आणि त्यातील ओव्हरकोट कथा वाचण्यात तो गुंग होतो. थोड्याच वेळात आई खालून  हाक मारेल, सगळ्यांबरोबर जेवणात सामील व्हावे लागेल, काही दिवसांत आईचे सगळे सामान आवरून तिला विमानात बसवून द्यावे लागेल हे सगळे माहीत असतानाही तो काही वेळ गोगोल वडिलांनी दिलेल्या पुस्तकातील गोष्टींत रमून जातो.त्याचे कुटुंब आता अपरिहार्यपणे परस्परांपासून दुरावणार आहे.पण मनात त्यांचे एकत्र घालवलेले सुंदर दिवस गोगोल जपून ठेवणार आहे.

‘दी नेमसेक’ या कादंबरीतील कथासूत्रे-

‘दी नेमसेक’ या कादंबरीचे कथानक समजून घेतल्यावर आपण आता या कादंबरीची कथासूत्रे थोडक्यात लक्षात घेऊ.झुंपा लाहिरी यांनी ‘दी नेमसेक’ या कादंबरीची जी सुधारीत नवी आवृत्ती २०१८ मध्ये प्रकाशित केली त्याला एक उपोद्घात जोडला आहे.त्यात त्यांना स्वतःला त्यांचे पासपोर्टवरील नाव बदलताना करावा लागलेला पत्रव्यवहार वगैरे गोष्टी त्या सांगतात.  त्यानंतर त्यांनी स्वतःच ‘दी नेमसेक’ कादंबरी लिहिताना त्यांनी कोणती कथासूत्रे मनात योजली होती ते त्यांनी स्पष्ट केले आहे.त्याचेच मराठी भाषांतर मी पुढे देते आहे.

“‘दी नेमसेक’ची मोठी कथासूत्रे आहेत बदल(change) आणि व्यक्तीचे (त्यानुसार) घडत(becoming)  जाणे.आपल्या नव्या घडणीत काहीतरी शोधणे, स्वीकारणे, आत्मसात करणे,जुळवून घेणे हे ‘दी नेमसेक’चे कथासूत्र आहे.जगण्याच्या दिशेत व्यत्यय येऊ शकतात याबद्दल ही कादंबरी सांगते.आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळे होण्याची माणसाच्या मनातील आस या कादंबरीला दाखवायची आहे.या प्राथमिक कथासूत्रांबद्दल सांगितल्यावर लक्षात येईल की माझ्या इतर साहित्यकृतींच्या कथासूत्रांशी त्याचे साधर्म्य आहे.माझा स्वतःशी चाललेला संघर्ष, माझे मूळ,माझे जगातील स्थान याबद्दल- सतत सुरूच राहतो.स्वतःच्या नवीन ओळखी (identity),माझ्यात सामावलेल्या नव्या भाषा आणि नवीन नेपथ्य,जुन्या सवयी आणि ओढींनी (passion) नव्यांसाठी जागा करून दिलेली असते.मी हा संघर्ष पूर्पणे थांबवणे,स्वतःला ओळखण्याचा शोध थांबवणे म्हणजे मला वाटते मी माझे लेखन थांबवणेच असेल.” 

लेखिकेने ‘दी नेमसेक’ हेच शीर्षक कादंबरीला का दिले असावे असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. मला वाटतं लेखिकेला असे म्हणायचे आहे की या कादंबरीतील गोगोल असो की अन्य कोणी व्यक्ती असो आपल्या नावाबद्दल ते अती संवेदनशील असतात. पण खरंच त्या नावाचा आणि त्यांच्या स्वतःच्या घडण्या-मोडण्याचा काहीही संबंध असतो का ?तर अजिबातच नाही. व्यक्तीचे नाव हे फक्त एक चिन्ह असते. नावे केवळ नावापुरतीच असतात असे लेखिकेचे म्हणणे आहे. व्यक्तीला स्वतःची ओळख आयुष्याशी झगडत स्वतःच घडवायची असते असे लेखिकेला ‘दी नेमसेक’ या शीर्षकातून सुचवायचे असावे.

‘दी नेमसेक’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे लक्षात घेतल्यावर तुम्हाला मूळ कादंबरी वाचण्याची उत्सुकता वाटावी !  मराठीत ही कादंबरी उल्का राऊत यांनी भाषांतरीत केली आहे.तीही तुम्ही वाचू शकता. ‘नेमसेक’ हा झुंपा लाहिरी यांच्या कादंबरीवर आधारित मीरा नायर दिग्दर्शित, इरफान आणि टब्बू यांच्या नितांत सुंदर अभिनयाने नटलेला चित्रपटदेखील तुम्ही नक्की पहा.

पुढील ब्लॉगमध्ये ‘दी नेमसेक’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करण्याचा आणि झुंपा लाहिरी यांच्या लेखनामागची अंतर्दृष्टी सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

                                                                 -गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा