मागील ब्लॉगमध्ये आपण शशी देशपांडे या भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रीच्या लेखनकर्तृत्वाचा परिचय करून घेतला. ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ ही शशी देशपांडे यांनी लिहिलेली पहिली कादंबरी. ती १९८० साली प्रकाशित झाली.२००९ मध्ये या कादंबरीचा प्रा. पुरूषोत्तम देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद प्रकाशित झाला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या मराठी अनुवादाच्या आधारेच ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे यांचा परिचय करून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो लिंक जोडली आहे.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे कथानक एकरेषीय नाही.ते काळाच्या अक्षावर पुढे मागे जात राहते. त्यामुळे कादंबरीच्या कालावकाशातही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे विभाजन झालेले दिसते. ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथानकाचा प्रत्यक्ष काळ एक-दोन महिन्यांचा असेल. पण अप्रत्यक्ष काळ साधारण चाळीस वर्षांचा असावा.कादंबरीचा प्रत्यक्ष अवकाश हा एका छोट्या नगरातील (बहुतेक कर्नाटकातील) एका मध्यमवर्गीय वस्तीतील घराचा  असला तरी अप्रत्यक्ष अवकाश मुंबई शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घराचा आहे.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथानकाचे स्वरूप घटनाकेंद्री नसून ते व्यक्तिरेखाकेंद्री  आहे. सरीता (सरू) या एकाच व्यक्तिरेखेला हे कथानक केंद्रस्थानी ठेवते असे म्हणता येईल.भूतकाळातील व वर्तमानातील अनेक घटनांमुळे सरीताच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता,भावनिक गोंधळ आणि अखेरीस या अस्वस्थ मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग तिला दिसणे, असा ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथानकाचा प्रवास होतो.

सरीता वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिच्या छोट्या नगरातून मुंबई महानगरात गेली, तिथे शिक्षण घेत असतानाच तिच्या आयुष्यात मनोहर नावाचा तरूण आला. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच सरीताने मनोहरशी प्रेमविवाह करून मुंबईतील चाळीतल्या छोट्याशा खोलीत संसार थाटला.पुढे  महत्त्वाकांक्षेचे पंख उभारून सरीताने उच्चशिक्षण पूर्ण करून एक यशस्वी डॉक्टर म्हणून मुंबईत आपला जम बसवला .चाळीतून ती अलिशान ब्लॉकमध्ये रहायला आली , तिने स्वतःचे क्लिनिक थाटले .सरीताचा पती मनोहर मूळात नाट्यकलावंत पण तिथे त्याला जम बसवता न आल्याने अखेरीस तो एका महाविद्यालयात प्राध्यापक झाला.सरीता आणि मनोहर यांना रेणूका आणि अभी अशी दोन मुलेही झाली.अशाप्रकारे सकृतदर्शनी तरी सरीता आणि मनोहर यांचे चौकोनी कुटूंब सुखी आहे. पण या सुखी कुटूंबात दुःखी असणाऱ्या सरीताचे उद्वस्थ झालेले मानसिक स्वास्थ आणि त्यामागच्या कारणांचे  तपशील ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीत वाचकांना पहायला मिळतात.

 आईच्या निधनाची बातमी कळल्याने सरीता मुंबईहून आपल्या माहेरच्या घरी परतली आहे या प्रसंगापासून ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे कथानक सुरू होते. तर साधारण महिना -दोन महिन्यांनंतर आपण परत आपल्या मुंबईच्या घरी जायचे की नाही याबद्दल सरीताने मनोमन काही एक निर्णय घेतला आहे इथे येऊन कथानक संपते.सरीताच्या मनात आपला भरला संसार आणि यशस्वी करियर सोडून द्यावी असे विचार का आले असावेत याची उत्तरे सरीताच्या भूतकाळात तर आहेतच पण वर्तमानातही आहेत.

सरीता एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटूंबातील पहिले अपत्य होती.तिचे वडील बॅंकेत कारकून होते तर आई पारंपरिक विचारांची गृहिणी होती.सरीता ज्या छोट्या नगरात लहानशा वसाहतीत रहात होती तेथील आजुबाजुची सगळीच कुटूंबे सरीताच्या कुटूंबासारखी मध्यमवर्गीय, पारंपरिक वळणाचीच होती.एक मुलगी म्हणून सरीताला घरात फारसे महत्त्व नव्हते. विशेषतः तिच्या आईचे तिच्यावर प्रेम नव्हते.पुढे सरीताला धाकटा भाऊ झाला आणि त्याचे नाव ध्रुव ठेवले गेले. पुराणातील उत्तानपाद राजाचा,  ध्रुव जसा अढळपद मिळवणारा तसा सरीताचा भाऊ ध्रुवदेखील आई-वडिलांच्या प्रेमात अढळपद मिळवून बसला. त्यामुळे सरीताच्या मनात एकप्रकारची चीड निर्माण झाली. ती ध्रुवचा दुस्वास करू लागली. ध्रुवच्या जन्मानंतर आपले कुटंबातील स्थान आणखीनच नगण्य झाले हे जाणवल्याने तिच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. पण ती मुलगी होती आणि मुलींना आजुबाजूच्या सगळ्याच कुटूंबांत दुय्यम स्थान मिळत होते.आपणही एक दिवस आई-वडिलांच्या मनात असे ध्रुवासारखे अढळपद मिळवावे, आपली स्वतःची ओळख निर्माण करावी अशी महत्वाकांक्षा सरीताच्या मनात ती लहानपणी दुर्लक्षीत अपत्य होती म्हणून निर्माण झाली असावी.

सरीताचे निष्प्रेम बालपण आणखीनच निष्प्रेम होण्याला एक प्रसंग कारण ठरला.तो होता एका पावसाळ्यातला प्रसंग. सरीता एका दुपारी आई झोपलेली असताना, घरातील दडपलेल्या, निष्प्रेम  वातावरणापासून दूर जावे म्हणून एकटीच घराबाहेर निघाली होती. पण तेवढ्यात ध्रुव तिच्या मागे लागला की तिने त्यालाही सोबत न्यावे.नाइलाजाने सरीताने ध्रुवला सोबत घेतले होते. गावाबाहेरच्या रानात फिरत असताना एका पानथळ जागेत सरीता पाण्यात उतरली आणि ध्रुवही तिच्या मागोमाग पाण्यात गेला. पण चिखलात आपण खोल जातो आहोत हे लक्षात येताच सरीता माघारी फिरली आणि ध्रुवलाही तिने माघारी बोलावले,त्याला मदतीचा हात दिला. परंतु दुर्दैवाने त्याला बाहेर पडता आले नाही आणि त्या छोट्याशा डबक्यात बुडून ध्रुव मरण पावला होता. ध्रुवच्या या अपमृत्यूला सरीताच जबाबदार आहे असा गैरसमज सरीताच्या आईने करून घेतला होता आणि त्यामुळे सरीता ही आईच्या नजरेत आणखीनच वाईट ठरली होती. सरीताचे वडील अबोल आणि बायकोपुढे दबून रहाणारे असल्याने तेही या परिस्थितीत सरीताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकले नव्हते.ध्रुवच्या मृत्यूमुळे सरीताला आपण आपल्या आई-वडिलांना नकोशाच आहोत हे तीव्रतेने जाणवले आणि मग घरापासून दूर राहून शिकता यावे यासाठी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्याचा हट्ट तिने धरला. आईचा कडवा विरोध असताना यावेळी मात्र तिचे वडील तिच्या पाठीशी उभे राहिले. सरीता मुंबईतल्या वसतीगृहात राहून वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली.

छोट्या नगरातून, दडपलेल्या वातावरणातून आल्याने अन्य शहरी मुलींसारखे पुरूषांशी मोकळे वागणे सरीताला प्रारंभी जमत नव्हते. पण स्मिता नावाच्या मैत्रिणीच्या सोबत महाविद्यालयातील नाटकांच्या तालमींना जेव्हा सरीता जाऊ लागली तेव्हा मनोहर नावाचा नाटकात जीव ओतून काम करणारा  तरूण तिला आवडू लागला.  मनोहर आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाही असे सरीताला वाटत असतानाच एका निराशेच्या क्षणी मनोहरला सरीताकडून दिलासा मिळाला.आणि मग सरीता आणि मनोहर यांचे प्रेम बहराला आले.मनोहर ब्राह्मणेतर जातीतील आहे आणि आर्थिकदृष्ट्याही निम्न मध्यमवर्गातला आहे हे सरीताच्या आई-वडिलांनी तिच्या प्रेमाला विरोध करण्याचे कारण होते.पण सरीताने आपला मनोहरशी प्रेमविवाह करण्याचा हट्ट सोडला नाही.  खरं तर, मनोहरचा कुठेच जम बसलेला नसताना आणि स्वतःचे वैद्यकीय शिक्षण अर्धवट झालेले असताना  सरीताने  विवाह करणे हे धोक्याचेच होते. पण प्रेमासाठी आसुसलेल्या सरीताला तो धोका जाणवलाच नाही. एका छोट्याशा चाळीतल्या खोलीत तिने मनोहरबरोबर आपले वैवाहिक जीवन सुरू केले. मनोहरने तिला आई-वडिलांशी जुळवून घ्यावे आणि संसारासाठी आर्थिक मदत घ्यावी असे सुचवलेले सरीताला आवडले नाही. एम.बी.बी.एस. ची पदवी मिळूनही चांगली नोकरी न मिळाल्याने सरीताने वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे ठरवले. मनोहर मिळेल ती कामे करत राहिला.या टप्प्यावर सरीताला तिचे एक प्राध्यापक बुझी(अद्याक्षर बी.ओ.झेड असल्याने विद्यार्थ्यांनी बुझी नाव ठेवलेले) यांनी आधी तिच्या कामातल्या चुका दाखवत अपमानीत केले, घाबरवले आणि नंतर गाडीतून लिफ्ट देत, नोकरी देऊ करत उपकृत करून ठेवले. बुझींना फक्त स्त्रियांचा सहवास हवा असतो तो लोकांसमोर फुशारकी मारायला हे सरीताच्या लक्षात आले. ते कोणत्याही स्त्रीला लैंगिक सुख देऊ शकत नाहीत हे त्यांचे न्यून सरीताने ओळखले.त्याचा फायदा घेत,  धिटाईने सरीताने बुझींना आपलेसे केले.लोकांच्या कुजबुजीकडे दुर्लक्ष करत तिने आपल्या स्वतंत्र क्लिनिकसाठी बुझींकडून कर्जाऊ पैसे मिळवले.आणि बघता बघता सरीता मुंबईतील एक प्रथितयश डॉक्टर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर तिने  बुझींना सोयीस्करपणे सोडून दिले होते.

एक डॉक्टर म्हणून व्यावसायिक यश मिळवताना सरीताला मनोहर आपल्यापासून दुरावतो आहे याचे भान नव्हते असे नाही, पण महत्त्वाकांक्षा तिला पुढे खेचत राहिली. मनोहरला नाटकात यश मिळाले नाही म्हणून तो प्राध्यापक झाला होता पण तरीही सरीतापेक्षा त्याची कमाई कमीच होती. समाजात वावरताना सरीताला एक ‘लेडी डॉक्टर’ म्हणून मिळणारा मान पाहून मनोहरच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. सरीताच्या चांगल्या मिळकतीमुळे मोठ्ठ घर,नोकर-चाकर,उत्तम खाणेपिणे याची सवय मनोहरला झाली.बुझी आणि सरीताची जवळीक  मनोहरला माहीत नव्हती असे नाही.पण श्रीमंती राहणीचे त्यालाही आकर्षण होतेच.मनोमन मात्र त्याला पराभूत वाटू लागले होते. त्याचा परिणाम म्हणून मनोहर विकृत झाला. सरीताशी या सगळ्याबद्दल बोलून स्पष्टीकरण घेण्याचे धाडस मनोहरला दाखवता आले नाही.त्याउलट रोज रात्री नवरा म्हणून हक्क गाजवत तो सरीतावर लैंगिक अत्याचार करू लागला. सुरवातीला मनोहरमधील हा बदल हे सरीताला  एक दुःस्वप्नच वाटले. पण हळूहळू तिला मनोहरच्या या वागण्याचा त्रास होऊ लागला. विशेषतः रात्री आपल्यावर अत्याचार करणारा आपला नवरा सकाळी काहीच न घडल्यासारखा आपल्याशी सहजतेने कसा वागू शकतो हे सरीताला कळेना.मनोहरला समजून घेण्यात आपलेच काही चुकते आहे का हेही तिला कळेना. मनोहरला याचा जाब विचारण्याचे धाडस ती दाखवू शकली नाही. मुलांसमोर भांडणे नकोत असे वाटून ती मनोहरचे अत्याचार सहन करत राहिली.आई-वडिलांपासून दुरावल्याने आपले हे शल्य सांगायचे तरी कोणाला आणि यातून मार्ग तरी कसा काढायचा हे सरीताला उमगेना. अशा अस्वस्थ मनःस्थितीत सरीता असताना तिच्या लहानपणीचे गावातील परिचित तिच्याकडे इलाज करून घेण्यासाठी आले. त्यांनी सहज म्हणून तिला तिच्या आईच्या निधनाची बातमी सांगितली आणि सरीता आणखीनच अस्वस्थ झाली. आपले वडील आता गावी एकटे पडतील हे जाणवून आणि आपल्या अस्वस्थ मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरीताने तडकाफडकी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

सरीताचे साधारण पंधरा वर्षांनंतर आपल्या माहेरी परतणे जेवढे तिच्यासाठी अनपेक्षीत होते तेवढेच ते तिच्या वृद्ध वडिलांसाठीही अनपेक्षीत होते.सरीताच्या वडिलांनी एक ब्राह्मण होतकरू मुलगा – माधव काही वर्षांपासून भाडेकरू म्हणून आपल्या घरात ठेवला होता. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरही ते खचले नव्हते. आपला दैनंदिन आयुष्यक्रम त्यांनी माधवच्या सोबतीने व्यवस्थित सुरू ठेवला होता.सरीताही त्या दोघांच्या दैनंदिन ,काहीशा स्वस्थ, शांत दिनक्रमात सहभागी झाली. त्यांनीही तिला तसे सामील करून घेतले. त्यामुळे सरीताला हळूहळू आपल्या मनात डोकावून पाहायची ,भूतकाळाचा अर्थ लावायची संधी मिळाली. मुलांची आणि मनोहरची सतत परत घरी बोलावणारी पत्रे येत असूनही सरीताने परत मुंबईत जाण्याचे टाळले.

दुपारच्या वेळी सरीताला तिच्या आईच्या मैत्रिणी भेटायला येऊ लागल्या. सरीताचे डॉक्टर होणे त्यांच्यासाठी कौतुकाची गोष्ट होती. सरीताकडून वैद्यकीय सल्ले त्या घेत होत्या. पण सरीताच्या आईने स्वतःच्या दुराग्रहामुळे शेवटपर्यंत सरीताला दूर ठेवले याची खंतही या शेजारणींच्या बोलावण्यातून सरीताला जाणवत होती.आपले दिसणे,वावरणे,घरातील कामे करणे यामुळे आपली जैविक नाळ आईशी जुळलेली आहे हे सरीताला प्रकर्षाने जाणवले. वृद्ध वडिलांशी बोलताना  आईने तिच्यावर केलेल्या अन्यायाबद्दलचे शल्य सरीताने व्यक्त केले.तेव्हा वडिलांनी ते कधीच ध्रृवच्या अपमृत्यूसाठी तिला जबाबदार धरत नव्हते हे स्पष्ट केले.तसेच आई आता हयात नाही तर ते पूर्वीचे गैरसमज,आकस का कवटाळून ठेवायचे  असेही वडिलांनी सरीताला विचारले.त्यामुळे आपणही आईसारख्या दुराग्रही आहोत का ? असा प्रश्न सरीताला पडला असावा.

दरम्यान सरीताच्या वडिलांच्या घरी रहाणाऱ्या माधवला त्याच्या घरून तार आली की त्याने तातडीने घरी निघून यावे. माधव पहाटेच गावी गेला आणि रात्री उशीरा परत आला. त्याचा धाकटा भाऊ घरातून पळून गेला आहे म्हणून वडिलांनी माधवला बोलावून घेतलेले होते. माधवचे वडीलही विक्षिप्त, मुलांना धाक दाखवून दडपशाही करणारे आहेत. त्याच्या धाकट्या भावाला अभिनयाची आवड असल्याने तो घरून पळाला आहे. माधव घरी जाऊन लगेचच परततो कारण त्याच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला ती गमावायची नाही. आपले हित त्याला कळते.

माधव स्वतःच्या हिताचा निर्णय घेऊ शकतो तर आपण का घेऊ नये असा विचार कदाचित सरीताच्या मनात येऊन गेला असावा. लेखिका त्याबद्दल काही स्पष्टपणे सांगत नाही.‘ द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीच्या कथानकाची अखेर वाचकांना विचारप्रवृत्त करणारी ठरते.विशेषतः सरीता नेमका काय निर्णय अखेरीस घेते हे शशी देशपांडे यांनी उघड केलेले नाही. वाचकांनीच त्याबाबत विचार करून अदमास घ्यावा अशी लेखिकेची इच्छा असावी.

मनोहरने मुंबईला परत घेऊन जायला येतो असे कळवल्याने सरीता भयभीत झाली. पुन्हा एकदा ते रात्रीचे वेदनादायक अत्याचार आपण कसे सहन करणार असा प्रश्न तिला सतावू लागला. आपण मनोहरला सामोरे जाऊ शकत नाही आणि परत त्याच्यासोबत घरी जायला आपल्याला भय वाटते हेदेखील सरीताने वडिलांना सांगितले. त्यामुळे ते व्यथित झाले. पण मनोहरशी ती याबाबत बोलली का असा प्रश्न त्यांनी सरीताला विचारला. न बोलल्यामुळे, संवादाचा पूल तुटल्यामुळेच सगळे गैरसमज होतात असे वडिलांनी सरीताला सांगितले. तरीही मनोहरला सामोरी जायची हिंमत आपल्यात नाही असे सरीताला वाटले.अशावेळी शेजारच्या एका कुटूंबातील बाईला फिट आली आहे आणि तिच्यावर उपचार करायला तुम्ही चला असा निरोप आला आणि सरीता भानावर आली. आपण एक प्रशिक्षित डॉक्टर आहोत याचे भान तिला आले.  कुटूंबातील दुर्लक्षित मुलगी, पतीचे अत्याचार सहन करणारी पत्नी यापेक्षा आपली  ‘लेडी डॉक्टर’ ही ओळख खूप मोठी आहे, शाश्वत आहे हे सरीताला जाणवले.मनोहर घरी येईल तेव्हा त्याला थांबायला सांगा असे वडिलांना सांगून सरीता शेजारच्या बाईवर इलाज करायला निघते.हाच कादंबरीचा शेवट आहे. जणू सरीता अखेरीस एक आत्मनिर्भर, धीट बाई झाली आहे. आता ती रडत, घाबरत,अपराधगंड बाळगत बसणार नाही तर धैर्याने,विवेकाने वास्तवाला सामोरी जाईल असे लेखिकेला सुचवायचे असावे.

सरीतामध्ये हे मानसिक परिवर्तन कसे झाले ?ते होताना सरीताने काय विचार केला असावा ? कदाचित आपली जैविक नाळ आईशी जुळलेली असली तरी आपण आईसारख्या नाही.ती ज्या पारंपरिक, संकुचीत विचारांची होती. इतर स्त्रियांना नवऱ्याकडून वाईट वागणूक मिळत असलेली तिला कळले तर आपली आई त्या बायकांनाच गुन्हेगार ठरवत असे तशा आपण नाही हे तर सरीताला जाणवले असावे. त्यामुळे बुझीशी जवळीक साधून आपण आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली, डॉक्टर म्हणून यश मिळवले याचा जो अपराधीपणा सरीताच्या मनात होता तो दूर झाला असावा. त्याचबरोबर आपले आईपेक्षा असलेले वेगळेपण,आपला मोकळा विवेकी विचार आपल्याला वैद्यकीय शिक्षणाने मिळाला आहे याचे भान सरीताला आले असावे. आपण एक  तज्ज्ञ डॉक्टर आहोत आणि आपल्या ज्ञानामुळे  आपल्याला अनेकांना वेदनेतून मुक्त करता येणे,मरणापासून वाचवणे शक्य आहे.किंबहुना तेच आपले कर्तव्य आहे,तीच आपल्या अस्तित्वाची खरी ओळख आहे हेही सरीताच्या लक्षात आले असावे.त्यामुळे अंधाऱ्या वास्तवाला घाबरून ती आता पळणार नव्हती. अंधारात काही भयकारी नसते हे आपण ध्रुवला समजावायचो पण तो आई-वडिलांच्या अती प्रेमामुळे दुबळा ठरला ,नाहक घाबरल्यानेच तो मृत्यूकडे खेचला गेला हे सरीताला आठवते. आपण असे दुबळे ठरण्याचे कारण नाही, मनोहरची पत्नी,गृहीणी,दोन मुलांची आई एवढीच आपली ओळख नाही तर डॉक्टर हीच आपली खरी ओळख आहे हे सरीताला लक्षात आले असावे. त्यामुळे रोजचे अत्याचार ,वेदना सहन करण्यापेक्षा, मनोहरला आपल्या आयुष्यातून दूर करण्याचा निर्णय तिने मनोमन घेतला असेल,तसे केल्याने आपण असुरक्षीत होणार नाही हे तिला जाणवले असेल. किंवा मनोहरशी संवादाचा पूल जोडून, वैद्यकीय इलाज करून त्याचे वर्तन बदलता येऊ शकेल हे सरीताला जाणवले असेल. अशा प्रकारे, सरीताने नेमका काय विचार केला आणि कोणता निर्णय घेतला हे लेखिका कथानकात संदिग्ध ठेवत असली तरी ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ कादंबरीच्या अखेरीस  मनोहरला सामोरे जायला सरीताच्या मनाची तयारी झाली आहे हे निश्चित.

कादंबरीची कथासूत्रे –

१) सरीताच्या आईच्या निमित्ताने लेखिका पारंपरिक वळणाने विचार करणाऱ्या स्त्रीची प्रवृत्ती दाखवते.या स्त्रिया पारंपरिक पुरूषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे  कैकवेळा आपल्या मुलींवर अन्याय करतात.मुलगा-मुलगी असा भेदभाव करत पक्षपातीपणे वागतात.    एक आई म्हणून या स्त्रिया मुलीला विश्वास,प्रेम देत नाहीत, मुलीवर धाकट्या भावंडांना सांभाळायची जबाबदारी टाकतात.जर ही जबाबदारी मुलीने नीट पार पाडली नाही तर मुलीला गुन्हेगार ठरवत तिच्या मनात अपराधगंड निर्माण करतात. स्वातंत्र्य घेऊ पाहणाऱ्या मुलींच्या मनात या पारंपरिक विचारांच्या माता नाहक भीती घालतात,स्वातंत्र्य घेण्यापासून त्या मुलींना परावृत्त करू पहातात.  जर नवऱ्याकडून, सासरच्या लोकांकडून एखाद्या स्त्रीवर संशय घेतला जात असेल, तिला क्रूर वागणूक मिळत असेल तर ते न्याय्यच आहे असे या पारंपरिक विचारांच्या स्त्रियांना वाटते.एकंदर दूराग्रही स्वभावाने आणि विवेकी विचार करता न आल्याने स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू बनतात असे एक कथासूत्र लेखिका  ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीतून ठळकपणे मांडते.

२) सरीता आणि तिच्या दोन मैत्रिणींच्या निमित्ताने पुन्हा स्त्रियांच्या तीन प्रवृत्ती लेखिकेने दाखवल्या आहेत.स्मितासारख्या आपल्या सावळ्या वर्णामुळे न्यूनगंड बाळगणाऱ्या, आर्थिक स्वातंत्र्य नसलेल्या , नवऱ्यावर सर्वस्वी अवलंबून राहण्यात धन्यता मांडणाऱ्या, पण दुसऱ्यांना गृहीत धरून आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करू पाहणाऱ्या स्त्रिया, नलूसारख्या अविवाहीत राहून,नोकरी करणाऱ्या, आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेल्या, आणि त्यामुळे आलेल्या आत्मविश्वासामुळे आपला दुराग्रह,सत्ता गाजवणाऱ्या स्त्रिया आणि सरीतासारख्या कर्तृत्ववान,महत्वाकांक्षेसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या ,वरवर सुखी पण संसारात दुःखी असलेल्या स्त्रिया.अशा या स्त्रियांच्या तीन प्रवृत्ती ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे एक कथासूत्र बनतात.

३) पुरूषांच्याही वेगवेगळ्या प्रवृत्ती लेखिकेने ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीत दाखवल्या आहेत. सरीताच्या आईच्यासारख्या पारंपरिक विचारांच्या  स्त्रियाच पुरूषप्रधान संस्कृती बळकट करतात असंही लेखिका दाखवताना दिसते.ध्रुवच्या निमित्ताने लेखिका असं सुचवते की स्त्रिया अती प्रेमाने,लाडाने  आपल्या मुलग्यांना दुबळे,घाबरट करून ठेवतात.इतके की कैकवेळा ते मुलगे स्वतःचा बचावही करू शकत नाहीत.आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही तर हे मुलगे निराश  होतात,खचतात.मनोहरच्या निमित्ताने स्त्रियांवर शारीरिक वर्चस्व गाजवणे हाच या पारंपरिक संस्कारातून घडलेल्या मुलग्यांना आपला पुरूषार्थ वाटू लागतो हे लेखिका दाखवते. बायकोच्या कर्तृत्वातून मिळणारी भौतिक सुखे पुरूषांना हवी असतात पण आपली बायको आपल्यापेक्षा वरचढ ठरली,समाजात तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली हे मात्र बरेच पुरूष  मोकळेपणाने स्वीकारू शकत नाहीत.अशा पुरूषांचे बायकोशी वर्तन मग नैसर्गिक न रहाता विकृत होत जाते असे एक कथासूत्र ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ मध्ये पहायला मिळते. सरीताच्या वडिलांच्या निमित्ताने अजिबात महत्त्वाकांक्षी नसणारे, चाकोरीबद्ध जीवन जगण्यात समाधान मानणारे आणि पत्नीच्या स्त्री अपत्याबद्दलच्या पूर्वग्रहांना,पारंपरिक समजांना दूर करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून शांत रहाणारे पुरूष हा एक प्रकारही समाजात दिसतो असे लेखिका दाखवते. पत्नीला विरोध न करता ते हे पुरूष तिच्या हाती सर्व सूत्रे सोपवतात आणि घरातील शांतता टिकवतात पण त्याने कौटुंबिक स्वास्थ्य टिकतेच असे नाही असे ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीतून लेखिका सुचवते. याखेरीज सरीताचे प्राध्यापक बुझी यांच्यानिमित्ताने समाजात वेगवेगळ्या स्त्रियांना मी कसा वश करतो हे दाखवून फुशारकी मारणारे पुरूष ही एक प्रवृत्तीही लेखिका दाखवते.माधवच्या निमित्ताने एक प्रतिकूल परिस्थितीशी लवचिकपणे जुळवून घेणारा ,स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या न टाळताही एक व्यक्ती म्हणून आपल्या प्रगतीचा मार्ग चोखळणारा पुरूष लेखिकेने दाखवला आहे.

४) अखेरीस  अंधार, निराशा स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही वाट्याला येऊ शकते पण या अंधारात चाचपडत रहायचे,अंधाराला घाबरून स्वतःला संपवून टाकायचे की अंधाराचा सामना करून ,संवादाचा पूल बांधत विवेकाने आपले वेगळेपण टिकवायचे हे सर्वस्वी व्यक्तीच्या प्रवृत्तीवर,आकलनावर आणि प्रयत्नावर अवलंबून आहे असे ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीतून लेखिकेला सुचवायचे असावे.

‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे भाषांतर मराठीत उपलब्ध आहे. त्यामुळे जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी ही विनंती.पुढील ब्लॉगमध्ये आपण ‘द डार्क होल्डस नो टेरर्स’ या कादंबरीचे कथनाच्या अंगाने विश्लेषण करू.

                                                                   – गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा