‘शॅडो प्ले’ या शशी देशपांडे यांनी लिहिलेल्या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण मागील ब्लॉगमध्ये लक्षात घेतली. आज ‘शॅडो प्ले’ या कादंबरीतील कथनाच्या निवडक भागांचे विश्लेषण करत आपण लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा वेध घेणार आहोत.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे आहे त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘शॅडो प्ले’ ही घटनाप्रधान कादंबरी आहे आणि त्या घटना प्रामुख्याने अरू या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या कुटुंबाच्या संदर्भातील आहेत.कादंबरीच्या उपकथानकात कस्तुरी या अन्य एका व्यक्तिरेखेसंदर्भातील घटना कथन केल्या जातात.अरू आणि कस्तुरी यांच्या वयात,त्यांना मिळालेल्या कौटुंबीक वातावरणात,त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीत काहीही सारखे नाही.या दोघींनाही जीवन जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावे लागले आहेत.या संघर्षात त्यांना काही प्रश्नही पडले आहेत जे कथनात ओघाने येतात.कस्तुरीचे उपकथानक अरूच्या कथानकाला समांतर आहे पण नंतर ते अरूच्या कथानकाला छेद देते, त्या कथानकात मिसळू लागते.अरू आणि कस्तुरी या दोघींच्या कथानकांत त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त त्यांच्या मित्रपरिवारातील घटनाही कथन केल्या जातात.अरू ही शहरात,ब्राह्मण, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली आणि मोठी झालेली थोरली मुलगी आहे.तिच्या आयुष्यातील काही घटनांमुळे तिला कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागली आहे.तर कस्तुरी ही ग्रामीण भागात, लिंगायत,जमिनदाराच्या कुटुंबात जन्मलेली आणि मोठी झालेली धाकटी मुलगी आहे.तिच्या आयुष्यातील घटनांमुळे तिला कुटुंबापासून दूर शहरात येऊन स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःला घेऊन ,स्वतंत्रपणे जगावे लागले आहे.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीच्या कथनात लेखिकेने प्रथम पुरूषी आणि तृतीय पुरूषी असे दोन्ही प्रकारचे कथक वापरले आहेत.अरूचे वडील गोपाळ यांचे स्वतःचे मनोगत प्रथम पुरूषी कथनात येते.बाकीचे कथन तृतीय पुरूषी आहे. गोपाळच्या कथनातून बरेच वेळा लेखिकेची अंतर्दृष्टी लक्षात येते.पण तृतीय पुरूषी कथनातूनही ती क्वचित व्यक्त झालेली दिसते.आपण गोपाळच्या मनोगताचे निवडक भाग घेऊन त्याच्याआधारे लेखिकेची जीवनदृष्टी समजून घेऊ.
अरूचे वडील गोपाळ यांच्या मनोगतात सुरूवातीला त्यांना होणारा पश्चात्ताप जाणवत राहतो.आपल्या व्यावसायिक जीवनात त्यांनी स्वतःच काहीशा भयव्याकुळ मनःस्थितीत घेतलेल्या एका निर्णयाने अस्वस्थ होत, एका तिरीमिरीत सुमीला आणि मुलींना सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ते सुमीच्या, कल्याणीच्या कुटुंबातील स्थान गमावून बसले होते. पण कल्याणीच्या आजारपणात तिने बोलावल्याने आणि नंतर अरूच्या लग्नाच्या निमित्ताने ते कल्याणीच्या घरात थांबले होते.अरूच्या लग्नात आपल्यावर कोणतीही जबाबदारी न टाकता आपल्या मेव्हण्या आणि मुलींनी सगळी जबाबदारी कशी लिलया पेलली आहे ते गोपाळ प्रत्यक्ष पहात होते.लग्नाची मंगलाष्टके गाणारा तरूण ब्राह्मण लग्न लावण्यापूर्वी जिन्स -टी शर्टमध्ये आलेला त्यांनी पाहिला होता आणि प्रत्यक्ष लग्न लावताना तो धोतर, टोपी घालून खणखणीत आवाजात सुरेल मंगलाष्टके म्हणत होता.गोपाळला या तरूण मुलाच्या या दोन भिन्न रूपांकडे पाहताना हे जाणवले होते की कोणत्याही माणसात असे अनेकविध ‘स्व’ असतात,एकाच माणसाची रूपे, त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिका वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या असू शकतात.गोपाळला एक बाप म्हणून अरूच्या लग्नात काही भूमिका उरली नव्हती कारण त्याच्या भूतकाळातील एका निर्णयामुळे त्या भूमिकेतून जणू तो बाद झाला होता. आपण स्वतःला कितीही महान समजलो तरी आपल्याशिवाय जग चालणार नाही ही आपली समजुत चुकीचीच असते हे गोपाळला चांगलेच उमजले होते. गोपाळला स्वतःला आपल्या बेजबाबदार वागण्याबद्दल पश्चात्ताप वाटत होता आणि अरूच्या लग्नात आपल्याला काही भूमिका नसण्याने जाणवणारी अस्वस्थता हे जणू त्याचे प्रयश्चित्त आहे असे गोपाळ मानत होता.तो म्हणतो-
“पश्चात्ताप आणि प्रायश्चित्त या गोष्टी एकत्र जातात.पश्चात्ताप(खंत) चुकलेली गोष्ट बरोबर करू शकतो यावर माझा कधीच विश्वास नव्हता.पण पश्चात्ताप आणि प्रायश्चित्त एकत्र येतात तेव्हा कदाचित त्याला काही अर्थ असावा.त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात.कोणतीच बाजू दुसऱ्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.प्रायश्चित्त ही शिक्षा मात्र नसते.आणि अरू जी न्यायाबद्दल अतिशय संवेदनशील आहे ती मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळाल्याशिवाय समाधानी होईल?….”
गोपाळला आठवते की तो सुमीला आणि मुलींना सोडून निघून गेल्यानंतर काही महिन्यांनी अरू सुमीवरील अन्याय दूर करण्यासाठी गोपाळने तिला घटस्फोट द्यावा, पोटगी द्यावी यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या प्रयत्नांत होती. पण तिच्या सुरेखा मॅडमच्या सल्ल्यानंतर तिने तो विचार सोडून दिला होता. गोपाळला सुमीमध्ये झालेले बदल जाणवत होते. तो मनात म्हणतो –
“तिला कदाचित हे कळले आहे की प्रभारी होणे, जबाबदार होणे तुम्हाला दयाळू व्हायला भाग पाडते.तुम्ही ज्यांच्यावर सत्ता गाजवता त्यांच्याशी दुष्टपणे वागू शकत नाही.ती (अरू) मऊ झाली आहे किंवा मवाळ झाली आहे असे मला वाटत नाही. ती केवळ आपल्या प्रत्येक निर्णयाबद्दल फार सजग झाली आहे.जी तळपती तलवार घेऊन ती मी त्यांना सोडून गेल्यावर मला भेटायला आली होती ती परत म्यानात गेली आहे. पण ती तलवार तिच्याकडे अजूनही आहे आणि वेळप्रसंगी अरू ती नक्कीच बाहेर काढेल.”
आपण घर सोडून निघून गेल्यानंतर सुमीचा अपघाती मृत्यू झाला आणि आपण मात्र अजूनही जिवंत आहोत याच्याबद्द गोपाळला अपराधी वाटते.आपण आपल्या बायकोशी अयोग्य वागलो,ती आपल्याआधी मरण पावली आणि आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधीच राहिली नाही हे गोपाळच्या दुःखाचे कारण आहे.
गोपाळचा भूतकाळ अतिशय दुःखाचा होता. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र तो हरवून बसला होता.एकमेव मोठी बहीण सुधा खेरीज त्याच्यावर प्रेम करणारे दुसरे कोणीच त्याच्या आयुष्यात नव्हते. आपला तो निष्प्रेम भूतकाळ सुमीशी लग्न करताना गोपाळने जणू मनातून पुसून टाकला होता. आणि भविष्यातील सुंदर, सुखी कुटुंबाची स्वप्ने त्याने पाहिली होती.
गोपाळला तर केवळ एक कुटुंब नाही तर सगळी मानवजात एकाच नाळेने बांधलेली असते असे जाणवले होते.सुमीच्या मृत्युनंतर अस्वस्थ झालेला गोपाळ जेव्हा तिच्या अस्थींचे विसर्जन करायला अलकनंदा नदीच्या पात्रात गेला होता आणि अस्थी विसर्जन करून व्यथित अंतःकरणाने बाहेर आला होता तेव्हा एका अज्ञात कुटुंबाने जणू त्याचे अंतःकरणातले दुःख जाणून त्याला आपल्या चारधाम यात्रेत सहज, सहर्ष सामावून घेतले होते.गोपाळ आपल्या मनोगतात म्हणतो-
“मला असं जाणवलं की श्रद्धा हा एक जादुई मंत्र आहे.टिळा टिळा दार उघड शब्द उच्चारल्यावर (खजिना असलेल्या गुहेचे) दार उघडते तसे श्रद्धेने, जग जाणून घेण्यासाठी नसेल कदाचित पण जग स्वीकारण्यासाठी मनाचे दार उघडते”
गोपाळने निष्प्रेम जीवन अनुभवले आहे पण परक्यांकडूनही मिळालेल्या प्रेमाचा अनुभव त्याला अचंबीत करणारा ठरला आहे. तो म्हणतो-
“हे प्रवासात भेटलेले (परके) कुटुंब मला कधीच एकटे जेवू देत नव्हते. कदाचित आपल्या घरी गेल्यावर ती नेहमीची व्यवहारी, स्वार्थी माणसे बनतील. पण आपल्या आत एक चांगला ‘स्व’ आहे हे जाणवणे, प्रेम करणे- मग ते परक्यावरही का असेना ही आपली आंतरीक गरज आहे हे जाणवणे – एका अदृष्य नाळेने आपण सर्व बांधलेले आहोत या माणुसकीच्या चमत्काराला समजणे यासाठी मला मात्र खूप लांब प्रवास करावा लागला होता.आपण कधीच वेगळे नसतो जोपर्यंत आपण स्वतः ती नाळ तोडतो. तसे केले तर मात्र आपण अक्षरशः एकटे होतो.”
आणि मग चारू जी स्वतः डॉक्टर होती तिने तिला मुलगा झाल्यावर लगेच गोपाळला फोन करून थोडं रडत,थोडं हसत ती बातमी गोपाळला दिली होती. तेव्हा तोच चमत्कार तिच्या शब्दांत गोपाळला जाणवला होता.बाळ- एखाद्या खडकातून वहाणाऱ्या खळाळत्या झऱ्यासारखे शुद्ध, निर्मळ असा चमत्कारच आहे जणू असे गोपाळला वाटले होते.
सुमीच्या मृत्युनंतर गोपाळ हिमालयात निघून गेला होता. तिथे एकटाच फिरत असताना त्यालाअपघात झाला. गावकऱ्यांनी त्याला उचलले,आपल्या घरी नेले, डॉक्टर बोलावले, शुश्रुषा केली तेव्हाही खाटेवर पडल्या पडल्या त्या गावकऱ्यांचे बोलण्याचे, हसण्याचे आवाज ऐकताना गोपाळला जाणवले होते की माणसाने जर अन्य माणसांशी स्वतःला जोडले नाही तर त्याला स्वतःचे असे काही स्थानच नसते.
कल्याणीची अखेरच्या दिवसांत सेवा करण्यासाठी आणि अरूच्या लग्नासाठी हिमालयातून पुनश्च आपल्या कुटुंबात आलेला गोपाळ सीमाला आपली गरज आहे तोपर्यंत तिच्यासोबत रहाणार होता.आणि तिथेच शेजारच्या घरातील कस्तुरीशी त्याची ओळख झाली.कस्तुरी म्हटले तर पूर्ण परकी, ना गोपाळच्या वयाची, जातीची, गोपाळची नी तिची प्रवृत्तीही अगदी भिन्न तरीही गोपाळला ती जवळची वाटू लागली. आणि कस्तुरी ऍंग्लो इंडियन मायराशी बालपणीच्या मैत्रीच्या नात्याने जोडली गेलेली होती.हे सगळेच बंध केवळ माणुसकीच्या नाळेतूनच निर्माण झालेले होते.
अरूच्या लग्नाच्या निमित्ताने गोपाळची आणि अरूच्या सुरेखा मॅडमची दुसऱ्यांदा भेट झाली होती. गोपाळची पहिली भेट सुरेखा मॅडमनी मुद्दाम घेतली होती. आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट व्हावा, आईला पोटगी मिळावी असे अरूने तिला कायद्याचे धडे शिकवणाऱ्या सुरेखा मॅडमना सांगितले होते. पण अरूच्या आईशी-सुमीशी बोलून सुरेखा मॅडमने अरूला वडिलांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यापासून परावृत्त केले होते.त्यावेळी सुरेखा मॅडम गोपाळलाही भेटल्या होत्या. अरूसारख्या मुलीला टाकून घरातून निघून जाणारा बाप कसा आहे ते मला पाहायचे होते असे त्या तिखटपणे म्हणाल्याचे गोपाळला आठवत होते.तुम्हाला आयुष्यभर चूक सुधारायला ‘दुसरी संधी मिळत नसते’ या विचारात बेचैन रहावे लागेल असा इशारा सुरेखा मॅडमनी तेव्हा गोपाळला दिला होता.पण गोपाळला तेव्हा असे वाटले होते की एखाद्याला दुसरी संधी दिली तरी तो आपली चूक सुधारेल का ? जर माणसाची वृत्तीच बदलणार नसेल तर तो आधी जी चूक केली तीच परत करेल असे गोपाळला वाटले होते.आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन जर माणूस जर त्याच चुका करणार असेल तर त्याला मोक्ष तरी कसा मिळणार ? असा प्रश्न गोपाळला पडला होता. तेव्हा मृत्यूनंतरचा स्वर्ग नी नंदनवनातील सुखांची कल्पना करणाऱ्या माणसाच्या श्रद्धेने तो चकीत झाला होता.
कल्याणीने मात्र मृत्यूआधी गोपाळला बोलावून घेऊन जणू त्याने केलेली चूक सुधारण्याची दुसरी संधीच दिली होती. अरूच्या लग्नात सामील होताना, सीमाला आयुष्यात स्थिर होईपर्यंत सोबत करताना आपण सुमीला व मुलींना सोडून जाण्याची जी चूक केली होती ती सुधारतो आहोत असे गोपाळला जाणवले होते. कल्याणीचे स्वतःचे वैवाहिक आयुष्य ही एक शोकांतिका ठरली असतानाही तिचा विवाहसंस्थेवर आणि वंशसातत्यातून माणसांना मिळणाऱ्या आनंदावर ठाम विश्वास कसा होता याचे गोपाळला आश्चर्य वाटले होते.
अरूच्या कार्यालयातील ट्रेसाचा दहशतवाद्यांनी केलेल्या बॉंबस्फोटात मृत्यू झाला होता. अरूने ट्रेसाच्या मुलीला ग्रेसीला शाळेतून आपल्या घरी आणले होते. तेव्हा ग्रेसीचे मन रमवताना दहशतवादाबद्दल गोपाळ विचार करत होता. दहशतवादी पुरूष असतात तशा स्त्रियाही असतात हे त्याने ऐकले होते. त्याला वाटले –
“मला नेहमी आश्चर्य वाटतं की स्त्री-पुरूषांना त्यांच्यामुळे कित्येकांना मरण येतं याचं काही दुःख तरी वाटत असतं की ते या कृतीतून वरवर जाणवणाऱ्या धैर्याच्या,नायकत्वाच्या ,हौतात्म्याच्या वलयाच्या आवरणात सगळं झाकून जातं. आपण चांगलीच गोष्ट केली आहे अशा विश्वासात ते आपण कित्येकांना मारलं याची पर्वाच करत नसतील का ? स्फोटके बनवताना, वापरताना माणुसकी सोडण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळत असेल का ? आणि मग ही गमावलेली माणुसकी ते जेव्हा एक बाप म्हणून,मुलगा म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून परत आपापल्या घरी जातात तेव्हा परत मनात जागवू शकत असतील ? हे सगळंच एक रहस्य वाटतं मला……. कधीकधी वाटतं मनुष्याचे जीवन ही जणू एक यात्रा आहे. एक न संपणारी यात्रा. सतत पुढे जाणारी, कधीच न थांबणारी, कधीही न बदलणारी. आपल्या गोष्टीत नवे काही नाही. निरागसांना मारणेही नवीन नाही. पण आता काहीतरी बदलते आहे. स्त्रिया हिंसेचा भाग बनू लागल्या आहेत. मला वाटतं स्त्रिया हिंसक होतात, एखाद्याला उद्वस्थ करतात तेव्हा त्या निसर्गाच्या विरूद्ध जात असतात.स्त्रिया आणि पुरूष हे सारखेच असतात हे मला पूर्णतः पटत नाही.मला वाटत आपण वेगळे असतो. मला वाटतं स्त्रिया निर्माण करण्यासाठी, संगोपन करण्यासाठी असतात..”
एका प्रसंगात कस्तुरीला भगवदगीतेतील ‘निमित्तमात्रम भवा सव्यसाची’ या विधानाबद्दल सांगताना गोपाळच्या स्वरातील उपहास ओळखून कस्तुरी त्याबद्दलचे कारण विचारते. तेव्हा गोपाळ म्हणतो-
“मला वाटतं अर्जुन मी या माणसांना मारलं नाही असं म्हणू शकत नाही. कृष्णाने या माणसांना मारलं असंही तो म्हणू शकत नाही किंवा काळाने यांना मारलं असंही तो म्हणू शकत नाही.मला तर हा फारच अघळपघळ वाद वाटतो.दिशाभूल करणारा.कदाचित माझ्याकडून काहीतरी सुटतही असेल.. पण मला वाटतं की आपण जे करतो त्याला आपण जबाबदार नाही असं म्हणणं हे विश्वाच्या मूलभूत तत्वाशी,जीवनाशीच- संबंधाच्या नियमाशीच विसंगत आहे.शब्द आणि कृती जगात अधांतरी विहरत नसतात.ते कोणाशीतरी संबध जोडून असतात. त्यांचे कोणीतरी मालक असतेच. विश्वात काहीच संबंधरहीत नसते. तुम्ही शब्द आणि कृती यांच्या परिणामांपासून कधीच सुटू शकत नाही.”
कादंबरीच्या अखेरीला टेनिसनची एक कविता कस्तुरीला समजावून सांगताना गोपाळ पुन्हा एकदा त्याचे जीवनाबद्दलचे आकलन मांडतो. ते उपनिषदांतून आलेले आहे तसेच टेनिसनच्या कवितेतूनही त्याला गवसले आहे. तो म्हणतो-
“हे जगाच्या पूर्णतेबद्दल आहे. संबंधांबद्दल आहे.आपण आपल्यात संपूर्ण असतोच पण तेव्हाच आपण दुसऱ्या कशाचा तरी भाग असतो, सगळ्याचाच भाग असतो.जगात काहीही वेगळं ,एकटं नसतं.”
अशाप्रकारे गोपाळच्या मनोगतातून विश्वातील संबंधाचा, शब्द-घटना यांच्या परिणामांच्या जबाबदारीचा, मानवी क्रौर्याबद्दलच्या चिंतेचा आणि सर्वांना जोडणाऱ्या माणुसकीच्या एकाच नाळेचा विचार प्रामुख्याने ठळक होतो हे आपण लक्षात घेतले. आता ‘शॅडो प्ले’ या कादंबरीतील तृतीय पुरूषी कथनातून कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखांना पडणारे प्रश्न आणि त्यातून डोकावणारी लेखिकेची जीवनदृष्टी समजून घेऊया.

‘शॅडो प्ले’ या कादंबरीच्या दुसऱ्या प्रकरणाच्या ‘होम’ या शीर्षकाखाली एक संवाद लेखिकेने दिला आहे. तो ‘इसाप अँड ऱ्होडोप’ या चित्रपटातील आहे. वॉल्टर सॅवेज लॉंडोर याने म्हटलेला तो काल्पनिक संवाद आहे. इसाप म्हणजे ग्रीसमधील नितीकथा सांगणारा तत्वज्ञ कथक तर ऱ्होडोप ही ग्रीक राणी आहे.या संवादात इसाप राणीला सांगतो की-
‘वर्तमान हे संगीतातील एखाद्या स्वरासारखे असते. ज्याच्यावर मागील स्वरांचा म्हणजे भूतकाळाचा प्रभाव असतो आणि ते पुढे येणाऱ्या स्वरांची म्हणजे भविष्याची चाहुल देत असते.’
शशी देशपांडे यांनी ‘शॅडो प्ले’ या कादंबरीच्या कथनाकात कल्याणी, अरू, रोहित, कस्तुरी,गोपाळ यांचे जे वर्तमान मांडले आहे त्यावर भूतकाळाचा प्रभाव तर आहेच (हा भूतकाळ ‘दी मॅटर ऑफ टाईम’ या शशी देशपांडे यांच्याच कादंबरीत सविस्तरपणे मांडलेला आहे.) पण कादंबरीच्या अखेरीस भविष्याची चाहुलही लेखिकेने कथनातून वर्तवली आहे.तसेच ‘घर’ या संकल्पनेबद्दलही लेखिकेने पहिल्याच प्रकरणात काही भाष्य केले आहे.
कादंबरीतील पहिलाच प्रसंग अरू या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या लग्नाचा आहे.हे लग्न अरूच्या आजीच्या-कल्याणीच्या घरी होते आहे.कल्याणी अत्यवस्थ आहे आणि तिच्या इच्छेखातर अरू आणि रोहित यांचे लग्न तिच्या मृत्यूपूर्वी लावले जाते आहे.कल्याणीच्याच इच्छापत्रानुसार पुढे कल्याणीचे घर पाडून तिथे नवे घर रोहितने बांधले . आपले घर पाडावे आणि तिथे येणाऱ्या पिढ्यांसाठी नवे घर बांधावे असे कल्याणीने सुचवले होते कारण तिला भूतकाळाची छाया येणाऱ्या पिढ्यांवर पडू नये असे वाटले होते.रोहित वास्तुकार असल्याने त्याने कल्याणीचे जुने घर पाडून तिथे नवीन अद्ययावत घर बांधले आहे खरे पण, जुन्या घराची त्याच्या मनातील प्रतिमा त्याला पुसता न आल्याने नव्या वास्तुवरही जुन्या घराचा ठसा आहेच. जुन्या घराचेच नाव ‘विश्वास’ नव्या घरालाही देण्यात आले आहे. जुन्या घराला ‘विश्वास’ हे नाव दिलेले होते ते कल्याणीच्या वडिलांच्या ‘विश्वासराव’ या पूर्वजाची आठवण म्हणून. पण नव्या घराचे नाव ‘विश्वास’ हेच ठेवताना रोहितच्या मनात विश्वास, श्रद्धा ही भावना असा अन्वयार्थ अभिप्रेत आहे.तो आणि त्याची बायको अरू, तिच्या बहिणी आणि सर्वांची लेकरे यांचा परस्परांवरचा विश्वास कायम राहील असे रोहितला सुचवायचे आहे.या कुटुंबातील माणसे शिक्षणानिमित्त, व्यवसायानिमित्त घरापासून दूर गेली तरी ती पुन्हा पुन्हा या घराकडे ओढली जातील यावर रोहितचा विश्वास आहे. रोहितला अरूशी लग्न करताना या कुटुंबातील नातेसंबंधाची मजबूत विणदेखील आकर्षित करणारी ठरली होती. कारण त्याचे स्वतःचे कुटुंब असे एकसंध राहिलेले नव्हते. व्यसनाधीन वडील,चिंताग्रस्त आई,बेजबाबदार धाकटा भाऊ, दूर निघून गेलेली बहीण असे कुटुंबचित्र असणाऱ्या रोहितला अरूच्या घरातील सर्वांचे परस्परांची काळजी घेणे, कठीण प्रसंगात एकमेकांसाठी मदतीला उभे राहणे या गोष्टी खूप आवडल्या आहेत. पूर्वीचे घर कल्याणीच्या एकुलत्या मनोरूग्ण मुलाच्या बेपत्ता होण्याने आणि त्यानंतर कल्याणीच्या नवऱ्याने-श्रीपतीने कल्याणीलाचा दोषी ठरवून सुमारे पंधरा वर्ष तिच्याशी संवाद तोडल्याने जणू शापित होते असे कल्याणीला वाटत असे म्हणूनच तर तिने इच्छापत्रात तिचे जुने घर पाडून नवीन घर बांधावे असे लिहून ठेवले होते.रोहितला नवीन घर बांधताना त्यासमोर मुलांना खेळायला ऐसपैस जागा ठेवावीशी वाटले होते.कारण हे घर मुलाबाळांच्या हसण्याखेळण्याने भरून जावे असे भविष्याचे चित्र रोहितच्या मनात होते. म्हणजे रोहितच्या भूतकाळाचा प्रभाव आणि भविष्याचे स्वप्न त्याच्या वर्तमान निवडीवर, निर्णयांवर पडला होता.
रोहितला कल्याणीचे घर नव्याने बांधताना जुन्याचे सातत्य नवीन वास्तुतही धरून ठेवावेसे वाटले होते. जुन्या घरातील गणेश मुर्ती जी खूप उंचावर होती ती त्याने खाली डोळ्यांच्या टप्प्यात येईल अशी ठेवली होती. कल्याणी या मुर्तीची पुजा आपल्या देखरेखीखाली करून घेत असे. आता अरू मुर्तीची स्वच्छता करत होती आणि पुजा करवून घेत होती. कल्याणीने लावलेली काही झाडे विशेषतः कढीपत्त्याचे झाड अरू आजही तितक्याच काळजीपूर्वक जपत होती. या सगळ्यात एक सातत्य रोहितला जाणवत होते. तसंच सगळ्या कुटुंबीयांच्या नाकाची ठेवण, ओठांची मुडप, डोळे याच्यात असणारे साम्य हे सातत्यही रोहितला जाणवत होते.
खरं तर, अरूची बहीण चारू आणि तिचा नवरा ऋषी काही वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते पण ते कल्याणीच्या घरी आले की पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.अमेरिकेतील ट्विन टॉवरवर झालेला हल्ला चारू व ऋषीच्या मनावर खोल चरा उठवून गेला होता. कारण त्या हल्ल्यानंतर आशियाई म्हणून त्यांच्याकडेही अमेरिकेत संशयाने पाहिले जाऊ लागले होते.आपला मुलगा पवन याच साशंक नजरांखाली वाढणार याची चिंता चारू व ऋषीच्या मनात होती. पण भारतात परत आले तरी काय पदरी पडेल याबद्दल त्यांना खात्री नव्हती.दहशतवाद इथेही वाढत चाललेला त्यांना कळत होते.पण क्रौर्य कायम टिकत नाही,आयुष्य पुढे सुरूच राहते हे अरू,चारूच्या कुटुंबाने आधीही अनुभवले होते. इथे निदान कोणताही दुःखाचा आघात झेलताना आपण सर्व एकत्र असू हेही त्यांना जाणवत होते.
गोपाळप्रमाणेच अरूलाही माणुसकीच्या नाळेने सगळे बांधले आहेत असा अनुभव ती वकिली करू लागली तेव्हा आला. सुरेखा मॅडम या तिच्या मैत्रीण,तत्वज्ञ, मार्गदर्शक कॉलेजच्या दिवसांपासूनच होत्या.त्यांच्याच कार्यालयात काम करू लागल्यावर नगमा, ट्रेसा या अन्य दोन स्त्रिया अरूच्या आयुष्याचा हिस्सा बनल्या. त्या ना एका धर्माच्या, जातीच्या, वयाच्या पण तरीही स्त्रीत्वाची आणि माणुसकीची नाळ त्यांना एकत्र बांधणारी ठरली. कौटुंबिक हिंसाचाराचे खटले चालवताना माणुसकीची झालेली क्रूर हत्या त्या सगळ्या रोज बघत होत्या.या हिंसाचारी व्यवस्थेशी संघर्ष करत असताना अजूनही जगात निरागसता आहे, आशा आहे हे त्या स्वतःला रोज समजावत होत्या.अरू जी नेहमीच न्यायाबद्दल खूप संवेदनशील होती तिला आता पटले होते की संपूर्ण, निखळ न्याय असा काही नसतोच.तिला कळत होते की-
“मानवी नातेसंबंध खूप गुंतागुंतीचे असतात, मानवी वर्तनात बहुविधता असते,माणसे अतिशय कुशलतेने क्रूरतेचे असे काही नवनवे मार्ग शोधत असतात की कायद्याला प्रत्येक समस्येसाठी न्याय पुरवणं अशक्य होऊन जातं.तिला आता कळलं होते की न्यायाधीश पूर्वीच्या एका खटल्यातले उद्गार ‘क्रौर्याचे प्रकार कधीच संपणार नाहीत’-पुन्हा पुन्हा का उच्चारत असतात.”
एका केसमध्ये नवऱ्याने कायदेशीर पत्नीला त्याच्या प्रेयसीसाठी रहाते घर रिकामे करून ,घटस्फोट द्यायला सांगितले होते तेव्हा तिने न्याय मिळण्याची वाट पाहात बसण्याऐवजी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला पाहून अरू अनेक दिवस अस्वस्थ राहिली होती.घटस्फोटीत स्त्री-पुरूष आपल्या मुलांच्या हक्कासाठी भांडताना अरू पाहात होती आणि व्यथित होत होती.तिला त्या लहानग्या मुलांच्या मनातील असुरक्षितता, गोंधळ, वेदना दिसत होती आणि मुलांच्या पालकांना ती का दिसू नये याचे तिला आश्चर्य वाटत होते.आता तिला कळून चुकले होते की-
“ सूड उगवणे हा न्याय मिळवण्याच्या इच्छेचे एक रूप आहे.न्याय मिळवण्याची इच्छा जणू रानटी होणे म्हणजे सूड उगवणे. तिला आता कळू लागले होते आणि ती चकीत झाली होती की शोषक आणि शोषित ,पुरूष आणि स्त्रिया यांच्यातील रेषा तिला पूर्वी वाटत असे त्याप्रमाणे स्वच्छ नसते. ती सारखी बदलणारी, तरल असते.”
अरूची सहकारी नगमा कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचे खटले हाताळत असे. तिला जाणवले होते की बहुसंख्य जोडपी स्वतःच्या वागण्याचा पुनर्विचार तर करत नाहीतच मग सामोपचाराचे बोलणे अशक्यच होते.
अरूला लग्नानंतर काही वर्षे उलटून गेली तरी मुल झाले नव्हते.तिला रोहित आणि तिच्या नात्यात पोकळी जाणवू लागली होती. बागेत खेळणारी मुले पाहून मुलांचा आईवडिलांवरचा पूर्ण विश्वास हा त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांनाही किती सुंदर वाटत असेल याची कल्पना ती करू शकत होती.दोघे म्हणजे कुटुंब नाही ,लग्न मुलं जन्माला घालण्यासाठी, ती वाढवण्यासाठी करायचे असते हे कल्याणीचे शब्द अरूला आठवत होते.कल्याणीने जुन्या घरावरची शापित सावली पुसून टाकण्यासाठी ते मोडून रोहितला नवे घर बांधायला सांगितले, ते मुलांच्या हसण्या-खेळण्याने भरलेले घर असावे यासाठी हे अरूला आठवत होते.पण सभोवती दिसणारी मुले तिला चिंतेत टाकत होती. विशेषतः प्रेमी मावशीचा मुलगा निखिल जो लहानपणी इतका निरागस होता तोच आता आई-वडिलांशी कसा उद्धटपणे बोलतो ते अरू पाहात होती. त्याची संगत वाईट होती,तो त्याच्या मैत्रिणीशीही उद्दामपणे वागत होता. प्रेमी मावशीने मुलाची एवढी काळजी घेऊनही निखिल असा झाला मग मुलं कशी वाढवायची असा प्रश्न अरूला पडला होता.आपले वडील गोपाळ आपण लहान असताना इतके प्रेमळ होते आणि मग अचानक ते आपल्याला सोडून दूर निघून गेले हे अरूने अनुभवले होते. त्यावेळची असुरक्षितता, भय आणि अचानक अंगावर आलेली जबाबदारी आठवून असेच आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्याला आले तर… असे अनामिक भय अरूच्या मनात दाटत होते.आपण अजूनही आपल्या वडिलांना माफ करू शकलेलो नाही याची खंतही तिला वाटत होती. त्यासंदर्भात कल्याणीचे वागणे तिला अंतर्मुख करून गेले होते. कल्याणीने तिच्या मृत्युपत्रात तिच्यावर झालेला अन्याय तर दूर केलाच होता पण भविष्यातील पिढ्यांच्या भल्याचा विचारही ती करू शकली होती.
भूतकाळातील अनुभवांनी मन घट्ट केलेल्या अरूला रोहितवर प्रेम करताना आपण परावलंबी होणार नाही ना याचे भय वाटले होते. तसेच मुलाची अपेक्षा ठेवणे हेच लग्नाचे अंतिम साध्य नाही हेही अरूला जाणवत होते. कारण तशी अपेक्षा ठेवून मुल होत नाही म्हणून आपले निराश होणे हे रोहितवर अन्यायकारक आहे हे तिला कळू लागले होते.या प्रगल्भ जाणिवेतूनच अरू मुल दत्तक घ्यायच्या निर्णयाला आली होती.
कस्तुरी आपले आयुष्य हिमतीने जगली होती. ती गोपाळसारखी तत्वज्ञानाची अभ्यासक नव्हती की अरूसारखी वकील नव्हती. ती आता जगाला एक यशस्वी, लोकप्रिय लेखिका म्हणून दिसत असली तरी ते सहजासहजी घडलेले नव्हते.तिच्या आयुष्यात अनेक खलनायक येऊन गेले होते. म्हणूनच तिने पटकथा लिहिलेल्या चित्रपटांत, मालिकांत जेव्हा दिग्दर्शक खलनायक एकाच पठडीत दाखवू लागत तेव्हा ती वैतागे. ती म्हणते-
“मी दिग्दर्शकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की खलनायक तुमच्याआमच्यासारखेच दिसतात.ते जणू सामान्य माणसांचा मुखवटा घालूनच आपल्या सभोवती वावरत असतात. कधी ते मित्राचा मुखवटा घालतात, कधी प्रियकराचा, कधी उद्धारकर्त्याचा तर कधी नवऱ्याचा –आणि मग अचानक ते आपला मुखवटा फाडून तुम्हाला त्यांचा खरा चेहरा दाखवतात.तेच फार भीतिदायक असतं.”
कस्तुरीची बालपणीपासूनची मैत्रीण मायरा कॅन्सरने आजारी पडते तेव्हा मैत्रिणीची ऍंग्लोइंडियन आई बेलिंदा तिला विचारते की हिंदू तत्वज्ञानात मागील जन्मातील कर्माची फळं तुम्हाला पुढील जन्मात भोगावी लागतात असं म्हणतात हे तुला पटतं का ?तुला स्वतःला तसा अनुभव आला आहे का ?तेव्हा कस्तुरी म्हणते –
“मला माहीत नाही.मी अशा गोष्टींचा विचारच करत नाही. गोष्टी का घडतात याचा विचार करणच मला निरर्थक वाटतं.मला वाटतं त्या फक्त घडतात आणि आपल्याला त्या स्वीकाराव्या लागतात इतकंच.”
कस्तुरीची प्रवृत्ती फार विचार करत बसण्याची नाही ती एक उत्स्फुर्तपणे जगणारी,व्यक्त होणारी,कृती करणारी बाई आहे.त्यामुळे तिने भरभरून प्रेम केले आहे ,घरच्या माणसांचा रोष पत्करला आहे, अगदी पोटच्या मुलाचा त्याग करण्याचे कणखरपणही तिला दाखवावे लागले आहे. पण मनाने ती हळवी, प्रेमळ बाई आहे. आपले दुःख ती कोणासमोर उघड करत नाही. पण इतरांच्या दुःखात मात्र सहभागी होते, त्यांना दिलासा देते.सीमावरील बलात्कारानंतर कस्तुरीच तिला मनोबल देते, अरूच्या मनात आपल्याबद्दल अढी आहे हे माहीत असूनही अरूने मुल दत्तक घेतल्यावर कस्तुरीच बाळाच्या देखभालीसाठी पुढाकार घेते.रिक्षावाला असो की घरातील नागी ही मोलकरीण कस्तुरी सगळ्यांशी जोडून घेणारी आहे. गोपाळशीही तिने सहज जोडून घेतले आहे.त्यामुळे त्याचा एकटेपणा, अपराधीपणा दूर करून ती त्याला सकारात्मक बनवू शकली आहे.
अशाप्रकारे ‘शॅडो प्ले’ या शशी देशपांडे यांच्या कादंबरीतील प्रामुख्याने गोपाळ या व्यक्तिरेखेच्या मनोगतांतून तसेच काही प्रमाणात रोहित व अरूच्या मनातील विचारांच्या गुंत्यातून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून आणि कल्याणी, कस्तुरीच्या प्रत्यक्ष जगण्यातून,कृतींतून लेखिकेची अंतर्दृष्टी वाचकांपर्यंत पोहोचते.
तुम्ही शशी देशपांडे यांची ‘शॅडो प्ले’ ही कादंबरी मूळातून वाचलीत तर त्यातील कथनातून व्यक्तिरेखा, घटना आणि त्यामागील लेखिकेची अंतर्दृष्टी याची कथानकात घातली गेलेली सुंदर विण तुम्हाला निश्चितच परिणामकारक वाटेल.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुढील ब्लॉगमध्ये आपण बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या भारतीय इंग्रजी लेखिका अरूंधती रॉय यांच्या कामगिरीचा परिचय करून घेणार आहोत.
-गीता मांजरेकर
________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा