मागील ब्लॉगमध्ये अरूधंती रॉय यांनी लिहिलेल्या, बुकर पारितोषिक प्राप्त अशा ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण लक्षात घेतली होती. आज या कादंबरीच्या कथनाच्या विश्लेषणातून लेखिकेची अंतर्दृष्टी अधिक स्पष्टपणे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही कादंबरी अपर्णा वेलणकर यांनी  मराठीत अनुवादीत केली आहे. त्या अनुवादीत पुस्तकाचाच आधार मी आजच्या लेखनासाठी घेतला आहे.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीत(अनुवादीत) एकूण ४३२ पृष्ठे आहेत. २१ लहान-मोठ्या प्रकरणांत या कादंबरीचे कथानक विभागले गेले आहे.या प्रकरणांची व्याप्ती पाहिली तर लेखिकेने कथानकाची रचना कशी केली आहे हे लक्षात येते. कादंबरीचे पहिले प्रकरण ४५ पानांचे आहे, दुसरे प्रकरण ६८  तर चौथे प्रकरण ३६ पानांचे आणि तेरावे प्रकरण ३४ पानांचे आहे.ही चार प्रकरणे वगळता उर्वरित १७ प्रकरणांची सरासरी पृष्ठसंख्या जेमतेम १२-१३ अशी असेल. त्यातही  पंधरावे प्रकरण केवळ २ पानांचे, सोळावे ५ पानांचे, सतरावे व अठरावे ही प्रकरणे १२ किंवा १३ पानांची एकोणिसावे प्रकरण ८ पानांचे नी एकविसावे प्रकरण १० पानांचे आहे.यावरून साधारणपणे पंधराव्या प्रकरणानंतर कादंबरीच्या कथानकाने वेग पकडलेला दिसतो. कादंबरीतील नाट्य आणि काव्य शेवटच्या सहा प्रकरणांतच आहे असे म्हणता येईल.उरलेल्या पंधरा प्रकरणांत या शेवटी येणार असलेल्या नाट्याची सूचना कथनातून मिळत राहाते पण नाट्यपूर्ण घटनांचे तपशील मात्र शेवटच्या तीन-चार प्रकरणांतच मिळतात.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे कथानक प्रामुख्याने केरळमधील आयमेनम गावात घडले आहे.ते काळाच्या अक्षावर मागे-पुढे सरकणारे आहे. त्यातही ते मागे सरकते ते एकाच घटनेच्या आणि त्या घटनेचे परिणाम म्हणून घडलेल्या अन्य काही घटनांच्या दिशेने. आणि पुढे सरकते तेही एकाच घटनेच्या दिशेने.मागे सरकत हे कथानक पोहचते १९७० च्या ख्रिसमसच्या आगे-मागे अम्मु आणि अस्पृश्य वेलुथा यांच्यामध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांकडे. ते उघडकीस आल्याने अम्मुला बेबी कोच्चमाने घरात डांबून ठेवणे, अम्मुने मुलांवर त्याचा राग काढणे, मुलांनी ऐन पावसात नदी ओलांडून पलीकडच्या हिस्ट्री होममध्ये जाण्याचा निर्णय घेणे, त्यांच्याबरोबर हट्टाने आलेल्या सोफी मॉलचे नदीत वाहून जाणे,बेबी कोच्चमाने पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने त्यांनी वेलुथाची क्रूर हत्या करणे, अम्मुची पोलिसांनी हेटाळणी करणे,चाकोने तिला घर सोडून जायला सांगणे, अम्मुने एस्थाला कलकत्त्याला त्याच्या वडिलांकडे पाठवणे, स्वतः नोकरीसाठी कोचिनला जाणे, तिथेच खंगून मरण पावणे या घटना  अतिशय वेगाने घडल्या आहेत.त्यानंतरच्या २३ वर्षांत एस्था व राहेल एकमेकांपासून दूर आहेत आणि त्यांच्या आयुष्यात जे घडले आहे ते कथनातून केवळ दोन-चार पानांत मांडले गेले आहे.कथानक पुढे सरकते ते एस्था आणि राहेल २३ वर्षांनंतर म्हणजे १९९३मध्ये आयमेनम गावात परत भेटतात या प्रसंगाकडे.  या प्रसंगाचे तपशीलही कथनात केवळ पाच-सहा पानांतच मांडले गेले आहेत.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीतील पहिली दोन प्रकरणे कादंबरीतील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्याला कारण असणारा इतिहास थोडक्यात उलगडणारी आहेत.उदा.एस्था या व्यक्तिरेखेच्या मौनाचे, अबोल राहण्याचे कारण त्याच्या सातव्या वर्षी त्याने पाहिलेली वेलुथाची अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेली हत्या,त्याने पाहिलेला सोफी मॉलचा अपघाती मृत्यू आणि त्याला अचानक आईपासून दूर जावे लागणे यात आहे हे कथनातून लक्षात येते.तसेच एस्थाची जुळी बहिण राहेल हिच्या वाट्याला एस्था कलकत्त्याला आणि अम्मु कोचिनला गेल्यानंतर,विशेषतः अम्मुच्या मृत्यूनंतर आलेलं असुरक्षितपण तिच्या शालेय शिक्षणावरच नव्हे तर संपूर्ण आयुष्यावरच कसे परिणाम करणारे ठरले तेही कथनातून स्पष्ट होत जाते.एस्था बालवयात आलेल्या अनुभवांनी मूक, अबोल झाला आहे तर राहेलच्या संवेदना जणू बालवयातील अनुभवांनी थिजून गेल्या आहेत.तारूण्यातील प्रेमालाही ती योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही हे कथनातून कळते.

राहेलच्या मनात कायमच ‘बिग गॉड’ आणि ‘स्मॉल गॉड’ यांची तुलना होत आली आहे. तिच्या मनातले बिग गॉड म्हणजे स्वार्थी सरंजामदार, भांडवलदार तर स्मॉल गॉड म्हणजे निरपेक्षपणे प्रेम करणारे उपेक्षित ,गरीब हे कथनातून उलगडत जाते. ‘स्मॉल गॉड’ ‘बिग गॉड’च्या सत्तेला क्षणभर का होईना हादरा देतात हे तिने अनुभवले आहे आणि ते तिच्या मनात कायमचे कोरले गेले आहे हेही कथनातून लक्षात येते.

पहिल्याच प्रकरणात बेबी कोच्चम्मा ही एस्था-राहेलच्या आजोबांची अविवाहीत, वृद्ध बहीण हीच आता आयमेनममधील पूर्वजांच्या घरात राहणारी त्यांची एकमेव नातेवाईक आहे हे कथनातून स्पष्ट होते.बेबी कोच्चम्माचे  विफल प्रेमप्रकरण कथनात थोडक्यात येते. याच बेबी कोच्चमाचा  भौतिक गोष्टींचा हव्यास, विशेषतः कपडे, दागदागिन्यांचा हव्यास, तिने घराकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष आणि तिला लागलेले टी.व्ही. पाहत बसायचे व्यसन या सर्व गोष्टी कथनात थोडक्यात मांडल्या गेल्या आहेत.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचे दुसरे प्रकरण सर्वात दीर्घ आहे.या प्रकरणात अम्मु, बेबी कोच्चम्मा आणि अम्मुचे वडील पाप्पाची यांची स्वभाववैशिष्ट्ये अधिक तपशीलवारपणे उलगडतात.हे संपूर्ण प्रकरण निळ्या प्लायमाऊथ गाडीतून एस्था-राहेल, त्यांची अम्मु, मामा चाको आणि अम्मुची आत्या बेबी कोच्चम्मा या सगळ्या कुटुंबीयांनी चाकोची विभक्त झालेली ब्रिटीश बायको मार्गारेट आणि मुलगी सोफी यांच्या स्वागतासाठी कोचिनकडे केलेल्या प्रवासाचे वर्णन करणारे आहे.मात्र असे असले तरी कथन सतत भूतकाळात जाते आणि त्यातून व्यक्तिरेखांच्या स्वभावांचे कंगोरे, त्यांच्या मनातील संघर्ष, घालमेल उलगडत जाते. उदा. अम्मु या व्यक्तिरेखेचा भूतकाळ, विशेषतः तिचा अयशस्वी प्रेमविवाहाचा विदारक अनुभव कथनातून सामोरा येतो. या अनुभवामुळेच अम्मुला दोन वर्षांच्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी  परतावे लागले आहे. असे परत येणे तिच्यासाठी अर्थातच नामुष्कीचे आहे.तिच्या अविवाहीत आत्याला तर तिचे परत येणे अजिबात आवडलेले नाही.त्यामुळे आत्या बेबी कोच्चमा अम्मुची छुपी शत्रू बनली आहे. विवाह मोडल्यामुळे अम्मुचा इंग्लंडमधून परत आलेला भाऊ चाको हाही अम्मुला आपल्या घरात भागीदारी देण्यास तयार नाही आणि त्यालाही आपली ही घटस्फोटीत बहीण व तिची जुळी मुले फारशी पसंत नाहीत. थोडक्यात अम्मुला माहेरी आपले व आपल्या मुलांचे नकोसे असणे अंतर्मनात जाणवले आहे. त्यामुळे तिच्या मनात मुलांबद्दल , त्यांच्या भविष्याबद्दल कायमच काळजी आहे. स्वतःचे एकाकीपण आणि मुलांची काळजी याने अम्मुच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याबद्दल कथक म्हणतो –

“दोन्ही मुलांवर अम्मुचा विलक्षण जीव. तरीही त्यांच्या भोकरासारख्या डोळ्यांमधली निरागस कोवळीक बघितली की तिचा थरकाप उडे. दोन्ही मुलं मनान फार प्रेमळ होती.समोरचा माणूस कितीही परका, अलिप्त, त्रयस्थ असला तरी त्याच्यावरही आपली मुलं वेड्यासारखं प्रेम करतात, हे लक्षात आल्यावर तर अम्मुचा संताप व्हायला लागला.. त्यांच्या दारूड्या बापाला आपण मुश्किलीने हुसकावून लावलं आपल्या आयुष्यातून नेमक्या त्याच फटीतून तिसरंच कुणी आत घुसलं म्हणजे मुलांची नजर आंधळीच राहिली तर काय भरवसा द्यावा ?”

अम्मु तरूण होती आणि एकाकी होती. तिच्या तनमनातील संघर्षही कथनातून स्पष्ट होतो. कथक म्हणतो-

“कधीकधी एक वेगळीच लहर अम्मुच्या तनमनावरून भरकटत जाई. रेडिओवरून तिच्या आवडत्या गाण्याची सुरावट कानी पडली की तिच्या आत.. खोलवर कुठेतरी सुखाचा ज्वालामुखी फुटे…नसानसांतून एका नव्या ऊर्जेचे लोट उसळत आणि जादुटोणा व्हावा तशी तिच्यातली मोहक ,रसरशीत स्त्री संयमाची ,विरक्तीची परित्यक्त आवरणं झुगारून उमलून उठे. अशावेळी अम्मुला कुठलीही बंधन, कसल्याही जबाबदाऱ्या आवरू शकत नसत.स्वतःच वैवाहिक अपयश बाजूला सारून ,मातृत्वाचा आब दूर लोटून तिच्यामधील स्त्री हुंकारू लागली की अम्मु काही वेगळीच दिसे.”

याच प्रकरणात अम्मुची आत्या बेबी कोच्चमा हिच्या अंतर्मनातील अम्मुबद्दलचा व तिच्या जुळ्या मुलांबद्दलचा द्वेषही कथक स्पष्ट करतो. तो म्हणतो –

“….स्वतःच्या खिन्न दुर्भाग्याची ओझी वाहणाऱ्यांना कधकधी आपल्याच वाटेवरून चालणाऱ्या अन्य सहप्रवाशांचा त्रास होतो..वीट येतो..पृथ्वीतलावरच्या सगळ्या दुर्भाग्याचाच राग येतो. तसंच बेबी कोच्चमाचं झालं होतं. स्वतःच्या वडिलांपासून तुटलेली ती अनाथ, निराधार जुळी मुलं तिला सहनच होत नसत.त्यांच्या दुर्दैवी आयुष्याचे धिंडवडे आपल्या नजरेसमोर नको , असे तिला वाटे..आपण आयमेनम हाऊसमध्ये आपल्या आईच्या माहेरी राहतोय ,परक्यांच्या तुकड्यांवर जगतोय याची ठुसठुस त्या जुळ्या पोरांच्याही मनात ठणकत रहावी म्हणून बेबी कोच्चम्मा सारखी धडपडत असे. तसं म्हटलं तर आयमेनम हाऊसमध्ये रहाण्याचा जसा जुळ्यांना हक्क नव्हता तसा तिला स्वतःलाही नव्हताच.आपण आपल्या नशिबाचे भोग धीराने सोसले, आनंदाने स्वीकारले, अशा समजुतीचा ताठा बेबी कोच्चमाच्या मनात शिगोशीग भरलेला! तसल्याच भोगांशी झगडणारी,झुंजणारी अम्मू मात्र तिला भलतीच दुबळी वाटे..म्हणून मग अम्मुचाही राग, द्वेष…!”

अम्मु आणि बेबी कोच्चमा यांच्यातील हा छुपा संघर्ष कादंबरीच्या अखेरीस अम्मुचे अस्पृश्य वेलुथाबरोबरचे प्रेमसंबंध उघड झाल्यावर परकोटीला पोहचतो. अम्मुचे आणि तिच्या जुळ्यांचे कायमचे आयमेनम हाऊस मधून उच्चाटन व्हावे यासाठी बेबी कोच्चमा ही संधी वापरते.पोलिसांना ती चुकीची माहिती देते ज्यामुळे अम्मुचा प्रियकर आणि जुळ्या मुलांचा जीवलग वेलुथा बेबी कोच्चमाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळेच नाहक पोलिसांच्या क्रौर्याचा बळी ठरतो.आणि अम्मुलाही पोलिसांकडून हेटाळणी सहन करावी लागते.एस्था आणि राहेलवर अम्मुने काढलेला राग, त्या दोघांचे सोफी मॉलला घेऊन नदीपलीकडे जाण्याचे प्रयत्न आणि त्यात सोफीचा झालेला अपघाती मृत्यू हे सगळे टळले असते जर बेबी कोच्चमाने अम्मु आणि जुळ्या मुलांचा द्वेष न करता त्यांना समजून घेतले,सामावून घेतले असते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही.सगळ्यांचीच ताटातूट होते आणि बेबी कोच्चमाही एकटीच पडते.

याच प्रकरणात बेबी कोच्चमाचा भाऊ म्हणजे अम्मुचे वडील पाप्पाची यांच्या स्वभावातील दोषांची कारणेही कथक उलगडतो. पाप्पाची उच्चशिक्षीत होते,दिल्ली येथील पुसा कृषीसंशोधन केंद्रातून संशोधक म्हणून निवृत्त होऊन आयमेनमच्या आपल्या वडिलोपार्जित घरात रहायला आले होते.पण निवृत्तीनंतर काय करायचे याबद्दल त्यांची काहीच योजना नव्हती. याउलट त्यांची पत्नी मम्माची आयमेनम हाऊसमध्ये परतल्यावर नव्या उत्साहाने लोणची, जॅम बनवू लागली होती, ते विकून पैसे मिळवू लागली होती. पाप्पाची वरवर आधुनिक असले तरी त्यांच्या अंतर्मनात तोच सरंजामशाही वृत्तीचा पुरूष दडून बसलेला होता. परदेशातही आपल्या पत्नीला व्हायोलीन वाजवण्यात गती आहे हे तिच्या व्हायोलीन शिक्षकाकडून कळल्यांवर त्यांनी आसूयेने तिचे व्हायोलीन शिकणे बंद केले होते. आयमेनममध्ये आल्यावर पाप्पाचींची तीच पुरूषी वृत्ती परत उफाळून आली होती.आपल्या पत्नीला ते रोज पितळी फुलदाणीने बडवून काढू लागले होते. कथक त्याबद्दल म्हणतो-

“निवृत्तीनंतर करायचं काय, या प्रश्नचिन्हानं वैतागलेले पाप्पाची घरात रिकामटेकडे बसून बसून उबून गेले होते. निरूपयोगीपणाची नामुष्की शेवटी त्यांना सहन होईनाशी झाली. आधीच ते मम्माचीपेक्षा वयाने मोठे. दोघांच्यामध्ये तब्बल सतरा वर्षांचा फरक. त्यामुळे स्वतःच आयुष्य संपता संपता बायकोच्या कर्तृत्वाला आलेला बहर त्यांना त्रास द्यायला लागला.आपली बायको तरण्या बाईच्या आवेशात कामाला भिडलीय आणि आपण मात्र तारूण्य आटलेल्या थेरड्या म्हाताऱ्यासारखे अडगळीत पडलो आहोत,या जाणिवेची तिडीक मस्तकात जायला लागली. तसा पाप्पाचींचा भडका उडाला. ते धुमसू लागले.. आतल्या आत.”

पाप्पाचींच्या मारापासून मम्माचीला वाचवले ते लंडनहून परतलेल्या त्यांच्या मुलाने चाकोने. आपल्या आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा हात त्याने घट्ट पकडून पिरगाळला. प्रतिक्रिया पाप्पाचींनी मम्माचीला मारणे थांबवले पण बोलणेही बंद केले ते कायमचे.अगदी ते मरेपर्यंत.

चाकोच्या मते पाप्पाचींच्या अंतर्मनातील विसंवादाचे कारण होते त्यांचे ‘ऍंग्लोफाईल’,इंग्रजाळलेले असणे. त्याच्या मते त्यांचे संपूर्ण कुटूंबच ब्रिटीशांच्या आगमनानंतर सिरीयन ख्रिश्चन झाले आणि तिथेच त्यांचा मूळांशी संबंध तुटला.हे तुटलेपणच पुढे कुटूंबाच्या वाताहतीला कारण ठरले. चाकोने केलेली ही कारणमीमांसा कथनातून स्पष्ट होते ती अशी –

“कबूल करताना स्वतःचाच तिरस्कार वाटत असला तरी आपण ‘ऍंग्लोफाईल’च आहोत असं चाकोने जुळ्यांना सांगून टाकलं होतं. त्याच्या मते अख्ख कुटुंबच तसं होतं. चुकीच्या दिशेने भलतीकडेच भरकटलेलं. स्वतःच्या इतिहासाची नाळ तुटून कसल्यातरी विचित्र कोंडीत घुसमटून पडलेलं”

खुद्द चाकोही एका बाजूला लंडनमध्ये शिकलेला, आधुनिक वातावरणात राहिलेला असला आणि मनोमन त्याला मार्क्सची विचारसरणी पटली असली तरी आचरणाने तो आळशी, विलासी होता. पुरूषी वर्चस्ववाद त्याच्यातही नकळत बिंबलेला होता.म्हणूनच अम्मुला आपल्या वडिलोपार्जित घरात हिस्सा द्यायची त्याची तयारी नव्हती. वेलुथाला कामगारांच्या मोर्चात पाहिल्यावर आपल्या लोणच्याच्या कारखान्यात तो संप पुकारू शकेल याची भीती वाटून चाको कॉम्रेड पिल्लईचा सल्ला मागायला गेला होता.कादंबरीच्या चौदाव्या प्रकरणात हा तपशील येतो.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही कादंबरी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील केरळीय समाजाची राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी अधूमधून कथन करत जाते.या कथनातून केरळमधील समाजातील विसंगती, ढोंगीपणा स्पष्ट होत रहातो.एका बाजूला भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ. इथेच जगातील पहिले लोकशाही मानणाऱ्या देशातील कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले.पण तरीही इथली विषमता संपली नाहीच.पूर्वापार जातीयतेने बुजबुजलेला केरळीय समाज, ब्रिटीशांनी अस्पृश्यांना धर्मांतर करून ख्रिस्ती करून घेतले असले तरी अस्पृश्यता पाळतच राहिला.त्यामुळे अस्पृश्य पारायरांसाठी स्वतंत्र चर्चेस ब्रिटीशांना स्थापन करावी लागली आणि तिथे पारायर धर्मगुरू नेमावे लागले. स्वातंत्र्यानंतर तर या धर्मांतरीत अस्पृश्यांची आणखीनच कोंडी झाली. धर्मांतरीत असल्याने त्यांना हिंदू अस्पृश्यांना मिळणाऱ्या सवलती मिळणेही अशक्य झाले.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीचा नायक आहे वेलुथा. जो पारायार या अस्पृश्य जातीचा आहे. त्याच्या वडिलांनी लहानपणापासून आयमेनम हाऊसमधील प्रतिष्ठीत अशा आयपे घराण्याची सेवा-चाकरी केली आहे.एकप्रकारची लाचारी त्यांच्या बोलण्या-चालण्यात रूजली आहे. पण वेलुथा तसा नाही. तो उत्तम कारागीर आहे. विविधप्रकारची कामे तो लिलया करू शकतो. मग ते कारखान्यातील कॅनिंग मशिन दुरूस्त करणे असो की सुतारकाम, इलेक्ट्रीक काम असो.आपल्या कौशल्यांमुळेच तो आयपे कुटुंबाला उपयोगी ठरला आहे.एका जर्मन कारागिराकडून प्रशिक्षण मिळालेल्या वेलुथाला आत्मभान आहे. तो कम्युनिस्ट पार्टीचा सक्रीय कार्यकर्ता झाला आहे. आयपे कुटुंबाच्या लोणच्याच्या कारखान्यात खरं तर तोच सर्वाधिक कामे करी पण मम्माची लोकापवाद टाळण्यासाठी त्याला इतरांपेक्षा कमी पगार देई. वेलुथाला हे कळत होते पण जुना कौटुंबीक संबंध असल्याने त्याने ते स्वीकारले होते. आपल्या झाडावरून पडून अपंग झालेल्या भावाची व वृद्ध पित्याची काळजी घेणारा वेलुथा एक मनमुक्त, मनस्वी माणूस होता.वेलुथाच्या वडिलांना मात्र त्याची काळजी वाटे. कथक त्याबद्दल लिहितो-

“अस्पृश्यांनी कसं अडखळत , घुटमळत चाललं-बोललं पाहिजे. पण ही अडखळ-घुटमळ वेलुथाच्या व्यक्तिमत्वात जरासुद्धा नव्हती. तो ज्या रूबाबात चालायचा ,ज्या तऱ्हेने मान उंच ठेवायचा ते सगळेच वेल्लयांच्या दृष्टीने आक्षेपार्ह होतं. कुणी काही विचारले नसताना एखाद्या विषयावरचे आपले स्वतंत्र मत देणे, इतरांनी केलेल्या सूचना शांतपणे, स्पष्ट, परखड शब्दांत धुडकावून लावणे हे दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं.”

वेलुथाचे हे बंडखोर , आत्मविश्वासाने भरलेले रूपच अम्मुला आवडले होते आणि सोफी मॉलच्या आगमनानंतरच्या सुमारे तेरा रात्री ती वेलुथाच्या सहवासात मनसोक्त जगली होती. वेलुथाच्या वडिलांना याची चाहुल लागताच त्यांच्या भयाला पारावार उरला नव्हता. अत्यंत लाचारीने ,गयावया करत त्यांनी वेलुथा आणि अम्मुचे संबंध असल्याचे मम्माचीला सांगितले होते आणि आयुष्यभर ज्यांची मरमर चाकरी केली त्या मम्माचीकडून प्रचंड अपमान, शिव्याशाप त्याला ऐकावा लागला होता. मम्माचीने अखेरीस तर त्या वृद्ध ,अशक्त माणसाला ढकलून दिले होते. चिखलात पडलेल्या त्या लाचार माणसाकडे दुर्लक्ष करून ती बेबी कोच्चमाच्याबरोबर घरात निघून गेली होती.आपला मुलगा वेलुथा परतला की त्याला कुऱ्हाडीने मारायचे असा बेत त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात केला होता.

राहेल ही ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीतील दृष्टीक्षेत्रनियंत्रक ठरेल. तिच्या नजरेतून आपल्याला कथानक उलगडत जाताना दिसते. राहेल लहानपणापासूनच धीट आहे.मोकळेपणाने बोलणारी , मनात येईल ते करणारी राहेल बरीचशी तिच्या अम्मुसारखी आहे.तिच्या मनात उपेक्षीतांबद्दल कणव आहे. ती २३ वर्षांनी आयमेनम हाऊसमध्ये तिच्या भावाला एस्थाला भेटायला येते तेव्हा त्या वडिलोपार्जित घराची झालेली दुर्दशा तिला पहावत नाही. बेबी कोच्चमाने घराच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.ती आणि तिची मोलकरीण कायम टी.व्ही. समोर बसून कार्यक्रम पाहात असतात. राहेलला त्या कार्यक्रमांत एक कृष्णवर्णीय गायक गाताना दिसतो. त्याच्या सूरांतील दुःख तिला जाणवतं. त्याच्या चेहऱ्यावरील वेदना, त्याला कारण असणारी अमेरिकेतील विषमता, दारिद्र्य तिने पाहिले आहे. पण उपेक्षितांबद्दलची ही सहवेदना राहेलच्या मनात बिंबली आहे ती तिच्या भारतातील वास्तव्यातच.शाळेतून त्यांचे शिक्षक त्यांना सहलीला नेत तेव्हा, स्टेशनवरच्या हमालाशी घासाघीस करून त्याला कशी कमीतकमी हमाली देत हे तिने कैकवेळा पाहिले आहे. इतर मुले त्या हमालाला हसत तेव्हा तिला त्या हमालाबद्दल सहानुभुती वाटली आहे. तो हमाल म्हणे बडा आदमी लालटेन साहेब, छोटा आदमी मोमबत्ती हे उद्गार कोणत्या विषादातून आले आहेत हे राहेलला जाणवले आहे.राहेलच्या मनावर ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ म्हणजेच उपेक्षीत माणसे का ठसा उमटवून गेली आहेत त्याचे कारण तिच्या बालपणीच्या अनुभवांत आहे. कथक हे अनुभव कादंबरीच्या अखेरच्या प्रकरणांत कथन करतो.विशेषतः वेलुथा जो राहेल- एस्थाचा एकमेव विरंगुळा आहे, जीवलग आहे त्यालाच पोलिस कशी क्रूर वागणूक देतात ते राहेलने पाहिले तेव्हापासून जणू तिच्या संवेदनाच बधिर झाल्या आहेत, जगातला कोणताही आनंद ती निखळपणे घेऊच शकत नाही. वेलुथाला वाचवणे आपल्याला शक्य झाले नाही आणि अम्मुचे निधन त्या दुःखामुळेच झाले याचे कायमचे शल्य राहेलच्या मनात आहे.एस्थाच्याही मनात ते आहेच. कादंबरीच्या तिसऱ्या प्रकरणात ते कथक स्पष्ट करतो.अकराव्या प्रकरणात वेलुथाची व्यक्तिरेखा अधिक स्पष्ट झाली आहे.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीतील बारावे प्रकरण कोचु थोम्बन या नावाचे आहे. मला वाटते हे कादंबरीतील एक महत्त्वाचे प्रकरण आहे आणि त्यातून लेखिकेची अंतर्दृष्टी स्पष्ट होते. १३ पानांचे हे प्रकरण आहे. एस्था आणि राहेलच्या वर्तमानात म्हणजे ते तेवीस वर्षांनी आयमेनममध्ये भेटले असताना त्या दोघांनीही गावातील कृष्ण मंदिरात एका रात्री रंगलेला कथकली नृत्य-नाट्याचा अत्यंत जिवंत आविष्कार पाहिला आणि त्यामुळे त्यांची मने पुन्हा एकदा बधिरावस्थेतून बाहेर आली, ते जीवनसन्मुख झाले असे सुचवणारा हा प्रसंग आहे.

कथकली नृत्य-नाट्य ही केरळमधील लोककला आहे. वर्षानुवर्षे ती देवालयांच्या आश्रयाने टिकून राहिलेली कला आधुनिक काळात मात्र केरळमधील रिसॉर्टस, आलिशान हेरीटेज होम्स मधील तथाकथित अभिरूचीसंपन्न, उच्चभ्रूंच्या पैशांसमोर लाचार झाली आहे. विशेषतः परदेशांतून आलेल्या पर्यटकांसमोर अतिशय त्रोटक स्वरूपात कथकली नृत्य-नाट्य सादर करण्याची तडजोड कथकली कलावंतांना करावी लागते. कारण त्यावरच त्यांची रोजी-रोटी अवलंबून असते.पण या तडजोडीच्या ज्या वेदना त्यांच्या मनाला होतात त्या विसरण्यासाठी हे कलावंत रात्रभर देवालयात मूळ स्वरूपातील कथकली नृत्य-नाट्य ज्या उत्कटतेने सादर करतात ते पाहून जाणकार, संवेदनशील प्रेक्षकांचे मन भरून येते. राहेल आणि एस्था देखील याला अपवाद नाहीत.खरं तर, ते दोघेही स्वतंत्रपणे या नृत्य-नाट्याचा प्रयोग पहायला येऊन देवळाच्या कट्ट्यावर बसलेले असतात. प्रयोग सुरू होऊनही बराच काळ झालेला असतो. पण तरीही कलावंतांच्या उत्कट नृत्य-अभिनयामुळे ते दोघेही नकळत त्या आविष्कारात गुंतत जातात आणि नृत्य-नाट्य संपून घरी जात असताना ते आपोआपच परस्परांशी पुन्हा एकदा मनाने जोडले जातात. त्यानंतरच्या रात्री ते दोघेही परस्परांच्या कुशीत शिरून रडतात, निःशब्दपणे त्यांनी एकत्र अनुभवलेले आणि मनात भरून राहिलेले त्यांच्या बालपणीच्या अनुभवांच्या दुःखाला, मनातील खूपणाऱ्या शल्याला बाहेर काढतात, अश्रूंवाटे वाट देतात.यापुढे ते परस्परांसाठी असणार आहेत आणि पुन्हा नव्याने जीवन रसरसून जगण्यासाठी सज्ज होणार आहेत.

कथकली नृत्य-नाट्य महाभारतातील प्रसंगांवर आधारीत आहे. ते लोकप्रिय का आहे याबद्दल कथक म्हणतो-

“…. कथा कुठल्या वळणाने जाईल, शेवटी काय होईल, हे सगळं ठाऊक असतं तरी जणू काहीच माहीत नसल्याच्या उत्कंठेने आपण जिवाचे कान करून ऐकतो. एखाद्या दिवशी मरण अटळ आहे, हे ठाऊक असूनही जणू अमरपट्टा मिळाल्याच्या थाटात आपण रसरसून जगतो, तसंच महाकाव्याचे सगळे धागे परिचयाचे असतात. कोण जगतं, कोण मरतं कुणाचं प्रेम सफल होत , कुणाच्या भाळी अखंड विरहाचा एकाकी शाप असतो.. हे सगळं ठाऊक असतं. तरी पुन्हा ऐकावसं वाटतं. नजर थकत नाही, तहान मिटत नाही.”

एस्था राहेलला महाभारतातील कर्णाची होणारी उपेक्षा स्पर्श करते, कुंतीची एक आई म्हणून होणारी कोंडी समजू शकते आणि भीमाने दुःशासनाचा ज्या क्रूरतेने वध केला त्याच्याशीही ते नाते जोडू शकतात.खरं तर, ते दोघेही सिरीयन ख्रिश्चन आहेत पण तरी महाकाव्यातील शाश्वत भावभावना, जीवनमूल्य यांच्याशी ते एकरूप होऊ शकतात.या महाकाव्यांत जे हजारो वर्षांपूर्वी घडलं ते आजही सर्वसामान्यांच्या आयुष्यात नव्या रूपाने घडतंच आहे. वेदना,उपेक्षा, क्रौर्य आजही संपलेलं नाही आणि तरीही जीवन अप्रतिहत सुरू आहे असे कथकाला सुचवायचे आहे. या कथनाच्या अखेरीस म्हातारा कोचु थोम्बन हत्ती उठतो आणि राहेलने दिलेला नारळ फोडून नव्या दिवसाला सामोरा जातो. अगदी असेच आपल्याला जीवनाला सामोरे गेले पाहिजे असेच कथक सुचवतो आहे असे वाटते.

कादंबरीच्या अखेरच्या म्हणजे एकविसाव्या प्रकरणात अम्मु आणि वेलुथा यांनी परस्परांवर केलेल्या उत्कट प्रेमाचे काव्यमय वर्णन येते. अम्मु वेलुथाशी प्रणय करून घरी जायला निघते तेव्हा अगदी सहजच त्याला म्हणते ‘उद्या भेटू…’ उद्याच्या सुखाची आशाच माणसाला जीवन जगण्याचे बळ देते.राहेल आणि एस्था यांनी फार लहानपणीच दुःख भोगलं आहे आणि त्यामुळे त्यांची मने जणू बधिर झाली आहेत पण दुःख अटळ आहे हे कथकली नृत्य-नाट्याचा आविष्कार पहाताना त्यांना जाणवले असावे.

नदी हा राहेल आणि एस्थाचा जणू प्राण आहे.नदीने त्यांना आनंद दिला आहे आणि दुःखही. पण नव्या हॉटेल्स आणि धरणांमुळे ती भिंतींनी जखडून टाकलेली त्यांना पहावत नाही.जीवन नदीसारखे प्रवाही आहे आणि इथे काहीही नित्य नाही. त्यामुळे दुःखही नित्य नाही नी सुखही. हे स्वीकारूनच, जगण्याचा आनंद छोट्या छोट्या गोष्टींतून उपभोगला पाहिजे हे सत्य त्यांना अखेरीस उमगले आहे असे म्हणता येईल. त्यामुळे ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही कादंबरी रूढार्थाने शोकांत ठरत नाही. उलट ती एक आशावादी,वाचकांना जीवनसन्मुख करणारी कादंबरी ठरते.

‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही कादंबरी तुम्ही मूळातून वाचावीत किंवा तिचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला मराठी अनुवाद तरी जरूर वाचावा ही विनंती.

पुढील ब्लॉगमध्ये पुलित्झर पारितोषिक विजेत्या भारतीय इंग्रजी कादंबरीकार झुम्पा लाहिरी यांच्या चरित्राचा व साहित्यिक कर्तृत्वाचा परिचय आपण करून घेणार आहोत.

  -गीता मांजरेकर

________________________________________________________________________________________________________________

१ प्रतिसाद

  1. वेलुथा सर्जनशील माणूस आहे, जो समाजाचा गुलाम होण्यास विरोध करतो. बहुतेकदा, सामाजिक भाष्य करण्यासाठी त्याची जीभ तीक्ष्ण बनते, कारण तो अंत्यंत उत्कटतेने पण कदाचित तेवढयाच निराशेनेदेखील भरलेला असावा. कादंबरीकार शेवटी आपल्याला एक आशाजनक व्यक्ती प्रस्तुत करतो ज्याच्या आकांक्षा आयमेनमच्या जबरदस्तीने बाळगून ठेवल्या गेलेल्या सरंजामशाही आयुष्यभराचे अतृप्त प्रेम आणि कित्येक वर्षे अस्पृश्यता, राजकीय कैदी म्हणून घालवलेल्या आघाताने शांत होतात.आयमेनम आणि त्याचा इतिहास आपल्या मुख्य पात्राच्या संघर्षांना, अत्याचारी व्यवस्थेबद्दलच्या त्याच्या रागाला आणि त्याने लोकांना त्यांच्या मानवतेपासून कसे वंचित ठेवले हे समजून घेण्याकडे लक्ष केंद्रित करतो. पोलिसांचे आक्रमण, जबरदस्तीने काढून टाकणे आणि सर्वसाधारणपणे जातीभेद, आयमेनममधील रहिवाशांना प्रेम, प्रणय, आनंद किंवा अगदी सामान्यतेची भावना यांसारख्या मूल्यांचा ‘निरोगीपणा’ पूर्णपणे स्वीकारावा या कल्पनेलाच उद्ध्वस्त करतो. कला ही थेरपीचा एक प्रकार म्हणून देखील ओळखली जाते, तर सर्जनशीलतेला व्यवसाय म्हणून कमी लेखणाऱ्या समाजात कथकलीसारख्या कलेला मर्यादा येतात.

    Like

यावर आपले मत नोंदवा