मागील ब्लॉगमध्ये आपण किरण देसाई यांनी लिहिलेल्या, बुकर पुरस्कार प्राप्त अशा ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकाचा आणि कथासूत्रांचा थोडक्यात परिचय करून घेतला.आज त्याच कादंबरीचा कथनाच्या अंगाने विचार करून लेखिकेची ही कादंबरी लिहिण्यामागील  अंतर्दृष्टी अधिक स्पष्ट करून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.

ज्यांना ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईलची लिंक जोडली आहे.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ ही ३२४ पृष्ठांची एक मोठी कादंबरी आहे. या कादंबरीचे कथन तृतीय पुरूषी आहे. कादंबरीचे कथानक एकूण ५३ छोट्या-मोठ्या अशा प्रकरणांत लेखिकेने विभागले आहे. परंतु या प्रकरणांतील कथन काळाच्या दृष्टीने पाहता एकरेषीय नाही. बरेचवेळा कथनातील वर्तमानकाळ अतिव्याप्त (Overlapping) होत भूतकाळात जातो.अवकाशही अतिव्याप्त होत कधी भारतात तर लगेच अमेरिकेत असा बदलतो.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचे कथानक दीर्घ आणि स्वाभाविकच घटनाप्रधान आहे. कथानकात महत्त्वाच्या मानाव्यात अशा व्यक्तिरेखा तीन चारच आहेत.अन्य व्यक्तिरेखा दुय्यम आहेत आणि त्या विशिष्ट आर्थिक वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येतात.

एकाच कादंबरीत दोन समांतर कथानके विकसीत करत नेण्याचा व उलगडण्याचा खटाटोप ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या लेखिकेने समर्थपणे पेलला आहे.या समांतर कथानकांपैकी एक भारतात तर दुसरे अमेरिकेत घडते.  

 ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीत एकाच कथानकातील समांतर कथानकांनी व्यापलेल्या कालखंडाची व्याप्ती वेगवेगळी आहे. कॅलिमपॉंगमध्ये घडलेल्या एका कथानकातील घटनांचा प्रत्यक्षातील काळ फक्त काही महिन्यांचा असेल.तर समांतरपणे अमेरिकेत घडणाऱ्या कथानकातील काळ मात्र काही वर्षांचा असावा. म्हणजे, कॅलिमपॉंगमधील ‘चो ओयु’या निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल यांच्या बंगल्यात काही नेपाळी घुसखोर घुसतात आणि दडपशाही करून दोन बंदुका,काही किराणा सामान घेऊन जातात या नाट्यपूर्ण घटनेने कथन सुरू होते. बंगल्यातील निवृत्त न्यायाधीश पटेल, त्यांची १७ वर्षांची नात सई आणि स्वयंपाकी पन्नालाल या घटनेने हादरतात.या घटनेनंतर केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेल्या दारूड्या माणसाचे दोन नातेवाईक काही महिन्यांत बरेचवेळा ‘चो ओयु’ बंगल्यावर आपल्या माणसावरील अन्यायाबद्दल दाद मागायला ,मदतीसाठी येतात. पण ‘चो ओयु’ बंगल्यातील निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल या माणसांना कोणतीही सहानुभूती दाखवत नाहीत. परिणामी ही माणसे अखेरीस जेमुभाईंचा मट्ट हा कुत्रा चोरून घेऊन जातात आणि जेमुभाई सैरभैर होतात, पन्नालाल  स्वयंपाक्याला मट्टच्या गायब होण्यासाठी दोषी धरून मारहाण करतात. सईला ‘चो ओयु’ बंगल्यावर घुसखोर नेपाळ्यांना बंदुका चोरायला पाठवणारा आपला प्रियकर ग्यान हाच असणार याची कल्पना येते आणि ग्यानच्या या दुष्ट वागण्याने दुखावली गेलेली सई ‘चो ओयु’ बंगला सोडून स्वतःचा व खऱ्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचे मनोमन ठरवते. अशाप्रकारे ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील समांतर कथानकांपैकी एका कथनकातील पहिली घटना व शेवटची घटना यांत कार्यकारणभाव आहे. मात्र या दोन घटनांच्या दरम्यान ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील अन्य अनेक घटना  घडतात आणि काहीं व्यक्तिरेखांचे भूतकाळ उलगडतात. एका आंदोलनाचे आणि त्यामुळे पेटलेल्या दंगलीचे, हिंसाचाराचे वर्णन देखील या कथानकात पार्श्वभूमीसारखे येत रहाते.त्यामुळे कथानक जटील होते आणि कथनातून  अप्रत्यक्षपणे  सुमारे ७० वर्षे मागे जात प्रदीर्घ कालपट उलगडला जातो.

दुसरीकडे ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील समांतर कथानक अमेरिकेत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेटर,स्वयंपाकी,डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणारा पन्नालाल स्वयंपाक्याचा मुलगा बिजूचे चित्रण करते.अखेरीस बिजू  अमेरिकेतील  शोषण, एकाकीपणाला कंटाळून आपल्या माणसांत परत येताना प्रवासात गोरखालॅंड चळवळीतील लोकांनी त्याचे सगळे सामान, पैसे लुबाडले आहेत आणि तो विकल अवस्थेत ‘चो ओयु’ बंगल्यावर पोहचला आहे.समांतर कथानकातील पहिल्या व शेवटच्या घटनेतही अप्रत्यक्षपणे कार्यकारणभाव आहे असे म्हणता येईल. भारतात बेकार असणारे अनेक तरूण बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत जातात कारण अमेरिकेत कोणतीही छोटी नोकरी मिळाली तरी डॉलर्समध्ये पगार मिळेल आणि तो नक्कीच भारतातल्यापेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे काही वर्ष नोकरी करून भरपूर पैसा मिळवू नी मग भारतात परत येऊ असे स्वप्न भारतभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक तरूण पहात असतात. बिजू त्यांच्यापैकीच एक आहे. त्याने काही वर्ष अमेरिकेत मिळतील ती कामे करून पैसे साठवले आहेत आणि जेव्हा भारताची, तिथे असणाऱ्या वडिलांची खूपच आठवण येऊ लागते तेव्हा त्याने परत भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे.आपण आपल्या लोकांत राहिलो तर सुखात राहू असे त्याला वाटू लागले आहे. परंतु प्रत्यक्षात भारतात आल्यावर ‘आपले लोक’ म्हणून ज्या लोकांवर विश्वास ठेवून तो कॅलिमपॉंगला यायला निघतो ते स्वतंत्र गोरखालॅंड चळवळीतले लोक बिजूला पूर्ण लुबाडतात.मिळवलेला सगळा पैसा, आणलेल्या सगळ्या वस्तू बिजूकडून काढून घेतल्या जातात.हे बिजूचा भ्रमनिरास करणारे असले तरी अस्वाभाविक नाही. अभावग्रस्त लोकांना संधी मिळाली की ते ज्यांची परिस्थिती बरी दिसते त्यांना लुबाडून त्यांच्या वाट्याला आलेल्या दारिद्र्याबद्दलचा राग व्यक्त करणारच ! त्यामुळे ‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील हे समांतर कथानकही संभवनीय आणि कार्यकारणभाव असलेले आहे.

 ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील समांतर कथानकांतील एकाचा शेवट प्रयाणाची सूचना देणारा आहे तर दुसऱ्या कथानकाचा शेवट आगमनाची सूचना देणारा आहे. एका कथानकात निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल यांची नात सई प्रेमातील प्रतारणेचा अनुभव आल्याने आणि आपले वास्तवाचे ज्ञान कमी पडते आहे हे जाणवल्याने कॅलिमपॉंग सोडून नवीन अनुभव घेण्यासाठी,नवे प्रेम शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. तर बिजू अमेरिकेत राहून वास्तवाचे चटके खाऊन,प्रेमशून्यतेला कंटाळून आणि दुर्दैवाने कफल्लक होऊन कॅलिमपॉंगमध्ये वडिलांकडे परत आला आहे.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील ५३ प्रकरणांचे जर वर्गीकरण केले तर या ५३ प्रकरणापैकी ३९ प्रकरणांत  एक कथानक उभे राहते.ज्यातील घटना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भारतात-कॅलिमपॉंगमध्ये घडल्या आहेत.किंवा कॅलिमपॉंगमध्ये रहाणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मनात घडल्या आहेत.या प्रकरणांत जेमुभाई, त्यांची नात सई,स्वयंपाकी पन्नालाल,सईचा मित्र ग्यान आणि त्यांच्या परिघातील नोनी,लोला व अन्य माणसे केंद्रस्थानी आहेत.यापैकी –

  • १० प्रकरणांतील कथनाला वर्तमानातील स्वतंत्र गोरखालॅंडची मागणी करणाऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे.
  • एकोणचाळीस प्रकरणांपैकी ७ प्रकरणांत निवृत न्यायाधीश जेमुभाई पटेल यांचा भूतकाळ तपशीलवारपणे उलगडतो.
  • कॅलिमपॉंगमधील चो आयु बंगल्याच्या परिसरातील नोनी,लोला या भगिनी, मिसेस सेन, फादर बुटी,अंकल पॉटी अशा लोकांचे चित्र १२ प्रकरणांत येते.
  • सई आणि ग्यानचे प्रकरण १० प्रकरणांत रंगवले गेले आहे.

अर्थात ही प्रकरण विभागणी ढोबळ आहे.कारण काही प्रकरणांत यातील सर्व गोष्टींची सरमिसळ झालेली आहे. एक-दोन ठिकाणी तर समांतर कथानक जे अमेरिकेत घडते आहे तेही या कथानकात अतिव्याप्त(Overlap) करण्यात आले आहे.तसेच, सईचा भूतकाळ, ग्यानच्या घराण्याचा पूर्वेतिहास, पन्नालाल स्वयंपाक्याचा भूतकाळ या गोष्टींचे तपशील थोडक्यात वरील प्रकरणांत विखुरलेले आहेत.एका प्रकरणात “सई दहा वर्षे नोनी आणि लोलाकडे शिकवणीला येत होती” असे वाक्य कथनात वापरून एकदम दहा वर्षांचा काळ पुढे सरकवला आहे .तर एका प्रकरणात जेमुभाई पटेल ग्यानला इंग्रजी कविता म्हणायला लावून त्याची खिल्ली उडवतात असा प्रसंग आहे आणि त्यांच्या या वागण्यामागे असणारा त्यांच्या भूतकाळातला तसाच प्रसंग लगेच उलगडून कार्यकारणभाव स्पष्ट केला जातो.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील समांतर कथानक  चौदा प्रकरणांत विभागले आहे.या कथानकातील घटना या अमेरिकेत घडल्या आहेत आणि त्यात पन्नालाल स्वयंपाक्याचा मुलगा बिजू केंद्रस्थानी आहे.त्याचे काही वर्षांचे अत्यंत अस्थिर आयुष्य दाखवण्यसाठी कथनात काहीवेळा फक्त तो जिथे काम करतो त्या रेस्टॉरंटसची नावेच एकामागोमाग एक येतात.त्यातून बिजूच्या नोकरी बदलण्यातील गती आणि आयुष्यातील अस्थैर्य कथक सांगू पहातो. अधिक पैसे मिळवण्याच्या मोहाने अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरीत झालेल्या विविध देशांतील कामगारांच्या वाट्याला येणारे अशाश्वत, अस्थिर, कष्टाचे आणि एकाकी जीवन बिजूच्या निमित्ताने कथनातून चित्रीत झाले आहे.तसेच अमेरिकेत स्थलांतरीत झालेले भारतीय व्यावसायिक तथाकथीत प्रतिष्ठीत झाले असले तरी त्यांचे वागणे कसे दुट्टपी,ढोंगी बनले आहे आणि त्यांच्या अपत्यांनी अमेरिकन संस्कृती स्वीकारल्याने त्यांचा कसा भ्रमनिरास झाला आहे तेही या कथनातून लेखिका स्पष्ट करते.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथनातून लेखिकेची अंतर्दृष्टी शोधण्याचा प्रयत्न करताना काही व्यक्तिरेखांच्या आत्मचिंतनातील वाक्य भाषांतरीत करावीत असे मला वाटते.ती वाक्ये मी संदर्भासह पुढे देते आहे.

१) ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या पहिल्याच प्रकरणात सई ही व्यक्तिरेखा जे आत्मचिंतन करते ते असे-

“एखादी गोष्ट पूर्ण केल्याचा,कृतकृत्यतेचा आनंद मनाला अधिक खोलवर जाणवतो की एखादी गोष्ट गमावल्याचे दुःख अधिक खोल जाणवते ? कल्पनारंजन करत तिने निर्णय घेतला की प्रेम इच्छा आणि इच्छापूर्ती यांच्या दरम्यानच्या फटीत रहात असावे.प्रेम अभावात असावे, समाधानात नसावे.प्रेम ही वेदना असावी, अपेक्षा असावी,पिछेहाट असावी, त्याभोवतीचे सगळे असावे पण ती भावनाच स्वतः असावी.”

सईला लहानपणापासून आई-वडिलांचे प्रेम मिळालेले नाही. ती सातव्या वर्षी पोरकी झाली आहे.कॅलिमपॉंगमध्ये ती आजोबांच्या आश्रयाला येते तेव्हा ते आजोबा म्हणजे निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल हे माणूस आहेत की पाल असा प्रश्न तिला पडतो. कारण ते प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांच्या चुका काढून चुकचुकणारे,इतरांना तुच्छ लेखणारे, कोणाशीही प्रेमाने संवाद न साधणारे,आत्ममग्न गृहस्थ आहेत. दुसरीकडे मट्ट कुत्रा सईला अधिक प्रेमळ वाटतो आणि पन्नालाल स्वयंपाक्याला इंग्रजी भाषा येत नसूनही त्याचा तिचा संवाद होऊ शकतो.’नॅशनल जिऑग्राफीक्स’चे अंक दाखवत ती पन्नालालला जगाचे ज्ञान देऊ पाहते.तिच्या मनात गरीबांबद्दल सहानुभूती आहे. सई सतरा वर्षांची होते तेव्हा तिच्या आयुष्यात एक शिक्षक या नात्याने आलेला ग्यान गरीब घरातला असला तरी तो तिला शारीर वासनेची जाणीव देतो आणि त्याच्यातील न्यूनगंडामुळे, बदलत्या राजकीय पार्श्वभूमीमुळे त्याच्या मनाच्या झालेल्या द्विधा अवस्थेमुळे त्याला सईची प्रतारणा करावी लागली असली तरी प्रेमाची चव,आस त्यानेच सईला दिलेली आहे.

२)कादंबरीतील अखेरच्या प्रसंगात सईने केलेले आत्मचिंतन पुढीलप्रमाणे-

“जीवनाचे ध्येय, हेतू कधी एकमेव नसतो..की जीवनाची दिशा कधी एकारलेली नसते..तिला शिकवलेला साधेपणा तिला जीवनात टिकू देणारा नसतो.यापुढे ती कधीही असा विचार करू शकणार नसते की कथन केवळ एकच असते आणि ते फक्त तिच्या मालकीचे असते.ती तिचा छोटासा आनंद निर्माण करू शकेल आणि त्यात सुखरूप जगू शकेल हा विचार ती यापुढे करू शकणार नसते.” सईला लहानपणापासून आलेले प्रेमाच्या अभावाचे , अनपेक्षीत प्रेमाचे, आपुलकीचे अनुभव आणि तिला सभोवतीच्या वास्तवाचे येत गेलेले भान यामुळे तिचा मानसिक प्रवास कल्पनारंजनाकडून वास्तवाचा स्वीकार करण्यापर्यंत झाला आहे.कोणीही परिपूर्ण नसतो. आणि आपण स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसतो तेव्हा आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठ दुःख आपल्याला न जाणवल्याने आपण एकांगी होतो हे सईला जाणवले आहे.म्हणूनच आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडून जगाचा अनुभव घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आहे.

३)जेमुभाई पटेल केंब्रिजमध्ये शिकायला गेले असताना त्यांच्या मूळच्या व्यक्तिमत्वात कसे परिवर्तन होत गेले त्याचे वर्णन कथक करतो. ते असे-

“जेमुभाईने स्वतःला गुंडाळायला सुरूवात केली होती.तो स्वतःला परका – इतका परका झाला होता की जेवढा तो सभोवतीच्या इतरांनाही परका नव्हता.स्वतःच्या त्वचेचा रंग त्याला विचित्र वाटू लागला होता,स्वतःचे उच्चार त्याला चमत्कारीक वाटू लागले होते.हसायचे कसे हे तो विसरला होता.स्मित हास्यासाठी ओठ किंचित उचलणेही त्याला जमेनासे झाले होते.आणि जर कधी तो हसलाच तर स्वतःच्या तोंडावर हात ठेवत असे कारण आपल्या हिरड्या कोणाला दिसू नयेत असे त्याला वाटू लागले होते.” जेमुभाई गुजराथमधील फिफीटसारख्या छोट्याशा खेड्यातून केंब्रिज विद्यापीठात  शिकायला गेले होते.आणि तिथे गेल्यापासून त्यांच्या मनात प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला होता.केंब्रिजमधून बाहेर पडून भारतात परतलेला जेमुभाई पटेल पूर्वीच्या जेमुभाईपेक्षा अगदी वेगळा होता.भारतात त्याचे कुटूंबीय तर त्याला गावंढळच वाटू लागले होते. त्याची सुंदर पत्नी निमी इंग्रजी भाषा येत नाही, इंग्रजी रितीरिवाज येत नाहीत म्हणून त्याच्या दृष्टीने अगदी तिरस्करणीय झाली होती.त्याचा परिणाम जेमुभाईचे निमीबरोबरचे वर्तन अत्यंत दुष्टपणाचे,हिंसक झाले होते.

जेमुभाई पटेल यांचे मट्ट या त्यांच्या कुत्र्यावर विलक्षण प्रेम होते. मट्ट गायब झाल्यावर जेमुभाई सैरभैर झाले होते. आपल्या निमीशी वाईट वागण्याने जीवनाचे जे कर्ज आपल्यावर चढले आहे ते सई घरी आल्यावर फिटू लागले आहे असे जेमुभाईंना वाटत होते. पण मट्ट नाहीसा झाला तेव्हा ते कर्ज अजून बाकी आहे याची जाणीव जेमुभाईंना झाली.निमीला आपण माहेरी पाठवले, पैसे पुरवत राहिलो पण तिची कधी कदर केली नाही. मेहुण्याने स्टोव्हच्या आगीत ती जळून गेली असे कळवले तेव्हा तो अपघात असावा असा विश्वास ठेवून आपण तो प्रसंग विसरून गेलो होतो.पण आता निमीचे जाणे अपघात नसावा तो तिच्या मेहुण्याने तिचा केलेला खून किंवा तिची आत्महत्या असावी आणि आपणच तिच्या मृत्यूला जबाबदार होतो असे जेमुभाईंना वाटू लागले होते.अशावेळी जेमुभाईंच्या मनातील विचारांबद्दल कथक म्हणतो-

“ एक खरी गोष्ट जेमुभाई शिकले होते. एखादा माणूस कशातही रूपांतरीत होऊ शकतो.ते विसरणे शक्य असते आणि कधीकधी आवश्यकही असते.”

आपण केंब्रिजला जाण्यापूर्वी कसे होतो आणि किती बदललो, किती क्रूर झालो विशेषतः आपण आपल्या आई-वडिलांवर, निमीवर ,आपल्या मुलीवर किती अन्याय केला याचा अपराधीपणा जेमुभाईंनी मनातून हेतूतः हद्दपार केला आहे.कारण एक न्यायाधीश, एक ब्रिटीश प्रशासकीय सेवेतील आय.सी.एस. ऑफिसर म्हणून आपली कारकीर्द घडवताना स्वतःची कठोर, शिस्तप्रिय, इंग्रजी रितीरिवाज पाळणारा अशी प्रतिमा घडवण्यासाठी स्वतःचे अपराध विसरून पुढे सरकणे त्यांना आवश्यक वाटले आहे.

५) पन्नालाल हा न्यायाधीश जेमुभाई पटेलांकडे अनेक वर्षांपासून काम करणारा स्वयंपाकी. जेमुभाईंना हव्या त्या शिस्तीत, वेळच्या वेळी त्यांना ‘अंग्रेजी खाना’ बनवून देणारा बटलर.पण त्याबदल्यात जेमुभाईंकडून त्याला मिळणार पगार मात्र जेमतेम होता. विशेषतः कॅलिमपॉंगमधील इतर उच्चभ्रू लोकांच्या नोकर-चाकरांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत तो अगदीच तुटपंजा होता. आपले हे दुःख लपवण्यासाठी पन्नालाल आपला मुलगा बिजू कसा अमेरिकेत आहे आणि तो कसा भरपूर पैसे मिळवतो आहे नी आपल्याला अमेरिकेला घेऊन जाणार आहे असे आभासी चित्र लोकांसमोर निर्माण करत असे.त्याला एका बाजुला आधुनिक भौतिक साधनसंपत्तीचा मोह होता. आपल्याकडेही टी.व्ही.,फ्रिज वगैरे सगळ्या गोष्टी असाव्यात असे त्याला वाटे पण प्रत्यक्षात तर तो ‘चो ओयु’ बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये कसातरी रहात होता.मूळात स्वभावाने भित्रा असणारा पन्नालाल आजारी पडला की डॉक्टरकडे जाई पण कोणीतरी सांगितलेली पुजा,बळी चढवणे, प्रायश्चित्त घेणे या पारंपरिक अंधश्रद्धा देखील त्याला प्रभावीत करत. कॅलिमपॉंगमध्ये स्वतंत्र गोरखालॅंडची मागणी करणाऱ्यांचे हिंसक आंदोलन सुरू असताना एका मोर्चाला पन्नालाल नाइलाजाने जातो. पण मोर्चाचे दंगलीत रूपांतर होते आणि पन्नालाल भयभीत होऊन परत घराकडे येत असताना त्याला वाटेत रक्ताची थारोळी दिसतात. कोणीतरी मोर्चानंतर खाऊ म्हणून डब्यातून आणलेली डाळ त्या रक्तात सांडलेली दिसते तेव्हा पन्नालाल गलबलतो. त्याच्या मनात येणारे विचार कथक असे मांडतो.-

“ते परस्परांशी विसंगत रंग,घरगुतीपणा आणि मृत्यू एकमेकांत मिसळलेले.शाश्वततेने अनपेक्षीताकडे घेतलेली धाव, करूणेला दूर हटवून तिथे आलेली हिंसेची प्रतिमा,नेहमीच स्वयंपाकी (पन्नालाल) हे सगळे दूर फेकून देऊ इच्छित होता आणि त्याचवेळी हे वास्तव पाहून त्याला रडावेसे वाटत होते.”

कथनातील चिंतनाच्या, वर्णनांच्या या काही तुकड्यांखेरीज कथानकातील आणखी काही तपशीलांमधूनही लेखिकेची जीवनदृष्टी समजून घेण्यास मदत होईल.

१) एक प्रसंग आहे सईच्या शिक्षिका असलेल्या आणि इंग्रजी भाषा, संस्कृती तिला शिकवणाऱ्या नोनी,लोला या बंगाली भगिनींच्या घरातला. या दोघींकडे येणारी मोलकरीण केसांग ही जेव्हा तिच्या आणि तिच्या नवऱ्यातील प्रेमाबद्दल आणि आंतरजातीय विवाहाबद्दल सांगते तेव्हा तिच्या मालकीणींना आश्चर्य वाटतं. कारण केसांगसारखी दरिद्री स्त्री काय उत्कट प्रेम करणार, तसे प्रेम करणे ही तर आपल्यासारख्या उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचीच मक्तेदारी आहे असा त्यांचा समज  आहे ! यावरून उच्चभ्रू लोकांची स्वतःच्या संस्कृतीबद्दलचा अहंकार बाळगण्याची आणि इतरांना तुच्छ लेखण्याची मानसिकता लक्षात येते. याच दोन बंगाली भगिनींच्या बंगल्यात जेव्हा काही नेपाळी तरूण घुसतात आणि खायला मागतात तेव्हा त्या संशयाने त्यांच्याकडे पहातात. नेपाळी तरूणांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारातच आपल्या झोपड्या उभारल्यावर या बंगाली स्त्रियांची झालेली त्रेधातिरपीट, त्यांच्यापैकी नोनीने नेपाळी सेनेच्या प्रधानाला जाऊन आपल्या बंगल्यातील अतिक्रमणाबद्दल सांगितल्यावर त्याने नोनीची उडवलेली खिल्ली हे प्रसंगही दोन आर्थिक वर्गातील तेढ,तिरस्कारच व्यक्त करतात.

२) जेमुभाई पटेलांनी पावसाच्या एका रात्री ग्यान हा सईचा नेपाळी शिक्षक ‘चो ओयु’ बंगल्यावर मुक्कामाला राहिलेला असताना जेवणाच्या टेबलावर त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला इंग्रजी कविता म्हणण्याचा आग्रह धरणे आणि त्याने टागोरांची कविता म्हटल्यावर जोरजोरात हसणे हा प्रसंग असेल किंवा खुद्द जेमुभाईंना त्यांच्या आय.सी.एस. च्या मुलाखतीच्या वेळी इंग्रज परीक्षकांनी इंग्रजी कविता म्हणायला लावणे आणि त्यांच्या भारतीय उच्चारांची खिल्ली उडवणे हा प्रसंग असेल यामध्ये देखील भेदभाव करण्याची मानसिकता आहे. अशा प्रसंगातूनच न्यूनगंड असणाऱ्या जेमुभाईचे आणि नंतर ग्यानचेही व्यक्तिमत्व क्रौर्याकडे गेले आहे.

३) पन्नालाल स्वयंपाक्याने उत्तर प्रदेशातील आपली पाच आंब्याची झाडे आणि छोटीशी जमीन यावरून भावाशी भांडण केले आहे. त्यामुळे त्याचे भावाशी संबंध संपले आहेत.यातूनही व्यक्तींमधील अहंकार,मालमत्तेबद्दलचा मोह यातून जी वितुष्ट निर्माण होतात ती अखेरीस माणसाचे नुकसानच करणारी ठरतात असेच लेखिकेला सुचवायचे आहे. मोठमोठ्या साम्राज्यांसाठी होणारी महायुद्धे असोत की पाच आंब्याच्या झाडांसाठी होणारी घरगुती भांडणे असोत सामोपचाराने ती मिटवली नाहीत तर अंतिमतः व्यक्ती, समाज, देशांचे नुकसानच होणार हे निश्चित आहे.

४)  स्वतंत्र गोरखालॅंडची मागणी करणाऱ्या दहशतवादी तरूणांचे आंदोलन ही गोष्ट कशाचा परिणाम आहे ? लेखिका जेव्हा ग्यान या सईला शिकवायला येणाऱ्या नेपाळी मुलाचा पूर्वेतिहास कथन करते तेव्हा ती कारणे स्पष्ट होतात.ब्रिटीशांनी भारतात त्यांचे साम्राज्य असताना चहाच्या बागांमध्ये काम करण्यासाठी नेपाळी लोकांना नेपाळमधून पश्चिम बंगालमध्ये आणले. त्यातील काही हट्ट्याकट्ट्या तरूणांना लष्करात भरती करून घेतले. काही नेपाळी तरूण ब्रिटीशांसाठी युद्ध लढले आणि कामी आले.काही अपंग झाले. या सगळ्या स्थित्यंतरात नुकसान झाले ते नेपाळी स्थलांतरीतांचे. त्यांना नेपाळमध्ये काही जमीन राहिली नाही आणि भारतात सन्मानाची वागणूक मिळेना. खरे तर कॅलिमपॉंग सारख्या पश्चिम बंगालमधील नगरात सर्वाधिक वस्ती नेपाळ्यांची पण त्यांच्या वाट्याला येणारी कामे श्रीमंतांकडे रखवलादारीची- हलक्या दर्जाची, त्यांची वस्ती झोपड्यांची. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण होणे आणि त्यांच्या अस्मितेला  आंदोलनाचे रूप येणे स्वाभाविकच आहे.पण ही आंदोलने चिरडून टाकली तर असंतोष धगधगतच राहणार. त्यापेक्षा सामोपचाराने अधिकाधिक न्याय्य निवाडा अशा संघर्षात शासनाने करणे आवश्यक आहे असे लेखिकेला सुचवायचे आहे.

५) ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीतील समांतर कथानकात बिजू या स्थलांतरीत कामगाराची जी कथा आणि व्यथा लेखिका मांडते तीही आर्थिक भेदभाव, शोषण,माणुसकीशून्यता याचाच प्रत्यय देणारी आहे.

अशाप्रकारे, कथनातील काही चिंतनांचे, वर्णनांचे हे तुकडे वाचताना ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या लेखिका किरण देसाई याची अंतर्दृष्टी स्पष्ट होत जाते.लेखिकेला असे वाटते आहे की व्यक्तीच्या मनातील दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा किंवा एका संपूर्ण संस्कृतीबद्दलचा,आर्थिक वर्गाबद्दलचा तिरस्कार,तुच्छता,भेदभाव केवळ क्रौर्याला ,हिंसेला, उद्दामपणालाच जन्म देते.निरपराध माणसांवर त्यामुळे अन्याय होतो.संपूर्ण मानवजातीचेच व्यक्तींच्या, संस्कृतींच्या, राष्ट्रांच्या वितुष्टांमुळे आणि युद्धांमुळे नेहमी नुकसानच झाले आहे. त्यामुळे हा नुकसानीचा वारसा जर संपवायचा असेल तर आपले मन व्यापक केले पाहिजे, आपल्या ज्ञानाच्या, जाणिवेच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत.तोच मानवजातीच्या  उद्धाराचा एकमेव विवेकी मार्ग आहे.

 ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथनाचे हे विश्लेषण करण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला का ? तुम्ही ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ ही कादंबरी मूळातून जरूर वाचावी ही विनंती. अशा अभिजात कादंबऱ्यांतील आशयसूत्रे नेहमीच कालातीत असतात असा प्रत्यय तुम्हाला येईल.

पुढील ब्लॉगमध्ये किरण देसाई यांनी लिहिलेल्या ‘हल्लाबल्लु इन दी ग्वावा ऑर्चर्ड’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे यांचा परिचय करून घेऊ.

-गीता मांजरेकर

2 प्रतिसाद

  1. तुम्ही केलेल्या कादंबरीच्या कथनातून आणि कथासूत्रातून मलाही माझ्या वक्तृत्त्वाच्या विषयासाठी बरेच संदर्भ मिळाले. आभारी आहे.

    Like

यावर आपले मत नोंदवा