‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही किरण देसाई यांनी लिहिलेली पहिली कादंबरी. जी  १९९८  साली भारतात प्रकाशित झाली.ही कादंबरी लिहिली तेव्हा किरण देसाई केवळ २७ वर्षांच्या होत्या. या कादंबरीसाठी किरण देसाई यांना ‘बेटी ट्रास्क  पारितोषिक’ मिळाले होते. हे पारितोषिक ३५ वर्षाखालील अशा कादंबरीकाराला दिले जाते जो राष्ट्रकुल देशातील असेल आणि ज्याची कादंबरी उत्तम दर्जाची असेल.आजच्या ब्लॉगमध्ये ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण समजून घेऊ.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘ हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ हे  कादंबरीचे शीर्षक वाचकांचे कुतूहल वाढवणारे आहे. ‘हलाबल्लू’ म्हणजे गोंधळ,गडबड,कोलाहल असा अर्थ बहुतेक शब्दकोशांनी दिलेला दिसतो.या शब्दाचं मूळ स्कॉटीश भाषेत असावे. भारतीय समाजव्यवस्थांच्या चौकटींत आणि शासकीय नोकरशाही व्यवस्थांनी निर्माण केलेल्या थंड कारभाराच्या  कोलाहलात व्यक्ती आपले सत्व आणि स्वत्व म्हणजे आपली शुद्धता, नैसर्गिकता, आपली ओळख  हरवून बसतो आणि त्यामुळे असमाधानी होतो असे तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करणारी किरण देसाई यांची ही कादंबरी आहे असे म्हणता येईल.

‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही किरण देसाई लिखीत कादंबरी भारतातील पंजाब प्रांतातील एका सत्य घटनेवर आधारीत असली तरी तिचा हेतू संपूर्ण वास्तव कथा सांगण्याचा नसून एक  कल्पनारंजीत कथा सांगण्याचा आहे.ही कादंबरी म्हटलं तर विनोदी आहे. या कादंबरीची  रचना जणू रंगीबेरंगी पत्त्यांच्यासारख्या गतीमान घटनांच्या खेळाचीच आहे असेही वाचकांना वाटेल.हिंदी मेलोड्रामॅटिक विनोदी चित्रपटाची आठवणही कदाचित ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही कादंबरी वाचताना काहींना येईल.

‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे कथानक तृतीय पुरूषी कथनातून वाचकांसमोर साकारते. कथानक बऱ्याच अंशी सरळरेषीय आहे म्हणजे ते क्वचितच काही व्यक्तिरेखांच्या भूतकाळात जाते. शहाकोट या गावी हे कथानक घडले आहे.म्हणजे कथानकाचा अवकाश छोटासाच आहे.कथानकाचा प्रत्यक्ष काळही केवळ काही महिन्यांचा आहे.

कथानकाच्या प्रारंभी कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा संपत चावलाचा जन्म कसा झाला ते एखाद्या पुराणकथेतील महानायकाच्या जन्माच्या प्रसंगासारखे कथन केले जाते. अर्थात हे कथन उपरोधिक आहे. महानायक जसे वादळी रात्री जन्म घेतात तसाच संपतही जन्म घेतो.पण संपत हा काही महानायक नाही तर तो आजच्या काळातला न-नायक (Antihero) आहे.ते वर्ष भयानक दुष्काळाचे असते पण संपत जन्माला येतो तो पाऊस घेऊनच. आणि दुष्काळी भागात हेलिकॉप्टरने अन्नाची पाकिटे टाकली जातात तीही नेमकी त्या दिवशी संपतच्या घरावरच पडतात ! त्यामुळे अर्थातच चावलांच्या घरात आणि वस्तीत संपतचा जन्म दैवी ठरतो !

संपतची आई कुल्फी ही सर्वसामान्य बायकांसारखी गृहकृत्यदक्ष वगैरे चौकटीत बसणारी नाही. ती संपतच्या जन्माआधी म्हणजे गरोदर असताना आपले मोठ्ठे पोट घेऊन गावभर,रानभर हिंडत असते. दुष्काळाच्या त्या दिवसांतही तिला धान्याने भरलेल्या शेतांची, उत्तमोत्तम अन्नपदार्थांची स्वप्ने पडतात,ती खडू घेऊन घरातील भिंतीवर ही चित्रे रंगवत रहाते.तिचे माहेर श्रीमंत आहे. पण त्या कुटूंबात अनुवंशिकतेने काहीशी विक्षिप्त माणसे जन्मल्याचा इतिहास आहे. कुल्फीमध्ये ती विक्षिप्तपणाची झाक आहे,ती स्वप्नाळू आहे असे जाणवताच तिच्या वडिलांनी तातडीने तिचे लग्न त्यांच्यापेक्षा कमी स्तरातील गरीब अशा चावला कुटूंबातील मुलाशी लावून दिले आहे. भरपूर हुंडा देऊन कुल्फी चावला कुटूंबात आली आहे. तिच्या सासरी नवरा आणि सासू असे दोघेच आहेत आणि सासूने आपली सून इतर चारचौघींसारखी गृहकृत्यदक्ष नाही हे लक्षात आले तरी ते स्वीकारले आहे.उलट सून नियमीतपणे स्वयंपाक करणार नसेल तर आपलीच सत्ता स्वयंपाकघरात राहील याचा आनंदच कुल्फीच्या सासूला झाला आहे.कुल्फी तिच्या मनात येईल तेव्हा स्वयंपाक करते. तिने बनवलेले पदार्थ अगदी वेगळे,तिच्या कल्पनेतून साकारलेले असतात. भलत्याच भाज्या, डाळी, भलतेच मसाले आणि शिजवण्याच्या,तळण्याच्या भन्नाट पद्धती वापरून ती ते पदार्थ बनवते. त्यामुळे अगदी वेगळी चव व गंध या पदार्थांना असतो ! ते सगळ्यांना आवडोत की न आवडोत  कुल्फीला त्याबद्दल ना खंत ना खेद ! रात्री-बेरात्री उठून कुल्फी घरातील कुठल्याही गोष्टी,मसाल्याचे पदार्थ काहीही खात रहाते आणि अशा या सर्वसामान्य नसणाऱ्या कुल्फीला पहिला मुलगा होतो. तो पाऊस आणि अन्न पाकिटे घेऊन आला,संपन्नता घेऊन आला म्हणून त्याचे नाव ‘संपत’ ठेवले जाते.संपतनंतर कुल्फीला एक मुलगी होते तिचे नाव ठेवले जाते पिंकी.

संपत चावलाचे वडील मिस्टर आर.के. चावला (बी.ए.पास) हे गावातल्या सहकारी बॅंकेत कारकून आहेत.घरातील  आणि घराबाहेरची सगळी कामे करणारा एक कर्तबगार कुटूंबप्रमुख ही आपली प्रतिमा मिस्टर आर.के.चावला यांना फार आवडते.आपली घरातील प्रत्येकाने सेवा केली पाहिजे,आपला अहंकार सुखावला पाहिजे असे सर्वच कुटूंबप्रमुखांप्रमाणे त्यांनाही वाटते.आपल्या मुलानेही आपल्यासारखीच नोकरी करावी,चार पैसे मिळवावेत आणि चाकोरीबद्ध,विशिष्ट पठडीतले आयुष्य जगावे असे त्यांना वाटते. पण संपत अभ्यासात हुशार नाही,त्याला कोणत्याच विषयात गती नाही. एकूणच त्याला अभ्यास करण्यासाठीची शिस्त नकोशी वाटते. त्याचे लक्ष एकाग्र होऊ शकत नाही.खरं तर संपतकडे चांगली निरीक्षणशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे पण आपल्या शिक्षणव्यवस्थेत या गुणांना किंमत मिळत नाही. सगळे शिक्षण म्हणजे घोकंपट्टी आहे. संपत कसाबसा ते कंटाळवाणे शालेय शिक्षण पूर्ण करतो आणि मिस्टर चावला खटपट करून त्याला गावातील पोस्ट ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवून टाकतात.आपला मुलगा सरकारी नोकरीत रूजू झाल्याने त्यांना कृतकृत्य वाटते.

संपत एकूणच आपल्या कुटूंबात, छोट्याशा घरात खूश नाही. रात्री सगळे जण वेगवेगळ्या सूरात घोरत असतात, पंख्याचा वारा लागत नाही आणि अशा वातावरणात संपतचा श्वास घुसमटतो. तो अर्ध्या रात्री उठून घराच्या गच्चीवर फेऱ्या घालत आपल्या आयुष्यात कोणी कुचबिहारी  तरूणी येईल याचे कल्पनारंजन करत,गाणी म्हणत रहातो.वडिलांची योगासने, झाडांना पाणी घालणे, शिस्तीत आंघोळ करून त्यांच्या कार्यालयात जाणे,सगळ्यांना कामाला लावून घरात सकाळीच एक कोलाहल (हलाबल्लू) निर्माण करणे हे सगळेच संपतला फार कंटाळवाणे वाटते. पण वडिलांनी त्यालाही त्याच चक्रात बांधले आहे.संपत कसाबसा आपली दैनंदिन कामे आटोपून आडरस्त्याने सायकल चालवत पोस्ट ऑफिसात पोहचतो. गावातले चिंचोळे रस्ते,साचलेली पाण्याची थारोळी, मध्येच लागणारी गंजलेल्या तारांची कुंपणे हे सगळेच संपतला कुरूप वाटते.

संपतच्या कार्यालयात एक पोस्टमास्टर आहेत आणि संपतच्यासारखे आणखी दोन कारकून आहेत. त्यातील एक गुप्ताजी हे मध्यमवयीन,संसारी गृहस्थ आहेत तर दुसरी ज्योत्स्ना ही प्रौढ कुमारी आहे.संपतचे वैशिष्ट्य म्हणजे तो जास्त बोलत नाही पण या दोघा सहकाऱ्यांचे बारकाईने निरीक्षण करत रहातो.एकमेकांच्या खुर्चीवर पाय ठेवून हे सहकारी आरामात बसले आहेत.मार्केटमधून येताना एका माकडाने आदल्या दिवशी संध्याकाळी आपली सलवार कशी खेचली आणि हातातील शेंगदाण्याची पुडी कशी पळवली याबद्दल ज्योत्स्ना सांगते आहे.संपतला ते माहीत आहे कारण त्याच्या बहिणीने पिंकीने मार्केटमध्ये येणाऱ्या माकडाबद्दल घरी सांगितले आहे.ज्योत्स्ना आपल्याला टेलरकडे जाऊन कशी नवी सलवार शिवून घ्यावी लागली आणि टेलर कसे चुकीची मापे घेतात त्यामुळे सलवार कधी खूप ढगळ तरी होते वा खूप घट्ट तरी होते याचे वर्णन करते आहे. आपले कपडे अद्ययावत असावेत,त्यात आपण तरूण दिसावे असे ज्योत्स्नाला वाटते आहे. आपल्याला रस्त्यातील तरूणांनी ‘आंटी’ म्हटलेलं तिला आवडणार नाही आहे.टेलरने सलवार नीट शिवून दिलेली नाही म्हणून ज्योत्स्ना आज कार्यालयात साडी नेसून आली आहे.पण साडीखालील परकर टेलरने नीट शिवलेला नाही असे तिला वाटते आहे.कोणतीही भीडभाड न बाळगता ती,परकराची शिवण कशी वाईट आहे हे साडी वर खेचून दाखवते. संपत ते पाहून अवाक होतो.गुप्ताजी बिनधास्तपणे डोळे मिचकावत साडीचा हिरवा  रंग तुला खुलून दिसत नाही याबद्दल ज्योत्स्नाला अनाहूत सल्ला देतात.ज्योत्स्नाही हसत हसत त्यांना, “माझ्या लग्नात तुम्ही फॅशन सल्लागार व्हा” असे गुप्ताजींना सांगते आणि हातातील फुटपट्टी त्यांच्या पोटात खुपसते. हे सगळे संपत पहातो.ज्योत्स्नाच्या दातांचा पांढराशुभ्र रंग आपल्या कार्यालयातील पिवळट,कळकट रंगात जास्तच उठून दिसतो असे संपतला वाटते.

पोस्टमास्तर येऊन सगळ्यांना कामाला लागण्याची आज्ञा करतात.काही दिवसांनी त्यांच्या मुलीचे लग्न आहे आणि त्या सोहळ्याची तयारी करण्यासाठी पोस्टातले त्यांचे हे तीन सहकारी त्यांना हक्काचे मदतनीस म्हणून हवे आहेत असेही ते सांगतात.ज्योत्स्ना आणि गुप्ताजी यांना त्यात काही गैर वाटत नाही पण संपतला मात्र आपल्या साहेबांच्या मुलीच्या लग्नात आपल्याला नोकरासारखे काम करावे लागणार आहे ही कल्पना कंटाळवाणी वाटते. पण तेवढ्यात त्याला सकाळीच वडिलांनी ‘साहेबांना कधी नाही म्हणू नये’ हा सल्ला दिल्याचे आठवते आणि तो मुकाट्याने होकार देत मान डोलावतो.साहेब त्याला सुनावतात की माझे तुझ्यावर लक्ष असेल कोणतेही गैरवर्तन करू नकोस.पोस्ट मास्टर साहेब गेल्यावर दिल्लीहून आलेल्या पत्रांचा गठ्ठा संपत घेऊन बसतो. खरं तर त्याला ती पत्रे त्यावरील पत्त्यांनुसार वेगवेगळ्या विभागाची एकत्र करून ठेवायची आहेत. पण ते करण्याआधी त्याचे कुतूहल त्याला गप्प बसू देत नाही. तो पत्रे हळूहळू उघडतो,वाचतो आणि परत चिकटवून टाकतो.असे त्याने याआधीही बरेचदा वेळ घालवायला केले आहे.गावातील अनेक लोकांची गुह्य रहस्ये आता त्याला कळली आहेत. हे सगळे उद्योग करता करता संध्याकाळ होते. घरी जाण्याची वेळ येते. तेव्हा पत्रे विभागानुसार वेगळी करण्याचे काम उद्या सकाळी लौकर येऊन करू असे मनाशी ठरवून संपत घरी जायला निघतो. घराच्या वाटेवर त्याच्या मनात त्याने पाहिलेल्या एका पोस्टकार्डवरचे मोठ्ठ्या माकडाचे चित्रच रेंगाळत असते.

काही महिन्यांनी पोस्ट मास्टरांच्या मुलीच्या लग्नाचा दिवस उजाडतो.ज्योत्स्ना आणि गुप्ताजी उत्साहाने लग्नघरी जाऊन तयारीला लागतात.संपतला सरबताचे ग्लास भरून द्यायचे आणि ते रिकामे झाल्यावर धुवून ठेवायचे काम दिलेले असते. ते थोडावेळ केल्यावर संपतला फार कंटाळा येतो. तो स्वयंपाक्यांनी बनवलेले पदार्थ कुत्र्यांना खाऊ घालू लागतो.स्वयंपाकघरामागे कुत्री जमा होऊ लागतात तेव्हा स्वयंपाकी संपतला दम देतात.मग संपत त्यांना गुंगारा देऊन पोस्ट मास्टरांच्या घरात शिरून एकेक खोली पाहू लागतो. काही खोल्या त्याला रूक्ष वाटतात पण अगदी शेवटच्या खोलीत त्याला बायकांच्या रेशमी साड्या, दागदागिने उघडेच पडलेले दिसतात. संपत खोलीचा दरवाजा बंद करून त्या साड्या आपल्याभोवती गुंडाळून पाहतो. काही दागिने घालून स्वतःची छबी आरशात न्याहाळतो.गुलाबपाणी स्वतःवर शिंपडून पाहतो.खोलीत अंधार असल्याने संपत तिथली मेणबत्ती पेटवतो आणि आपण शाळेत असताना रात्री मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचो ते आठवून गुंग होऊन जातो.त्यावेळी मेणबत्तीचे गळलेल्या मेणाचे आपण कसे गोळे करून ठेवायचो ते त्याला आठवते.रात्रभर जागूनही परीक्षेत काही आठवायचे नाही हेही आठवते.दागिन्यांमधील नथ उचलून तो आपल्या नाकात घालतो. आता बाहेरून येणारा बिर्याणीचा सुगंध त्याला मोहून टाकतो आणि संपत साडी गुंडाळूनच बाहेर येतो. कोणाचे त्याच्याकडे लक्ष जात नाही तेव्हा तो कारंज्याच्या हौदात उडी मारून बायकांवर पाणी उडवतो. “मला केळीच्या बनात भेटा,तुमची हृदये जिंकतो” असे म्हणत बाहेर पडतो.आता त्याला वाटते की सिनेमातील नटीप्रमाणे आपले एकेक कपडे आपण काढावेत ! तो साडी सोडतो आणि हळूहळू शर्टाची बटणे काढू लागतो आणि शर्ट एखाद्या हिरोसारखे स्टाईलमध्ये तो दूर भिरकावतो.लोक ओरडू लागतात तेव्हा तो कारंज्यावर चढतो आणि आपली पॅन्ट काढतो ! अर्थात त्याची पाठ गर्दीकडे आहे ! कादंबरीत हा सगळा प्रसंग तपशीलवार रंगवलेला आहे पण हे खरे की संपतचे स्वप्न ते मात्र स्पष्ट केलेले नाही.न-नायक असणाऱ्या संपतने नायक बनण्याचा केलेला प्रयत्न अर्थातच त्याला महागात पडतो.

दुसऱ्या दिवशी संपतला त्याचे कुटूंबीय नोकरी गेल्याबद्दल ओरडत असतात.वडील दुसरी नोकरी बघ म्हणून दम देत असतात. आजी ओल्या कपड्यांना निळा रंग कसा लागला, ओल्या कपड्यांमुळे सर्दी होईल असे म्हणत असते.गुप्ताजी आणि ज्योत्स्ना संपतची नोकरी गेल्यामुळे त्याचे सांत्वन करायला आलेले असतात.संपतला वाटते या सर्वांना शांत बसवावे आणि  ओरडून यांना सांगावे की ‘मी काहीही केलेले नाही’.पण ते बडबडत रहातात आणि संपत घराच्या गच्चीवर निघून जातो.आपल्या या परिस्थितीला आपले घरचे वातावरणच कारण आहे असे त्याला वाटते. गणिताच्या शिक्षकांनी त्याला गणित न आल्याने मारलेले टोमणे त्याला आठवतात.त्याला खरं तर आता कोणतीच नोकरी करायची इच्छा नसते. एक फक्त स्वतःसाठीचे शांत अवकाश त्याला हवे असते.त्याला खालच्या खिडकीतून त्याची आई बाहेर डोकावून गंध घेत ‘फणसss’ असे म्हणताना दिसते. शेजारच्या घरातले आपल्या मुलाशी कौतुकाने खेळताना दिसतात, कोणाच्या घरातील कुकरची शिट्टी ऐकू येते. पण आपल्याला कधीच गणिते सुटत नसत तेही आठवत रहाते.थोड्या वेळाने त्याची आई कुल्फी त्याच्यासाठी एक पेरू घेऊन गच्चीवर येते. आपल्या मुलाची परिस्थिती पाहून तिला वाईट वाटत असते.संपतला वाटते की आपण तो पेरू त्यातील चवीष्ट रस आणि गरासह शोषून घ्यावा.तो पेरू हातात घेतो आणि हळूहळू त्याला वाटते की पेरू मोठा होत चालला आहे.अचानक तो पेरू स्फोट होऊन फुटतो,त्यातील बिया गोळ्यांसारख्या इतस्ततः उडतात आणि संपतला वाटते की आपणच पेरूचा गर आणि रस झालो आहोत. आपल्या शरीरातून रक्ताऐवजी पेरूचा रसच वहातो आहे ! त्याला एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.तेवढ्यात त्याची आई कुल्फी त्याला विचारू लागते की, “ पेरू चांगला नव्हता का? मी फळवाल्याला सांगेन.आता तुला पेरूऐवजी अंडे देऊ का ?” संपतला दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे एस.टी. बसच्या कार्यालयात जाऊन नोकरीसाठी  मुलाखत द्यायची नसते. तो मनात म्हणतो “मला अंड नको,मला माझे स्वातंत्र्य हवे आहे.”(पेरू आणि अंडे हे शब्द कादंबरीचा शेवट समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा)

त्याच दिवशी दुपारी संपतचे कुटूंबीय त्याला एकट्याला घरी ठेवून कोणा नातेवाईकाच्या घरी लग्नाला जातात आणि ते गेल्यावर संपत तडक घराबाहेर पडून मिळेल ती एस.टी. पकडतो.ती बस सकाळी शहाकोटमध्ये दूध पोहचवायला आलेल्या दुधवाल्यांना त्यांच्या खेड्यांकडे घेऊन निघालेली असते. दुधाच्या मोठमोठ्या रिकाम्या हंड्यासह बसलेली एक म्हातारी दुधवाली बाई संपतची चौकशी करू लागते.  इथेही शांती नाही असे वाटून संपत, बस मध्येच थांबली असताना खाली उतरून माळरानावरून पळू लागतो. पळत पळत तो एका पेरूच्या बागेत शिरतो.एकेकाळी ती जमीन न्यायाधीशांची असते पण आता ती राखीव जंगलाच्या हद्दीत आलेली असते.संपत धावत धावत बागेत शिरतो आणि बागेच्या अगदी टोकाला त्याला चांगले उंच पेरूचे झाड दिसते.संपत त्यावर चढून बसतो.दोन फांद्यांच्या बेचक्यात तो स्वतःसाठी जागा तयार करतो.पेरूच्या झाडाच्या गुळगुळीत फांद्यांचा स्पर्श, त्यावरून सरकणारे किटक,पक्षी,माकडे सगळे त्याला विलक्षण शांततेचा,आपलेपणाचा प्रत्यय देतात.

चावला कुटूंबीय घरी येतात तेव्हा संपत घरी नसल्याने त्यांना धक्का बसतो.ते पोलिसात तक्रार नोंदवतात. गावातच त्याचा शोध घेऊनही तो सापडत नाही तेव्हा सगळेच भयभीत होतात.दुसऱ्या दिवशी आसपासच्या मंडळींनी काळजी दाखवायला घरी येणे वगैरे सगळे नाटकी प्रकार होतात पण संपत गायब कुठे झाला ते कळत नाही. नंतरच्या दिवशी गावाबाहेरील विद्यापीठाच्या परिसराचा सुरक्षा रक्षक दही घ्यायला शहाकोट गावात येतो तेव्हा तो बातमी आणतो की त्याने गावाबाहेरच्या माळरानावरील पेरूच्या बागेत कोणाला तरी झाडावर चढताना पाहिले आहे आणि तो माणूस बागेतून बाहेर आलेला नाही.ही बातमी चावला कुटूंबाकडे पोहचते.सगळे कुटूंब मिळेल ती एस.टी. पकडून आरडाओरडा करत गावाबाहेरच्या पेरूबागेत पोहचतात आणि तिथे अगदी आतल्या झाडावर त्यांना संपत मजेत पेरू खात बसलेला दिसतो. ‘तुम्ही इथे कशाला आलात’ किंवा ‘काही माणसांना सर्वांपासून दूर शांतपणे झाडावर बसू रहावेसे वाटते’, ‘माझे हात तोडलेत तरी मी घरी येणार नाही’ असं काहीतरी आपल्या कुटूंबाला सांगावेसे संपतला वाटते. पण तो काहीच बोलू शकत नाही.

मिस्टर चावला संपतला खाली उतरण्याची आज्ञा करतात.संपत ढिम्म हलत नाही. पिंकी म्हणते की तुझ्या अशा झाडावर चढून बसण्याने आम्हाला शरमेने समाजात तोंड दाखवणं कठीण होईल, आजी म्हणते की काही न खाता-पिता तू किती सुकून गेला आहेस.पण संपतची आई कुल्फी तिच्या भूतकाळात शिरते आणि आपल्यालाही असेच सगळ्यांपासून दूर रानोमाळ भटकत रहावेसे वाटे हे तिला आठवते. संपत आपल्याला जे करता आले नाही ते करतोय म्हणून ती खूश होते आणि संपतला ‘तिथेच राहूदे’असे म्हणते. अर्थातच मिस्टर चावला तिच्यावर भडकतात ! “फक्त माकडं झाडावर चढून बसतात आणि तू कसली आई आहेस जी मुलाला झाडावरच बस म्हणते आहेस” असं म्हणत, मिस्टर चावला संपतला झाडावरून खाली उतरवण्यासाठी योजना मनोमन आखू लागतात.माकडं झाडावर बसू शकतात, किटक झाडांवर रांगू शकतात, पक्षी तर झाडावर घरटी करून अंडी घालू शकतात आणि आपल्या पिलांना मोठेही करू शकतात फक्त माणसांनी झाडांवर चढून त्याचा आश्रय घेणे विचित्र ठरते असे का .. हा प्रश्न कथक वाचकांना विचारतो.

मिस्टर चावला शहाकोटमधून डॉ.बॅनर्जींना पेरूबागेत बोलवतात.ते संपतला खाली बोलावतात. पण तो येत नाही कारण डॉक्टर आपल्याला वेड्याच्या इस्पितळात टाकतील याची भीती त्याला वाटते. शेवटी चावला कुटूंब डॉक्टर बॅनर्जींनाच झाडावर चढवते. तेही संपतची सगळी तपासणी करून खाली उतरतात आणि त्याला काही झालेले नाही पण तो वेडा आहे आणि फक्त देवच त्याचं भलं करू शकेल असे म्हणंत गावात निघून जातात. मग चावला तिबेटीयन लामा, होमियोपाथिक डॉक्टरांकडे जातात,आयुर्वेदिक वैद्य गाठतात ,मेंदुतज्ज्ञाला भेटायला शहरात जातात पण कोणीही संपतसाठी असरदार औषधोपचार करू शकत नाही.शेवटी चावलाजी एका साधूकडे जाऊन संपतची सगळी लक्षणे त्यांना सांगतात.संपत वेडा नाही त्याचे लग्न लावून दिले तर तो बरा होईल असे साधू सुचवतात.मग संपतच्या लग्नासाठी मुलगी शोधणे सुरू होते. गोरी गोमटी,हुंडा देणारी मुलगी संपतला कशी मिळणार ..त्यामुळे एक गरीब, सावळी,कुरूप मुलगी तेवढी संपतसाठी मिळू शकते. तिला घेऊन वाजत गाजत तिचे नातवाईक येतात पण संपत खालीच आला नाही तर लग्न होणार कसे ?त्यामुळे त्या मुलीलाच झाडावर चढायला सांगितले जाते.ती कशीबशी आपली भरजरी साडी नेसून झाडावर चढते पण पुढे काय करायचे हे तिला कळत नाही . खालून सूचना येतात की संपतच्या पायाला हात लाव .ती आपली थंडगार बोटे संपतच्या पावलांना लावते.त्या थंड स्पर्शाने संपत घाबरून तिथल्या तिथेच उडी मारतो. ते बघून मुलगी झाडावरून धपकन खाली पडते आणि  मुळूमुळू रडू लागते.पिंकी तिला रडताना पाहून वैतागून चिमटा काढते आणि ती आणखीनच जोरात रडू लागते ! हा सगळा प्रसंग लेखिकेने ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या कथानकात विनोदी पद्धतीने रंगवला आहे.अर्थातच मिस्टर चावला हतबलपणे डोक्याला हात लावून ‘या मुलाचे आता करू तरी काय’ असे म्हणत त्रागा करतात.

 संपतला वाटते की सगळ्यांना सांगावे इथून निघून जा, मी झाडावरच सुखी आहे. पण वडिलांकडे पाहून त्याला सहानुभूती वाटते. त्यांनी आपल्याला सुधारण्यासाठी लहानपणापासून केलेला त्रागा त्याला आठवतो.आपल्याला कधीच माणसांमध्ये सहजपणे वावरता का आले नाही ? असा प्रश्न संपतला पडतो.तो अस्वस्थपणे सभोवती पाहू लागतो. तेव्हा अचानक खाली गर्दीत त्याला शहाकोटमधील त्यांचे शेजारी सिंग उभे दिसतात. त्याला आठवते की पोस्टात वेळ जात नाही म्हणून कधीतरी सिंग यांचे पत्र त्याने उघडून वाचलेले असते.त्यातील गोष्ट आठवून तो सिंग यांना हाक मारून विचारतो की त्यांचे सोने-नाणे अजून तुळशीखाली सुऱक्षितपणे पुरलेले आहे ना ? सिंग थक्क झालेले त्याला दिसते. तेवढ्यात मिसेस चोपडा बाई त्याला दिसतात नी त्यांच्या पत्रातील मजकूर आठवून संपत झाडावरूनच त्यांना विचारतो की घाबरून त्यांच्या श्वासनलिकेत अजूनही श्वास अडकतो का ? स्वाभाविकच मिसेस चोपडाही चपापतात !  एवढ्यात गर्दीत एक टक्कलवाला संपतला दिसतो नी त्याला आठवते की हा माणूस गावातल्या एका गल्लीतून कोणतेतरी जडीबुटीवाले तेल विकत घेताना आपण पाहिले होते. संपत त्याला सल्ला देतो की जडीबुटीचे तेल काही लागू पडलेले नाही तर राईचे तेल वापरून रोज मसाज करा आणि चमत्कार पहा ! संपतच्या या अशा बोलण्याचा व्हायचा तो परिणाम खाली जमलेल्या गर्दीवर होतो. सर्वांना संपतकडे काहीतरी दैवी शक्ती आहे असे वाटू लागते आणि पहाता पहाता संपतचा संपतबाबा, मंकीबाबा होतो !

संपतला लोक दैवी शक्ती असलेला मानू लागले आहेत हे पहाताच मिस्टर चावलांच्या डोक्यात आपल्या मुलाचा उपयोग करून अधिकाधिक पैसा कसा मिळवावा ही गणिते जुळवली जाऊ लागतात. आधी ते संपतसाठी झाडावर खाट चढवतात, त्याला खालून वर पुलीने चहा, नाश्ता,जेवण सगळे  पुरवले जाऊ लागते. कुल्फी आपल्या मुलासाठी नवनव्या चवीचे,गंधाचे पदार्थ झाडाखाली चुलीवर बनवू लागते. संपतची आजी तर येणाऱ्या भक्तगणांसाठी चहाचा ठेलाच सुरू करते.संपतच्या कार्यालयातील प्रौढ कुमारीका सहकारी ज्योत्स्ना अतिशय भाविकपणे संपतच्या पाया पडते. तिच्याकडून गावभर संपतच्या थोरपणाबद्दल लोकांमध्ये बातमी पसरते.संपतचा फोटो असलेली पोस्टर्स सर्वदूर पाठवणे, वर्तमानपत्रात त्याची माहिती देणे हे सगळे पटपट घडू लागते. संपतला भक्तीभावाने दिल्या जाणाऱ्या पैशांसाठी स्वतंत्र बॅंक खाते त्यांनी उघडले जाते!  आपापल्या समस्या घेऊन काही उपाय मिळेल या आशेने येणाऱ्या लोकांना संपत मनाला येईल ती सुभाषितासारखी वाक्ये ऐकवू लागतो. त्यालाही त्यात मजा वाटू लागते. आजवर चोरून वाचलेली पत्रे, चौकातल्या लोकांच्या गप्पांमधून ऐकलेली चमकदार वाक्ये, केलेली निरीक्षणे आणि चांगली कल्पनाशक्ती सगळ्याचा फायदा संपतला करता येऊ लागतो.आपल्याला मिळालेली पेरूबाबा,झाडावरचा बाबा,मंकी बाबा ही ओळख संपतला हवीशी वाटू लागते.संपतच्या दैवीपणाबद्दल, त्याच्या अध्यात्मिक ज्ञानाबद्दल शंका घेणारा एक नास्तिकवादी गट आहे. ते संपतचे रहस्य आणि खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी एक माणूस कायमचा संपतच्या पाळतीवर ठेवतात.हा माणूस संपतची सुभाषिते, आलंकारीक वचने ऐकून तसेच बोलू लागतो !शेवटी तर तो संपतला जे वेगवेगळे खाद्यपदार्थ कुल्फी बनवून देते त्यातच काहीतरी मादक पदार्थ असावेत ज्यामुळे संपत दैवी बाबासारखा बोलतो अशी शंका घेतो.संपतचे पोस्टऑफिसमधील एक सहकारी गुप्ताजी यांनाही संपतच्या दैवी गुणांबद्दल शंका व मत्सर वाटतो.तेही संपतचे बिंग उघडे पडावे म्हणून संधी शोधू लागतात.

संपतची बहीण पिंकी हिचे एक उपकथानक ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीत आहे. पिंकी तारूण्यात पदार्पण करणारी मुलगी आहे. रोज नवनवे कपडे घालून बाजारात फेरफटका मारायला तिला आवडते. कोणीतरी आपला पाठलाग करत होते असा गोड गैरसमज ती करून घेते. संपतमुळे पेरूबागेत रहायला आल्यावर बाजारातून काही ना काही गोष्टी आणायला पिंकीला निमित्तच मिळते. पण मुलीवर बारीक नजर असलेले चावलाजी आपल्या आईलाही पिंकीबरोबर बाजारात पाठवतात.एकदा पिंकी आणि आजी बाजारातील थिएटरमध्ये सिनेमा पाहून बाहेर गाडीवरचे आईसक्रीम खात असताना एक माकड पिंकीवर हल्ला करते आणि तिच्या हातातले आईसक्रीम घेऊन जाते. त्यावेळी घाबरून गेलेल्या पिंकीला आईसक्रीमची गाडी चालवणारा मुलगा आधार देतो. आणि पिंकीच्या मनात प्रेमाचा गुलाब फुलतो.प्रेमात पुढे कसे जायचे हे माहीत नसल्याने पिंकी संपतला त्याबद्दल विचारते आणि संपत तिला सूचकपणे कृतीशील होण्याचा सल्ला देतो ! पिंकी धीट होते आणि आईसक्रीम विकणाऱ्या मुलाला एके सकाळी गाठून त्याच्या कानाचा चावाच घेते ! पिंकीच्या प्रेमाच्या या रौद्र रूपामुळे तो मुलगा भांबावून जातो, त्याच्या कानाच्या पाळीचा तुकडाच पडतो !त्याला घरातच कोंडून घ्यावे लाते. पण पिंकी त्यातूनही मार्ग काढते आणि तो बाथरूममध्ये असताना खिडकीतून त्याला चिठ्ठी,गुलाब देते.त्याच्या घरचे त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवतात पण पिंकी त्याच्या मनात आपण पळून जाऊ अशी कल्पना भरवते.

इथे पाऊस जवळ येत असतो आणि आता संपतचे काय होणार हा प्रश्न मिस्टर चावलांना सतावत असतो. संपतला झाडावरून खाली उतरवून एक देऊळ बांधून त्यात बसवावे असे त्यांना वाटते पण संपतला ते अजिबात मान्य होत नाही. हळूहळू आपण लोकांना अधिक काही सांगू शकणार नाही आणि आपला ‘मंकीबाबा’हा अवतार संपवावा लागणार हेही संपतला जाणवते.तसेच आपल्याला हवी ती शांतता आपण गमावून बसलो आहोत हेही त्याला त्रासदायक वाटू लागते.त्याच सुमारास पेरूबागेतील माकडांचा हैदोस वाढू लागतो.माकडे अशीच येणाऱ्या संपतच्या भक्तांना त्रास देऊ लागली तर हळूहळू माणसांचा ओघ आटेल आणि आपला उत्पन्नाचा ओघही बंद होईल याची भीती चावलाजींना वाटते. माकडांचा नायनाट करावा यासाठी ते सरकार दरबारी अर्ज, तक्रारी करतात.त्यामुळे वनखाते, पोलीस खाते, लष्कर अशा सगळ्याच व्यवस्था एकदमच माकडांना पेरूबागेतून कसे हटवावे या गहन प्रश्नावर उपाय शोधू लागतात. त्यात माकड म्हणजे हनुमानाचे वंशज त्यामुळे त्यांना पकडणे म्हणजे पाप असे म्हणणाऱ्या संस्कृतीरक्षकांचा एक विरोधी गटही आहे ! या सर्व व्यवस्थांतील लोकांनी शोधलेले  भन्नाट उपाय, केलेल्या विनोदी चर्चा हा ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचा महत्त्वाचा भाग आहे.

अखेरीस माकडांना प्रचंड मोठ्या जाळ्यांमध्ये पकडावे आणि खोल जंगलात नेऊन सोडावे अशी योजना लष्कर चावलाजींच्या सल्ल्याने ठरवते. एका पहाटे ही योजना पार पडणार असते. त्यावेळी थोडावेळ संपतला झाडावरून खाली उतरावे लागणार असते. ते कळल्यावर संपत प्रचंड अस्वस्थ होतो. त्याला झाडावरून खाली उतरण्याची इच्छा नसते आणि त्याहीपेक्षा आजवर जी माकडे त्याची मित्र बनलेली असतात, आपल्या माकडचाळ्यांनी त्याचे मनोरंजन करत असतात त्यांना पकडून जंगलात नेणार हे त्याला असह्य वाटत असते.

पिंकी आईसक्रीमवाल्याबरोबर पळून जाण्यासाठी तोच दिवस व वेळ ठरवते की जेव्हा माकडांना लष्कर पकडणार असते.एखाद्या विनोदी हिंदी चित्रपटातल्याप्रमाणे सगळे दृष्य कथानकात लेखिकेने रंगवले आहे. संस्कृतीरक्षक गटाने मुद्दामच रस्त्यावर टाकलेले अडथळे, पिंकीला पळवून न्यायला येणाऱ्या आईसक्रीमवाल्या मुलाची द्विधा अवस्था, त्याची गाडी लष्कराच्या गाडीच्या वाटेत आल्याने लष्कराने त्यालाच जाळ्यात पकडून ठेवणे  असे तुफान विनोदी प्रसंग कथानकात लेखिकेने रंगवले आहेत.

पेरूबागेतला ‘हलाबल्लू’ किंवा कोलाहल शेवटी थांबतो कारण माकडे पकडण्यासाठीचे जाळे आईसक्रीमवाल्या मुलाला पकडण्यासाठी वापरले गेले आहे ! माकडेही शांत गंभीर होतात.  संपतला आपल्यासारखे माकड व्हावेसे वाटते आहे हे जणू त्यांना उमगते. ते संपतचे रूपांतर पेरूत करतात आणि काळजीपूर्वक तो पेरू एखाद्या पिलासारखा पोटाशी घेऊन झपाट्याने जंगलात दूर निघून जातात असा ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचा शेवट होतो.संपतला पूर्वी त्याच्या आईने पेरूऐवजी अंड हवं का विचारल्याचा संदर्भ लक्षात घेतला तर संपत जणू पेरू होतो म्हणजे गर्भावस्थेत जातो.पण त्याचा पुनर्जन्म माणसांचा नसेल तर तो माकडाचा असेल असेही हा शेवट सुचवतो.तथाकथीत संस्कृतीच्या कोलाहलापासून दूर आदिम अवस्थेकडे असा हा संपतचा प्रवास  ‘दी हल्लाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या कथानकात चित्रीत झाला आहे.

‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ कादंबरीतील कथासूत्रे –

१)‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही सायन्स फिक्शन स्वरूपाची कादंबरी रूढार्थाने ठरणार नाही तरी जीवशास्त्रातील डार्विनने मांडलेला उत्क्रांतीवादाचा संदर्भ या कादंबरीत सूचकपणे येतो.निसर्ग कोणता जीव जगवावा (Nature’s selection) आणि त्यासाठी त्यात कोणते बदल कालौघात घडवावे हे ठरवत असतो. ही एक हजारो वर्ष चालणारी प्रक्रिया असते,ज्यामुळे उत्क्रांती होते.जशी माकडाच्या विशिष्ट प्रजातीपासून हजारो वर्षांनी माणूस उत्क्रांत झाला. ‘Survival of the fittest’ असा हा उत्क्रांतीचा नियम.पण जर एखाद्या माणसाला आपले हे उत्क्रांत स्वरूप आवडत नसेल,झेपत नसेल आणि परत मागे जायचे असेल, म्हणजे माकड व्हायचे असेल तर ? हे एक कथासूत्र कल्पनेच्या आधारे ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीच्या कथानकातून हळूहळू विकसीत केले गेले आहे.

२) ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही वरवर विनोदी कादंबरी वाटली तरी ती  एक शोकांतिका आहे.आधुनिक काळात मानवी मूल्यांना प्राधान्य राहिलेले नाही. भौतिक साधनसंपत्ती गोळा करणे हेच एकमेव स्वार्थी मूल्य सगळ्या मानवी समाजांना ग्रासून टाकते आहे. ‘नरेची केला हीन किती नर’ किंवा ‘What man has made of man’ अशी खंत आधुनिक काळातील मूल्यहीन मानवी जीवनाबद्दलची मोठमोठ्या तत्वज्ञांनी व्यक्त केली आहे.तथाकथीत प्रगती माणसाची वर्तणुक ढोंगी,स्वार्थी करण्यास कारण ठरली आहे.जी व्यक्ती अशी ढोंगी,स्वार्थी मनोवृत्तीची बनू शकत नाही ती जणू या जगात जगायला लायक रहात नाही ,संपतसारखी त्या व्यक्तीची शोकांतिका होते. असे  एक कथासूत्र ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीत आहे.

३) माणूस हा केवळ निसर्गनियमाने जगणारा प्राणी नाही. तो एक समाजशील प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला जन्मतः मिळालेल्या कौटूंबीक नातेसंबंधांच्या जाळ्यात आणि या जाळ्याने किंवा समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थांच्या चौकटीत जगावे लागते.त्यामुळे व्यक्ती आणि समाज यांच्यातील द्वंद्व हा नेहमीच चांगल्या कादंबरीचा विषय ठरतो.पूर्वी असे संघर्ष असणाऱ्या कादंबऱ्या साधारणपणे नायकप्रधान असत.मात्र आधुनिक आणि आजच्या उत्तरआधुनिक काळात कादंबऱ्या नायकांच्या न रहाता न-नायकांच्या झाल्या आहेत. ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’या कादंबरीतही संपत चावला हा न-नायक (Antihero) आहे. त्याला चौकटबद्ध समाजात जगताना परात्मता ( Alienation),सत्वहीनता  जाणवते.त्यामुळे त्याच्या मनात  द्वंद्व सुरू होते. तो या द्वंद्वातून सुटण्यासाठी ज्या कृती करतो आणि समाज त्यावर ज्या प्रतिक्रिया देतो ते म्हणजे ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’चे  मुख्य कथासूत्र आहे असे म्हणता येईल.

४)माणूस हा मूलतः प्राणीच आहे आणि अन्य सर्व प्राण्यांप्रमाणे त्यालाही नैसर्गिकपणे जगावेसे वाटणे स्वाभाविक आहे. पण मानवी समाज सुव्यवस्थित जगण्यासाठी अनेक व्यवस्थांची जी चौकट तयार करतो त्यात माणसाला नैसर्गिकपणे जगायला वाव रहात नाही. ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चड’ कादंबरीतल्या संपत चावलासारखी एखादी व्यक्ती जन्मतःच वेगळी असेल,तिला नैसर्गिकपणे ,तिच्या सत्वाला आणि स्वत्वाला जपत जगावेसे वाटत असेल तर? म्हणजे त्याला केवळ पोटापाण्यासाठी सामाजिक चौकटीत जगणे असह्य होत असेल तर त्याने काय करावे ? पळून जावे, आत्महत्या करावी की आध्यात्मिक मार्ग स्वीकारून साधू-गुरू व्हावे ? पण असे अध्यात्मिक गुरू  झाल्याने एक ओळख मिळत असली तरी शेवटी तेही एक ढोंगच आहे याची जाणीव संपत चावलासारख्या संवेदनशील माणसाला होतेच.भौतिक स्वार्थासाठी आपला कोणी वापर करू लागले आणि आपला समाजापासून दूर जाऊन शांतपणे,निसर्गनियमाने जगण्याचा हेतूच असफल होऊ लागला तर संपतसारख्याने काय करावे ? हे ‘हलाबल्लू इन दी ग्वाव ऑर्चर्ड’ या कादंबरीने उपस्थित केलेले प्रश्न आहेत.त्याचे उत्तर देता येत नाही तेव्हा ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे कथासूत्र कल्पनारंजीत होते.संपत चावला हा माणूस म्हणून नैसर्गिकपणे जगू शकत नाही म्हणून तो पेरू होतो आणि माकडे त्याला आपल्यासोबत  खोल जंगलात घेऊन जातात अशी ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीची अखेर आहे.ती कल्पनारंजीत असली तरी वाचकांना अंतर्मुख करणारी आहे.

५) भारतीय समाजातील कुटूंबव्यवस्था,विवाहव्यवस्था आणि लोकशाही व्यवस्थेतून निर्माण झालेल्या शिक्षण,प्रशासन, पोलीस,लष्कर,न्यायालये व अन्य नोकरशाही व्यवस्था सगळ्यांतच प्रचंड गोंधळ आहे.कालपरत्वे या व्यवस्थांनी परिवर्तन,अद्ययावतता स्वीकारलेली नाही. कोणत्याही सुधारणांसाठी इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या व्यवस्था म्हणजे जणू अभेद्य तुरूंग झाले आहेत.व्यक्तीच्या कोणत्याही समस्या सोडवायला या व्यवस्था असमर्थ ठरत आहेत.या व्यवस्थांचे गुलाम बनलेली माणसे केवळ ढोंगी वर्तन करत असतात. त्यांचे वागणे परिस्थितीशी इतके विसंगत असते की ते हास्यास्पद ठरते हे दाखवणे हेही ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे एक कथासूत्र आहे.

६) भारतीय समाजाला प्रयत्नवादापेक्षा जादू आणि चमत्कारांची ओढ आहे. खरे तर आधुनिक काळात माणसांनी विवेकी, विज्ञाननिष्ठ बनणे आवश्यक आहे.  पण भारतीय समाज अधिकाधिक अध्यात्मिक,अंधश्रद्धाळू बनत चालला आहे.परिणामी या दुबळ्या मानसिकता असलेल्या समाजाचा गैरफायदा घेणारे साधू,बुवा, गुरू मोठ्या प्रमाणात उदयाला येत असतात.दुबळी माणसे या लोकांच्या भूलथापांनी इतकी प्रभावीत होतात की स्वतःची बुद्धीच जणू गहाण ठेवतात हे दाखवणे हेही ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे एक कथासूत्र ठरते.

अशाप्रकारे ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही भारतीय समाजव्यवस्थेतील,नोकरशाहीतील गोंधळाचे व्यंगचित्र तर दाखवतेच पण त्यापेक्षाही अधिक अशा चौकटबद्ध, ढोंगी व्यवस्थांच्या कचाट्यात अडकलेल्या सरळ स्वभावाच्या, संवेदनशील माणसाला सत्वहीन जगणे किती असह्य होऊ शकते ते या कादंबरीला दाखवायचे आहे.

तुम्ही किरण देसाई यांची ‘हलाबल्लू इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ ही कादंबरी जरूर वाचावी ही विनंती. पुढील ब्लॉगमध्ये याच कादंबरीचा कथनाच्या अंगाने विचार करू.

                                                                       -गीता मांजरेकर

2 प्रतिसाद

  1. भारी आहे ही कादंबरी .. आणि त्या कादंंबरीच्या मुखपृष्ठावरील चित्र ही.. संपत या न- नायकाची भूमिका आणि आमची सद्यस्थिती यात बरेच साम्य आहे. म्हणजे आम्हालाही अगदी मोकळेपणाने हिंडावेसे वाटते पण, तेवढीच बंधने देखील आहेत..

    Like

यावर आपले मत नोंदवा