मागील ब्लॉगमध्ये आपण किरण देसाई या भारतीय इंग्रजी कादंबरीकार महिलेचे चरित्र आणि कादंबरीकार म्हणून तिची कामगिरी याबद्दल थोडक्यात माहिती करून घेतली. त्या माहितीत सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ही होती की २००६ साली किरण देसाई या जागतिक ख्यातीच्या ‘मॅन बुकर’ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या होत्या.किरण देसाई यांना बुकर पारितोषिक मिळवून देणारी त्यांची कादंबरी आहे ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’.आजच्या ब्लॉगमध्ये आपण याच कादंबरीचे कथानक व कथासूत्रांचा शोध घेणार आहोत.ही कादंबरी बरीच दीर्घ असल्याने आजचा ब्लॉगही स्वाभाविकच दीर्घ असणार आहे.
ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडते आहे.
कादंबरीचा काल आणि अवकाश
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ ही कादंबरी २००६ साली प्रकाशित झाली.या कादंबरीतील प्रत्यक्ष काल १९८० चे दशक आहे असे म्हणता येईल. पण कादंबरीतील एका व्यक्तिरेखेच्या भूतकाळामुळे हा काळ अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्यपूर्वकाळापर्यंत मागे जातो. कादंबरीतील अवकाशाबाबतही असेच होते.म्हणजे कादंबरीतील बऱ्याचशा घटना भारतातील दार्जिलींगजवळच्या कॅलिमपाँग या छोट्याशा नगरात तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्कजवळील मॅनहटन या शहरात घडल्या आहेत.परंतु कथानकातील एका व्यक्तिरेखेच्या भूतकाळामुळे कादंबरीचा अवकाश कधी वाचकांना घेऊन गुजराथमधील पिफीट या खेड्यात आणि बोंडा नावाच्या दूरस्थ इलाक्यात पोहोचतो तर कधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठ परिसरात नेतो.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचे कथानक एकरेषीय नाही. ते काळ आणि अवकाश या दोन्ही अक्षांवर मागे-पुढे तसेच देशा-परदेशात जात रहाते.कादंबरीतील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा तीन-चारच आहेत पण या व्यक्तिरेखांच्या परिघातील अन्य काही व्यक्तिरेखाही कादंबरीच्या कथानकाला व्यापक बनवतात.मात्र कादंबरीला सर्वाधिक व्यामिश्रता,सम्यक सामाजिक परिमाण प्राप्त होते ते कथानकाला असलेल्या राजकीय चळवळी व उपेक्षीत जनसमूहांच्या उठावांच्या पार्श्वभूमीमुळे.

कादंबरीचे कथानक :
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’चे कथानक एकरेषीय नाही पण आपल्या आकलनासाठी ते आपण एका रेषेत आणून घेणे सोयीचे ठरेल. तसा प्रयत्न मी पुढे करणार आहे.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकाची सुरूवात कॅलिमपॉंग या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या ‘चो ओयु’ बंगल्यात होते.या बंगल्यात निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल त्यांच्या नातीसह रहातात. कथानक एका नाट्यपूर्ण घटनेने सुरू होते. एका रात्री बंगल्यात काही नेपाळी तरूण घुसले आहेत आणि त्यांनी पटेल यांच्या घरातील दोन बंदुका हस्तगत केल्या आहेत.पटेलांच्या स्वयंपाक्याला दरडावून या घुसखोर नेपाळी मुलांनी त्यांना हवे तेवढे खाऊन घेतले आहे आणि अंधारात ते पसार झाले आहेत.दुसऱ्या दिवशी पटेलांच्या स्वयंपाक्याने पोलिस स्टेशनला जाऊन रात्री घडलेल्या प्रसंगाची तक्रार नोंदवली आहे.पोलिसांनी पहिला संशय या स्वयंपाक्यावरच घेऊन बंगल्याच्या आऊटहाऊसमधील त्याच्या सामानाची झडती घेतली आहे.त्यात पोलिसांना काहीही सुगावा लागलेला नाही. स्वयंपाकी पन्नालाल याच्या मुलाने अमेरिकेहून पाठवलेली पत्रे मात्र या झडतीत पाण्यात भिजली आहेत.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीत ‘चो ओयु’ बंगल्यातील निवृत्त न्यायाधीश पटेल यांचे कुटुंब केंद्रस्थानी आहे. कॅलिमपॉंगमधील ‘चो ओयु’ हा ब्रिटीशकालीन बंगला आहे. त्यात निवृत्त न्यायाधीस पटेल त्यांच्या निवृत्तीनंतर सुमारे वीस वर्षांपासून रहात आहेत.त्यांच्या कुटुंबात जेमुभाई पटेल स्वतः,आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेली त्यांची नात सई आणि कुत्रा मट्ट हे तिघे आहेत.बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये त्यांचा अनेक वर्षांपासूनचा स्वयंपाकी पन्नालाल रहात आहे. सईला आपल्या आजोबांचा भूतकाळ माहीत नाही.खरं तर, पन्नालाल स्वयंपाक्यालाही आपल्या मालकाच्या विशेषतः त्याच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल काही माहीत नाही. तरीही तो सईला कल्पनेने तिच्या आजोबांच्या कर्तृत्वाच्या, शौर्याच्या आणि प्रेमाच्या मनगढंत कहाण्या कुजबुजत्या आवाजात सांगत आला आहे. जेमुभाई न्यायमुर्ती म्हणून कार्यरत असल्यापासून तो त्यांना एकटेच रहाताना पाहत आला आहे. जेमुभाई पटेल यांनाही आपला भूतकाळ कुणाला सांगावा असे वाटत नाही. पण तो काही घटनांमुळे त्यांच्या मनात अचानक जागा होत रहातो.त्यामुळे कथानकात त्यांच्या आठवणीच्या रूपात त्यांचा भूतकाळ उलगडत जातो.
जेमूभाई हा स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला, मूळचा गुजराथमधील पाटीदार समाजातला गरीब कुटुंबातला पण उपजतच हुशार मुलगा. त्यामुळे त्याच्या वडिलांनी पोटाला चिमटा काढून आपल्या या होतकरू मुलाला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी धडपड केली.जेमुभाईने आय.सी.एस.व्हावे हे स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिले आणि जेमूभाईच्या मनात रूजवले. जेमुभाईला इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली पण त्याला इंग्लंडला पाठवण्यासाठी आवश्यक ते पैसे त्याच्या वडिलांकडे नव्हते.त्यांच्या समाजातील सर्वात श्रीमंत माणसाला ते त्याच्या हवेलीत जाऊन भेटले. आपला प्रस्ताव त्यांनी या श्रीमंत माणसासमोर ठेवला. जेमू केंब्रिजमध्ये शिकून आय.सी.एस. होणार आहे. त्याला तुम्ही जावई करून घ्या आणि त्याबदल्यात त्याच्या प्रवासाचा खर्च करा. तुमच्या मुलीला भविष्यात काही कमी पडणार नाही.तुमचीही आय.सी.एस. जावयाचा सासरा म्हणून समाजात प्रतिष्ठा वाढेल असा हा प्रस्ताव आहे.आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी त्या श्रीमंत माणसाने लगेचच आपल्या मुलीचे निमीचे जेमुशी लग्न लावून दिले.जेमूचा प्रवासखर्च उचलला आणि लग्नानंतर काही दिवसांतच जेमू लंडनमध्ये दाखल झाला. निमीला फक्त एकदा सायकलवरून गावात फिरवून आणण्याखेरीज जेमूला तिचा सहवास मिळाला नाही.कायम हवेलीच्या चार भिंतीत जगलेल्या निमीला त्या एका सायकल वारीमुळे जेमूबद्दल जिव्हाळा वाटला.भविष्याची सुंदर स्वप्ने ती पाहू लागली.
लंडनसारख्या देशात सभ्यतेच्या,वागण्या-बोलण्याच्या,पेहरावाच्या अनेक औपचारिकता पाहून जेमुभाईच्या मनात प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला.आपले दिसणे, आपले गुजराथी वळणाचे इंग्रजी बोलणे,आपले पुढे असलेले दात,तोंडाला आणि कपड्यांना येणारा दुर्गंध सगळे त्याला सभोवतीच्या गोऱ्या आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत हिणकस वाटत राहिले. मिसेस राईस या बाईच्या बंगल्यातील एक खोली त्याला भाड्याच्या बाबतीत परवडणारी वाटली आणि त्याने तिथेच मुक्काम केला. एखादे सॅंडविच आणि दूध यापेक्षा अधिक काही मिसेस राईस त्याला देऊ शकत नव्हती. पण तेवढ्यावरच जेमूने समाधान मानले. न्यूनगंडामुळे लंडनमधील वास्तव्यात जेमुभाई एकाकी होत गेला. स्वतःला ब्रिटीश सभ्यतेत बसवण्यासाठी जेमूने आटोकाट प्रयत्न केले. एक त्याच्याचसारख्या गरीब परिस्थितीतून केंब्रिजमध्ये शिकायला आलेला बोस हा बंगाली विद्यार्थी तेवढा जेमूला थोडा जवळचा वाटे. पण अन्य कोणाशीही त्याची मैत्री झाली नाही. केंब्रिजमधील अभ्यासाचा ताणही जेमूच्या अवाक्यापलीकडचा होत गेला. रात्रंदिवस त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आणि तो अभ्यास करत राहिला. आय.सी.एस.च्या लेखी परीक्षेत जेमू पास झाला पण मुलाखतीत त्याला नीट उत्तरे तर देता आली नाहीतच उलट मुलाखत घेणाऱ्यांनी त्याला इंग्रजी साहित्य वाचलेले नसल्याबद्दल आणि भाषा नीट येत नसल्याबद्दल खिल्ली उडवली. सुदैवाने त्यावर्षी अधिक आय.सी.एस. अधिकाऱ्यांची गरज असल्याने शेवटच्या यादीत जेमुभाईचे नाव आले.
जेमुभाई लगेचच भारतात परतला.फिफिट गावात त्याचे जंगी स्वागत झाले. पण मायदेशी परतलेला जेमू भारतातून केंब्रिजला शिकण्यासाठी गेलेल्या जेमूपेक्षा त्याच्या कुटुंबांतील सर्वांनाच अगदी वेगळा वाटला.जेमूला आपले सगळे कुटुंबीय अगदी आपला श्रीमंत सासरा आणि सुंदर बायकोही गावंढळ वाटत राहिले.आपली माणसे भेटल्याचा आनंद त्याला झाला नाही किंवा तो व्यक्त करणे त्याने अंगी बाणवलेल्या ब्रिटीश सभ्यतेत आता बसेना.परिणामी जेमूभाई आपल्या कुटुंबीयांशी तुच्छतेने वागू लागला. निमीवर त्याने आपला सगळा राग काढला.अत्यंत क्रूरपणे तो निमीवर रोज रात्री अत्याचार करत राहिला आणि सकाळी उठल्यावर तो तिच्याशी अलिप्तपणे वागू लागला. निमीने हे सगळे सहन केले, अंगवळणी पाडून घेतले. जेमूभाईची दूरवरच्या जंगलाने वेढलेल्या बोंडा इलाक्यात पहिली नेमणूक झाली. दोन दिवस प्रवास करून जेमूभाई पत्नी निमीसह त्या नेमणुकीच्या ठिकाणी रूजू झाले. आय.सी.एस अधिकाऱ्यांच्या त्या वसाहतीत एक अलिशान सरकारी बंगला,दिमतीला दोन नोकर,गाडी असे सगळे वैभव जेमूभाईला लाभले. आजूबाजूला ब्रिटीश व भारतीय अधिकाऱ्यांची घरे असलेल्या वसाहतीत जेव्हा पार्ट्या होत तेव्हा जेमूभाई निमीला घेऊन जात नसे. त्याला तिची लाज वाटे. ती अशा पार्ट्यांमध्ये गावंढळ वाटेल असा त्याचा पूर्वग्रह होता. सहा महिन्यांत एकदाही निमीला त्याने बंगल्यातून बाहेर पडू दिले नव्हते. पण एके दिवशी जेमूभाई कामानिमित्त दौऱ्यावर गेलेले असताना वसाहतीतील भारतीय स्त्रिया ज्या ब्रिटीशविरोधी गांधीवादी चळवळीत सहभागी होत्या त्यांनी निमीला जवाहरलाल नेहरू बोंडा स्टेशनवर येणार आहेत म्हणून तूही त्यांना बघायला चल असा आग्रह केला. कधी नाही ते बाहेर पडायला मिळेल या आकर्षणातून निमी त्या बायकांबरोबर गेली. पण दुसऱ्या दिवशी दौऱ्यावरून परतलेल्या जेमूभाईला त्याबद्दल ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जाब विचारला. आपली नोकरी, आपला अधिकार,आपली प्रतिष्ठा निमीच्या वागण्याने धोक्यात येईल या भीतीने जेमूभाईने निमीला मारहाण केली आणि दोन दिवसांनी निमी माहेरी जायला नकार देत असतानाही तिची ट्रेनने गुजराथला रवानगी केली.
