आजच्या ब्लॉगमध्ये आपण भारतीय अमेरिकन इंग्रजी कादंबरीकार झुंपा लाहिरी यांची चरित्रात्मक माहिती घेऊन त्यांच्या साहित्यिक कामगिरीचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे आहे त्यांच्यासाठी ऑडिओ फाईल सोबत जोडली आहे.
११ जुलै १९६७ रोजी लंडनमध्ये जन्मलेल्या निलंजना सुदेष्णा ऊर्फ झुंपा लाहिरी या प्रथितयश इंग्रजी कथाकार व कादंबरीकार आहेत.तसेच त्यांनी इटालियन भाषेतही साहित्य निर्मिती केली असून, इटालियन साहित्य इंग्रजीत भाषांतरित केले आहे.

झुंपा लाहिरी यांचे वडील अमर लाहिरी जे मूळचे कलकत्ता येथील टॉलिंगजचे असले तरी लंडनमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळवून स्थलांतरित झाले होते.त्यांची पत्नी तपोती ही देखील कलकत्ता येथे जन्माला आली असली तरी तीही विवाहानंतर पतीसोबत लंडनला स्थलांतरित झाली होती आणि तिथे शिक्षिका म्हणून काम करत होती.आपली पहिली मुलगी निलंजनाचे टोपणनाव या दांपत्याने झुंपा असे ठेवले होते.झुंपा अगदी लहान असतानाच लाहिरी दांपत्य अमेरिकेत स्थलांतरित झाले.तिथे त्यांनी जम बसवला आणि त्यांची दुसरी मुलगी अमेरिकेतच जन्माला आली.
अमर आणि तपोती लाहिरी नोकरीनिमित्त पाश्चात्य देशांत स्थिरावले असले तरी त्यांनी आपली बंगालमधील नाळ अजिबात तोडली नव्हती.आपली बंगाली भाषा, साहित्य व संस्कृती यांचा त्यांना सार्थ अभिमान होता.त्यामुळे आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी बंगाली भाषा शिकवली तर होतीच पण घरात सर्वांनी बंगाली भाषेतच बोलले पाहिजे असा कटाक्षही बाळगला होता.
झुंपा आणि तिच्या धाकट्या बहिणीला त्यांचे आई-वडील जमेल तेव्हा कलकत्ता येथे घेऊन जात.झुंपाच्या आईचे वडील नावाजलेले चित्रकार होते.ते झुंपाला नवनव्या गोष्टी मुद्दाम रचून सांगत आणि त्यामुळे झुंपालाही शब्दांशी व कल्पनेशी खेळण्याची सवय झाली होती.
अमेरिकन शाळेत झुंपाला दाखल केले गेले.तिथे तिचे टोपणनाव उच्चारायला सोपे म्हणून शिक्षकांनी तेच नोंदवले.खरे तर झुंपाला ते फारसे आवडत नव्हते.तिथूनच तिच्या मनात संघर्ष सुरू झाला.जो तिने पुढे आपल्या ‘नेमसेक’ या कादंबरीत ठळकपणे मांडला. घरातील जुन्या जगातील मुल्ये आणि वास्तवात नवीन जगाशी सराईतपणे जुळवून घेणे हा संघर्ष झुंपासाठी सोपा नव्हता.हाच संघर्ष तिच्या साहित्यात अभिव्यक्त झालेला दिसतो.
लिहिण्या वाचण्याची आवड झुंपाला घरातूनच लावली गेली.तिची आई सतत बंगाली साहित्य वाचत असे आणि जमेल तेव्हा लिहीत असे.झुंपाला इंग्रजी साहित्याची गोडी वाटू लागली.तिने शाळेत असल्यापासून लिहायला सुरुवात केली.नाटकांतही कामे केली .१९८९ मध्ये झुंपाने बर्नाड कॉलेजमधून इंग्रजी साहित्याची पदवी मिळवली.त्यानंतर तिने सर्जनशील लेखन, विशुद्ध कला आणि तुलनात्मक साहित्य अशा तीन विषयांत पदव्युत्तर पदव्या मिळवल्या.पुढे ‘रेनेसान्स स्टडी’ या विषयावर संशोधन करून झुंपाने बोस्टन विद्यापीठातून पीएच.डी.देखील मिळवली.शिकत असताना तिच्यावर मॅविस गॅलंट, विल्यम ट्रेवर,एलिस मन्रो, व्हर्जिनिया वुल्फ ,आंतोन चेकाव्ह ,डान्टे आणि जेम्स जॉईस या लेखक,कवींचा प्रभाव होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झुंपाने पुस्तकांच्या दुकानात नोकरी केली.तिथे तिला बरेच शिकता आले,लेखनाचे प्रयोग करता आले.नंतर तिने बोस्टन विद्यापीठात सर्जनशील लेखन या विषयाचे अध्यापन केले.
आपल्या साहित्यात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील अनुभव सहजपणे गुंफलेले असावेत असे झुंपाला वाटत होते.तसा प्रयत्न त्यांनी सुरूवातीला आपल्या कथांतून केला.बरेचवेळा त्यांचे लेखन नियतकालिकांनी साभार परत पाठवले पण त्या प्रयत्न करत राहिल्या.न्युयॉर्कर,वर्ड रिव्ह्यू,स्टोरी क्वॉर्टर्ली अशा नियतकालिकांनी त्यांच्या कथांना प्रसिद्धी दिली.याच एकूण नऊ कथांचा संग्रह म्हणजे ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’ हे झुंपा लाहिरी १९९९ मध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक.याच कथासंग्रहासाठी झुंपा लाहिरी ‘पुलित्झर पुरूस्कारा’च्या मानकरी ठरल्या.याच पुस्तकाला ‘पेन हेमिंग्वे पुरस्कार’ देखील मिळाला. या पुस्तकातील काही कथांना कलकत्त्याची पार्श्वभूमी होती तर काहींना अमेरिकेची.भारतातील ठरवून लग्न करण्याची विवाह पद्धती, अमेरिकन भारतीय लोकांना सतावणारी परात्मता , संस्कृती हरवल्याची त्यांना असलेली बोच अशी कथासूत्रे आपल्या कथांतून झुंपा लाहिरी यांनी फुलवली होती.

२००१ मध्ये अल्बर्टो व्हॉर्वोलियास बुश या टाईम वर्तमानपत्रातील पत्रकाराशी झुंपा विवाहबद्ध झाल्या.त्यांना दोन मुली झाल्या.
पहिल्या कथासंग्रहाच्या यशानंतर झुंपा यांनी कादंबरी लिहिण्याचे ठरविले .’नेमसेक’ ही त्यांची पहिली कादंबरी २००३ साली प्रकाशित झाली.२००६ साली या कादंबरीवर आधारित चित्रपट देखील आला.ही कादंबरीदेखील स्थलांतरित भारतीयांच्या मनातील उलथापालथी दाखवते.आपली व्यक्ती म्हणून ओळख मिळवण्यासाठी या स्थलांतरित मंडळींना ज्या संघर्षाला सामोरे जावे लागते ते झुंपा यांनी तपशीलवार पद्धतीने ‘नेमसेक’ या कादंबरीत मांडले आहे.ही कादंबरी बेस्ट सेलर ठरली आहे.मराठीत व अन्य भारतीय भाषांत तिचे भाषांतर झाले आहे.
२००८ मध्ये ‘अनअकस्टम्ड अर्थ’ हा झुंपा लाहिरी यांचा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध झाला.याही कथासंग्रहात त्यांनी भारतीयांना अमेरिकेत आपले बस्तान बसवताना आणि विशेषतः तेथील संस्कृतीशी जुळवून घेताना जो आंतरीक संघर्ष करावा लागतो त्याचे बारकाईने चित्रण केले आहे.या कथासंग्रहासाठी झुंपा लाहिरी यांना ‘फ्रॅंक ओ कॉनॉर’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

२०१३ साली झुंपा यांनी ‘दी लोलॅंड’ ही कादंबरी प्रसिद्ध केली.या कादंबरीत दोन बंगाली भावांनी आयुष्यात निवडलेले अगदी भिन्न मार्ग लेखिका दाखवते.या कादंबरीला ‘बुकर पारितोषिका’साठी नामांकित केले गेले होते.तसेच या कादंबरीसाठी झुंपा यांना २०१५ चा ‘साऊथ एशियन साहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला.

२०१२ साली झुंपा लाहिरी आपल्या कुटुंबाला घेऊन इटलीची राजधानी रोम येथे स्थलांतरित झाल्या.इटालियन भाषा त्यांना शिकायचीच होती.ती त्यांनी झपाट्याने अवगत तर केलीच पण त्यात पुढे प्राविण्य मिळवून त्या इटालियन भाषेत साहित्य निर्मिती करू लागल्या.२०१५ साली ‘इन आल्ट्र पॅरोल’ (इन आदर वर्डस) हे त्यांचे इटालियन भाषेतील पहिले पुस्तक प्रकाशित झाले.तर २०१८ साली ‘डोव्ह मी ट्रोव्हो’ (व्हेअरअबाऊटस) हे त्यांचे इटालियन भाषेतील दुसरे पुस्तक प्रकाशित झाले.ही कादंबरी होती.ही पुस्तके त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेतही अनुवादीत केली.त्यानंतर अन्य इटालियन लेखकांचे साहित्य इंग्रजीत भाषांतरित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.डॉमनिको स्टारनोक यांचे ‘ट्रीक’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केले.त्या अनुवादाला त्यावर्षीचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.
‘हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत झुंपा लाहिरी यांनी म्हटले आहे की त्या जिथे कुठे असतील तिथे त्यांना परकेपणा जाणवत राहील आणि त्या जाणिवेबद्दल त्या आयुष्यभर लिहीत राहतील.भाषांतर हा मार्ग त्यासाठी त्यांनी आग्रहपूर्वक निवडला आहे.कारण भाषांतर करणारा नेहमीच संहितेबाहेर राहू शकतो.
२०२२ मध्ये झुंपा लाहिरी यांनी इटालियन भाषेतील दुसरा कथासंग्रह ‘रॅकोटी रोमानी’ प्रकाशित केला आणि त्याचे इंग्रजी भाषांतर २०२३ मध्ये ‘रोमन स्टोरीज’ या नावाने प्रसिद्ध झाले.
झुंपा लाहिरी यांना ‘अमेरिकन अकादमी ऑफ आर्टस ऍन्ड लेटर्स’ या संस्थेने २०१४ साली ‘नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल’ने सन्मानित करण्याची घोषणा केली.हे पदक तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते झुंपा लाहिरी यांना देण्यात आले.२०१७ साली इटालियन सरकारने झुंपा यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा पुरस्कार दिला.२०१९ मध्ये त्यांना ‘कमांडर ऑफ इटालियन रिपब्लिक’ हा पुरस्कार इटालियन राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटरेला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अशा या जागतिक ख्यातीच्या भारतीय इंग्रजी कादंबरीकार झुंपा लाहिरी यांच्या ‘नेमसेक’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे आपण पुढील ब्लॉगमध्ये समजून घेणार आहोत.
–गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा