मागील ब्लॉगमध्ये आपण शशी देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे समजून घेतली. आज त्याच कादंबरीचे कथनाच्या अंगाने विश्लेषण करून लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथनाचे वैशिष्ट्य हे की त्यात प्रथम पुरूषी आणि तृतीय पुरूषी असे दोन्ही प्रकारचे कथक लेखिकेने यथायोग्य पद्धतीने वापरले आहेत. जेव्हा कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा सरीता ( सरू)  हिच्या मनातील उलथापालथी दाखवायच्या असतात तेव्हा लेखिका प्रथम पुरूषी कथन वापरताना दिसते. तर कादंबरीचे कथानक काळाच्या अक्षावर पुढे-मागे सरकवण्यासाठी, घटना-प्रसंगांचे वर्णन करण्यासाठी लेखिकेने तृतीय पुरूषी कथन वापरलेले दिसते.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीची सुरूवात प्रथम पुरूषी कथनाने होते आणि त्यात सरीताने तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचा अनुभव कथन केलेला दिसतो.हा अनुभव प्रत्यक्षातला नसून ते एक दुःस्वप्न आहे आणि ते नेहमीचच आहे असं सरीता म्हणते. हा अत्याचार करणाऱ्या पुरूषाचा चेहरा सरीताला अनोळखी, परका वाटतो. या दुःस्वप्नाचा अनुभव नेहमीचाच आहे आणि तो वेदनादायक आहे पण तरीही या अनुभवाने आपल्याला हायसं का वाटतं हे सरीताला कळत नाही. हाच पुरूष कधी तिला रात्री-बेरात्री आपल्या पलंगाजवळ उभा असलेला दिसला आहे. तपकिरी रंगाचा रूमाल वापरणारा हा पुरूष आपला गळा आवळून खून करेल अशी भीती सरीताच्या मनात ठाण मांडून बसली आहे.त्या दुःस्वप्नात आपल्यावरील अत्याचाराने सरीता बेशुद्ध पडते. ती जेव्हा शुद्धीवर येते आणि डोळे उघडून पाहते तेव्हा तिला पलंगावर तिच्या शेजारी तिचा नवराच झोपलेला दिसतो. या कथनातून पतीकडून लैंगिक अत्याचाराचा अनुभव सरीतासाठी नेहमीचाच झाला आहे , तो तिला दुःस्वप्नासारखा वाटला तरी तो प्रत्यक्षातलाच आहे आणि हा लैंगिक अत्याचार करणारा पुरूष तिला परका वाटला तरी तो प्रत्य़क्ष तिचा नवराच आहे या गोष्टी स्पष्ट होत जातात.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथानकातील दुसऱ्या प्रसंगाचे कथन  तृतीय पुरूषी आहे.सरीता सुमारे पंधरा वर्षांनी आपल्या माहेरच्या घरी आली आहे. त्या घराचा दरवाजा ठोठावताना तिच्या मनात अचानक  पुराणातील कृष्ण-सुदामा भेटीचा प्रसंग जागा झाला आहे असे कथक म्हणतो. पण त्याचवेळी ती स्वतःला आपण काही सुदाम्यासारखे फाटक्या कपड्यातले, लाचार नाही असे म्हणून दिलासाही देताना दिसते. मनोमन आपण लाचारच आहोत असं तिला वाटतंय का ? नाहीतर सुदामाची गोष्ट तिला का आठवावी ?असा एक प्रश्न कथक वाचकांच्या मनात निर्माण करतो.एक विवाहित स्त्री म्हणून आपल्याला समाजात जे स्थान आहे तेच जाण्याची भीती सरीताच्या मनात आहे का ? आणि त्यामुळेच ती लाचार झाली आहे का ? असे प्रश्न पुढे कथानक वाचताना वाचकाला अंतर्मुख करतात.

सरीताला तिच्या आईच्या निधनाची बातमी कळल्याने ती वडिलांना भेटायला माहेरी आली आहे.तिच्या वडिलांनाही तिचं येणं अनपेक्षीत वाटलं आहे हे कथनातून स्पष्ट होतं.पण लगेचंच ते सरीताला स्वीकारतात. सरीताला तिची आई नसलेल्या या घरात बाबांचे वागणे पूर्वीपेक्षा अगदी बदलले आहे असे जाणवते. आईचा फोटो आपण घरात लावला नाही याबद्दल ते सरीताकडे खंत व्यक्त करतात पण सरीताला जाणवते की आई गेल्यामुळे बाबांचे वागणे अधिक मोकळे, नैसर्गिक झाले आहे.सरीताला झोपण्यासाठी ते चटई आणि उशी आणून देतात तेव्हा त्याबद्दल तिला काय वाटते ते सांगताना कथक म्हणतो-

“..ते नेहमी रूबाबात असत,घरातले सत्ताधीश, असल्या लहान-सहान गोष्टीत ते कधी लक्ष घालीत नसत.आणि तरी या नव्या भूमिकेत त्यांनी स्वतःला व्यवस्थित बसवलं होतं, जणू त्यांची आधीची निष्क्रियता म्हणजे त्यांची बायकोच्या पुढे शरणागती होती,स्वतःशी काहीच त्याचा संबंध नव्हता.”

आपल्याला दोन मुले आहेत हे वडिलांना माहीत आहे पण त्यांची साधी नावे जाणून घेण्याची उत्सुकताही ते दाखवत नाहीत हे पाहून सरीताला त्यांचा राग येतो. ते तिला दूरचे, अलिप्त वाटतात पण नंतर ती स्वतःलाच प्रश्न विचारते की आपण त्यांच्याकडून आपुलकीची अपेक्षा तरी कशी करावी ?आपल्याला तसा अधिकार नाही याची जाणीवही सरीताला होते. वडिलांना  आपल्या चौकोनी कुटूंबाबद्दल सांगताना सरीताला सुखी कुटूंबाची जाहिरात आठवते आणि ती अचानक आभासात जाते. तिला आपला मुलगा अभी शाळेत जाताना पोटात दुखतंय असं सांगून कशी टाळाटाळ करतो ते जणू दिसतं आणि रेणू गप्पगप्प आहे असंही दिसतं. आभासातून बाहेर येताना सरीताला जे वाटतं ते कथनातून पुढीलप्रमाणे व्यक्त होतं –

“ सुखी कुटूंब, भूतकाळात धक्कादायक अप्रिय घटना घडल्या असल्या तरी आता सुखी कुटूंब सत्य परिस्थिती दडवून.”

याच ठिकाणी कथक सरीताच्या मनातील भय व्यक्त करतो. तो म्हणतो –

 “शिवाय ही विघटनाची आणखी एक नवी विचित्र भीती. आपलं अस्तित्वच संपल्याची भयप्रद जाणीव. नाही, त्याहूनही वाईटच.शब्द-भ्रमकाराची बाहुली जी स्मित करते,खदाखदा हसते आणि बोलतेही, ते केवळ तिच्या धन्यामुळे.भीती अशाची की शब्दभ्रमकार माझ्यासोबत जर नसेल तर मी अधोगतीला जाईन,निर्जीव बाहुलीच जणू, चेहऱ्यावर चिकटवलेलं बावळट हसू असणारी.”

अनुवादक ‘शब्दभ्रमकार’ हा थोडा किल्ष्ट शब्द वापरत असला तरी बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या कलावंताची बाहुली(Pupet) जशी केवळ त्याच्यावर अवलंबून असते आणि तिला वेगळे, स्वतंत्र अस्तित्वच नसते तसे आपले होते आहे असे सरीताला वाटत असावे.इथे कथन परत प्रथम पुरूषी होते आणि सरीताच्या मानसिक उलघालीबद्दल तिच्याच शब्दांतून व्यक्त होते-

“माझा व्यवसायच कदाचित माझा शब्दभ्रमकार असेल.कारण माझ्यासमोर माझा पेशंट असेपर्यंतच मी खरीखरी असते,असं मला वाटतं.दोन पेशंटसच्या मधल्या वेळात मी काहीच नसते.आणि तरी दोन पेशंटसच्या दरम्यान आताशा मी जास्तीत जास्त वेळ घेते असं मला वाटतं.जणू काही नसणं म्हणजेच निवांत असणं…..एकदा मी कागदाचे कपटे करीत होते,तेव्हा मनात विचार आला… जमिनीवर पडणारे माझ्या मनाचे तुकडे आहेत.आणि तिथं निर्मला माझ्याकडे चकित होऊन पहात म्हणतेय ..काय झालं डॉक्टर ?…तिच्या आवाजात असा विश्वास ,जणू तिनं मला समजून घेतलंय.जणू काही पुन्हा सगळं सुरळीत झालंय,पण माझ्या दृष्टीने काही बदल नाही. सतत मनात हीच भीती की एखादे दिवशी निर्मला आत डोकावून बघेल आणि टेबलामागं तिला कोणी दिसणार नाही. फक्त एक पांढरा कोट कोणीच न घातलेला.रिकामा रिकामा.व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित चेहरा ठेवायचा असं मला सांगणारा शब्दभ्रमकार एखाद्या दिवशी नसला तर वाढणारी माझी भीती.”

सरीताला जाणवते आहे की एक डॉक्टर म्हणून आपले व्यावसायिक अस्तित्वच काय ते आपल्याला आहे. आपले एक स्त्री म्हणून, माणूस म्हणूनचे अस्तित्व हरवल्यासारखे सरीताला वाटते आहे. तिचा पती मनोहर आणि तिच्यातील विसंवाद हे त्याचे कारण आहे. हा विसंवाद आणि त्यांच्या नात्यातील व्यर्थता तिला बोचते आहे.जणू मनोहरचं आणि आपलं वैवाहिक नातं हा आता केवळ आभास आहे असे सरीताला वाटू लागले आहे. तिची ही जाणीव  स्पष्ट करताना कथक प्रथम पुरूषी कथनात एक प्रसंग मांडतो. तो असा –

“त्या रात्री मी मनूला त्याविषयी सांगितलं.

“माझी आई गेली”. मी म्हणाले

“तुझी आई? त्याचे डोळे माझा चेहरा निरखून पाहू लागले. त्याला जे काही दिसलं त्यावरून खात्री पटली असावी किंवा कदाचित, त्याला काहीच दिसलं नाही,त्यावरून.

“कोणी सांगितलं तुला ?”

“तुझे प्रा. कुलकर्णी”

“कुठे भेटले तुला ?” 

आम्ही बेडरूममध्ये होतो,तो बेडवर, मी ड्रेसिंग टेबलसमोर ,स्टुलावर माझ्या केसांची वेणी घालत. तो माझ्या प्रतिबिंबाशी बोलत होता, आणि माझं प्रतिबिंब त्याच्याशी. हे असं सोपं होतं.अधिक सुरक्षितही आणि आरशातले  आम्ही, सुंदर सजवलेल्या बेडरूमसाठी  पोझ घेऊन बसलेल्या जोडप्यासारखे.…”

सरीता मनोहरला तिने तिच्या वडिलांकडे जायचं ठरवल्याबद्दल सांगते. तेव्हा त्याला आश्चर्य वाटते.लग्नानंतर एवढ्या वर्षांत ती कधीच माहेरी गेली नाही आणि तिच्य आई-वडिलांनीही स्वतःहून कधी संपर्क केलेला नाही तर सरीताने का जावं तिथे असा मनोहरचा प्रश्न आहे.सरीताला आता इतक्या वर्षांनंतर आपल्या आईची माफी मागावी असं वाटत असावं असे अनुमान तो बांधतो. ते ऐकून सरीता हसू लागते. तिच्या मनात त्यावेळी जे येतं ते प्रथम पुरूषी कथनात कथक मांडतो. ते असे –

“क्षमा? मला हसू आवरेना. तसं तो चकित होऊन माझ्याकडे पहातच राहिला. क्षमा? अशी कुठली गुंतागुंत नकोय. माझ्या गरजा खूपच साध्या आहेत. रात्रभर शांत झोप घ्यावी. कुठल्या वेदनेशिवाय जागं व्हावं. उद्याचा दिवसही स्वस्थपणे पार पडावा.कुठला विचार करायला नको, कसलं स्वप्न नको. फक्त जगावं आणि तसं करायचं असेल तर इथून दूर जायला हवं. होय , त्यासाठीच मला जायचंय. या घरापासून, मॅचिंग पडदे आणि हॅंडलूमच्या बेडशीटसनी निर्माण केलेल्या या स्वर्गापासून दूर जायला हवं. ह्या रानटीपणा आणि शरणागतीच्या नरकापासून दूर गेलं पाहिजे.पण माझ्यामध्ये मीच नरक घेऊन फिरत असेन तर  मग मी सुटकेची आशाच नको करायला.पण तेही मला समजायला हवं. आणि म्हणून मी घरी वडिलांकडे जाते आहे….”

एकंदर सरीताला तिचं सुखी वैवाहिक आयुष्य हा केवळ देखावा आहे आणि तो कदाचित तिच्या स्वतःच्या मानसिक दुबळेपणामुळेच टिकून आहे हे लक्षात आले आहे पण आहे त्या वास्तवाचा स्वीकार करण्याची ताकद ती जणू हरवून बसली आहे.  आता हा सुखी संसाराचा देखावा,हे ढोंगी आयुष्यच तिला नकोसे झाले आहे. म्हणूनच आई गेली हे निमित्त साधून ती आपल्या खोट्या, वरवरच्या कौटुंबीक आयुष्यापासून दूर जाऊन स्वतःचा शोध घेऊ इच्छिते आहे.आपली मानसिक ताकद तिला अशी दूर जाऊनच आजमावता येणार आहे हे कथक स्पष्ट करतो. सरीताने तिच्या वडिलांकडे निघून जाण्यामागची ही कारणमीमांसा लक्षात घेतली की मग तिचा पुढचा मानसिक प्रवास नीट समजू शकतो.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करताना या कादंबरीच्या प्रारंभीच्या काही भागातील कथनाचा आपण विचार केला. त्यातून आपल्याला कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा सरीता लग्नानंतर  सुमारे पंधरा वर्षांनी तिच्या माहेरी का निघून आली आहे आणि  तिच्या मनात कोणत्या उलथापालथी घडल्या आहेत ते कळले.आपल्या मनाचा शोध घेण्यासाठी सरीता माहेरी आलेली आहे आणि तिच्या मनात तिच्या वैवाहिक जीवनातील पतीने केलेले अत्याचार सलत आहेत हे आपल्याला स्पष्ट झाले.कादंबरीच्या कथानकात पुढे कथन बरेचवेळा सरीताच्या भूतकाळात जाते आणि त्यातून सरीताचा बालपणापासून ते एक यशस्वी डॉक्टर होईपर्यंतचा आणि नंतर एक विवाहित स्त्री म्हणूनचे स्वतःचे अपयश जाणवेपर्यंतचा तिचा प्रवास वाचकांसमोर उलगडतो.

सरीता एक मुलगी असल्याने तिच्या आईने केलेली तिची उपेक्षा, तिचा धाकटा भाऊ ध्रृव याच्या अपघाती निधनाला सरीताच कारणीभूत आहे असे मानून आईने कायमच सरीताचा केलेला दुःस्वास, आईला आपली योग्यता पटवून देण्यासाठी सरीताने अट्टहासाने मुंबईत राहून घेतलेले वैद्यकशास्त्राचे शिक्षण, त्याच काळात तिने आईच्या विरोधात जाऊन मनोहरशी केलेला प्रेमविवाह, मनोहरची आपल्याला आपल्या करीयरमध्ये पुढे सरकण्यासाठी मदत होणार नाही हे लक्षात आल्यावर सरीताने तिचे एक प्राध्यापक बुझी यांच्या अहंकाराला खतपाणी घालून स्वतःचा करून घेतलेला फायदा. पण यशस्वी डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवल्यावरही आपण सुखी नाही , आपल्याला केवळ भौतिक सुख नकोच होतं तर एक साधं निरपेक्ष प्रेम करणारं नात हवं होतं हे सरीताच्या लक्षात येणे असा हा सगळा भूतकाळ कथनातून ओघाने उलगडत जातो.

एका बाजूला तृतीय पुरूषी कथनातून सरीताचा वर्तमानकाळ लेखिका मांडत राहते. सरीता तिच्या वडिलांच्या घरात रूळली आहे. तिचा म्हणून एक दिनक्रम आपोआपच आखला गेला आहे. त्यात घरातली साफसफाई , स्वयंपाक ही दैनंदिन कामे आहेतच पण त्याचबरोबर आजुबाजूच्या वस्तीतील लोकांच्या घरातील रूग्णांना वैद्यकीय सल्ला, औषधोपचार करणे या गोष्टीही ती करते आहे.स्वतःचे वडील आणि त्यांनी घरात सोबतीला ठेवलेला विद्यार्थी माधव यांचे आहे ती परिस्थिती स्वीकारून, शांतपणे जगणे सरीता पाहते आहे.त्या दोघांच्या गरजा,अपेक्षा अगदी माफक आहेत.पण तरीही ते समाधानी आहेत. हे पाहून सरीताला तिच्या हरवलेल्या मनःशांतीची कारणे  स्पष्ट होत गेली असावीत. पण तरीही तिला तिच्या मनातील जुनाट जळमटे अजून झटकून टाकता आली नसावीत. काही दुःख,अपराधीपणाचे ओझे सरीताने मनातच दाबून ठेवलेले आहे. कादंबरीच्या अखेरीस मनोहरचे तिला परत घरी घेऊन जायला येतो आहे असे पत्र मिळते तेव्हा सरीताच्या मनातील दबलेला राग, दुःख अचानक बाहेर पडते.तिच्या वडिलांना ती  हे दुःख सांगते आणि मनोहरला टाळण्यासाठी आपण वडिलांच्या घरातून दूर निघून जायचे ठरवले आहे असे ती म्हणते तेव्हा मात्र तिचे वडील तिला अडवतात. ते म्हणतात-

“अशाप्रकारे तू पळून जाऊ शकत नाहीस सरू…..तुला त्याची भीती वाटते …त्याला एक संधी दे सरू.थांब आणि त्याला भेट.बोल त्याच्याशी. त्याला कळू दे तुझ्याकडून ,काय चुकलंय ते. मला सांगितलंस ते त्यालाही सांग.”

सरीताला मात्र तिच्या वडिलांचा सल्ला पटत नव्हता किंवा स्वीकारता येत नव्हता. आता परत मनोहरच्या घरी जाणं शक्य नाही असे तिला वाटत होते. तेव्हा तिचे वडील तिला समजावत म्हणाले-

“सरू ,पुन्हा असं करू नकोस…अशी संसाराकडे पाठ फिरवू नकोस पुन्हा.गोलाकार वळण घे आणि त्याला सामोरी जा. भेट त्याला.…”

याआधी सरूने ध्रृवच्या अपघाती मृत्युसाठी जेव्हा आईने रागाने तिला जबाबदार धरले होते तेव्हा अशीच घराकडे पाठ फिरवली होती. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत गेलेली सरू प्रेमविवाह करून आई-वडिलांपासून दूरच झाली होती.त्यावेळी तिने आई-वडिलांशी संवाद तोडला होता आणि आता ती मनोहर, तिची मुलं यांच्याशी संवाद तोडायला निघाली होती. तिला कळत होते की आपली आईही अशीच दुराग्रही होती आणि त्यामुळे ती एकाकी पडली होती. सरीताचा दुराग्रह चुकीचा आहे असे तिचे वडील तिला सांगत होते.ते म्हणाले –

“पण आता मी तुला विनंती करतोय.तुझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय जाऊ नकोस.त्याच्याशी बोल. काय चुकलंय ते त्याला सांग.”

पण सरीताच्या मनात मनोहरबद्दल भीती होती,पुन्हा एकदा त्याचे अत्याचार सहन करण्याची शारीरिक मानसिक ताकद तिच्यात नव्हती. यावेळी वडिलांनी आपल्या पाठीशी उभे रहावे असे तिला वाटत होते. पण आता ते तिला साथ देऊ शकणार नव्हते. तिचा निर्णय तिनेच घ्यायचा आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.पण विवेकी विचार करायची आणि जीवनाला सामोरी जायची ताकदच सरीता हरवून बसली होती. ती म्हणाली-

“बाबा, तुम्हाला कल्पना नाही,मी थकलेय.खूप थकलेय .माझं पुढे कसं काय होणारय मला खरंच ठाऊक नाही. हे सगळं संपवू शकले असते तर.. नाही काळजी करू नका. मी ते करणार नाही. करूच शकत नाही. केलं असतं तर फार पूर्वीच केलं असतं… पण मला वाटलं तुम्ही मदत कराल”

सरीताचं हे थकणं मनोकायीक असलं तरी ते तेवढंच मर्यादीत नाही.त्यामागे तिची समाजाने चालवलेली बदनामी हेही कारण आहे. समाज स्त्रीकडे आणि पुरूषाकडे विशिष्ट अपेक्षेने पाहतो.पण त्या दोघांनी आपापल्या भूमिका नीट बजावल्या नाहीत तर प्रामुख्याने स्त्रीलाच दोष देतो. यातून स्त्रीला जे बोल लावले जातात ते ऐकून आलेला हा थकवा आहे. एक ‘लेडी डॉक्टर’ म्हणून सरीताला मिळणारा मानसन्मान एक प्राध्यापक म्हणून मनोहरला मिळत नाही.स्वतःचे क्लिनिक सरीताने स्वतःच्या हिकमतीने मिळवले आहे, घर आणि त्यातील भौतिक सोयीसुविधा सरीताच्या कमाईतून  आलेल्या आहेत.पण समाजात तिच्या आणि तिचे प्राध्यापक बुझी यांच्या नात्याबद्दल कुजबूज आहे. त्यामुळे मनोहरला मनोमन एक पुरूष म्हणून अपयशी वाटतं आहे. अर्थात सामाजिक संकेतांच्या चौकटीत एक पुरूष संसाराची जबाबदारी घेणारा, कर्तृत्ववान, स्त्रीवर सत्ता गाजवणारा हवा आणि तसे आपण नाही हे मनोहरला बोचते आहे. ज्यातून तो विकृत झाला आहे आणि सरीतावर अत्याचार करून सत्ता गाजवू पाहतो आहे.आपला भाऊ,आई,पती सगळ्यांच्या दुर्दैवाला आपणच जबाबदार आहोत असे समाजाचे म्हणणे खोडून काढणे सरीताला शक्य नाही.तिला हा सगळा पेच कळतो आहे पण यातून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग तिला शांतपणे जगू देईल याबद्दल ती साशंक आहे.त्याबद्दल सरीताच्या मनातले विचार, भावना प्रथम पुरूषी कथनातून व्यक्त होतात.ती मनात म्हणत असते-

“पण कधी क्षमाही नसते. पश्चात्तापही नसतो. मी निष्काळजीपणे पाठ फिरवली म्हणून माझा भाऊ गेला. मीच सोडून गेले म्हणून माझी एकाकी आई गेली. माझा नवरा अपयशी ठरला कारण मी त्याचं पौरूष नष्ट केलं”

एका बाजूला यशस्वी डॉक्टर असणारी सरीता एक मुलगी म्हणून, बायको म्हणून आपणच चुकीचे वागलो या निष्कर्षापर्यंत यायला समाजाची चौकटच कारण आहे.सरीता स्वतःला दोष देते आहे, अपराधीभावाने दुःखी आहे.तिच्या मनातले विचार ओळखूनच जणू तिचे वडील म्हणतात-

“मी तुला एकदा म्हणालो होतो सरू..तुझी आई गेली,तसा तुझा भाऊही.गेलेल्यांचा विचार कशाला करतेस ..मी तुला सांगितलं …ते गेलेयत.ते आता काहीच करू शकत नाहीत.इतरांमुळे तू कशाला मनःस्ताप करून घेतेस? तू तुझ्यासाठी पुरेशी नाहीस का? हे तुझं आयु्ष्य आहे ,नाही का ?”

वडिलांनी सरीताच्या मनातील भूतकाळातल्या गोष्टींच्या अपराधीपणाचे ओझे मनावरून खाली उतरवून ठेवायला तिला मदत केली.  तरीही सरू मनोहरला सामोरी जायची हिंमत करू शकत नव्हती.मनोहर कुठल्याही क्षणी घराचा दरवाजा ठोठावणार होता आणि सरू भयभीत झाली होती. तिने वडिलांकडून वचन घेतले होते की मनोहरने दार ठोठावले तरी त्याला घरात घेऊ नका.त्यांनी नाइलाजाने  मान हलवली होती.

आणि मग मनोहर कधीही येईल या अपेक्षेने दाराकडे पाहात असताना सरूच्या मनात काय घडले त्याचे कथन प्रथम पुरूषी निवेदनात येते.सरू मनात म्हणत असते-

“ठीक आहे,मी एकटी आहे.पण असा प्रत्येक जणच एकटा आहे. माणसं …ती आपल्याला कधीच साथ देणार नाहीत.पण आपण एकटेच आहोत म्हणून ,दुसरं कोणीच नाही म्हणून, आपण प्रयत्न करत राहीलं पाहिजे.आपला स्वतःवरच विश्वास नसला , तर मग आपण बुडालोच”

तृतीय पुरूषी कथक सरीताच्या मनात झालेल्या या परिवर्तनाची कारणे कथन करतो. सरीताला जाणवते की तिच्या वडिलांनी आईचे जाणे स्वीकारून पुन्हा त्यांचे जगणे सहज सुरू केले आहे.त्यांच्या घरातील विद्यार्थी माधव प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या हिताचा विचार करून निर्णय घेऊ शकतो आहे. आणि तिच्या वडिलांनी विचारलेला ‘हे तुझं आयुष्य नाही का?’ आणि  ‘तू तुझ्यासाठी पुरेशी नाहीस का?’हे प्रश्नही सरीताला अंतर्मुख करतात.कथक म्हणतो –

“तिनं आधी निर्धाराने नाकारलेली आणि नंतर मनापासून स्वीकारलेली तिची रूपं तिला आठवली.अपराधी बहीण, कर्तव्यच्युत मुलगी,निष्प्रेम बायको…अपराधांच्या सुया टोचलेली व्यक्ती.होय,ती तीनही व्यक्तिमत्व तिच्यामध्ये होती हे ती आता नाकारू शकत नव्हती.पुन्हा ‘संपूर्ण’ ती होण्यासाठी तिला ही रूपं स्वीकारावीच लागली असती.पण तिची जर ही तीनही रूपं होती, तर ती रूपं म्हणजेच ती नव्हती. ही सगळी रूपं म्हणजे ती होतीच,पण आणखीही काही होती.”

स्वतःच्या अंतर्मनाचा सरीताचा शोध इथे जणू पूर्णत्वास येतो. अशावेळी तिच्या मनात जे विचार येतात ते प्रथम पुरूषी कथनातून कथानकात व्यक्त होतात. सरीता स्वतःशीच म्हणते-

“माझं आयुष्य हे माझं आहे. …मी जर कळसूत्री बाहुली असेन तर मी स्वतःलाच तसं केलं, म्हणून लग्नाच्या अदृष्य सावलीला मी लोंबकळतेय, त्याचा आशय केव्हाच हरपून गेलाय,कारण माझ्या आईची शापवाणी खरी ठरण्याची मला भीती वाटतेय.”

त्याचवेळी दरवाजाची कडी वाजते, सरीता धैर्याने दरवाजा उघडते. शेजारचा एक मुलगा त्याच्या घरातील मुलीला फिट आली म्हणून सरीताला एक डॉक्टर म्हणून तातडीने बोलवायला आलेला असतो.क्षणात सरीता त्याच्याबरोबर जायला निघते. मनोहर आला तर त्याला थांबायला सांगा मी लवकरात लवकर परत येते असे ती वडिलांना सांगते असे कथक म्हणतो. तेव्हा, सरीताने स्वतःच्या जीवनाला स्वीकारण्याची, हिंमतीने वास्तवाला सामोरी जाण्याची आणि यथायोग्य निर्णय घेण्याची ताकद परत मिळवली आहे हेच तो स्पष्ट करतो.

अशाप्रकारे, प्रथम पुरूषी आणि तृतीय पुरूषी कथनाचा समर्पक वापर करून शशी देशपांडे यांनी सरीता या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या आयुष्याचा जीवनपट तिच्या मनातील सर्व उलथापालथींसह बारकाईने उलगडला आहे. एका स्त्रीला स्वतःला सिद्ध करताना आयु्ष्यात नैतिकताही पणाला लावावी लागते आणि मग तेच तिला कालांतराने अपराधीपणाचे वाटू शकते. त्या अपराधीपणाने ती किती हतबल,दुबळी होऊ शकते हे तर ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीत लेखिकेने मांडले आहेच, पण त्याबरोबरच जेव्हा एखादी स्त्री स्वतःचे आयुष्य जसे आहे तसे स्वीकारायचे ठरवते तेव्हा तिचा दुबळेपणा कसा गळून पडतो आणि ती पुन्हा एकदा सबल, संपूर्ण स्त्री कशी होऊ शकते हे परिवर्तनही लेखिकेने  या कादंबरीतील सरीताच्या माध्यमातून सुस्पष्टपणे मांडले आहे.स्त्री सहसा आयुष्यापासून पळून जात नाही.तिचे मानसिक पेच,तिचे भय,तिचे नैराश्य हे तिच्या नैतिकतेच्या कल्पनांतून निर्माण झालेले असते पण एकदा का तिने हे पेच विवेकाने सोडवले की ती पुन्हा एकदा सक्षम होऊ शकते हे दाखवणे हीच ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या लेखिकेची अंतर्दृष्टी आहे.

एक जिज्ञासू वाचक म्हणून तुम्ही ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ ही कादंबरी मूळातून वाचावीत किंवा मग प्रा. पुरूषोत्तम देशमुख यांनी केलेला या कादंबरीचा मराठी अनुवाद तरी जरूर वाचावात ही विनंती.

पुढील ब्लॉगमध्ये आपण शशी देशपांडे यांच्या ‘दॅट लॉंग सायलन्स’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे समजून घेणार आहोत.

                                                              -गीता मांजरेकर

————————————————————————————————————————————————————————–

यावर आपले मत नोंदवा