निमीच्या माहेरी तिचे स्वागत झाले कारण ती गरोदर असल्याची बातमी तिने दिली. सहा महिन्यांनी जेमूभाईंना निमीच्या काकांची तार आली की त्यांना मुलगी झाली आहे आणि त्यांनी फिफीटला येऊन निमीला व मुलीला घेऊन जावे.पण जेमूभाईने आपली नेमणूक जंगल असलेल्या इलाक्यात झालेली आहे जिथे निमीची व मुलीची देखभाल होऊ शकणार नाही अशी सबब सांगून पैसे पाठवून दिले.पुढेही जेमूभाई बायको-मुलीसाठी पैसे पाठवत राहिले पण त्यांनी त्यांना भेटण्याचे सौजन्य कधीही दाखवले नाही. निमी आपल्या मोठ्या बहिणीच्या आश्रयाने मुलीला मोठे करू लागली. मेहुण्याने पदोपदी अपमान केला तरी ती तो सहन करत राहिली. मुलीला तिने डेहराडूनच्या बोर्डिंग शाळेत टाकावे असे जेमूभाईने कळवले आणि डेहराडूनच्या शाळेत त्याची मुलगी शिकली, मोठी झाली आणि कालांतराने दिल्लीमधील कॉलेजमध्ये आली.तिथेच अनाथाश्रमात वाढलेल्या मेस्त्री आडनावाच्या एका पारशी मुलाशी तिने प्रेमविवाह केला.तिच्या आईचे म्हणजे निमीचे निधन झाले.
यथावकाश जेमूभाई प्रशासकीय सेवेत उच्च पदावर चढले. न्यायाधीश म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती. पण निवृत्तीनंतर त्यांना ब्रिटीशांप्रमाणेच थंड हवेच्या ठिकाणी शांतपणे जगायचे होते. १९५७ मध्ये त्यांनी कॅलिमपॉंगमधील एका स्वीस माणसाचा ‘चो आयु’ हा बंगला विकत घेतला होता.१९६०च्या सुमारास अनेक वर्षांपासून त्यांचा स्वयंपाकी असणाऱ्या पन्नालालला व मट्ट नावाच्या इमानी कुत्र्याला सोबत घेऊन जेमुभाईने निवृत्तीनंतर कॅलिमपॉंगला स्थलांतर केले.
जेमूभाईचा जावई मेस्त्री हा भारतीय हवाईदलात वैमानिक होता. त्याचा निडरपणा आणि जिद्द पाहून १९६१मध्ये रशियन अवकाश मोहिमेसाठी त्याची निवड झाली. नवऱ्याबरोबर मॉस्कोला जाताना जेमूभाईच्या मुलीने आपल्या सहा वर्षाच्या मुलीला सईला ती स्वतः जिथे शिकली त्याच डेहराडूनच्या सेंट ऑगस्टिन कॉन्वेंट बोर्डिंग शाळेत दाखल केले. दुर्दैवाने जेमूभाईची मुलगी आणि जावई दोघेही रशियातील मॉस्कोमध्ये एका बसखाली चिरडले गेले.सई अनाथ झाली. तिच्या आईने सईच्या आजोबांचे म्हणजे जेमूभाईचे नाव एकमेव पालक म्हणून दिलेले असल्याने.त्यांना तार केली गेली. सात वर्षांच्या सईला घेऊन सेंट ऑगस्टीन कॉन्वेंटमधील नन जेमूभाईच्या पत्त्यावर कॅलिमपॉंगला दाखल झाली.दुसरा पर्यायच नसल्याने जेमूभाईने सईला आपल्या घरातला एक सदस्य म्हणून स्वीकारले.पण खरे तर सईला सातव्या वर्षापासून सांभाळले ,जेवू-खाऊ घातले, तिच्यावर माया केली ती पन्नालाल स्वयंपाक्यानेच.
जेमुभाई पटेल यांच्या स्वयंपाक्याचे पन्नालालचे कुटुंब ‘चो आयू’ बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये रहाते आहे. ज्यात एकेकाळी तो आणि त्याचा मुलगा बिजू असे दोघे होते पण नंतर बिजू अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने स्थलांतरीत झाला .त्यामुळे पन्नालाल एकटाच आऊटहाऊसमध्ये राहू लागला. ‘अंग्रेजी खाना’ बनवण्यात आणि न्यायाधीशांची बडदास्त राखण्यात तो सरावलेला होता. पण त्याबदल्यात न्यायमुर्तींकडून त्याला मिळणारा पगार तुटपुंजा होता. परिणामी पन्नालाल आऊटहाऊसमध्येच धान्य कुजवून त्याची दारू बनवे आणि सैनिकांना ते बेकायदेशीर मार्गाने पोहचवे.त्याबदल्यात त्याला बरे पैसे मिळत.न्यायाधीशांनी वाण सामान आणण्यासाठी दिलेले पैसे तो बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी घासाघीस करून वाचवे आणि ते स्वतःच्या खिशात टाके.आपला मुलगा बिजू अमेरिकेहून परत येईल आणि आपली परिस्थिती एकदम सुधारेल असे स्वप्न पन्नालाल पहात असे.
पन्नालालचा मुलगा बिजू न्युयॉर्कजवळील मॅनहटन शहरात सुमारे दहा वर्ष कुठल्या ना कुठल्या रेस्टॉरंटमध्ये कधी स्वयंपाकी म्हणून तर कधी डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे.बिजूच्या निमित्ताने अमेरिकेतील असंघटीत कामगारांचे कष्टाचे जगणे,त्यांचे होणारे शोषण,त्यांच्या वाट्याला आलेली सततची असुरक्षितता याचे चित्रण ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीत किरण देसाई यांनी केले आहे.बिजू सतरा-अठरा वर्षांचा असल्यापासून त्याने अमेरिकेत येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कधी कोणा एजंटच्या माध्यमातून मुलाखत देऊन नोकरी मिळेल या आशेवर त्याने पैसे भरले आहेत आणि मग आपली फसगत झाल्याचे त्याच्या लक्षात आले आहे. तर कधी अमेरिकन वकिलातीसमोर रात्रंदिवस थांबून प्रत्यक्ष व्हिसा देणाऱ्या खिडकीवर मुलाखतीत त्याला नकार मिळाला आहे. पण एकदा योगायोगाने त्याचा अमेरिकेचा पर्यटक व्हिसा मंजुर झाल्यावर त्याला आणि त्याच्या वडिलांना आपण अत्यंत सुदैवी आहोत असेच वाटले आहे.अमेरिकेत वडिलांच्या ज्या मित्राच्या भरोशावर बिजू गेला आहे त्या नंदू नामक इसमाने त्याला कोणतीच मदत केलेली नाही.बिजूने स्वतःच धडपडून एका उपहारगृहात डिलिव्हरी बॉय म्हणून काम मिळवले आहे. सायकलवरून रात्री-बेरात्री त्याने खाद्यपदार्थ लोकांना नेऊन पोहचवले आहेत.कुठल्या ना कुठल्या उंच इमारतीच्या तळघरातील पार्किंगमध्ये अनेक असंघटीत मजुरांप्रमाणे तोही आसरा घेत राहिला आहे.केकच्या दुकानात काम करताना सईद हा दक्षिण अमेरिकन मुलगा त्याचा दोस्त झाला आहे.बिजूसारखा तो भेदरून रहाणारा नाही.बिनधास्त रहाण्याची त्याची अशी एक जीवनशैली आहे.बिजूला त्याच्यासोबत आश्वस्त वाटते.पण सईदवर फिदा होणाऱ्या मुलीही अनेक आहेत.बिजूला त्या भानगडीत पडायचे नाही.सईद कोणा एका मुलीशी लग्न करतो आणि बिजूपासून दुरावतो.पण असे होणारच हे बिजूनेही आता स्वीकारलेले आहे. अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थ बनवून आणि गिऱ्हाईकांना ते पोहचवून मांसाहाराची एकप्रकारची घृणा बिजूच्या मनात निर्माण होते. एखाद्या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये काम तो शोधतो आहे. ‘गांधी कॅफे’ हे एका गुजराथी माणसाचे रेस्टॉरंट त्याला काम देते. एवढेच नाही तर जेवण आणि रहाणे दोन्हीची सोय त्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झाल्याने बिजूची वणवण संपते.लौकरच तो गुजराथी मालक हरेशभाई-हॅरीचा विश्वासातला नोकर बनतो. हॅरीने तरूणपणी अमेरिकेत येऊन आपले रेस्टॉरंट सुरू केले आहे आणि आता त्याचे भारतीय शाकाहारी पदार्थ देणारे रेस्टॉरंट म्हणून चांगले नाव झाले आहे.हॅरीची बायको पारूलबेन अमेरिकेत आली तेव्हा गुजराथी ग्रामीण बायकांसारखीच होती पण हळूहळू तिने अमेरिकन बायकांसारखी आधुनिक रहाणी स्वीकारली आहे.हॅरीची मुलगी तर अमेरिकेतच जन्माला आली आहे नी तिथेच मोठी झाली आहे. तिला आई-वडीलांबद्दल थोडाही आदर नाही. आत्मकेंद्रीत अमेरिकन युवा पिढीची ती प्रतिनिधी आहे.आपल्या मुलीचे वागणे हॅरीला दुःखी करते आणि तो दारू पित आपले दुःख बिजूला सांगत रहातो.आपण भारतात राहिलो असतो तर असे घडले नसते हे त्याला जाणवते पण आता परत भारतात जाण्याचे त्याचे मार्ग खुंटले आहेत. भौतिक सोयी-सुविधांची सवय झालेल्या हॅरीला आणि त्याच्या पत्नीला आता अमेरिकेतच रहायचे आहे. तो त्यांच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे.बिजू जोपर्यंत हॅरीचा निष्ठावंत,आज्ञाधारक नोकर असतो तोपर्यंत हॅरी त्याला आसरा देतो पण एकेदिवशी बिजू रेस्टॉरंटमध्येच पाय घसरून पडतो आणि जखमी होतो तेव्हा मात्र तो बिजूला आरमासाठी,डॉक्टरी इलाजासाठी पैसे देत नाही. रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातच बिजूला झोपून रहावे लागते आणि जमेल ती कामे करावी लागतात.त्यावेळी बिजूला आपल्या जगण्यातील शोषण, यंत्रवतता, आपला एकाकीपणा अंगावर येतो. बरे झाल्यावर काही दिवसांनी त्याला कॅलिमपॉंगमध्ये सुरू असलेल्या स्वतंत्र गुरखालॅंडची मागणी करणाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल माहिती मिळते. आपले वडील सुरक्षित असतील का याची काळजी वाटून बिजू ट्रंक कॉल लावतो. पण लाईन खराब असल्याने त्याला जेमतेम वडिलांशी दोन-चारच वाक्य बोलता येतात.आपण असेच वडिलांपासून दूर राहिलो तर ते मेले तरी आपल्याला समजणार नाही नी आपले काही बरे-वाईट झाले तर त्यांनाही कळणार नाही असे बिजूला वाटते. मॅनहटनमधील प्रदुषीत अशा हडसन नदीच्या पुलावर उभे असताना कोणीतरी एक विक्षिप्त माणूस त्याच्या शेजारी येऊन उभा रहातो आणि हडसन नदीच्या मूळ नावाचा अर्थ दोन्ही बाजूंनी वहाणारी नदी असा आहे असे सांगतो.बिजूला वाटते की अमेरिका आपले दुहेरी शोषण करते आहे. तो द्विधा मनःस्थितीत सापडतो.सततच्या कामाने आपण आपले माणूसपणच हरवून बसलो आहोत आणि आपले आयुष्य प्रेमशून्य झाले आहे. निसर्गरम्य भारतीय खेड्यांत आपण माणूस म्हणून जगत होतो, मोकळा श्वास घेत होतो, शुद्ध पाणी पित होतो. अमेरिकेत आपण कृत्रीम,रूक्ष आयुष्य जगत आहोत. यापुढे आपण इथे राहू शकणार नाही हे लक्षात आल्यावर आपली जमा केलेली पुंजी खर्च करून बिजू भारतात परत जाण्याचे तिकीट काढतो, घरी नेण्यासाठी टी.व्ही. आणि डिजीटल गोष्टी, कपडे,चॉकलेटस विकत घेतो आणि अमेरिकेचा निरोप घेतो.
भारतीय भूमीवर परत पाऊल ठेवताना बिजूला आपल्या अमेरिकेतल्या सगळ्या कष्टाचा,एकाकीपणाचा विसर पडतो. आपण आपल्या माणसांत आलो असे त्याला वाटते.पण कलकत्त्याहून कॅलिमपॉंगला जाण्यासाठी त्याला बरीच यातायात करावी लागते.कॅलिमपॉंगमधील परिस्थिती अजूनही आटोक्यात न आल्याने तिथे कर्फ्यू असतो. शेवटी गुरखालॅंड चळलीतील माणसांच्या मदतीने बिजू कॅलिमपॉंगला जायला निघतो. वाटेत अनेक ठिकाणी खचलेला रस्ता,कोसळलेल्या दरडी यांचा सामना करत तो कॅलिमपॉंग जवळ पोहचतो खरा पण तिथेच गुरखालॅंड चळवळीतील माणसे त्याला जिपमधून उतरवतात.त्याच्यावर बंदुक रोखून त्याचे सामानही उतरवतात आणि त्याचे सगळे पैसे, सामान,बुट हस्तगत करून ही बिजूला आपली वाटलेली माणसे, जवळच्या एका घराच्या कुंपणावरील फाटका नाईट ड्रेस घालून त्याला जंगलात सोडून देतात. जे कष्टाने कमावले ते सगळे गमावलेला बिजू रडतखडत जंगलातून,अंधारातून कॅलिमपॉंगची वाट शोधत ‘चो ओयु’ बंगल्याच्या फाटकापाशी पोहचतो. फाटक उघडणाऱ्या पन्नालालला तो पिताजी म्हणून मिठी मारतो हे बंगल्यातून सई पाहते. पण तेव्हा तिच्या मनात बंगला सोडून दूर निघून जाण्याचा विचार पक्का झालेला असतो.
सईला कॅलिमपॉंग सोडून जावेसे वाटते आहे कारण तिला तिच्या प्रेमात प्रतारणेचा अनुभव आला आहे.सई सात वर्षांची असताना च्यो आयु बंगल्यात आल्यावर आपले आजोबा कसे स्वतःच्या इंग्रजी रितीभाती सांभाळण्यातच धन्यता मांडणारे आहेत ते ती पाहते. तिला स्वतःला डेहराडूनच्या कॉन्वेंट शाळेतून बाहेर पडल्यावर सुटका झाल्यासारखे वाटते आहे.कॅलिमपॉंगच्या शाळेत ती जाऊ लागते. पण तिथल्या शिक्षणाबद्दल तिचे आजोबा निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल नाखुष असल्याने सईला लहानपणापासूनच चो आयु बंगल्याच्या जवळच्या मॉन ऍमी नावाच्या बंगल्यात राहणाऱ्या नोमिता(नोनी) व लोलिता (लोला)या बंगाली भाषिक भगिनींकडे शिकवणीसाठी पाठवले जाते. नोनी ही विधवा आहे तर लोला ही अविवाहीत आहे. नोनीची मुलगी इंग्लंडला बीबीसी मध्ये काम करते याचा तिला विलक्षण अभिमान आहे. एकंदरीत इंग्रजी भाषा, इंग्रजी एटीकेटस, इंग्रजी खाद्यपदार्थ अशा संस्कृतीतील या दोन भगिनी आहेत. त्यातील विशेषतः लोला ही इंग्रजी भाषा व साहित्य तसेच अन्य विषयही सईला शिकवू लागते.सईला त्या बंगल्यात प्रेमाची ऊब मिळाल्यासारखे वाटते. त्या घरातील मुस्तफा नावाचा बोका तिचा लाडका होतो.नोनी आणि लोला या भगिनींच्या परिचयाची सगळी मंडळी सईचीही परिचीत होतात. त्यात फादर बुटी हे स्विस मिशनरी आहेत तसेच अंकट पॉटी हे दाक्षिणात्य गृहस्थ आहेत.याखेरीज अफगाणची राजकन्या, मिसेस सेन अशी इतर मंडळीही सईच्या परिचयाची होतात. लहान सई सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरते.पण कालांतराने सईच्या अभ्यासक्रमातील गणित व भौतिकशास्त्र हे विषय शिकवणे आपल्या क्षमतेबाहेरचे आहे हे लोलाच्या लक्षात येते. ती सईच्या आजोबांना तसे कळवते. सतराव्या वर्षी सईला गणित व भौतिक शास्त्र शिकवायला कॅलिमपॉंगच्या महाविद्यालयातील एक हुशार नेपाळी तरूणाची ग्यानची नेमणूक केली जाते. हा तरूण आठवड्यातले काही दिवस संध्याकाळी ‘चो आयु’ मध्ये सईची शिकवणी घ्यायला येऊ लागतो. प्रारंभी तो सईशी औपचारिकतेने वागतो आणि फक्त शिकवत रहातो. पण नंतर तारूण्यसुलभ आकर्षण सई आणि ग्यान या दोघांच्याही मनात जागे होते आणि ते बंगल्याबाहेर भेटू लागतात.सईला पहिल्यांदाच असे प्रेम मिळाल्याने ती विलक्षण सुखावते.शारीरिक आकर्षणात वाहू लागते.पण अचानक स्वतंत्र गोरखालॅंडची मागणी करणारी दहशतवादी चळवळ जोर धरू लागते आणि आपण सईच्या प्रेमात अडकणे ग्यानला अपराधीपणाचे वाटू लागते. सई आणि तिच्यासारखी श्रीमंत मंडळी आपले दुःख, आपला जीवनसंघर्ष समजूच शकत नाहीत अशी जाणीव होऊन ग्यान सईशी तोडून वागू लागतो.तिच्या राहणीमानाची खिल्ली उडवू लागतो.सई त्यामुळे दुखावते.
गोरखालॅंडची मागणी करणारे सशस्त्र जमाव कॅलिमपॉंगमधील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवतात.श्रीमंतांच्या घरात,आवारात घुसून त्यांच्या जागेवर अतिक्रमण करू लागतात.सईच्या घरात घुसून तिच्या आजोबांच्या बंदुका घेऊन जाणारे तरूण गुरखालॅंडची मागणी करणाऱ्या अतिरेकींच्या गटातीलच असतात. त्यांना आजोबांच्या बंदुकींबद्दल ग्यानकडून कळले असावे हा अंदाज सई बांधते. तो खोटा नसतो.सई ग्यान तिच्या घरी शिकवायला येण्याचे अचानक थांबवतो तेव्हा न रहावून त्याचे घर शोधत त्यांच्या वस्तीत पोहोचते. ग्यानच्या व त्याच्या वस्तीतील लोकांचे दारिद्र्य सईला अस्वस्थ करते.सईला पाहून ग्यान त्याच्या घरातून बाहेर येतो.सईला काय हवे आहे, ती त्याच्या घरापर्यंत का आली आहे असे प्रश्न विचारून तो सईशी अलिप्तपणे वागतो.सई त्याला ढोंगी,भ्याड म्हणते आणि आपल्या घरी येऊन चीज टोस्ट खाताना,प्रेमाने अलिंगन-चुंबन घेताना आपली श्रीमंती त्याला कशी
चालली असा भोचक प्रश्न विचारते तेव्हा ग्यान हसू लागतो. त्याला तिचे प्रश्न बालीश वाटतात.पण सई जेव्हा त्यानेच आपल्या घरी दहशतवादी तरूणांना आजोबांच्या बंदुका चोरायला पाठवले असा आरोप ग्यानवर करते तेव्हा तो चवताळतो आणि सईला मारतो.सई अपमानीत होऊन चो आयु बंगल्याकडे निघून जाते. ग्यानला त्याची आजी घरात बोलावून समज देते आणि त्याचे स्वतंत्र गोरखालँडची मागणी करणाऱ्या अतिरेकी संघटनेत सामील होणे कसे चुकीचे आहे हे ती त्याला पटवते.ग्यानला आपली चूक जाणवते आहेच. तो अतिरेकी संघटनेपासून दूर रहायचे ठरवतो.
‘चो आयु’ बंगल्यातील न्यायाधीश जेमूभाई पटेलांच्या बंदुका चोरीला गेल्याची तक्रार पन्नालालने नोंदवल्यावर पोलीसांवर आरोपी कोण याचा शोध घेण्याची जबाबदारी येते. पण ते तसा शोध न घेता रोज दारू पिऊन रस्त्यावर बेहोश होऊन पडणाऱ्या एका माणसालै पोलीस कोठडीत आणून बेदम मारतात आणि त्यानेच न्यायाधीशांच्या घरच्या बंदुका चोरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवून त्याला तुरूंगात टाकतात.मारहाणीने त्या माणसाचा एक डोळा फुटतो पण पोलीसांना त्याबद्दल काही वाटत नाही. या माणसाची बायको आणि वडील गावातून चालत चो आयु बंगला शोधत येतात. ते न्यायाधीश जेमुभाईल पटेलांना विनंती करतात की तूरूंगात नाहक अडकवून ठेवलेल्या निरपराध माणसाला सोडून देण्यासाठी न्यायमुर्तींना रदबदली करावी. पण न्यायमुर्ती जेमुभाईनां यात पडायचे नसल्याने ते या गरीब माणसांकडे दुर्लक्ष करतात.पन्नालाल आणि सईला या माणसांची दया येते पण त्यांना काही धान्य द्यायला पन्नालाल जातो तोपर्यंत ती दोघे निघून गेलेली असतात.परत एकदा जेव्हा ती दोन माणसे न्यायाधीशांकडे गयावया करत मदतीची याचना करत येतात तेव्हाही न्यायाधीश आपल्याला या भानगडीत पडायचे नाही असे सांगून त्यांना हाकलवून लावतात.न्यायाधीश जेमुभाईच्या सहानुभूतीशून्य वागण्याचा सूड उगवण्यासाठी ही दोन गरीब माणसे बंगल्याच्या मागील जंगलात दबा घरून बसतात आणि सकाळी न्यायाधीशांचा कुत्रा मट्ट बागेत फिरायला आलेला असताना त्याला पोत्यात घालून पळवतात. तो परदेशी वाणाचा कुत्रा विकून आपण थोडेफार पैसे मिळवू शकू असे त्यांना वाटते.
मट्ट हा न्यायाधीशांचा जीव की प्राण आहे.तो एकच सजीव आहे की ज्याच्यावर जेमुभाई पटेलांनी मनापासून प्रेम केले आहे. त्यामुळे मट्ट नाहीसा झाल्याने ते अतिशय व्याकूळ होतात. कधी नाही ते देवाची करूणा भाकतात. पोलिस चौकीत जातात. पण पोलीस सध्या कर्फ्यु आहे. दंगली चालू आहेत, माणसे वाचवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. त्यात तुमचा कुत्रा शोधायला वेळ नाही असे सांगून न्यायाधीशांना घरी पाठवतात. आपला अधिकार आता उपयोगाचा ठरणार नाही हे कळून न्यायाधीश जेमुभाई पटेल आणखीनच सैरभैर होतात. मट्टवर नीट लक्ष ठेवले नाही म्हणून ते पन्नालाल स्वयंपाक्याला दोष देतात. कधी नाही ते न्यायाधीश आपल्याला बोलले हे पाहून पन्नालाल अस्वस्थ होतो. तो दारू प्यायला गेला असाताना ग्यान तिथे त्याला भेटतो आणि सईबद्दल विचारतो.मट्ट बेपत्ता झाल्याने सई रडते आहे हे कळल्यावर ग्यान कसेही करून मी मट्टला शोधून काढून सईला आणून देईन असे आश्वासन पन्नालालला देतो. पन्नालालला त्याच्यावर विश्वास बसत नाही. तो दारूच्या नशेत ‘चो आयु’ बंगल्यावर येतो आणि न्यायाधीश जेमुभाई पटेलांना आपल्या चपला देऊन त्याने आपल्याला बदडून काढा असे विनवत रहातो. जेमुभाईनां तो काय म्हणतो हे आधी कळत नाही पण शेवटी तेही आपला मट्ट बेपत्ता झाल्याचा उद्वेग पन्नालालला बेदम मारून व्यक्त करतात. सई हे पाहून त्यांना रोखू पाहते. पण त्याचवेळी तिच्या मनाला एकप्रकारची अपूर्णता जाणवते.चो आयु बंगल्यात राहून आपण आपले विश्व किती मर्यादीत करून घेतले आहे, आपल्या मनाचा-बुद्धीचा विकासच कसा खुंटला आहे हे अचानक सईला लक्षात येते.आपण आता चो आयुच्या चार भिंतीपलीकडे जाऊन स्वतःचा शोध घेतला पाहिजे असे ठरवते. नेमका त्याचवेळी बिजू अमेरिकेतून आणलेले सगळे सामान, पैसा गमावलेल्या अवस्थेत अंधारात कसाबसा, विकलपणे चो आयुच्या दरवाजात आलेला असतो.पन्नालाल स्वयंपाक्याला तो पिताजी म्हणून मिठी मारताना सई पाहते.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकात अन्य व्यक्तिरेखा व घटनाही आहेत पण त्या दुय्यम महत्त्वाच्या आहेत.त्यात एक आहे फादर बूटी जे स्वित्झर्लंडवरून मिशनरी म्हणून भारतात आले आहेत आणि कॅलिमपॉंगमध्येच पंचेचाळीस वर्षे राहिले आहेत.स्वित्झर्लंड जसा दुग्धजन्य उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे तसाच भारतही बनू शकेल असे फादर बुटींना वाटते आणि ते स्वतःची डेअरी चालवतात. दार्जिंलिंगमधील शाळांना ते चिज पुरवतात.आपल्याप्रमाणेच इतरांनीही दुग्धजन्य उत्पादने बनवली तर कॅलिमपॉंगमधील युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल असे फादर बुटी यांना वाटते.पण प्रत्यक्षात तसे घडत नाही कारण चीज वा अन्य दुग्धजन्य उत्पादनांना कॅलिमपॉंगंमध्ये फारशी मागणीच नाही.फादर बुटींकडे असलेला कॅमेरा ते फुलपाखराचा फोटो काढत असताना पोलीस ताब्यात घेतात. मग फादर बुटी यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याचे पोलीसांना लक्षात येते. गुरखालॅंडची मागणी करणाऱ्यांच्या आंदोलनाला फादर बुटी मदत करतात असा आरोप करून फादर बुटीसाऱख्या निष्पाप माणसाला भारत सोडून जाण्याचे आदेश पोलीस देतात. सईला हे कळते तेव्हा ग्यानला ती दोष देते.ग्यानचा फादर बुटींवर झालेल्या अन्यायात प्रत्य़क्ष काही हात नाही पण नेपाळी अतिरेकी संघटनेत तोही असल्याने सई फादर बुटींवरील अन्यायाचा ठपका ग्यानवर ठेवते.तसेच नोनी व लोला यांच्या बंगल्यात घुसलेली अतिरेकी माणसे, त्यांच्या बंगल्याच्या आवारात आपल्या झोपड्या उभारून अतिक्रमण करणारी माणसे, नोनीला अपमानीत करणारा गुरखा आंदोलनातील अतिरेकी संघटनेचा नायक या सगळ्या घटनाही कथानकात येतात. उपेक्षीत वर्गातील असंतोषाचा विरोध श्रीमंतांवर सूड उगवून कसा व्यक्त केला जातो हे या घटनांतून लेखिका किरण देसाई दाखवतात.अशा हिंसक,उद्दाम विरोधामुळे हे उपेक्षीत समूह त्यांची विश्वासार्हता गमावून बसतात असेही त्यांना म्हणायचे असावे.
कादंबरीतील कथासूत्रे :

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचे हे प्रदीर्घ व व्यामिश्र कथानक लक्षात घेतल्यावर आता आपण या कादंबरीतील कथासूत्रे लक्षात घेऊ.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या प्रारंभी, कथानक सुरू होण्यापूर्वी लेखिकेने जॉर्ज ल्युईस बोर्जेस या कवीची एक कविता उधृत केली आहे. त्या कवितेच्या आधारे जणू लेखिका तिच्या कादंबरीतील कथासूत्रांची चाहुल वाचकांना देते.त्या कवितेचे स्वैर भाषांतर साधारण असे—
“प्रकाशाबद्दलचे लिहिणे अंधारावर प्रहार करते, उल्केपेक्षा ते अधिक शक्तीशाली ठरते
ती उंच अनाकलनीय शहरे गावकुसांचा घास घेतात
माझे जीवन आणि मृत्यूबद्दल खात्री ठेवून मी महत्त्वाकांक्षांचे निरीक्षण करतो
आणि त्यांना समजून घेणे मला आवडेल
त्यांचे दिवस हावरट आणि हवेत उडवलेल्या असूडासारखे.
त्यांच्या रात्री जणू पोलादी क्रोधापासून विश्रांती,आक्रमणसाठी चपळ.
ते बोलतात माणुसकीबद्दल.
माझी माणुसकी या भावनेत की आपण सारे एकाच दारिद्र्याचे आवाज आहोत.
ते बोलतात स्वदेशाबद्दल.
माझा स्वदेश म्हणजे गिटारची लय,थोडी व्यक्तीचित्रे,एक जुनी तलवार
सांजवेळीची मांडवातील वेलींची दिसलेली प्रार्थना
काळ म्हणजे जगणारा मी
माझ्या सावलीपेक्षाही मूक,मी प्रचंड धनलोलूप अगणितांमधून चालतो
ते अपरिहार्य आहेत,उद्यासाठी एकमेव सुयोग्य
माझे नाव कोणीतरी आणि कोणीही
मी सावकाश चालतो,त्याच्यासारखा जो इतक्या दूरून येतो की त्याच्या येण्याची अपेक्षाच नसते.”
जॉर्ज बोर्जेस यांची ही कविता आधुनिक जगातील माणसांच्या जगण्यातील पेच मांडते. एकाबाजूला पैसा आणि तो मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असणारे आजच्या जगात अपरिहार्य आहेत तर दुसरीकडे वेगवेगळ्या कारणांनी परात्मतेचा अनुभव घेणारी,आपली ओळख विसरलेली अगणित सामान्य गरीब माणसे म्हणजे केवळ मूक सावल्या झाल्या आहेत याबद्दलची अस्वस्थ करणारी जाणीव बोर्जेस यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.नेमकी हेच ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचे एक कथासूत्र आहे.
‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकात दोन आर्थिक वर्गातील,दोन भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली माणसांच्या जगण्यातील विसंगती, विरोधाभास लेखिका संवेदनशीलतेने दाखवते आहे.तिला कोणत्याही एका वर्गाचे समर्थन करायचे नसावे किंवा कोणत्याही एका वर्गाबद्दल सहानुभूती दाखवायची नसावी.लेखिकेला एकाच जगातील दोन भिन्न रहाणीमाने,दोन भिन्न भावविश्वे परस्परांसमोर उभी करायची असावीत. शक्य असेल तिथे ही दोन जगे परस्परांना छेद देतात तेव्हा काय होते? अशावेळी दोन भिन्न जगांतील व्यक्तींच्या मनात कोणत्या संवेदना निर्माण होतात आणि ते कोणती कृती करतात याचा बारकाईने वेध कादंबरीच्या माध्यमातून लेखिका घेताना दिसते.संपूर्ण मानवजातीलाच काहीतरी मिळवण्याच्या नादात काहीतरी ‘गमावण्याचा जणू वारसाच’(Inheritance of loss) मिळाला आहे हे कथासूत्र ‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या शीर्षकातून लेखिका सुचवते.या कादंबरीच्या कथानकात अशा काही मिळवण्याच्या नादात काही गमावणाऱ्या व्यक्तींच्या कहाण्या आणि समूहांचे किंवा सभ्यतांचे संघर्ष तुकड्या तुकड्याने वाचकांच्या मनावर आदळतात.
युरोपियनांच्या साम्राज्यवादामुळे भारत,नेपाळ,श्रीलंका या एक वसाहती बनल्या आणि या भूभागात पूर्वापार रहात असलेल्या मानवसमुहांची सभ्यता,संस्कृती मागासलेली आहे असे म्हणून ती मागे रेटत ब्रिटीशांनी त्यांची भाषा, त्यांची सभ्यता व संस्कृती या वसाहतींवर लादली. ब्रिटीशांच्या राजवटीत वसाहतीतील काहींना ज्ञान-विज्ञानाचे दरवाजे खुले झाले,त्यांना विवेकवाद,लोकशाही,आधुनिकता यांचा परिचय झाला.अशांतील मोजक्या लोकांनीच खरं तर भारतात स्वातंत्र्य चळवळ सुरू केली.पण असेही काही लोक होते ज्यांनी त्यांना मिळालेल्या इंग्रजी शिक्षणाचा,प्रशासकीय नोकऱ्यांचा उपयोग स्वतःची सर्वांगीण प्रगती करून घेण्यासाठी करताना आपल्या सभोवतीच्या सर्वसामान्यांना तुच्छ लेखले,त्यांना अपमानीत करून क्रूरपणे वागवले.म्हणजे परकीय ज्ञान आणि आधुनिकता मिळवताना या तथाकथित प्रतिष्ठीत,अधिकारी वर्गाने आपली मूळ मानवतावादी मूल्ये, आपल्या सभ्यतेतील कौटुंबीक नातेसंबंधांतील प्रेमाचा ओलावा हे सगळे गमावले.कादंबरीतील निवृत्त न्यायाधीश जेमुभाई पटेल अशाच लोकांचे प्रतिनिधित्व करतात.
ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून भारतीय द्विपसमुहातील भूप्रदेश कालौघात मुक्त झाले असले तरी या संपूर्ण प्रदेशातील कितीतरी आदिम टोळ्यांना,भूमीपुत्रांना आपली जमीन,जंगल,पाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीचे अधिकार गमावून बसल्याचा अनुभव आला.आपण फसवले गेलो, आपल्याला अस्तित्वच उरले नाही अशी उपेक्षेची जाणीव घेऊन जगणे कठीण झाल्याने यातील कितीतरी समुहांनी वेळोवेळी उठाव केले, सशस्त्र दहशतवादी संघटना उभारल्या आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती ज्यांनी हिरावून घेतली असे त्यांना वाटत होते त्या श्रीमंतांना, प्रशासनाला दहशत दाखवून पुन्हा आपले गमावलेले सगळे परत मिळवण्याचा प्रयत्न ही उपेक्षीत मंडळी जागोजागी करू लागली. त्यात खालीस्तानवादी होते, गोरखालॅंडची मागणी करणारे होते, तामिळ वाघ होते, बलुची होते, बोडो होते आणि अन्य उपेक्षीतही होते.आजही हे मणीपूर, मध्यप्रदेश,झारखंडमधील आदिवासींचे संघर्ष संपलेले नाहीत.परिणामी या उपेक्षीत समुहांची स्वतःची प्रतिमा देखील डागाळते आहे.हे समूह आपल्या अस्तित्वाच्या,अस्मितेच्या संघर्षात आपली विश्वासार्हता गमावून बसत आहेत. ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचे हेही एक कथासूत्र आहे.
दारिद्र्याचे, बेरोजगारीचे चटके भोगणाऱ्या भारत आणि अन्य विसनशील देशांतील सामान्य माणसांना आपला देश सोडून अमेरिकेसारख्या देशात स्थलांतर करून पैसा मिळवण्याची संधी घ्यावी असे वाटणे स्वाभाविक होते. पण ही संधी घेताना प्रचंड असुरक्षितता, शोषण,परात्मता,प्रेमशून्यता यांचा सामना या असंघटीत कामगार म्हणून जगणाऱ्या अमेरिकेतील स्थलांतरीतांना करावा लागला. म्हणजे भौतिक संपत्ती मिळवण्याच्या नादात या बेकायदेशीरपणे स्थलांतरीत झालेल्या लोकांनी आपल्या आयुष्यातले प्रेम, नातेसंबंध,समाधान, शांती आणि आत्मसन्मान गमावला. ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ कादंबरीतील बिजूच्या करूण कहाणीतून हेच कथासूत्र लेखिका वाचकांसमोर मांडते आहे. आज तर ते कथासूत्र अधिकच समर्पक झाले आहे.
सई या व्यक्तिरेखेच्या कल्पनारम्य प्रेमसंबंधात तिच्या वाट्याला आलेली स्वाभाविक प्रतारणा दाखवत आपल्याच सुरक्षित कोषात जगणाऱ्या भारतातील एका विशिष्ट वर्गाचा वास्तवाशी संबंध तुटला आहे हे कथासूत्र किरण देसाई यांनी प्रभावीपणे कादंबरीत उलगडले आहे.सईला प्रेम हवेसे वाटते,ज्ञान हवेसे वाटते पण त्यासाठी आपली सुरक्षितता सोडावी लागेल याचे भान तिला कादंबरीच्या अखेरीस आलेले दिसते.
अशाप्रकारे काहीतरी मिळवले पण काहीतरी गमावले,काहीतरी मिळवण्याची मोठीच किंमत चुकवावी लागली असा प्रत्यय मानवजातीला जणू वारशासारखा मिळाला आहे हे सूत्र किरण देसाई यांनी ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकातून वाचकांसमोर प्रभावीपणे उलगडले आहे असे म्हणता येईल.
तुम्हाला ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ ही कादंबरी वाचावी असे वाटावे अशी अपेक्षा करते.पुढील ब्लॉगमध्ये दी इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करू.
-गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा